राशी प्रभावशाली बायबल भाष्यकार
हिब्रू भाषेतले मुद्रित झालेल्या पहिल्या पुस्तकांपैकी एक कोणते होते? पेन्टॅट्यूक (मोशेची पहिली पाच पुस्तके) यावर करण्यात आलेले एक भाष्य. हा ग्रंथ इटलीच्या रेज्जियो कॅलेब्रिया शहरातून १४७५ साली प्रकाशित झाला. ग्रंथाचा लेखक? राशी या नावाने ओळखले जाणारे एक गृहस्थ.
पण या भाष्याला इतके खास महत्त्व का देण्यात आले आहे? राशी—द मॅन ॲण्ड हिज वर्ल्ड या आपल्या पुस्तकात एज्रा शेरेशेव्स्की सांगतात की राशी यांचा भाष्यग्रंथ, “यहुदी लोकांच्या घराघरांत तसेच सार्वजनिक अध्ययन गृहांत हमखास वाचला जाणारा आधारग्रंथ बनला. यहुदी वाङ्मयातील इतर कोणत्याही ग्रंथाला हा दर्जा देण्यात आलेला नाही . . . पेन्टॅट्यूकवर राशी यांनी केलेल्या भाष्याचा आधार घेऊन लिहिण्यात आलेली २००, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त भाष्ये प्रसिद्ध झाली.”
राशी यांच्या भाष्यग्रंथाचा फक्त यहुदी लोकांवरच प्रभाव पडला आहे का? बहुतेकांना कदाचित याची माहिती नसेल, पण राशी यांच्या हिब्रू शास्त्रवचनांवरील भाष्याचा शतकानुशतके बायबल भाषांतरांवरही प्रभाव राहिला आहे. पण राशी कोण होते, आणि ते इतके प्रभावशाली कसे ठरले?
राशी कोण होते?
राशी यांचा जन्म १०४० साली फ्रांसच्या ट्रवॉ शहरात झाला.a तरुणपणी त्यांनी राइनलंडच्या वर्म्ज आणि माइन्ट्स शहरांतल्या यहुद्यांच्या धर्म विद्यालयांत शिक्षण घेतले. येथे, युरोपातल्या सर्वात प्रतिष्ठित यहुदी विद्वानांच्या छत्रछायेखाली त्यांनी विद्यार्जन केले. वयाच्या सुमारे पंचविसाव्या वर्षी त्यांना काही खासगी कारणांमुळे ट्रवॉ येथे परतावे लागले. एव्हाना एक अतिशय गुणवान विद्वान असण्याची ख्याती मिळवलेले राशी, लवकरच ट्रवॉ येथल्या यहुदी समाजाचे धार्मिक पुढारी बनले आणि त्यांनी आपले स्वतःचे धर्म विद्यालय देखील स्थापन केले. कालांतराने या नव्या यहुदी शैक्षणिक केंद्राला, जर्मनीतल्या राशींच्या शिक्षकांच्या विद्यालयांपेक्षाही अधिक महत्त्व प्राप्त झाले.
त्या काळात फ्रांसमध्ये राहणाऱ्या यहुद्यांचे त्यांच्या तथाकथित ख्रिस्ती शेजाऱ्यांशी शांती-सलोख्याचे संबंध होते; यामुळे राशींना आपली शैक्षणिक कार्ये अधिक स्वतंत्रपणे करणे शक्य होते. पण स्वतःला समाजापासून विलग करून घेणाऱ्या विद्वानां-पैकी राशी नव्हते. धर्म विद्यालयाचे शिक्षक आणि मुख्याधिकारी असल्यामुळे त्यांना अतिशय प्रतिष्ठित स्थान होते, तरीसुद्धा आपल्या उदरनिर्वाहाकरता ते द्राक्षारस तयार करण्याचा धंदा करायचे. लहानमोठ्या धंद्यांच्या बारकाव्यांची चांगली माहिती असल्यामुळे त्यांना सर्वसाधारण यहुद्यांशी जवळीक साधता आली; आणि यामुळे त्यांची परिस्थिती समजून घ्यायला आणि त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करायला त्यांना मदत झाली. ट्रवॉ हे शहर अगदी मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळेही राशी यांच्या ज्ञानात खूप भर पडली. प्रमुख व्यापार मार्गांवर असल्यामुळे ट्रवॉ शहर एक बहुराष्ट्रीय केंद्र बनले होते आणि यामुळे वेगवेगळ्या देशांच्या लोकांचे रितीरिवाज त्यांना जवळून पाहायला मिळाले.
भाष्यग्रंथाचे प्रयोजन काय होते?
आपल्या ग्रंथालाच सर्वकाही मानणारे लोक, अशी यहुद्यांची ख्याती होती. पण ‘तो ग्रंथ,’ अर्थात बायबल हिब्रू भाषेत होता आणि “लोक” मात्र आता ॲरबिक, जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, आणि अशाच कितीतरी भाषा बोलू लागले होते. अर्थात, बहुतेक यहुद्यांना अजूनही लहानपणापासून हिब्रू शिकवले जायचे, पण त्यांना देखील बायबलच्या बऱ्याच शब्दांचा अर्थ स्पष्टपणे कळायचा नाही. शिवाय, रब्बींच्या प्रभुत्वाखाली यहुदी धर्मांत लोकांना बायबलच्या शाब्दिक अर्थाचे परिक्षण करण्यापासून परावृत्त करण्याची शतकानुशतके अतिशय प्रबल प्रवृत्ती होती. बायबलच्या शब्दांवर आणि उताऱ्यांवर आधारित असलेल्या कितीतरी अन्योक्त्या आणि अख्यायिका अस्तित्वात होत्या. यांपैकी बरीच भाष्ये आणि कथा लांबलचक खंडांत अभिलिखित करण्यात आल्या होत्या; या संग्रहाला मिद्राशb हे नाव पडले.
राशी यांचे नातू, रब्बी सॅम्युएल बिन मेइर (राश्बाम) हे देखील एक बायबल विद्वान होते. उत्पत्ति ३७:२ या वचनावर भाष्य करताना त्यांनी म्हटले की, “[राशी यांच्या पूर्वीचे] जुने भाष्यकार सहसा उपदेश (देराशोत) करत असत; आणि त्यालाच ते आपले सर्वात मुख्य उद्दिष्ट समजायचे, [पण] त्यांनी बायबलच्या मजकुराच्या शाब्दिक अर्थाचा सखोल अभ्यास कधी केलाच नाही.” या प्रवृत्तीबद्दल भाष्य करताना डॉ. ए. कोहेन (सॉन्सिनो बुक्स ऑफ द बायबल चे मुख्य संपादक) लिहितात: “[बायबलच्या] मजकुराच्या सरळसरळ अर्थाला धरून नसलेल्या कोणत्याही स्पष्टीकृत विवरणाला परवानगी दिली जाणार नाही, असा रब्बींनी नियम जरी केला असला, तरीसुद्धा प्रत्यक्षात मात्र ते या नियमाकडे लक्ष देत नव्हते.” अशाप्रकारच्या धार्मिक वातावरणात, बायबल वाचणाऱ्या सर्वसाधारण यहुदी माणसाला ते समजून घेणे अतिशय कठीण जायचे आणि यातूनच एका खुलासा करणाऱ्या सहायक ग्रंथाची गरज निर्माण झाली.
राशी यांचे उद्दिष्ट आणि त्यांच्या कार्यपद्धती
राशी यांना इब्री शास्त्रवचनांचा मजकूर सर्व यहुद्यांना समजेल अशा रूपात आणायचा होता; याच उद्दिष्टाचा त्यांनी जीवनभर पाठलाग केला. आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, जे त्यांच्या मते वाचकाला समजायला कठीण जातील अशा विशिष्ट शब्दांच्या आणि उताऱ्यांच्या विवेचनांचा त्यांनी संग्रह करायला सुरवात केली. राशींनी संग्रहित केलेल्या या विवेचनांत त्यांनी आपल्या शिक्षकांनी दिलेल्या स्पष्टीकरणांचा देखील उल्लेख केला आहे; शिवाय त्यांतून रब्बींच्या समग्र लिखाणांबद्दल स्वतः राशी यांना असलेल्या व्यापक ज्ञानाचीही प्रचिती येते. भाषेच्या संशोधनाकरता, राशी यांनी उपलब्ध असणाऱ्या सर्व मार्गांचा पुरेपूर उपयोग करून घेतला. मॅसोरेट्स यांनी केलेल्या टिपणाचा आणि उच्चारण संकेतांचा मजकुराच्या अर्थावर कसा प्रभाव पडतो याकडेही त्यांनी लक्ष दिले. एखाद्या शब्दाच्या अर्थावर प्रकाश टाकण्यासाठी ते आपल्या पेन्टॅट्यूकच्या भाष्यात बऱ्याच वेळा बायबलच्या ॲरमेक भाषांतराचा (आँजकलॉस यांचे तार्गुम) संदर्भ देतात. पूर्वी कधीही प्रयोगात न आणलेल्या पद्धती उपयोगात आणून त्यांनी शब्दयोगी अव्यये, उभयान्वयी अव्यये, क्रियापदांचे अर्थ आणि व्याकरण व वाक्यरचना यांच्या इतर पैलूंवर प्रकाश टाकला; आणि असे करताना त्यांनी अतिशय लवचिकता व कल्पकता दाखवली. त्यांच्या या स्पष्टीकरणांमुळे हिब्रू भाषेची वाक्यरचना आणि व्याकरण समजून घेण्यात अतिशय मोलाचा हातभार लागला.
रब्बींच्या प्रभुत्वाखाली असलेल्या यहुदी धर्माच्या वहिवाटीच्या विरोधात जाऊन राशी यांनी नेहमी कोणत्याही मजकुराच्या सरळसोप्या शाब्दिक अर्थावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. पण यहुद्यांना असंख्य मिद्राश ग्रंथांची अगदी चांगली माहिती झालेली होती; त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करता येत नव्हते. राशींच्या भाष्याचा एक लक्षवेधक पैलू हाच आहे की ज्या मिद्राश लिखाणांमुळे बऱ्याच वेळा बायबलच्या मजकुराचा शाब्दिक अर्थ अस्पष्ट झाला होता त्याच लिखाणांशी राशींनी आपल्या विवेचनांचा संबंध जोडला आहे.
उत्पत्ति ३:८ या वचनाच्या विवेचनात राशी हे स्पष्ट करतात: “बेरेशित राबाह आणि इतर मिद्राश संग्रहांत आपल्या धर्मगुरुंनी बऱ्याच अग्गादिकc मिद्राशिमची आधीच सुव्यवस्थित मांडणी केलेली आहे. पण मी मात्र केवळ वचनांचा सरळसोपा अर्थ (पेशात) आणि फक्त असे अग्गादॉत विचारात घेतो जे शास्त्रवचनांचा अहवाल संदर्भासहित स्पष्ट करतात.” राशींनी केवळ तीच मिद्राश विवरणे निवडली आणि थोडीफार बदलली, जी त्यांच्या मते एखाद्या वचनाचा अर्थ किंवा संदर्भ स्पष्ट करण्यासाठी सहायक होती; ज्यांमुळे विरोधाभास किंवा संदिग्धता निर्माण होत होती अशी मिद्राशिम विवरणे त्यांनी बदलली किंवा गाळून टाकली. यामुळे, यहुद्यांच्या येणाऱ्या पिढ्यांना बहुतेककरून अशीच मिद्राश विवरणे वाचायला मिळाली जी राशींनी निवडली होती.
राशी यांनी आपल्या शिक्षकांना अगदी मुक्तपणे श्रेय दिले; पण आपल्या शिक्षकांनी दिलेली स्पष्टीकरणे एखाद्या मजकुराच्या स्पष्ट कारणमीमांसेच्या विरोधात आहेत असे त्यांना वाटल्यास राशी आपली असहमती व्यक्त करायला मागेपुढे पाहायचे नाहीत. एखाद्या उताऱ्याचा अर्थ आपल्याला कळलेला नाही, किंवा पूर्वी आपण त्याचा चुकीचा अर्थ दिला होता असे वाटल्यास राशी हे कबूल करायला तयार असायचे; इतकेच काय, त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे गैरसमज दूर केल्याच्या उदाहरणांचाही त्यांनी उल्लेख केला आहे.
आपल्या काळानुसार चालणारे राशी
राशी आपल्या काळानुसार चालायचे. एका लेखकाने त्यांच्याविषयी असे म्हटले: “[राशी] यांनी यहुदी समाजाला केलेले सर्वात महत्त्वाचे योगदान म्हणजे त्यांनी सर्व समर्पक उताऱ्यांचे आपल्या काळात प्रचलित असलेल्या प्रादेशिक भाषेत केलेले विशदीकरण; त्यांची भाषा इतकी स्पष्ट आणि सोपी आहे, त्यांची शैली इतकी जिवंत आणि संवेदनशील आहे आणि त्यांची लिखाणे इतकी कौशल्यपूर्ण आणि विद्वत्तापूर्ण आहेत की लोक त्यांच्या लिखाणांना पूज्य मानू लागले; साहित्य जगतात त्यांची लिखाणे अजरामर झाली. राशी यांनी हिब्रू इतक्या खुबीने आणि सुरेखपणे लिहिले की ते फ्रेंच आहे की काय असा भास होतो. एखादा नेमका हिब्रू शब्द सापडत नसेल, तर त्याऐवजी राशी फ्रेंच शब्द हिब्रू लिपीत लिहून वापरायचे.” असे जवळजवळ ३,५०० फ्रेंच शब्द राशी यांनी वापरले आहेत आणि जुन्या फ्रेंच भाषेचा आणि उच्चारणाचा अभ्यास करणाऱ्यांना या शब्दांची बरीच मदत झाली आहे.
राशींच्या जीवनात सुरवातीला तुलनात्मकपणे शांतीची परिस्थिती असली तरीसुद्धा त्यांच्या जीवनाच्या उत्तरार्धात यहुदी आणि तथाकथित ख्रिश्चन समाजांत बराच तणाव वाढत गेला. १०९६ साली सुरू झालेल्या पहिल्या धर्मयुद्धात राशींनी जेथे शिक्षण घेतले होते त्या राइनलंडच्या यहुदी समाजांवर संकट कोसळले. हजारो यहुद्यांची कत्तल करण्यात आली. या कत्तलींच्या बातम्या ऐकून राशींच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाला असावा (११०५ साली त्यांचा मृत्यू होईपर्यंत त्यांची प्रकृती खालावतच गेली). त्यानंतर, राशींच्या शास्त्रवचनांवरील भाष्यांत अमुलाग्र बदल झालेला आढळतो. याचे एक उल्लेखनीय उदाहरण म्हणजे यशयाचा ५३ वा अध्याय; यात क्लेश सोसणाऱ्या यहोवाच्या सेवकाबद्दल सांगितलेले आहे. पूर्वी तालमुदप्रमाणेच, राशींनीही या वचनांचा मशीहाशी संबंध जोडला होता. पण धर्मयुद्धांनंतर असे दिसते की, ही वचने अन्यायी वागणूक सोसणाऱ्या यहुदी लोकांना लागू होतात असे त्यांचे मत बनले. या उताऱ्याचा यहुदी लोक जो अर्थ सांगत आले होते त्याला यामुळे एक नवे वळण लागले.d अशारितीने, ख्रिस्ती धर्मजगताचे गैरख्रिस्ती वर्तन यहुद्यांसहित असंख्य लोकांना येशूविषयीचे सत्य जाणण्यापासून परावृत्त करण्यास कारणीभूत ठरले.—मत्तय ७:१६-२०; २ पेत्र २:१, २.
बायबल भाषांतरावर त्यांनी कसा प्रभाव पाडला?
राशी यांच्या लिखाणांचा प्रभाव लवकरच यहुदी धर्माबाहेरही जाणवू लागला. फ्रेंच फ्रान्सिस्कन बायबल भाष्यकार, निकलस ऑफ लायरा (१२७०-१३४९) यांना तर “रब्बी सॉलमन [राशी]” यांच्या मतांचा संदर्भ घेण्याची इतकी सवय होती की त्यांना “सॉलमनचा नकल्या” असे टोपणनाव देण्यात आले. आणि लायरा यांच्या लिखाणांचा पगडा बऱ्याच भाष्यकारांवर आणि भाषांतरकारांवर होता; इंग्रजीतल्या किंग जेम्स व्हर्शन बायबलच्या भाषांतरकारांचे अनुप्रवेशक आणि जर्मनीत बायबलच्या भाषांतरात क्रांती घडवून आणणारे सुधारक मार्टिन ल्युथर यांचाही यात समावेश आहे.
रब्बींच्या ज्या विचारप्रणालीचा राशींवर जबरदस्त प्रभाव होता, ती ख्रिस्ती सत्याशी विसंगत होती. तरीसुद्धा, बायबलमध्ये वापरलेले हिब्रू शब्दप्रयोग, वाक्यरचना आणि व्याकरण यांविषयी त्यांना असलेले गहिरे ज्ञान तसेच बायबलच्या मजकुराचा सरळसोपा, शाब्दिक अर्थ समजून घेण्यासाठी त्यांनी सतत केलेला प्रयत्न यामुळे बायबलचा सखोल अभ्यास करणाऱ्यांसाठी आणि भाषांतरकारांसाठी राशींची लिखाणे तुलनात्मक अभ्यासाच्या दृष्टीने अतिशय माहितीवर्धक ठरली आहेत.
[तळटीपा]
a “राशी” हे नाव हिब्रू भाषेत “रब्बी शलोमो यित्सकाकी” [रब्बी सॉलमन बिन आयझक] या शब्दांतली पहिली अक्षरे घेऊन तयार केलेले संक्षिप्त नाव आहे.
b “मिद्राश” हा शब्द “विचारणा करणे, अभ्यास करणे, परीक्षण करणे” आणि विस्ताराने “उपदेश करणे” या अर्थाच्या एका हिब्रू मूळ शब्दातून आला आहे.
c आग्गादा (अनेकवचन, आग्गादॉत) याचा शाब्दिक अर्थ “विवरण” असून, रब्बींच्या लिखाणांतील बेकायदेशीर भागांच्या संदर्भात हा शब्द वापरला जातो; या लिखाणांत सहसा बायबलमधील चरित्रांवर पण बायबलवर आधारित नसलेल्या कथा किंवा रब्बींवर आधारित असलेल्या आख्यायिका समाविष्ट होत्या.
d बायबलमधल्या या विशिष्ट उताऱ्यावर आणखी माहितीसाठी वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीने प्रकाशित केलेल्या विल देयर एव्हर बी ए वर्ल्ड विदाउट वॉर? या माहितीपत्रकातील पृष्ठ २८ वर “माय सर्व्हंट”—हू इज ही? या शीर्षकाचा रकाना पाहावा.
[२६ पानांवरील चित्राचे श्रेय]
Text: Per gentile concessione del Ministero dei Beni Culturali e Ambientali