वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w17 जून पृ. २२-२६
  • महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • हा विषय इतका महत्त्वाचा का?
  • हा विषय आपल्या तारणापेक्षाही अधिक महत्त्वाचा
  • ईयोबने त्याचा दृष्टिकोन बदलला
  • महत्त्वाच्या विषयावरून आपलं लक्ष विचलित होऊ देऊ नका
  • ईयोब देवाशी एकनिष्ठ राहतो
    बायबल—मानवजातीला कोणता संदेश देते?
  • ईयोबाने यहोवाच्या नावाचे गौरव केले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • यहोवाच्या सर्वोच्च अधिकाराचं समर्थन करा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • ‘यहोवावर आशा ठेवा’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
w17 जून पृ. २२-२६
आपले खोटे दावे सिद्ध करण्यासाठी सैतान ईयोबवर अतिशय कठीण परीक्षाप्रसंग आणतो. यांत गंभीर आजार आणि सांत्वन करायला आलेल्या खोट्या मित्रांनी केलेला मानसिक छळ सामील या गोष्टी सामील होत्या

महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावा

“तू, केवळ तूच, परमेश्‍वर [“यहोवा,” NW] या नावाने सर्व पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांना कळून येईल.”—स्तो. ८३:१८.

गीत क्रमांक: ४६, १६

तुम्ही काय शिकलात?

  • यहोवाचा सर्वोच्च अधिकार सिद्ध होणं हा विषय महत्त्वाचा का आहे?

  • ईयोबने यहोवाच्या सर्वोच्च अधिकाराचं समर्थन कसं केलं? पण कोणत्या बाबतीत तो कमी पडला?

  • आपण कोणत्या काही मार्गांनी यहोवाच्या सर्वोच्च अधिकाराचं समर्थन करू शकतो?

१, २. (क) अधिक महत्त्वाचा विषय कोणता आहे? (ख) हा विषय आपल्यासाठी महत्त्वाचं का आहे?

आज बऱ्‍याच लोकांसाठी पैसाच सर्वकाही आहे. ते सतत पैशाचा विचार करत असतात. आपल्याला जास्तीत जास्त पैसा कसा कमावता येईल आणि तो कसा टिकवून ठेवता येईल, याचाच ते विचार करतात. तर इतर काहींसाठी त्यांचं कुटुंब, आरोग्य किंवा जीवनात काहीतरी साध्य करणं हेच सगळ्यात महत्त्वाचं असतं.

२ पण या सर्वांहून महत्त्वाचा एक विषय आहे; तो म्हणजे, यहोवाचा सर्वोच्च अधिकार सिद्ध होणं. या विषयाकडे आपलं कधीही दुर्लक्ष होणार नाही ही काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. तसं केलं नाही तर आपण स्वतःच्या समस्यांमध्ये किंवा दैनंदिन जीवनातच इतके गुरफटून जाऊ शकतो, की अधिक महत्त्वाच्या विषयाचा आपल्याला विसर पडू शकतो. पण याउलट, आपण जर यहोवाच्या सर्वोच्च अधिकाराचं समर्थन केलं, तर दैनंदिन जीवनातील समस्यांचा सामना करण्यास आणि यहोवासोबतचा आपला नातेसंबंध आणखी मजबूत करण्यास आपल्याला मदत मिळेल.

हा विषय इतका महत्त्वाचा का?

३. यहोवाच्या शासनाविषयी सैतानाने कोणते दावे केले?

३ विश्‍वावर शासन करण्याचा अधिकार यहोवाला आहे की नाही, असा प्रश्‍न सैतानाने उपस्थित केला आहे. सैतान मानवांना असाही विचार करायला लावतो, की यहोवा एक चांगला शासक नाही आणि तो आपल्या लोकांपासून चांगल्या गोष्टी राखून ठेवतो. त्याऐवजी, मानवांनी स्वतःच राज्य केलं तर ते अधिक आनंदी राहू शकतात असा सैतानाचा दावा आहे. (उत्प. ३:१-५) तसंच, कोणताही मानव यहोवाला एकनिष्ठ राहू शकत नाही आणि कठीण प्रसंगांचा सामना करावा लागल्यास तो यहोवाला आपला शासक म्हणून नाकारेल असाही सैतानाने दावा केला आहे. (ईयो. २:४, ५) पण आपल्या शासनाशिवाय मानवांचं जीवन किती दुःखमय व कष्टमय असेल हे सर्वांना समजावं, यासाठी यहोवाने वेळ जाऊ दिला आहे.

४. सर्वोच्च अधिकार कोणाला आहे, हे सिद्ध होणं गरजेचं का आहे?

४ हे खरं आहे, की सैतानाने केलेले दावे खोटे आहेत हे यहोवाला आधीपासूनच माहीत होतं. मग, सैतानाला त्याचे दावे सिद्ध करण्यासाठी यहोवाने वेळ का दिला? याचं कारण म्हणजे, या वादविषयाशी स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सर्व बुद्धिमान जीव जुडलेले आहेत. (स्तोत्र ८३:१८ वाचा.) आदाम आणि हव्वा यांनी यहोवाचं शासन नाकारलं, आणि आजवर अनेकांनीही तेच केलं आहे. त्यामुळे सैतानाने केलेले दावे खरे आहेत असा काही जण कदाचित विचार करतील. आणि जोपर्यंत मानवांच्या आणि देवदूतांच्या मनात हा प्रश्‍न राहील, तोपर्यंत या जगामध्ये खरी शांती आणि एकता नांदू शकत नाही. पण विश्‍वावर शासन करण्याचा सर्वोच्च अधिकार यहोवालाच आहे हे कायमचं सिद्ध झाल्यानंतर मात्र, सर्व जण त्याच्या चांगल्या शासनाखाली सर्वकाळ जगतील; आणि संपूर्ण विश्‍वात शांती प्रस्थापित होईल.—इफिस. १:९, १०.

५. सर्वोच्च अधिकार यहोवालाच आहे, या महत्त्वपूर्ण विषयाशी आपण कसे जुडलेले आहोत?

५ विश्‍वावर शासन करण्याचा सर्वोच्च अधिकार यहोवालाच आहे हे लवकरच सिद्ध होईल. सैतानाचं व मानवांचं शासन अपयशी होऊन ते कायमचं काढून टाकलं जाईल. पण, मसीही राज्याद्वारे प्रकट होणारं देवाचं शासन मात्र यशस्वी ठरेल. त्या वेळी, यहोवाला विश्‍वासू राहिलेल्या लोकांनी हे सिद्ध केलेलं असेल, की मनुष्य देवाला एकनिष्ठ राहू शकतो आणि त्याच्या शासनाचं समर्थन करू शकतो. (यश. ४५:२३, २४) अशा विश्‍वासू लोकांपैकी आपणही असावं अशी तुमची इच्छा आहे का? नक्कीच, आपल्या सर्वांची हीच इच्छा आहे. म्हणूनच, हा विषय किती महत्त्वाचा आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे.

हा विषय आपल्या तारणापेक्षाही अधिक महत्त्वाचा

६. यहोवालाच सर्वोच्च अधिकार आहे हे सिद्ध होणं किती महत्त्वाचं आहे?

६ यहोवाचा सर्वोच्च अधिकार सिद्ध होणं, आपल्या स्वतःच्या तारणापेक्षा व आनंदापेक्षाही अधिक महत्त्वाचं आहे. पण याचा अर्थ असा होत नाही, की आपलं तारण महत्त्वाचं नाही किंवा यहोवाला आपली मुळीच काळजी नाही. असं आपण का म्हणू शकतो?

७, ८. यहोवालाच सर्वोच्च अधिकार आहे हे सिद्ध झाल्यामुळे आपल्याला कसा लाभ होईल?

७ यहोवाचं मानवांवर खूप प्रेम आहे. खरंतर त्याचं आपल्यावर इतकं प्रेम आहे, की आपल्याला सर्वकाळाचं जीवन मिळावं यासाठी त्याने स्वतःच्या पुत्राला खंडणी म्हणून दिलं. (योहा. ३:१६; १ योहा. ४:९) यहोवाने मानवांना भविष्यासाठी जी अभिवचनं दिली आहेत, ती पूर्ण करण्यास जर तो चुकला तर सैतान आणि इतर विरोधक खरे ठरतील. सैतानाचा दावा आहे की यहोवा देव खोटं बोलतो, अन्यायीपणे शासन करतो व चांगल्या गोष्टी मानवांपासून राखून ठेवतो. यहोवाचे विरोधक त्याने दिलेल्या अभिवचनांची थट्टा करत म्हणतात: “आता कुठे गेलं त्याच्या उपस्थितीचं अभिवचन? आमच्या वाडवडिलांचा मृत्यू झाला तेव्हापासून सर्व गोष्टी निर्मितीच्या सुरुवातीपासून जशा चालल्या होत्या, तशाच अजूनही चालल्या आहेत.” (२ पेत्र ३:३, ४) पण यहोवा त्याची सर्व अभिवचनं नक्की पूर्ण करेल. खरंतर, त्याला सर्वोच्च अधिकार आहे हे सिद्ध करण्यात, त्याने मानवांच्या तारणाचाही समावेश केला आहे. (यशया ५५:१०, ११ वाचा.) यासोबतच, शासन करण्याचा यहोवाचा अधिकार प्रेमावर आधारलेला आहे. त्यामुळे आपण या गोष्टीची खात्री बाळगू शकतो, की तो नेहमी आपल्या एकनिष्ठ सेवकांवर प्रेम करेल आणि त्यांची कदर करेल.—निर्ग. ३४:६.

८ विश्‍वावर शासन करण्याचा सर्वोच्च अधिकार यहोवालाच आहे हे सिद्ध होणं महत्त्वाचं असलं, तरी मानवांच्या तारणाला त्याच्या नजरेत काहीच महत्त्व नाही, असं नाही. उलट, तो मनापासून आपली काळजी करतो. म्हणूनच, अधिक महत्त्वाचा विषय कोणता आहे, हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे आणि यहोवाच्या सर्वोच्च अधिकाराचं एकनिष्ठपणे समर्थन केलं पाहिजे.

ईयोबने त्याचा दृष्टिकोन बदलला

९. सैतानाने ईयोबविषयी कोणता दावा केला? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

९ यहोवाच्या सर्वोच्च अधिकाराबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगणं खूप महत्त्वाचं आहे. याबद्दल आपण ईयोबच्या पुस्तकातून बरंच काही शिकू शकतो. हे बायबलमधल्या सर्वात आधी लिहिलेल्या काही पुस्तकांपैकी एक आहे. या पुस्तकात, सैतानाने ईयोबविषयी केलेल्या दाव्याबद्दल आपल्याला वाचायला मिळतं. त्याने असा दावा केला, की जर ईयोबला संकंटांचा सामना करावा लागला तर तो देवाला नाकारेल. सैतानाने असंही सुचवलं की यहोवाने ईयोबवर संकटं आणावीत. पण यहोवाने तसं केलं नाही; त्याने सैतानाला ईयोबची परीक्षा घेण्याची अनुमती दिली. तो सैतानाला म्हणाला: “त्याचे सर्वस्व तुझ्या हाती देतो.” (ईयोब १:७-१२ वाचा.) त्यानंतर काही काळातच ईयोबने आपले सेवक आणि आपली सर्व मालमत्ता गमावली. तसंच, त्याच्या दहा प्रिय मुलांचादेखील मृत्यू झाला. ईयोबवर आलेली ही सगळी संकटं देवाकडून आहेत असं सैतानाने भासवलं. (ईयो. १:१३-१९) त्यानंतर सैतानाने ईयोबला एका भयंकर आणि घृणास्पद रोगाने आजारी पाडलं. (ईयो. २:७) इतकंच नाही, तर ईयोबची पत्नी आणि त्याचे तीन मित्र यांनी अतिशय वाईट गोष्टी बोलून ईयोबचा धीर खचवला.—ईयो. २:९; ३:११; १६:२.

१०. (क) आपण यहोवाला एकनिष्ठ असल्याचं ईयोबने कसं दाखवून दिलं? (ख) यहोवाला ईयोबचा दृष्टिकोन सुधारण्याची गरज का पडली?

१० मग, सैतानाने केलेला दावा खरा ठरला का? नाही. ईयोबला अत्यंत कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला, तरी त्याने यहोवा देवाला नाकारलं नाही. (ईयो. २७:५) पण, काही काळासाठी मात्र ईयोबने योग्य दृष्टिकोन गमावला. आपण नीतिमान आहोत हेच सिद्ध करण्याचा तो प्रयत्न करत राहिला. तसंच, आपल्यावर जे परीक्षाप्रसंग ओढवले आहेत, त्यामागचं कारण जाणून घेण्याचा आपल्याला अधिकार आहे असंही त्याला वाटलं. (ईयो. ७:२०; १३:२४) ईयोबच्या भावना आपण समजू शकतो. पण ईयोबचा दृष्टिकोन चुकीचा आहे हे यहोवाला माहीत होतं, आणि त्याने तो सुधारला. यहोवाने हे कसं केलं?

११, १२. यहोवाने ईयोबला काय समजण्यास मदत केली? आणि मिळालेल्या सल्ल्याला ईयोबने कसा प्रतिसाद दिला?

११ यहोवाने ईयोबचा दृष्टिकोन कसा सुधारला याबद्दल आपण बायबलमधील ईयोबच्या पुस्तकातील ३८ ते ४१ या अध्यायांत वाचू शकतो. ईयोबला संकटांचा आणि परीक्षांचा सामना का करावा लागत आहे, हे यहोवाने त्याला समजावून सांगितलं नाही. त्याऐवजी, ईयोब हा यहोवा देवाच्या तुलनेत किती छोटा आहे, हे त्याला समजावं अशी यहोवाची इच्छा होती. ईयोबच्या स्वतःच्या समस्यांपेक्षाही जास्त महत्त्वाच्या आणखी कितीतरी गोष्टी आहेत, हे समजण्यास यहोवाने त्याला मदत केली. (ईयोब ३८:१८-२१ वाचा.) यहोवाच्या शब्दांमुळे ईयोबला त्याच्या दृष्टिकोनात बदल करण्यास मदत मिळाली.

१२ पण, ईयोबने इतकं काही सोसल्यानंतरही यहोवाने ज्या प्रकारे त्याला सल्ला दिला, त्यावरून यहोवा त्याच्याशी कठोरपणे वागला असं म्हणता येईल का? नक्कीच नाही; आणि ईयोबनेही तसा कधी विचार केला नाही. यहोवाकडून मिळणारी सुधारणूक ईयोबने स्वीकारली आणि त्याबद्दल कदरही व्यक्‍त केली. तो असंही म्हणाला की, “मी माघार घेऊन धूळराखेत बसून पश्‍चात्ताप करत आहे.” (ईयो. ४२:१-६) याआधी, ईयोबपेक्षा वयानं लहान असलेल्या अलीहूनेदेखील त्याला त्याच्या विचारसरणीत बदल करण्यास मदत केली होती. (ईयो. ३२:५-१०) यहोवाने दिलेला प्रेमळ सल्ला ईयोबने स्वीकारला आणि आपला दृष्टिकोन बदलला, तेव्हा ईयोबच्या एकनिष्ठतेवर आपण खूश असल्याचं यहोवाने इतरांना दाखवून दिलं.—ईयो. ४२:७, ८.

१३. संकटानंतरच्या काळातही यहोवाने दिलेल्या सल्ल्यामुळे ईयोबला कशी मदत मिळाली असेल?

१३ यहोवाने दिलेल्या सल्ल्याचा ईयोबला त्याच्या पुढच्या आयुष्यातही फार उपयोग झाला. बायबल म्हणतं: “परमेश्‍वराने ईयोबाचे उत्तरवय पूर्ववयाहून अधिक सुखसंपन्‍न केले.” कालांतराने त्याला “आणखी सात पुत्र व तीन कन्या झाल्या.” (ईयो. ४२:१२-१४) ईयोबचं त्याच्या या मुलांवर प्रेम असलं, तरी संकटांदरम्यान गमावलेल्या त्याच्या आधीच्या मुलांना तो कधीच विसरला नसेल. तसंच, त्याच्यावर व त्याच्या कुटुंबावर आलेली संकटेही तो कदाचित कधीही विसरू शकला नसेल. आपल्यावर आलेल्या संकटांमागचं खरं कारण ईयोबला कदाचित कालांतराने समजलं असेल. असं असलं तरी, देवाने आपल्यावर इतकी संकटं का येऊ दिली, असा विचार त्याच्या मनात येत असावा. असे विचार मनात आल्यावर, यहोवाने त्याला जे सांगितलं होतं ते त्याला आठवत असेल. आणि त्यामुळे त्याला सांत्वन आणि योग्य दृष्टिकोन बाळगण्यास नक्कीच मदत मिळाली असेल.—स्तो. ९४:१९.

एक बहीण हॉस्पिटलमध्ये ॲडमीट असूनही प्रचार करत आहे; एका बांधवाने फोटोफ्रेमला हृदयाशी धरलं आहे; विपत्ती आलेल्या ठिकाणी एक आई आपल्या मुलीला घेऊन

स्वतःच्या समस्यांऐवजी, आपण यहोवाच्या सर्वोच्च अधिकाराचं समर्थन करण्याकडे लक्ष लावू शकतो का? (परिच्छेद १४ पाहा)

१४. ईयोबाच्या उदाहरणावरून आपण काय शिकतो?

१४ बायबलमधील ईयोबच्या अहवालावर मनन केल्यामुळे आपल्याला सांत्वन मिळू शकतं आणि आपल्या दृष्टिकोनात बदल करण्यास मदत मिळू शकते. बायबलमधील इतर घटनांप्रमाणेच, ईयोबच्या पुस्तकातील घटनाही “आपल्याला शिक्षण देण्याकरता लिहिण्यात आल्या होत्या; यासाठी की, आपल्या धीराने आणि शास्त्रवचनांतून मिळणाऱ्‍या सांत्वनाने आपल्याला आशा मिळावी.” (रोम. १५:४) ईयोबचा अहवाल आपल्याला हे शिकवतो, की आपण स्वतःच्या समस्यांमध्येच इतकं गुरफटून जाऊ नये, की यहोवाच्या सर्वोच्च अधिकाराचा जो महत्त्वपूर्ण विषय आहे त्याकडे आपलं दुर्लक्ष होईल. ईयोबप्रमाणेच आपण कठीण काळातही यहोवाला एकनिष्ठ राहू या आणि या विश्‍वावर शासन करण्याच्या यहोवाच्या अधिकाराचं समर्थन करू या.

१५. संकटांमध्येही यहोवाला विश्‍वासू राहिल्यामुळे काय साध्य होतं?

१५ आपल्यावर संकटं येतात तेव्हा त्याचा अर्थ यहोवा आपल्यावर रागावला आहे असा होत नाही, हे ईयोबच्या अहवालावरून दिसून येतं; आणि त्यामुळे आपल्याला सांत्वनही मिळतं. आपल्यावर येणाऱ्‍या संकटांमुळे आपल्याला यहोवाच्या सर्वोच्च अधिकाराचं समर्थन करण्याची संधी मिळते. (नीति. २७:११) आपण धीराने सहन करतो, तेव्हा यहोवाचं मन आनंदित करतो आणि भविष्यासाठी असलेली आपली आशाही आणखी मजबूत होते. (रोमकर ५:३-५ वाचा.) ईयोबच्या अहवालावरून आपल्याला दिसून येतं की “यहोवा दयाळू व अतिशय कनवाळू आहे.” (याको. ५:११) विश्‍वावर शासन करण्याचा सर्वोच्च अधिकार कोणाला आहे या वादविषयात जर आपण यहोवाच्या बाजूने उभे राहिलो, तर तो नक्कीच आपल्याला प्रतिफळ देईल. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवल्याने आपल्याला “सहनशक्‍ती दाखवून आनंदाने धीर” धरण्यास मदत होते.—कलस्सै. १:११.

महत्त्वाच्या विषयावरून आपलं लक्ष विचलित होऊ देऊ नका

१६. आपण स्वतःला कोणत्या गोष्टीची सतत आठवण करून दिली पाहिजे? आणि का?

१६ हे खरं आहे, की जीवनात संकटांचा सामना करत असताना, यहोवाच्या सर्वोच्च अधिकाराचं समर्थन करण्याच्या महत्त्वाच्या विषयावर लक्ष लावणं आपल्याला कठीण जाऊ शकतं. आपण आपल्या समस्यांचा नको तितका विचार करतो, तेव्हा लहानातली-लहान समस्याही मोठी वाटायला लागते. त्यामुळे, आपण सतत स्वतःला याची आठवण करून दिली पाहिजे, की जीवनात कोणत्याही समस्येला तोंड द्यावं लागलं तरी यहोवाच्या सर्वोच्च अधिकाराचं समर्थन करणं महत्त्वाचं आहे.

१७. यहोवाच्या सेवेत व्यस्त राहिल्याने अधिक महत्त्वाच्या गोष्टीवर लक्ष लावण्यास कशी मदत होते?

१७ यहोवाच्या सेवेत स्वतःला व्यस्त ठेवल्यामुळे अधिक महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष लावण्यासाठी आपल्याला मदत होते. रेना नावाच्या आपल्या एका बहिणीचं उदाहरण घ्या. तिला लकवा मारला होता आणि कॅन्सरही झाला होता. त्यामुळे तिला सतत वेदना व्हायच्या. हॉस्पिटलमध्ये असताना ती तिथल्या कर्मचाऱ्‍यांना, रुग्णांना आणि भेटायला येणाऱ्‍या लोकांना प्रचार करायची. एकदा रेनाला अडीच आठवडे हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं. त्या काळात तिने ८० तास प्रचार केला. रेना या आपल्या बहिणीला याची कल्पना होती, की तिच्या आजारामुळे तिला लवकरच मरण येईल. पण, अशा काळातही अधिक महत्त्वाची गोष्ट कोणती आहे हे ती कधीही विसरली नाही. यहोवाच्या अधिकाराचं समर्थन केल्याने, तिला तिचं दुःख काही प्रमाणात हलकं करण्यास मदत झाली.

१८. जेनिफर या आपल्या बहिणीच्या अनुभवावरून आपण काय शिकतो?

१८ दैनंदिन जीवनातील समस्यांचा सामना करतानाही आपण यहोवाच्या सर्वोच्च अधिकाराचं समर्थन करू शकतो. जेनिफर नावाच्या दुसऱ्‍या एका बहिणीचा अनुभव लक्षात घ्या. एकदा तिला तीन दिवस एअरपोर्टवरच काढावे लागले. ती आपल्या घरी जाण्यासाठी एका विमानाची वाट पाहत होती. पण, एकापाठोपाठ एक विमान रद्द झाल्यामुळे आणि एअरपोर्टवरच राहावं लागत असल्यामुळे ती खूप थकून गेली आणि तिला अगदी एकटं वाटू लागलं. तिच्यावर ओढावलेल्या या परिस्थितीमुळे ती स्वतःची कीव करू शकली असती. पण जेनिफरने तसं केलं नाही. उलट तिने यहोवाला प्रार्थना केली आणि एअरपोर्टवर असलेल्या लोकांना प्रचार करता यावा यासाठी मदत मागितली. याचा परिणाम असा झाला की, ती अनेक लोकांना देवाच्या राज्याचा आनंदाचा संदेश सांगू शकली आणि तिने अनेक प्रकाशनंही दिली. आपल्या अनुभवाविषयी सांगताना जेनिफर म्हणते: “अशा बिकट प्रसंगीही यहोवाने माझे प्रयत्न आशीर्वादित केले. आणि त्याच्या नावाची चांगल्या प्रकारे साक्ष देण्यासाठी मला बळ दिलं.”

१९. खऱ्‍या उपासकांची ओळख कशावरून होते?

१९ विश्‍वावर शासन करण्याचा सर्वोच्च अधिकार यहोवालाच आहे हे सिद्ध होणं किती महत्त्वाचं आहे, ही गोष्टी खऱ्‍या अर्थाने केवळ यहोवाचे लोक समजू शकतात. आणि यावरूनच खऱ्‍या उपासकांची ओळख पटते. त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकाने यहोवाच्या सर्वोच्च अधिकारचं समर्थन करत राहिलं पाहिजे.

२०. यहोवाच्या अधिकाराचं समर्थन करण्यासाठी आपण जे काही करतो, त्याबद्दल यहोवाला कसं वाटतं?

२० यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करत असताना आणि समस्यांचा सामना करत असताना, यहोवाच्या सर्वोच्च अधिकारचं समर्थन करण्यासाठी आपण जे काही करतो, ते तो पाहतो आणि त्याची मनापासून कदर करतो. (स्तो. १८:२५) यहोवाच्या अधिकाराचं समर्थन करणं का गरजेचं आहे आणि आपल्याला हे अधिक मोठ्या प्रमाणात कसं करता येईल हे आपण पुढील लेखात पाहू या.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा