‘लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला कामकरी’ होण्यास झटणे
ॲन्ड्रे सोपा यांच्याद्वारा कथित
दुसरे महायुद्ध भडकले आणि त्यानंतरचा रक्तपात वर्णन करता येणार नाही इतका भयाण होता; सगळीकडं निराशेचं सावट पसरलं होतं. नॉर्वेत नार्विकजवळील जर्मन नौदलात सिग्नलमॅन म्हणून मी कामाला असल्यामुळे मानवाने मानवाचीच केलेली अमानुषता मी प्रत्यक्ष पाहिली होती. खाडीच्या आश्रयाखाली रात्रीच्या वेळी ध्रुवीय प्रकाशांचे अद्भुत सौंदर्य पाहिल्यावर मी जीवनाचा गंभीरपणे विचार करू लागलो. हे सर्व निर्माण करणारा देव, युद्धात चाललेल्या या अघोरीपणाला जबाबदार नव्हता याची मला खात्री होती.
माझा जन्म १९२३ मध्ये, चेक सीमेजवळील लॉसोतच्या (आता पोलंडमध्ये) एका लहानशा गावात झाला; आम्ही गरीब होतो आणि मळ्यात राहायचो. माझे आईवडील कॅथलिक होते आणि आमच्या घरात धर्माला अतिशय महत्त्व होतं. परंतु लहानपणापासूनच माझ्या मनात धर्माविषयी शंका होत्या. आमच्या गावात तीन प्रोटेस्टंट बिऱ्हाडं होती; आणि कॅथलिक समाजानं त्यांना वाळीत टाकलं होतं. हे असं का, हे मला कळायचं नाही. शाळेत आम्हाला कॅटकिसम शिकवलं जायचं. एकदा जेव्हा मी पाळकांना त्रैक्याचं स्पष्टीकरण विचारलं तेव्हा उत्तराच्या ऐवजी मला दहा फटके मिळाले. पण मी जेव्हा १७ वर्षांचा होतो तेव्हा आणखीन एक घटना घडली ज्यामुळे चर्चवरील माझा विश्वास पूर्णपणेच उडाला. माझे आजीआजोबा (आईचे आईवडील) एकापाठोपाठ एक अशा दोन महिन्यात वारले आणि आईकडे दोन चर्च अंत्यविधीसाठी पुरेसे पैसे नव्हते. म्हणून तिनं पाळकांना, पैसे नंतर दिले तर चालतील का असं विचारलं. यावर पाळक म्हणाले, “तुझ्या आईवडलांकडं काही ना काही तरी असेलच ना? ते विक आणि अंत्यविधी कर.”
हे व्हायच्या काही महिने आधी म्हणजे १९३३ मध्ये हिटलर सत्तेवर आल्यानं आम्हाला पोलिश बोलण्यावर बंदी घालण्यात आली म्हणून आम्हाला जर्मन बोलावे लागले. ज्यांनी नकार दिला, किंवा ज्यांना जर्मन आली नाही असे लोक गायब होऊ लागले—त्यांना छळछावण्यात पाठवण्यात आलं होतं असं आम्हाला नंतर सांगण्यात आलं. आमच्या गावाचं नावसुद्धा बदलण्यात आलं, ग्रुनफ्लीस हे जर्मन नाव देण्यात आलं. मी चौदाव्या वर्षी शाळा सोडली; हिटलर युथ संघटनेत माझं नाव नसल्यामुळे मला नोकरी मिळत नव्हती. कशी तरी मला अप्रेन्टीस लोहार म्हणून काम मिळालं. युद्ध चालू झाल्यावर हिटलरसाठी आणि जर्मन सैन्यदलासाठी चर्चमध्ये प्रार्थना म्हटल्या जायच्या. मला प्रश्न पडला की, अशाच प्रार्थना युद्धात भाग घेणाऱ्या दुसऱ्या बाजूच्या लोकांमध्ये पण होत असाव्यात का?
जर्मन नौदलात काम
डिसेंबर १९४१ मध्ये मी, जर्मन नौदलात जाण्यासाठी करार केला आणि १९४२ च्या सुरवातीला मला एका स्काऊट जहाजावर काम करण्यासाठी नॉर्वेजियन किनारपट्टीवर पाठवण्यात आलं. आम्हाला ट्रॉन्डीयम आणि ओस्लो दरम्यान सैन्यदल, दारूगोळा पुरवठा किंवा दुसरा माल आणणाऱ्या जहाजांना संरक्षण देण्याचं काम होतं. असं एकदा समुद्रावर असताना, मी दोन नाविकांना बायबलमध्ये जगाचा अंत होणार असल्याचं म्हटलं आहे असं बोलताना ऐकलं होतं. त्यांना उघडपणे बोलायला भीती वाटत होती तरी, त्यांनी मला सांगितलं की त्यांचे आईवडील यहोवाच्या साक्षीदारांबरोबर संगती करीत होते पण ते मात्र यहोवाचे साक्षीदार झाले नव्हते. मी पहिल्यांदाच यहोवाच्या साक्षीदारांचं नाव ऐकलं होतं.
युद्ध संपत आलं होतं तेव्हा आम्हाला ब्रिटिशांनी कैद करून नेलं आणि आम्हाला पुन्हा जर्मनीला नेण्याकरता अमेरिकन लोकांच्या स्वाधीन केलं. आमच्यापैकी ज्यांची घरं सोव्हियत झोनमध्ये होती त्यांना कोळशाच्या खाणीत काम करायला फ्रान्सच्या उत्तरेकडे असलेल्या लिएविंग येथील एका तुरुंग छावणीत पाठवण्यात आलं. ही ऑगस्ट १९४५ ची गोष्ट आहे. मला आठवतं मी एका फ्रेन्च रक्षकाला त्याचा धर्म कोणता असं विचारलं होतं. तो म्हणाला: “कॅथलिक.” मी पण एक कॅथलिक असल्यामुळे मी त्याला विचारलं, की मग आपण एकमेकांचे शत्रू कसे झालो? तो म्हणाला: “आता हे शोधून काढण्यात काही अर्थ नाही. हे असंच चालत आलं आहे.” परंतु, एकाच धर्माच्या लोकांनी भांडायचं, एकमेकांचे खून करायचे हे गणित मला अजूनही कळत नव्हतं.
कोळशाच्या खाणीत प्रकाशाचा किरण
खाणीत काम करायला गेलो तेव्हा पहिल्याच दिवशी इव्हन्झ एम्योट नामक एकानं मला त्याने आणलेले सॅन्डवीच खायला दिले. तो मूळचा संयुक्त संस्थानांतील ओहायोचा होता पण फ्रान्समध्ये पुष्कळ वर्षांपासून होता. त्याने मला अशा एका जगाबद्दल सांगितले जेथे युद्ध होणार नाही. त्याचा दयाळू स्वभाव मला फार आवडला. मी जर्मन होतो आणि तो अमेरिकन होता तरीसुद्धा त्याच्या मनात माझ्याबद्दल काही नव्हतं. त्याच्यानंतर सन १९४८ च्या सुरवातीला आम्ही एकमेकांना पुन्हा भेटलो; तेव्हा त्याने मला “प्रीन्स ऑफ पीस” नामक इंग्रजीतील एक पुस्तिका दिली. आणि आता मला समजले की, एक देव आहे ज्याला युद्धाचा वीट येतो—ध्रुवीय प्रकाश पाहताना मी अशाच देवाची कल्पना करीत होतो. ही शिकवण देणारा धर्म शोधून काढायचंच असं मी ठरवलं. पण इव्हन्झ खाणीच्या दुसऱ्या बाजूला काम करत असल्यामुळे मी काही त्याला भेटू शकलो नाही. मी तुरुंग छावणीतील सर्व धार्मिक गटात गेलो, पुस्तिकेविषयी त्यांना काही माहिती होती का ते विचारलं, पण काही उपयोग झाला नाही.
शेवटी, १९४८ च्या एप्रिल महिन्यात मी तुरुंग छावणीतून सुटलो; आता मी स्वतंत्र कामगार झालो होतो. पुढच्या रविवारी मी रस्त्यावर घंटीचा आवाज ऐकला. पाहतो तो इव्हन्झ! तो यहोवाच्या साक्षीदारांच्या एका गटाबरोबर होता ज्यांनी सॅण्डवीच बोर्ड लावलेले होते; त्या बोर्डावर एका जाहीर भाषणाचा विषय लिहिला होता. घंटी वाजवणारे मॉरसो लर्वा होते; आता ते फ्रान्समध्ये शाखा समितीचे सदस्य आहेत. माझी ओळख जर्मन भाषा बोलणाऱ्या एका पोलंडच्या व्यक्तीबरोबर करण्यात आली; त्याचं नाव होतं, योसेफ कुलचॉक; त्याने आपल्या विश्वासामुळे छळछावण्यांमध्ये पुष्कळ त्रास सहन केला होता. त्याने मला त्या संध्याकाळी सभेला यायला सांगितलं. तिथं जे काही चाललं होतं त्यातलं बहुतेक तर माझ्या डोक्यावरूनच गेलं, पण जेव्हा सर्वांनी हात वर केले तेव्हा मी माझ्या शेजारी बसलेल्याला विचारलं की त्यांनी हात वर का केले आहेत. तो म्हणाला: “हे सर्व जण पुढच्या आठवडी डंकरक्यूला प्रचाराला जाऊ शकतात.” मी त्याला विचारलं, “मीपण येऊ?” तो म्हणाला: “हो, ये.” मग, पुढील रविवारी मी घरोघरच्या प्रचाराला गेलो. आम्हाला भेटलेल्या सर्वांनाच आमचं बोलणं पटलं नाही, पण मला मात्र मजा आली, आणि मग मी नियमाने प्रचाराला जाऊ लागलो.
माझ्या तापट स्वभावावर नियंत्रण करण्यास शिकणे
काही दिवसांनी, स्वतंत्र झालेले जर्मन कैदी जिथं राहतात त्या बराकींत साक्षीदारांनी प्रचार चालू केला. हे इतकं सोपं नव्हतं, कारण, तापट स्वभावाचा म्हणून सगळे मला ओळखायचे. प्रचाराच्या वेळी कोणी माझं ऐकलं नाही, तर मी त्यांना सरळ धमकी द्यायचो, “सांभाळून राहा बरं, नाहीतर बघ मग.” एकदा, खाणीत काम करताना, एकानं यहोवाची टिंगल केली तेव्हा मी सरळ त्याला एक ठोसाच दिला.
पण यहोवाच्या मदतीनं मी माझ्या तापट स्वभावावर नियंत्रण करू शकलो. एकदा, या बराकींमध्ये प्रचार करताना दारू प्यायलेले काही लोक साक्षीदारांना त्रास देत होते. मला लगेच राग येतो हे माहीत असल्यामुळे माझ्याबरोबर असलेल्या बंधुंनी मला आवरण्याचा बराच प्रयत्न केला; पण त्या लोकांपैकी एकजण भांडायच्या तयारीनं माझ्यापुढे आला आणि आपला जॅकेट काढू लागला. मी माझ्या सायकलवरून उतरलो, त्याला माझी सायकल धरायला सांगितली आणि खिशात हात घालून उभा राहिलो. त्याला इतकं आश्चर्य वाटलं की, मला काय म्हणायचं होतं ते त्यानं ऐकून घेतलं. मी त्याला घरी जाऊन झोप आणि मग जाहीर भाषणाला ये असं सांगितलं. आणि तो संध्याकाळी बरोबर ३.०० वाजता आला! असंच, हळूहळू पूर्वी कैदी असलेल्या २० जणांनी संदेश स्वीकारला. माझा तर १९४८ च्या सप्टेंबर महिन्यातच बाप्तिस्मा झाला होता.
व्यस्त पण तरी प्रतिफळदायी
प्रचार जिथं करायचा होता ते क्षेत्र सांभाळायचं आणि जाहीर भाषणं जिथं देता येतात अशी ठिकाणं शोधायची जबाबदारी मला देण्यात आली. यासाठी मला, खाणींत शेवटच्या शिफ्टसाठी जाण्यापूर्वी केव्हा केव्हा माझ्या लहानशा मोटरसायकलवर ३० किलोमीटरपर्यंत जावं लागायचं. मग शनिवार-रविवारच्या जोडसुटीला आम्ही बसनं क्षेत्रात जात असू आणि स्पीकरबरोबर दोन किंवा तीन प्रचारकांना उतरवत असू. मोठमोठ्या गावात एखाद चांगलं ठिकाण दिसल्यावर आम्ही आमच्या सूटकेसस एकावर एक रचून ठेवायचो की झाला स्पीकर स्टॅण्ड. बहुतेकवेळा आम्ही ज्या जाहीर भाषणासाठी लोकांना आमंत्रण देत होतो त्याचं नाव असलेले सॅण्डवीच बोर्ड घालत असू.
सन १९५१ ची गोष्ट; मी रेईम्समधील साक्षीदार झॉनेट शोफरला भेटलो. ते आमचं प्रथमदर्शनी प्रेम होतं, आणि मे १७, १९५२ रोजी आम्ही विवाहबद्ध झालो. आम्ही डुए जवळ खाण असलेल्या गावात अर्थात पेकनकूर येथे राहायला गेलो. काही दिवसांनंतर माझी तब्येत बिघडू लागली. मला सिलिकोसिस असल्याचं सांगण्यात आलं; हा श्वसनसंस्थेचा एक आजार आहे जो खाणीत काम करणाऱ्यांना होतो; पण मला दुसरं कोणतं काम मिळत नव्हतं. म्हणून १९५५ साली जर्मनीच्या न्युरेम्बर्ग येथील एका आंतरराष्ट्रीय संमेलनाच्या वेळेस, ऱ्हाईनमधील एका लहानशा औद्योगिक शहरात म्हणजेच केलच्या लहानशा मंडळीला मदत करण्यास आम्हाला सांगितले. तिकडे जायला आम्हाला काही हरकत नव्हती. त्या वेळेस मंडळीत फक्त ४५ प्रचारक होते. या मंडळीबरोबर आम्ही सात वर्षांपर्यंत कार्य केले; आणि प्रचारकांची संख्या ९५ पर्यंत वाढली.
सेवेचे आणखी विशेषाधिकार
मंडळी पक्की झाली होती हे पाहिल्यावर आम्हाला खास पायनियर म्हणून फ्रान्सला पाठवावे अशी आम्ही संस्थेला विनंती केली. आम्हाला पॅरीसची नेमणूक मिळाली. तेथे घालवलेले आठ महिने अगदी आनंदात गेले. माझे आणि झॉनेटचे असे मिळून ४२ बायबल अभ्यास चालवण्याचा आम्हाला सुहक्क मिळाला. आम्ही तिथं होतो तेव्हा पाच विद्यार्थ्यांनी बाप्तिस्मा घेतला आणि ११ जणांनी नंतर सत्य स्वीकारले.
आम्ही लॅटिन क्वाटरमध्ये राहत असल्यामुळे सॉरबोनमधल्या प्राध्यापकांशी आमच्या नेहमी भेटी व्हायच्या. फेथ हिलिंग करणारा तत्त्वज्ञानाच्या एका निवृत्त प्राध्यापकाने बायबल अभ्यास चालू केला आणि शेवटी यहोवाचा साक्षीदार झाला. एकदा, मी जेसुईट शिक्षकांचा जवळचा मित्र असलेल्या एका सिविल इंजिनियरबरोबर बायबलवर चर्चा चालू केली. आमच्या घरी तो दुपारी तीनला आलेला रात्री दहा वाजता गेला. आणि एक दीड तासांनंतर तो पुन्हा आला तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटले. तो एका जेसुईटबरोबर बोलला पण बायबल भविष्यवाणींबद्दलच्या त्याच्या प्रश्नांना तो उत्तरं देऊ शकला नाही. पहाटे एक वाजता तो घरी गेला आणि सात वाजता पुन्हा आला. काही काळानं तोही यहोवाचा साक्षीदार झाला. सत्याबद्दल अशाप्रकारची तहान पाहून आम्हा पतीपत्नीला खूप उत्तेजन मिळालं.
पॅरिसमध्ये सेवा केल्यानंतर मला फ्रान्सच्या पूर्वेस प्रवासी पर्यवेक्षक म्हणून सेवा करण्यास बोलावण्यात आलं. फ्रेन्च आणि जर्मन बोलणाऱ्या मंडळ्यांना भेटी देऊन तेथील बांधवांना बळकट करायला आम्हाला खूप आनंद वाटला. लोरेनमधील रोमबास मंडळीला भेट देताना मी स्टॅनिस्लास ॲम्ब्रोशॉक यांना भेटलो. ते पोलंडचे होते व युद्धाच्या वेळी एका मित्र राष्ट्राच्या पाणबुडीवर त्यांनी काम केलं होतं आणि नॉर्वेजियन समुद्रावर ते लढले होते. आणि त्याच समुद्राच्या विरुद्ध बाजूला आम्ही होतो. परंतु आता आम्ही आमचा देव यहोवा याची एकत्र मिळून सेवा करीत होतो. पॅरिसमध्ये एका संमेलनात मला एक ओळखीचा चेहरा दिसला. मी फ्रान्सच्या उत्तरेकडे कैदी म्हणून होतो तेव्हा तो छावणीचा कमांडर होता. अधिवेशनात एकत्र काम करायला आम्हाला किती आनंद झाला! देवाच्या वचनात इतके सामर्थ्य आहे की ते पूर्वी शत्रू असलेल्यांना जवळचे मित्र बनवते!
पण मग १४ वर्षांपासून मी करत असलेले प्रवासी कार्य माझ्या ढासळत चाललेल्या तब्येतीमुळे मला थांबवावं लागलं. पण होता होईल तितकी यहोवाची सेवा करीत राहण्याचा आम्हा पतीपत्नीचा निश्चय होता. त्यासाठी आम्ही फ्रान्सच्या पूर्वेस मलहाऊसच्या शहरात घर आणि नोकरी पाहिली आणि पायनियर (पूर्ण वेळेचे सुवार्तिक) बनलो.
आणखी एक आनंद जो मला लाभला तो म्हणजे राज्य सभागृहांच्या बांधकामात माझा सहभाग. सन १९८५ मध्ये पूर्व फ्रान्ससाठी एक कन्स्ट्रक्शन टीम बनवण्यासाठी मला सांगण्यात आलं. कुशल व्यापाऱ्यांचा उपयोग करून व इच्छुक स्वयंसेवकांना प्रशिक्षण देऊन आम्ही एक टीम बनवू शकलो जिने ८० पेक्षा अधिक सभागृहांच्या बांधकामात अथवा नूतनीकरणात भाग घेतला आहे. सन १९९३ मध्ये मला दक्षिण अमेरिकेच्या फ्रेन्च गियाना येथे एक संमेलनगृह आणि पाच राज्य सभागृहांच्या बांधकामात सहभाग मिळाला म्हणून आनंद वाटतो.
परिक्षांतही पुढे जाणे
मी हे अगदी खात्रीने सांगू शकतो की ईश्वरशासित कार्याची गेली ५० वर्षे आनंदात गेली आहेत; या वर्षांत अनेक सुहक्क देखील मला मिळाले. माझ्याबरोबर ४३ वर्षे संसार केलेल्या माझ्या प्रिय पत्नीचं १९९५ च्या डिसेंबर महिन्यात निधन झालं तेव्हा मला खूप दुःख झालं. आजही मी ते दुःख विसरलेलो नाही तरी, यहोवा मला शक्ती देतो आणि काळाच्या ओघात माझं दुःख विसरण्याकरता माझ्या आध्यात्मिक बंधूभगिनींनीसुद्धा मला प्रेम आणि आधार दिला आहे.
मला १९६३ मध्ये जर्मनीच्या म्युनिक येथील एका संमेलनात एका अभिषिक्त बांधवानं काय म्हटलं होतं ते आजही मला आठवतं. ते मला म्हणाले होते: “ॲन्ड्रे, इकडे तिकडे पाहू नकोस. छळछावण्यांतील बांधवांवर अनेक परिक्षा आल्या. पण पुढं चालत राहणं हे आपल्यावर आहे. आपण स्वतःवर इतकी दया करू नये. पुढं चालत राहा!” हे मी नेहमी माझ्या मनात ठेवलं. माझी तब्येत चांगली नसल्यामुळे व वाढत्या वयामुळे मी जास्त करू शकत नसलो तरी इब्री लोकांस ६:१० मधील शब्दांतून मला सांत्वन मिळते; तेथे म्हटले आहे: ‘तुमचे कार्य व त्याच्या नावासाठी तुम्ही दाखवलेली प्रीती विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.’ होय, यहोवाची सेवा करणे हा महान सुहक्क आहे जो कोणालाही मिळू शकतो. गेल्या ५० वर्षांपासून, ‘लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला कामकरी’ असण्याचे माझे ध्येय होते व आजही आहे.—२ तीमथ्य २:१५.
[२२ पानांवरील चित्र]
नॉर्वेच्या खाडीत काम करताना मी अशाप्रकारच्या बोटींवर होतो
[२३ पानांवरील चित्र]
उत्तरेकडील फ्रान्समध्ये सायकलवर प्रचार करताना
[२३ पानांवरील चित्र]
एकावर एक ठेवलेल्या सूटकेसेस स्पीकरचा स्टॅण्ड होता
[२४ पानांवरील चित्रं]
माझी पत्नी झॉनेट, १९५२ मध्ये आमच्या लग्नाच्या वेळी