यहोवाच्या सर्वोच्च अधिकाराचं समर्थन करा!
“यहोवा आमच्या देवा, गौरव, सन्मान आणि सामर्थ्य मिळण्यास तूच योग्य आहेस; कारण तू सर्व गोष्टी निर्माण केल्या.”—प्रकटी. ४:११.
१, २. आपल्यापैकी प्रत्येकाला कशाची खातरी पटली पाहिजे? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)
आपण आधीच्या लेखात पाहिलं होतं, की मानवजातीवर शासन करण्यास यहोवा योग्य नाही असा दावा सैतानाने केला आहे. सैतानाचं असं म्हणणं आहे, की यहोवा न्यायीपणे शासन करत नाही, आणि देवाऐवजी मानवांनी स्वतःच शासन केलं, तर ते अधिक आनंदी राहतील. सैतानाचं हे म्हणणं खरं आहे का? समजा, मानव स्वतःच शासन करून सर्वकाळाचं जीवन जगू शकला असता तर परिस्थिती कशी असती? तो अधिक आनंदी राहू शकला असता का? देवाच्या शासनापासून पूर्णपणे स्वतंत्र राहणं आणि सर्वकाळाचं जीवन जगणं शक्य असतं, तर तुम्ही खरोखर आनंदी राहू शकला असता का?
२ या प्रश्नांची उत्तरं दुसरा कोणीही तुमच्यासाठी देऊ शकत नाही. प्रत्येकाने स्वतःच यांचा काळजीपूर्वक विचार करायला हवा. असं केल्यास, शासन करण्याची यहोवाची पद्धत सगळ्यात उत्तम आहे आणि आपला पूर्ण पाठिंबा मिळण्यास तो योग्य आहे, हे स्पष्ट होईल. बायबलमध्ये याबद्दल जे काही सांगण्यात आलं आहे त्यावरून आपल्याला याची खात्री पटते. विश्वावर शासन करण्याच्या यहोवाच्या अधिकाराविषयी बायबल काय सांगतं ते आता आपण पाहू.
शासन करण्याचा अधिकार केवळ यहोवालाच
३. सर्वोच्च अधिकारी असण्याचा हक्क यहोवालाच आहे असं का म्हणता येईल?
३ यहोवा सर्वसमर्थ देव आणि निर्माणकर्ता असल्यामुळे तोच विश्वाचा सर्वोच्च अधिकारी आहे. (१ इति. २९:११; प्रे. कार्ये ४:२४) स्वर्गातील एका दृष्टान्तात, ख्रिस्तासोबत राज्य करणाऱ्या १,४४,००० जनांनी म्हटलं: “यहोवा आमच्या देवा, गौरव, सन्मान आणि सामर्थ्य मिळण्यास तूच योग्य आहेस; कारण तू सर्व गोष्टी निर्माण केल्या आणि तुझ्याच इच्छेने त्या अस्तित्वात आल्या आणि निर्माण करण्यात आल्या.” (प्रकटी. ४:११) सर्व गोष्टी यहोवानेच निर्माण केल्या आहेत. त्यामुळे, स्वर्गात आणि पृथ्वीवर राज्य करण्याचा अधिकार केवळ त्यालाच आहे.
४. आपल्याला इच्छास्वातंत्र्य असलं, तरी देवाविरुद्ध बंड करण्याचा अधिकार नाही असं का म्हणता येईल?
४ सैतानाने मात्र काहीच निर्माण केलेलं नाही. त्यामुळे, विश्वावर शासन करण्याचा कोणताही अधिकार त्याला नाही. सैतान आणि पहिलं मानवी जोडपं यांनी यहोवाच्या सर्वोच्च अधिकाराविरुद्ध बंड केलं आणि असं करण्याद्वारे ते उद्धटपणे वागले. (यिर्म. १०:२३) त्यांना यहोवाकडून इच्छास्वातंत्र्य मिळालं होतं. पण, त्यामुळे त्यांना यहोवाचं शासन नाकारण्याचा अधिकार होता का? मुळीच नाही. इच्छास्वातंत्र्यामुळे एखाद्या व्यक्तीला जीवनात निर्णय घेण्याचा व निवड करण्याचा अधिकार मिळतो; पण आपला निर्माणकर्ता, यहोवा याच्याविरुद्ध बंड करण्याचा अधिकार मात्र मिळत नाही. यावरून स्पष्ट होतं, की देवाविरुद्ध बंड करणं म्हणजे इच्छास्वातंत्र्याचा दुरुपयोग करणं. मानव या नात्याने आपल्याला नेहमीच यहोवाच्या शासनाची व मार्गदर्शनाची गरज आहे.
५. देवाचे निर्णय नेहमी योग्यच का असतात?
५ विश्वावर शासन करण्याचा अधिकार यहोवालाच आहे याचं आणखी एक कारण विचारात घ्या. यहोवा आपल्या अधिकाराचा वापर अगदी न्यायीपणे करतो. तो म्हणतो: “मी दया करणारा व पृथ्वीवर धर्म व न्याय चालवणार परमेश्वर आहे; . . . यात मला संतोष आहे.” (यिर्म. ९:२४) योग्य काय आहे हे ठरवण्यासाठी यहोवाला मानवी नियमांची गरज नाही. उलट, योग्यतेचे स्तर तो स्वतःच ठरवतो. त्याने आपल्या परिपूर्ण न्यायबुद्धीच्या आधारावरच मानवांना नीतिनियम घालून दिले आहेत. स्तोत्रकर्त्याने म्हटलं: “नीती व न्याय ही तुझ्या राजासनाचा पाया आहेत.” त्यामुळे, यहोवाने घालून दिलेला प्रत्येक नियम, तत्त्व आणि निर्णय योग्यच असतो. (स्तो. ८९:१४; ११९:१२८) यहोवा न्यायीपणे शासन करत नाही असा दावा सैतान करतो. पण, खरंतर सैतान स्वतःच जगात न्यायनीती स्थापन करू शकत नाही.
६. शासन करण्याचा अधिकार यहोवालाच आहे याचं एक कारण काय आहे?
६ शासन करण्याचा अधिकार यहोवालाच आहे याचं आणखी एक कारण म्हणजे, विश्वाची देखभाल करण्यासाठी लागणारं ज्ञान आणि बुद्धी त्याच्याजवळ आहे. उदाहरणार्थ, यहोवाने आपल्या पुत्राला, असे आजार बरे करण्याची क्षमता दिली होती, जे आजार कोणताही डॉक्टर बरे करू शकला नाही. (मत्त. ४:२३, २४; मार्क ५:२५-२९) आपल्यासाठी ते चमत्कार असतील, पण यहोवासाठी मात्र ते चमत्कार नव्हते. आपल्या शरीराची रचना तो चांगल्या प्रकारे जाणतो आणि शरीराला झालेलं कोणतंही नुकसान तो भरून काढू शकतो. तसंच, तो मृत लोकांना जिवंत करू शकतो आणि कोणतीही नैसर्गिक आपत्ती थांबवू शकतो.
७. सैतानाच्या जगातील कोणत्याही व्यक्तीपेक्षा यहोवाची बुद्धी श्रेष्ठ आहे असं का म्हणता येईल?
७ सैतानाच्या शासनाधीन असलेलं हे जग, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर शांती निर्माण करू शकत नाही. जगात शांती आणण्यासाठी लागणारी बुद्धी केवळ यहोवाजवळ आहे. (यश. २:३, ४; ५४:१३) त्याच्या बुद्धीबद्दल आपल्यालाही प्रेषित पौलसारखंच वाटतं. पौलने म्हटलं: “देवाचे आशीर्वाद किती विपुल आहेत! त्याची बुद्धी व ज्ञान किती अफाट आहे! त्याचे निर्णय गहन आणि मार्ग आपल्या बुद्धीपलीकडे आहेत.”—रोम. ११:३३.
यहोवाची शासनपद्धती सर्वात उत्तम
८. यहोवाच्या शासनपद्धतीविषयी तुम्हाला कसं वाटतं?
८ आतापर्यंत आपण पाहिलं, की विश्वावर शासन करण्याचा अधिकार यहोवालाच आहे हे बायबल स्पष्टपणे दाखवून देतं. पण, यासोबतच यहोवा सर्वात उत्तम शासक का आहे, हेसुद्धा बायबल दाखवतं. एक कारण म्हणजे, यहोवा प्रेमळपणे शासन करतो. बायबल म्हणतं, की तो “दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर” आहे. या गोष्टीचा आपण विचार करतो तेव्हा आपण भारावून जातो. (निर्ग. ३४:६) देव आपल्याला सन्मानाने आणि आदराने वागवतो. आपण स्वतःचीसुद्धा जितकी काळजी घेऊ शकत नाही, तितकी तो आपली काळजी घेतो. सैतानाचं असं म्हणणं आहे, की यहोवा आपल्या सेवकांपासून चांगल्या गोष्टी राखून ठेवतो. पण हे साफ खोटं आहे. उलट, आपल्याला सर्वकाळाचं जीवन जगण्याची आशा मिळावी म्हणून त्याने आपला प्रिय पुत्रही दिला.—स्तोत्र ८४:११; रोमकर ८:३२ वाचा.
९. देवाला प्रत्येक व्यक्तीबद्दल आपुलकी वाटते हे कशावरून दिसून येतं?
९ एक समूह या नात्याने यहोवा आपल्या सर्व लोकांवर प्रेम करतो. पण, त्याच वेळी समूहातील प्रत्येक व्यक्तीबद्दलसुद्धा त्याला तितकीच आपुलकी वाटते. प्राचीन काळात काय घडलं ते विचारात घ्या. जवळजवळ तीनशे वर्षांपर्यंत, यहोवाने शास्ते म्हणजे न्यायाधीश यांच्याद्वारे आपल्या राष्ट्राचं मार्गदर्शन केलं आणि त्यांना शत्रूवर विजय मिळवून दिला. पण, या सबंध काळादरम्यान यहोवाने व्यक्तींचीसुद्धा दखल घेतली. त्यांपैकीच एक रूथ नावाची स्त्री होती. रूथ ही काही इस्राएली नव्हती; पण, यहोवाची उपासक बनण्यासाठी तिने बरेच त्याग केले होते. त्यामुळे, यहोवाने तिला एक पती आणि पुत्र देऊन आशीर्वादित केलं. त्याहून महत्त्वाचं म्हणजे, येणाऱ्या मसीहाची पूर्वज बनण्याचा बहुमान तिला लाभला. याशिवाय, यहोवाने बायबलमधील एका पुस्तकात रूथची जीवनकथा समाविष्ट करण्यास बायबलच्या लेखकांना प्रेरित केलं आणि त्या पुस्तकाला तिचं नावही दिलं. भविष्यात जेव्हा रूथचं पुनरुत्थान होईल आणि या सगळ्या गोष्टी तिला समजतील, तेव्हा तिला कसं वाटेल याची तुम्ही कल्पना करू शकता का? —रूथ ४:१३; मत्त. १:५, १६.
१०. यहोवाची शासनपद्धती जुलमी नाही असं आपण का म्हणू शकतो?
१० यहोवाची शासनपद्धती मुळीच जुलमी नाही. उलट, जे त्याच्या आज्ञांचं पालन करतात ते स्वातंत्र्य आणि आनंद अनुभवतात. (२ करिंथ. ३:१७) यहोवाबद्दल दावीदने म्हटलं: “तेज व प्रताप ही त्याजपुढे आहेत; सामर्थ्य व आनंद त्याच्या स्थानी आहेत.” (१ इति. १६:७, २७) तसंच, एथान नावाच्या स्तोत्रकर्त्यानेही असं लिहिलं: “ज्या लोकांस उत्साहशब्दाचा परिचय आहे ते धन्य! हे परमेश्वरा, ते तुझ्या मुखप्रकाशात चालतात. ते तुझ्या नावामुळे नेहमी उल्हास करतात; तुझ्या न्यायपरायणतेने त्यांची उन्नती होते.”—स्तो. ८९:१५, १६.
११. यहोवाची शासनपद्धती सगळ्यात उत्तम आहे याची आपल्याला अधिकाधिक खातरी कशी पटू शकते?
११ आपण जितकं जास्त यहोवाच्या चांगुलपणावर मनन करू तितकी जास्त आपल्याला खातरी पटेल, की यहोवाची शासनपद्धती सगळ्यात उत्तम आहे. आणि मग आपल्यालाही स्तोत्रकर्त्याप्रमाणेच वाटेल. तो देवाला म्हणाला: “खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्र दिवसांपेक्षा उत्तम आहे.” (स्तो. ८४:१०) यहोवानेच आपली रचना केली आहे व आपल्याला बनवलं आहे, त्यामुळे नेमक्या कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला आनंद मिळू शकतो हे त्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे. तो उदारपणे, आपल्या गरजेपेक्षा जास्त आपल्याला पुरवतो. यहोवा आपल्याला जे काही करायला सांगतो ते आपल्या भल्यासाठीच असतं. म्हणूनच, यहोवाच्या आज्ञांचं पालन केल्यास आपण नेहमी आनंदी राहू; मग त्यासाठी आपल्याला जीवनात कोणतेही त्याग करावे लागले तरीसुद्धा.—यशया ४८:१७ वाचा.
१२. कोणत्या मुख्य कारणामुळे आपण यहोवाच्या सर्वोच्च अधिकाराचं समर्थन करतो?
१२ बायबलमधून आपल्या समजतं, की ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राजवटीच्या शेवटी काही जण यहोवाच्या सर्वोच्च अधिकाराविरुद्ध बंड करतील. (प्रकटी. २०:७, ८) ते असं का करतील? कारण त्या वेळी, सैतान लोकांना स्वार्थीपणे वागण्यास प्रवृत्त करेल. त्याने हे नेहमीच केलं आहे. तो लोकांना कदाचित हे पटवून देण्याचा प्रयत्न करेल, की देवाच्या आज्ञांचं पालन न करताही ते सर्वकाळाचं जीवन जगू शकतात. अर्थात, हे कधीच खरं ठरू शकत नाही. पण मुख्य मुद्दा हा आहे, की अशा खोट्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवणार का? यहोवावर आपलं मनापासून प्रेम असेल आणि त्याच्या चांगुलपणाची व तोच सर्वोच्च अधिकारी आहे याची जर आपल्याला खातरी पटलेली असेल, तर अशा खोट्या गोष्टींचा आपल्याला वीट वाटेल. आणि प्रेमळपणे शासन करणाऱ्या यहोवाच्या सर्वोच्च अधिकाराखाली जीवन जगण्याची आपल्याला इच्छा असेल.
देवाच्या सर्वोच्च अधिकाराचं एकनिष्ठपणे समर्थन करा
१३. आपण यहोवाच्या सर्वोच्च अधिकाराचं समर्थन करत असल्याचं कसं दाखवू शकतो?
१३ आतापर्यंत आपण पाहिलं, की यहोवालाच विश्वावर शासन करण्याचा अधिकार आहे आणि त्याची शासनपद्धती सगळ्यात उत्तम आहे. म्हणूनच, त्याच्या सर्वोच्च अधिकाराचं आपण समर्थन केलं पाहिजे. यहोवाला एकनिष्ठ राहण्याद्वारे आणि त्याचं अनुकरण करण्याद्वारे आपण त्याच्या अधिकाराचं समर्थन करतो. एखाद्या परिस्थितीत यहोवा ज्या प्रकारे वागला असता त्या प्रकारे वागण्याचा आपण शक्य तितका प्रयत्न करतो, तेव्हा आपण हेच दाखवून देतो की आपल्याला त्याची शासनपद्धती पसंत आहे व त्याच्या शासनाचं आपण समर्थन करतो.—इफिसकर ५:१, २ वाचा.
१४. मंडळीतील वडील आणि कुटुंबप्रमुख यहोवाचं अनुकरण कसं करू शकतात?
१४ बायबलमधून आपल्याला समजतं, की यहोवा नेहमी प्रेमळपणे आपल्या अधिकाराचा वापर करतो. त्यामुळे, यहोवाचा सर्वोच्च अधिकार पसंत करणारे कुटुंबप्रमुख आणि मंडळीतील वडील यहोवाचं अनुकरण करतात; ते कधीही इतरांवर जुलूम करत नाहीत किंवा त्यांच्यावर सत्ता गाजवत नाहीत. प्रेषित पौलने देवाचं आणि त्याच्या पुत्राचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. (१ करिंथ. ११:१) त्याने इतरांना लज्जित केलं नाही किंवा योग्य ते करण्याची जबरदस्ती केली नाही. उलट, योग्य ते करण्यास पौलने प्रेमळपणे त्यांना उत्तेजन दिलं. (रोम. १२:१; इफिस. ४:१; फिले. ८-१०) असं करण्याद्वारे पौलने यहोवाचं अनुकरण केलं. आपणसुद्धा इतरांशी प्रेमळपणे वागतो, तेव्हा यहोवाच्या सर्वोच्च अधिकाराचं समर्थन करतो.
१५. अधिकारपदावर असलेल्यांचा आदर करण्याद्वारे आपण यहोवाच्या शासनाचं समर्थन कसं करतो?
१५ यहोवाने ज्यांना अधिकार दिला आहे त्यांचा आदर करण्याद्वारे आणि त्यांना सहकार्य करण्याद्वारे, आपण त्याच्या शासनाचं समर्थन करतो. एखादा निर्णय का घेण्यात आला हे जरी आपल्याला समजत नसलं किंवा त्याच्याशी आपण सहमत नसलो, तरी देवाच्या व्यवस्थेला आपण पाठिंबा देतो. अर्थात, अशी मनोवृत्ती जगातल्या लोकांच्या मनोवृत्तीपेक्षा फार वेगळी आहे. पण, यहोवाला आपला शासक म्हणून स्वीकारल्यानंतर मात्र आपण त्याच्या व्यवस्थेला पाठिंबा देतो. (इफिस. ५:२२, २३; ६:१-३; इब्री १३:१७) शिवाय, यहोवा नेहमी आपल्या भल्याचाच विचार करत असल्यामुळे, आपण जेव्हा अशी मनोवृत्ती बाळगतो तेव्हा आपल्याला आनंद मिळतो.
१६. आपल्या निर्णयांवरून आपण देवाच्या सर्वोच्च अधिकाराचं समर्थ करत आहोत हे कसं दाखवून देऊ शकतो?
१६ जीवनात योग्य निर्णय घेण्याद्वारेसुद्धा आपण देवाच्या सर्वोच्च अधिकाराचं समर्थन करू शकतो. अर्थात, जीवनातील प्रत्येक पैलूच्या बाबतीत यहोवा आपल्याला विशिष्ट आज्ञा देत नाही. पण, एखाद्या गोष्टीविषयी त्याचे विचार काय आहेत हे तो आपल्याला सांगतो. त्यामुळे, एखाद्या परिस्थितीत काय निर्णय घ्यावा हे समजण्यास आपल्याला मदत मिळते. उदाहरणार्थ, ख्रिश्चनांनी कशा प्रकारचे कपडे घालावेत किंवा घालू नयेत याची यादी यहोवाने दिलेली नाही. पण, आपण त्याचे साक्षीदार असल्यामुळे आपला पेहराव शालीन आणि उचित असावा असं तो सांगतो. (१ तीम. २:९, १०) तसंच, आपल्या निर्णयांचा इतरांवर काय परिणाम होईल याचाही आपण विचार करावा असं यहोवाला वाटतं. (१ करिंथ. १०:३१-३३) आपण जेव्हा यहोवाची विचारसरणी लक्षात घेऊन निर्णय घेतो तेव्हा हेच दाखवून देतो, की आपल्याला त्याची शासनपद्धती पसंत आहे आणि त्याच्या शासनाचं आपण समर्थन करत आहोत.
वैयक्तिक निर्णय घेताना आणि आपल्या कौटुंबिक जीवनात, देवाच्या सर्वोच्च अधिकाराचं समर्थन करा (परिच्छेद १६-१८ पाहा)
१७, १८. ख्रिस्ती पती-पत्नी कसं दाखवून देऊ शकतात, की ते यहोवाच्या सर्वोच्च अधिकाराचं समर्थन करतात?
१७ विवाहित ख्रिस्ती यहोवाच्या सर्वोच्च अधिकाराचं समर्थन कसं करू शकतात याचा एक मार्ग विचारात घ्या. एखाद्या जोडप्याचं वैवाहिक जीवन, त्यांनी आशा केली होती तसं कदाचित नसेल. त्यांच्यात कदाचित गंभीर समस्याही असतील. पण, यहोवा प्राचीन इस्राएल राष्ट्राशी ज्या प्रकारे वागला, त्याचा विचार केल्यास त्यांना मदत होऊ शकते. इस्राएल राष्ट्रासाठी यहोवा जणू एका पतीसारखा होता. (यश. ५४:५; ६२:४) पण, त्या राष्ट्राने वेळोवेळी त्याचं मन दुखावलं. ते नातं जणू गंभीर समस्या असलेल्या वैवाहिक जीवनासारखं होतं. पण, यहोवाने इस्राएल राष्ट्रासोबत असलेलं आपलं नातं तडकाफडकी मोडून टाकलं नाही. उलट, त्याने वारंवार त्यांना क्षमा केली आणि दिलेली वचनं पाळली.—स्तोत्र १०६:४३-४५ वाचा.
१८ यहोवावर प्रेम करणारे विवाहित ख्रिस्ती त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या वैवाहिक जीवनात समस्या असल्या, तरी ते आपलं नातं मोडून टाकण्यासाठी चुकीचा मार्ग शोधत नाहीत. त्यांना हे माहीत आहे, की यहोवा विवाहाच्या शपथांना खूप गंभीर लेखतो आणि पती-पत्नीने नेहमी एकमेकांना “जडून” राहावं अशी त्याची इच्छा आहे. बायबलनुसार, अनैतिक लैंगिक कृत्य हे एकच असं कारण आहे, ज्याच्या आधारावर एखादी व्यक्ती घटस्फोट घेऊन पुन्हा लग्न करू शकते. (मत्त. १९:५, ६, ९) ख्रिस्ती पती-पत्नी आपलं वैवाहिक जीवन यशस्वी करण्याचा होता होईल तितका प्रयत्न करतात, तेव्हा ते दाखवून देतात की यहोवाच्या सर्वोच्च अधिकाराचं ते समर्थन करतात.
१९. आपल्या हातून चुका होतात तेव्हा आपण काय केलं पाहिजे?
१९ यहोवाला माहीत आहे, की आपण सर्वच अपरिपूर्ण आहोत आणि त्यामुळे वेळोवेळी त्याचं मन दुखावतो. म्हणूनच त्याने ख्रिस्ताच्या खंडणीची तरतूद केली आहे. त्यामुळे, आपल्या हातून एखादी चूक घडल्यास आपण यहोवाकडे क्षमा मागितली पाहिजे. (१ योहा. २:१, २) घडलेल्या चुकीबद्दल दुःख करत बसण्याऐवजी, आपण त्यापासून शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यहोवासोबतचा नातेसंबंध अधिक मजबूत करत राहिल्यास, तो आपल्याला क्षमा करेल आणि आपल्या दुःखातून बाहेर पडण्यास व त्याची सेवा करत राहण्यास मदत करेल.—स्तो. १०३:३.
२०. आज यहोवाच्या सर्वोच्च अधिकाराचं समर्थन करणं का गरजेचं आहे?
२० येणाऱ्या नवीन जगात सर्व जण यहोवाच्या शासनाधीन राहतील आणि त्याचे नीतिमान मार्ग शिकतील. (यश. ११:९) पण आजही, त्यांबद्दल शिकण्यासारखं बरंच काही आहे. लवकरच, अशी एक वेळ येईल जेव्हा विश्वावर शासन करण्याच्या देवाच्या अधिकारावर कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही. त्यामुळे, यहोवाच्या आज्ञांचं पालन करण्याद्वारे, त्याची विश्वासूपणे सेवा करण्याद्वारे आणि प्रत्येक गोष्टीत त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करण्याद्वारे, आपण यहोवाच्या सर्वोच्च अधिकाराचं समर्थन करण्याचा होता होईल तितका प्रयत्न करू या.