यहोवाचे सार्वभौमत्त्व आणि देवाचे राज्य
“हे यहोवा, महत्त्व व पराक्रम, व वैभव व जय व प्रताप ही तुझीच आहेत . . . हे यहोवा राज्य तुझेच आहे.”—१ इतिहास २९:११, पं.र.भा.
१. यहोवाला या विश्वाचा सार्वभौम शासक असण्याचा अधिकार का आहे?
“यहोवाने आपले राजासन आकाशांमध्ये स्थापले आहे, आणि त्याचे राज्य सर्वांवर अधिकार करते.” (स्तोत्र १०३:१९) या शब्दांत स्तोत्रकर्त्याने आधिपत्याविषयी एक मूलभूत सत्य व्यक्त केले. सृष्टिकर्ता असल्यामुळे यहोवाला या विश्वाचा सार्वभौम शासक असण्याचा अधिकार आहे.
२. दानीएलाने यहोवाच्या आत्मिक राज्याचे कशारितीने वर्णन केले?
२ अर्थात, यहोवा सार्वभौम शासक आहे त्याअर्थी त्याची प्रजाही असली पाहिजे. यहोवाने आत्मिक प्राण्यांना अस्तित्त्वात आणले. प्रथम त्याच्या एकुलत्या एक पुत्राला आणि मग अगणित देवदूतांना. सुरुवातीला, या आत्मिक प्राण्यांवरच यहोवाचे स्वामित्व होते. (कलस्सैकर १:१५-१७) बऱ्याच काळानंतर, संदेष्टा दानीएल याला दृष्टान्तात स्वर्गातील दृश्याची झलक दाखवण्यात आली. त्याने असे वर्णन केले: “मी पाहत असता आसने मांडण्यात आली आणि एक पुराणपुरुष आसनारूढ झाला. . . . हजारो लोक त्याची सेवा करीत होते; लाखो लोक त्याच्यासमोर उभे होते.” (दानीएल ७:९, १०) अगणित काळापासून, या ‘पुराणपुरुषाने’ अर्थात यहोवाने त्याचे “सेवक” म्हणून कार्य करणाऱ्या आत्मिकपुत्रांच्या मोठ्या सुसंघटित कुटुंबावर सार्वभौम या नात्याने अध्यक्षता केली आहे.—स्तोत्र १०३:२०, २१.
३. यहोवाच्या सार्वभौमत्त्वाच्या सीमा भौतिक विश्वापर्यंत कशाप्रकारे विस्तारल्या?
३ कालांतराने, यहोवाने पृथ्वीचा समावेश असलेले एक विस्तृत व वैविध्यपूर्ण भौतिक विश्व अस्तित्वात आणले आणि अशारितीने आपल्या शासनाच्या सीमा वाढवल्या. (ईयोब ३८:४, ७) पृथ्वीवरून पाहणाऱ्याला आकाशातील सूर्य, चंद्र, तारे इतक्या सुव्यवस्थितरित्या कार्य करताना दिसतात, की जणू त्यांचे कोणी मार्गदर्शन करण्याची किंवा त्यांच्यावर नियंत्रण करण्याची गरजच नाही असे वाटावे. तरीपण स्तोत्रकर्त्याने असे घोषित केले: “[यहोवाने] आज्ञा केली आणि ती निर्माण झाली. त्याने ती सर्वकाळासाठी स्थापिली; त्याने नियम लावून दिला त्याचे उल्लंघन कोणी करणार नाही.” (स्तोत्र १४८:५, ६) अनादिकालापासून यहोवा आत्मिक विश्वाचे तसेच भौतिक विश्वाचे कार्य मार्गदर्शित करण्याद्वारे व त्यावर नियंत्रण करण्याद्वारे आपले सार्वभौमत्त्व चालवत आहे.—नहेम्या ९:६.
४. यहोवा मानवांशी व्यवहार करताना आपले सार्वभौमत्त्व कशाप्रकारे प्रयोगात आणतो?
४ पहिल्या मानवी दांपत्याची सृष्टी करण्यात आल्यावर देवाने आणखी एका प्रकारे आपले सार्वभौमत्त्व प्रयोगात आणले. मानवांना उद्देशपूर्ण व समाधानदायक जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले सर्वकाही पुरवल्यानंतर यहोवाने त्यांना पृथ्वीवरील इतर जिवांवर अधिकार गाजवण्याचा हक्क बहाल केला. अशाप्रकारे त्याने मानवांना आपले प्रतिनिधी म्हणून अधिकार चालवण्यास नियुक्त केले. (उत्पत्ति १:२६-२८; २:८, ९) यावरून हे स्पष्ट होते की देवाचे शासन उदार व प्रेमळ तर आहेच पण ते आपल्या प्रजेला आदर व सन्मानही देते. आदाम व हव्वा जोपर्यंत यहोवाच्या सार्वभौमत्त्वाच्या अधीन राहिले तोपर्यंत त्यांच्याजवळ पृथ्वीवर नंदनवनासारख्या निवासस्थानात सर्वकाळ जगण्याची आशा होती.—उत्पत्ति २:१५-१७.
५. यहोवा आपले सार्वभौमत्त्व ज्याप्रकारे गाजवतो त्याविषयी काय म्हणता येईल?
५ या सर्व माहितीवरून आपल्याला काय समजते? पहिली गोष्ट ही, की यहोवा अनादिकालापासूनच सर्व सृष्टीवर सार्वभौमत्त्व गाजवत आला आहे. दुसरी गोष्ट, देवाचे शासन हे उदार असून या शासनाखाली असणाऱ्यांना ते सन्मान देते. आणि शेवटची गोष्ट म्हणजे, आपण देवाच्या शासनाला अधीन राहिलो व त्यास पाठिंबा दिला तर आपल्याला सार्वकालिक आशीर्वाद मिळतील. म्हणूनच प्राचीन इस्राएलच्या राजा दाविदाचे हे शब्द अगदी खरे आहेत: “हे यहोवा, महत्त्व व पराक्रम, व वैभव व जय व प्रताप ही तुझीच आहेत, कारण आकाशांत व पृथ्वीत जे काही आहे ते सर्व तुझेच आहे; हे यहोवा राज्य तुझेच आहे, आणि तू सर्वांवर मस्तक असा उंचावलेला आहेस.”—१ इतिहास २९:११, पं.र.भा.
देवाच्या राज्याची गरज का उद्भवली?
६. देवाचे सार्वभौमत्त्व व त्याचे राज्य कशाप्रकारे संबंधित आहेत?
६ या विश्वाचा सार्वभौम, अनादिकालापासूनच आपल्या सामर्थ्याचा व शक्तीचा उपयोग करत आला आहे. तर मग देवाच्या राज्याची गरज का उद्भवली? कोणत्याही राज्याचा सार्वभौम, प्रजेचा कारभार पाहणाऱ्या एका प्रशासनाद्वारे सहसा आपला अधिकार अंमलात आणतो. त्याचप्रमाणे, देवाचे राज्य देखील देवाच्या विश्वव्यापी सार्वभौमत्त्वाचे प्रतिनिधीत्व करणारे एक प्रशासन आहे. या प्रशासनाच्या माध्यमाने देव, आपण निर्माण केलेल्या प्राण्यांवर राज्य करतो.
७. यहोवाने आपले सार्वभौमत्त्व व्यक्त करण्यासाठी एक नवे माध्यम का स्थापन केले?
७ वेगवेगळ्या कालखंडांत यहोवाने आपले सार्वभौमत्त्व वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त केले. एका नव्या घडामोडीला प्रतिक्रिया म्हणून, त्याने आपले सार्वभौमत्त्व व्यक्त करण्यासाठी एक नवे माध्यम स्थापन केले. हे केव्हा घडले? देवाच्या एका विद्रोही आत्मिक पुत्राने, अर्थात सैतानाने आदाम व हव्वेला यहोवाच्या शासनाविरुद्ध बंड करण्यास प्रवृत्त केले तेव्हा हे घडले. या बंडामुळे देवाच्या सार्वभौमत्त्वाला ललकारण्यात आले. ते कसे? सैतानाने जेव्हा हव्वेला सांगितले की देवाने मना केलेले फळ खाल्ले तरीसुद्धा ‘तू खरोखर मरणार नाहीस,’ तेव्हा तो असे सुचवत होता की यहोवाने तिला खोटे सांगितले. दुसऱ्या शब्दांत, यहोवा भरवशालायक नाही असे त्याने सुचवले. सैतानाने हव्वेला असेही सांगितले, की “देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील, आणि तुम्ही देवासारखे बरेवाईट जाणणारे व्हाल.” सैतान असे म्हणण्याचा प्रयत्न करत होता, की आदाम व हव्वा यांनी देवाच्या आज्ञेकडे दुर्लक्ष केले व त्यांनी आपला स्वतंत्र मार्ग निवडला तर ते जास्त सुखी होतील. (उत्पत्ति ३:१-६) हा तर थेटपणे देवाच्या शासन करण्याच्या अधिकारावर व त्याच्या शासनाच्या योग्यतेवर हल्ला होता. यहोवाने या परिस्थितीत काय केले?
८, ९. (क) राज्यातल्या लोकांनी बंड केल्यास मानवी राजा ती परिस्थिती कशाप्रकारे हाताळेल? (ख) एदेन बागेत यहोवाच्या विरोधात बंड करण्यात आले तेव्हा त्याने काय केले?
८ राज्यातल्या लोकांनी जर उघडउघड बंड केले तर कोणताही राजा काय करतो? ज्यांना इतिहासाची थोडीफार माहिती आहे त्यांना काही उदाहरणे आठवत असतील. बंड झाल्यास, त्याकडे दुर्लक्ष न करता सहसा कोणत्याही राज्याचा सार्वभौम शासक, मग तो अतिशय दयाळू व उदार राजा असला तरीही, तो बंड करणाऱ्यांना गद्दार ठरवून शिक्षा अवश्य करतो. यानंतर कदाचित राजा त्या बंडखोरांना दडपून टाकण्यासाठी व राज्यात शांती पुनर्स्थापित करण्यासाठी आपल्या एखाद्या माणसाला नेमेल. त्याचप्रकारे, यहोवानेही बंड होताच आवश्यक पावले उचलली व बंडखोरांविरुद्ध शिक्षा जाहीर केली. असे करण्याद्वारे यहोवाने दाखवले की परिस्थिती पूर्णपणे त्याच्या नियंत्रणात होती. त्याने आदाम व हव्वा यांना सार्वकालिक जीवनाचे वरदान मिळण्यास अयोग्य ठरवले व त्यांना एदेन बागेतून हाकलून लावले.—उत्पत्ति ३:१६-१९, २२-२४.
९ सैतानाविरुद्ध शिक्षा घोषित करताना, यहोवाने आपले सार्वभौमत्त्व व्यक्त करण्यासाठी एक नवे माध्यम स्थापन करण्याचे जाहीर केले. या माध्यमाद्वारे त्याच्या सबंध राज्यात शांती व सुव्यवस्था पुनर्स्थापित केली जाणार होती. सैतानाला देवाने असे म्हटले: “तू व स्त्री, तुझी संतति व तिची संतति यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडिशील.” (उत्पत्ति ३:१५) अशारितीने, सैतानाचा व त्याच्या समर्थकांचा सर्वनाश करण्यासाठी व आपल्या सार्वभौमत्त्वाची योग्यता सिद्ध करण्यासाठी यहोवाने एका ‘संततिला’ नेमण्याचा आपला संकल्प जाहीर केला.—स्तोत्र २:७-९; ११०:१, २.
१०. (क) “संतति” कोण असल्याचे स्पष्ट झाले? (ख) पहिली भविष्यवाणी कशाप्रकारे पूर्ण होईल यासंबंधी पौलाने काय म्हटले?
१० या ‘संततीत’ येशू ख्रिस्त व त्यासोबत शासन करणाऱ्या सहशासकांच्या एका खास गटाचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले. येशू व हे सहशासक मिळूनच देवाचे मशीही राज्य बनते. (दानीएल ७:१३, १४, २७; मत्तय १९:२८; लूक १२:३२; २२:२८-३०) पण हे सर्व लगेच प्रकट करण्यात आले नाही. किंबहुना, त्या पहिल्या भविष्यवाणीची पूर्णता नेमकी कशाप्रकारे होईल हे “रहस्य गतयुगांत गुप्त [ठेवण्यात आले].” (रोमकर १६:२५) कित्येक शतकांपर्यंत देवाचे अनेक विश्वासू सेवक त्या काळाची वाट पाहात होते, जेव्हा हे पवित्र “रहस्य” उलगडले जाईल आणि त्या पहिल्या भविष्यवाणीची पूर्णता होऊन यहोवाचे सार्वभौमत्त्व कायमचे सिद्ध केले जाईल.—रोमकर ८:१९-२१.
पवित्र “रहस्य” क्रमाक्रमाने उलगडले जाते
११. यहोवाने अब्राहामाला कोणती माहिती प्रकट केली?
११ काळ जसजसा पुढे सरकत गेला, तसतसे यहोवाने ‘देवाच्या राज्याच्या रहस्याविषयी’ निरनिराळ्या पैलूंवर क्रमाक्रमाने प्रकाश टाकला. (मार्क ४:११) ज्यांना ही माहिती प्रकट करण्यात आली त्यांच्यापैकी एक होता अब्राहाम, ज्याला ‘देवाचा मित्र’ म्हणण्यात आले होते. (याकोब २:२३) यहोवाने अब्राहामाला वचन दिले, “मी तुजपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन.” कालांतराने देवाने अब्राहामाला असेही प्रकट केले की “तुजपासून राजे उत्पन्न होतील” आणि “तुझ्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील.”—उत्पत्ति १२:२, ३; १७:६; २२:१७, १८.
१२. जलप्रलयानंतर सैतानाची संतती कशाप्रकारे उजेडात आली?
१२ अब्राहामाच्या काळापर्यंत, मानवांद्वारे इतरांवर राज्य व सत्ता चालवण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. उदाहरणार्थ निम्रोद, जो नोहाचा पणतू होता, त्याच्याविषयी बायबल असे म्हणते की “तो पृथ्वीवर महारथी होऊ लागला. तो परमेश्वरासमोर [“यहोवाच्या विरोधात,” NW] बलवान पारधी झाला.” (उत्पत्ति १०:८, ९) आपल्या सामर्थ्याच्या जोरावर शासक बनलेला निम्रोद व त्यासारखे इतर शासक सैतानाच्या हातातले प्यादे होते हे तर स्पष्टच आहे. ते व त्यांचे समर्थक सैतानाच्या संततीचे भाग बनले.—१ योहान ५:१९.
१३. याकोबाद्वारे यहोवाने काय भाकीत केले?
१३ सैतानाने मानवी शासक उभे करण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा यहोवाचा संकल्प पूर्णतेकडे वाटचाल करत राहिला. अब्राहामाचा नातू याकोब याच्याद्वारे यहोवाने असे प्रकट केले: “यहूदाकडचे राजवेत्र ज्याचे आहे तो येईपर्यंत ते त्याजकडून जाणार नाही, राजदंड त्याच्या पायांमधून ढळणार नाही; राष्ट्रे त्याची आज्ञांकित होतील.” (उत्पत्ति ४९:१०) “राजवेत्र” व “राजदंड” हे सार्वभौमत्त्व किंवा राज्यत्त्व यास सूचित करतात. त्याअर्थी, या भविष्यसूचक शब्दांनी असे सूचित केले की भविष्यात असा कोणीतरी येईल ज्याला ‘राष्ट्रांवर’ अर्थात सर्व मानवजातीवर राज्यत्त्व मिळवण्याचा अधिकार असेल. हा कोण होता?
“ज्याचे आहे तो येईपर्यंत”
१४. दाविदासोबत यहोवाने कोणता करार बांधला?
१४ यहोवाने आपल्या लोकांवर राजा होण्याकरता यहुदाच्या वंशजांपैकी सर्वप्रथम यिशैचा पुत्र दावीद याला निवडले.a (१ शमुवेल १६:१-१३) दाविदाच्या हातून अनेक पाप व चुका झाल्या तरीसुद्धा, यहोवाच्या सार्वभौमत्त्वाला तो एकनिष्ठपणे जडून राहिल्यामुळे यहोवाने त्याच्यावर कृपादृष्टी केली. त्याने दाविदासोबत एक करार केला ज्याद्वारे त्याने एदेन बागेतील भविष्यवाणीवर अधिक प्रकाश टाकला. त्याने दाविदाला म्हटले: “तुझ्या पोटच्या वंशजास [मी] तुझ्यामागून स्थापून त्याचे राज्य स्थिर करीन.” हे शब्द केवळ दाविदाचा पुत्र व वारस शलमोन याच्याबद्दलच नव्हते. कारण करारात पुढे असे म्हणण्यात आले: “मी त्याचे राजासन कायमचे स्थापीन.” दाविदासोबत केलेल्या त्या करारातून हे स्पष्ट झाले की देवाने वचन दिलेली राज्याची “संतति” किंवा वंशज हा कालांतराने दाविदाच्या कुळातून येणार होता.—२ शमुवेल ७:१२, १३.
१५. यहुदाचे राज्य एकप्रकारे देवाच्या राज्याचा नमुना होते असे का म्हणता येईल?
१५ दाविदापासून सुरू होऊन एक राजघराणे अस्तित्त्वात आले. या राजघराण्यातील राजांचा महायाजकाकडून पवित्र तेलाने अभिषेक केला जात असे. त्यामुळे या राजांना अभिषिक्त जन किंवा मशीहा म्हटले जाऊ शकत होते. (१ शमुवेल १६:१३; २ शमुवेल २:४; ५:३; १ राजे १:३९) त्यांच्याविषयी असे म्हणण्यात आले की ते यहोवाच्या सिंहासनावर बसून यहोवाचे प्रतिनिधी राजे म्हणून जेरूसलेमवर राज्य करत होते. (२ इतिहास ९:८) त्याअर्थी, यहुदाचे राज्य हे देवाच्या राज्याचा एक नमुना होते. ते यहोवाचे सार्वभौमत्त्व व्यक्त करणारे एक माध्यम होते.
१६. यहुदी राजांच्या शासनकाळात काय घडले?
१६ राजा व लोक यहोवाच्या सार्वभौमत्त्वाला मान देऊन वागले तेव्हा त्यांना त्याचे संरक्षण व आशीर्वाद लाभले. विशेषतः शलमोनाची कारकीर्द ही अभूतपूर्व शांती व समृद्धीचा काळ ठरला. सैतानाचा प्रभाव पूर्णपणे नष्ट होऊन यहोवाचे सार्वभौमत्त्व कायमचे सिद्ध करण्यात आल्यावर, देवाच्या राज्य शासनात जी परिस्थिती असेल त्याची पूर्वझलक त्यातून मिळाली. (१ राजे ४:२०, २५) दुःखाची गोष्ट म्हणजे दाविदाच्या कुळातील बहुतेक राजांनी यहोवाच्या नियमांचे पालन केले नाही आणि परिणामस्वरूप लोक मूर्तिपूजा व अनैतिक आचरण करू लागले. शेवटी यहोवाने सा.यु.पू. ६०७ साली बॅबिलोनी लोकांकडून या राज्याचा नाश होऊ दिला. यहोवाच्या सार्वभौमत्त्वाची अपकीर्ती करण्याच्या प्रयत्नात सैतानाला जणू यश आले आहे असे या घटनेमुळे भासले.
१७. दाविदाच्या कुळाच्या राज्याचे पतन झाले तरीसुद्धा परिस्थिती आपल्या नियंत्रणात आहे हे यहोवाने कसे दाखवले?
१७ दाविदाच्या कुळाच्या राज्याचे पतन होणे आणि त्याआधी उत्तरेकडील इस्राएलच्या राज्याचे पतन होणे हा यहोवाचे सार्वभौमत्त्व निकामी ठरल्याचा किंवा ते कोणत्याही प्रकारे उणे पडल्याचा पुरावा नव्हता. तर सैतानाच्या प्रभावाचा व मानवजातीने देवापासून फारकत घेतल्याचा हा दुष्परिणाम होता. (नीतिसूत्रे १६:२५; यिर्मया १०:२३) आपण अजूनही सार्वभौमत्त्व गाजवत आहोत हे दाखवण्यासाठी यहोवाने यहेज्केल संदेष्ट्याद्वारे असे घोषित केले: “शिरोभूषण उतरीव, मुकुट काढून टाक . . . मी त्याचा विध्वंस करीन, करीनच करीन. ही स्थिति अशीच राहावयाची नाही; ज्याचा हक्क आहे तो आल्यावर त्यास मी सत्ता देईन.” (यहेज्केल २१:२६, २७) या शब्दांवरून असे सूचित होते की “संतति” किंवा “ज्याचा हक्क आहे तो” अद्याप आला नव्हता.
१८. गब्रीएल देवदूताने कोणती घोषणा केली?
१८ आता आणखी पुढे म्हणजे सा.यु.पू. २ सालापर्यंत आपण जाऊ या. गब्रीएल देवदूताला उत्तर पॅलेस्टाईनच्या गालील प्रांतातील नासरेथ नावाच्या नगरात राहणाऱ्या एका कुमारीकडे, म्हणजे मरीयेकडे पाठवण्यात येते. तो असे घोषित करतो: “पाहा! तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल. त्याचे नाव येशू ठेव. तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील; आणि प्रभु देव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल; आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करील व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.”—लूक १:३१-३३.
१९. कोणत्या रोमांचक घटना घडण्याची वेळ आली होती?
१९ सरतेशेवटी, पवित्र “रहस्य” उलगडण्याची वेळ जवळ आली होती. वचन दिलेल्या ‘संततितील’ प्रमुख व्यक्ती, अर्थात येशू लवकरच प्रगट होणार होता. (गलतीकर ४:४; १ तीमथ्य ३:१६) कालांतराने सैतान त्याची टाच फोडेल पण तो सैतानाचे डोके फोडून त्याचा व त्याच्या सर्व समर्थकांचा नाश करेल. तसेच देवाच्या राज्याद्वारे कशाप्रकारे सैतानाने केलेले सर्व नुकसान भरून काढले जाईल व यहोवाचे सार्वभौमत्त्व कायमचे सिद्ध केले जाईल याविषयी तो साक्ष देईल. (इब्री लोकांस २:१४; १ योहान ३:८) येशू हे सर्व कसे साध्य करेल? आणि तो आपल्याकरता कोणता अनुकरणीय आदर्श मागे सोडून गेला आहे? या प्रश्नांची उत्तरे पुढील लेखात पाहू या.
[तळटीप]
a इस्राएलवर राज्य करण्याकरता देवाने सर्वप्रथम ज्याला निवडले होते तो शौल बन्यामीन वंशाचा होता.—१ शमुवेल ९:१५, १६; १०:१.
तुम्ही स्पष्ट करू शकता का?
• यहोवाला या विश्वाचा सार्वभौम शासक असण्याचा अधिकार का आहे?
• यहोवाने आपले राज्य स्थापन करण्याचा संकल्प का केला?
• पवित्र “रहस्य” यहोवाने क्रमाक्रमाने कसे प्रगट केले?
• दाविदाच्या कुळाच्या राज्याचे पतन झाले तरी परिस्थिती पूर्णपणे यहोवाच्या नियंत्रणात होती हे कशावरून दिसून आले?
[५ पानांवरील चित्र]
अब्राहामाद्वारे यहोवाने काय भाकीत केले?
[७ पानांवरील चित्र]
दाविदाच्या कुळाच्या राज्याचे पतन होणे हा यहोवाचे सार्वभौमत्त्व निकामी ठरल्याचा पुरावा का नव्हता?