“सोन्याऐवजी मला हिरे सापडले”
मिखॉलीस कॉमीनॉरीस यांनी कथन केलेले
दक्षिण आफ्रिकेत सोन्याच्या शोधात गेल्यावर पाच वर्षांनंतर, मी सोन्याहून अधिक मौल्यवान असे काही तरी घेऊन घरी परतत होतो. आता माझ्याकडे असलेल्या संपत्तीबद्दल व इतरांना सांगण्यासाठी माझ्या तीव्र इच्छेबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो.
आयोनियन समुद्राच्या केफालोनिया या ग्रीक बेटावर १९०४ मध्ये माझा जन्म झाला. त्यानंतर काही काळातच माझे आईवडील दोघेही वारल्यामुळे मी अनाथ म्हणूनच वाढलो. मला मदतीची नितान्त गरज होती व तशी मी देवाकडे नेहमी प्रार्थना करीत असे. मी ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्चला नियमितरीत्या उपस्थित राहत असलो तरी, बायबलविषयी मी पूर्णपणे अज्ञानी होतो. मला कोणतेच समाधान मिळाले नाही.
१९२९ मध्ये मी, चांगल्या जीवनाच्या शोधार्थ दुसऱ्या देशात जाण्याचे ठरवले. माझे ओसाड बेट सोडून मी इंग्लंडमार्गे दक्षिण आफ्रिकेच्या प्रवासाला जहाजाने निघालो. १७ दिवसांच्या समुद्र प्रवासानंतर मी दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन येथे पोहंचलो. मला लगेचच एका ग्रीक मनुष्याने मला कामावर ठेवले. परंतु भौतिक संपत्तीत मला समाधान मिळाले नाही.
अधिक मौल्यवान असे
दक्षिण आफ्रिकेत सुमारे दोन वर्षांच्या वास्तव्यानंतर यहोवाचा एक साक्षीदार मी काम करत होतो तेथे आला आणि ग्रीक भाषेतील बायबल आधारित साहित्य त्याने मला सादर केले. त्यामध्ये, मृत कोठे आहेत? (इंग्रजी) व जुलुमाचा अंत केव्हा होईल? (इंग्रजी) ह्या पुस्तिकांचा समावेश होता. मी त्या पुस्तिका केवढ्या आवेशाने वाचल्या होत्या, एवढेच नव्हे तर त्यात उल्लेखलेली सर्व शास्त्रवचने तोंडपाठ केली होती हे मला आजही आठवते. एके दिवशी मी माझ्यासोबत काम करणाऱ्याला म्हणालो: “मी इतक्या वर्षांपासून ज्याच्या शोधात होतो ते मला सापडले. मी सोने मिळवण्यासाठी आफ्रिकेत आलो होतो पण सोन्याऐवजी मला हिरे सापडले.”
देवाचे व्यक्तिगत नाव यहोवा आहे, त्याचे राज्य स्वर्गात केव्हाच स्थापित झाले आहे व आपण युगाच्या समाप्तीच्या दिवसांमध्ये जगत आहोत या सर्व गोष्टी शिकताना मला खूप आनंद झाला. (स्तोत्र ८३:१८; दानीएल २:४४; मत्तय ६:९, १०; २४:३-१२; २ तीमथ्य ३:१-५; प्रकटीकरण १२:७-१२) यहोवाचे राज्य सर्व जातीच्या मानवांना अनंत आशीर्वाद देईल हे माहीत होणे किती रोमहर्षक होते! ह्या मौल्यवान सत्यांचा प्रचार संपूर्ण जगभरात होत होता ह्या आणखी एका वस्तुस्थितीमुळे मी प्रभावित झालो.—यशया ९:६, ७; ११:६-९; मत्तय २४:१४; प्रकटीकरण २१:३, ४.
मी लगेचच केप टाऊन येथील वॉच टावर संस्थेच्या शाखा दप्तराचा पत्ता शोधून काढला आणि आणखी बायबल साहित्य मिळवले. बायबलची एक व्यक्तिगत प्रत मिळाल्यामुळे मला विशेष आनंद झाला. मी जे काही वाचत असे त्याची इतरांना साक्ष देण्यासाठी मी प्रवृत्त होत असे. लिक्सूरीयोन, या माझ्या मायदेशी असलेल्या माझ्या नातेवाईकांना, मित्रांना व ओळखीच्या लोकांना मी बायबल प्रकाशने पाठवू लागलो. यहोवाला संतुष्ट करण्यासाठी एखाद्याने त्याला समर्पण केले पाहिजे याविषयी मला माझ्या अभ्यासांद्वारे हळूहळू आकलन होऊ लागले. म्हणून मी लागलीच प्रार्थनेद्वारा तसे केले.
एकदा मी, यहोवाच्या साक्षीदारांच्या एका सभेला उपस्थित राहिलो पण मला इंग्रजी येत नसल्यामुळे मला एक अवाक्षरही समजले नाही. पोर्ट एलिझबेथमध्ये पुष्कळ ग्रीक राहत असल्याचे मला समजले तेव्हा मी तेथे राहावयास गेलो खरा, पण ग्रीक बोलणारा एकही साक्षीदार मला भेटला नाही. म्हणून, पूर्ण-वेळेचा सुवार्तिक होण्याकरता मी ग्रीसला पुन्हा जाण्याचा विचार केला. मला आठवतं मी तेव्हा स्वतःस म्हणालो होतो: ‘मी ग्रीसला कोणत्याही परिस्थितीत जाईन.’
ग्रीसमधील पूर्ण वेळेची सेवा
१९३४ च्या वसंतऋतूत मी ड्वीलियो नामक इटालियन समुद्र जहाजाने प्रवासाला निघालो. मी फ्रान्सच्या मार्सेल्स येथे पोहंचलो आणि दहा दिवसांच्या मुक्कामानंतर पॅट्रीस नामक प्रवासी जहाजाने ग्रीसकडे निघालो. प्रवासादरम्यान, जहाजात काही यांत्रिक बिघाड झाला आणि रात्रीच्या वेळी, समुद्रात लाईफबोट्स सोडण्याचा हुकूम देण्यात आला. तेव्हा मला ग्रीसला कोणत्याही परिस्थितीत जाण्याचा मी केलेला विचार आठवला. परंतु, काही वेळाने मोठ्या जहाजांना ओढून नेणारी एक इटालियन ओढबोट आली आणि तिने आम्हाला नेपल्स, इटलीपर्यंत ओढत नेले. सरतेशेवटी आम्ही (पिरेइस), ग्रीस येथे पोहंचलो.
तेथून मी अथेन्सला गेलो व वॉच टावर संस्थेच्या शाखा दप्तराला भेट दिली. अथानासियोस करनासियोस नामक शाखा पर्यवेक्षकांसोबत गप्पा मारताना मी पूर्ण वेळेची प्रचार नेमणुक मिळावी अशी इच्छा व्यक्त केली. दुसऱ्या दिवशी मी मुख्य ग्रीसच्या दक्षिणेकडील भागातील पेलोपोन्निसोस या गावी जाण्यास निघालो. तो अख्खा जिल्हा माझे व्यक्तिगत क्षेत्र म्हणून नेमण्यात आला होता!
एका गावातून दुसऱ्या गावात, एका खेड्यातून दुसऱ्या खेड्यात, एका शेतातून दुसऱ्या शेतात आणि दूरदूर वसलेल्या एका घरातून दुसऱ्या घरी मी पूर्ण जोमाने प्रचार कार्य चालू केले. पूर्ण वेळेची सेवा चालू करून एकावर्षापेक्षा अधिक काळ उलटल्यावर म्हणजे, १९३५ च्या उन्हाळ्यात मला बाप्तिस्मा देणारे मायकल ट्रिऑन्डॉफिलोपौलोस लवकरच मला येऊन मिळाले. तेव्हा सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था नसल्यामुळे आम्ही सगळीकडे पायीच जात असू. आम्हाला पाळकांकडून होणारा विरोध सर्वात मोठी समस्या होती, आमचे कार्य थांबवण्यासाठी ते काहीही करत असत. यामुळे आम्हाला पुष्कळ पूर्वग्रहाला सामोरे जावे लागले. तरी, इतके अडथळे असतानाही साक्ष दिली जात होती आणि यहोवाचे नाव सर्वत्र जाहीर केले जात होते.
विरोध सहन करणे
एकदा सकाळच्या वेळी, आर्काडियाच्या डोंगराळ जिल्ह्यात प्रचार करत असताना मी मॉगुल्यॉनॉ नामक एका खेड्यात पोहंचलो. एक तास साक्ष देऊन झाल्यावर मला चर्चच्या घंटांचा नाद ऐकू आला व हा नाद माझ्यामुळेच वाजवला जात होता हे मी जाणले! एका ग्रीक ऑर्थोडॉक्स आर्चीमॅनड्रीटच्या (बिशपच्या खालोखालचा हुद्दा असलेला) नेतृत्वाखाली एक जमाव एकत्र झाला होता. मी लगेचच माझी बॅग बंद केली आणि मनोमन यहोवाला प्रार्थना केली. मुलांचा घोळका घेऊन तो आर्चीमॅनड्रीट सरळ माझ्या दिशेने चालत आला. आणि जोरजोराने ओरडून म्हणू लागला, “हाच पहा तो!”
मुले माझ्याभोवती जमली आणि तो पाळक पुढे होऊन आपल्या ढेरीने मला ढकलत म्हणू लागला की, ‘मी याच्यामुळे उगाच दूषित झालो तर, त्यापेक्षा मी त्याला हातच लावत नाही.’ मग तो किंचाळला, “मारा त्याला! मारा!” पण तेवढ्यात एक पोलीस अधिकारी तेथे पोहंचला आणि त्याने आम्हाला दोघांनाही पोलीस स्टेशनमध्ये नेले. जमावाला चिथावण्याच्या आरोपाखाली त्या पाळकाला चौकशीसाठी आणण्यात आले होते व कोर्टाच्या खर्चासह ३०० ड्राखमांचा दंड त्याच्यावर लादण्यात आला. मला मात्र सोडण्यात आले.
आम्ही एका नवीन क्षेत्रात आलो तेव्हा, एक मोठे शहर आमच्या कार्याचे केंद्र बनवले व तेथून चार तासांच्या पायी जाण्याच्या अंतरावरील सर्व क्षेत्र उरकले. म्हणजे आम्ही भल्या पहाटेच, अजून अंधार होता तेव्हाच घर सोडत असू व संध्याकाळी अंधार पडल्यावर घरी पुन्हा येत असू, प्रत्येक दिवशी एक अथवा दोन खेड्यांना भेट देत असू. आजूबाजूची खेडी उरकल्यावर आम्ही केंद्र शहरी प्रचार करून पुढे जात असू. पाळक आमच्याविरूद्ध लोकांना भडकवत असल्यामुळे बहुतेक वेळा आम्हाला अटक होत असे. मध्य ग्रीसमधील पारनससच्या भागात अनेक महिन्यांसाठी पोलीस माझ्या शोधात होते. पण मी त्यांच्या हाती कधीच सापडलो नाही.
एकदा बंधू ट्रिऑन्डॉफिलोपौलोस आणि मी बोईओटियाच्या जिल्ह्यातील मुरिकीच्या खेड्यात प्रचार करत होतो. आम्ही खेड्याचे दोन विभाग केले व मी वयाने लहान असल्यामुळे उतारावरून कार्य करण्यास सुरवात केली. अचानक मला खालून ओरडण्याचा आवाज ऐकू आला. मी खाली पळत जात असतानाच माझ्या मनात विचार आला की ‘कदाचित बंधू ट्रिऑन्डॉफिलोपौलोस यांना मारहाण होत असावी.’ सर्व खेडूत स्थानीय कॉफीगृहात एकत्र झाले होते आणि एक पाळक बिथरलेल्या रेड्याप्रमाणे इकडून तिकडे फेऱ्या मारत होता. तो ओरडत होता, “ही लोकं आम्हाला ‘सर्पाचे संतान,’ म्हणतात.”
त्या पाळकाने बंधू ट्रिऑन्डॉफिलोपौलोस यांच्या डोक्यात इतक्या जोराने काठीने मारले की तिचे तुकडे झाले. व त्यांच्या चेहऱ्यावरून भळाभळा रक्त वाहत होते. मी ते रक्त पुसले आणि आम्ही तेथून निघून गेलो. तीन तास चालल्यावर आम्ही थीब्स शहरी पोहंचलो. तेथे एका क्लिनीकमध्ये त्यांच्या जखमेवर औषधोपचार करण्यात आले. आम्ही झालेली घटना पोलिसांना सांगितली आणि त्यांच्याविरूद्ध केस दाखल करण्यात आली. परंतु, त्या पाळकाचा लगाबांधा असल्यामुळे तो निर्दोष सुटला.
ल्यूकस शहरात कार्य करत असताना, त्या क्षेत्रातील एका राजकीय नेत्याच्या चेल्यांनी आम्हाला “अटक” करून गावातील कॉफीगृहात आणले. लोकांनी स्थापिलेल्या कोर्टात (कँगरू कोर्ट) आमच्यावर आरोप करण्यास सुरवात झाली. राजकीय नेता आणि त्याचे चेले आमच्यासमोर फेऱ्या मारत आळीपाळीने आम्हाला बडबड करत होते व आपल्या आवळलेल्या मुष्ठीचा धाक दाखवत होते. त्या सर्वांनी घेतली होती. आमच्याविरूद्धचे त्यांचे हे लांबलचक निंदात्मक भाषण दुपारपासून सूर्यास्तापर्यंत चालू राहिले पण आम्ही मात्र अगदी शांत होतो व आम्ही निर्दोष आहोत हे आमच्या चेहऱ्यावरील हास्याद्वारे प्रकट केले तसेच मदतीकरता यहोवा देवाला मनातल्या मनात प्रार्थना केली.
अंधार पडल्यावर दोन पोलिसांनी आम्हाला त्यांच्या तावडीतून सोडवले. त्यांनी आम्हाला पोलीस स्टेशनात नेले व चांगली वागणूक दिली. दुसऱ्या दिवशी आपल्या कृत्यांचे समर्थन देण्यासाठी तो राजकीय नेता आला व ग्रीसच्या राजाविरुद्ध आम्ही प्रचार करत असल्याचा आमच्यावर दोषारोप केला. म्हणून पोलिसांनी दुसऱ्या दोन लोकांच्या संरक्षणाखाली आम्हाला पुढील तपासणीसाठी लमिया नामक शहरी पाठवले. तेथे आम्हाला सात दिवसांसाठी कोठडीत ठेवण्यात आले आणि मग बेड्या घालून चौकशीसाठी लारिसा शहरात आम्हाला नेण्यात आले.
लारिसामधील आमच्या ख्रिस्ती बांधवांना आमच्या आगमनाविषयी माहीत असल्यामुळे ते आमची वाट पाहत होते. त्यांनी आमच्याबाबत दाखवलेल्या आपुलकीमुळे संरक्षकांना एक उत्तम साक्ष मिळाली. पूर्वी सैन्यात कॅप्टनच्या हाताखालील अधिकारी असलेले व आता यहोवाचे साक्षीदार असलेले आमचे वकील त्या शहरात प्रसिद्ध होते. कोर्टात येऊन त्यांनी आमची केस हाताळली तेव्हा, आमच्यावर केलेले आरोप खोटे शाबीत झाले आणि आम्हाला सोडण्यात आले.
यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रचाराच्या यशामुळे विरोध आणखी तीव्र झाला. १९३८ व १९३९ मध्ये धर्मांतराला मनाई करणारे नियम संमत करण्यात आले व याबाबतीत मायकल आणि मी अनेक कोर्ट प्रकरणांत गोवलेलो होतो. नंतर, शाखा दप्तराने आम्हाला आमच्या कार्याकडे लोकांचे जास्त लक्ष आकर्षित होऊ नये म्हणून वेगवेगळे कार्य करण्याचा सल्ला दिला. एकट्याने काम करणे मला आधी कठीण वाटले. तरीसुद्धा, यहोवावर पूर्ण भरवसा ठेवून मी ॲटिका, बोईओटिया, फिथिओटीस, इयुबोईअ, एटोलिया, एकरनानिया, युरटानिया व पेलोपोनिसोस हे जिल्हे पायी उरकले.
या काळादरम्यान, यहोवावर भरवसा ठेवा या स्तोत्रकर्त्याच्या सुंदर शब्दांनी मला साहाय्य केले: “तुझ्या साहाय्याने मी फौजेवर चाल करून धावत जातो, माझ्या देवाच्या साहाय्याने मी तट उडून जातो. तोच देव मला सामर्थ्याचा कमरबंद बांधितो, तो माझा मार्ग निर्वेध करितो. तो माझे पाय हरिणींच्या पायांसारखे करितो, आणि उंच जागांवर माझी स्थापना करितो.”—स्तोत्र १८:२९, ३२, ३३.
सन १९४० मध्ये इटलीने ग्रीसवर युद्धाची घोषणा केली व त्यानंतर लगेचच जर्मन सैनिकांनी देशावर हल्ला केला. लष्करी कायदा जाहीर करण्यात आला व वॉच टावर संस्थेच्या पुस्तकांवर बंदी आली. ग्रीसमधील यहोवाच्या साक्षीदारांसाठी तो काळ अतिशय कठीण होता; तरीसुद्धा, त्यांची संख्या नाट्यमयरीत्या वाढत गेली—१९४० मध्ये १७८ साक्षीदारांपासून १९४५ मधील दुसऱ्या महायुद्धाच्या अंताला १,७७० पर्यंत!
बेथेलमध्ये सेवा करणे
सन १९४५ मध्ये मला अथेन्स येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दप्तरात सेवा करण्याचे आमंत्रण मिळाले. “देवाचे घर” असा अर्थ असलेले बेथेल तेव्हा, लॉम्बॉरडू स्ट्रीटवरील एका भाड्याच्या घरात होते. पहिल्या मजल्यावर कार्यालये होती आणि तळघरात छापखाना होता. छापखान्यात एक लहानशी छपाई मशीन व ट्रिमींग मशीन होती. तेव्हा छपाईचे काम केवळ दोनच जण करत असत, पण थोड्याच दिवसांमध्ये इतर स्वयंसेवक आपल्या घरून ये जा करून कार्याला हातभार लावू लागले.
न्यूयॉर्क, ब्रुकलिन येथील वॉच टावर संस्थेच्या मुख्यालयाशी सन १९४५ मध्ये पुन्हा संपर्क साधता आला आणि त्याच वर्षी आम्ही ग्रीसमध्ये नियमितपणे द वॉचटावर छापू लागलो. मग, १९४७ मध्ये आम्ही १६ टेनेडू स्ट्रीट, येथे आमचे कार्यालय हलवले पण छापखाना लॉम्बॉरडू स्ट्रीट येथेच होता. नंतर, छापखाना लॉम्बॉरडू स्ट्रीटपासून पाच किलोमीटर दूर असलेल्या एका साक्षीदाराच्या कारखान्यात हलवण्यात आला. यास्तव, काही काळासाठी या तीन ठिकाणी जाण्यासाठी आमची खूपच धावपळ होत असे.
मला आठवते, की आम्ही भल्या पहाटेच टेनेडू स्ट्रीट वरील निवासस्थान सोडत व छापखान्यापर्यंत प्रवास करीत असू. तेथे दुपारी १ वाजेपर्यंत काम केल्यावर मी छापलेले कागद घेऊन लॉम्बॉरडू स्ट्रीटवर जात असे. तेथे हे छापलेले कागद नियतकालिकाच्या रुपाने हाताने मुडपून, शिवून व मग बाजूने कापले जात. त्यानंतर आम्ही ती तयार नियतकालिके पोष्टात नेत असू, तिसऱ्या मजल्यावर नेऊन त्यांना वेगवेगळे करण्यास व टपालाने पाठवण्यासाठी पाकिटांवर तिकीटे लावण्यास पोष्ट कर्मचारी वर्गाला आम्ही मदत करत असू.
सन १९५४ पर्यंत, ग्रीसमध्ये साक्षीदारांची संख्या ४,००० पेक्षा अधिक वाढली होती व त्यामुळे विस्तृत तरतूदींची आवश्यकता होती. यास्तव, आम्ही करतॉली स्ट्रीटवर अथेन्सच्या खालच्या बाजूला असलेल्या एका शहरातील तीन मजली बेथेलमध्ये राहावयास गेलो. सन १९५८ मध्ये, मला स्वयंपाकघराची देखरेख करण्याचे काम देण्यात आले व १९८३ पर्यंत मी तीच जबाबदारी सांभाळत होतो. यावेळेपावेतो, सन १९५९ मध्ये मी एलीफथारिऑशी विवाह केला जी यहोवाच्या सेवेत निष्ठावान मदतनीस ठरली.
पुन्हा विरोध सहन करणे
सन १९६७ मध्ये एका लष्करी पक्षाने सत्ता बळकावली व पुन्हा एकदा आमच्या प्रचारकार्यावर बंधने घालण्यात आली. परंतु, आमच्या कार्यांवर आलेल्या निर्बंधांना सामोरे जाण्याच्या गत अनुभवामुळे आम्ही लगचेच परिस्थितीशी जुळवून घेतले व सर्व कामे गुप्तरीत्या यशस्वीपणे पार पाडली.
आम्ही आमच्या सर्व सभा खासगी घरांमध्ये चालवल्या व दारोदारच्या सेवेत खबरदारी बाळगली. तरीसुद्धा, आमच्या बांधवांना वेळोवेळी अटक होत असे व कोर्टप्रकरणे वाढत राहिली. देशाच्या विविध भागांमध्ये होणाऱ्या चौकशींसाठी आमचे वकील सतत धावपळ करीत असत. विरोध असतानाही बहुसंख्य साक्षीदार खासकरून सप्ताहांती त्यांच्या प्रचार कार्यात नियमित होते.
एखाद्या शनिवारी किंवा रविवारी प्रचार कार्य संपल्यावर आमच्यापैकी कोणी हरवले तर नाही हे पाहण्यासाठी तपासणी होत असे. बहुधा, हरवलेली व्यक्ती जवळच्याच पोलीस स्टेशन कोठडीत असे. म्हणून आम्ही त्यांच्याकरता ब्लँकेट आणि अन्न घेऊन जात असू व त्यांना उत्तेजन देत. तसेच, आम्ही आमच्या वकिलांना कळवत असू व ते सोमवारच्या दिवशी कोठडीत असलेल्यांच्या वतीने सरकारी वकिलांपुढे बोलत असत. आम्ही आनंदाने या परिस्थितीला सामोरे जात असू कारण आम्ही हे सर्व काही सत्यासाठी सहन करीत होतो!
बंदी होती तेव्हा बेथेलमधील आमचे छपाईचे कार्य पूर्णपणे बंद होते. यास्तव, एलीफथारिऑ आणि मी अथेन्सच्या उपनगरीत असलेल्या ज्या घरात राहत होतो ते घर एकप्रकारे छापखानाच बनले. एलीफथारिऑ एका जड टाइपरायटरवर वॉचटावर लेखांचे टंकलेखन करीत असे. ती टाइपरायटरवर एकावेळी दहा कागद लावून टाइपींग करीत असे, व अक्षरे छापण्याकरता तिला टाइपरायटरची कळ अतिशय जोर देऊन दाबावी लागत असे. मग मी ती सर्व पाने गोळा करून शिवत असे. दररोज संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत हा आमचा नित्यक्रम होता. आमच्या घराच्या खालच्या मजल्यावर एक पोलीस राहत होता पण त्याला कधीच कशी शंका आली नाही याचे आम्हाला आजही आश्चर्य वाटते.
निरंतर वृद्धीमुळे आनंद करणे
सन १९७४ मध्ये ग्रीसमध्ये लोकसत्ता पुनःस्थापित करण्यात आली व आमचे प्रचार कार्य पुन्हा एकदा उघडपणे होऊ लागले. तरीसुद्धा, आमच्या कार्यावरील सात वर्षांच्या बंदीदरम्यान, ६,००० पेक्षा अधिक नव्या साक्षीदारांची आश्चर्यकारक वाढ झाली व यामुळे एकूण १७,००० पेक्षा अधिक राज्य प्रचारक झाले.
शिवाय, शाखेत आम्ही आमचे छपाईचे कार्य पुन्हा चालू केले. त्यामुळे करतॉली स्ट्रीटवरील बेथेल लहान वाटू लागले. म्हणून मराऊसी या अथेन्सच्या उपनगरीत २.५ एकर जमीन विकत घेण्यात आली. २७ नवीन बेडरूम्स, एक कारखाना, कार्यालये व इतर सुविधांचे बांधकाम करण्यात आले. ऑक्टोबर १९७९ मध्ये या सर्वांचे समर्पण झाले.
कालांतराने आम्हाला आणखी जागेची आवश्यकता भासू लागली. याकारणास्तव, अथेन्सच्या उत्तरेकडे सुमारे ६० किलोमीटरवर ५४ एकर जमीन विकत घेण्यात आली. त्या ठिकाणाचे नाव एलिओना आहे जे डोंगरावर वसले आहे, तेथून डोंगरांचे व नदी नाले असलेल्या दरींचे दृश्य दिसते. एप्रिल १९९१ मध्ये आम्ही, एका घरात आठ जण राहू शकतील अशी २२ घरे व दुसऱ्या सुविधांचे समर्पण केले.
पूर्ण वेळेच्या सेवेमध्ये ६० वर्षे खर्च केल्यानंतरही मी अजूनही तंदुरस्त आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे मी ‘वृद्धपणातहि फळ देत आहे.’ (स्तोत्र ९२:१४) मी माझ्या डोळ्यांनी यहोवाच्या खऱ्या उपासकांच्या संख्येत महान वृद्धी पाहण्याकरता अजूनही जिवंत असल्यामुळे त्याचे विशेष आभार मानतो. संदेष्टा यशयाने या वृद्धिविषयी भाकीत केले होते: “राष्ट्रांची संपत्ति तुजकडे आणावी, . . . म्हणून तुझ्या वेशी सतत उघड्या राहतील, त्या अहोरात्र बंद म्हणून राहणार नाहीत.”—यशया ६०:११.
सर्व राष्ट्रांतील लाखो लोकांच्या झुंडीला यहोवाच्या संघटनेत येताना पाहणे व देवाच्या नवीन जगात जाण्याकरता मोठ्या संकटातून कसे वाचता येईल त्याचे शिक्षण घेताना पाहणे किती सर्वोत्कृष्ट संधी आहे! (२ पेत्र ३:१३) मी अगदी खरेपणाने सांगू शकतो, की हे जग मला देऊ शकणाऱ्या कोणत्याही गोष्टीपेक्षा पूर्ण वेळेची सेवा माझ्याकरता सर्वात मौल्यवान ठरली आहे. होय, मला सोन्याचे खजिने नव्हेत तर माझ्या जीवनाला प्रमाणापेक्षा अधिक श्रीमंत करणारे आध्यात्मिक हिरे सापडले आहेत.
[२३ पानांवरील चित्र]
मिखॉलीस व एलीफथारिऑ कॉमीनॉरीस
(उजवीकडे) लॉम्बॉरडू स्ट्रीटवरील छापखाना