“तुमची अंतःकरणे दृढ करा”
“तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागून वचनानुसार फलप्राप्ति करून घ्यावी, म्हणून तुम्हाला सहनशक्तीचे अगत्य आहे.”—इब्री लोकांस १०:३६.
१, २. (अ) पहिल्या शतकातील अनेक ख्रिश्चनांच्या बाबतीत काय झाले होते? (ब) विश्वास कमजोर होणे इतके सोपे का आहे?
सर्व बायबल लेखकांपैकी, प्रेषित पौलाने जितक्यांदा विश्वासाचा उल्लेख केला तितका कोणीही केला नाही. ज्यांचा विश्वास कमी झाला होता किंवा नाहीसा झाला होता अशांविषयी तो अनेकदा बोलला. जसे की, हुमनाय व आलेक्सांद्र यांचे “विश्वासरूपी तारू फुटले” असे तो म्हणाला. (१ तीमथ्य १:१९, २०) देमासला “ऐहिक सुख प्रिय असल्यामुळे” तो पौलाला सोडून गेला. (२ तीमथ्य ४:१०) काहींनी त्यांच्या अख्रिस्ती, बेजबाबदार कृत्यांद्वारे “विश्वास नाकारला.” इतर लोक खोट्या ज्ञानाने बहकल्यामुळे ते “विश्वासापासून ढळले.”—१ तीमथ्य ५:८; ६:२०, २१.
२ हे अभिषिक्त ख्रिस्ती अशाप्रकारे उणे का पडले? “विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खातरी आहे.” (इब्री लोकांस ११:१) आपल्याला जे दिसत नाही त्यावर आपण विश्वास करतो. दिसणाऱ्या वस्तूंसाठी आपल्याला विश्वास लागत नाही. अदृश्य आध्यात्मिक संपत्तीपेक्षा दृश्य संपत्तीसाठी कार्य करणे सोपे आहे. (मत्तय १९:२१, २२) आपल्या अपरिपूर्ण शरीराला पुष्कळ दृश्य गोष्टींचे—जसे की “देहाची वासना, डोळ्यांची वासना”—यांचे आकर्षण वाटते आणि त्या गोष्टी आपला विश्वास कमजोर करू शकतात.—१ योहान २:१६.
३. एखाद्या ख्रिश्चनाने कोणत्या प्रकारचा विश्वास विकसित केला पाहिजे?
३ तरीपण पौल म्हणतो, की “देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे.” मोशेचा असा विश्वास होता. “त्याची दृष्टी प्रतिफळावर होती” व “जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला.” (इब्री लोकांस ११:६, २४, २६, २७) ख्रिश्चनांकडे अशाप्रकारचा विश्वास असायला हवा. या बाबतीत, मागील लेखात उल्लेख केल्याप्रमाणे अब्राहामाचे उत्तम उदाहरण आपल्यापुढे आहे.
अब्राहामाचे विश्वासाविषयी उदाहरण
४. अब्राहामाच्या विश्वासाचा परिणाम त्याच्या जीवनावर कसा झाला होता?
४ सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील अशा एका वंशाचा अब्राहाम पिता होणार असल्याचे अभिवचन देवाने त्याला ऊर देशात दिले होते. (उत्पत्ति १२:१-३; प्रेषितांची कृत्ये ७:२, ३) त्या अभिवचनाच्या आधारावर अब्राहामाने यहोवाची आज्ञा पाळली आणि पहिल्यांदा तो हारानास आणि मग कनानास राहायला गेला. तेथे, यहोवाने अब्राहामाला अभिवचन दिले की तो देश त्याच्या संतानाला दिला जाईल. (उत्पत्ति १२:७; नहेम्या ९:७, ८) परंतु, यहोवाने ज्याचे अभिवचन दिले होते त्यातील बहुतेक अब्राहामाच्या मृत्यूनंतर पूर्ण व्हायचे होते. जसे की, कबरस्थान म्हणून त्याने विकत घेतलेल्या मकपेलाची गुहा याव्यतिरिक्त कनानमधील कोणतीही जमीन अब्राहामाच्या मालकीची नव्हती. (उत्पत्ति २३:१-२०) तरीपण त्याने यहोवाच्या वचनावर विश्वास ठेवला. एवढेच नव्हे तर त्याचा भवितव्यातील ‘पाये असलेल्या व देवाने योजलेल्या व बांधलेल्या नगरावर’ विश्वास होता. (इब्री लोकांस ११:१०) या विश्वासाने त्याला त्याच्या संपूर्ण जीवनभर टिकवून ठेवले होते.
५, ६. यहोवाच्या अभिवचनासंबंधाने अब्राहामाच्या विश्वासाची परीक्षा कशी घेण्यात आली होती?
५ अब्राहामाचे संतान एक मोठे राष्ट्र बनेल या अभिवचनासंबंधी हे खासकरून दिसून येते. हे अभिवचन साकार होण्यासाठी, अब्राहामाला पुत्र असावयास हवा होता; आणि पुत्र मिळावा म्हणून तो कितीतरी वेळ थांबून होता. देवाने त्याला पहिल्यांदा वचन दिले तेव्हा तो किती वर्षांचा होता हे आपल्याला माहीत नाही परंतु तो लांबचा प्रवास करून हारानला आला होता तरीसुद्धा अद्याप यहोवाने त्याला पुत्र दिला नव्हता. (उत्पत्ति ११:३०) ‘मालमत्ता आणि माणसे’ मिळवण्याइतपत तरी तो हारान येथे होता आणि तो जेव्हा कनानास गेला तेव्हा तो ७५ वर्षांचा होता आणि सारा ६५ वर्षांची होती. अजूनपर्यंत तरी त्यांना पुत्र नव्हता. (उत्पत्ति १२:४, ५) सारा जेव्हा सत्तरीच्या मध्यात पोहंचली तेव्हा तिला वाटले, की ती आता अब्राहामाला पुत्र देऊ शकणार नाही. म्हणून, त्या काळच्या रीतीनुसार तिने आपली दासी हागार हिला अब्राहामाला दिले आणि तिच्याद्वारे त्याला एक पुत्र झाला. परंतु हा पुत्र वचनयुक्त संतान नव्हता. कालांतराने हागार आणि तिच्या मुलाला पाठवण्यात आले. तरी, अब्राहामाने जेव्हा त्यांच्यावतीने विनंती केली तेव्हा यहोवाने इश्माएलला आशीर्वाद देण्याचे वचन दिले.—उत्पत्ति १६:१-४, १०; १७:१५, १६, १८-२०; २१:८-२१.
६ देवाच्या नियुक्त समयी, अर्थात अब्राहाम आणि सारा यांनी पहिल्यांदा अभिवचन ऐकले त्याच्या कित्येक वर्षांनंतर, शंभरी गाठलेल्या अब्राहामाला आणि ९० वर्षांच्या साराला इसहाक झाला. काय आनंद झाला असेल त्यांना! या वयोवृद्ध जोडप्याच्या “निर्जीव” शरीरातून जेव्हा नवीन जीव उत्पन्न झाला तेव्हा आपले जणू पुनरुत्थान झाल्यासारखे त्यांना वाटले असेल. (रोमकर ४:१९-२१) त्यांना बराच काळ थांबून राहावे लागले, पण जेव्हा अभिवचनाची पूर्णता झाली तेव्हा थांबून राहिल्याचा त्यांना फायदाच झाला होता.
७. विश्वासाचा सहनशीलतेशी संबंध कसा आहे?
७ विश्वास अल्प समयासाठी नसावा याची आठवण अब्राहामाचे उदाहरण करून देते. पौलाने विश्वासाला सहनशीलतेबरोबर जोडले; तो म्हणाला: “तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागून वचनानुसार फलप्राप्ति करून घ्यावी, म्हणून तुम्हाला सहनशक्तीचे अगत्य आहे. . . . परंतु ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्यांपैकी आपण नाही; तर जिवाच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहो.” (इब्री लोकांस १०:३६-३९) अभिवचनाची पूर्णता व्हावी म्हणून पुष्कळ जण दीर्घकाळ थांबून राहिले आहेत. काही जण तर त्यांच्या संपूर्ण आयुष्यभर थांबून राहिले आहेत. त्यांच्या दृढ विश्वासाने त्यांना टिकवून ठेवले आहे. आणि अब्राहामाप्रमाणे, त्यांनाही यहोवाच्या नियुक्त समयी प्रतिफळ मिळेल.—हबक्कूक २:३.
देवाचे ऐकणे
८. आज आपण देवाचे कोणत्या माध्यमाद्वारे ऐकतो व त्याने आपला विश्वास दृढ का होईल?
८ चार अशा गोष्टी होत्या ज्यांनी अब्राहामाचा विश्वास बळकट केला आणि त्या आपलीही मदत करू शकतात. पहिली गोष्ट, यहोवा जेव्हा त्याच्याबरोबर बोलला तेव्हा त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊन त्याने ‘देव आहे,’ हे दाखवले. अशाप्रकारे, यिर्मयाच्या दिवसांतील यहुद्यांपासून तो वेगळा ठरला; यहोवा आहे असा या यहुद्यांचा विश्वास होता परंतु त्याच्या वचनावर त्यांचा विश्वास नव्हता. (यिर्मया ४४:१५-१९) आज यहोवा त्याचे प्रेरित वचन बायबलद्वारे आपल्याशी बोलतो; ते ‘काळोख्या जागी अर्थात आपल्या अंतःकरणात प्रकाशणाऱ्या दिव्याप्रमाणे’ असल्याचे पेत्राने म्हटले. (२ पेत्र १:१९) आपण लक्षपूर्वक बायबलचे वाचन करतो तेव्हा ‘विश्वासाच्या वचनांनी आपले पोषण’ होते. (१ तीमथ्य ४:६; रोमकर १०:१७) शिवाय, या शेवटल्या दिवसांत, ‘विश्वासू व बुद्धिमान दास’ “यथाकाळी” आध्यात्मिक अन्न अर्थात बायबल तत्त्वे लागू करण्यासंबंधी आणि बायबल भविष्यवाणीच्या समजेसंबंधी मार्गदर्शन देत आहे. (मत्तय २४:४५-४७) या माध्यमाद्वारे यहोवाचे ऐकणे आपला विश्वास दृढ करण्याकरता अत्यावश्यक आहे.
९. ख्रिस्ती आशेवर आपण खरोखर विश्वास ठेवल्यास काय होईल?
९ अब्राहामाच्या विश्वासाचा त्याच्या आशेशी जवळचा संबंध होता. “त्याने ‘बहुत राष्ट्रांचा बाप’ व्हावे म्हणून आशेला जागा नसताहि त्याने आशेने विश्वास ठेवला.” (रोमकर ४:१८) आपले साहाय्य करू शकणारी ही दुसरी मदत आहे. यहोवा “त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे,” ही गोष्ट आपण केव्हाही विसरता कामा नये. प्रेषित पौल म्हणाला: “आम्ही श्रम व खटपट करितो; कारण . . . जिवंत देवावर आम्ही आशा ठेविली आहे.” (१ तीमथ्य ४:१०) आपण ख्रिस्ती आशेवर खरोखरच विश्वास ठेवला तर अब्राहामाप्रमाणे आपल्या जीवनमार्गावरून आपला विश्वास प्रकट होईल.
देवाबरोबर बोलणे
१०. कोणत्या प्रकारची प्रार्थना आपला विश्वास दृढ करील?
१० अब्राहामाचा विश्वास बळकट करणारी तिसरी गोष्ट म्हणजे तो देवाबरोबर बोलला. आज आपणही आपल्याला मिळालेल्या प्रार्थनेच्या देणगीचा उपयोग करून येशू ख्रिस्ताद्वारे यहोवाबरोबर बोलू शकतो. (योहान १४:६; इफिसकर ६:१८) निरंतर प्रार्थना करण्याच्या आवश्यकतेवर जोर देणारा एक दृष्टांत सांगितल्यानंतरच येशूने हा प्रश्न विचारला होता की: “मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय?” (लूक १८:८) विश्वास-वर्धक प्रार्थना अविचारी किंवा आपोआप केली जाणारी नसते. ती अगदी अर्थपूर्ण असते. जसे की, आपल्याला महत्त्वपूर्ण निर्णय करावे लागतात तेव्हा किंवा आपल्यावर खूपच दबाव असतो तेव्हा मनापासून प्रार्थना करणे अतिशय आवश्यक आहे.—लूक ६:१२, १३; २२:४१-४४.
११. (अ) अब्राहामाने यहोवापुढे आपले मन मोकळे केले तेव्हा त्याचा विश्वास मजबूत कसा झाला? (ब) आपण अब्राहामाच्या अनुभवातून काय शिकू शकतो?
११ अब्राहाम म्हातारा होत चालला होता आणि यहोवाने अजूनतरी त्याला वचनयुक्त संतान दिले नव्हते तेव्हा त्याला लागून राहिलेल्या काळजीबद्दल तो देवाशी बोलला. यहोवाने त्याला दिलासा दिला. याचा परिणाम? अब्राहामाने “परमेश्वरावर विश्वास ठेविला आणि अब्रामाचा हा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्त्व गणिला.” मग यहोवाने त्याला दिलेल्या दिलाशाला पुष्टी देण्याकरता त्याला एक चिन्ह दिले. (उत्पत्ति १५:१-१८) आपण प्रार्थनेद्वारे यहोवाकडे आपले मन मोकळे केले, त्याचे वचन बायबल यांतील त्याचे दिलासा देणारे शब्द स्वीकारले आणि पूर्ण विश्वासाने त्याच्या आज्ञेत राहिलो तर यहोवा आपला विश्वास देखील बळकट करील.—मत्तय २१:२२; यहूदा २०, २१.
१२, १३. (अ) यहोवाच्या मार्गदर्शनाचे अनुसरण केल्यावर अब्राहामाला कशाप्रकारे आशीर्वादित करण्यात आले? (ब) कोणत्या प्रकारचे अनुभव आपला विश्वास मजबूत करू शकतील?
१२ अब्राहामाचा विश्वास बळकट करणारी चौथी गोष्ट म्हणजे, अब्राहामाने यहोवाच्या निर्देशनांचे अनुकरण केले तेव्हा यहोवाने त्याला आधार दिला. अब्राहाम आक्रमण करणाऱ्या राजांपासून लोटला वाचवायला गेला तेव्हा यहोवाने त्याला विजय मिळवून दिला. (उत्पत्ति १४:१६, २०) आपल्या संतानाला वारस म्हणून मिळणाऱ्या देशात अब्राहाम तात्पुरत्या रहिवाशासारखा राहिला तेव्हा यहोवाने त्याला संपन्न केले. (पडताळा उत्पत्ति १४:२१-२३.) इसहाकासाठी योग्य पत्नी शोधताना यहोवाने अब्राहामाच्या सेवकाला मार्गदर्शन केले. (उत्पत्ति २४:१०-२७) होय, यहोवाने “अब्राहामाला सर्व बाबतीत आशीर्वादित केले.” (उत्पत्ति २४:१) यामुळे त्याचा विश्वास इतका बळकट झाला व तो यहोवा देवाच्या इतक्या समीप आला की यहोवाने त्याला “माझा मित्र” असे संबोधले.—यशया ४१:८; याकोब २:२३.
१३ आज आपलाही विश्वास असा मजबूत होऊ शकतो का? होय. आपणही अब्राहामाप्रमाणे, यहोवाच्या सर्व आज्ञांचे पालन करून त्याची परिक्षा पाहिल्यास, तो आपल्यालाही आशीर्वादित करील आणि आपला विश्वास बळकट करील. उदाहरणार्थ, १९९८ च्या सेवा वर्ष अहवालाकडे एक नजर टाकल्यावर आपल्याला दिसून येईल की सुवार्तेचा प्रचार करण्याविषयी त्याने दिलेल्या आज्ञांचे पालन करणाऱ्या अनेकांना त्याने किती अद्भुतरीत्या आशीर्वादित केले आहे.—मार्क १३:१०.
आज विश्वासाचा अहवाल
१४. राज्य वार्ता क्र. ३५ च्या मोहिमेवर यहोवाने आशीर्वाद कसा दिला?
१४ सन १९९७ च्या ऑक्टोबरमध्ये, राज्य वार्ता क्र. ३५ चे वितरण करण्याची मोहीम, लक्षावधी साक्षीदारांच्या आवेशामुळे व जोमामुळे उल्लेखनीयरीत्या यशस्वी ठरली. घानामध्ये जे घडले ते खरोखरच खास आहे. सुमारे २.५ कोटी प्रतींचे चार भाषांत वितरण करण्यात आले आणि यामुळे जवळजवळ २,००० बायबल अभ्यासांसाठी विनंती करण्यात आली. सायप्रसमध्ये राज्य वार्ताचे वितरण करणाऱ्या दोन साक्षीदारांच्या लक्षात आले, की एक पाळक त्यांच्या मागे मागे येत होता. काही वेळानंतर त्यांनी त्याला राज्य वार्ता दिली. पण त्याच्याकडे ती आधीच होती व तो म्हणाला: “मला यातील संदेश इतका आवडला आहे की ज्यांनी ही पत्रिका काढली आहे त्यांचं मला अभिनंदन करायचं आहे.” डेन्मार्कमध्ये, राज्य वार्ताच्या १.५ कोटी प्रती वितरीत करण्यात आल्या; चांगला परिणाम दिसून आला. जनसंपर्क कार्यालयात कार्य करणाऱ्या एका स्त्रीने म्हटले: “या हस्तपत्रिकेत सर्वांसाठी संदेश आहे. तो समजण्यास सोपा आहे; तो मनाला भिडतो, आणखी माहीत करून घेण्याची इच्छा तुमच्यामध्ये निर्माण करतो. तो नेम अगदी निशाण्यावरच लागतो.”
१५. सर्व लोकांपर्यंत पोहंचण्याकरता केलेल्या प्रयत्नांवर यहोवाने आशीर्वाद दिला हे कोणते अनुभव दाखवतात?
१५ सन १९९८ मध्ये लोकांना फक्त त्यांच्या घरीच नव्हे तर जेथे कोठे ते भेटतील तेथे त्यांना प्रचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कोट डी आयव्हरी मध्ये एका मिशनरी जोडप्याने धक्क्यावरील ३२२ जहाजांना भेटी दिल्या. त्यांनी २४७ पुस्तके, २,२८४ नियतकालिके, ५०० पत्रिका, शेकडो हस्तपत्रिका आणि नाविकांना समुद्रावर गेल्यावर व्हिडिओवर पाहण्यासाठी कॅसेट दिल्या. कॅनडामध्ये एक साक्षीदार मोटारीचे भाग जेथे बनवले जातात व दुरुस्त केले जातात अशा दुकानात गेला. दुकानाचा मालक आस्थेवाईक होता आणि बंधू तेथे साडेचार तास थांबला; पण गिऱ्हाईकांच्या वर्दळीमुळे या साडेचार तासांपैकी फक्त तासभरच वेळ मालकाबरोबर बोलायला मिळाला. शेवटी रात्री १०.०० वाजता मालकाबरोबर अभ्यास चालू करण्यात आला. कधीकधी असे व्हायचे की मध्यरात्रीपर्यंत अभ्यास चालू व्हायचा नाही आणि चालू झाल्यावर पहाटे दोन वाजेपर्यंत चालायचा. हे इतके सोपे नव्हते पण परिणाम मात्र चांगले होते. सभांना जाता यावे म्हणून मालकाने रविवारच्या दिवशी दुकान बंद ठेवायचे ठरवले. तो आणि त्याचे कुटुंब चांगली प्रगती करू लागले.
१६. अपेक्षा माहितीपत्रक आणि ज्ञान पुस्तक प्रचार आणि शिकवण्याच्या कार्यात प्रभावशाली साधने आहेत हे कोणत्या अनुभवांवरून दिसते?
१६ देव आपल्याकडून काय अपेक्षितो माहितीपत्रक आणि सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान पुस्तक हे प्रचार आणि शिकवण्याच्या कार्यात अजूनही शक्तिशाली साधने आहेत. इटलीमध्ये बससाठी थांबलेल्या एका ननने राज्य वार्ता स्वीकारली. दुसऱ्या दिवशी, पुन्हा एकदा तिची भेट घेऊन तिला अपेक्षा माहितीपत्रक देण्यात आले. त्यानंतरच्या प्रत्येक दिवशी १०-१५ मिनिटांसाठी बसस्टॉपवरच तिचा बायबल अभ्यास चालू झाला. दीड महिन्यांनंतर तिने, आपला अभ्यास जारी ठेवण्यासाठी कॉन्व्हेंट सोडून आपल्या घरी ग्वाटेमालाला जाण्याचे ठरवले. मलावीमध्ये चर्चला न चुकता जाणाऱ्या लोबिना नामक एका स्त्रीला, आपल्या मुली यहोवाच्या साक्षीदारांबरोबर बायबलचा अभ्यास करीत आहेत हे समजले तेव्हा तिला ते आवडले नाही. मुलींनी त्यांना जमेल तसे तिला बायबल सत्याविषयी सांगण्याचा प्रयत्न केला. जून १९९७ मध्ये लोबिनाने ज्ञान पुस्तक पाहिले आणि त्यावरील “नेणारे ज्ञान” हा शब्दप्रयोग पाहून तिची जिज्ञासा वाढली. जुलैमध्ये ती बायबलचा अभ्यास करायला तयार झाली. ऑगस्टमध्ये ती प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहिली आणि सर्व कार्यक्रम लक्षपूर्वक ऐकला. महिन्याच्या शेवटपर्यंत तिने चर्च पूर्णपणे सोडले आणि बाप्तिस्मा न घेतलेली एक प्रचारक झाली. नोव्हेंबर १९९७ मध्ये तिचा बाप्तिस्मा झाला.
१७, १८. संस्थेचे व्हिडिओ लोकांना आध्यात्मिक गोष्टी ‘पाहायला’ मदत मिळण्यास उपयुक्त कसे ठरले आहेत?
१७ संस्थेच्या व्हिडिओने अनेकांना आध्यात्मिक गोष्टी ‘पाहण्यास’ मदत केली आहे. मॉरिशसमध्ये एका मनुष्याने चर्चमधील मतभेद पाहून चर्च सोडून दिले होते. एका मिशनरी बांधवाने त्याला युनायटेड बाय डिवाईन टिचिंग नामक एक व्हिडिओ दाखवला ज्यात यहोवाच्या साक्षीदारांमधील ऐक्य दाखवण्यात आले आहे. प्रभावीत होऊन तो मनुष्य म्हणाला: “तुम्ही यहोवाचे साक्षीदार आताच परादीसमध्ये आहात!” तो बायबल अभ्यास करायला तयार झाला. जपानमधील एका बहिणीने सत्यात नसलेल्या तिच्या पतीला जेहोवाज विटनेसस—द ऑर्गनायझेशन बिहाईन्ड द नेम हा व्हिडिओ दाखवला तेव्हा तो नियमाने बायबल अभ्यास करण्यास प्रवृत्त झाला. युनायटेड बाय डिवाईन टिचिंग व्हिडिओ पाहिल्यावर तर आपणही यहोवाचा एक साक्षीदार झाले पाहिजे असे त्यास वाटू लागले. द बायबल—ए बुक ऑफ फॅक्ट ॲण्ड प्रॉफसी हा तीन भागांचा व्हिडिओ पाहिल्यावर त्याने बायबल तत्त्वे आपल्या जीवनात लागू करण्यास सुरवात केली. आणि जेहोवाज विटनेसस स्टॅन्ड फर्म अगेंस्ट नात्सी असॉल्ट या व्हिडिओद्वारे तो पाहू शकला की यहोवा आपल्या लोकांना सैतानाच्या हल्ल्यांविरुद्ध बळकट करतो. ऑक्टोबर १९९७ मध्ये या मनुष्याचा बाप्तिस्मा झाला.
१८ गेल्या सेवा वर्षांत अनेकांनी अनुभवलेल्या अनुभवांपैकी ही काही उदाहरणे आहेत. हे अनुभव दाखवतात, की यहोवाच्या साक्षीदारांचा विश्वास सक्रिय आहे आणि त्यांच्या कार्यांवर आशीर्वाद देऊन यहोवा त्यांचा विश्वास बळकट करीत आहे.—याकोब २:१७.
आज विश्वास विकसित करणे
१९. (अ) आपण अब्राहामापेक्षा चांगल्या परिस्थितीत कसे आहोत? (ब) येशूचा बलिदानरुपी मृत्यू साजरा करण्याकरता गेल्या वर्षी किती जण एकत्र जमले होते? (क) गेल्या वर्षी कोणत्या राष्ट्रांत स्मारक उपस्थिती उल्लेखनीय होती? (पृष्ठे १२ ते १५ वरील तक्ता पाहा.)
१९ आज आपण अनेक प्रकारे अब्राहामापेक्षा किती तरी पटीने चांगल्या परिस्थितीत आहोत. अब्राहामाला यहोवाने दिलेली सर्व अभिवचने पूर्ण केली हे आपल्याला माहीत आहे. अब्राहामाच्या संतानाला कनान देशाचा वारसा मिळाला आणि त्यांचे एक मोठे राष्ट्रसुद्धा बनले. (१ राजे ४:२०; इब्री लोकांस ११:१२) याशिवाय, अब्राहामाने हारान सोडून सुमारे १,९७१ वर्षांनंतर त्याच्या एका वंशाचा अर्थात येशूचा, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाद्वारे पाण्याने बाप्तिस्मा झाला आणि मग, पूर्ण व आध्यात्मिक अर्थाने अब्राहामाचे संतान अर्थात मशीहा होण्याकरता यहोवाद्वारे पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा झाला. (मत्तय ३:१६, १७; गलतीकर ३:१६) सा.यु. ३३ च्या निसान १४ रोजी येशूने, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांकरता आपले जीवन खंडणी बलिदान म्हणून अर्पण केले. (मत्तय २०:२८; योहान ३:१६) आता त्याच्याद्वारे कोट्यवधी लोक आशीर्वादित होऊ शकत होते. गेल्या वर्षी निसान १४ ला १,३८,९६,३१२ लोक प्रेमाचे हे अद्भुत कृत्य साजरे करण्याकरता जमले होते. अभिवचने पूर्ण करणाऱ्या महान यहोवाचे काय हे दोषनिवारण!
२०, २१. पहिल्या शतकात सर्व राष्ट्रांतील लोक अब्राहामाच्या संतानाद्वारे कसे आशीर्वादित झाले व आजही आशीर्वादित कसे होत आहेत?
२० पहिल्या शतकात, सर्व राष्ट्रांतील अनेकांनी—शारीरिक इस्राएलपासून—अब्राहामाच्या या संतानावर विश्वास ठेवला आणि ते देवाचे अभिषिक्त पुत्र, नवीन, ‘देवाच्या आध्यात्मिक इस्त्राएलचे’ सदस्य बनले. (गलतीकर ३:२६-२९; ६:१६; प्रेषितांची कृत्ये ३:२५, २६) देवाच्या राज्यात सहराजे म्हणून स्वर्गामध्ये अमर आत्मिक जीवनाची त्यांना पक्की आशा होती. केवळ १,४४,००० जणांनाच अशाप्रकारे आशीर्वाद मिळणार होता; त्यांतील फार कमी आता हयात आहेत. (प्रकटीकरण ५:९, १०; ७:४) गेल्या वर्षी या संख्येपैकी ८,७५६ लोकांनी, आपण त्या संख्येतील आहोत ही आपल्या विश्वासाची साक्ष स्मारकसोहळ्यात बोधचिन्हे खाण्याद्वारे दिली.
२१ आज यहोवाच्या साक्षीदारांतील बहुतेक जण प्रकटीकरण ७:९-१७ मध्ये भाकीत केलेल्या ‘मोठ्या लोकसमुदायाचे’ आहेत. येशूद्वारे ते स्वतःला आशीर्वादित मानत असल्यामुळे परादीस पृथ्वीवर त्यांना चिरकालिक जीवनाची आशा आहे. (प्रकटीकरण २१:३-५) १९९८ मध्ये प्रचार कार्यात भाग घेणाऱ्या ५८,८८,६५० जणांचा हा समुदाय खरोखरीच “मोठा” असल्याचे शाबीत होते. रशिया आणि युक्रेनमधील १,००,००० प्रचारकांना पहिल्यांदाच रिपोर्ट देताना पाहून खरोखरीच आनंद वाटतो. ऑगस्ट महिन्यात संयुक्त संस्थानातील १०,४०,२८३ प्रचारकांनी दिलेला रिपोर्ट देखील उल्लेखनीय आहे. १९ राष्ट्रांपैकी केवळ तीन राष्ट्रांचाच हा अहवाल आहे ज्यात गेल्या वर्षी १,००,००० पेक्षा अधिक प्रचारकांनी रिपोर्ट दिला होता.
लवकरच पूर्ण होणारी आशा
२२, २३. (अ) आज आपण आपली अंतःकरणे दृढ का केली पाहिजेत? (ब) आपण ज्यांचा विश्वास कमजोर होऊन नाहीसा झाला त्या पौलाने उल्लेखलेल्या लोकांप्रमाणे नव्हे तर अब्राहामासारखे कसे होऊ शकतो?
२२ स्मारकविधीला उपस्थित असलेल्यांना, आपण यहोवाच्या अभिवचनांच्या पूर्णतेत कोठवर आलो आहोत याची आठवण करून देण्यात आली होती. १९१४ साली येशू देवाच्या स्वर्गीय राज्याचा राजा बनल्यानंतर राज्यसत्तेतील त्याच्या उपस्थितीची सुरवात झाली. (मत्तय २४:३; प्रकटीकरण ११:१५) होय, अब्राहामाचे संतान आता स्वर्गात राज्य करीत आहे! याकोब त्याच्या दिवसांतील ख्रिश्चनांविषयी म्हणाला: “धीर धरा, आपली अंतःकरणे स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ आली आहे.” (याकोब ५:८) आणि ती उपस्थिती आता एक वास्तविकता बनली आहे! तेव्हा, आपण आपली अंतःकरणे आणखी दृढ करू शकतो!
२३ नियमित बायबल अभ्यास आणि अर्थपूर्ण प्रार्थना यांद्वारे देवाच्या अभिवचनांवरील आपला भरवसा सतत नवनवीन होवो. यहोवाच्या वचनांचे पालन करताना त्याच्या आशीर्वादांचा लाभ घेणे कधीही थांबवू नये. मग आपण, ज्यांचा विश्वास कमजोर होऊन नाहीसा झाला त्या पौलाने उल्लेखलेल्या लोकांप्रमाणे नव्हे तर अब्राहामासारखे होऊ. आपल्या परमपवित्र विश्वासापासून कोणीही आपल्याला वेगळे करू शकत नाही. (यहुदा २०) १९९९ सेवा वर्षादरम्यान आणि चिरकाललिक भवितव्यात यहोवाच्या सर्व सेवकांच्या बाबतीत असेच व्हावे ही सदिच्छा.
तुम्हाला माहीत आहे?
◻ आज आपण देवाचे कसे ऐकू शकतो?
◻ देवाला अर्थपूर्ण प्रार्थना केल्यावर कोणते लाभ प्राप्त होतात?
◻ आपण यहोवाच्या मार्गदर्शनांचे आज्ञापूर्वक अनुसरण केल्यास आपला विश्वास मजबूत कसा होईल?
◻ वार्षिक अहवालामधील (पृष्ठे १२ ते १५) कशाने तुमचे लक्ष वेधले?
[१२-१५ पानांवरील तक्ता]
यहोवाच्या साक्षीदारांचा १९९८ चा जगव्याप्त सेवा वर्ष अहवाल
(For fully formatted text, see publication.)
[१६ पानांवरील चित्र]
आपण यहोवाचे वचन ऐकल्यास त्याच्या अभिवचनांवरील आपला भरवसा नवनवीन होत राहील
[१८ पानांवरील चित्र]
सेवेत भाग घेतल्यावर आपला विश्वास मजबूत होतो