सत्याहून आणखीन चांगलं काय असेल
जी. एन. फॉन डर बेल यांचे कथन
वर्ष १९४१ च्या जून महिन्यात मला गेस्टापोंच्या हवाली करून जर्मनी येथील बर्लिन शहराजवळील सॅक्सेनहाउसन नावाच्या एका छळ छावणीत नेण्यात आलं. १९४५ सालच्या एप्रिल महिन्यातील कुविख्यात डेथ मार्चपर्यंत (मृत्यू पदयात्रा) मी कैदी नंबर ३८१९० म्हणून तिथंच होतो. पण, ते सारं सांगण्याआधी मी कैदी कसा झालो ते मला आधी सांगू द्या.
माझा जन्म १९१४ साली पहिलं महायुद्ध सुरू झालं, त्याच्या थोड्याच काळानंतर रॉटरडॅम, नेदरलँड्स इथं झाला. वडील रेल्वेत कामाला असल्यामुळे आमचं छोटेसं क्वार्टर रेल्वे ट्रॅकच्या जवळच होतं. १९१८ साली युद्ध संपण्याच्या बेतात होतं तेव्हा मी कितीतरी खास संकटकालीन रेलगाड्या आमच्या घरासमोरून धावताना पाहिल्या असतील. या गाड्यांतून नक्कीच असंख्य जखमी सैनिकांना आघाडीवरून त्यांच्या घरी नेले जात असावे.
बारा वर्षांचा असताना मी नोकरी करण्यासाठी शाळा सोडली. आठ वर्षांनी एका प्रवासी जहाजावर कारभाऱ्याची नोकरी पत्करली आणि पुढची चार वर्षं नेदरलँड्स आणि युनायटेड स्टेट्स यांच्यादरम्यान समुद्र प्रवास करण्यात गेली.
आमचं जहाज १९३९ सालच्या उन्हाळ्यात न्यूयॉर्कच्या बंदरावर येऊन थांबलं; एव्हाना दुसऱ्या महायुद्धाचे रंग दिसू लागले होते. अशात, एका माणसानं जहाजावर येऊन मला एका न्यायप्रिय सरकाराविषयी सांगणारं सरकार (इंग्रजी) नावाचं पुस्तक दिलं तेव्हा मी ते आनंदानं स्वीकारलं. समुद्रावरील जीवन आता पूर्वीसारखं सुरक्षित राहिलं नव्हतं, म्हणून रॉटरडॅमला परतल्यावर मी नोकरी शोधू लागलो. सप्टेंबर १ रोजी जर्मनीनं पोलंडवर आक्रमण केलं आणि सबंध जगभर दुसरं महायुद्ध पेटलं.
बायबल सत्य शिकणे
वर्ष १९४०, मार्च महिना. रविवारची सकाळ. मी माझ्या विवाहित भावाला भेटायला त्याच्या घरी गेलो असताना, एका यहोवाच्या साक्षीदारानं दारावरील बेल वाजवली. सरकार पुस्तक आधीच माझ्याजवळ असल्याचं सांगून, मी त्याला स्वर्गाविषयी आणि स्वर्गात कोण जातात याविषयी काही प्रश्न विचारले. मला इतकी काही स्पष्ट आणि तर्कशुद्ध उत्तरं मिळाली की मी मनात म्हणालो, ‘नक्कीच, हेच सत्य आहे.’ मी त्याला माझा पत्ता दिला आणि घरी येऊन मला भेटण्याचं आमंत्रण दिलं.
यानंतर तो साक्षीदार तीन वेळा माझ्या घरी आला तेव्हा प्रत्येक वेळी बायबलच्या विषयांवर आमच्या सविस्तर चर्चा झाल्या; या अवघ्या तीनच भेटींनंतर मी त्या साक्षीदारासोबत घरोघरच्या प्रचार कार्यात जाऊ लागलो. प्रचाराच्या क्षेत्रात पोचल्यावर त्यानं मला कोठून सुरवात करायची ते सांगितलं आणि मग मला एकट्यानेच प्रचार कार्य करावं लागलं. त्याकाळी कित्येक नवीन लोकांना अशाचप्रकारे प्रचार कार्याची सुरवात करून देण्यात येत असे. रस्त्यावर कुणाच्या नजरेत येऊ नये म्हणून घराच्या आत गेल्यावरच साहित्य द्यायचं असं मला सांगण्यात आलं होतं. युद्धाच्या त्या सुरवातीच्या काळात फार सांभाळून कार्य करावं लागत असे.
तीन आठवड्यांनंतर, १० मे १९४० रोजी जर्मन सैन्यांनी नेदरलँड्सवर हल्ला केला आणि २९ मे रोजी रीख कमिशनर झायसिंगवार्ट यांनी यहोवाच्या साक्षीदारांच्या संघटनेवर बंदी आली असल्याचे जाहीर केले. आम्ही लहान लहान गटांतच भेटत असू आणि सभांची ठिकाणे देखील गुप्त ठेवण्याची खबरदारी बाळगली जात असे. प्रवासी पर्यवेक्षकांच्या भेटी आमच्यासाठी खासपणे प्रोत्साहक असायच्या.
मला सतत धूम्रपान करण्याची सवय होती; माझा अभ्यास घेणाऱ्या त्या साक्षीदारालाही मी जेव्हा सिगारेट दिली तेव्हा मला कळले की तो धूम्रपान करत नाही, मी मनात म्हणालो: “काही झालं तरी, धूम्रपान मात्र आपल्याला सोडता येणार नाही!” पण नंतर सहज रस्त्यावर चालता चालता माझ्या मनात हा विचार आला की ‘आपल्याला जर साक्षीदार बनायचेच आहे तर मग अस्सल साक्षीदार बनण्यातच अर्थ आहे.’ त्यानंतर मी जे धूम्रपान सोडले ते कायमचेच.
सत्यात खंबीर होणे
भावाच्या घरी साक्षीदाराची भेट झाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत, म्हणजे १९४० सालच्या जून महिन्यात मी यहोवाला केलेल्या माझ्या समर्पणाचे प्रतीक म्हणून बाप्तिस्मा घेतला. काही महिन्यांनंतर, ऑक्टोबर १९४० मध्ये मी एक पायनियर म्हणून पूर्णवेळेच्या सेवेत रुजू झालो. तेव्हा मला एक पायनियर जाकीट देण्यात आले. कोटाच्या आत घालता येणाऱ्या या जाकिटाला पुस्तकं, पुस्तिका इत्यादी ठेवण्यासाठी बरेच खिसे होते.
जर्मन सैन्याने ताबा मिळवल्यावर यहोवाच्या साक्षीदारांचा पद्धतशीरपणे पत्ता लावून त्यांना अटक करण्यात आली. १९४१ साली फेब्रुवारी महिन्यात मी आणि आणखी काही साक्षीदार सकाळच्या वेळी क्षेत्र सेवा करीत होतो. ते ब्लॉकच्या एका बाजूची घरं करत होते तर मी पलीकडची घरं करायला गेलो. खूप वेळ झाल्यावरही ते आले नाहीत तेव्हा काय भानगड आहे हे पाहायला मी परत गेलो; जाताना मला एक माणूस भेटला, त्यानं मला विचारलं, “ही लहान पुस्तकं तुमच्याजवळही आहेत का?”
“हो आहेत,” असं मी उत्तर देताच त्यानं मला अटक केली आणि पोलिस स्थानकात नेलं. तब्बल चार आठवडे मला कोठडीत ठेवण्यात आले. जवळजवळ सगळेच पोलिस अधिकारी माझ्याशी चांगले वागायचे. यापुढे आपण बायबल साहित्य वाटप करणार नाही अशा लेखी प्रतिज्ञेवर सही केल्यास, गेस्टापोच्या हाती सोपवले जाण्यापूर्वी कोणीही स्वतःची सुटका करून घेऊ शकत होता. मला त्या प्रतिज्ञेवर सही करायला सांगण्यात आलं तेव्हा मी म्हणालो: “तुम्ही मला २० लाख गुल्डेन्स (नेदरलँड्स येथील चलन) दिलीत, तरीही मी सही करणार नाही.”
आणखी काही काळ कोठडीत ठेवल्यानंतर मला गेस्टापोच्या स्वाधीन करण्यात आलं. अशारितीनं मी जर्मनीतील सॅक्सेनहाउसन छळ छावणीत पोचलो.
सॅक्सेनहाउसनमधील जीवन
मी येथे १९४१ च्या जून महिन्यात आलो तेव्हा सुमारे १५०—अधिकतर जर्मन साक्षीदार—आधीच येथे होते. आम्हा नव्या कैद्यांना छावणीच्या आयसोलेशन (एकांतवास) नावाच्या एका विभागात नेण्यात आलं. तिथं आमच्या ख्रिस्ती भावांनी आमची काळजी घेतली आणि पुढे होणार असलेल्या गोष्टींसाठी आमची तयारी केली. एका आठवड्यानंतर नेदरलँड्सहून साक्षीदारांची आणखी एक तुकडी आली. सुरवातीला आम्हाला बराकींपुढे एकाच ठिकाणी सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उभं राहायला सांगण्यात आलं. कधीकधी तर कैद्यांना सबंध आठवडाभर किंवा त्याहीपेक्षा अधिक काळ दररोज असं उभं राहावं लागत असे.
इतकी निर्दय वागणूक मिळत असूनही, संघटित राहून आध्यात्मिक पोषण घेत राहण्याच्या अत्यावश्यकतेची आम्हा भावांना जाणीव होती. दररोज बायबलच्या एखाद्या वचनावर काही विचार तयार करून येण्याची एकेकावर जबाबदारी सोपवली जायची. नंतर, प्रांगणात इतर साक्षीदार एकेकट्यानं त्याच्याजवळ जाऊन त्यानं तयार केलेले मुद्दे ऐकायचे. नियमितपणे, कुणाच्याही नकळत कोणत्या न कोणत्या प्रकारे छावणीत साहित्य आणलं जायचं आणि अगदी प्रत्येक रविवारी आम्ही एकत्र येऊन या बायबल साहित्याचा अभ्यास करायचो.
संयुक्त संस्थानांमध्ये १९४१ सालच्या उन्हाळ्यात सेंट लुईस इथं झालेल्या अधिवेशनात जे मुले (इंग्रजी) नावाचं पुस्तक प्रसिद्ध करण्यात आलं होतं ते कसं कुणास ठाऊक, पण सॅक्सेनहाउसनमध्ये आणण्यात आलं. कुणाच्या हाती लागून नष्ट करण्यात येऊ नये म्हणून आम्ही ते पुस्तक फाडून त्याचे अनेक भाग केले आणि बांधव हे भाग आळीपाळीनं घेऊन वाचत असत.
पण कालांतरानं छावणीच्या अधिकाऱ्यांना आमच्या सभांचा सुगावा लागला. उपाय म्हणून त्यांनी साक्षीदारांना वेगवेगळ्या बराकींमध्ये ठेवले. यामुळे आम्हाला इतर कैद्यांना प्रचार करण्याची फारच उत्तम संधी मिळाली आणि पाहता पाहता अनेक पोलिश, युक्रेनियन आणि इतर देशांच्या लोकांनी सत्य स्वीकारले.
बीबेलफॉर्शर अर्थात यहोवाच्या साक्षीदारांना एकतर झुकायला लावायचे नाहीतर त्यांना खतम करायचे हा नात्सींचा पक्का इरादा त्यांनी जगजाहीर केलेला होता. परिणामस्वरूप आमच्यावर भयंकर दबाव येऊ लागला. एका प्रतिज्ञापत्रावर सही करून आपला विश्वास त्यागल्यास तुम्हाला सोडून दिले जाईल असं आम्हाला सांगण्यात आलं. बांधवांपैकी काहीजण असा युक्तिवाद करू लागले की, “कैदेतून सुटल्यास, मी यहोवाची अधिक सेवा करू शकेन.” मोजक्यांनी सही केली, पण अधिकांश बांधव सर्व हालअपेष्टा, अपमान आणि गैरवर्तणूक झेलूनही विश्वासू राहिले. ज्यांनी तडजोड केली त्यांच्यापैकी काहींचे पुढे काय झालं याचा पत्ताच लागला नाही. पण आनंदाची गोष्ट अशी की त्यांच्यापैकी इतरजण नंतर बदलले आणि ते अजूनही सक्रिय साक्षीदार आहेत.
कैद्यांना निघृणपणे शारीरिक शिक्षा दिली जात असे, उदाहरणार्थ कधीकधी वेतानं त्यांना २५ फटके मारत असत, आणि आम्हाला पुन्हा पुन्हा असले दृश्य पाहायला भाग पाडलं जायचं. एकदा चार माणसांना फाशी देताना आम्हाला पाहायला लावण्यात आलं. असल्या अनुभवांचा माणसाच्या मनावर फार मोठा परिणाम होतो. माझ्याच बराकीत राहणारा उंचापुरा, उमदा दिसणारा आपल्या बांधवांपैकी एक मला म्हणाला, “इथं येण्यापूर्वी रक्त पाहताच मला भोवळ यायची. पण आता हृदयाचा अक्षरशः दगड झालाय.” आमची मनं कठीण जरूर झाली होती, पण आम्ही कठोर बनलो नाही. खरं सांगायचं तर, त्या छळ करणाऱ्यांविषयी मी एकदाही आपल्या मनात सूडभावना किंवा द्वेष बाळगलेला नाही.
एका कॉमान्डोसोबत (श्रम तुकडी) काही काळ काम केल्यावर मला खूप ताप आल्यामुळे इस्पितळात दाखल करण्यात आलं. एका दयाळू नॉर्वेजियन डॉक्टरांनी आणि एका झेकोस्लोव्हेकियन परिचारिकेनं मला खूप मदत दिली आणि कदाचित त्यांच्याच दयेनं मी जिवंत राहिलो असेन.
डेथ मार्च
एप्रिल १९४५. युद्धात जर्मनीचा पराभव होणार हे एव्हाना स्पष्टपणे दिसू लागले होते. पश्चिमी मित्र राष्ट्रे पश्चिमेकडून आणि सोव्हिएत सैन्य पूर्वेकडून वेगानं आगेकूच करीत होतं. अवघ्या काही दिवसांच्या आत छळ छावण्यांमधील हजारो लोकांना जिवे मारून त्यांच्या मृतदेहांची कोणत्याही पुराव्याशिवाय विल्हेवाट लावणे नात्सींना अशक्य होतं. म्हणून त्यांनी सर्व आजारी कैद्यांना मारून टाकायचं आणि उरलेल्यांना जवळच्या बंदरांवर हलवायचं असं ठरवलं. तेथून त्यांना जहाजांवर चढवून ती जहाजं मुद्दामहून समुद्रात बुडवून टाकायची अशी त्यांची दुष्ट योजना होती.
सॅक्सेनहाउसन येथून जवळजवळ २६,००० कैद्यांची ती पदयात्रा एप्रिल २० च्या रात्री सुरू झाली. छावणी सोडण्याआधी आपल्या आजारी भावांना छावणीतल्या दवाखान्यातून सोडवण्यात आलं. त्यांना नेण्यासाठी बांधवांनी कुठूनतरी एक गाडी मिळवली. सहा वेगवेगळ्या देशांची आम्ही एकंदर २३० जणं होतो. आजारी बांधवांपैकी एक होते, ब्रदर आर्थर विंक्लर; त्यांनी नेदरलँड्स मधील कार्याच्या प्रगतीसाठी मोलाचा हातभार लावलेला होता. आम्ही सर्व साक्षीदार सर्वात शेवटी चालत होतो आणि सतत आम्ही एकमेकांना चालत राहण्याचं प्रोत्साहन देत होतो.
सुरवातीला, कुठेही न थांबता आम्हाला सतत ३६ तास चालत राहावं लागलं. भयंकर वेदना आणि कमालीच्या थकव्यामुळे मला चालतानाच अक्षरशः झोप लागली. पण इतरांपेक्षा मागे पडलो किंवा विश्रांतीसाठी थोडं थांबलो तर गाड्र्सच्या बंदुकीनं उडवले जाण्याची भीती होती. रात्री आम्ही शेतांत किंवा जंगलांत झोपायचो. फार थोडे काहीतरी खायला मिळायचे, आणि कधी तर तेसुद्धा नाही. पोटातली आग असह्य झाली तेव्हा स्वीडिश रेड क्रॉस संस्थेनं आम्हाला पुरवलेली टूथपेस्ट चाटण्याची माझ्यावर पाळी आली.
एका ठिकाणी, रशियन आणि यु.एस. सैन्य नेमके कुठे आहे याविषयी जर्मन गाड्र्सचा गोंधळ झाल्यामुळे आम्हाला चार दिवस जंगलातच मुक्काम करावा लागला. पण ही देखील देवाचीच दया असावी, कारण इथं थांबल्यामुळे ज्या जहाजांत आम्हाला जलसमाधी मिळणार होती, ती जहाजे निघण्यापूर्वी आम्ही ल्यूबेक बे येथे पोचूच शकलो नाही. शेवटी १२ दिवसांनंतर सुमारे २०० किलोमीटरची पदयात्रा केल्यावर आम्ही क्रिव्हिट्स वुड इथं आलो. हे ठिकाण ल्यूबेकपासून ५० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या श्फेरीन शहराच्या जवळच होते.
आमच्या उजवीकडे सोव्हिएत तर डावीकडे अमेरिकन सैन्य होते. तोफांच्या आणि अविरत गोळीबाराच्या कर्कश्श आवाजावरून, आपण युद्ध आघाडीच्या जवळच कुठेतरी आहोत, हे आम्हाला कळलं. जर्मन गाड्र्सची भीतीने गाळण उडाली; काही गाड्र्सनी पोबारा केला, तर काहींनी ओळखता येऊ नये म्हणून आपले लष्करी गणवेष काढून चक्क मेलेल्या कैद्यांचे कपडे चढवले. या सर्व गोंधळात, आम्ही सर्व साक्षीदारांनी एकत्र येऊन, मार्गदर्शन मिळावं म्हणून प्रार्थना केली.
पुढाकार घेणाऱ्या बांधवांनी ठरवले की दुसऱ्या दिवशी अगदी पहाटे निघून यु.एस. सैन्याच्या दिशेनं जावं. डेथ मार्च सुरू झाल्यापासून जवळजवळ निम्मे कैदी एकतर मरण पावले होते किंवा त्यांना वाटेत गोळीनं उडवण्यात आलं होतं, पण सर्व साक्षीदार मात्र अद्याप सुरक्षित होते.
नायमेगन शहरात माझी एक बहीण राहायची; काही कनेडियन लष्करी कार्यकर्त्यांनी मला या शहरापर्यंत गाडीनं पोहंचवलं. पण इथं आल्यावर मला कळलं की तिनं ती जागा सोडली होती. मग मी पायीच रॉटरडॅमला निघालो. सुदैवानं, वाटेत मला एका खाजगी वाहनानं लिफ्ट दिली आणि थेट रॉटरडॅमला आणून सोडलं.
सत्यच माझं जीवन होतं आणि आहे
रॉटरडॅमला आल्या दिवशीच मी पुन्हा पायनियर कार्य करण्यासाठी अर्ज भरला. तीन आठवड्यांनंतर मी माझ्या नियुक्त शहरी अर्थात झटफन इथं आलो; इथं मी पुढच्या साडेतीन वर्षांपर्यंत सेवा करीत होतो. यादरम्यान माझी खालावलेली प्रकृती थोडी सुधारली. मग मला एक प्रवासी सेवक, म्हणजेच विभागीय पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आलं. काही महिन्यांनंतर, न्यूयॉर्कमधल्या साउथ लँसिंग इथं असणाऱ्या वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेकडून मला आमंत्रण आलं. १९४९ सालच्या फेब्रुवारी महिन्यात प्रशालेच्या १२ व्या वर्गातून पदवीधर झाल्यानंतर मला बेल्जियमला नियुक्त करण्यात आलं.
बेल्जियमला आल्यावर मी वेगवेगळ्याप्रकारे सेवा केली; शाखा दप्तरात जवळजवळ आठ वर्षं आणि विभागीय तसेच प्रांतीय पर्यवेक्षक म्हणून प्रवासी कार्यात कितीतरी दशकं. १९५८ साली मी झ्यूसटीन हिच्यासोबत विवाहबद्ध झालो, माझ्या प्रवासी कार्यात ती आता मला साथ देऊ लागली. वयोमानानुसार आता माझं कार्य मर्यादित झालं आहे, पण अजूनही बदली प्रवासी पर्यवेक्षक म्हणून मी आनंदानं सेवा करीत आहे.
सेवेत घालवलेल्या माझ्या जीवनाकडे वळून पाहताना, मी खरंच असं म्हणू शकतो, की “सत्याहून आणखी चांगलं काय असेल.” अर्थात जीवन नेहमीच सुरळीत चालले नाही. पण स्वतःच्या चुकांपासून आणि उणिवांपासून धडे घेण्याची गरज मी ओळखली आहे. म्हणूनच तरुण मंडळीशी बोलताना, मी कित्येकदा त्यांना सांगतो: “तुमच्याही हातून चुका होतील, कदाचित तुम्ही गंभीर चुकाही करून बसाल, पण या चुकांविषयी खोटं कधीही बोलू नका. आईवडिलांजवळ किंवा मंडळीतील एखाद्या वडिलांजवळ मन मोकळं करा आणि मग आवश्यक त्या सुधारणा करा.”
बेल्जियम येथे ५० वर्षांच्या पूर्णवेळेच्या सेवेत माझ्या डोळ्यासमोर कितीतरी लहान लहान मुलं मोठी होऊन मंडळीत वडील आणि विभाग पर्यवेक्षक झाली आहेत. शिवाय या देशातील राज्य प्रचारकांच्या संख्येत, जेमतेम १,७०० पासून २७,००० पर्यंत वाढ झालेली मी पाहिली आहे.
तुम्हीच सांगा, “यहोवाची सेवा करण्यात घालवलेल्या जीवनापेक्षा आणखी समाधानकारक जीवन कोणतं असू शकेल?” त्यापेक्षा चांगलं जीवन न कधी होतं, न आहे, न कधी असेल. माझी यहोवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्ही दोघांनीही त्याची सर्वकाळ सेवा करावी म्हणून त्यानं आम्हा उभयतांना सदोदीत मार्गदर्शन आणि आशीर्वाद देत राहावा.
[२६ पानांवरील चित्र]
१९५८ साली आमच्या लग्नानंतर माझी पत्नी व मी