वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • br-1 १२/१ पृ. १८-२२
  • ‘स्थिर उभे राहा आणि परमेश्‍वराचे तारण पाहा’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘स्थिर उभे राहा आणि परमेश्‍वराचे तारण पाहा’
  • टेहळणी बुरूज अभ्यास लेख माहितीपत्रक
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवा आपल्या लोकांना वाचवतो
  • “परमेश्‍वर आज तुमचे जे तारण करील ते पाहा”
  • इस्राएलाच्या तारणातून धडा घ्या
  • यहोवावर भरवसा ठेवा
  • यहोवाचे मार्ग जाणून घेणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • यहोवा कोण आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • “जो अदृश्‍य आहे त्याला” तुम्ही पाहत आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • देव इस्राएल लोकांची गुलामगिरीतून सुटका करतो
    बायबल—मानवजातीला कोणता संदेश देते?
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज अभ्यास लेख माहितीपत्रक
br-1 १२/१ पृ. १८-२२

‘स्थिर उभे राहा आणि परमेश्‍वराचे तारण पाहा’

“परमेश्‍वर माझ्या पक्षाचा आहे; मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार?”—स्तोत्र ११८:६.

१. मानवजात भविष्यात लवकरच कशाचा अनुभव घेणार आहे?

मानवजात लवकरच अशा एका मोठ्या संकटाला तोंड देणार आहे ज्याचा मानवजातीने पूर्वी कधीच अनुभव घेतलेला नाही. आपल्या दिवसाविषयी भाकीत करताना येशूने आपल्या अनुयायांना सावध राहण्याविषयी इशारा दिला: “जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही, व पुढे कधीहि येणार नाही असे मोठे संकट त्या काळी येईल; आणि ते दिवस कमी केले नसते तर कोणाहि मनुष्याचा निभाव लागला नसता; परंतु निवडलेल्यांसाठी ते कमी केले जातील.”—मत्तय २४:२१, २२.

२. मोठ्या संकटाला कोणी रोखून धरले आहे?

२ देवदूत मानवांना दिसत नसले तरीसुद्धा त्यांनी या महान संकटाला रोखून धरले आहे. या संकटाला का रोखून धरण्यात आले आहे त्याचे कारण प्रेषित योहानाला येशूने दाखवलेल्या एका दृष्टांतात पाहण्याचा सुहक्क मिळाला. वृद्ध प्रेषित योहान त्याचे वर्णन कसे करतो ते पाहा: “मी चार देवदूत पृथ्वीच्या चार कोनांवर उभे राहिलेले पाहिले, ते . . . पृथ्वीचे चार वारे अडवून धरीत होते. मी आणखी एक देवदूत सूर्योदयाच्या दिशेने वर चढताना पाहिला, त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता; [त्या] चार देवदूतांना . . . तो उच्च स्वराने म्हणाला, ‘आमच्या देवाचे जे दास आहेत त्यांच्या कपाळावर आम्ही शिक्का मारीपर्यंत पृथ्वीला, समुद्राला व झाडांना उपद्रव करू नका.’”—प्रकटीकरण ७:१-३.

३. मोठ्या संकटाचा पहिला टप्पा काय असेल?

३ ‘आमच्या देवाच्या [अभिषिक्‍त] दासांचा’ शेवटला शिक्का मारण्याचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. ते चार देवदूत विनाशकारी वारे सोडण्याच्या तयारीत आहेत. जेव्हा ते त्या वाऱ्‍यांना सोडतील तेव्हा सर्वात आधी काय होईल? एक देवदूत याचे उत्तर देतो: “मोठी नगरी बाबेल झपाट्याने टाकली जाईल व ह्‍यापुढे कधीहि सापडणार नाही.” (प्रकटीकरण १८:२१) खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्याचा विनाश होईल तेव्हा स्वर्गात किती उल्लास होईल!—प्रकटीकरण १९:१, २.

४. पुढे कोणत्या घडामोडी होणार आहेत?

४ पृथ्वीची सर्व राष्ट्रे यहोवाच्या लोकांच्या विरुद्ध एकजूट झालेली असतील. या विश्‍वासू ख्रिश्‍चनांचा समूळ नाश करण्यात या राष्ट्रांना यश मिळेल का? यश मिळेलच, असे त्यांना वाटेल. पण, येशू ख्रिस्त आपल्या स्वर्गीय सैन्याबरोबर या मानवी शक्‍तींचाच कायमचा नाश करून टाकेल. (प्रकटीकरण १९:१९-२१) आणि शेवटी मग दियाबल आणि त्याचे दुरात्मे यांना निष्क्रियतेच्या अगाधकूपात टाकले जाईल. त्याच्यानंतर ते मानवांची दिशाभूल करू शकणार नाहीत कारण हजार वर्षांसाठी त्यांना बांधून ठेवले जाईल. मोठ्या संकटातून वाचलेला मोठा समूह सुटकेचा निःश्‍वास सोडेल!—प्रकटीकरण ७:९, १०, १४; २०:१-३.

५. यहोवाशी एकनिष्ठ राहणारे कोणता आनंद अनुभवणार आहेत?

५ या अद्‌भुत आणि भय-प्रेरक घटना आपण लवकरच अनुभवणार आहोत. या घटनांचा संबंध, यहोवाच्या शासन करण्याच्या हक्काशी अर्थात त्याच्या सार्वत्रिक सार्वभौमत्वाशी आहे. विचार करा: आपण जर यहोवाशी विश्‍वासू राहिलो आणि त्याच्या सार्वभौमत्वाच्या बाजूने दृढ राहिलो तर आपल्याला त्याच्या नावाच्या पवित्रीकरणात व त्याच्या उद्देशांच्या पूर्णतेत भाग घेण्याची संधी मिळेल. हा आनंद किती अमोल असेल!

६. जवळच येऊन ठेपलेल्या घटनांच्या संबंधाने आपण कोणत्या गोष्टी पाहणार आहोत?

६ या महत्त्वाच्या घटनांसाठी आपण तयार आहोत का? यहोवामध्ये आपल्याला वाचवण्याची शक्‍ती आहे असा आपण भरवसा ठेवतो का? उचित वेळी आणि उत्तम प्रकारे तो आपल्या मदतीला धावून येईल, अशी आपल्याला खात्री आहे का? या प्रश्‍नांची उत्तरे स्वतःला देताना आपण, प्रेषित पौलाने रोममधील सहख्रिश्‍चनांना काय सांगितले ते लक्षात ठेवू शकतो. त्याने म्हटले: “धीराच्या व शास्त्रापासून मिळणाऱ्‍या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी म्हणून जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरिता लिहिले.” (रोमकर १५:४) आपल्या शिक्षणाकरीता, आपल्याला सांत्वन आणि आशा देण्याकरीता शास्त्रवचनांत ज्या गोष्टी लिहून ठेवल्या आहेत त्यामध्ये त्या प्रसंगाचा अहवाल आहे जेव्हा यहोवाने इस्राएलांना त्यांच्यावर जाचजुलूम करणाऱ्‍या ईजिप्शियन लोकांच्या हातून सोडवले. यहोवाने इस्राएली लोकांचे तारण कसे घडवून आणले त्याबद्दलच्या रंजक घटनांचे जवळून परीक्षण केल्यावर आपल्याला, मोठ्या तेजीने जवळ येणाऱ्‍या मोठ्या संकटातून आपला बचाव कसा होईल हे पाहून खूप उत्तेजन मिळेल.

यहोवा आपल्या लोकांना वाचवतो

७. सा.यु.पू. १५१३ मध्ये ईजिप्तमध्ये कोणते तंग वातावरण निर्माण झाले होते?

७ वर्ष आहे सा.यु.पू. १५१३. यहोवाने ईजिप्तवर आधीच नऊ पीडा आणल्या आहेत. यांपैकी शेवटल्या पीडेनंतर फारो मोशेला असे म्हणत पिटाळून लावतो: “माझ्यापुढून चालता हो आणि संभाळ, पुनः मला आपले तोंड दाखवू नकोस. तू आपले तोंड मला दाखविशील, त्या दिवशी तू मरशील.” मोशे त्याला म्हणतो: “तू ठीक बोललास; मी पुनः तुझे तोंड कधीहि पाहणार नाही.”—निर्गम १०:२८, २९.

८. इस्राएलांना बचावाकरता कोणत्या सूचना देण्यात आल्या होत्या व याचा काय परिणाम झाला?

८ यहोवा आता मोशेला सांगतो, की फारोला आणि सर्व ईजिप्शियन लोकांना आणखी एक शेवटला फटका बसेल. अबीब (निसान) महिन्याच्या १४ व्या तारखेला प्रत्येक ईजिप्शियन मनुष्याचा आणि प्रत्येक प्राण्याचा ज्येष्ठ जन्मलेला मारला जाईल. पण देवाने मोशेला दिलेल्या सूचनांचे पालन केल्यास इस्राएली घराणी वाचू शकतील. त्यांना आपल्या घराच्या दोन्ही दारबाह्‍यांना व चौकटीच्या कपाळपट्टीला एका नर मेंढराचे रक्‍त लावायचे होते आणि घरातून बाहेर पडायचे नव्हते. त्या रात्री काय झाले? मोशे काय सांगतो ते पाहा: “मध्यरात्री असे झाले की मिसर देशातील . . . सर्व प्रथमवत्स परमेश्‍वराने मारून टाकिले.” यावर फारो त्वरीत कार्य करतो. तो मोशेला व अहरोनाला बोलावून घेतो आणि त्यांना सांगतो: “माझ्या लोकांतून निघून जा; तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जाऊन परमेश्‍वराची सेवा करा.” मग काय, इस्राएली लोक लगेच निघतात. कदाचित, तीस लाखांपेक्षा अधिक लोक, आणि त्यांच्याबरोबर गैर इस्राएली लोकांचा “एक मोठा मिश्र समुदाय” देखील जातो.—निर्गम १२:१-७, २९, ३१, ३७, ३८.

९. यहोवा इस्राएली लोकांना ईजिप्तमधून कोणत्या मार्गाने नेतो व त्याने हा मार्ग का निवडला?

९ इस्राएलांना सर्वात जवळच्या मार्गावरून, भूमध्य समुद्राकडून व पलिष्ट्यांच्या देशातून नेता येत होते. पण हे तर शत्रूंचे क्षेत्र होते. त्यामुळे, आपल्या लोकांना युद्धापासून वाचवण्याकरता यहोवा त्यांना लाल समुद्राच्या रानाच्या मार्गावरून नेतो. लोकांची संख्या लाखोंवर होती तरीपण कुठेही गोंधळ नव्हता. बायबलमधील अहवाल आपल्याला असे सांगतो: “इस्राएल लोक मिसर देशातून लढाईला सज्ज” होतात त्याप्रमाणे निघाले.—निर्गम १३:१७, १८.

“परमेश्‍वर आज तुमचे जे तारण करील ते पाहा”

१०. देव इस्राएल लोकांना पी-हहिरोथापुढे तळ ठोकण्यास का सांगतो?

१० यानंतर, घटनांना एक आश्‍चर्यकारक वळण लागते. यहोवा मोशेला सांगतो: “इस्राएल लोकांना असे सांग की, तुम्ही मागे फिरून मिग्दोल आणि समुद्र ह्‍यांच्यामध्ये असलेल्या पी-हहिरोथापुढे बालसफोनासमोर तळ द्यावा.” इस्राएल लोक या सूचनांचे पालन करतात खरे, पण या मोठ्या लोकसमुदायाची, इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था होते. एकाबाजूला डोंगर आणि दुसऱ्‍या बाजूला लाल समुद्राचा एक बाहू याच्या मध्ये ते अडकतात. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग नाही असे त्यांना वाटू लागते. परंतु आपण काय करतो हे यहोवाला चांगले माहीत असते. तो मोशेला सांगतो: “मी फारोचे मन कठीण करीन आणि तो त्यांचा पाठलाग करील; ह्‍याप्रकारे फारो व त्याची सर्व सेना ह्‍यांच्यावर मी गौरवशाली होईन, आणि मी परमेश्‍वर आहे हे मिसरी लोक ओळखतील.”—निर्गम १४:१-४.

११. (क) फारो काय करतो आणि इस्राएली लोक कशी प्रतिक्रिया दाखवतात? (ख) इस्राएली लोक कुरकुर करू लागतात तेव्हा मोशे त्यांना काय म्हणतो?

११ आपण इस्राएली लोकांना ईजिप्तमधून सोडून घोडचूक केली असे फारोला वाटू लागल्यामुळे तो ६०० निवडक रथ आणि त्यावरील सरदार घेतो आणि त्यांचा पाठलाग करतो. जेव्हा इस्राएली लोकांनी या ईजिप्शियन सैन्याला पाहिले तेव्हा ते गर्भगळीत होऊन मोशेला ओरडून म्हणू लागले: “मिसरात काय कबरा नव्हत्या म्हणून तू आम्हाला येथे रानात मारायला आणिले?” पण यहोवा आपल्याला जरूर वाचवेल ही मोशेला खात्री होती त्यामुळे तो त्यांना म्हणाला: “भिऊ नका स्थिर उभे राहा आणि परमेश्‍वर आज तुमचे जे तारण करील ते पाहा. . . . परमेश्‍वर तुम्हासाठी लढेल; तुम्ही शांत राहा.”—निर्गम १४:५-१४.

१२. यहोवा आपल्या लोकांना कसे वाचवतो?

१२ मोशेचे शब्द खरे ठरतात. यहोवा स्वतः अलौकिक शक्‍तींच्या द्वारे इस्राएली लोकांच्या वतीने लढणार होता. यहोवाचा देवदूत चमत्कारिकरीत्या, इस्राएलांच्या पुढे असलेला मेघस्तंभ त्यांच्या मागे नेतो. या मेघामुळे, ईजिप्शियन लोकांवर अंधार येतो पण तोच मेघस्तंभ इस्राएलांना प्रकाश देतो. (निर्गम १३:२१, २२; १४:१९, २०) देवाच्या आज्ञेनुसार मोशे आता लाल समुद्राच्या समोर आपला हात उगारतो. अहवालात पुढे म्हटले आहे: “तेव्हा परमेश्‍वराने रात्रभर पूर्व दिशेचा जोराचा वारा वाहवून समुद्र मागे हटविला. . . . इस्राएल लोक भरसमुद्रात कोरड्या जमिनीवरून चालू लागले आणि उजवीकडील व डावीकडील पाणी त्यांच्यासाठी भिंतीसारखे झाले.” ईजिप्शियन लोकही समुद्राच्या कोरड्या जमिनीवर इस्राएली लोकांचा पाठलाग करू लागतात; पण यहोवा आपल्या लोकांच्या बाजूने होता. तो ईजिप्शियन लोकांच्या सैन्यात गोंधळ माजवतो आणि मोशेला सांगतो: “आपला हात समुद्रावर उगार म्हणजे पाणी पूर्वीसारखे जमून मिसऱ्‍यांवर, त्यांच्या रथांवर व स्वारांवर येईल.” फारोचे संपूर्ण सैन्य सुमद्रात बुडून नाश होते; एकही सैनिक वाचत नाही!—निर्गम १४:२१-२८; स्तोत्र १३६:१५.

इस्राएलाच्या तारणातून धडा घ्या

१३. इस्राएलांची सुटका झाली तेव्हा त्यांनी काय केले?

१३ इस्राएली लोक असे चमत्कारिकरीत्या बचावले तेव्हा त्यांच्यावर काय परिणाम झाला? मोशेने व इस्राएली लोकांनी आनंदाने गाऊन यहोवाची स्तुती करायला सुरुवात केली! ते असे गाऊ लागले: “मी परमेश्‍वराला गीत गाईन, कारण तो विजयी होऊन उन्‍नत झाला आहे; . . . परमेश्‍वर युगानुयुग राज्य करील.” (निर्गम १५:१, १८) होय, त्यांच्या मनात आधी यहोवाला उंचावण्याचा विचार आला. या घटनेत यहोवाने आपले सार्वभौमत्व दाखवले होते.

१४. (क) इस्राएलांच्या अनुभवातून आपण यहोवाविषयी काय शिकतो? (ख) २००८ सालचे वार्षिक वचन काय आहे?

१४ या चित्तथरारक घटनांतून आपल्याला कोणता बोध, सांत्वन व आशा मिळते? यहोवाच्या लोकांना कोणत्याही प्रकारच्या परीक्षेला तोंड द्यावे लागत असले तरीसुद्धा तो त्यांना त्यातून वाचवण्यास समर्थ आहे, हे आपण पाहू शकतो. अशी कोणतीही परिस्थिती नाही ज्यावर तो मात करू शकत नाही. यहोवाने जेव्हा पूर्व दिशेचा जोराचा वारा वाहवून समुद्र मागे हटविला तेव्हा इस्राएली लोकांपुढे कोणतेही अडखळण राहिले नाही. यहोवा त्याच लाल समुद्राच्या पाण्यात फारोच्या सैन्याला जलसमाधी देऊ शकला. यावर मनन करताना आपणही स्तोत्रकर्त्याच्या शब्दांना सहमती दर्शवू शकतो: “परमेश्‍वर माझ्या पक्षाचा आहे; मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार?” (स्तोत्र ११८:६) रोमकर ८:३१ मधील पौलाच्या या शब्दांतूनही आपल्याला सांत्वन मिळू शकते: “देव आपणाला अनुकूल असल्यास आपणाला प्रतिकूल कोण?” या ईश्‍वरप्रेरित देववाणीतून आपल्याला किती आश्‍वासन मिळते! यामुळे आपल्या मनातील सर्व भीती व शंका नाहीशा होतात आणि आपल्याला आशा मिळते. म्हणूनच २००८ सालचे वार्षिक वचन किती उचित आहे: ‘स्थिर उभे राहा आणि यहोवाचे तारण पाहा!’—निर्गम १४:१३, पं.र.भा.

१५. इस्राएल लोकांची ईजिप्तमधून सुटका होताना आज्ञाधारकपणा दाखवणे महत्त्वाचे का होते व आजही का आहे?

१५ इस्राएलाचे ईजिप्तमधून निघण्याच्या अहवालातून आपण आणखी काय शिकतो? यहोवा आपल्याला जे काही सांगतो ते आपण ऐकले पाहिजे. वल्हांडणाविषयी यहोवाने जी सविस्तर तयारी इस्राएल लोकांना करायला सांगितली होती ती सर्व त्यांनी केली. निसान १४ च्या रात्री कोणीही घराच्या बाहेर पडू नये म्हणून त्यांना जी आज्ञा देण्यात आली होती ती त्यांनी पाळली. ईजिप्त सोडताना त्यांना “लढाईला सज्ज होऊन” जातात तसे जाण्यास सांगितले होते. (निर्गम १३:१८) आज, ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाकरवी’ आपल्याला जे मार्गदर्शन दिले जाते ते आपण अनुसरणे अतिशय महत्त्वाचे आहे. (मत्तय २४:४५) ‘हाच मार्ग आहे; याने चला, . . . तुम्हाला उजवीकडे जावयाचे असो किंवा डावीकडे जावयाचे असो,’ अशी वाणी आपल्या मागून येते तेव्हा ती आपण लक्षपूर्वक ऐकली पाहिजे. (यशया ३०:२१) मोठ्या संकटाच्या उद्रेकाच्या आपण जसजसे जवळ येतो तसतसे आपल्याला कदाचित काही सविस्तर माहिती दिली जाईल. त्या क्लेशमय काळात आपण जर यहोवाच्या इतर एकनिष्ठ सेवकांच्या संगतीने राहिलो तरच आपला प्रवास सुरक्षित होईल.

१६. इस्राएलांची सुटका करताना यहोवाने ज्याप्रकारे घटना घडवून आणल्या त्यावरून आपण काय शिकू शकतो?

१६ यहोवाने इस्राएलांना अशा एका परिस्थितीत आणले होते जेव्हा त्यांची अवस्था इकडे आड आणि तिकडे विहीर अशी भासत होती, हेही आठवा. एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्‍या बाजूला लाल समुद्र. परिस्थिती अगदीच आशाहीन वाटत होती. पण सर्व काही यहोवाच्या नियंत्रणात होते. त्याने जे काही केले त्यामुळे त्याची स्तुती झाली आणि त्याच्या लोकांचे तारण झाले. आज, संघटनेतील काही गोष्टी ज्याप्रकारे हाताळल्या जातात, त्याचे कारण कदाचित आपल्याला स्पष्ट दिसणार नाही, पण यहोवा आपल्या विश्‍वासू माध्यमाचा उपयोग करून पुरवत असलेल्या मार्गदर्शनावर आपण पूर्ण मनाने भरवसा ठेवू शकतो. कधीकधी आपले शत्रू आपल्याला चीत करत आहेत असे आपल्याला वाटेल. आपल्या मर्यादित दृष्टिकोनामुळे आपण संपूर्ण चित्र पाहू शकत नसू. तरीपण, उचित समयी यहोवा, त्याने इस्राएल लोकांच्या बाबतीत केले तसे आजही घटना घडवून आणण्यास समर्थ आहे.—नीतिसूत्रे ३:५.

यहोवावर भरवसा ठेवा

१७. देवाच्या मार्गदर्शनावर आपण पूर्ण भरवसा का ठेवू शकतो?

१७ दिवसा मार्ग दाखवण्यासाठी मेघस्तंभाची आणि रात्री उजेड देण्यासाठी अग्निस्तंभाची यहोवाने जी योजना केली होती त्यावर इस्राएली लोकांनी मनन केले तेव्हा त्यांना यहोवावर किती भरवसा वाटला असावा याची तुम्ही कल्पना करू शकता का? “[खऱ्‍या] देवाचा दूत” त्यांच्या प्रवासात त्यांचे मार्गदर्शन करत होता हे स्पष्ट होते. (निर्गम १३:२१, २२; १४:१९) आज आपणही भरवसा ठेवू शकतो की, यहोवा आपल्या लोकांना मार्गदर्शन देण्यासाठी, त्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांची सुटका करण्यासाठी त्यांच्यासोबत आहे. “तो आपल्या भक्‍तास सोडीत नाही; त्यांचे रक्षण सर्वकाळ होते,” या अभिवचनावर आपण विश्‍वास ठेवू शकतो. (स्तोत्र ३७:२८) आज देवाच्या सेवकांच्या पाठीशी असलेल्या त्या शक्‍तिशाली देवदूतांना आपण विसरू नये. त्यांच्या मदतीने आपण ‘स्थिर उभे राहून यहोवाचे तारण पाहू’ शकतो.—निर्गम १४:१३, पं.र.भा.

१८. आपण “देवाची [संपूर्ण] शस्त्रसामग्री धारण” का केली पाहिजे?

१८ कोणती गोष्ट आपल्याला सत्याच्या मार्गात “स्थिर उभे” राहण्यास मदत करू शकेल? पौलाने इफिसकरांना लिहिलेल्या आपल्या पत्रात ज्या आध्यात्मिक शस्त्रसामग्रीचे वर्णन केले आहे ते परिधान केल्याने आपण “स्थिर उभे” राहू शकू. “देवाची [संपूर्ण] शस्त्रसामग्री धारण करा” असे प्रेषित पौल आपल्याला आर्जवतो. या आध्यात्मिक शस्त्रसामग्रीतील प्रत्येक शस्त्र आपण परिधान केले आहे का? येत्या वर्षात आपण प्रत्येकाने, शस्त्रसामग्रीतील प्रत्येक शस्त्र जागच्या जागी व योग्यरीत्या बसलेले आहे किंवा नाही याचे परीक्षण करून पाहिले पाहिजे. दियाबल सैतान, जो आपला शत्रू आहे, त्याला आपल्या कमजोरी माहीत आहेत. आपण जेव्हा बेसावध असतो तेव्हा आपल्याला पकडण्याचा किंवा आपल्यावर वर्मी घाव घालण्याचा तो प्रयत्न करतो. दुष्ट आत्मिक शक्‍तींविरुद्ध “आपले झगडणे” आहे. पण यहोवाच्या शक्‍तीने आपण विजयी ठरू शकतो.—इफिसकर ६:११-१८; नीतिसूत्रे २७:११.

१९. आपण जर शेवटपर्यंत टिकून राहिलो तर आपल्याला कोणता सुहक्क मिळेल?

१९ “तुम्ही आपल्या धीराने आपले जीव मिळवाल,” असे येशूने आपल्या अनुयायांना म्हटले. (लूक २१:१९) समोर येणाऱ्‍या कोणत्याही अडीअडचणींना विश्‍वासूपणे चीत करणाऱ्‍यांपैकी आपण असूया जेणेकरून देवाच्या अपात्री कृपेमुळे आपल्याला ‘स्थिर उभे राहून यहोवाचे तारण पाहण्याचा’ सुहक्क मिळू शकेल.

तुमचे काय उत्तर आहे?

• लवकरच कोणत्या चित्तथरारक घटना घडणार आहेत?

• सा.यु.पू. १५१३ मध्ये यहोवाने आपल्या लोकांना वाचवून त्याच्या शक्‍तीचे प्रदर्शन कसे केले?

• भविष्यात तुम्ही काय करण्याचा निश्‍चय केला आहे?

[२२ पानांवरील संक्षिप्त आशय]

२००८ सालचे वार्षिक वचन असे आहे: ‘स्थिर उभे राहा आणि यहोवाचे तारण पाहा!’ —निर्गम १४:१३, पं.र.भा.

[१९ पानांवरील चित्र]

“जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरिता लिहिले”

[२० पानांवरील चित्र]

फारोच्या हट्टापायी ईजिप्तचा नाश झाला

[२१ पानांवरील चित्र]

इस्राएल लोकांनी यहोवाच्या आज्ञा पाळल्या तेव्हा ते बचावले

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा