आमच्या व्यक्तीगत परिश्रमांना अनुसरून कापणी करणे
१ यहोवाने मानवजातीसाठी असणारी आपली प्रीती विविध मार्गाने व्यक्त केली आहे. एका जमलेल्या जनसमुदायापुढे येशूने देवाच्या अप्रतिम प्रेमाविषयी बोलताना म्हटले की देव “वाइटांवर व चांगल्यावर आपला सूर्य उगवतो आणि नीतीमानांवर व अनीतीमानांवर पाऊस पाडतो.” (मत्तय ५:४३-४८) आणखी एका प्रसंगी येशूने आपल्या पित्याच्या सर्वोच्च प्रेमाचे प्रमाण दिले—त्याच्या एकुलत्या एका पुत्राचे यज्ञार्पण. हे देवाने आमच्या तारणासाठी पुरविले. (योहान ३:१६) यहोवाच्या प्रेमाला आपल्या श्रोत्यांनी रसपूर्ण प्रतिसाद द्यावा असे येशूने म्हटले. आम्ही देखील हेच करीत आहोत का?
२ यहोवाच्या प्रेमाची पूर्ण रसिकता आपणाला दाखवावयाची आहे व त्यापासून आपला चिरकाल लाभ मिळवावयाचा आहे तर त्याला आपण जाणले पाहिजे. (योहान १७:३) आम्हाला त्याची सेवा त्याला पसंत वाटणाऱ्या मार्गाने कशी करता येईल याविषयीच्या सूचना व मार्गदर्शन आम्ही ग्रहण केले पाहिजे. यहोवाने आपल्याला त्याचे प्रेरित वचन पवित्र शास्त्र देऊन तसेच ज्याकडून आपल्याला सूचना व सल्ला मिळू शकेल त्या त्याच्या अद्भुत संस्थेला सामोरे आणून आपली प्रेमळ प्रीती दाखवली आहे. (मत्तय २४:४५-४७; २ तीमथ्य ३:१६, १७) यहोवाचे समर्पित लोक या नात्याने आम्हाला त्याच्या मार्गाचे शिक्षण मिळाले आहे. पण यहोवाच्या प्रीतीची जाण आपल्याठायी आहे हे आम्ही आमच्या व्यक्तीगत परिश्रमाद्वारे दाखवतो का? त्याला संतुष्ट करावे व त्याद्वारे स्वतःला लाभ मिळवून घ्यावा म्हणून आम्ही त्याच्या सूचना ग्रहण करतो का? (यशया ४८:१७; याकोब १:२२) प्रेषित पौलाने १ करिंथकर ३:८ मध्ये असे लिहिलेः “लावणारा व पाणी घालणारा हे एकच आहेत, तरी प्रत्येकाला आपापल्या श्रमाप्रमाणे मजुरी मिळेल.”
३ होय, देव आमच्या बाबतीत जे अपेक्षून आहे त्यानुसार आम्ही काम केलेच पाहिजे. अर्थात, प्रत्येकाची आध्यात्मिक दृष्टीने एकाच प्रमाणात प्रगति होत नाही, हे खरे. आमची प्रगती ही पुष्कळ गोष्टींवर अवलंबून असते, त्यामुळे इतरांसोबत निराशादायक तुलना करणे हे सूज्ञ स्वरुपाचे नाही. तथापि, आम्ही जे व्यक्तीगत श्रम करतो ते महत्त्वाचे आहे. आम्हाला संस्थेच्या अधिक समीप असण्याजोगे असे काय करता येईल? ख्रिस्ती या नात्याने आमच्या व्यक्तीगत जबाबदाऱ्या स्वीकारण्यामध्ये सुधारणा करता येतील अशी काही क्षेत्रे आहेत का? मंडळीच्या कार्यहालचालींना अधिक पाठिंबा देण्यासाठी कोणते प्रयत्न करावे लागतील? संस्था आम्हाला सूचनारुपाने जे मुद्दे प्रस्तुत करीत आहे त्यापैकी काहींचा अवलंब करण्याची गरज भासत आहे का?—१ तीमथ्य ४:१६.
विश्वासू जनांचे उदाहरण अनुसरा
४ आमचे विश्वासू भाऊ व बहिणी कित्येक दशकापासून देवाच्या राज्याची सुवार्ता विश्वासूपणे घोषित करीत आहेत. (१ करिंथ. ११:१) त्यांनी देवाच्या प्रीतीस प्रतिसाद दिला आणि आपले परिश्रम तसेच पवित्र शास्त्रीय सूचना अनुसरण्याचा व्यक्तीशः प्रयत्न केल्यामळे पुष्कळ लाभ मिळवले. ते मंडळीत क्रियाशील कामकऱ्यांचा एक मजबूत संच निर्माण करतात, आणि ते आपली व्यक्तीगत जबाबदारी झटकून देत नाहीत. त्यांच्या या व्यक्तीगत श्रमाची आज आपण फळे पाहात आहोत.—रोम. १:१३; २ करिंथ ३:१-३.
५ आता दर वर्षी, हजारो नवीन लोक संस्थेकडे घोळक्याने येत आहेत. (यशया ६०:८) हे देखील पूर्ण रुपाचे आध्यात्मिक व्यक्ती बनण्यासाठी झटत आहेत, आणि यांची प्रचाराची कामगिरी तसेच उत्साह स्तुत्य आहे. यहोवा, आपली सेवा परिश्रमाने करणाऱ्यांना कसे आशीर्वादित करीत आहे हे पाहून ते लाभ उचलतात. प्रौढ बंधू-भगिनींचे उदाहरण नव्या लोकांना शिकवते की, ही वेळ, देवाच्या सेवाकार्यात आपला हात आखडून घेण्याची किंवा मंद बनण्याची नाही. आपण नवे किंवा अनुभवी प्रचारक असलो तरी आपण आपल्या आध्यात्मिकतेत वाढ करीत आहोत का, आपल्या व्यक्तीगत ख्रिस्ती जबाबदाऱ्यांचा स्वीकार करीत आहोत का व सर्व ईश्वरशासित तरतुदींचा लाभ घेत आहोत का?
शिकलेल्या गोष्टींचा अवलंब करणे
६ आपण ‘आचरण करणारे असावे’ हे याकोबाने लिहीण्याच्या बऱ्याच काळाआधी मोशेने यहुद्यांना म्हटले होतेः ‘तुम्ही ही वचने अनुसरा.’ (याकोब १:२५; अनु. ११:१८, न्यू.व.) यास्तव केवळ ज्ञान पुरेसे नव्हते. त्या यहुद्यांनी नियमशास्त्रातील वचनांचे अनुकरण करून यहोवाच्या आज्ञेत राहायचे होते. हे मूलभूत तत्त्व आजही तसेच आहे. आज्ञाधारकपणाचे मोल देवाचा पुत्र येशू याला तर नक्कीच ठाऊक होते. (योहान ८:२८) तो मत्तय ७:२४ मध्ये म्हणालाः “जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका सूज्ञ मनुष्यासारखा ठरेल.”
७ विभागीय संमेलनात आपल्याला जे शिकायला मिळते त्याचा आम्ही अवलंब करतो का? खासपणे या काळात आपण जागृत राहून सावध का असले पाहिजे ते आपल्याला कळते का? दियाबलाचे युक्तीबाज हल्ले व त्याने लावून ठेवलेले पाश याबाबतीत आम्ही दक्ष आहोत का? मंडळीत नैतिक व आध्यात्मिक शुद्धता टिकवून ठेवण्याच्या अनुषंगाने संस्था आम्हाला वारंवार ज्या सूचना व इशारे देते त्याविषयीची आपण कदर करतो का? आपण जे ऐकतो त्याचा किती प्रमाणात अवलंब करीत आहोत?—याकोब १:२३-२५.
८ यहोवा जसा पवित्र आहे त्याप्रमाणेच आपणही पवित्र असावे यावर सध्याच्या खास संमलेन दिवशी भर देण्यात आला आहे. (१ पेत्र १:१४-१६) पवित्रता याचा अर्थ धार्मिक शुद्धता किंवा स्वच्छता, पावित्र्य हा होय. ते देवाची सेवा करण्यासाठी वेगळे करण्यात आलेली स्थिती दर्शविते. आम्हाला सुवार्तेची सेवा सोपवण्यात आली आहे. यास्तव, आपल्याला सत्याचे पवित्र वचन वाहता यावे म्हणून आध्यात्मिक, नैतिक व शारीरिकरित्या शुद्ध असलेच पाहिजे. हे करण्यासाठी आपण स्वतःकडे वाजवीपेक्षा अधिक लक्ष दिले पाहिजे. (इब्री. २:१) आम्ही हे केले तर आमच्या व्यक्तीगत परिश्रमांना अनुसरून आम्ही कापणी करू शकू.
व्यक्तीगत अभ्यासाचे लाभ
९ व्यक्तीगत अभ्यास आमचा विश्वास दृढ करतो आणि सत्याविषयीची आमची आत्मियता वाढवतो. तो आम्हाठायी आत्मविश्वास उभारतो व आपल्याला अधिकारवाणीने बोलण्यास सुसज्ज करतो. तो आम्हाठायी अंतर्दृष्टी व समज देतो आणि नवे मनुष्यत्व धारण करण्यास मदत देतो. (कलस्सै. १:९-११) तथापि, फलदायी अभ्यासासाठी वेळ व परिश्रमाची गरज आहे, आणि अचूक ज्ञान व आध्यात्मिक खोली ग्रहण करण्यासाठी कोणत्याही आडवाटा नाहीत. आपण अभ्यासासाठी जितके देतो तितकेच आपल्याला त्याकडून मिळेल.—२ करिंथ ९:६, ७; गल. ६:७.
१० मंडळीच्या सभांची तयारी करण्यासाठी आम्ही पुरेसा वेळ बाजूला काढतो का? यहोवा आपल्या विश्वासू व बुद्धिमान दासाद्वारे जी आध्यात्मिक भरवणूक देत आहे त्याविषयी आदर दाखविण्याचा हा एक मार्ग आहे. सभांची योग्य तयारी आम्हाला देवाच्या वचनाचे नियमित वाचन व अभ्यास करण्याच्या आराखड्यास अनुसरण्यास मदत देते. आपल्याला ईश्वरशासित उपाध्यपणाच्या शाळेतील कार्यक्रमात पवित्र शास्त्र वाचनाचा जो आराखडा नेमून दिलेला आहे त्यासाठी दर आठवडी आपण वेळ देतो का? दर दिवशी वाचन करून त्यावर मनन करायला केवळ काहीच मिनिटे लागतात. सेवा सभा ही आम्हाला आमचे जाहीर सेवकपण कोणकोणत्या मार्गाने प्रभावी करता येईल त्याविषयी दक्ष राहण्यास मदत देते. तर मग, आम्ही ते साहित्य सेवाकार्यात कसे लागू करू शकतो याची तयारी खास लक्ष देऊन करतो का? शिवाय ते लगेच अमलात आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो का? टेहळणी बुरुज अभ्यास तसेच मंडळीचा पुस्तक अभ्यास यांच्या तयारीसाठीही खास व्यवस्था करण्यास हवी. हे आम्ही करीत आहोत का?
सभेत सहभागी होणे
११ आम्ही सभेत सहभागी झाल्यास त्यापासून अधिक लाभ मिळवू शकतो. सभेची पूर्वतयारी व सभेत सहभागी होण्याचे प्रयत्न करणे हे आम्हाला सभांच्या दरम्यान लक्ष देण्यास आणि इतरांनी केलेल्या विवेचनांकडून लाभ मिळवून घेण्यास अधिक सोपे करते. काही लोक, त्यांनी सभेत पहिले उत्तर देण्यासाठी किंवा ईश्वरशासित शाळेत आपले पहिले भाषण देण्यासाठी जी पराकाष्ठेची तयारी केली होती ती अद्याप आठवून सांगतात. आता जरी बुजरेपणा हा बहुतेक राहिला नसला तरी आमची आध्यात्मिक प्रगती सर्वांना दिसून यावी यासाठी आपण अधिक श्रम घेत आहोत का? (१ तीमथ्य ४:१५) आमच्या विवेचनांमुळे दुसऱ्यांना लाभ घडतो व उत्तेजन मिळते. आमची चांगली तयारी झालेली असली, जे साहित्य सभेत हाताळले जाणार आहे त्याचा अभ्यास केलेला आहे तर त्यात अर्थपूर्ण रितीने घेतलेला सहभाग इतरांना प्रीती व सत्कर्मे करीत राहण्यासाठी उत्तेजन देईल.—इब्री. १०:२३-२५.
१२ आमची विवेचने दीर्घ आणि गुंतागुंतीची असू नयेत. खरे म्हणजे एखाद्या शास्त्रवचनाचा अवलंब स्पष्ट करण्याच्या अनुषंगाने जे प्रश्न विचारले जातात त्याचे उत्तर थोडक्यात दिलेले बरे. आमची तयारी चांगली झालेली असली तर मग, आम्हाला स्वतःच्या शब्दात ते उत्तर देता येईल. तसे केल्यास, याकडून आम्हाला व इतरांना मोठा लाभ मिळतो. तो का? कारण आम्ही जे सांगत असतो ते सांगायला तसेच जो मुद्दा आम्हाला समजला आहे तो स्पष्ट करण्यासाठी विचार करण्याची जरुरी असते. यामुळे इतरांना ते साहित्य अधिक सुलभतेने समजण्याची मदत देते. याशिवाय, ती माहिती नंतर दुसऱ्या प्रसंगी वापरता यावी म्हणून स्मरणात ठेवण्याची मदत मिळते.
क्षेत्रावर उदारपणे पेरणी करा
१३ आमचे ख्रिस्ती उपाध्यपण हा सेवेचा एक ठेवा आहे. (२ करिंथ ४:७) तुम्ही याकडे तसे बघता का? सेवकपणाद्वारे आम्हाला इतरांना आमचा विश्वास व्यक्त करण्याची सुसंधि मिळते. येशूने म्हटले की, अंतःकरणाच्या समृद्धितून मुख बोलते. (लूक ६:४५) क्षेत्रकार्यात पूर्ण सहभाग घेता यावा म्हणून आम्ही जितके व्यक्तीगत प्रयत्न करतो तेवढे अधिक लाभ आम्हाला मिळतात. आमची सत्याविषयीची समज अधिक तीक्ष्ण बनते, आणि पवित्र शास्त्राचा अधिक कार्यक्षम पद्धतीने वापर करण्याची कुवत वाढते. दुसऱ्यांपाशी सत्य नेण्याचा व त्यांना आमचा थोर निर्माणकर्ता याजविषयी शिकून घेण्याची मदत देण्याचा आनंद आम्हाला मिळतो. देवाची राज्यसत्ता व त्याचे सार्वभौमत्व यांचा खरेपणा याविषयी साक्षीदार या नात्याने आमची भूमिका राहते. यहोवा संतुष्ट होतो, त्याच्या अधिक सदृष्यतेचे बनता येते आणि त्याच्या इच्छेप्रमाणे करता येते याचा आपल्याला आनंद होत राहतो.—मत्तय ५:४८.
१४ आमच्या व्यक्तीगत श्रमाचे नित्य मूल्यमापन करीत राहिल्यास यहोवास केली जाणारी भक्ती नाममात्र राहणार नाही. याचा काय अर्थ आहे? त्याचा अर्थ आम्ही यहोवाच्या इच्छेची पूर्ति करण्याच्या बाबतीत कधीच अर्धवट अंतःकरणाचे राहणार नाही, त्याची सेवा दाखविण्यासाठी करणार नाही आणि अंतःकरणपूर्वक निष्ठा व प्रयत्न यांचा अभाव दर्शविणारे मोजकेच तास त्याच्या कार्यात घालविणार नाही. यहोवास दिली जाणारी आमची सेवा पूर्ण हृदयाची असली पाहिजे. त्याच्या सेवेमध्ये आपणापाशी जे आहे ते देण्याचे आमचे शास्त्रवचनीय कर्तव्य आहे. (कलस्सै. ३:२३, २४) हे खरे की, प्रत्येकाची परिस्थिती भिन्न असते आणि यहोवा, आम्हास शक्य आहे त्यापेक्षा अधिक मागणी करीत नाही. पण, जे आम्हाला करता येऊ शकते त्याची मात्र तो अपेक्षा धरतो! (मत्तय २२:३७) आमची पतित मानवी प्रवृत्ती ही अंग काढून घेण्याकडे झुकलेली असल्यामुळे आम्ही स्वतःचे वेळोवेळी परिक्षण करणे बरे आणि देवाच्या सेवेत कोठे सुधारणा करता येऊ शकते ते पाहणे बरे. हे करण्याचा आमचा प्रघात आहे का?
१५ यहोवाच्या सेवेत सर्वोत्तम देण्यामध्ये व्यक्तीगत ध्येये व इच्छा यांना अडखळण बनू न देण्यासाठी सतत दक्ष राहिले पाहिजे. सुखोपभोग, छंद व मनोरंजन यांना त्यांच्या जागी ठेवले पाहिजे. याचप्रमाणे प्रापंचिक कामात अधिकपणे गुंतण्यापासून स्वतःला सावध ठेवले पाहिजे. मत्तय ६:२२, २३ मध्ये दिलेला येशूचा सल्ला ग्रहण करण्यामुळे आम्हाला आध्यात्मिक आस्था जोपासण्यासाठी अधिक परिश्रम करता येईल व अधिक लाभ मिळवता येतील.
१६ आपण नवे मनुष्यपण धारण करीत राहण्याचा प्रयास करीत असता, मंडळीच्या सभा, संमेलने, अधिवेशने आणि प्रकाशने यांजकरवी मिळणाऱ्या सूचना व सल्ला अनुसरण्याची आपली व्यक्तीगत जबाबदारी ग्रहण करण्याची तयारी ठेवू या. आम्हापैकी प्रत्येकजण खूप अभ्यास करीत राहो, सभेत उत्साहाने भाग घेत राहो, आणि आपल्या परिस्थितीनुरुप शिष्य बनविण्याच्या कामी सहभागी होत राहो. अशाप्रकारे देवाच्या प्रेमास रसिकपूर्णतेने प्रतिसाद दिल्यामुळे आम्हाला आता बहुत पटीने आध्यात्मिक आशीर्वाद मिळण्याची आणि यहोवाच्या नव्या जगात चिरकालिक जीवन प्राप्त करण्याच्या मजबूत आशेची हमी राहील.