जेरोम—बायबलच्या अनुवाद क्षेत्रातील वादग्रस्त अग्रेसर
एप्रिल ८, १५४६ रोजी ट्रेंटच्या कायदेमंडळाने असा हुकूम दिला की, लॅटिन व्हल्गेटला “[कॅथोलिक] चर्चने मान्यता दिली असून . . . कोणत्याही कारणाने ते अमान्य करण्याची हिंमत अथवा धाडस कोणीही करू नये.” व्हल्गेट पूर्ण होऊन एक हजार वर्षे झाली होती तरी ते आणि त्याचा अनुवादक जेरोम कित्येक वर्षांपासून वादग्रस्त होते. जेरोम कोण होता? त्याच्याबद्दल आणि त्याच्या बायबलच्या अनुवादाबद्दल वाद का निर्माण झाला? आज त्याच्या साहित्याचा प्रभाव बायबलच्या अनुवादावर कसा पडतो?
विद्वान बनला कसा
जेरोमचे लॅटिन नाव होते युसिबियस हायरॉनमस. सध्याच्या ईटली आणि स्लोव्हेनिया सीमेजवळ, डॅल्मेशिया या रोमन प्रांतात स्ट्रीडॉन येथे सा.यु. ३४६ मध्ये त्याचा जन्म झाला.a त्याचे आईवडिल बऱ्यापैकी श्रीमंत होते आणि लहानपणीच त्याने श्रीमंतीचा फायदा अनुभवला होता कारण सुप्रसिद्ध व्याकरणकार डनेटस याच्याकडून त्याला रोममध्ये शिक्षण प्राप्त झाले होते. व्याकरण, साहित्यशास्त्र आणि तत्त्वज्ञान या विषयांमध्ये जेरोम अत्यंत वाकबगार होता. याच काळादरम्यान तो ग्रीकही शिकू लागला.
सा.यु. ३६६ मध्ये रोम सोडल्यावर, जेरोम वेगवेगळ्या ठिकाणी भटकत राहिला आणि शेवटी ईटलीतल्या आक्वलेआ येथे स्थित झाला; येथे प्रथमच वैरागी जीवनाशी त्याचा संबंध आला. संन्यासी जीवनाचे दृष्टिकोन त्याला आवडले आणि तो व त्याचे मित्र पुष्कळ वर्षे वैराग्यांसारखे राहिले.
सा.यु. ३७३ मध्ये एका अज्ञात कारणामुळे त्यांचा हा गट विभागला. या घटनेमुळे जेरोमचे डोळे उघडले आणि तो पूर्वेकडे भटकत भटकत बिथनिया मग गलेशिया मग सिलिसिया आणि शेवटी ॲन्टियोक, सिरिया येथे आला.
या लांबच्या प्रवासामुळे तो क्षीण झाला होता. त्याच्यात काहीच त्राण उरले नव्हते, त्याची प्रकृती फार खालावली होती आणि तापाने तर तो मरणालाच टेकला होता. आपल्या मित्राला त्याने एका पत्रात लिहिले, “प्रभू येशू ख्रिस्ताने मला तुझ्यापर्यंत चटकन पोस्त केले तर किती बरे होईल. खरे तर, कोणताही रोग नसताना फक्त दुबळेपणामुळे माझा नुसता सापळा झाला आहे.”
आजारपण, एकाकीपणा आणि मनःस्ताप हे सर्व तर होतेच पण त्याशिवाय जेरोमसमोर एक नवीनच संकटप्रसंग उभा ठाकला होता—आध्यात्मिक स्वरूपाचा. आपल्याला देवाच्या “न्यायासनापुढे फरफटत आणले जात” असल्याचे त्याने स्वप्नात पाहिले. तू कोण असे विचारले असता जेरोम म्हणाला: “मी एक ख्रिस्ती आहे.” पण तिथला अधिकारी खेकसला: “तू खोटे बोलत आहेस, तू सिसेरोचा अनुयायी आहेस, ख्रिस्ताचा नव्हे.”
तोपर्यंत, देवाच्या वचनाच्या अभ्यासाऐवजी त्याला मूर्तिपूजक साहित्याचा अभ्यास करण्याचा जास्त नाद होता. तो म्हणतो, “मला माझ्या विवेकाग्नीने फार यातना दिल्या.” आपली चूक सुधारण्यासाठी जेरोमने प्रार्थनेत अशी शपथ घेतली: “प्रभू मी पुन्हा कधी असली जगिक पुस्तके स्वतःजवळ ठेवली किंवा पुन्हा कधी ती पुस्तके वाचली तर मी तुला नाकारल्यासारखे होईल.”
नंतर, जेरोमने असा वाद घातला की स्वप्नात केलेल्या शपथेवरून त्याला जबाबदार ठरवता येऊ शकत नव्हते. पण, तरीही दिलेली शपथ पाळायचा त्याने ध्यास घेतला होता—निदान तत्त्वात तरी. म्हणून, जेरोमने ॲन्टीयोक सोडले आणि सिरीयाच्या वाळवंटात कॅल्सस येथे तो एकान्तवासात राहू लागला. तो संन्यासासारखा राहू लागला आणि बायबल आणि तत्त्ववेत्तीय साहित्याचा अभ्यास करण्यात गढून गेला. जेरोम म्हणाला: “आधी मानवांच्या पुस्तकांचा मी जितक्या आवेशाने अभ्यास करायचो त्यापेक्षा देवाच्या पुस्तकांचा जास्त आवेशाने मी आता अभ्यास करू लागलोय.” त्याने तेथील सिरियॅक भाषा देखील शिकून घेतली आणि ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या एका ज्यूच्या मदतीने तो इब्री भाषा शिकू लागला.
पोपकडून कामगिरी
जवळजवळ पाच वर्षे मठात राहिल्यावर जेरोम आपला अभ्यास पुढे चालू ठेवायला ॲन्टियोकला गेला. परंतु, तो परतून आला तेव्हा चर्चमध्ये फूट निर्माण झाली होती. तेथे वाळवंटात असतानाच, जेरोमने पोप डमॅससकडे सल्ला मागितला, तो म्हणाला: “चर्चचे तीन गट झाले आहेत, आणि प्रत्येक गट मला आपल्यात ओढण्याचा प्रयत्न करत आहे.”
कालांतराने, जेरोमने पॉलायनसशी संलग्न होण्याचे ठरवले; हाच पॉलायनस, ॲन्टीयोकच्या बिशप पदासाठी दावा केलेल्या तिघांपैकी एक होता. पॉलायनसकडून नियुक्त केले जाण्यासाठी जेरोमने दोन अटी मांडल्या. एक अट म्हणजे, मठवासी राहून स्वतःची ध्येये साध्य करण्यास त्याला मोकळीक हवी होती. आणि दुसरी अट ही की, एखाद्या विशिष्ट चर्चमधील कोणत्याही पाळकांच्या जबाबदाऱ्या त्याला नको होत्या.
सा.यु. ३८१ मध्ये, पॉलायनससोबत जेरोम कॉन्स्टंटीनोपलच्या कायदेमंडळात गेला आणि त्यानंतर रोमलाही त्याच्यासोबत गेला. पोप डमॅससने जेरोमची विद्वत्ता आणि भाषाविषयक प्रावीण्य लगेचच ताडले. एका वर्षातच, जेरोमला डमॅससचा खाजगी सचिव होण्याचा बहुमान मिळाला.
सचिव बनल्यावरही जेरोमने वादग्रस्त विषय टाळले नाहीत. उलट, वादग्रस्त विषयांना तो जणू आमंत्रणच द्यायचा. उदाहरणार्थ, पोपच्या राजवाड्यातही तो वैराग्यासारखाच राहात होता. एवढेच नव्हे, तर आपल्या साध्या राहणीमानाचा पुरस्कार करून शिवाय पाळकांच्या सुखविलासी जीवनपद्धतीबद्दल तिरस्काराने बोलून त्याने बऱ्याच जणांशी शत्रुत्व करून घेतले होते.
जेरोमची टीका करणारे लोक असतानाही पोप डमॅससकडून त्याला पूर्ण पाठिंबा होता. जेरोमला आपले बायबल संशोधन पुढे चालू ठेवण्याचे प्रोत्साहन देणे पोपला योग्य वाटत होते. त्यावेळी, बायबलच्या अनेक लॅटिन आवृत्ती वापरल्या जात होत्या. यांतील पुष्कळांचे अनुवाद हलगर्जीपणाने करण्यात आले असल्यामुळे त्यांच्यामध्ये काही ठळक चुका होत्या. डमॅससच्या मनात आणखी एक गोष्ट ही होती की, भाषेमुळे चर्चचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग होत होते. पूर्वेतल्या फार कमी लोकांना लॅटिन येत होती, तर पश्चिमेतल्या त्याहून कमी लोकांना ग्रीक येत होती.
म्हणून पोप डमॅससला शुभवर्तमान पुस्तकांचा एक सुधारित लॅटिन अनुवाद व्हावा असे वाटत होते. डमॅससला मूळ ग्रीकचा अचूक अर्थ देणारा पण तरीही लॅटिन भाषेत सुटसुटीत आणि स्पष्ट असा अनुवाद हवा होता. जेरोम त्या मोजक्या विद्वानांपैकी एक होता ज्याच्याकडे असा अनुवाद तयार करण्याची क्षमता होती. ग्रीक, लॅटिन आणि सिरीयॅक भाषांवर त्याचे प्रभुत्व होते आणि इब्री भाषेचे त्याला बऱ्यापैकी ज्ञान होते म्हणून या कामासाठी तो अगदी योग्य व्यक्ती होता. डमॅससने ही कामगिरी जेरोमवर सोपवल्यावर त्याने या कामाला सुरवात केली; त्यासाठी त्याला कमीत कमी २० वर्षे लागणार होती.
अधिकच वाद
शुभवर्तमानाच्या पुस्तकांचा अनुवाद जेरोमने जलदगतीने केला असला, तरी त्याची एक अस्खलित, विद्वत्तापूर्ण पद्धत होती. त्या वेळी उपलब्ध असलेल्या सर्व ग्रीक हस्तलिखितांची तुलना करून ग्रीक मजकुराशी होता होईल तितकी साम्यता असावी म्हणून त्याने लॅटिन मजकुराच्या मांडणीत आणि शब्दांतही सुधारणा केल्या.
जेरोमने ग्रीक सेप्ट्युजींट शास्त्रवचनांचा आधार घेऊन तयार केलेल्या स्तोत्रसंहितेच्या लॅटिन सुधारित आवृत्तीला जसा चांगला प्रतिसाद मिळाला त्याचप्रमाणे चार शुभवर्तमानांच्या त्याच्या अनुवादालाही बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. तरीपण, त्याच्यावर टीका करणारे तर होतेच. जेरोमने लिहिले, “काही तुच्छ लोक मुद्दामहून माझ्यावर असा आरोप करत आहेत की, मी पूर्वजांच्या अधिकाराविरुद्ध आणि बाकी सर्वांच्या मताविरुद्ध जाऊन शुभवर्तमानातील काही उताऱ्यांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला.” सा.यु. ३८४ मध्ये पोप डमॅससचा मृत्यू झाल्यावर तर असे दोषारोप अधिकच वाढले. नवीन पोपसोबत जेरोमचे मुळीच पटत नसल्यामुळे त्याने रोम सोडून जाण्याचा विचार केला. पुन्हा एकदा, जेरोम पूर्वेकडे निघाला.
इब्री भाषेचा विद्वान बनला कसा
सा.यु. ३८६ मध्ये जेरोम बेथलेहेम येथे स्थित झाला आणि आपले उर्वरित आयुष्य त्याने तेथेच घालवले. त्याच्यासोबत निष्ठावान अनुयायांचा एक गट होता आणि त्या गटात पाउला नावाची रोममधील एका कुलीन घराण्यातली श्रीमंत स्त्री देखील होती. जेरोमच्या प्रचारामुळे पाउलाने वैराग्य स्वीकारले होते. तिने दिलेल्या आर्थिक मदतीमुळे जेरोमच्या निर्देशनाखाली एक मठ स्थापण्यात आला. तेथे त्याने आपले साहित्यिक काम जारी ठेवले आणि त्याच्या आयुष्यातले सर्वात परिश्रमाचे काम पूर्ण केले.
पॅलेस्टाईनमध्ये राहत असल्यामुळे त्याला आपली इब्री भाषा सुधारण्याची संधी मिळाली. त्या भाषेतल्या काही कठीण गोष्टी समजावून घेण्यासाठी त्याने अनेक ज्यूईश खाजगी शिक्षकांकडे शिकवणी लावली. पण, या खाजगी शिक्षकांकडून शिकणेसुद्धा सोपे नव्हते. जेरोमने टायबेरियसचा बारानिनास या एका शिक्षकाबद्दल म्हटले: “बारानिनासला मला रात्रीच्या वेळी येऊन शिकवणी द्यायला तयार करायला खूप कठीण गेले आणि पैसाही खूप द्यावा लागला.” पण रात्रीच्या वेळी शिकवणी कशाला? कारण “ख्रिस्ती” व्यक्तीसोबत सहवास ठेवण्याविषयी यहुदी समाजाच्या विचाराची बारानिनासला भीती वाटत होती!
जेरोमच्या काळात, इब्री बोलणाऱ्या विदेशी लोकांना कंठस्वर नीट उच्चारता येत नसल्यामुळे ज्यू बहुधा त्यांची टीका करायचे. तरीसुद्धा, खूप प्रयत्नांनिशी जेरोमला या उच्चारांवर प्रभुत्व मिळवता आले. जेरोमने पुष्कळ इब्री शब्द लॅटिन लिपीतही लिहिले. यामुळे त्याला हे शब्द लक्षात ठेवायला मदत तर मिळालीच परंतु त्या काळाचा इब्री उच्चारही जपून ठेवता आला.
जेरोमबाबतीत सर्वात मोठा वाद
पोप डमॅससने जेरोमला बायबलच्या केवढ्या भागाचा अनुवाद करायला सांगितला हे काही स्पष्ट नाही. पण, या अनुवादाच्या कामाबद्दल जेरोमला किती महत्त्व वाटायचे याविषयी काहीच शंका नाही. जेरोमला त्याचे ध्येय स्पष्ट दिसत होते आणि तो फार करारीसुद्धा होता. “चर्चसाठी फायदेकारक आणि भावी पिढीसाठी उपयुक्त” ठरणारा अनुवाद आपण करावा ही त्याची उत्कट इच्छा होती. म्हणून त्याने सबंध बायबलचा एक सुधारित लॅटिन अनुवाद तयार करायचे ठरवले.
इब्री शास्त्रवचनांसाठी जेरोमला सेप्ट्युजींटचा आधार घेऊन अनुवाद करायचा होता. मुळतः, सा.यु.पू. तिसऱ्या शतकात इब्री शास्त्रवचनांचा ग्रीकमध्ये केलेला हा अनुवाद, थेट देवाकडून प्रेरित आहे असे अनेकांचे मत होते. म्हणून, त्या काळातील ग्रीक भाषिक ख्रिश्चनांमध्ये सेप्ट्युजींट अगदी सर्रास वापरले जात होते.
परंतु, पुढे पुढे जेरोमला त्या ग्रीक हस्तलिखितांमध्ये बरीच विसंगतता दिसून येऊ लागली, त्याला लॅटिनमध्ये आढळली होती तशीच. मग जेरोमला स्वस्थ बसवेना. शेवटी, तो या निष्कर्षावर येऊन पोचला की, एक विश्वस्त अनुवाद तयार करण्यासाठी त्याला ग्रीक हस्तलिखिते बाजूला सारावी लागतील—सेप्ट्युजींटसारख्या मानलेल्या अनुवादाकडेही दुर्लक्ष करून त्याला थेट मूळ इब्री शास्त्रवचनांचा आधार घ्यावा लागेल.
त्याच्या या निर्णयाने मोठा कल्लोळ माजला. जेरोम शास्त्रवचनांमध्ये भेसळ करणारा आहे, देवाची निंदा करणारा आहे, ज्यू लोकांची बाजू घेऊन चर्चच्या परंपरांचे उल्लंघन करणारा आहे अशी त्याची निंदा केली जाऊ लागली. त्या काळी चर्चचा सर्वात प्रमुख तत्त्ववेत्ता ऑगस्टीन याने देखील जेरोमला पुन्हा सेप्ट्युजींट वापरायला सुरवात करण्याची विनंती करत म्हटले: “जर पुष्कळ चर्चेसमध्ये तुमचा अनुवाद वापरण्यात येऊ लागला, तर लॅटिन चर्चेस आणि ग्रीक चर्चेसमध्ये वाचल्या जाणाऱ्या शास्त्रवचनांचा मजकूर भिन्न असेल ही अत्यंत खेदाची गोष्ट ठरेल.”
होय, ऑगस्टीनला याची भीती होती की, पश्चिम चर्चेस इब्री शास्त्रवचनांवर आधारित जेरोमच्या लॅटिन अनुवादाचा उपयोग करू लागले आणि पूर्वीय ग्रीक चर्चेस सेप्ट्यूजींट अनुवादच वापरत राहिले तर चर्चमध्ये विभाग होतील.b शिवाय, केवळ जेरोम ज्या अनुवादाचे समर्थन करू शकत होता अशा अनुवादासाठी सेप्ट्युजींटला बाजूला सारण्याविषयी ऑगस्टीनने शंका व्यक्त केली.
या विरोधकांमुळे जेरोमने काय केले? जेरोमने टीका करणाऱ्यांकडे लक्षच दिले नाही; त्याचा स्वभावच तसा होता. तो थेट इब्रीतूनच अनुवाद करत राहिला आणि सा.यु. ४०५ साली त्याचे लॅटिन बायबल पूर्ण झाले. पुष्कळ वर्षांनंतर त्याच्या अनुवादाला व्हल्गेट हे नाव दिले गेले, त्याचा अर्थ सर्वांनी स्वीकारलेली आवृत्ती असा होतो (लॅटिन व्हल्गेटस म्हणजे, “सर्वसामान्य, लोकप्रिय असलेले”).
कायमस्वरूपी कार्यसिद्धी
इब्री शास्त्रवचनांचा जेरोमचा अनुवाद म्हणजे तेव्हाच्या शास्त्रवचनांची केवळ सुधारित आवृत्ती नव्हती. त्यामुळे पुढच्या पिढीसाठी बायबलच्या अभ्यासाची आणि अनुवादाची दिशाच बदलली. इतिहासकार विल ड्यूरंट म्हणतात, “व्हल्गेट, चवथ्या शतकाची सर्वात मोठी आणि प्रभावशाली साहित्यिक कार्यसिद्धी ठरली आहे.”
जेरोमची भाषा मार्मिक आणि स्वभाव भांडखोर असला, तरी बायबल संशोधनाला पुन्हा एकदा प्रेरित इब्री शास्त्रवचनांकडे वळवण्याचे काम त्याने एकट्याने साध्य केले. अगदी बारकाईने त्याने बायबलच्या प्राचीन इब्री आणि ग्रीक हस्तलिखितांचा अभ्यास आणि तुलना केली; ती हस्तलिखिते आज आपल्याजवळ नाहीत. ज्यूईश मॅसोरेट्सच्याही आधीचे त्याचे साहित्य आहे. म्हणूनच, बायबलमधील शास्त्रवचनांच्या पर्यायी अनुवादांची तुलना करण्यासाठी व्हल्गेट अत्यंत मौल्यवान संदर्भ आहे.
देवाच्या वचनाचे चाहते बायबलच्या अनुवाद क्षेत्रातल्या या वादग्रस्त अग्रेसराच्या मेहनतीची प्रशंसा करू शकतात, अर्थात याचा अर्थ त्याच्या विचित्र स्वभावाकडे किंवा धार्मिक मतांकडे दुर्लक्ष करावे असे नाही. शिवाय, जेरोमने आपले ध्येय साध्य केलेच—त्याने “भावी पिढीसाठी उपयुक्त” ठरणारा अनुवाद खरोखर तयार केला.
[तळटीपा]
a जेरोमच्या जीवनातल्या तारखा आणि घटनाक्रमांवर सर्वच इतिहासकारांचे सहमत नाही.
b परिणामस्वरूप, पश्चिम ख्रिस्ती धर्मजगतात जेरोमचा अनुवाद मूळ बायबल म्हणून वापरले जाऊ लागले, तर पूर्व ख्रिस्ती धर्मजगतात आजही सेप्ट्यूजींटचाच वापर केला जातो.
[२८ पानांवरील चित्र]
बेथलेहेम येथे जेरोमचा पुतळा
[Credit Line]
Garo Nalbandian
[Picture Credit Lines on page 26]
वरती डावीकडे, इब्री हस्तलिखित: Courtesy of the Shrine of the Book, Israel Museum, Jerusalem; खाली डावीकडे, सिरियॅक हस्तलिखित: Reproduced by kind permission of The Trustees of the Chester Beatty Library, Dublin; वरती मध्यावर, ग्रीक हस्तलिखित: Courtesy of Israel Antiquities Authority