वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ९/१ पृ. २४-२८
  • मी यहोवावर अवलंबून राहण्यास शिकलो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मी यहोवावर अवलंबून राहण्यास शिकलो
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • कडक परीक्षांची सुरवात
  • हातमिळवणीचा प्रश्‍न
  • छळ वाढतो
  • पूर्वेकडे स्थलांतर —मग बचाव
  • मुक्‍ततेच्या आनंदावर विरजण
  • अखेरीस स्वतंत्र!
  • देवाच्या शासनाची बाजू घेण्याचा आम्ही पक्का निर्णय घेतला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • पन्‍नासपेक्षा अधिक वर्षांपासून ‘भेटी देणे’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • यहोवाच्या प्रेमळ हाताखाली सेवा करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • ख्रिस्ताचा सैनिक बनून राहण्याचा दृढ निश्‍चय असलेला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ९/१ पृ. २४-२८

मी यहोवावर अवलंबून राहण्यास शिकलो

यॉन कोरपा-ओन्डो यांच्याद्वारे कथित

ते १९४२ चं साल होतं आणि रशियातील कुर्स्क जवळ हंगेरीयन सैनिकांचा माझ्यावर पहारा होता. दुसऱ्‍या महायुद्धादरम्यान रशियाविरुद्ध लढणाऱ्‍या ॲक्सीस सत्तेचे आम्ही कैदी होतो. माझी कबर खोदून ठेवली होती; मी इथूनपुढं यहोवाचा साक्षीदार नाही, असा मजकूर असलेल्या एका कागदपत्रावर सही करण्यासाठी मला दहा मिनिटं देण्यात आली होती. त्यानंतर काय घडलं ते सांगण्याआधी मी इथं पोहंचलो कसा ते आधी सांगतो.

झाहोर नावाच्या गावात सन १९०४ मध्ये माझा जन्म झाला. आता हे गाव पूर्व स्लोव्हाकियात मोडतं. पहिल्या महायुद्धानंतर नव्याने स्थापन झालेल्या झेकोस्लाव्हाकियात झाहोर सामील झालं. आमच्या गावात सुमारे २०० उंबरठे होते आणि एक ग्रीक कॅथलिकांचं आणि दुसरं कॅल्व्हनीस्टांचं अशी दोन चर्च होती.

मी कॅल्व्हनीस्ट चर्चला जात होतो; पण माझ्या जीवनाला नैतिकतेचा कोणताही लगाम नव्हता. माझ्या घराजवळच एक मनुष्य राहायचा जो सर्वांपेक्षा जरा उठून दिसायचा. एकदा तो माझ्याशी बोलला व त्याने मला एक बायबलही दिलं. ते पुस्तक मी माझ्या हातात पहिल्यांदा घेतलं होतं. याच काळात, १९२६ मध्ये मी बार्बोराशी लग्न केलं आणि आम्हाला दोन मुलंही झाली, बार्बोरा आणि यॉन.

मी बायबल वाचू लागलो, पण त्यातील पुष्कळशा गोष्टी माझ्या डोक्यावरून गेल्या. म्हणून मी माझ्या पाळकाकडं गेलो आणि मला जरा समजावून सांगा असं त्यांना म्हटलं. यावर ते मला म्हणाले, “बायबल फक्‍त शिकलेल्या लोकांसाठी आहे, ते समजून घेण्याचा उगाच प्रयत्न करू नकोस.” आणि मग मला त्यांनी पत्ते खेळायला बोलवलं.

त्यामुळे मला बायबल दिलेल्या मनुष्याकडे मी गेलो. तो एक बायबल विद्यार्थी होता; तेव्हा यहोवाच्या साक्षीदारांना या नावानं ओळखलं जायचं. मला मदत करायला तो एका पायावर तयार झाला हळूहळू माझ्या डोळ्यांवरचा अज्ञानाचा पडदा दूर होऊ लागला. मी पिण्याचं थांबवलं आणि शुद्ध नैतिक जीवन जगू लागलो; मी इतरांना यहोवाविषयी देखील सांगू लागलो. सन १९२० च्या दशकाच्या सुरवातीला झाहोरमध्ये बायबलमधील सत्याची मुळे चांगलीच पसरली होती; लवकरच बायबल विद्यार्थ्यांचा एक सक्रिय गट तयार झाला होता.

पण, तिथं तीव्र धार्मिक विरोध होता. माझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे असं तिथल्या पाळकांनी माझ्या कुटुंबाला सांगून माझ्याविरुद्ध फितवलं. पण माझ्या जीवनाला अर्थ प्राप्त झाल्यामुळे सत्य यहोवा देवाची सेवा करण्याचा मी चंग बांधला. त्यानुसार सन १९३० मध्ये मी यहोवाला माझ्या समर्पणाचे द्योतक म्हणून बाप्तिस्मा घेतला.

कडक परीक्षांची सुरवात

दुसऱ्‍या महायुद्धामध्ये आमचा प्रदेश सन १९३८ ला जर्मनीची बाजू घेणाऱ्‍या हंगेरीयन शासनाखाली आला. आमच्या गावाची लोकसंख्या हजाराच्या आसपास असली तरी त्यांपैकी फक्‍त ५० लोक साक्षीदार होते. प्रचार केल्याने आमचा जीव आणि स्वातंत्र्य धोक्यात येण्याची दाट शक्यता असतानाही आम्ही प्रचार करण्याचं काही सोडलं नाही.

सन १९४० मध्ये हंगेरीयन सैन्यात भरती होण्याची माझ्यावर सक्‍ती करण्यात आली. अशावेळी मी काय करावं? लोक युद्धाची शस्त्रसामग्री मोडून त्याद्वारे शांतीची सामग्री तयार करतील यासंबंधी असणाऱ्‍या बायबल भविष्यवाण्या माझ्या वाचनात आल्या होत्या व कालांतराने देव पृथ्वीवरील सर्व युद्धांचा समूळ नाश करील हेही मला माहीत होतं. (स्तोत्र ४६:९; यशया २:४) या कारणास्तव मला युद्धाचा वीट आला होता म्हणून होणाऱ्‍या परिणामांची कोणतीही तमा न बाळगता सैन्यात भरती न होण्याचा मी निर्णय घेतला.

मला १४ महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली; हंगेरीतील पेक येथील तुरुंगात मी होतो. याच तुरुंगात आणखी पाच साक्षीदारही होते; आम्हाला एकमेकांना भेटता येऊ शकत असल्यामुळे आम्ही कृतज्ञ होतो. परंतु मी पायांत साखळदंड असलेल्या स्थितीत काही काळापर्यंत एकांतवासात होतो. युद्धासंबंधाने असलेली कामे न केल्यामुळे आम्हाला चांगलाच मार दिला जायचा. याशिवाय, दुपारचे दोन तास वगळता अख्खा दिवस आम्हाला जबरदस्तीनं सावधान स्थितीत उभं राहायला सांगितलं जायचं. ही परीक्षा कैक महिने चालली. पण आम्ही देवासमोर शुद्ध विवेक राखल्यामुळे आनंदी होतो.

हातमिळवणीचा प्रश्‍न

एकदा, १५ कॅथलिक पाळकांचा एक गट आमच्याकडे आला आणि सैन्यात भरती होऊन आम्ही युद्धाला पाठिंबा दिला पाहिजे असं आम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न करू लागला. चर्चेदरम्यान आम्ही त्यांना म्हणालो: “आत्मा अमर असतो आणि युद्धामध्ये आम्ही मेल्यावर स्वर्गात जाऊ हे तुम्ही आम्हाला बायबलमधून सिद्ध करून दाखवलं तरच आम्ही सैन्यात भरती होऊ.” अर्थातच, ते काही सिद्ध करू शकले नाहीत व आमच्याबरोबर पुढे चर्चा करण्याचं त्यांनी नाव घेतलं नाही.

सन १९४१ मध्ये माझी तुरुंगाची शिक्षा संपली; मी माझ्या कुटुंबाला कधी भेटतोय असं मला झालं होतं. पण तसं होण्याऐवजी मला साखळदंडात जखडून हंगेरीतील सारोस्पाटीकच्या सैन्यतळाकडे नेण्यात आलं. तिथं पोहंचल्यावर मला सोडण्यात येईल असं मला सांगण्यात आलं. “तुला फक्‍त एवढं लिहून द्यावं लागेल, की मी घरी गेल्यावर २०० पेंगो भरेन.”

मी त्यांना विचारलं, “ते कसं शक्य आहे? तुम्हाला ते पैसे कशासाठी हवेत?”

मला सांगण्यात आलं, “त्या पैशाच्या बदल्यात आम्ही तुला एक सर्टिफिकेट देऊ; त्यावर तू सैन्यात भरती होण्याकरता कराव्या लागणाऱ्‍या वैद्यकीय चाचणीत पास झाला नाहीस असं लिहिलेलं असेल.”

आता माझ्यापुढे पेच निर्माण झाला. एक वर्षापेक्षा अधिक वर्ष मी अमानुष वागणूक सहन केली होती; मी थकत चाललो होतो. तेव्हा काही पैसे भरून मी मुक्‍त होऊ शकत होतो. “मी विचार करेन,” असे पुटपुटलो.

मी कोणता निर्णय घेऊ? मला माझ्या पत्नीचा आणि मुलांचासुद्धा विचार करायचा होता. त्याच वेळी मला एका सहख्रिश्‍चनाकडून एक प्रोत्साहनदायक पत्रं मिळालं. त्याने इब्री लोकांस १०:३८ हे वचन उद्धृत केलं होतं; तिथं प्रेषित पौल यहोवाच्या शब्दांचा उल्लेख करतो: “माझा नीतिमान मनुष्य विश्‍वासाने जगेल; तो जर माघार घेईल, तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष वाटणार नाही.’” त्यानंतर काही दिवसांनी दोन हंगेरीयन अधिकारी बराकीमध्ये माझ्याशी येऊन बोलले; एकानं मला म्हटलं: “तू बायबल तत्त्वांवर इतका ठाम आहेस हे पाहून आम्ही तुझा किती आदर करतो याची कदाचित तुला जाणीव नसेल! बिलकुल हार मानू नकोस!”

मला २०० पेंगोंसाठी मुक्‍त करणाऱ्‍या लोकांकडे मी दुसऱ्‍या दिवशी गेलो आणि म्हणालो: “यहोवा देवानं मला तुरुंगात टाकण्याची परवानगी दिली आहे, तर तोच मला सोडवेल. मी पैसे देऊन स्वतःची सुटका करून घेणार नाही.” यामुळे मला दहा वर्षांचा तुरुंगवास घडला. मी हातमिळवणी करावी म्हणून त्यांचे प्रयत्न एवढ्यावरच थांबले नाहीत. मी फक्‍त दोन महिने सैन्यात काम केल्यास मला क्षमा केली जाईल असा आदेश कोर्टानं दिला; यासाठी मला हातात शस्त्र देखील घ्यावं लागणार नव्हतं! हा प्रस्ताव सुद्धा मी डावलून लावला आणि माझा तुरुंगवास सुरू झाला.

छळ वाढतो

मला पुन्हा एकदा पेक येथील तुरुंगात टाकण्यात आलं. यावेळी छळ जरा कडकच होता. माझे हात मागे बांधून मला हातावर दोन तास लटकवून ठेवण्यात आलं. यामुळे माझे दोन्ही खांदे निखळले. अशाप्रकारचा छळ सुमारे सहा महिन्यांनी पुन्हा करण्यात आला. मी हार मानली नाही याचे श्रेय मी केवळ यहोवालाच देतो.

सन १९४२ मध्ये, काही राजकीय कैद्यांना, यहुद्यांना आणि आम्हा २६ यहोवाच्या साक्षीदारांना जर्मन सैन्यांच्या अंमलाखाली असलेल्या कुर्स्क शहराच्या एका क्षेत्रात नेण्यात आलं. आम्हाला जर्मनांच्या स्वाधीन करण्यात आलं; त्यांनी आम्हा कैद्यांना सैनिकांची अन्‍नसामग्री, शस्त्रास्त्र आणि कपडालत्ता उचलण्याचं काम दिलं. आम्ही साक्षीदारांनी हे काम नाकारलं, कारण यामुळे आमच्या ख्रिस्ती तटस्थतेचा भंग होत होता. यास्तव, आम्हाला पुन्हा हंगेरीयन सैनिकांच्या स्वाधीन करण्यात आलं.

कालांतराने आम्हाला कुर्स्कच्या तुरुंगात टाकण्यात आलं. रबरी सोट्यानं आम्हाला दिवसातून तीनदा चोप दिला जायचा. असं खूप दिवस चाललं. एक फटका माझ्या कानशीलावर पडला आणि मला खाली पाडण्यात आलं. मला इतकं बेदम मारण्यात येत होतं, की ‘आता मी मरतोय, की काय,’ असं मला वाटू लागलं. माझं संपूर्ण शरीर बधीर झाल्यामुळे मला काहीच संवेदना होत नव्हत्या. तीन दिवस आमच्या पोटात अन्‍नाचा एक कणही नव्हता. मग आम्हाला कोर्टात नेण्यात आलं आणि सहा जणांना मृत्युदंड ठोठावण्यात आला. ही शिक्षा अंमलात आणली गेली आणि आता आम्ही २० जणच उरलो होतो.

सन १९४२ च्या ऑक्टोबरमध्ये कुर्स्क येथे मी सहन केलेली विश्‍वासाची परीक्षा माझ्या जीवनातील सर्वात खडतर परीक्षा राहिली आहे. प्राचीन काळातील राजा यहोशाफाट याच्या लोकांनी जेव्हा असामान्य संकटांचा सामना केला तेव्हा त्याने व्यक्‍त केलेल्या भावनांसारख्याच आमच्या भावना होत्या: “आमच्यावर चालून आलेल्या या मोठ्या समूहाशी सामना करण्यास आम्हास ताकद नाही; आम्ही काय करावे ते आम्हास सुचत नाही; पण आमचे डोळे तुजकडे लागले आहेत.”—२ इतिहास २०:१२.

आम्हा उरलेल्या २० जणांना, १८ हंगेरीयन सैनिकांच्या पहाऱ्‍याखाली आमची स्वतःची कबर खोदायला घेऊन गेले. कबर खोदून झाल्यावर कागदपत्रावर सही करण्यासाठी दहा मिनिटं आहेत असं आम्हाला सांगण्यात आलं; त्या कागदपत्रावरील काही भाग असा होता: “यहोवाच्या साक्षीदारांची शिकवण चुकीची आहे. इथूनपुढं मी त्यावर विश्‍वास ठेवणार नाही किंवा तिचे समर्थन करणार नाही. मी हंगेरीयन मायभूमीसाठी लढेन . . . मी रोमन कॅथलिक चर्चमध्ये रुजू होईन याची पक्की खात्री देण्यासाठी मी सही करतो.”

दहा मिनिटांनी “दाए मुड,” असे म्हणून कबरेपर्यंत जाण्याचं आम्हाला फर्मावण्यात आलं. त्यानंतर पहिल्या आणि तिसऱ्‍या कैद्याला कबरेत उतरण्याची आज्ञा देण्यात आली. या दोघांना कागदपत्रावर सही करण्यासाठी आणखी दहा मिनिटं देण्यात आली. एका सैनिकाला त्यांच्यावर दया आली आणि त्यांना तो म्हणाला: “अरे बाबांनो, आतातरी तुमचा विश्‍वास सोडा आणि कबरेतून बाहेर या!” यावर कोणीही काही म्हटलं नाही. मग अधिकाऱ्‍यानं दोघांना गोळ्या झाडून ठार मारलं.

“बाकीच्यांच काय?” एका सैनिकानं अधिकाऱ्‍याला विचारलं.

त्यानं उत्तर दिलं, “त्यांना बांधा, आपण त्यांना आणखी जरा त्रास देऊ आणि मग सकाळी सहा वाजता गोळ्या घालू.”

हे ऐकून माझे अवसानच गळाले; नाही, मी मरणार म्हणून नव्हे, तर कदाचित मी तो त्रास सहन करू शकलो नाही आणि हातमिळवणी केली तर? म्हणून मी पुढे झालो आणि म्हणालो: “साहेब, तुम्ही ज्यांना ठार मारलं त्या आमच्या बांधवांसारखीच चूक आम्हीही केली आहे. मग तुम्ही आत्ताच आम्हाला पण का गोळ्या घालत नाही?”

पण त्यांनी तसं केलं नाही. आमचे हात त्यांनी मागं बांधले. आणि आम्हाला हातांवर लटकवण्यात आलं. आम्ही बेशुद्ध व्हायचो तेव्हा ते आमच्यावर पाणी शिंपडायचे. आमच्या शरीराच्या ओझ्यानं आमचे खांदे निखळले; ती असह्‍य वेदना होती. हा छळ जवळजवळ तीन तास चालला. मग अचानक एक ऑर्डर आली, आणखी यहोवाच्या साक्षीदारांना गोळ्या घालायच्या नाहीत.

पूर्वेकडे स्थलांतर —मग बचाव

तीन आठवड्यांनंतर आम्हाला, डॉन नदीच्या किनाऱ्‍यावर पोहंचूपर्यंत काही दिवस ओळीने चालवत नेलं. आमच्यावर देखरेख ठेवणाऱ्‍यांनी आम्हाला सांगितलं, की आम्हाला पुन्हा जिवंत नेलं जाणार नाही. दिवसा आम्हाला काहीही फालतू कामं दिली जायची, जसं की, खड्डे खणायचे आणि ते पुन्हा भरायचे. संध्याकाळी आम्हाला जरा इकडं तिकडं फिरायला मोकळीक होती.

मी परिस्थिती जरा बारकाईनं पाहिली; दोन मार्ग मला दिसले. एकतर तिथं राहून मरायचं किंवा जर्मन सैनिकांपासून पळून जाऊन रशियन सैनिकांना शरण जायचं. गोठलेली डॉन नदी पार करून पळून जाण्यास आमच्यातील केवळ तिघं जण तयार झाले. डिसेंबर १२, १९४२ रोजी आम्ही यहोवाला प्रार्थना केली आणि पलायन केले. आम्ही रशियन आघाडीला पोहंचलो आणि मग आम्हाला लागलीच ३५,००० कैद्यांच्या एका तुरुंग छावणीत टाकण्यात आलं. वसंत ऋतूपर्यंत फक्‍त २,३०० कैदी जिवंत राहिले होते. बाकीचे उपासमारीमुळे मरण पावले होते.

मुक्‍ततेच्या आनंदावर विरजण

युद्धाच्या अखेरच्या काळातून आणि ते समाप्त होऊन पुष्कळ महिने उलटून गेल्यानंतरच्या काळातून मी रशियन कैदी म्हणून वाचलो. आणि नोव्हेंबर १९४५ मध्ये मी झाहोरला माझ्या घरी परतलो. आमच्या शेतीवाडीची अवस्था अतिशय वाईट झाली होती; म्हणून मला सर्व पहिल्यापासून सुरू करावं लागलं. युद्धाच्या वेळी माझ्या पत्नीनं आणि मुलांनी शेतीकडे पाहिलं होतं, पण ऑक्टोबर १९४४ मध्ये रशियन आले तेव्हा त्यांना सर्वकाही सोडून पूर्वेस जावं लागलं. आमच्या मालकीचं सर्व काही लुटलं गेलं.

घरी पोहंचल्यावर बायको आजारी असल्याचं पाहून मी अगदी खिन्‍न झालो. फेब्रुवारी १९४६ मध्ये तिने आमचा निरोप घेतला. ती फक्‍त ३८ वर्षांची होती. आमच्या दोघांची ताटातूट होऊन पाच पेक्षा अधिक वर्षं झाली होती आणि आता आम्हाला एकमेकांचा पुरेसा सहवासही लाभला नव्हता.

माझे आध्यात्मिक बांधव, सभांची उपस्थिती आणि घरोघरच्या कार्यातील सहभाग यांमुळे मला सांत्वन मिळाले. सन १९४७ मध्ये मी बरनो येथील एका अधिवेशनाला उपस्थित राहण्याकरता पैसे उधार घेतले; हा प्रवास सुमारे ४०० किलोमीटरचा होता. तेथील माझ्या ख्रिस्ती बांधवांकडून व वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीचे तेव्हाचे अध्यक्ष, नेथन एच. नॉर यांच्याकडून मला खूप सांत्वन व उत्तेजन मिळालं.

पण आम्ही युद्धानंतरचं स्वातंत्र्य जास्त काळ उपभोगू शकलो नाही. १९४८ मध्ये साम्यवादी समर्थक आम्हाला त्रास देऊ लागले. १९५२ मध्ये झेकोस्लाव्हाकिया येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यात पुढाकार घेणाऱ्‍या पुष्कळ बांधवांना अटक करण्यात आली आणि मंडळ्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली. १९५४ मध्ये मलाही अटक करण्यात आली आणि मला चार वर्षे तुरुंगात टाकण्यात आलं. माझा मुलगा यॉन आणि त्याचा मुलगा यूरी यांनाही, ख्रिस्ती तटस्थता राखल्याबद्दल तुरुंगात डांबण्यात आलं. मी प्रागमधील पानक्रात्स राज्यातील तुरुंगात दोन वर्षं घालवली. सन १९५६ मध्ये कैद्यांना माफी जाहीर करण्यात आली आणि मी मुक्‍त झालो.

अखेरीस स्वतंत्र!

सरतेशेवटी सन १९८९ मध्ये साम्यवाद्यांची झेकोस्लाव्हाकियावरील पकड ढिली होत गेली आणि यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्याला कायदेशीररीत्या मान्यता मिळाली. अशाप्रकारे पुन्हा एकदा एकत्र भेटणे आणि उघडपणे प्रचार करणे आम्हाला शक्य झाले. त्यावेळी झाहोरमध्ये जवळजवळ शंभरएक साक्षीदार होते; याचा अर्थ गावातील प्रत्येक १० लोकांपैकी एक जण साक्षीदार होता. अलीकडेच आम्ही झाहोरमध्ये सुमारे २०० बैठकींचे एक सुंदरसे, ऐसपैस राज्य सभागृह बांधले आहे.

अलीकडे माझी तब्येत चांगली नसल्यामुळे मंडळीतील बांधव मला सभेला त्यांच्या गाडीतून नेतात. तेथे गेल्यावर मला खूप बरं वाटतं, टेहळणी बुरूज अभ्यासादरम्यान उत्तरं देताना समाधान वाटतं. माझ्या कुटुंबाच्या तीन पिढ्यांतील काही सदस्यांना आणि पुष्कळशा नातवंडांना यहोवाची सेवा करताना मी पाहतो तेव्हा मला खूप आनंद वाटतो. यांतील एकानं, कौटुंबिक जबाबदाऱ्‍यांचा भार नव्हता तोपर्यंत झेकोस्लाव्हाकियामध्ये यहोवाच्या साक्षीदारांचा प्रवासी पर्यवेक्षक या नात्याने कार्य केलं.

अनेक परीक्षांच्या काळात यहोवाने मला बळ दिल्याबद्दल मी त्याचे मनोमन आभार मानतो. “जो अदृश्‍य आहे त्याला पाहत” असल्याप्रमाणे—त्याच्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे मी टिकून राहिलो आहे. (इब्री लोकांस ११:२७) होय, तारण करण्याच्या त्याच्या शक्‍तीचा मी अनुभव घेतला आहे. म्हणूनच अजूनही मी, मंडळीतील सभांना उपस्थित राहण्याचा आणि सार्वजनिक सेवेत त्याचे नाव घोषित करण्याचा माझ्या परीने प्रयत्न करतो.

[२५ पानांवरील चित्र]

झाहोरमधील राज्य सभागृह

[२६ पानांवरील चित्र]

टेहळणी बुरूज अभ्यासादरम्यान उत्तरं देण्याच्या सुहक्काची मी कदर करतो

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा