ईश्वरी कोडी आणि देवाचा उद्देश
कोणाला माहित नसते तोपर्यंतच गंमत. माहीत झाले तर गंमत नाही. ही गंमत काय सांगा पाहू? कोडे.
आजच्या व्यावहारिक जगात, लोकांना कोडे म्हटले की लहान मुलांचा खेळ वाटतो, परंतु प्राचीन काळात कोडे म्हणजे “बुद्धीची परीक्षा” असे द इंटरप्रीटर्स डिकश्नरी ऑफ द बायबल नामक पुस्तक म्हणते.—पडताळा नीतिसूत्रे १:५, ६.
कधीकधी आपली इच्छा व उद्देश सरळ सांगण्याऐवजी, यहोवाने त्याच्या भविष्यसूचक वचनांना, उपमांचा, “रहस्यमय,” किंवा जटील कोड्यांचा उपयोग करून मुद्दामहून अस्पष्ट केले आहे. (स्तोत्र ७८:२, मराठी कॉमन लँग्वेज; गणना १२:८, द एम्फसाईज्ड बायबल) कोडे यासाठी वापरण्यात आलेला इब्री शब्द बायबलमध्ये फक्त १७ वेळा वापरण्यात आला असला तरी, शास्त्रवचने ही खरे तर कोडी आणि नीतिसूत्रांनीच भरली आहेत.
बायबलमधील कोड्यांची विपुलता
राजा शलमोन, त्याच्याकडे आणले जाणारे सर्वात जटिल प्रश्न किंवा कोडे सहज सोडवू शकत होता असे अहवालानुसार म्हटले आहे. (१ राजे १०:१, NW तळटीप) देवाने दिलेल्या बुद्धिमुळेच तर तो असे करू शकत होता. परंतु, शलमोन एकदा सोरेचा राजा हीराम याच्यासोबत कोडे सोडवण्यात हारला होता या प्राचीन इतिहासकारांच्या अहवालात काही सत्य असेल, तर ते बहुतेककरून त्याच्या धर्मत्यागामुळे यहोवाच्या आत्म्याचा पाठिंबा गमावून बसल्यानंतर झाले असावे. न्यायाधीश शमशोनालाही कोडी सोडवण्याचा छंद होता. एकदा, पवित्र आत्म्याच्या शक्तीने, एका कोड्यामुळे त्याने देवाच्या शत्रूंच्या हृदयाचे ठोकेच बंद पाडले.—शास्ते १४:१२-१९.
परंतु, बायबलमधील अनेक कोड्यांचा संबंध थेट यहोवाच्या उद्देशांशी आहे. उदाहरणार्थ, उत्पत्ति ३:१५ चा विचार करा. बायबलचा संपूर्ण विषय आधारित असलेली ही भविष्यवाणीच एक कोडे अर्थात ‘[पवित्र] रहस्य’ आहे. (रोमकर १६:२५, २६) अलौकिक दृष्टान्त आणि प्रकटीकरणे यांच्याव्यतिरिक्त प्रेषित पौलाने देवाच्या उद्देशांचे विशिष्ट पैलूही “अस्पष्ट,” म्हणजे अगदी “अंधुक” पाहिले. (१ करिंथकर १३:१२; २ करिंथकर १२:१-४) आणि प्रकटीकरण १३:१८ मध्ये अचानक उल्लेखण्यात आलेल्या व कसलेही स्पष्टीकरण नसलेल्या जंगली श्वापदाच्या “सहाशे सहासष्ट” या गूढ संख्येबद्दल लोक करत असलेल्या अंदाजांबद्दल काय? ही ईश्वरी कोडी सोडवण्यास कोण समर्थ आहे व या कोड्यांद्वारे कोणता उद्देश साध्य होतो?
पवित्र रहस्य उलगडणे
आपणा सर्वांना, आपल्या पाच इन्द्रिय शक्तींमध्ये दृष्टी सर्वात मौल्यवान आहे. परंतु प्रकाशाविना मानवी दृष्टी पूर्णपणे निरर्थक ठरली असती. आपण अंधांप्रमाणेच असतो. मानवी मनाविषयीही असेच आहे. मानवी मनामध्ये दोन गोष्टींच्या पद्धतींमध्ये तुलना करण्याची, तर्काचा उपयोग करण्याची व अशाप्रकारे कोडी सोडवण्याची क्षमता आहे. तरीपण, पवित्र रहस्ये सोडवण्यासाठी आणखी कशाची तरी आवश्यकता आहे. काही जण बायबलमधील कोड्यांचे उत्तर देऊ शकले तरी, बायबलचा लेखक अर्थात प्रकाशाचा देव यहोवाच फक्त त्या कोड्यांचा मूळ अर्थ सांगू शकतो.—१ योहान १:५.
पण दुःखाची गोष्ट म्हणजे, लोक इतके गर्विष्ठ व स्वैराचारी आहेत की यहोवाकडून उत्तर मिळण्यासाठी ते थांबायला तयार नाहीत. कोड्याचे कुतूहल असलेले असेही काही लोक आहेत ज्यांनी, सत्याऐवजी बौद्धिक प्रेरणेद्वारे देवाच्या वचनाच्या बाहेर असलेल्या स्रोतामार्फत उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ, कबालामध्ये सांगितलेले यहुदी गूढवाद, विशिष्ट आंकड्यांवर व इब्री मुळाक्षरांतील विशिष्ट अक्षरांवर जोर देतात. दुसऱ्या बाजूला पाहता, दुसऱ्या शतकातील नॉस्टिक्सनी, इब्री आणि ग्रीक शास्त्रवचनांतील गूढ अर्थ माहीत करून घेण्यासाठी त्यांचा उपयोग केला.
अशाप्रकारे, भलत्याच ठिकाणी शोध केल्यामुळे, ते मूर्तीपूजक चालीरीती किंवा अंधविश्वासांमध्ये आणखीनच गुरफटत गेले आणि ईश्वरी सत्यापासून दुरावले. ‘या जगात इतकी दुष्टाई भरली आहे, म्हणजे सृष्टीकर्ता याव्हे हा काही चांगला देव नव्हे,’ असे नॉस्टिक्सचे म्हणणे होते. हा सुज्ञ सल्ला होता असे तुम्हाला वाटते का? मानवी विचारशैली किती अल्प आहे! म्हणूनच तर, नॉस्टिक पंथांनी काढलेल्या धर्मत्यागी कल्पनांचा विरोध करत प्रेषित पौलाने आपल्या पत्रांमध्ये अशी कडक ताकीद दिली, की: “शास्त्रलेखापलीकडे कोणी जाऊ” नका!—१ करिंथकर ४:६.
“रहस्यमय” गोष्टींवर प्रकाश टाकणे
पण मग, प्रकाशाचा देव “रहस्यमय” गोष्टी का बोलतो? कोडे ही गोष्टच मुळी अशी असते जी कल्पनाशक्तीला व तर्कशक्तीला आव्हान करते. एखाद्या चविष्ट अन्नपदार्थावर सजवण्यासाठी पेरलेली कोथंबीर पाहून तोंडाला जसे पाणी सुटते त्याचप्रमाणे, शास्त्रवचनांमध्ये अधूनमधून असलेली कोडी, एखाद्याचे लक्ष वेधतात किंवा त्यातील संदेश अधिक उठावदार बनवतात. अशावेळी, लागलीच स्पष्टीकरणे दिलेली असतात.—यहेज्केल १७:१-१८; मत्तय १८:२३-३५.
यहोवा उदारतेने बुद्धी देतो पण ती भलत्यासलत्या कोणालाही देत नाही. (याकोब १:५-८) अनेक ज्याला कोडे समजतात अशा पुष्कळ कूट म्हणींचा ईश्वरप्रेरित संग्रह असलेल्या नीतिसूत्रे पुस्तकाचा विचार करा. ही कोडी समजून घेण्यास वेळ लागतो, मनन करावे लागते. हा प्रयत्न करायला किती लोक तयार आहेत? या कोड्यांतील बुद्धी केवळ त्यांनाच मिळू शकेल जे ती शोधून काढू इच्छितात.—नीतिसूत्रे २:१-५.
तसेच येशूनेही आपल्या श्रोत्यांची मनोवृत्ती जाणून घेण्याकरता दृष्टान्तांचा उपयोग केला. झुंडीच्या झुंडीने लोक त्याच्याकडे येऊ लागले. तो सांगत असलेल्या गोष्टी, तो करत असलेले चमत्कार त्यांना आवडत होते. तरी, आपली जीवनशैली बदलायला व येशूचे अनुसरण करायला किती जण तयार होते? येशूचे शिष्य या लोकांपेक्षा किती वेगळे होते! त्याच्या शिकवणी समजून घेण्याचा त्यांनी वारंवार प्रयत्न केला आणि त्याचे अनुयायी होण्याकरता त्यांनी स्वेच्छेने स्वार्थत्याग केला.—मत्तय १३:१०-२३, ३४, ३५; १६:२४; योहान १६:२५, २९.
प्रकाशाकडे पाहणे
एका सूत्रानुसार, “कोड्यांबद्दल वाटणारी आस्था आणि ज्ञानवृद्धीचा काळ एकाच वेळी येत असल्यासारखे वाटते.” आज आपण देवाच्या लोकांसाठी आध्यात्मिक “प्रकाश उदयास” आला त्या काळात जगत असल्यामुळे खूपच धन्य लोक आहोत. (स्तोत्र ९७:११; दानीएल १२:४, ९) यहोवा त्याच्या वेळापत्रकानुसार आपले उद्देश प्रकट करूपर्यंत आपण धीराने थांबण्यास तयार आहोत का? सर्वात महत्त्वाचे म्हणजे, देवाच्या प्रकट इच्छेनुरूप कसे वागायचे हे आपल्याला कळते तेव्हा आपण आपल्या जीवनशैलीत बदल करावयास लागलीच कार्य करतो का? (स्तोत्र १:१-३; याकोब १:२२-२५) असे केल्यास यहोवा आपल्या प्रयत्नांवर आशीर्वाद देईल जेणेकरून, साध्या डोळ्यांनी अंधूक दिसणारी गोष्ट चष्म्यातून जशी स्पष्ट दिसते त्याप्रमाणे पवित्र आत्मा आपली आध्यात्मिक दृष्टी तेज करील ज्यामुळे आपण आपल्या ज्ञानचक्षुंनी ईश्वरी उद्देशाचे संपूर्ण चित्र स्पष्टपणे पाहू शकू.—१ करिंथकर २:७, ९, १०.
होय, शास्त्रवचनीय कोडी, “रहस्ये प्रगट करणारा” म्हणून यहोवाचा महिमा करतात. (दानीएल २:२८, २९) शिवाय, तो आपली मने पारखणारा आहे. (१ इतिहास २८:९) ईश्वरी सत्यावरील प्रकाशाचा पडदा प्रगतीशीलपणे बाजूला सारला जात आहे, यात आपण आश्चर्य करायची काही गरज नाही. (नीतिसूत्रे ४:१८; रोमकर १६:२५, २६) केवळ निष्फळता पदरी पाडणाऱ्या गूढवादाद्वारे किंवा अल्प मानवी बुद्धीद्वारे देवाविषयीच्या गहन गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपण, त्याच्या “रहस्यमय” गोष्टींवर सत्याचा प्रकाश पाडावा, त्याच्या नियुक्त समयातील विश्वासू सेवकांना त्याचे अद्भुत उद्देश प्रकट करावेत म्हणून पूर्ण भरवशाने यहोवा देवाकडे आपली दृष्टी लावू या.—आमोस ३:७; मत्तय २४:२५-२७.
[२६ पानांवरील चित्राचे श्रेय]
Biblia Hebraica Stuttgartensia, Deutsche Bibelgesellschaft Stuttgart