यहोवाच्या मार्गदर्शनाचा तुम्ही फायदा करून घेत आहात का?
१ आज लाखो लोक समस्यांवर मात करून आनंदी कसे राहता येईल हे जाणून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. यासाठी ते असंख्य सल्लाविषयक पुस्तके वाचतात किंवा वेगवेगळ्या संस्थांच्या कार्यक्रमांना जातात. यामुळे काहीजणांना फायदाही झाला आहे असे ते सांगतात. पण आज सर्वसामान्य माणसाच्या जीवनाबद्दल विचार केल्यास या मानवी संस्थांच्या मार्गदर्शनाने त्यांना शांतिपूर्ण, समाधानी जीवन जगण्याकरता मदत झाली आहे असे दिसते का? निश्चितच नाही!—१ करिंथ. ३:१८-२०.
२ पण दुसरीकडे पाहता, आपल्या निर्माणकर्त्याने आज अतिशय मोलवान मार्गदर्शन विनामूल्य पुरवले आहे. ज्यांना कोणाला इच्छा आहे ते देवाच्या मार्गदर्शनाचा स्वीकार करू शकतात. अर्थात यहोवाची इच्छा आहे की प्रत्येकाने त्याच्या मार्गदर्शनाचा फायदा करून घ्यावा. लोकांना सरळ मार्गाने चालता यावे म्हणून त्याने त्याचे वचन मार्गदर्शन म्हणून दिले आहे. तसेच त्याने आज राज्याची सुवार्ता देखील जगभर घोषित करण्याची तरतूद केली आहे. (स्तोत्र १९:७, ८; मत्त. २४:१४; २ तीम. ३:१६) यहोवाच्या आज्ञांचे पालन केल्यामुळेच जीवन खऱ्या अर्थाने आनंदी होते.—यश. ४८:१७, १८.
३ यहोवाचे मार्गदर्शन कोणत्याही सल्लाविषयक पुस्तकांतून किंवा व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रमांतून मिळणाऱ्या माहितीपेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. यहोवाचे वचन व त्याची संस्था आपल्याला त्याच्या अनेक तरतुदींविषयी सांगते; या तरतुदींचा आपण पुरेपूर फायदा करून घेतल्यास आपल्याला खरी मदत मिळू शकते; शिवाय, या ज्ञानामुळे होणारे चांगले परिणाम कायमस्वरूपी आहेत.—१ पेत्र ३:१०-१२.
४ मंडळीच्या सभांतून फायदा करून घ्या: यहोवा आपली मनापासून काळजी घेतो त्यामुळेच तो आपल्याला मार्गदर्शन देतो. त्याच्या मार्गदर्शनाकडे आपण लक्ष दिल्यास आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. त्याने आपल्याकरता आठवड्यातून पाच सभांची तरतूद केली आहे. या सभांना उपस्थित राहिल्यामुळे देवाविषयीच्या आपल्या ज्ञानात भर पडते. यहोवाशी जवळचा नातेसंबंध जोडून वाईट गोष्टींपासून स्वतःला कशाप्रकारे अलिप्त ठेवावे हे आपल्याला या सभांतून कळून येते. आणि साहजिकच या ज्ञानामुळे आपले जीवन आनंदी होते.
५ एवढेच नाही. मंडळीच्या सभा आपल्याला आपली ‘अंतःकरणे विशाल करण्याची’ संधी देतात. (२ करिंथ. ६:१३) सभांच्या निमित्ताने आपण मंडळीतल्या बांधवांशी ओळख वाढवू शकतो. त्यांना प्रोत्साहन देऊ शकतो आणि आपल्यालाही त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळते. प्रेषित पौलाने रोमकरांना लिहिताना हेच सांगितले होते. (रोम. १:११, १२) ख्रिस्ती बांधवांसोबत एकत्र येण्याचे सोडून दिलेल्यांना त्याने सक्त ताकीद दिली होती.—इब्री. १०:२४, २५.
६ जीवनात खरे समाधान व आनंद मिळवण्याचा एक मार्ग म्हणजे इतरांबद्दल स्वारस्य असणे. आपण इतरांच्या आनंदात भर पाडण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे आपल्याला प्रोत्साहन दिले जाते. यामुळे ख्रिस्ती सभांमधून केवळ आपल्यालाच फायदा होत नाही तर मंडळीतल्या बांधवांनाही आपल्या सहवासाचा फायदा होतो. म्हणूनच आपण सभांमध्ये मनःपूर्वक सहभाग घ्यावा अशी आपल्याकडून अपेक्षा केली जाते.
७ तीमथ्याला लिहिताना प्रेषित पौलाने याविषयी मार्गदर्शन केले होते; त्याने म्हटले: “स्वतःला सतत देवाच्या भक्तीमध्ये गुंतवण्याची सवय ठेव.” (१ तीम. ४:७, इजी टू रीड व्हर्शन) प्रत्येकाने स्वतःला विचारून पाहावे: ‘मी असे करतो का? सभांमध्ये शिकलेल्या गोष्टींचा फायदा करून घेण्याचा मी प्रयत्न करतो का?’ सभांमध्ये शिकलेल्या गोष्टी लक्ष देऊन ऐकण्याची आणि त्यांनुसार वागण्याची आपण सवय लावली असेल तरच या प्रश्नांची होकारार्थी उत्तरे आपण देऊ शकू. केवळ सभांमध्ये शिकवणाऱ्या बांधवांच्या गुणांकडे आपण लक्ष देऊ नये. तर मार्गदर्शन करणारा मुळात आपला महान शिक्षक यहोवा देव आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. विश्वासाच्या डोळ्यांनी पाहिले तरच आपल्याला हे ओळखता येईल.—यश. ३०:२०.
८ ईश्वरशासित सेवा प्रशाला व सेवा सभा: या सभांद्वारे आपल्याला ख्रिस्ती सेवेत निपुण होण्याकरता मदत केली जाते. ईश्वरशासित सेवा प्रशाला ही खरोखरच एक शाळा आहे. यात विद्यार्थ्यांना नियमितपणे मार्गदर्शन व सुधारणेसाठी सल्ला दिला जातो. या शाळेत तुम्हाला चारचौघांसमोर बोलण्यात व देवाचे वचन परिणामकारक पद्धतीने शिकवण्यात प्रगती करण्याची संधी मिळते. पण या तरतुदीचा पुरेपूर फायदा करून घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम त्या शाळेत नाव नोंदवावे लागेल. तसेच, सभांना नियमित उपस्थित राहून त्यांत सहभाग घ्यावा लागेल. तुम्हाला मिळालेल्या भाषणांची मन लावून तयारी करणे देखील महत्त्वाचे आहे. शिवाय, जेव्हा तुम्हाला सुधारणा करण्याचा सल्ला दिला जातो तेव्हा तो स्वीकारून त्याचे पालन केल्यास तुमची नक्कीच प्रगती होईल.
९ आपली ख्रिस्ती सेवा किती महत्त्वाची आहे हे आपल्याला सेवा सभेतून शिकायला मिळते. तसेच शिष्य बनवण्याच्या कार्यात आपण कशाप्रकारे सहभाग घेऊ शकतो हे देखील या सभेतून आपल्याला शिकायला मिळते. या दोन सभांतून मिळणाऱ्या मार्गदर्शनाचा तुम्ही व तुमच्या कुटुंबातील सदस्य पुरेपूर फायदा करून घेत आहेत का? एका ख्रिस्ती जोडप्याने म्हटले: “सेवा सभेतून आम्हाला दैनिक वचनाच्या कौटुंबिक चर्चेचे महत्त्व पटले. आम्ही दैनिक वचनाची दररोज चर्चा करत नव्हतो, पण आता आम्ही ती करू लागलो आहोत.” या कुटुंबाला यामुळे कोणता फायदा झाला आहे? या दांपत्याने पुढे असे म्हटले: “जेवणाच्या वेळी सोबत बसून एकमेकांशी बोलताना आम्हाला खूप आनंद वाटतो, पूर्वीसारखी वादावादी आता होत नाही.” त्यांच्या लहान मुलांनाही सभांतून काही फायदा झाला आहे का? हो निश्चितच. त्या मुलांची आई असे म्हणते: “आमच्या मुलांवर सभांचा किती खोलवर परिणाम होत आहे हे आम्हाला स्पष्ट दिसतं. एकदा आमचा सहा वर्षांचा मुलगा खोटं बोलत असल्याचं आमच्या लक्षात आलं. आणि नेमक्या त्याच आठवडी ईश्वरशासित सेवा प्रशालेतील पहिलं भाषण खोटं बोलणं या विषयावर होतं. भाषण सुरू झालं तेव्हा आमच्या मुलाचा चेहरा अगदी पाहण्यालायक झाला होता. त्याला वाईट वाटलं हे अगदी स्पष्ट दिसत होतं. त्याने अगदी केविलवाणा चेहरा करून त्याच्या बाबांकडे पाहिलं आणि गप्प बसून राहिला. साहजिकच त्याला धडा मिळाला होता. त्यानंतर तो कधीही खोटं बोलला नाही.”
१० सेवा सभेत दिल्या जाणाऱ्या सूचनांचा एका पायनियर बहिणीला खूपच फायदा झाला. कसा? ती सांगते: “मी सेवेत नेहमी एकाच पद्धतीनं बोलते. कधीकधी मला वाटतं की आमची राज्य सेवा यात दिलेल्या सूचना आमच्या क्षेत्रात परिणामकारक ठरणार नाहीत. पण सेवा सभेत जेव्हा या सूचना उपयोगात आणण्याचं प्रोत्साहन दिलं जातं तेव्हा मात्र मला खूप उत्साह येतो आणि सांगितल्याप्रमाणे मी त्या सूचनांचं पालन करते. आणि यामुळे सेवेतला माझा आनंद द्विगुणीत होतो.” या बहिणीने पहिल्याच भेटीत बायबल अभ्यास सुरू करण्याविषयी देण्यात आलेल्या मार्गदर्शनाचे बरेच आठवडे पालन केले. तिच्या प्रयत्नांना यश आले कारण मदतीकरता देवाला प्रार्थना करत असलेल्या एका मुलीशी तिची भेट झाली आणि या मुलीने पहिल्याच भेटीत बायबल अभ्यास सुरू केला.
११ कधीकधी सभेतील काही भाषणांतून वैयक्तिक बाबींविषयी बायबलचा सल्ला देण्यात येतो; असे भाषण ऐकताना स्वतः यहोवा तुमच्याशी बोलत आहे असे तुम्हाला जाणवते का? एका बांधवाने सांगितले: “अलीकडेच सभेत एका भाषणात वक्त्याने मनोरंजनाविषयी सांगितलं. ख्रिस्ती लोकांकरता कोणत्या प्रकारचं मनोरंजन उचित आहे आणि कोणतं अनुचित याविषयी त्या भाषणात सांगण्यात आलं. मला टीव्हीवर बॉक्सिंग पाहण्याची खूप हौस होती. पण हे भाषण ऐकल्यानंतर मला जाणवलं की बॉक्सिंग सारख्या खेळात खऱ्या ख्रिस्ती लोकांनी रस घेणं उचित नाही. त्यानंतर मी बॉक्सिंग पाहण्याचं सोडून दिलं.” तर अशाप्रकारे जरी या बांधवाने काही काळ एका हिंसक प्रकारच्या खेळात रस घेतला तरीसुद्धा यहोवा परमेश्वराकडून आलेल्या मार्गदर्शनाचा स्वीकार करून त्याने ते सोडून दिले.—स्तोत्र ११:५.
१२ जाहीर भाषण, टेहळणी बुरूज अभ्यास आणि मंडळीचा पुस्तक अभ्यास: दर आठवडी जी जाहीर भाषणे आपल्याला ऐकायला मिळतात, त्यांत बायबलच्या अनेक विषयांवर चर्चा केली जाते. या भाषणांतून मिळणाऱ्या मार्गदर्शनाचा तुम्ही फायदा करून घेत आहात का? एका ख्रिस्ती पतीने त्याला जाहीर भाषणामुळे झालेल्या लाभाविषयी सांगितले: “एका जाहीर भाषणात आत्म्याच्या सर्व फळांविषयी सांगण्यात आलं होतं. या भाषणात वक्त्याने ते स्वतः आत्म्याची फळे विकसित करण्याचा कसा प्रयत्न करतात हे सांगितलं. त्यांनी सांगितलं की दर आठवडी ते एका गुणावर लक्ष केंद्रित करतात आणि आठवड्याभर तो विशिष्ट गुण स्वतःत आणण्याचा प्रयत्न करतात. आठवड्याच्या शेवटी आपण दैनंदिन जीवनात तो गुण विकसित करण्यात कितपत यशस्वी ठरलो याविषयी ते आत्मपरीक्षण करतात. यानंतर पुढच्या आठवडी ते एका नवीन गुणाकडे लक्ष देतात. वक्त्याने स्वतःविषयी दिलेली ही माहिती मला खूपच आवडली. मीसुद्धा त्यांच्याप्रमाणेच करू लागलो.” शिकलेल्या गोष्टींचे पालन करण्याचे हे किती चांगले उदाहरण आहे!
१३ टेहळणी बुरूज अभ्यासातून आपल्याला जीवनाच्या वेगवेगळ्या प्रसंगांत बायबलच्या तत्त्वांचे कशाप्रकारे पालन करावे हे शिकायला मिळते. जीवनातल्या वेगवेगळ्या आव्हानांना तोंड देऊनही मनाची शांती कशी टिकवून ठेवावी हे आपल्याला या अभ्यासातून कळून येते. तसेच, टेहळणी बुरूज अभ्यासामुळे आपल्याला सत्याचे प्रगतिशील ज्ञान मिळते. उदाहरणार्थ, “असे होणे अवश्य आहे,” “वाचणाऱ्याने समजून घ्यावे,” आणि “दक्ष आणि कष्टाळू असा!” या मे १, १९९९ अंकातील टेहळणी बुरूज लेखांतून तुम्हाला फायदा झाला नाही का? या लेखांचा अभ्यास केल्यानंतर तुमच्यावर कसा परिणाम झाला? येशूने भविष्याविषयी दिलेल्या इशाऱ्याची तुम्ही दखल घेत आहात हे तुम्ही आपल्या कृतींतून दाखवून देत आहात का? “ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्रस्थानात” उभा राहिल्यानंतर ज्या परीक्षांना तोंड द्यावे लागेल त्यांसाठी तुम्ही स्वतःची तयारी करत आहात का? (मत्त. २४:१५-२२) तुमच्या जीवनातील ध्येयांवरून आणि तुमच्या जीवनशैलीवरून तुम्हाला भौतिक गोष्टींपेक्षा यहोवाच्या नावाचे पवित्रीकरण जास्त महत्त्वाचे वाटते, हे दिसून येते का? खरोखर टेहळणी बुरूज अभ्यासातून आपल्याला या काळाची निकड ओळखून त्वरित कार्य करण्याचे प्रोत्साहन मिळत नाही का?
१४ मंडळीच्या पुस्तक अभ्यासातूनही आपल्याला किती शिकायला मिळते याचा विचार करा. सध्या आपण बायबलमधील दानीएल पुस्तकाचा अभ्यास करत आहोत. मागच्या चार महिन्यांत या पुस्तकाचा अभ्यास करताना दर आठवडी आपला विश्वास अधिक दृढ झाला असे तुम्हाला जाणवले नाही का? यहोवाचा प्रिय संदेष्टा दानीएल याच्याप्रमाणे आपणही आपला विश्वास पक्का करू इच्छितो, जेणेकरून आपल्याला सर्व परीक्षांना तोंड देता येईल.
१५ यहोवा आपल्याला आनंदी जीवन जगण्याचे मार्गदर्शन देतो: देवाच्या आज्ञांचे पालन केल्यामुळे आपल्याला जीवनातील बरेच दुःखदायक प्रसंग टाळता येतील. शिवाय खरा आनंद आपल्याला अनुभवता येईल. यहोवाच्या मार्गदर्शनानुसार चालल्यामुळे आपण त्याच्या कार्यात प्रत्यक्ष सहभागी होतो. आणि साहजिकच देवाचे कार्य करणारे सर्वात आनंदी लोक आहेत.—१ करिंथ. ३:९; याको. १:२५.
१६ मंडळीच्या सभांमध्ये शिकवल्या जाणाऱ्या गोष्टी लक्ष देऊन ऐकण्याची सवय लावा. ऐकत असताना, या गोष्टींचा जीवनात कसा उपयोग करणार याचा नेहमी विचार करा. (योहा. १३:१७) यहोवाची उत्साहाने सेवा करा आणि पूर्ण मन लावून सेवा करा. तुमचा आनंद दिवसेंदिवस वाढत जाईल. तुमचे जीवन अधिकाधिक अर्थपूर्ण होत जाईल. आणि यहोवाचे मार्गदर्शन तुम्हाला खरोखर हितकारक ठरेल.