वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 १/१ पृ. १७-२२
  • “सत्य व शांति यांची आवड धरा”!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “सत्य व शांति यांची आवड धरा”!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ‘तुमचे हात दृढ होवोत’
  • “भिऊ नका”
  • “आपल्या शेजाऱ्‍याबरोबर खरे बोला”
  • “हर्ष व आनंद”
  • ‘आपण यहोवाजवळ अनुग्रह मागू’
  • “सर्व भाषा बोलणाऱ्‍या राष्ट्रांपैकी दहा जण”
  • यहोवा विपुल शांती आणि सत्य देतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • “देवाची शांती” तुमच्या अंतःकरणाचे रक्षण करो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • हाग्गय व जखऱ्‍या पुस्तकातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • आपले हात दृढ करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 १/१ पृ. १७-२२

“सत्य व शांति यांची आवड धरा”!

“सेनाधीश परमेश्‍वराचे [यहोवाचे, NW] वचन मला प्राप्त झाले की: . . .‘सत्य व शांति यांची आवड धरा.‘”—जखऱ्‍या ८:१८, १९.

१, २. (अ) शांतीच्या बाबतीत मानवजातीचा काय अहवाल आहे? (ब) हे सध्याचे जग खरी शांती का पाहू शकणार नाही?

“या जगाला शांती कधीच लाभली नाही. कोठेतरी—आणि बहुधा पुष्कळ ठिकाणी एका वेळेस—युद्ध चालूच असते.” असे अमेरिकेच्या संयुक्‍त संस्थानातील मॅसाशुसेट्‌स विद्यापीठाचे प्राध्यापक मिल्टन मेयर म्हणाले. मानवजातीवर किती तो दुःखद आविष्कार! खरेच, मानवांना शांतीची गरज वाटली आहे. राज्यकर्त्यांनी, रोमी काळातील पॅक्स रोमाना पासून शीतयुद्धादरम्यानचा “परस्पर आश्‍वासित विनाश,” (M.A.D.) धोरणापर्यंत, ती टिकून ठेवण्यासाठी हरतऱ्‍हेचे प्रयत्न केले आहेत. परंतु अखेरीस, त्यांचे सर्व प्रयत्न विफल ठरले. अनेक शतकांआधी यशयाने व्यक्‍त केल्याप्रमाणे ‘शांतीचा संदेश आणणारे स्फुंदून स्फुंदून रडले.’ (यशया ३३:७) असे का बरे?

२ कारण, चिरकाल शांती द्वेष आणि लोभ विरहित परिस्थितीतून उत्पन्‍न झाली पाहिजे; ती सत्यावर आधारित असली पाहिजे. शांती, लबाडींवर आधारित असू शकत नाही. म्हणूनच, यहोवाने प्राचीन इस्राएलसाठी पुनर्स्थापना आणि शांतीचे अभिवचन देताना म्हटले: “नदीप्रमाणे शांति व पाण्याच्या पुराप्रमाणे राष्ट्रांचे वैभव मी तिजकडे वाहवितो.” (यशया ६६:१२) या युगाचा दैवत, दियाबल सैतान, “मनुष्यघातक,” खुनी व “लबाड व लबाडीचा बाप आहे.” (योहान ८:४४; २ करिंथकर ४:४) तेव्हा, असे दैवत असलेल्या जगात शांती असणे कसे शक्य आहे?

३. त्रस्त जगात राहत असताना देखील यहोवाने त्याच्या लोकांसाठी कोणते उल्लेखनीय बक्षीस दिले आहे?

३ परंतु यहोवा आपल्या लोकांना, सैतानाच्या युद्ध-ग्रस्त जगात राहत असताना देखील शांती देतो हे उल्लेखनीय आहे. (योहान १७:१६) सा. यु. पू. सहाव्या शतकात त्याने यिर्मयाद्वारा आपले अभिवचन पूर्ण केले व त्यांना त्याच्या मातृदेशी परत आणले तेव्हा “शांति व सत्य” दिले. (यिर्मया ३३:६) तसेच, त्याने या शेवटल्या दिवसांमध्ये, आजपर्यंत या जगाने कधी पाहिले नव्हते अशा त्रस्त काळात राहत असताना त्याच्या लोकांना त्यांच्या ‘देशात,’ किंवा पार्थिव आध्यात्मिक संपदेत “शांति व सत्य” देऊ केले. (यशया ६६:८; मत्तय २४:७-१३; प्रकटीकरण ६:१-८) जसजसे आपण जखऱ्‍याच्या ८ व्या अध्यायाची चर्चा करु तसे आपल्याला या ईश्‍वरप्रदत्त शांती आणि सत्याची सखोल समज प्राप्त होईल आणि त्यातील आपला सहभाग आपण कशाप्रकारे टिकवून ठेवू शकतो हेही आपल्याला दिसेल.

‘तुमचे हात दृढ होवोत’

४. इस्राएलांना शांती हवी असल्यास त्यांनी कशा प्रकारे वागावे त्यासाठी जखऱ्‍याने त्यांना कसे उत्तेजन दिले?

४ जखऱ्‍याच्या ८ व्या अध्यायात आपण सहाव्या वेळी यहोवाकडून एक रोमांचकारी घोषणा ऐकतो: “सेनाधीश परमेश्‍वर म्हणतो, ‘सेनाधीश परमेश्‍वराचे मंदिर बांधावे म्हणून त्याचा पाया घातला त्या वेळच्या संदेष्ट्यांची ही वचने या समयी जे तुम्ही ऐकत आहा, ते तुम्ही आपले हात दृढ करा. त्या दिवसापूर्वी माणसास मजुरी मिळत नसे, पशूबद्दल भाडे मिळत नसे व येणाऱ्‍याजाणाऱ्‍यास शत्रूमुळे स्वास्थ्य मिळत नसे; कारण माणसांनी एकमेकांवर उलटावे असे मी केले.’”—जखऱ्‍या ८:९, १०.

५, ६. (अ) इस्राएल लोक निरुत्साहित झाल्यामुळे इस्राएलची दशा कशी झाली? (ब) इस्राएलांनी यहोवाच्या उपासनेला प्रथम स्थान दिल्यास त्याने कोणता बदल करण्याचे त्यांना अभिवचन दिले?

५ जेरुसलेममध्ये मंदिराची पुनर्बांधणी होत असताना जखऱ्‍या असे बोलला. सुरवातीला, बॅबिलोनमधून परतलेले इस्राएली निरुत्साहित झाले व त्यांनी मंदिराचे बांधकाम थांबवले. स्वतःच्या सुखाकडे आपले लक्ष केंद्रित केल्यामुळे त्यांना यहोवाचा आशीर्वाद व शांती लाभली नव्हती. त्यांनी आपल्या जमिनींवर लागवड केली आणि त्यांच्या द्राक्षमळ्यांची काळजी घेतली तरीसुद्धा ते समृद्ध झाले नाहीत. (हाग्गय १:३-६) ते जणू काय ‘बिनमजुरीचे’ काम करत होते.

६ आता, मंदिराची पुनर्बांधणी होत असताना जखऱ्‍याने यहुद्यांना “दृढ” राहण्यास आणि यहोवाच्या उपासनेला धैर्याने प्रथम स्थानी ठेवण्यास उत्तेजन दिले. असे केल्याने काय होणार होते बरे? “‘मी पूर्वी होतो तसा या अवशिष्ट लोकांबरोबर असणार नाही,’ असे सेनाधीश परमेश्‍वर म्हणतो. ‘शांततेचे बीजारोपण होत आहे; द्राक्षी आपले फळ देईल; भूमि आपला उपज देईल आणि आकाश आपले दहीवर देईल. या अवशिष्ट लोकांस मी या अवघ्यांचे वतन देईन. हे यहुदाच्या घराण्या व हे इस्राएलाच्या घराण्या, असे होईल की, जे तुम्ही राष्ट्रात शापरूप होता त्या तुमचा उद्धार मी करीन व तुम्ही आशीर्वादरूप व्हाल; भिऊ नका, तुमचे हात दृढ होवोत.’” (जखऱ्‍या ८:११-१३) इस्राएल लोकांनी दृढनिश्‍चयाने पाऊल उचलले असते तर ते निश्‍चित समृद्ध झाले असते. पूर्वी जेव्हा राष्ट्रांना शापाच्या उदाहरणाचा उल्लेख करावा असे वाटले तेव्हा ते इस्राएल राष्ट्राकडे बोट दाखवू शकत होते. आता इस्राएल आशीर्वादाचे एक उदाहरण होणार होते. ‘त्यांचे हात दृढ करण्यासाठी’ किती उत्तम कारण!

७. (अ) १९९५ चे सेवा वर्ष संपत असताना यहोवाच्या लोकांनी कोणते रोमांचकारी बदल अनुभवले आहेत? (ब) वार्षिक अहवालाकडे नजर टाकल्यावर, कोणती राष्ट्रे आहेत ज्यांच्या प्रचारकांचा, पायनियरांचा आणि सरासरी तासांचा उल्लेखनीय अहवाल तुम्हाला दिसतो?

७ आजच्या काळाबद्दल काय? त्याचे असे होते, की १९१९ च्या पूर्वीच्या वर्षांमध्ये, यहोवाच्या लोकांचा आवेश काहीसा थंडावला होता. पहिल्या जागतिक युद्धात त्यांनी पूर्णपणे तटस्थ पावित्रा घेतला नव्हता व त्यांचा राजा येशू ख्रिस्त याचे अनुकरण करण्याऐवजी मनुष्याचे अनुकरण करण्याकडे त्यांचा कल होता. परिणामी, संघटनेतून व बाहेरून येणाऱ्‍या विरोधामुळे काही जण निरुत्साहित झाले. मग, १९१९ मध्ये यहोवाच्या मदतीने त्यांनी त्यांचे हात दृढ होऊ दिले. (जखऱ्‍या ४:६) यहोवाने त्यांना शांती प्रदान केली आणि ते बळाने समृद्ध झाले. त्यांची समृद्धता, १९९५ च्या सेवा वर्षात कळसास पोहंचलेल्या त्यांच्या गत ७५ वर्षांमधील अहवालावरून दिसून येते. लोक या नात्याने, यहोवाचे साक्षीदार राष्ट्रीयवाद, जातीयवाद, कलुषितपणा आणि द्वेषाच्या इतर सर्व उगमांपासून दूर राहतात. (१ योहान ३:१४-१८) ते यहोवाच्या आध्यात्मिक मंदिरात खऱ्‍या आवेशाने त्याची सेवा करतात. (इब्रीयांस १३:१५; प्रकटीकरण ७:१५) मागील केवळ एका वर्षातच त्यांनी त्यांच्या स्वर्गीय पित्याबद्दल इतरांशी बोलण्यात शंभर कोटी तास खर्च केले! प्रत्येक महिन्याला त्यांनी ४८,६५,०६० बायबल अभ्यास चालवले. प्रत्येक महिन्याला सरासरी ६,६३,५२१ जणांनी पायनियर सेवेत सहभाग घेतला. आपल्या उपासनेत खरोखरच उत्साही असलेल्या लोकांचे उदाहरण द्यावयाचे असते, तेव्हा ख्रिस्ती धर्मजगतातील सेवक काहीवेळा यहोवाच्या साक्षीदारांचा उल्लेख करतात.

८. कशा प्रकारे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्‍ती ‘शांततेच्या बीजाचा’ लाभ घेऊ शकते?

८ त्यांच्या आवेशामुळे यहोवा त्याच्या लोकांना ‘शांततेचे बीज’ देतो. ते बीज विकसित करणाऱ्‍या प्रत्येकाला, त्याच्या अंतःकरणात तसेच त्याच्या जीवनात शांती वाढत असलेली दिसून येईल. यहोवासोबत आणि सह ख्रिश्‍चनांसोबत शांतीने राहणारा प्रत्येक विश्‍वासू ख्रिस्ती, यहोवाचे नाव असलेल्या लोकांसोबत सत्य आणि शांतीत सहभाग घेत असतो. (१ पेत्र ३:११; पडताळा याकोब ३:१८.) ते आश्‍चर्यकारक नाही का?

“भिऊ नका”

९. यहोवा त्याच्या लोकांसोबतच्या व्यवहारात कोणता बदल करील असे अभिवचन त्याने दिले?

९ आता आपण यहोवाकडून सातवी घोषणा ऐकतो. ती काय आहे? “सेनाधीश परमेश्‍वर असे म्हणतो, ‘तुमच्या पूर्वजांनी मला कोप आणिला तेव्हा तुमचे अनिष्ट करण्याचे मी योजिले याविषयी मला अनुताप झाला नाही,’ असे सेनाधीश परमेश्‍वर म्हणतो; ‘त्याप्रमाणे या दिवसात यरुशलेमेचे व यहूदाच्या घराण्याचे हित करण्याचे मी योजिले आहे; भिऊ नका.’”—जखऱ्‍या ८:१४, १५.

१०. यहोवाच्या साक्षीदारांचा कोणता अहवाल, ते घाबरले नसल्याचे दाखवतो?

१० पहिल्या जागतिक महायुद्धादरम्यान, यहोवाचे लोक आध्यात्मिकरीत्या इतरत्र पांगले गेले असले तरी योग्य तेच करण्याची त्यांची मनसा होती. यास्तव, काही प्रमाणात शिस्त दिल्यानंतर यहोवाने त्यांच्यासोबतच्या त्याच्या व्यवहारात बदल केला. (मलाखी ३:२-४) आज, आपण मागे वळून पाहतो व त्याने जे काही केले त्यासाठी आपण उत्कटतेने त्याचे आभार मानतो. हे खरे, की ‘राष्ट्रे आपला द्वेष’ करतात. (मत्तय २४:९) पुष्कळांना तुरुंगात डांबण्यात आले तर काही त्यांच्या विश्‍वासामुळे दगावले. आपण बहुतेकवेळा उदासीनता किंवा शत्रुत्वाचा सामना करतो. पण आपण घाबरुन जात नाही. आपल्याला माहीत आहे की यहोवा दृश्‍य किंवा अदृश्‍य कोणत्याही विरोधापेक्षा अति शक्‍तिमान आहे. (यशया ४०:१५; इफिसकर ६:१०-१३) “परमेश्‍वराची प्रतिक्षा कर; खंबीर हो, हिम्मत धर” या शब्दांकडे आपण दुर्लक्ष करणार नाही.—स्तोत्र २७:१४.

“आपल्या शेजाऱ्‍याबरोबर खरे बोला”

११, १२. यहोवा त्याच्या लोकांना जे आशीर्वाद देतो त्यात आपलाही पूर्ण सहभाग हवा असल्यास आपण कोणती गोष्ट व्यक्‍तिगतरीत्या ध्यानात ठेवावी?

११ यहोवाकडून येणाऱ्‍या आशीर्वादांचा पूर्णपणे सहभाग घेण्यासाठी आपण पुढील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. जखऱ्‍या म्हणतो: ‘“तुम्ही करावयाचे ते हेच की, तुम्ही सर्व आपल्या शेजाऱ्‍याबरोबर खरे बोला; आपल्या वेशीत खरेपणाने वर्ता व शांतिदायक न्याय करा; तुम्ही कोणी मनात आपल्या शेजाऱ्‍याचे अनिष्ट चिंतू नका; कारण या सर्वांचा मला तिटकारा आहे,’ असे परमेश्‍वर म्हणतो.”—जखऱ्‍या ८:१६, १७.

१२ आपण सत्य बोलावे असे यहोवा आपल्याला आर्जवतो. (इफिसकर ४:१५, २५) दुसऱ्‍यांविरुद्ध हानीकारक गोष्टींची योजना करणाऱ्‍या, स्वतःच्या लाभासाठी सत्याला झाकून ठेवणाऱ्‍या किंवा खोट्या शपथा वाहणाऱ्‍यांच्या प्रार्थना तो ऐकत नाही. (नीतिसूत्रे २८:९) त्याला धर्मत्यागाचा वीट असल्यामुळे आपण बायबल सत्यांशी जडून राहावे अशी तो इच्छा करतो. (स्तोत्र २५:५; २ योहान ९-११) तसेच, इस्राएलमधील शहरांच्या वेशीपाशी असलेल्या वडील जनांप्रमाणे, न्यायिक प्रकरणे हाताळणाऱ्‍या वडिलांनी, व्यक्‍तिगत मतांवर नव्हे तर बायबल सत्यांवर आधारित त्यांचा सल्ला व निर्णय घेतला पाहिजे. (योहान १७:१७) त्यांनी “शांतिदायक न्याय” करून ख्रिस्ती मेंढपाळ या नात्याने, झगडणाऱ्‍या पक्षांमध्ये शांती प्रस्थापित करण्याचा व पश्‍चात्तापी अपराध्यांना देवासोबत शांती पुनः प्राप्त करण्यास मदत करण्याचा प्रयत्न करावा अशी यहोवाची इच्छा आहे. (याकोब ५:१४, १५; यहुदा २३) त्याच वेळी, बुद्धिपुरस्सरपणे चुकीच्या गोष्टी करण्याद्वारे मंडळीतील शांततेचा भंग करणाऱ्‍यांना ते धैर्याने बहिष्कृत करून मंडळीतील शांती टिकवतात.—१ करिंथकर ६:९, १०.

“हर्ष व आनंद”

१३. (अ) उपवासाविषयी कोणता बदल जखऱ्‍याने भाकीत केला? (ब) इस्राएलमध्ये कोणता उपवास पाळण्यात येत होता?

१३ आता आपण आठवी गंभीर घोषणा ऐकतो: “सेनाधीश परमेश्‍वर म्हणतो, ‘चवथ्या, पाचव्या, सातव्या व दहाव्या महिन्यातले उपास यहूदाच्या घराण्यास हर्ष व आनंद देणारे होतील; ते आनंदाच्या उत्सवाचे दिवस होतील; म्हणून सत्य व शांति यांची आवड धरा.’” (जखऱ्‍या ८:१९) मोशेच्या नियमशास्त्राधीन असलेल्या इस्राएलांनी, त्यांच्या पापांबद्दल दुःख व्यक्‍त करून प्रायश्‍चित्ताच्या दिवशी उपवास केले. (लेवीय १६:२९-३१) जखऱ्‍याने उल्लेखिलेले चार उपवास स्पष्टपणे, जेरुसलेमवरील विजय आणि विनाश यासंबंधित शोक करण्यासाठी पाळले जात होते. (२ राजे २५:१-४, ८, ९, २२-२६) पण आता मंदिराची पुनर्बांधणी झाली होती व जेरुसलेम पुन्हा वसले होते. शोकाचे रुपांतर आनंदात झाले आणि उपवासाचे रुपांतर सणात होऊ शकत होते.

१४, १५. (अ) कशा प्रकारे स्मारक विधीचा महोत्सव आनंदाचे मोठे कारण होता व यामुळे आपल्याला कशाची आठवण झाली पाहिजे? (ब) वार्षिक अहवालात पाहिल्यानुसार कोणत्या राष्ट्रांत स्मारक विधीची उल्लेखनीय उपस्थिती होती?

१४ आज आपण जखऱ्‍याने उल्लेखिलेल्या किंवा नियमशास्त्रात विहित केलेले उपवास पाळत नाही. आपल्या पापांसाठी येशूने त्याचे जीवन अर्पण केल्यामुळे आपण एका मोठ्या प्रायश्‍चित्ताच्या दिवसाच्या आशीर्वादांचा आनंद उपभोगत आहोत. आपल्या सर्व पापांची प्रतिकात्मक नव्हे तर पूर्णपणे क्षमा झाली आहे. (इब्रीयांस ९:६-१४) स्वर्गीय महायाजक, येशू ख्रिस्त याच्या आज्ञेचे पालन करून आपण त्याच्या मृत्यूचा स्मारक विधी पाळतो जो ख्रिश्‍चनांनी पाळावा असा एकमात्र विधी आहे. (लूक २२:१९, २०) तो विधी पाळण्यासाठी आपण दर वर्षी एकत्र येतो तेव्हा “हर्ष व आनंद” अनुभवत नाही का?

१५ गेल्या वर्षी, १९९४ मधील ८,५८,२८४ पेक्षा अधिक, म्हणजे १,३१,४७,२०१ लोक स्मारक विधी साजरा करण्यासाठी जमले होते. केवढा तो मोठा समुदाय! यहोवाच्या साक्षीदारांच्या ७८,६२० मंडळ्यांमध्ये नेहमीपेक्षा अधिक संख्येतील लोक हा विधी साजरा करण्यासाठी त्यांच्या मंडळ्यांमध्ये जमले तेव्हा तेथे झालेल्या आनंदाचे चित्र डोळ्यापुढे आणा. निश्‍चितच, तेथे उपस्थित असलेले सर्व, “मार्ग, सत्य व जीवन” असणारा व यहोवाचा महान “शांतीचा अधिपती” म्हणून जो आता शासन करत आहे त्याची आठवण करत असताना “सत्य व शांति यांची आवड” धरण्यास प्रवृत्त झाले. (योहान १४:६; यशया ९:६) त्रास आणि युद्धाने पीडित असलेल्या देशांत राहणाऱ्‍या ज्या लोकांनी हा विधी साजरा केला त्यांच्यासाठी त्याचा खास अर्थ होता. आपल्यातील काही बांधवांनी १९९५ दरम्यान अवर्णनीय अशा थरारक गोष्टी पाहिल्या. तरीसुद्धा, ‘सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेल्या देवाने दिलेल्या शांतीने त्यांचे अंतःकरण व त्यांचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखले.’—फिलिप्पैकर ४:७.

‘आपण यहोवाजवळ अनुग्रह मागू’

१६, १७. राष्ट्रांचे लोक कशा प्रकारे ‘परमेश्‍वराजवळ अनुग्रह मागू शकतात’?

१६ पण, स्मारक विधीला उपस्थित राहिलेले ते लाखो लोक आले कोठून? यहोवाची नववी घोषणा स्पष्टीकरण देते: “सेनाधीश परमेश्‍वर असे म्हणतो: राष्ट्रे, व अनेक नगराचे रहिवासी येतील अशी वेळ येईल; एका नगराचे रहिवासी दुसऱ्‍या नगरास जाऊन म्हणतील, आपण त्वरेने जाऊन परमेश्‍वराजवळ अनुग्रह मागू व सेनाधीश परमेश्‍वराच्या चरणी लागू; मीहि जातो. पुष्कळ लोक व समर्थ राष्ट्रे यरुशलेमेत सेनाधीश परमेश्‍वराच्या चरणी लागण्यास व परमेश्‍वराजवळ अनुग्रह मागण्यास येतील.”—जखऱ्‍या ८:२०-२२.

१७ स्मारक विधीला उपस्थित राहिलेल्यांना ‘सेनाधीश यहोवाच्या चरणी लागायचे’ होते. त्यातील बहुतेक जण त्याचे समर्पित, बाप्तिस्मा प्राप्त सेवक होते. उपस्थितांपैकी लाखो जण त्या टप्प्यापर्यंत अद्याप पोहंचले नव्हते. काही राष्ट्रांमध्ये स्मारक उपस्थिती राज्य प्रचारकांच्या संख्येपेक्षा चार किंवा पाच पटीने अधिक होती. या पुष्कळ आस्थेवाईकांना प्रगती करण्यासाठी मदतीची आवश्‍यकता आहे. येशू आपल्या पापांसाठी मरण पावला व आता तो देवाच्या राज्यामध्ये आधिपत्य गाजवत आहे या ज्ञानामध्ये प्रमुदित होण्यास आपण त्यांना शिकवू या. (१ करिंथकर ५:७, ८; प्रकटीकरण ११:१५) स्वतःस यहोवा देवाला समर्पित करण्यासाठी तसेच त्याच्या नियुक्‍त राजाच्या अधीन होण्यासाठी आपण त्यांना उत्तेजन देऊ या. अशा प्रकारे ते ‘परमेश्‍वराजवळ अनुग्रह मागतील.’—स्तोत्र ११६:१८, १९; फिलिप्पैकर २:१२, १३.

“सर्व भाषा बोलणाऱ्‍या राष्ट्रांपैकी दहा जण”

१८, १९. (अ) जखऱ्‍या ८:२३ च्या पूर्णतेत आज “यहूदी” कोण आहे? (ब) आज ते “दहा जण” कोण आहेत जे ‘यहूदी माणसाचा पदर धरतात’?

१८ जखऱ्‍याच्या आठव्या अध्यायात आपण शेवटच्या वेळी असे वाचतो: “सेनाधीश परमेश्‍वर असे म्हणतो.” यहोवाची शेवटची घोषणा काय आहे बरे? “त्या दिवसात सर्व भाषा बोलणाऱ्‍या राष्ट्रांपैकी दहा जण यहूदी माणसाचा पदर धरून म्हणतील, ‘आम्ही तुम्हाबरोबर येतो कारण देव तुम्हाबरोबर आहे असे आम्ही ऐकले आहे.’” (जखऱ्‍या ८:२३) जखऱ्‍याच्या दिवसांमध्ये, स्वाभाविक इस्राएल देवाचे निवडलेले राष्ट्र होते. परंतु पहिल्या शतकात इस्राएलने यहोवाच्या मशीहाला नाकारले. यास्तव, आपल्या देवाने “यहूदी”—नवे इस्राएल—म्हणजेच आध्यात्मिक यहुद्यांचा मिळून बनलेले “देवाचे इस्राएल” असलेल्यांना त्याचे खास लोक होण्यासाठी निवडले. (गलतीकर ६:१६; योहान १:११; रोमकर २:२८, २९) यांची शेवटली संख्या १,४४,००० इतकी होणार होती व यांना येशूबरोबर त्याच्या स्वर्गीय राज्यात राज्य करण्यासाठी मानवजातीतून निवडण्यात येणार होते.—प्रकटीकरण १४:१, ४.

१९ या १,४४,००० पैकी बहुतांश लोक विश्‍वासूपणे मरण पावले व त्यांना त्यांचे स्वर्गीय बक्षीस प्राप्त देखील झाले. (१ करिंथकर १५:५१, ५२; प्रकटीकरण ६:९-११) यांच्यातील काहीजण अद्याप पृथ्वीवर हयात आहेत व ‘यहुद्याबरोबर’ जाण्यास तयार झालेले “दहा जण,” निःसंशयी, ‘सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्‍यांचा मोठा लोकसमुदाय’ आहे हे पाहून ते आनंदित झाले आहेत.—प्रकटीकरण ७:९; यशया २:२, ३; ६०:४-१०, २२.

२०, २१. जगाचा विनाश जसजसा अधिक जवळ येतो तसे आपण यहोवाबरोबर शांतीने कसे राहू शकू?

२० या जगाचा अंत जसा अपरिहार्यपणे जवळ येतो तसे, ख्रिस्ती धर्मजगत यिर्मयाच्या दिवसांतील जेरुसलेमसारखे आहे: “आम्ही शांतीची अपेक्षा करितो पण हित काही होत नाही; आम्ही बरे होण्याची वाट पाहतो तो पाहा दहशत.” (यिर्मया १४:१९) जेव्हा राष्ट्रे खोट्या धर्माविरुद्ध उठतील आणि त्याचा हिंसात्मकरीत्या अंत करतील तेव्हा ती दहशत संपेल. त्यानंतर लगेचच, राष्ट्रे स्वतः देवाच्या शेवटल्या युद्धात, म्हणजे हर्मगिदोनात नाश होतील. (मत्तय २४:२९, ३०; प्रकटीकरण १६:१४, १६; १७:१६-१८; १९:११-२१) तेव्हा किती कोलाहल माजेल!

२१ हे सर्व काही घडत असताना यहोवा, सत्य प्रेमिकांना व ‘शांततेचे बीज’ विकसित करणाऱ्‍यांचे संरक्षण करील. (जखऱ्‍या ८:१२; सफन्या २:३) तेव्हा, त्याच्या लोकांच्या देशात आपण सुरक्षित राहू या, आवेशाने जाहीररीत्या त्याचे गौरव करू या आणि होता होईल तितक्या लोकांना ‘परमेश्‍वराजवळ त्याचा अनुग्रह मागण्यास’ मदत करू या. असे केले तरच आपण यहोवाच्या शांतीचा कायम उपभोग घेऊ शकू. होय, “परमेश्‍वर आपल्या लोकांस सामर्थ्य देईल; परमेश्‍वर आपल्या लोकांस शांतीचे वरदान देईल.”—स्तोत्र २९:११.

तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकाल?

◻ जखऱ्‍याच्या दिवसांमध्ये देवाच्या लोकांनी कशा प्रकारे त्यांचे ‘हात दृढ होऊ दिले’? आणि आज?

◻ छळ, शत्रुत्व आणि उदासीनता यांना आपण कशाप्रकारे प्रतिसाद देतो?

◻ ‘आपल्या शेजाऱ्‍याबरोबर खरे बोलण्यात’ काय गोवले आहे?

◻ एखादी व्यक्‍ती कशा प्रकारे ‘परमेश्‍वराजवळ अनुग्रह मागू शकते’?

◻ जखऱ्‍या ८:२३ च्या पूर्णतेत आनंदाचे कोणते मोठे कारण दिसून येते?

[१८ पानांवरील चित्रं]

गत वर्षी, यहोवाच्या साक्षीदारांनी देवाच्या राज्याविषयी इतरांशी बोलण्यात १,१५,०३,५३,४४४ तास खर्च केले

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा