१९९६ च्या ईश्वरशासित सेवा प्रशालेपासून लाभ मिळवा—भाग २
१ सन १९४३ मध्ये, ईश्वरशासित सेवा प्रशालेच्या आरंभानंतर लगेचच, संस्थेच्या एका शाखेने असा अहवाल दिला: “या अत्युत्तम व्यवस्थेला, ज्या बांधवांनी जाहीर वक्ते होण्याची कल्पनाही केली नव्हती अशा अनेकांना व्यासपीठावर फार कार्यक्षम आणि क्षेत्रात अतिशय प्रभावकारी बनण्यास मदत करण्यामध्ये अल्पावधीतच यश मिळाले आहे.” आम्हा सर्वांना हवे असलेले सर्वोत्तम प्रशिक्षण ही प्रशाला देतच आहे.
२ बायबल वाचन: ज्या लोकांना भाषणाचे भाग दिले जातात तेच केवळ या प्रशालेपासून लाभ घेतात असे नाही. खरे पाहता, आम्हा सर्वांना एक नेमणूक आहे—साप्ताहिक बायबल वाचन. प्रत्येक आठवडी बायबलचे कोणते अध्याय वाचले जावेत हे प्रशालेचा आराखडा दाखवतो. दररोज बायबलचे वाचन करण्याच्या महत्त्वावर जोर देणाऱ्या अनेक शास्त्रवचनीय स्मरणिका आहेत. (यहो. १:८; स्तोत्र १:२; प्रे. कृत्ये १७:११) बायबल वाचन चांगल्या आध्यात्मिक आरोग्याकरता आवश्यक आहे; ते मन आणि अंतःकरणाचे पोषण करते. दररोज केवळ पाच मिनिटे बायबलचे वाचन केल्यास, आपण आराखड्यानुसार आपला क्रम राखू शकू. वर्षाच्या शेवटी, आपण देवाच्या वचनातील १५० पेक्षा अधिक अध्याय वाचून काढले असतील. बायबल आपल्या हाताशी असल्यास, आपल्याला त्यातील काही भाग दररोज वाचता आला पाहिजे.
३ बोधप्रद भाषण: बांधवांना निष्ठावान, आवेशी सेवेकरता प्रवृत्त करण्यासाठी बोधप्रद भाषण देणाऱ्या वक्त्याने, समज करून देण्यासाठी व यहोवा, त्याचे वचन आणि त्याच्या संघटनेविषयी गुणग्राहकता वाढवण्यासाठी शिकवण्याच्या चांगल्या पद्धतींचा उपयोग करावयास हवा. वडील आणि सेवा सेवक, चांगली तयारी करणे, विषयाला धरून त्यांचे भाषण तयार करणे, खात्रीने बोलणे आणि साहित्यामध्ये जिवंतपणा आणणे यांद्वारे हे साध्य करू शकतात. (इब्री. ४:१२) वक्त्याने त्याच्या नेमलेल्या समयापुरतेच भाषण मर्यादित ठेवणे हे महत्त्वपूर्ण आहे. “प्रत्येक शास्त्रलेख” (इंग्रजी) हे पुस्तक बायबल शास्त्रवचनांनी पूर्ण भरलेले आहे आणि आपल्याला आध्यात्मिकरित्या लाभदायक असू शकणारे पुष्कळ मनोवेधक शास्त्रवचनीय साहित्य सादर करते. उद्घोषक (इंग्रजी) या पुस्तकात यहोवाच्या दृश्य संघटनेच्या आधुनिक दिवसाचा इतिहास आहे आणि त्यात विश्वास, आवेश, भक्ती आणि प्रीती प्रदर्शित केलेल्या वास्तविक लोकांच्या जीवनातील घटनांचे कथन केले आहे. आपल्या ईश्वरशासित संस्कृतीविषयी आणि आधुनिक काळात यहोवाने त्याच्या लोकांना कशा प्रकारे आशीर्वादित केले आहे त्याविषयी पुष्कळसे अद्याप शिकावयाचे आहे. यहोवाच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सखोल अंतर्दृष्टी प्राप्त करण्यास आणि बायबलच्या तत्त्वांचा व्यक्तिगत अवलंब करण्यास उपासनेतील ऐक्य हे पुस्तक आपल्याला मदत करते.
४ बायबलचे ठळक मुद्दे: ही नेमणूक मिळालेल्या बांधवांनी, मंडळीच्या फायद्यास्तव व्यावहारिक मार्गाने लागू करता येतील अशी विशिष्ट वचने निवडावीत. यासाठी नेमलेल्या अध्यायांचे वाचन, त्यांच्यावर मनन, आणि निवडक वचनांचा अर्थ स्पष्ट करणारे काही मुद्दे मिळावेत म्हणून त्यांच्यावर संशोधन करण्याची गरज आहे. वॉच टावर पब्लीकेशन्स् इंडेक्स याच्या मागच्या बाजूला, “शास्त्रवचनांची सूची” आहे जी बायबलच्या विशिष्ट वचनांबद्दल माहिती शोधण्याकरता उपयुक्त ठरू शकते. हा भाग हाताळणाऱ्या बांधवांनी चांगले बुद्धिचातुर्य वापरावे आणि असंबंधित साहित्य समाविष्ट करण्याचे टाळावे. सहा मिनिटांत उचितपणे पुरेल त्यापेक्षा अधिक साहित्य त्यांनी तयार करू नये.
५ आपण सर्वजण ईश्वरशासित सेवा प्रशालेपासून लाभ मिळवू शकतो. त्यापासून आपल्याला वक्तृत्वाच्या आणि शिकवण्याच्या आपल्या क्षमतेला सुधारण्यास मदत मिळू शकते. या तरतुदीचा पुरेपूर फायदा घेतल्याने, आपली “प्रगति सर्वांस दिसून यावी म्हणून” आपल्याला नक्की मदत मिळेल.—१ तीम. ४:१५.