वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 १०/१ पृ. २२-२५
  • यहोवा ज्यास पात्र आहे ते त्याला देणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा ज्यास पात्र आहे ते त्याला देणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • शिकलेल्या गोष्टींनुसार कार्य करणे
  • अडथळे असूनही प्रचार कार्य चालू
  • आयदोनोहॉरीत आमची सेवा
  • क्रूर छळ
  • विरोध असूनही वाढ
  • यहोवाच्या प्रेमळ हाताखाली सेवा करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • पन्‍नासपेक्षा अधिक वर्षांपासून ‘भेटी देणे’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • मला ऑस्ट्रेलियात खरे धन प्राप्त झाले
    सावध राहा!—१९९४
  • “सोन्याऐवजी मला हिरे सापडले”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 १०/१ पृ. २२-२५

यहोवा ज्यास पात्र आहे ते त्याला देणे

टीमोलियोन वॅसिलियू यांच्याद्वारे कथित

आयदोनोहॉरीच्या गावात बायबलची शिकवण दिल्याबद्दल मला अटक करण्यात आली होती. पोलिसांनी माझ्या पायातले शूज काढले आणि माझ्या तळपायावर मारायला सुरूवात केली. मारून मारून माझे पाय इतके बधिर झाले की मला वेदनाच जाणवत नव्हत्या. ही अशी घटना ग्रीसमध्ये नवखी नव्हती; माझ्यावर हा प्रसंग कसा ओढवला ते सांगण्याआधी मी एक बायबल शिक्षक कसा झालो ते आधी तुम्हाला सांगतो.

माझा जन्म १९२१ साली झाल्यानंतर लगेचच, आमचं कुटुंब उत्तर ग्रीसच्या रोडोलिवोस शहरात राहायला गेलं. मी माझ्या तरुणपणी अगदी स्वच्छंदी जीवन जगत होतो. मी ११ वर्षांचा होतो तेव्हा धुम्रपान करायला लागलो. नंतर, मी दारूडा झालो, जुगार खेळू लागलो आणि मी रोज रात्री पार्ट्यांना जायचो. माझ्यात संगीत कला असल्यामुळे मी एका स्थानिक बँडमध्ये सामील झालो. एका वर्षाच्या आत मी बँडमधील बहुतेक सर्व वाद्ये वाजवायला शिकलो. त्याबरोबरच मी अभ्यासही करायचो आणि मला न्याय या गुणाची आवड होती.

दुसऱ्‍या महायुद्धाने उग्र स्वरुप धारण केले होते तेव्हा, म्हणजे १९४० च्या सुरवातीला आमच्या बँडला एका लहान मुलीच्या अंत्यसंस्कारासाठी एकदा बोलवण्यात आलं होतं. कबरस्थानात नातेवाईकांना आणि मित्रजनांना आपला शोक आवरतच नव्हता. पूर्ण आशा सोडून दिलेल्या या लोकांना पाहून माझ्यावर खूप खोल प्रभाव पडला. मी विचार करू लागलो, ‘आपण का मरतो? आपल्या क्षणभंगुर जीवनात आणखी काही आहे का? मला उत्तरे कोठे मिळतील?’

काही दिवसांनंतर, मी माझ्या घरातल्या एका फळीवर नवीन कराराची एक प्रत पाहिली. मी ती काढली आणि वाचू लागलो. मोठ्या प्रमाणावर होणारी युद्धे येशूच्या उपस्थितीच्या चिन्हाचा भाग आहेत असे जेव्हा मी, मत्तय २४:७ मध्ये वाचले तेव्हा मला समजले, की येशूचे हे शब्द तर आपल्या दिवसांना लागू होतात. पुढील काही आठवड्यांत मी ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांची ही प्रत कितींदा तरी वाचली.

मग १९४० सालच्या डिसेंबर महिन्यात मी आमच्या घराजवळच राहणाऱ्‍या एका कुटुंबाच्या घरी गेलो; या कुटुंबात एक विधवा आणि तिची पाच मुलं होती. त्यांच्या घराच्या माळ्यावर मला, पुस्तिकांचा एक गठ्ठा मिळाला; त्यातील एक पुस्तिका वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीने छापलेली, इच्छिलेले सरकार या नावाची होती. मी माळ्यावरच बसून ती पुस्तिका पूर्ण वाचून काढली. वाचल्यावर मला खात्री पटली, की बायबल ज्याला ‘शेवटला काळ’ म्हणते त्या काळातच आपण जगत आहोत आणि यहोवा देव या व्यवस्थीकरणाचा लवकरच नाश करणार व त्याबदली एक धार्मिक नवीन जग आणणार.—२ तीमथ्य ३:१-५; २ पेत्र ३:१३.

विश्‍वासू लोक पृथ्वीवरील परादीसमध्ये अनंतकाळ जगतील आणि देवाच्या राज्याच्या शासनाखालील त्या नवीन जगात दुःख आणि मृत्यू नसेल याचा शास्त्रीय पुरावा मिळाला तेव्हा तर मी अधिकच प्रभावीत झालो. (स्तोत्र ३७:९-११, २९; प्रकटीकरण २१:३, ४) मी वाचत असताना प्रार्थना करून देवाला या गोष्टींबद्दल आभार व्यक्‍त केले व त्याच्या अपेक्षा काय आहेत हे त्याने मला दाखवावे अशी मी विनंती केली. यहोवा देव, माझी पूर्ण जीवानिशी सेवा स्वीकारण्यास पात्र आहे, हे मला स्पष्ट झाले.—मत्तय २२:३७.

शिकलेल्या गोष्टींनुसार कार्य करणे

तेव्हापासून मी धुम्रपान, दारू आणि जुगार सोडून दिला. मी त्या विधवेच्या पाच मुलांना आणि माझ्या धाकट्या भावंडांना एकत्र केलं व पुस्तिकेतून मी जे काही शिकलो ते त्यांना समजावलं. लवकरच आम्ही, आम्हाला जे माहीत होतं ते इतरांना सांगू लागलो. लोक आम्हाला यहोवाचे साक्षीदार म्हणून ओळखू लागले; खरं तर अजूनपर्यंत आम्ही एकाही साक्षीदाराला भेटलो नव्हतो. अगदी सुरवातीपासूनच मी दर महिन्याला शंभर पेक्षा अधिक तास, शिकत असलेल्या गोष्टी इतरांना सांगण्यात खर्च केले.

शहरातल्या ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्चच्या पाळकांपैकी एक आमच्याविरुद्ध तक्रार करायला नगराध्यक्षाकडे गेला. पण असं झालं होतं, की काही दिवसांपूर्वी एका तरुण साक्षीदाराला एक हरवलेला घोडा सापडला आणि त्याने तो घोडा त्याच्या मालकाकडे सुपूर्त केला होता; पण या घटनेबद्दल आम्हाला काहीही माहीत नव्हते. या प्रामाणिकपणामुळे नगराध्यक्षाला साक्षीदारांबद्दल आदर होता म्हणून पाळक जेव्हा त्याच्याकडे तक्रार घेऊन गेला तेव्हा त्याने त्याचे काही एक ऐकले नाही.

एकदा, १९४१ सालच्या ऑक्टोबर महिन्यात मी बाजारात साक्षीकार्य करत होतो तेव्हा, जवळच्याच एका गावात एक साक्षीदार राहतो असं कोणीतरी मला सांगितलं. तो साक्षीदार म्हणे, पूर्वी एक पोलीस होता; त्याचं नाव होतं, क्रिसटॉस ट्रियॉनटॉफिलू. मी त्याला भेटायला गेलो आणि तो १९३२ पासून साक्षीदार असल्याचं मला समजलं. त्याने मला वॉच टावर संस्थेची किती तरी जुनी प्रकाशने दिली तेव्हा मला किती आनंद झाला! या प्रकाशनांनी मला आध्यात्मिक प्रगती करायला खूप मदत केली.

सन १९४३ मध्ये मी, देवाला केलेल्या माझ्या समर्पणाचे द्योतक म्हणून पाण्याने बाप्तिस्मा घेतला. यावेळेपर्यंत मी ड्रावीसकोस, पॉलियोकोमी आणि मॉवरोलोफोस या जवळपासच्या तीन गावांमध्ये बायबल अभ्यास चालवत होतो. देवाची वीणा (इंग्रजी), या पुस्तकातून मी बायबल अभ्यास घेत होतो. कालांतराने, या क्षेत्रात यहोवाच्या साक्षीदारांच्या चार मंडळ्या सुरू करण्याचा सुहक्क मला लाभला.

अडथळे असूनही प्रचार कार्य चालू

सन १९४४ मध्ये, ग्रीसला जर्मनीच्या ताब्यातून मुक्‍त करण्यात आले व त्यानंतर काही काळानंतर अथेन्समधील वॉच टावर संस्थेच्या शाखा कार्यालयाशी दळणवळण सुरू करण्यात आले. शाखा दफ्तराने मला अशा एका क्षेत्रात जाऊन प्रचार करायला सांगितले जेथे राज्य संदेश कधीच कोणी ऐकला नव्हता. मी त्या क्षेत्रात राहायला गेल्यानंतर तीन महिन्यांसाठी एका मळ्यात काम केलं आणि बाकीचं संपूर्ण वर्ष सेवेत घालवलं.

त्यावर्षी मला माझी आई, ती विधवा आणि तिच्या पाच मुलांपैकी चार मुलं, या सर्वांचा बाप्तिस्मा पाहण्याचा सुहक्क मिळाला; या विधवेच्या धाकट्या मुलीनं म्हणजे मॉरियॉनथीनं १९४३ मध्ये बाप्तिस्मा घेतला आणि त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात ती माझी प्रिय पत्नी झाली. तीस वर्षांनंतर म्हणजे १९७४ मध्ये माझे वडील पण बाप्तिस्मा प्राप्त साक्षीदार बनले.

आम्हाला १९४५ सालच्या सुरवातीला शाखा दफ्तराकडून टेहळणी बुरूज मासिकाची सायक्लोस्टाईल केलेली पहिली प्रत मिळाली. त्यातील मुख्य लेख, “जा, सर्व राष्ट्रांना शिष्य करा!” हा होता. (मत्तय २८:१९, दी एम्फॅटिक डायग्लॉट) मॉरियॉनथी आणि मी लागलीच स्ट्रायमॉन नदीच्या पूर्वेकडील दूरवरच्या क्षेत्रांमध्ये कार्य करण्यासाठी आमचं घर सोडलं. इतरही साक्षीदार नंतर आम्हाला सामील झाले.

एखाद्या गावात जाण्यासाठी आम्ही अनवाणी, दऱ्‍याखोऱ्‍यांतून व डोंगरांतून चालत जायचो. कारण आमच्याकडे बुटांची एकेकच जोड होती; आणि ती जोड फाटली तर आमच्याकडे दुसरी जोड नव्हती म्हणून आम्ही ही काटकसर करत होतो. १९४६ ते १९४९ च्या काळात नागरी युद्ध ग्रीसमध्ये उग्र स्वरूप धारण करू लागल्यामुळे प्रवास करणं जिकरीचं होतं. रस्त्याच्या बाजूला लोकांचे शव उघड्यावर पडलेली सर्रास दिसायचे.

हालअपेष्टांमुळे निराश होण्याऐवजी आम्ही आवेशाने सेवा करत राहिलो. पुष्कळ वेळा मला, “मृत्युच्छायेच्या दरीतूनहि मी जात असलो तरी कसल्याहि अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस; तुझी आंकडी व तुझी काठी मला धीर देतात,” असे लिहिणाऱ्‍या स्तोत्रकर्त्याप्रमाणे वाटले. (स्तोत्र २३:४) या काळात आम्ही बहुतेकदा अनेक आठवडे घरापासून दूर असायचो; आणि मी कधीकधी सेवेमध्ये महिन्याला २५० तास खर्च करायचो.

आयदोनोहॉरीत आमची सेवा

सन १९४६ मध्ये आम्ही भेट दिलेल्या एका गावाचे नाव होते आयदोनोहॉरी; हे गाव उंच डोंगरमाथ्यावर वसलेले होते. तेथे आम्ही एका मनुष्याला भेटलो; त्याने आम्हाला सांगितलं, की गावात दोन लोक होते ज्यांना बायबल संदेश ऐकायचा होता. पण, शेजाऱ्‍यांच्या भीतीमुळे तो मनुष्य आम्हाला त्यांच्याकडे घेऊन जायला तयार होईना. आम्ही कसंबसं त्या दोघांचं घर शोधून काढलंच; त्यांनी आमचे छान आदरातिथ्य केले. आणि, बघता बघता त्यांच्या घरात किती लोकं जमली! ते या लोकांचे नातेवाईक आणि मित्रजन होते. ते सर्व लक्ष देऊन आमचं बोलणं ऐकत असल्याचं पाहून मला खरंच खूप आश्‍चर्य वाटलं. त्यांना यहोवाच्या साक्षीदारांना भेटण्याची इतकी आस लागली होती, पण जर्मन ताबेदारीच्या काळात तेथे कोणी यहोवाचा साक्षीदार नव्हता, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. कशामुळे त्यांची इतकी आस्था वाढली होती?

ते दोन कर्ते पुरुष स्थानीय साम्यवादी पार्टीतले प्रमुख होते व त्यांनी लोकांमध्ये साम्यवादी विचार बिंबवले होते. पण त्यांना वॉच टावर संस्थेने छापलेल्या सरकार (इंग्रजी), नावाच्या पुस्तकाची एक प्रत मिळाली होती. हे पुस्तक वाचल्यावर त्यांची खात्री पटली, की फक्‍त देवाचे राज्यच, एक परिपूर्ण, धार्मिक सरकार आणू शकत होते.

आम्ही या लोकांबरोबर मध्यरात्रीपर्यंत बोलत बसलो. त्यांच्या प्रश्‍नांची बायबल आधारित उत्तरे मिळाल्यावर ते अगदी तृप्त झाले. पण, गावातील साम्यवादी लोकांनी मला ठार मारण्याचा कट रचला; कारण त्यांच्या नेत्यांचं मी मतपरिवर्तन केलं होतं म्हणे. आणि, पहिल्या रात्री जमलेल्या लोकांपैकी तोही मनुष्य होता ज्याने मला गावातील या दोन आस्थेवाईक लोकांबद्दल सांगितलं होतं. कालांतराने त्यानेही बायबलचं ज्ञान घेऊन प्रगती केली, बाप्तिस्मा घेतला व नंतर एक ख्रिस्ती वडील बनला.

क्रूर छळ

या भूतपूर्व साम्यवाद्यांना भेटून जास्त काळ उलटला नव्हता तोच दोन पोलीस आम्ही ज्या घरात बसलो होतो तेथे येऊन थडकले. आमच्यावर बंदूक रोखून त्यांनी आम्हाला अटक केली आणि पोलीस ठाण्यात नेलं. तेथील पोलीस फौजदारचे ग्रीक कर्मठ पाळकांबरोबर जवळचे संबंध असल्यामुळे त्यानं आमची चांगलीच खरडपट्टी काढली. आणि शेवटी त्यानं विचारलं, “बरं, आता मी तुम्हाला काय करावं?”

आमच्या मागे उभा असलेल्या पोलीसांनी एकाच वेळी म्हटले: “चांगला चोप देऊ या यांना!”

रात्र फार झाली होती. पोलीसांनी आम्हाला तळघरात डांबलं आणि शेजारच्या खानावळीत गेले. पिऊन तर्रर झाल्यावर ते पुन्हा आले आणि त्यांनी मला वर नेलं.

त्यांची अवस्था पाहून मला वाटलं, की ते मला कोणत्याही क्षणी ठार मारतील. त्यासाठी, हे लोक मला जे वागणूक देणार आहेत ती सहन करायला मला शक्‍ती द्यावी अशी मी देवाला प्रार्थना केली. त्यांनी काही लाकडी दांडके घेतले आणि मी सुरवातीला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझ्या तळपायावर फटके मारू लागले. त्यानंतर त्यांनी माझ्या सर्व शरीरावर फटके मारले आणि मग मला तळघरात फेकून दिलं. नंतर त्यांनी दुसऱ्‍याला बाहेर आणलं आणि त्यालाही मारू लागले.

त्या वेळेत मी, इतर दोन तरूण साक्षीदारांना, त्यांना सहन कराव्या लागणाऱ्‍या परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्यांच्या मनाची तयारी करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी पुन्हा मलाच वर नेलं. त्यांनी माझे कपडे काढले आणि जवळजवळ एक तास पाचजन मिळून मला मारत राहिले, त्यांच्या सैनिकी बुटांनी त्यांनी माझं डोकं तुडवलं. आणि मग पुन्हा मला तळघरात फेकलं; तिथं मी १२ तास बेशुद्धावस्थेत होतो.

आमची सुटका झाल्यावर, गावातील एका कुटुंबानं आम्हाला रात्री त्यांच्या घरी आसरा दिला व आमची काळजी घेतली. दुसऱ्‍या दिवशी आम्ही घरी जायला निघालो. आम्हाला पडलेल्या मारामुळे आम्ही इतके जखमी व गळून गेलो होतो, की फक्‍त दोन तासांचा तो पायी प्रवास करायला आम्हाला आठ तास लागले. मारामुळे मी इतका सुजलो होतो की मॉरियॉनथी मला ओळखूच शकली नाही.

विरोध असूनही वाढ

सन १९४९ मध्ये नागरी युद्ध अजून चाललेच होते तेव्हा आम्ही थेस्सलोनिकाला राहायला गेलो. तेथील चार मंडळ्यांपैकी एका मंडळीत सहायक मंडळी सेवक म्हणून मला नेमण्यात आलं. एक वर्षांनंतर ही मंडळी इतकी वाढली, की आम्हाला दुसरी मंडळी तयार करावी लागली आणि मग मला त्या नवीन मंडळीचा मंडळी सेवक किंवा अध्यक्षीय पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आले. एक वर्षानंतर नवीन मंडळीतही जवळजवळ दुप्पट वाढ झाली आणि आम्हाला पुन्हा एक नवीन मंडळी तयार करावी लागली!

थेस्सलोनिकामध्ये यहोवाच्या साक्षीदारांची संख्या वाढत चालल्याचे पाहून विरोधकांचा तिळपापड होत होता. १९५२ साली एकदा मी कामावरून घरी आलो आणि पाहतो तो, आमचं घर जळून खाक झालं होतं. मॉरियॉनथी कशीबशी आपला जीव वाचवू शकली होती. त्या रात्री सभेमध्ये आम्हाला सर्वांना सांगावं लागलं, की आम्ही या मळक्या कपड्यांमध्ये सभेला का आलो होतो—आमच्याकडे अंगावरच्या कपड्यांना सोडून काहीच उरलं नव्हतं. आमच्या ख्रिस्ती बंधूभगिनींनी आम्हाला सहानुभूती दाखवली, आम्हाला सावरून घेतलं.

सन १९६१ मध्ये, मला प्रवासी कार्य करायला नेमण्यात आलं; दर आठवडी मला वेगवेगळ्या मंडळ्यांना भेट देऊन तेथील बांधवांना आध्यात्मिकरीत्या मजबूत करायचं होतं. पुढील २७ वर्षांपर्यंत मी सपत्नीक मॅसिडोनिया, थ्रेस आणि थेस्सली यांतील विभागांना व प्रांतांना भेटी दिल्या. १९४८ पर्यंत माझ्या प्रिय मॉरियॉनथीची दृष्टी पूर्णपणे गेली होती तरीसुद्धा तिने धैर्याने मला साथ दिली; विश्‍वासाच्या अनेक परीक्षा सहन केल्या. तिलाही पुष्कळ वेळा अटक करण्यात आली, तिची चौकशी करण्यात आली व कैदखान्यात डांबण्यात आलं. त्यानंतर तिची तब्येत हळूहळू ढासळत गेली आणि १९८८ मध्ये कर्करोगाने तिचा बळी घेतला.

त्याच वर्षी मला थेस्सलोनिकामध्ये खास पायनियर म्हणून सेवा करायला नेमण्यात आलं. आता, मी ५६ वर्षं यहोवाची सेवा केली असली तरी, सेवेमध्ये अजूनही कार्य करू शकतो, सेवेच्या विविध पैलूत भाग घेऊ शकतो. कधीकधी मी दर आठवड्याला २० पेक्षा अधिक बायबल अभ्यास चालवले आहेत.

मी हे समजून घेतलं आहे की आपण, एका महान शैक्षणिक कार्यक्रमाच्या सुरवातीच्या काळात आहोत; हा कार्यक्रम पुढे यहोवाच्या नवीन जगात हजार वर्षांपर्यंत चालणार आहे. पण ही वेळ आराम करण्याची, आजचे काम उद्यावर ढकलण्याची किंवा शारीरिक इच्छा पूर्ण करण्यात आपला वेळ दवडण्याची नाही असं मला वाटतं. मी यहोवा देवाचा खूप आभारी आहे की त्याने मला, सुरवातीला मी त्याला दिलेले वचन पाळण्यास मदत केली; कारण तो माझी पूर्ण जीवानिशी भक्‍ती व सेवा स्वीकारण्यास खरोखरच पात्र आहे.

[२४ पानांवरील चित्र]

प्रचारावर बंदी होती तेव्हा भाषण देत असताना

[२५ पानांवरील चित्र]

मॉरियॉनथीबरोबर

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा