तरुणांनो, सभांचा पुरेपूर फायदा करून घ्या
१ एक मुलगी म्हणते: “कधीकधी मला वाटतं, की आम्हा वाढत्या वयातल्या मुलाचं जीवन सर्वात कठीण असतं. अनैतिकतेत गुंतलेल्या, ड्रग्स व पिण्याची सवय असलेल्या मुलांमुलींच्या सहवासात आम्हाला राहावं लागतं.” तुम्हालाही असेच वाटते का? मग अशा सवयी असलेल्या मुलांचा तुमच्यावर वाईट परिणाम होऊ नये म्हणून तुम्ही काय करू शकता? यासाठी यहोवाचेच मार्ग सर्वात उत्तम आहेत यावर तुमचा विश्वास असणे महत्त्वाचे आहे. कारण असा विश्वास असल्याशिवाय “त्याला ‘संतोषविणे’ अशक्य आहे.” (इब्री. ११:६) मंडळीच्या सभांना नियमित उपस्थित राहिल्यामुळे तुमचा विश्वास दिवसेंदिवस दृढ होत जाईल आणि यामुळे वाईट गोष्टींपासून दूर राहण्याचा तुमचा संकल्प देखील दृढ होत जाईल.
२ सभांतून तुम्ही बरेच काही शिकू शकता: जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत एकत्र बसून जेवायला तुम्हाला आवडत नाही का? सभांना उपस्थित राहताना देखील तुम्ही असाच आनंद अनुभवू शकता, अर्थात, आध्यात्मिक दृष्टीने.
३ सभांमध्ये अनेक विषयांवर चर्चा केली जाते. अगदी आपल्या दररोजच्या समस्यांपासून तर बायबलच्या गहन भविष्यवाण्यांच्या रोचक अभ्यासापर्यंत. या चर्चांतून आपल्या ज्ञानात भर पडते. उत्तम सवयी कशा लावाव्यात व दररोजच्या जीवनातील समस्यांना कसे तोंड द्यावे याविषयी अतिशय व्यवहार्य मार्गदर्शन केले जाते. सभांना येणारे लोक जगातल्या लोकांपेक्षा कितीतरी पटीने चांगले असतात, शिवाय सभांमधील वातावरण आनंददायक असते, तेथे तुम्हाला सर्वांशी मनमोकळेपणाने बोलता येते. (स्तोत्र १३३:१) म्हणूनच एका तरुणाने म्हटले: “मी दिवसभर शाळेत असतो, संध्याकाळी घरी येईपर्यंत अगदी थकून जातो. पण सभा या वाळवंटातल्या हिरवळीसारख्या मला वाटतात. सभांना गेल्यावर मला अगदी ताजंतवानं वाटतं आणि दुसऱ्या दिवशी शाळेतील समस्यांना, मोहपाशांना तोंड देण्याची मला शक्ती मिळते.” आणखी एक तरुण म्हणतो: “यहोवावर प्रेम करणाऱ्या लोकांच्या सहवासात राहिल्यामुळे मला यहोवाशी जवळचा नातेसंबंध राखायला मदत मिळते.”
४ ईश्वरशासित सेवा प्रशालेत नाव नोंदवल्यामुळे तुम्हाला हळूहळू बरेच काही शिकायला मिळते. बायबलमधील अनेक विषयांची माहिती गोळा करण्याची संधी मिळते, त्या विषयांवर लहानसे भाषण तयार करायला शिकता येते. शिवाय राज्य सभागृहात इतरांपुढे ते भाषण चांगल्याप्रकारे सादर करण्याचेही प्रशिक्षण मिळते. लोकांचे जीवन वाचवू शकेल असे ज्ञान त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहंचविण्याचे प्रशिक्षण घेणे किती मोलाचे आहे याचा विचार करा. इतके मोलाचे प्रशिक्षण तरुण लोकांना आणखी कोठे मिळू शकेल?
५ सभांचा जास्तीतजास्त फायदा करून घेणे: सभांचा जास्तीतजास्त फायदा करून घ्यायचा असेल तर तीन महत्त्वाच्या गोष्टी केल्या पाहिजेत. तयारी करणे, सहभाग घेणे आणि शिकलेल्या गोष्टींनुसार वागणे.
६ सभांची तयारी करा: सभांची तयारी करण्यासाठी एक निश्चित वेळ ठरवा. मग त्या वेळेत शाळेचे काम, नोकरी किंवा मनोरंजन काहीही आड यायला नको. स्वतःला शिस्त लावा, कारण सभांमध्ये चर्चिल्या जाणाऱ्या विषयांचे आधीपासूनच परीक्षण करणे तुमच्याच फायद्याचे आहे. निश्चित वेळ ठरवल्यामुळे त्या वेळेला सभांची तयारी करण्याची तुम्हाला सवय लागेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ईश्वरशासित सेवा प्रशालेतील दर आठवड्याचे बायबल वाचन न चुकता करा. दर आठवड्याकरता नेमून दिलेले अध्याय वाचण्यासाठी तुम्हाला दररोज फक्त थोडा वेळ राखून ठेवावा लागेल. वाचल्यानंतर त्यावर मनन करा. दर आठवड्याच्या बुक स्टडीची व टेहळणी बुरूज अभ्यासाचीही तयारी करा. काहीजण एकदोन दिवसांआधीच हा अभ्यास करून ठेवतात. शक्यतो सेवा सभेच्या सर्व भागांचीही तयारी करा.
७ सहभाग घ्या: बायबल आपल्याला सांगते की येशू अवघ्या १२ वर्षांचा असताना मंदिरात गुरूजनांमध्ये बसून त्यांचे भाषण ऐकताना व त्यांना प्रश्न विचारताना व स्वतः उत्तरे देताना आढळला. (लूक २:४६, ४७) दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, तो त्या चर्चेत अगदी तल्लीन झाला होता. तुम्ही देखील सभांमध्ये सहभाग घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्यांतून अधिक फायदा करून घेता येईल.—नीति. १५:२३.
८ सभांमध्ये शिकवल्या जाणाऱ्या गोष्टींवर लक्ष एकाग्र करणे गरजेचे आहे. कधीकधी भाषण देण्यापेक्षा ते लक्ष देऊन ऐकणे कठीण असते. का? कारण दुसरी व्यक्ती बोलत असताना आपले मन सहज भरकटू शकते. हे टाळण्यासाठी काय करता येण्यासारखे आहे? नोट्स घ्या. नोट्स घेतल्यामुळे तुमचे मन इकडे तिकडे भरकटणार नाही. तसेच बायबलमधील वचने उघडून वक्त्यासोबत वाचा.
९ या शिवाय, सभांमध्ये प्रश्नोत्तरांच्या रूपात चर्चा केली जाते तेव्हा प्रत्येक वेळी त्यात सहभाग घेण्याचा निर्धार करा. विचार करून उत्तर द्या. नीतिसूत्रे १५:२८ म्हणते त्याप्रमाणे: “धार्मिक मनुष्य विचार करून उत्तर देतो.”
१० शिकलेल्या गोष्टींनुसार वागा: सभांमध्ये शिकलेल्या गोष्टींनी तुमच्यात ‘कार्य करावे’ असे तुम्हाला वाटत असेल तर शिकलेल्या गोष्टींनुसार वागा. (१ थेस्स. २:१३) प्रत्येक सभेत शिकायला मिळालेल्या गोष्टींनुसार तुम्ही वागायचे ठरवल्यास आपोआपच तुम्ही यहोवाच्या आणखी जवळ याल. तो तुम्हाला वास्तविक वाटू लागेल आणि सत्याला आपलेसे करून त्यानुसार ‘चालताना’ तुम्हाला खरा आनंद व समाधान प्राप्त होईल.—३ योहा. ४.
११ तर तरुणांनो, नियमितपणे सभांची तयारी करा, त्यांत सहभाग घ्या आणि शिकलेल्या गोष्टींनुसार वागा; असे केल्यास तुम्हाला सभांतून खूप आनंद मिळेल. तसेच, सभांचा पुरेपूर फायदा तुम्हाला घेता येईल. तुमचा विश्वास दृढ होईल आणि यहोवा देवाला विश्वासू राहण्याचा निर्धार देखील पक्का होईल.—स्तोत्र १४५:१८.