वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • br-1 १२/१ पृ. ८-१२
  • यहोवाच्या सार्वभौमत्त्वाला तुमचा पाठिंबा आहे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाच्या सार्वभौमत्त्वाला तुमचा पाठिंबा आहे का?
  • टेहळणी बुरूज अभ्यास लेख माहितीपत्रक
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • सार्वभौमत्त्वाचा वादविषय पुढे आणला जातो
  • “देवाचे राज्य जवळ आले आहे”
  • “पूर्ण झाले आहे”
  • एक अनुकरणीय आदर्श
  • देव “सर्वांना सर्वकाही” होईल तेव्हा
  • यहोवाचे सार्वभौमत्त्व आणि देवाचे राज्य
    टेहळणी बुरूज अभ्यास लेख माहितीपत्रक
  • येशू कशा प्रकारे देवाचे नीतिमत्त्व उंचावतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • यहोवाच्या सर्वोच्च अधिकाराचं समर्थन करा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज अभ्यास लेख माहितीपत्रक
br-1 १२/१ पृ. ८-१२

यहोवाच्या सार्वभौमत्त्वाला तुमचा पाठिंबा आहे का?

“राष्ट्रांमध्ये म्हणा: ‘यहोवा राज्य करतो.’”—स्तोत्र ९६:१०, पं.र.भा.

१, २. (क) सा.यु. २९ सालच्या ऑक्टोबर महिन्याच्या सुमारास कोणती अतिशय महत्त्वाची घटना घडली? (ख) या घटनेची येशूकरता काय अर्थसूचकता होती?

सा.यु. २९ सालच्या ऑक्टोबर महिन्याच्या सुमारास एक अतिशय महत्त्वाची घटना घडली. त्यापूर्वी कधीही कोणी पाहिली नव्हती अशी ती विलक्षण घटना होती. त्या घटनेविषयी शुभवर्तमान लेखक योहान असे लिहितो: “[बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानाने] अशी साक्ष दिली की, आत्मा कबुतरासारखा आकाशातून उतरत असताना आणि [येशूवर] स्थिर राहिलेला मी पाहिला. मी तर त्याला ओळखीत नव्हतो; तरी ज्याने मला पाण्याने बाप्तिस्मा करावयास पाठविले त्याने मला सांगितले होते की, ज्या कोणावर आत्मा उतरत असताना व स्थिर राहताना पाहशील तोच पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणारा आहे. मी स्वतः पाहिले आहे व साक्ष दिली आहे की, हा देवाचा पुत्र आहे.” ही घटना त्या थोडक्याच काही घटनांपैकी एक आहे, ज्यांच्याविषयी चारही शुभवर्तमान लेखकांनी लिहिले.—योहान १:३२-३४; मत्तय ३:१६, १७; मार्क १:९-११; लूक ३:२१, २२.

२ येशूवर दृश्‍य स्वरूपात पवित्र आत्मा ओतण्यात आला तेव्हा हे सिद्ध झाले की तोच अभिषिक्‍त जन, अर्थात मशीहा किंवा ख्रिस्त आहे. (योहान १:३३) सरतेशेवटी, प्रतिज्ञात “संतति” प्रगट झाली होती! बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानापुढे उभा असलेला हाच तो होता, ज्याची टाच सैतानाद्वारे फोडली जाणार होती आणि जो खुद्द, यहोवाच्या व त्याच्या सार्वभौमत्त्वाच्या त्या आद्यशत्रूचे डोके फोडणार होता. (उत्पत्ति ३:१५) त्या क्षणापासून, येशूला या गोष्टीची पूर्णपणे जाणीव होती, की यहोवाने आपल्या सार्वभौमत्त्वासंबंधी व राज्यासंबंधी जो संकल्प केला होता तो पूर्ण करण्याचा त्याने सर्वतोपरी प्रयत्न केला पाहिजे.

३. यहोवाच्या सार्वभौमत्त्वाचे समर्थन करण्यात येशू जी भूमिका वठवणार होता, त्याकरता सुसज्ज होण्यासाठी त्याने काय केले?

३ आपल्यासमोर असलेली मोठी जबाबदारी पार पाडण्यास सुसज्ज होण्याकरता “येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा यार्देनेपासून परतला, आणि त्याला आत्म्याने चाळीस दिवस रानात नेले.” (लूक ४:१; मार्क १:१२) त्या चाळीस दिवसांच्या काळात येशूला, यहोवाच्या सार्वभौमत्त्वाविषयी सैतानाने उभ्या केलेल्या वादविषयासंबंधी आणि यहोवाच्या सार्वभौमत्त्वाचे समर्थन करण्याकरता आपण काय केले पाहिजे याविषयी गहन विचार करण्याची संधी मिळाली. सैतानाने उपस्थित केलेल्या वादविषयात स्वर्गात व पृथ्वीवर असलेल्या सर्व विचारक्षम सजीव प्राण्यांचा समावेश आहे. म्हणूनच, आपण येशूच्या विश्‍वासू उदाहरणाचे परीक्षण करून यहोवाच्या सार्वभौमत्त्वास आपला पाठिंबा आहे हे दाखवण्यासाठी काय केले पाहिजे यावर विचार केला पाहिजे.—ईयोब १:६-१२; २:२-६.

सार्वभौमत्त्वाचा वादविषय पुढे आणला जातो

४. सैतानाच्या कोणत्या कृतीमुळे सार्वभौमत्त्वाचा वादविषय पुढे आणला गेला?

४ अर्थात, वर उल्लेख केलेल्या घटनांपैकी कोणतीही घटना सैतानाच्या नजरेतून सुटली नाही. त्याने लगेच देवाच्या ‘स्त्रीच्या’ मुख्य ‘संततिवर’ पहिला वार केला. (उत्पत्ति ३:१५) सैतानाने येशूला तीन वेळा मोहात पाडण्याचा प्रयत्न केला. या तीनही वेळा त्याने येशूला असे काहीतरी करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला, की जे येशूला वैयक्‍तिकदृष्ट्या फायद्याचे होते पण जे त्याच्या पित्याच्या इच्छेच्या विरोधात होते. विशेषतः तिसऱ्‍या परीक्षेत सार्वभौमत्त्वाचा वादविषय पुढे आणला गेला. येशूला “जगातील सर्व राज्ये व त्यांचे वैभव” दाखवून सैतानाने त्याला सरळसरळ हे आव्हान केले: “तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सगळे काही तुला देईन.” “जगातील सर्व राज्ये” खरोखरच दियाबलाच्या ताब्यात आहेत याची येशूला पूर्ण कल्पना होती. म्हणूनच, सार्वभौमत्त्वाच्या वादविषयात आपण कोणाच्या बाजूला आहोत हे दाखवण्याकरता येशूने त्याला म्हटले: “अरे सैताना, चालता हो, कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘परमेश्‍वर तुझा देव ह्‍याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर.’”—मत्तय ४:८-१०.

५. येशूला कोणती कठीण कामगिरी पार पाडायची होती?

५ येशूने ज्याप्रकारे आपले जीवन व्यतीत केले त्यावरून त्याने अगदी स्पष्टपणे हे दाखवले की यहोवाच्या सार्वभौमत्त्वाचे समर्थन करणे हेच त्याच्या जीवनातले मुख्य उद्दिष्ट होते. येशूला अगदी चांगल्याप्रकारे माहीत होते की भविष्यवाणीत सांगितल्यानुसार स्त्रीच्या ‘संततिची’ टाच फोडली जाईल, त्याअर्थी सैतानाच्या हाती त्याला मृत्यू येईल आणि तोपर्यंत त्याने विश्‍वासू राहिले पाहिजे व त्याद्वारे देवच सार्वभौम शासक असण्यास योग्य आहे हे सिद्ध करून दाखवले पाहिजे. (मत्तय १६:२१; १७:१२) तसेच यहोवाविरुद्ध बंड करणाऱ्‍या सैतानावर विजय मिळवून सबंध सृष्टीत शांती व सुव्यवस्था पुनर्स्थापित करण्याचा अधिकार यहोवाने ज्या प्रशासनाला दिला होता त्या देवाच्या राज्याविषयी त्याला साक्षही द्यायची होती. (मत्तय ६:९, १०) ही कठीण कामगिरी पूर्ण करण्यासाठी येशूने काय केले?

“देवाचे राज्य जवळ आले आहे”

६. देव आपल्या राज्याद्वारे “सैतानाची कृत्ये नष्ट” करील हे येशूने कशाप्रकारे जाहीर केले?

६ सर्वप्रथम, “येशू देवाची सुवार्ता गाजवीत गाजवीत गालीलात आला व म्हणाला: ‘काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे.’” (मार्क १:१४, १५) येशूने तर असेही म्हटले, की “[मला] देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे, कारण त्यासाठीच मला पाठविले आहे.” (लूक ४:१८-२१, ४३) येशू “उपदेश करीत व देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत” त्या सबंध प्रदेशात फिरला. (लूक ८:१) त्याने अनेक चमत्कारही केले. उदाहरणार्थ, त्याने लोकसमुदायांना अन्‍न दिले, नैसर्गिक शक्‍तींना नियंत्रित केले, रोग्यांना बरे केले, इतकेच काय त्याने मृतांनाही जिवंत केले. या चमत्कारांद्वारे येशूने हे शाबीत करून दाखवले की एदेन बागेत झालेल्या बंडामुळे जी सगळी हानी झाली व जे दुःख मानवाच्या वाट्याला आले ते सर्व नाहीसे करण्यास व त्याद्वारे ‘सैतानाची कृत्ये नष्ट करण्यास’ देव समर्थ आहे.—१ योहान ३:८.

७. येशूने आपल्या अनुयायांना काय करण्याची आज्ञा दिली आणि याचा काय परिणाम झाला?

७ राज्याची सुवार्ता जास्तीतजास्त प्रमाणात गाजविली जावी म्हणून येशूने काही विश्‍वासू अनुयायांना एकत्रित करून त्यांना या कार्याचे प्रशिक्षण दिले. सर्वप्रथम त्याने आपल्या १२ प्रेषितांना नियुक्‍त केले आणि ‘त्यांस देवाच्या राज्याची घोषणा करावयास पाठविले.’ (लूक ९:१, २) मग त्याने आणखी ७० जणांना हा संदेश घोषित करण्यासाठी पाठवले: “देवाचे राज्य तुमच्याजवळ आले आहे.” (लूक १०:१, ८, ९) या शिष्यांनी परत येऊन जेव्हा राज्य प्रचार कार्यात आलेल्या यशाविषयी सांगितले तेव्हा येशूने हे उद्‌गार काढले: “सैतान आकाशातून विजेसारखा पडला हे मी पाहिले.”—लूक १०:१७, १८.

८. येशूच्या जीवनाकडे पाहिल्यास काय स्पष्टपणे दिसून येते?

८ राज्याविषयी साक्ष देण्यात येशूने कोणतीही कसूर केली नाही. आणि हे कार्य करण्याची एकही संधी त्याने कधी वाया जाऊ दिली नाही. सर्वसामान्य सोयीसुविधांचीही अपेक्षा न करता, त्याने दिवसरात्र अथक परिश्रम घेतले. त्याने एकदा म्हटले: “खोकडास बिळे व आकाशातल्या पाखरांस घरटी आहेत; परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकावयास ठिकाण नाही.” (लूक ९:५८; मार्क ६:३१; योहान ४:३१-३४) आपल्या मृत्यूच्या थोड्याच वेळाआधी येशूने पंतय पिलातासमोर अगदी निर्भयपणे म्हटले: “मी ह्‍यासाठी जन्मलो आहे व ह्‍यासाठी जगात आलो आहे की, मी सत्याविषयी साक्ष द्यावी.” (योहान १८:३७) येशूच्या सबंध जीवनावरून हे दिसून येते की तो केवळ एक महान शिक्षक, किंवा महत्कृत्ये करणारा किंवा आत्मत्यागी तारणकर्ता होण्याकरता नव्हे तर मुख्यतः सार्वभौम प्रभू यहोवा याच्या इच्छेचे समर्थन करण्याकरता आणि ती इच्छा पूर्ण करण्यास देव समर्थ आहे याविषयी साक्ष देण्याकरता पृथ्वीवर आला होता.—योहान १४:६.

“पूर्ण झाले आहे”

९. देवाच्या स्त्रीच्या ‘संततीची’ टाच फोडण्यात सैतान शेवटी कशाप्रकारे यशस्वी ठरला?

९ राज्याच्या संदर्भात येशूने जे काही केले ते साहजिकच देवाचा शत्रू दियाबल सैतान याच्या नजरेत खुपत होते. त्याने आपल्या ‘संततीपैकी’ जे पृथ्वीवर होते, अर्थात राजकीय व धार्मिक वर्तुळातील त्याचे जे समर्थक होते त्यांच्या माध्यमाने देवाच्या स्त्रीच्या ‘संततीला’ कायमचे गप्प करावे म्हणून वारंवार प्रयत्न केले. येशूचा जन्म झाला तेव्हापासून पृथ्वीवरील त्याच्या जीवनाच्या शेवटच्या घटकेपर्यंत सैतानाने आपल्या हस्तकांसोबत मिळून येशूला छळले. शेवटी, सा.यु. ३३ सालच्या पूर्वार्धात मनुष्याचा पुत्र शत्रूच्या हाती दिला जाण्याची आणि त्या शत्रूकडून त्याची टाच फोडली जाण्याची वेळ आली होती. (मत्तय २०:१८, १९; लूक १८:३१-३३) शुभवर्तमानातील अहवाल स्पष्टपणे दाखवतात की कशाप्रकारे सैतानाने यहुदा इस्कर्योत, मुख्य याजक, शास्त्री, परूशी व रोमी यांसारख्या अनेक लोकांचा आपले प्यादे म्हणून उपयोग केला. या लोकांच्याद्वारे त्याने येशूला निंद्य अपराधी ठरवून त्याला वधस्तंभावर यातनामय मृत्यू सहन करायला भाग पाडले.—प्रेषितांची कृत्ये २:२२, २३.

१०. वधस्तंभावर मरण सोसण्याद्वारे येशूने मुख्यतः काय साध्य केले?

१० वधस्तंभावर कण्हत, विव्हळत मरणयातना सोसणाऱ्‍या येशूचा जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा तुमच्या मनात काय येते? कदाचित तुम्हाला येशूने पापी मानवजातीकरता निस्वार्थपणे दिलेल्या खंडणी बलिदानाची आठवण होत असेल. (मत्तय २०:२८; योहान १५:१३) ते बलिदान देण्याद्वारे यहोवाने व्यक्‍त केलेल्या महान प्रेमाबद्दल कदाचित तुम्हाला आश्‍चर्य वाटत असेल. (योहान ३:१६) किंवा कदाचित तुमच्या मनातही त्या रोमी शताधिपतीसारख्या भावना येत असतील, ज्याने म्हटले: “खरोखर हा देवाचा पुत्र होता.” (मत्तय २७:५४) येशूच्या मृत्यूविषयी विचार करताना या सगळ्या भावना मनात येणे योग्यच आहे. पण वधस्तंभावर येशूचे शेवटले शब्द काय होते ते आठवा. त्याने म्हटले: “पूर्ण झाले आहे!” (योहान १९:३०) काय पूर्ण झाले होते? आपल्या जीवनाद्वारे व मृत्यूद्वारे येशूने बरेच काही साध्य केले हे खरे आहे. पण येशू पृथ्वीवर मुख्यतः यहोवाच्या सार्वभौमत्त्वाविषयी उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्‍नांना छेद देण्यासाठीच आला नव्हता का? आणि यहोवाच्या नावावर लावण्यात आलेला काळीमा पुसून टाकण्यासाठी, ‘संतति’ या नात्याने त्याला सैतानाच्या हातून सर्वात टोकाची परीक्षा सहन करावी लागेल हे देखील आधीच भाकीत करण्यात आले नव्हते का? (यशया ५३:३-७) या अतिशय महत्त्वाच्या जबाबदाऱ्‍या होत्या, पण येशूने त्या पूर्णार्थाने पार पाडल्या. खरोखर त्याने किती मोठी कामगिरी पूर्ण केली होती!

११. एदेन बागेतील भविष्यवाणीची सर्व अर्थांनी पूर्णता करण्यासाठी येशू काय करेल?

११ येशूच्या विश्‍वासूपणामुळे व एकनिष्ठतेमुळे त्याला एका मानवाच्या रूपात नव्हे तर ‘जिवंत करणाऱ्‍या आत्म्याच्या’ रूपात पुनरुत्थित करण्यात आले. (१ करिंथकर १५:४५; १ पेत्र ३:१८) यहोवाने आपल्या पुत्राचे स्वर्गात गौरव केले व त्याला असे अभिवचन दिले: “मी तुझे वैरी तुझे पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस.” (स्तोत्र ११०:१) या ‘वैऱ्‍यांमध्ये’ सर्वात मुख्य दोषी सैतान आणि त्याच्या ‘संततीत’ असलेल्या इतर सर्वांचा समावेश होता. यहोवाच्या मशीही राज्याचा राजा या नात्याने येशू ख्रिस्त स्वर्गात व पृथ्वीवर यहोवाच्या विरोधात असलेल्या सर्वांना नाहीसे करेल. (प्रकटीकरण १२:७-९; १९:११-१६; २०:१-३, १०) तेव्हा कोठे उत्पत्ति ३:१५ यातील भविष्यवाणीची सर्व अर्थांनी पूर्णता होईल. तसेच, “तुझे राज्य येवो. जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो,” या प्रार्थनेचेही खऱ्‍या अर्थाने उत्तर मिळालेले असेल.—मत्तय ६:१०; फिलिप्पैकर २:८-११.

एक अनुकरणीय आदर्श

१२, १३. (क) आज राज्याच्या सुवार्तेला कशाप्रकारचा प्रतिसाद मिळत आहे? (ख) ख्रिस्ताच्या पावलांवर पाऊल ठेवून चालण्याविषयी आपण स्वतःला कोणते प्रश्‍न विचारले पाहिजेत?

१२ आज, येशूने भाकीत केल्याप्रमाणे, राज्याची सुवार्ता अनेक देशांत गाजवली जात आहे. (मत्तय २४:१४) परिणामस्वरूप, लाखो लोकांनी आपले जीवन देवाला समर्पित केले आहे. देवाच्या राज्याद्वारे मिळणाऱ्‍या आशीर्वादांबद्दल जाणून ते रोमांचित झाले आहेत. पृथ्वीवर एका नंदनवनात सर्वकाळ शांती व सुरक्षिततेत जीवनाचा आनंद लुटण्याची ते आतुरतेने वाट पाहात आहेत आणि या आशेविषयी ते आनंदाने इतरांना सांगत आहेत. (स्तोत्र ३७:११; २ पेत्र ३:१३) तुम्ही या राज्य उद्‌घोषकांपैकी एक आहात का? जर असाल, तर तुम्ही प्रशंसेस पात्र आहात. तरीसुद्धा, आणखीही एक गोष्ट आहे ज्याविषयी आपल्यापैकी प्रत्येक व्यक्‍तीने विचार केला पाहिजे.

१३ प्रेषित पेत्राने लिहिले: “ख्रिस्तानेहि तुम्हासाठी दुःख भोगले आणि तेणेकरून तुम्ही त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुम्हांकरिता कित्ता घालून दिला आहे.” (१ पेत्र २:२१) याठिकाणी पेत्राने येशूच्या प्रचार करण्याविषयीच्या आवेशाबद्दल किंवा ज्या कुशलतेने तो इतरांना शिकवत होता त्याबद्दल नव्हे तर त्याच्या दुःख भोगण्याबद्दल लिहिले याकडे लक्ष द्या. यहोवाच्या सार्वभौमत्त्वाच्या अधीन होण्याकरता आणि सैतान खरोखरच लबाड आहे हे सिद्ध करून दाखवण्याकरता येशू कितपत दुःख सहन करण्यास तयार होता, याची एक प्रत्यक्ष साक्षीदार या नात्याने पेत्राला पूर्ण जाणीव होती. मग आपण येशूच्या पावलांवर पाऊल ठेवून कशाप्रकारे चालू शकतो? आपण स्वतःला हे प्रश्‍न विचारले पाहिजे: ‘यहोवाच्या सार्वभौमत्त्वाविषयी माझे वैयक्‍तिक समर्थन व सन्मान व्यक्‍त करण्याकरता मी कितपत दुःख सहन करण्यास तयार आहे? मी ज्याप्रकारे जगतो आणि ज्याप्रकारे सेवाकार्यात सहभाग घेतो त्यावरून यहोवाच्या सार्वभौमत्त्वास समर्थन दर्शवणे हे माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे आहे हे दिसून येते का?’”—कलस्सैकर ३:१७.

१४, १५. (क) अयोग्य सल्ला व प्रस्तावांना येशूने कशी प्रतिक्रिया दाखवली व का? (ख) आपण कोणता वादविषय सदोदीत मनात बाळगला पाहिजे? (“यहोवाची बाजू घ्या” या चौकटीतील मुद्द्‌यांचा समावेश करावा.)

१४ दररोज, आपल्यासमोर अनेक लहानमोठ्या परीक्षा येतात. अनेक निर्णय आपल्याला घ्यावे लागतात. या सर्व प्रसंगी आपण कशाच्या आधारावर निर्णय घेतले पाहिजेत? उदाहरणार्थ, यहोवासोबतचा आपला चांगला नातेसंबंध धोक्यात येईल असे काहीही करण्याचा जेव्हा आपल्याला मोह होतो तेव्हा आपण काय करतो? पेत्राने जेव्हा येशूला म्हटले की त्याने स्वतःवर दया करावी, तेव्हा येशूने काय केले? येशू त्याला म्हणाला: “अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा! . . . देवाच्या गोष्टींकडे तुझे लक्ष नाही, माणसांच्या गोष्टींकडे आहे.” (मत्तय १६:२१-२३) कल्पना करा, की आपल्याला आर्थिक फायद्याची किंवा आपल्या व्यवसायात बढतीची संधी दिली जाते; पण ही संधी स्वीकारल्यास आपल्या आध्यात्मिक कार्यांत व्यत्यय येणार आहे. अशा वेळी आपली प्रतिक्रिया येशूसारखी असेल का? येशूला जेव्हा जाणीव झाली की त्याचे चमत्कार पाहून काही लोक त्याला “राजा करण्याकरिता बळजबरीने धरण्याच्या बेतात आहेत” तेव्हा तो लगेच तेथून निघून गेला.—योहान ६:१५.

१५ या व इतर प्रसंगी येशू इतक्या निश्‍चयी वृत्तीने का वागला? कारण त्याला जाणीव होती की हा केवळ स्वतःला वाचवण्याचा किंवा स्वतःचा फायदा करून घेण्याचा प्रश्‍न नव्हता. त्याला आपल्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करायचे होते आणि यहोवाच्या सार्वभौमत्त्वाला आपले समर्थन दर्शवायचे होते. आणि यासाठी तो कोणतीही किंमत चुकवण्यास तयार होता. (मत्तय २६:५०-५४) जर आपण येशूप्रमाणे, यहोवाच्या सार्वभौमत्त्वाचा मूळ वादविषय सदोदीत मनात बाळगला नाही, तर आपण कोणत्याही क्षणी ख्रिस्ती तत्त्वांविषयी तडजोड करण्याची किंवा त्यांचे उल्लंघन करण्याची शक्यता आहे. का बरे? कारण सैतान हा अयोग्य गोष्टींनाही आकर्षक रूपात समोर आणण्यात तरबेज आहे. हव्वेला मोहात पाडताना त्याने अगदी हेच केले होते. आणि आपण सहज त्याच्या या कुयुक्‍त्‌यांना बळी पडू शकतो.—२ करिंथकर ११:१४; १ तीमथ्य २:१४.

१६. इतरांना मदत करताना आपले कोणते ध्येय असले पाहिजे?

१६ सेवाकार्यात आपण लोकांशी त्यांना जे प्रश्‍न भेडसावतात त्यांविषयी बोलतो आणि त्यांना त्या प्रश्‍नांची बायबलमधील उत्तरे दाखवतो. बायबलचा अभ्यास करण्याकरता त्यांची आस्था वाढवण्याचा हा एक परिणामकारक मार्ग आहे. पण शेवटी, बायबल काय सांगते याविषयी किंवा देवाच्या राज्यात कोणते आशीर्वाद मिळतील याविषयी समजून घेण्यास लोकांना मदत करणे एवढेच आपले ध्येय नाही. आपण त्यांना खरा वादविषय समजून घेण्यास मदत केली पाहिजे. खरे ख्रिस्ती बनून आपला वधस्तंभ उचलण्यास व राज्याखातर दुःख भोगण्यास ते तयार आहेत का? (मार्क ८:३४) जे यहोवाच्या सार्वभौमत्त्वाला समर्थन देतात अशा लोकांमध्ये सामील होण्यास व त्याद्वारे सैतान एक लबाड निंदक आहे हे सिद्ध करून दाखवण्यास ते तयार आहेत का? (नीतिसूत्रे २७:११) आपल्याजवळ, स्वतःला व इतरांनाही असे करण्यास मदत करण्याची सुसंधी आहे.—१ तीमथ्य ४:१६.

देव “सर्वांना सर्वकाही” होईल तेव्हा

१७, १८. आपण यहोवाच्या सार्वभौमत्त्वाचे समर्थन करत असल्यास आपण कोणत्या अद्‌भुत काळाची अपेक्षा करू शकतो?

१७ आपल्या आचरणाद्वारे व सेवाकार्याद्वारे आपण यहोवाच्या सार्वभौमत्त्वाचे समर्थन करतो हे दाखवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत असताना आपण त्या काळाची वाट पाहू शकतो जेव्हा येशू ख्रिस्त “देवपित्याला राज्य सोपून देईल.” हे केव्हा घडेल? प्रेषित पौल याचा खुलासा करतो: “सर्व आधिपत्य, सर्व अधिकार व सामर्थ्यहि नष्ट केल्यावर तो देवपित्याला राज्य सोपून देईल. कारण आपल्या पायाखाली सर्व शत्रु ठेवीपर्यंत त्याला राज्य केले पाहिजे. . . . तेव्हा, ज्याने सर्व त्याच्या अंकित करून दिले त्याच्या अंकित स्वतः पुत्रहि होईल; अशा हेतूने की, देव सर्वांना सर्वकाही व्हावा.”—१ करिंथकर १५:२४, २५, २८.

१८ देव “सर्वांना सर्वकाही” होईल, तो काळ किती अद्‌भुत असेल! ज्या हेतूने देवाच्या राज्याची स्थापना झाली होती तो हेतू साध्य झालेला असेल. यहोवाच्या सार्वभौमत्त्वाचा विरोध करणाऱ्‍या सर्वांचा नाश झालेला असेल. सबंध विश्‍वात शांती व सुव्यवस्था पुनःस्थापित झालेली असेल. स्तोत्रकर्त्याच्या शब्दांत सांगायचे झाल्यास, सर्व सृष्टी तेव्हा असे गायील: “यहोवाला, त्याच्या नावाला योग्य ते गौरव द्या. . . . राष्ट्रांमध्ये म्हणा, ‘यहोवा राज्य करतो.’”—स्तोत्र ९६:८, १०, पं.र.भा.

तुम्ही उत्तर देऊ शकाल का?

• येशूने देवाच्या सार्वभौमत्त्वाचा वादविषय कशाप्रकारे सतत दृष्टिक्षेपात ठेवला?

• आपल्या सेवाकार्याद्वारे व मृत्यूद्वारे येशूने मुख्यतः काय साध्य केले?

• आपण यहोवाच्या सार्वभौमत्त्वाचे समर्थन करतो हे दाखवण्याकरता आपण कोणकोणत्या बाबतीत येशूचे अनुकरण करू शकतो?

[११ पानांवरील चौकट/चित्रे]

यहोवाची बाजू घ्या

कोरिया व इतर अनेक ठिकाणच्या बांधवांना अनुभव आल्याप्रमाणे, ख्रिश्‍चनांना जेव्हा कठीण परीक्षांना तोंड द्यावे लागते तेव्हा, अशा परीक्षा मुळात त्यांच्यावर का येतात याचे कारण मनात स्पष्टपणे बाळगल्यास त्या परीक्षांना तोंड देण्यास आपल्याला साहाय्य मिळते.

भूतपूर्व सोव्हिएत अंमलादरम्यान तुरुंगवास झालेल्या एका यहोवाच्या साक्षीदाराने असे म्हटले: “एदेन बागेत उपस्थित करण्यात आलेला वादविषय, अर्थात यहोवाच्या शासन करण्याच्या अधिकाराविषयीचा वादविषय आमच्या मनात अगदी स्पष्ट होता आणि त्यामुळेच आम्ही [या परीक्षेत] टिकून राहू शकलो. . . . आम्हाला माहीत होते की ही यहोवाच्या शासनाला आमचे समर्थन दर्शवण्याची एक संधी होती. . . . यामुळे आम्ही अगदी खंबीर होऊन यहोवाला एकनिष्ठ राहू शकलो.”

आणखी एका साक्षीदाराने सांगितले की सक्‍तमजुरीच्या शिबिरात राहात असताना त्याला व इतर साक्षीदारांना कशामुळे टिकून राहता आले. तो म्हणतो: “यहोवाने आम्हाला साहाय्य पुरवले. कठीण परिस्थितीतही आम्ही आध्यात्मिकदृष्टीने जागृत होतो. विश्‍वाच्या सार्वभौमत्त्वाच्या वादविषयात आपण यहोवाची बाजू घेतली आहे या सकारात्मक विचाराने आम्ही एकमेकांना प्रोत्साहन देत होतो.”

[८ पानांवरील चित्र]

सैतानाने मोहात पाडण्याचा प्रयत्न केला तेव्हा येशूने कशाप्रकारे यहोवाच्या सार्वभौमत्त्वाला आपले समर्थन दर्शवले?

[१० पानांवरील चित्र]

येशूच्या मृत्यूमुळे काय साध्य झाले?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा