मूर्तिपूजक पायावरील इमारत
अनेक पर्यटक प्रचंड स्मारके पाहण्याकरता रोम, इटलीमध्ये जातात, ज्या प्रचंड वास्तूंपैकी एक आहे पँथियॉन. रोमी वास्तुकलेचा हा एक उत्कृष्ट नमुना आहे. ही प्राचीन इमारत अद्यापही चांगल्या स्थितीत उभ्या असणाऱ्या बोटांवर मोजण्याइतक्या इमारतींपैकी एक आहे. सा.यु.पू. २७ मध्ये अग्रीपाने ही इमारत बांधण्यास घेतली आणि तिची पुर्नबांधणी सा.यु. १२० मध्ये होड्रीयन याने केली. या इमारतीचे विशेष आकर्षण म्हणजे तिचा ४३ मीटर व्यास असलेला मोठा घुमट, अगदी अलीकडच्या काळापर्यंत या घुमटाच्या रूंदीची बरोबरी करणारी इमारत अस्तित्वात नव्हती. पँथियॉन हे सुरवातीला मूर्तिपूजक लोकांचे मंदीर होते, “सर्व दैवतांची जागा” हा त्याच्या मूळ ग्रीक शब्दाचा अर्थ होतो. परंतु, आज ते रोमन कॅथलिक चर्च आहे. हे आश्चर्यकारक परिवर्तन कसे झाले?
सा.यु. ६०९ मध्ये पोप बॉनिफेस चौथा याने पुष्कळ काळापासून उपयोगात न येणारे हे मंदीर “ख्रिस्ती” चर्चला पुन्हा समर्पित केले. त्यावेळी त्याला सांटा मारिया रोटुन्डा हे नाव देण्यात आले. ला सिव्हिल्टा कॅटोलिका या इटालियन जेसूट नियतकालिकात सन १९०० मध्ये प्रकाशित झालेल्या लेखानुसार, या इमारतीचा उपयोग कसा करावा याविषयी बॉनिफेस याने मनात ठरवले होते, “ख्रिस्ती क्षेत्रातील सर्व हुतात्म्यांचा किंवा सर्व संताचा गौरव करणे, पण यांत त्याने देवाच्या कुमारी मातेला प्रथम स्थान दिले.” आजच्या रोमन कॅथलिक चर्चने—सांटा मारिया ॲड मार्टिर्स (सेंट मेरीज एट द मार्टिर्स) किंवा पर्यायी, सांटा मारिया रोटुन्डा—पँथियॉनला नावे दिली आहेत—त्यांतून अशास्त्रवचनीय हेतू स्पष्ट होतो—पडताळा प्रेषितांची कृत्ये १४:८-१५.
हाच लेख पुढे म्हणतो की, पँथियॉन याला नव्या हेतूने जुळवून घेण्यासाठी “फार काही करण्याची आवश्यकता नव्हती. बॉनिफेसने सेंट ग्रेगरी [पोप ग्रेगरी पहिला] या त्याआधीच्या पोपने घालून दिलेले साधे आणि उदारमतवादी नियम अनुसरले. सेंट ग्रेगरी द ग्रेट हा मूर्तिपूजक मंदिराचे चर्चमध्ये रूपांतर करण्यात पारंगत आणि प्रसिद्ध होता.” ते कोणते नियम होते?
मूर्तिपूजक ब्रिटनला चालवलेल्या एका मिशनरीला सा.यु. ६०१ मध्ये लिहिलेल्या पत्रात ग्रेगरीने असे मार्गदर्शन दिले: “उल्लेख केलेल्या देशातील मूर्तिपूजक मंदिरे नाश करू नयेत; तर त्यांतील फक्त मूर्ती नष्ट कराव्यात . . . मंदिरे चांगल्या स्थितीत असल्यास त्यांत होणारी दियाबलाची उपासना थांबवावी आणि खऱ्या देवाची सेवा तेथे सुरू करावी.” ग्रेगरीची अशी कल्पना होती, की अद्यापही नुकसान न झालेली मंदिरे पाहून या मूर्तिपूजक लोकांना तेथे वारंवार जावेसे वाटेल. पण पोपने पुढे असे लिहिले, की मूर्तिपूजक लोक “दियाबलाकरता बैल अर्पित,” पण त्यांनी आशा व्यक्त केली की “येथून पुढे त्यांनी दियाबलकरता प्राणी अर्पण करू नयेत, तर देवाची स्तुती करताना आपल्या आनंदाकरता त्यांनी या प्राण्यांना मारावे.”
याशिवाय, मूर्तिपूजक उपासनेची “जागा” घेण्यासाठी रोमन कॅथलिक धर्माने आधीच्या मंदिराच्या आसपास “ख्रिस्ती” संतांना समर्पित केलेली चर्चेस स्थापन केली. प्राचीन सणांचा स्वीकार करून त्यांना ख्रिस्ती स्वरूप देण्यात आले. ला सिव्हिल्टा कॅटोलिका हे नियतकालिक असे म्हणते: “आरंभीच्या ख्रिश्चनांच्या काही परंपरांचे आणि धार्मिक सणांचे काही विशिष्ट मूर्तिपूजक वहिवाटींशी आणि मार्गांशी खूप साम्य होते हे सध्याच्या सर्व विद्वानांना माहीत आहे. या मूर्तिपूजक वहिवाटी लोकांना खूप आवडायच्या आणि प्राचीन जगात सार्वजनिक आणि खासगी जीवनात मूर्तिपूजक वहिवाटी खोलवर रूजलेल्या आणि स्थापलेल्या होत्या. रोमन कॅथलिक चर्च दयाळू आणि बुद्धिमान होते, मूर्तिपूजक रितीरिवाज आणि वहिवाटी पूर्णपणे काढण्याची चर्चला गरज भासली नाही; उलटपक्षी त्या रितीरिवाजांना ख्रिस्ती अर्थ देण्यात आला होता, हे रितीरिवाज जिवंत करून त्यांस उच्च दर्जा देण्यात आला होता, सामर्थ्याच्या जोरावर चर्चने त्यांवर विजय मिळवला पण, असे करतानाही त्यात सौम्यता होती म्हणून दोन्ही पक्षांकडून आणि संस्कृतीच्या लोकांकडून कोणतीही ओरड न होता चर्चने त्यांना जिंकून घेतले.”
मूर्तिपूजक सण ख्रिस्ती धर्मात सामावून घेण्याचे एक सर्वज्ञात उदाहरण म्हणजे नाताळ. खरे तर, डिसेंबर २५ या तारखेला प्राचीन काळातील रोमी लोक “अजिंक्य सूर्याचा जन्मदिवस” म्हणून डायस नातालिस सोलिस इन्व्हिक्टी हा सण साजरा करत.
मूर्तिपूजक लोकांची मने जिंकण्याकरता चर्च सत्याशी जडून राहिले नाही. सिनेक्रेटिसीझमच्या अर्थात “लोकांना आवडणारे” विधर्मी विश्वास आणि रितीरिवाज आपल्यात सामावून घेण्याच्या वहिवाटीला चर्चने योग्य ठरवले. परिणामी मिश्रजातीय, धर्मत्यागी चर्च उदयास आले ज्यातील शिकवणी खऱ्या ख्रिस्ती विश्वासापासून फार भिन्न होत्या. हे लक्षात घेता, याचे आश्चर्य होणार नाही, की “सर्व दैवतांचे” रोमचे आधीचे मंदीर—पँथियॉन—मारिया आणि इतर “संताना” समर्पित असलेले रोमन कॅथलिक चर्च झाले.
हे स्पष्ट आहे की, ‘दियाबलाची उपासना करण्याचे सोडून खऱ्या देवाची उपासना करण्याकरता’ मंदिराच्या समर्पणात किंवा सणाच्या नावात बदल करणे पुरेसे नाही. प्रेषित पौलाने विचारले: “देवाच्या मंदिराचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? . . . त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा, असे प्रभु म्हणतो आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका; कारण मी तुम्हाला स्वीकारीन; आणि मी तुम्हाला पिता असा होईन, आणि तुम्ही मला पुत्र व कन्या अशी व्हाल, असे सर्वसमर्थ प्रभु म्हणतो.”—२ करिंथकर ६:१६-१८.