तुझ्यावर चालविण्याकरिता घडिलेले कोणतेहि हत्यार चालणार नाही
“तुझ्यावर चालविण्याकरिता घडिलेले कोणतेहि हत्यार तुजवर चालणार नाही.”—यशया ५४:१७.
१, २. अल्बेनियातील यहोवाच्या साक्षीदारांचा अनुभव यशया ५४:१७ मधील शब्दांची सत्यता कशी सिद्ध करतो?
आग्नेय युरोपमधील एका लहानशा डोंगराळ देशात बऱ्याच दशकांआधी निर्भयी ख्रिश्चनांचा एक लहानसा गट होता. एका नास्तिक कम्युनिस्ट सरकारने या गटाला चुरडून टाकण्याचे सर्वंकष प्रयत्न केले. पण, छळ, श्रम शिबिरे आणि प्रसार माध्यम यांच्याद्वारे पसरवलेली खोटी माहिती यांपैकी कशानेही हा गट पुढे जायचे थांबू शकला नाही. कोण होते ते? ते, अल्बेनियातील यहोवाचे साक्षीदार होते. ते एकत्र येऊ शकत नव्हते, प्रचार करू शकत नव्हते तरीपण, अनेक दशकांपासून त्यांनी दाखवलेल्या चिकाटीमुळे ख्रिस्ती धर्म वरचढ व आदरणीय ठरला आहे आणि यहोवाच्या नावाची स्तुती झाली आहे. गेल्या वर्षी अल्बेनियातील त्यांच्या नवीन शाखा दफ्तराच्या समर्पणप्रसंगी एका फार जुन्या विश्वासू साक्षीदार बांधवाने असे म्हटले: “सैतान खूप प्रयत्न करतो, पण प्रत्येकवेळा हरतो; नेहमी यहोवाचाच विजय होतो!”
२ हे सर्व, यहोवाने आपल्या लोकांना दिलेल्या वचनाच्या सत्यतेचा जिवंत पुरावा आहे. यशया ५४:१७ मध्ये यहोवाने असे वचन दिले आहे: “तुझ्यावर चालविण्याकरिता घडिलेले कोणतेहि हत्यार तुजवर चालणार नाही; तुजवर आरोप ठेवणाऱ्या सर्व जिव्हांना तू दोषी ठरविशील.” सैतानाच्या जगाने काहीही केले तरी यहोवाचे समर्पित सेवक त्याची उपासना थांबवणार नाही, यास इतिहास साक्ष आहे.
सैतानाचे निष्फळ ठरलेले प्रयत्न
३, ४. (क) सैतानाच्या शस्त्रांमध्ये कोणकोणत्या हत्यारांचा समावेश होतो? (ख) सैतानाची हत्यारे कशाप्रकारे निकामी ठरली आहेत?
३ खऱ्या उपासकांविरुद्ध वेगवेगळ्या प्रकारच्या हत्यारांचा उपयोग करण्यात आला आहे; जसे की त्यांच्यावर बंदी आणण्यात आली, जमावाद्वारे हिंसाचार करण्यात आला, त्यांना तुरुंगात डांबण्यात आले, ‘कायद्याने [त्यांच्यावर] अरिष्ट योजण्यात’ आली. (स्तोत्र ९४:२०, पं.र.भा.) या घडीला, यहोवाचे साक्षीदार या लेखाचा अभ्यास करत असताना देखील काही देशांतील या खऱ्या ख्रिश्चनांना देवाप्रती एकनिष्ठा दाखवल्याबद्दल ‘परीक्षेत’ पाडले जात आहे.—प्रकटीकरण २:१०.
४ उदाहरणार्थ, यहोवाच्या साक्षीदारांच्या एका शाखा दफ्तराने असा अहवाल दिला, की देवाचे सेवक क्षेत्र सेवेत असताना त्यांच्यावर हल्ले झाल्याची ३२ प्रकरणे केवळ एका वर्षात घडली. याशिवाय, सार्वजनिक प्रचार कार्यात भाग घेणाऱ्या तरुण व वृद्ध, स्त्री व पुरुष साक्षीदारांना पोलिसांनी अटक केल्याच्या ५९ घटना घडल्या. यांतील काहींच्या बोटांचे ठसे घेण्यात आले, फोटो घेण्यात आले व गुन्हेगार म्हणून त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. इतरांना, त्यांना मारहाण केली जाईल अशा धमक्या देण्यात आल्या. दुसऱ्या एका देशात, यहोवाच्या साक्षीदारांना, अटक केल्याच्या, दंड भरण्याच्या किंवा मारहाण केल्याचे १,१०० पेक्षा अधिक खटले कागदोपत्री आहेत. यांपैकी २०० पेक्षा अधिक प्रकरणे, साक्षीदार जेव्हा येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी साजरा करण्यासाठी जमा झाले होते तेव्हा घडले! तरीसुद्धा, यहोवाच्या आत्म्याने त्याच्या लोकांना, या देशांत आणि इतर राष्ट्रांतही जबरदस्त विरोध होत असतानाही तग धरून राहण्यास मदत केली आहे. (सफन्या ४:६) शत्रूंचा रोष, यहोवाची स्तुती करणाऱ्यांना शांत करू शकणार नाही. कोणतेही शस्त्र देवाच्या उद्देशाचा पराभव करू शकत नाही, असा आपल्याला पूर्ण भरवसा आहे.
आरोप ठेवणाऱ्या जिव्हांना खोटे ठरवणे
५. पहिल्या शतकात यहोवाच्या सेवकांविरुद्ध कोणत्या आरोप लावणाऱ्या जिव्हा होत्या?
५ यशयाने असे भाकीत केले, की देवाचे लोक त्यांच्या विरुद्ध आरोप ठेवणाऱ्या जिव्हांना खोटे ठरवतील. पहिल्या शतकात ख्रिश्चनांविषयी सहसा खोटी माहिती पसरवली जात असे; त्यांना वाईट लोक म्हणून चित्रित केले जात असे. एक उदाहरण प्रेषितांची कृत्ये १६:२०, २१ मधील शब्दांवरून पाहायला मिळते जेथे असे म्हटले आहे: “हे लोक . . . आमच्या नगराला फार त्रास देतात, आणि आम्हा रोमन लोकांना जे परिपाठ स्वीकारावयाला व आचरावयाला योग्य नाहीत ते हे सांगतात.” दुसऱ्या एका प्रसंगी धार्मिक विरोधकांनी शहराच्या अधिकाऱ्यांना ख्रिस्ताच्या अनुयायांविरुद्ध कार्य करण्यास चेतवले. या विरोधकांनी असा दावा केला: “ज्यांनी जगाची उलटापालट केली ते येथेहि आले आहेत; . . . आणि हे सर्व जण कैसराच्या हुकमांविरुद्ध वागतात.” (प्रेषितांची कृत्ये १७:६, ७) प्रेषित पौलावर “एक पीडा” आणि ‘सर्व जगात’ बंड उठवणाऱ्या पंथाचा पुढारी असा ठपका लावण्यात आला होता.—प्रेषितांची कृत्ये २४:२-५.
६, ७. खरे ख्रिस्ती त्यांच्यावर लावल्या जाणाऱ्या खोट्या आरोपांना कोणत्या एका मार्गाने खोटे ठरवतात?
६ आजही जेव्हा खऱ्या ख्रिश्चनांविषयी खोटी माहिती पसरवली जाते, दुष्ट हेतूने त्यांची निंदा केली जाते, त्यांची प्रतिमा बिघडवण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा आपल्याला त्यात आश्चर्य वाटत नाही. या शाब्दिक हल्ल्यांना आपण दोषी कसे ठरवतो अर्थात खोटे कसे ठरवतो?—यशया ५४:१७.
७ यहोवाच्या साक्षीदारांच्या उत्तम आचरणाद्वारे सहसा अशा खोट्या आरोपांना व चुकीच्या माहितीला खोटे ठरवले जाते. (१ पेत्र २:१२) आपण कायद्याने चालणारे नागरिक आहोत आणि सहमानवांच्या कल्याणाबद्दल खरी काळजी दाखवणारे नैतिक लोक आहोत हे, ख्रिस्ती आपल्या आचरणाद्वारे शाबीत करून दाखवतात तेव्हा त्यांच्यावर लावलेले आरोप आपोआप खोटे ठरतात. आपले उत्तम आचरणच आपल्याला बेकसूर ठरवते. उत्तम कार्यांत आपण किती चिकाटीने भाग घेतो हे लोक जेव्हा पाहतात तेव्हा बहुतेकदा ते आपल्या स्वर्गीय पित्याचे गौरव करण्यास प्रवृत्त होतात व यहोवाच्या लोकांची उच्च नैतिक जीवनशैली आहे हे कबूल करतात.—यशया ६०:१४; मत्तय ५:१४-१६.
८. (क) आपल्या शास्त्र आधारित भूमिकेचे समर्थन करण्याकरता काही वेळा आपल्याला काय करावे लागेल? (ख) येशूचे अनुकरण करून आपणही आरोप लावणाऱ्या जिव्हांना खोटे कसे ठरवतो?
८ आपल्या दैवी आचरणाव्यतिरिक्त कधीकधी आपल्याला, आपल्या शास्त्र आधारित भूमिकेचे धैर्याने समर्थन करावे लागेल. यासाठी कदाचित आपल्याला सरकारला व न्यायालयात अपील करावे लागेल. (एस्तेर ८:३; प्रेषितांची कृत्ये २२:२५-२९; २५:१०-१२) येशू पृथ्वीवर होता तेव्हा काही वेळा त्याने त्याची टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले; त्यांच्या खोट्या आरोपांचे खंडन केले. (मत्तय १२:३४-३७; १५:१-११) येशूचे अनुकरण करून आपणही, आपल्या विश्वासांचे स्पष्टीकरण देण्याची संधी मिळते तेव्हा ते आनंदाने देऊ इच्छितो. (१ पेत्र ३:१५) शाळेत, कामाच्या ठिकाणी किंवा सत्यात नसलेले नातेवाईक आपली थट्टा करतात तेव्हा आपण देवाच्या वचनातील सत्य सांगण्याचे थांबवू नये.—२ पेत्र ३:३, ४.
जेरूसलेम—‘भारी पाषाण’
९. जखऱ्या १२:३ मधील ‘भारी पाषाण’ कोणत्या जेरूसलेमेस चित्रित करते आणि पृथ्वीवर या जेरूसलेमेचे कोण प्रतिनिधीत्व करते?
९ राष्ट्रे खऱ्या ख्रिश्चनांचा विरोध का करतात याचे कारण जखऱ्याच्या भविष्यवाणीत स्पष्ट होते. जखऱ्या १२:३ मध्ये काय म्हटले आहे ते पाहा: “त्या दिवशी असे होईल की सर्व राष्ट्रांना भारी पाषाणासारखे असे मी यरुशलेमेस करीन.” कोणत्या जेरूसलेमेकडे ही भविष्यवाणी अंगुली दर्शवत आहे? जखऱ्याच्या भविष्यवाणीतील जेरूसलेम, “स्वर्गीय यरुशलेम” आहे; अभिषिक्त ख्रिश्चनांना ज्याकरता पाचारण करण्यात आले आहे त्या स्वर्गीय राज्यास हे जेरूसलेम चित्रित करते. (इब्री लोकांस १२:२२) या मशीही राज्याच्या वारशांपैकी एक लहानसा शेष भाग अद्यापही पृथ्वीवर आहे. त्यांचे सोबती असलेली “दुसरी मेंढरे” यांच्याबरोबर ते लोकांना, अजूनही वेळ आहे तोवर देवाच्या राज्याकडे वळण्यास आर्जवत आहेत. (योहान १०:१६; प्रकटीकरण ११:१५) राष्ट्रे या आमंत्रणाला कसा प्रतिसाद देतात? आणि यहोवा आज आपल्या खऱ्या उपासकांना कोणत्या प्रकारचा पाठिंबा देत आहे? जखऱ्या पुस्तकाच्या १२ व्या अध्यायाच्या अर्थाचे आपण परीक्षण करून पाहिल्यावर आपल्याला ते समजेल. असे केल्याने आपल्याला हे आश्वासन मिळेल, की देवाच्या अभिषिक्त जणांविरुद्ध आणि त्यांच्या समर्पित सोबत्यांविरुद्ध ‘कोणतेही हत्यार चालणार नाही.’
१०. (क) देवाच्या लोकांवर हल्ले का होतात? (ख) ‘भारी पाषाण’ बाजूला सारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना काय झाले आहे?
१० जखऱ्या १२:३ असे सूचित करते, की राष्ट्रांना ‘जखमा’ होतील. हे कसे होते? राज्याच्या सुवार्तेचा प्रचार झाला पाहिजे, असा देवाने हुकूम दिला आहे. यहोवाचे साक्षीदार प्रचार करण्याची जबाबदारी गांभीर्याने घेतात. परंतु, देवाचे राज्य हीच मानवजातीसाठी एकमेव आशा आहे, असा जो प्रचार होत आहे तो राष्ट्रांना ‘भारी पाषाणासारखा’ झाला आहे. राज्य प्रचारकांच्या कामात अडथळा आणून ते हा प्रचार बंद पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. राज्य प्रचार कार्यात लुडबूड करून या राष्ट्रांनी अनेक ठिकाणी कापून ‘स्वतःला जखमा करून’ घेतल्या आहेत. इतकेच नव्हे तर त्यांचे प्रयत्न फोल ठरल्यामुळे त्यांचे नावलौकिकही खराब झाले आहे. या व्यवस्थीकरणाचा अंत होण्याआधी, देवाच्या मशीही राज्याच्या ‘सार्वकालिक सुवार्तेचा’ प्रचार करण्याचा सुहक्क मिळालेल्या खऱ्या उपासकांची तोंडे ही राष्ट्रे बंद करू शकत नाहीत. (प्रकटीकरण १४:६) यहोवाच्या सेवकांवर होणारा हिंसाचार पाहून एका आफ्रिकन देशातील एका तुरुंग रक्षकाने असे म्हटले: ‘या लोकांचा छळ करून तुम्ही तुमची शक्ती वाया घालवत आहात. ते कधीही हातमिळवणी करणार नाहीत. उलट त्यांची संख्या वाढतच राहील.’
११. जखऱ्या १२:४ मध्ये देवाने जे वचन दिले आहे ते तो कसे पूर्ण करतो?
११ जखऱ्या १२:४ वाचा. आपल्या धैर्यवान राज्य संदेशवाहकांविरुद्ध लढणाऱ्यांना आपण लाक्षणिक अर्थाने अंधत्व आणू आणि त्यांना “वेडे” करू असे वचन यहोवा देतो. आणि त्याने आपले वचन पूर्ण केले आहे. जसे की, खऱ्या उपासनेवर पूर्वी बंदी असणाऱ्या एका देशात विरोधक देवाच्या लोकांना आध्यात्मिक अन्नापासून वंचित ठेवू शकले नाहीत. एका बातमीपत्रकाने तर असाही दावा केला, की यहोवाचे साक्षीदार बायबल साहित्य देशात आणण्याकरता फुग्यांचा उपयोग करीत होते! देवाने आपल्या एकनिष्ठ सेवकांना दिलेले वचन खरे ठरले: “मी आपले डोळे उघडून . . . राष्ट्रांच्या प्रत्येक घोड्यांस अंधत्व आणीन.” रागाने लालबुंद झालेल्या राज्याच्या शत्रूंना कोणत्या दिशेने जायचे हे कळत नाही. पण आपल्याला हा भरवसा आहे, की यहोवा आपल्या लोकांना समूह या नात्याने टिकवून ठेवेल आणि त्यांच्या कल्याणाची काळजी घेईल.—२ राजे ६:१५-१९.
१२. (क) येशू पृथ्वीवर होता तेव्हा त्याने कोणत्या अर्थाने आग पेटवली? (ख) अभिषिक्त शेष एका आध्यात्मिक मार्गाने कशाप्रकारे आग पेटवत आहेत आणि याचा परिणाम काय होत आहे?
१२ जखऱ्या १२:५, ६ वाचा. “यहुदाचे सरदार,” देवाच्या लोकांमध्ये देखरेख असणाऱ्यांना सूचित करतात. राज्याच्या संबंधाने पृथ्वीवरील कार्ये जळजळत्या आवेशाने करण्यास यहोवा या सरदारांना प्रवृत्त करतो. एके प्रसंगी येशूने आपल्या शिष्यांना असे सांगितले: “मी पृथ्वीवर आग पेटवण्यास आलो आहे.” (लूक १२:४९) त्याने खरोखरच लाक्षणिक आग पेटवली. येशूने जेव्हा आवेशाने प्रचार केला तेव्हा देवाच्या राज्याचा संदेश सर्वात महत्त्वाचा संदेश होता. यामुळे संपूर्ण यहुदी राष्ट्रांत वादाची ठिणगी पेटली. (मत्तय ४:१७, २५; १०:५-७, १७-२०) तसेच, “लाकडाखालच्या आगटीसारखे, पेंढ्याखालच्या जळत्या मशालीसारखे” ख्रिस्ताचे पदोपदी अनुकरणारे अनुयायी आपल्या दिवसांत, एका आध्यात्मिक मार्गाने आग पेटवत आहेत. सन १९१७ मध्ये, द फिनिश्ड मिस्ट्रीa नावाच्या पुस्तकाने, ख्रिस्ती धर्मजगताच्या दांभिकपणाचा अगदी जबरदस्तपणे पर्दाफाश केला. यामुळे पाळकवर्ग अतिशय खवळला. अलिकडच्या काळात, “धर्माच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या दुष्ट कृत्यांचा कधी अंत होईल का?” या राज्य सुवार्ता क्र. ३७ पत्रिकेने अनेक लोकांना, देवाच्या राज्याच्या बाजूने अथवा त्याच्या विरोधात बाजू घेण्यास प्रवृत्त केले आहे.
“यहुदाचे डेरे” बचावतील
१३. “यहुदाचे डेरे” हा वाक्यांश काय सूचित करतो आणि ज्यांच्यावर परिणाम होतो त्यांना यहोवा का वाचवतो?
१३ जखऱ्या १२:७, ८ वाचा. प्राचीन इस्राएलमध्ये, तंबू हे देशातील एक वैशिष्ट्य होते. मेंढपाळ आणि शेतात काम करणारे मजूर कधीकधी तंबू टाकून त्यात राहत असत. जेरूसलेम शहरावर कोणा शत्रू राष्ट्राने हल्ला केला तर आधी तंबूत राहणाऱ्या लोकांवर त्याचा परिणाम होत असे आणि त्यांना सुरक्षिततेची आवश्यकता होती. “यहुदाचे डेरे” हा वाक्यांश, अभिषिक्त शेष आपल्या दिवसांत जणू काय तटबंदी शहरांच्या आत नव्हे तर उघड्या माळरानावर आहेत, याला सूचित होते. ते मशीही राज्याच्या कार्याचे निर्भयतेने समर्थन करतात. सेनाधीश यहोवा “प्रथम यहुदाचे डेरे” वाचवेल कारण, सैतान थेट त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे.
१४. ‘यहुदाच्या डेऱ्यांतल्यांचे’ यहोवा समर्थन कसे करतो आणि त्यांना “ठेच” लागण्यापासून कसे वाचवतो?
१४ ऐतिहासिक अहवाल हे सिद्ध करतो, की यहोवा, राज्याच्या या अभिषिक्त दूतांचे त्यांच्या ‘डेऱ्यांत’ अर्थात क्षेत्रात समर्थन करतो.b त्यांना “ठेच” [NW] लागण्यापासून तो त्यांचा बचाव करील अर्थात त्यांना योद्धा राजा असलेल्या दाविदासारखे बलवान व धैर्यवान बनवेल.
१५. यहोवा ‘सर्व राष्ट्रांचा नाश करण्याची खटपट’ का करत आहे व हे तो केव्हा करेल?
१५ जखऱ्या १२:९ वाचा. यहोवा ‘सर्व राष्ट्रांचा नाश करण्याची खटपट’ का करत आहे? कारण ते मशीही राज्याचा सतत विरोध करीत आहेत. देवाच्या लोकांवर जुलूम केल्याबद्दल व त्यांचा छळ केल्याबद्दल ते न्यायदंडास पात्र ठरले आहेत. लवकरच सैतानाचे पृथ्वीवरील हस्तक देवाच्या खऱ्या उपासकांवर शेवटला हल्ला करतील. याने, बायबलमध्ये ज्याचे वर्णन हर्मगिदोन असे केले आहे त्या जागतिक परिस्थितीची सुरुवात होईल. (प्रकटीकरण १६:१३-१६) हा हल्ला होईल तेव्हा सर्वश्रेष्ठ न्यायाधीश आपल्या सेवकांना वाचवेल आणि सर्व राष्ट्रांमध्ये त्याचे नाव पवित्र करेल.—यहेज्केल ३८:१४-१८, २२, २३.
१६, १७. (क) ‘परमेश्वराच्या सेवकांचे वेतन’ काय आहे? (ख) सैतानाचे हल्ले आपण धीराने सहन करतो हा कशाचा पुरावा आहे?
१६ सैतानाचे कोणतेच हत्यार जगभरातील देवाच्या लोकांचा विश्वास कमकुवत करू शकत नाही किंवा त्यांचा आवेश कमी करू शकत नाही. यहोवामध्ये आपल्याला वाचवण्याचे सामर्थ्य आहे या जाणीवेमुळे आपल्याला जी शांती मिळते ती ‘परमेश्वराच्या सेवकांचे वेतन’ आहे. (यशया ५४:१७) कोणीही आपल्याला, आपल्या शांती व आध्यात्मिक श्रीमंतीपासून जबरदस्तीने वंचित ठेवू शकत नाही. (स्तोत्र ११८:६) आपला विरोध करण्यास, आपल्यावर संकट आणण्यास सैतान लोकांना चेतवत राहील. दोष लावला जात असतानाही आपण एकनिष्ठपणे धीर दाखवतो हा, देवाचा आत्मा आपल्यावर असल्याचा पुरावा आहे. (१ पेत्र ४:१४) यहोवाच्या स्थापित राज्याची सुवार्ता संपूर्ण जगभरात घोषित केली जात आहे. देवाच्या लोकांना विरोधाचे तडाखे मारण्यासाठी अनेक लाक्षणिक “गोफणगुंडे” त्यांच्या दिशेने फेकण्यात आले आहेत. तरीपण, यहोवाच्या शक्तीने त्याचे सेवक अशा गोफणगुंडांवर मात करून त्यांना निकामी करतात. (जखऱ्या ९:१५) अभिषिक्त शेष आणि त्यांचे एकनिष्ठ सोबती केव्हाही हार मानणार नाहीत!
१७ दियाबलाच्या हल्ल्यांपासून कायमची मुक्ती मिळण्याची आपण वाट पाहत आहोत. ‘आपल्यावर चालवण्याकरता घडलेले कोणतेही हत्यार आपल्यावर चालणार नाही; आपल्यावर आरोप ठेवणाऱ्या सर्व जिव्हांना आपण दोषी ठरवू,’ या हमीमुळे आपल्याला किती सांत्वन मिळते!
[तळटीपा]
a यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले, पण सध्या छापले जात नाही.
b अधिक माहितीकरता, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले यहोवाचे साक्षीदार—देवाच्या राज्याचे उद्घोषक (इंग्रजी) पुस्तकाची पृष्ठे ६७५-६, पाहा.
तुमचे उत्तर काय आहे?
• सैतानाची हत्यारे निकामी ठरली आहेत हे कशावरून दिसून येते?
• स्वर्गीय जेरूसलेम ‘भारी पाषाणासारखे’ कसे होते?
• यहोवा ‘यहुदाच्या डेऱ्यांना’ कसे वाचवतो?
• आपण हर्मगिद्दोनाच्या जसजसे जवळ येतो तसतसे आपल्याला कोणती खात्री आहे?
[२३ पानांवरील चित्रे]
अल्बेनियातील यहोवाचे लोक सैतानाचे हल्ले होत असूनही विश्वासू राहिले
[२५ पानांवरील चित्र]
येशूने त्याच्यावर लावलेल्या दोषारोपांचे खंडन केले
[२६ पानांवरील चित्रे]
सुवार्तेचा प्रचार करणाऱ्यांवर चालवण्याकरता घडवलेले कोणतेही हत्यार चालणार नाही