“तुमच्याजवळ जे आहे त्याजशी जडून राहा”
साक्षीदारांचा एक गट, सुमारे ३० द्वीपांनी बनलेल्या सायक्लेड्स ग्रीसच्या बेटांवरील एकावर प्रचार करीत होता. दोघेजण घरोघरचे कार्य करीत असताना एका पोलिसाला भेटले; त्याने त्यांना पोलिस स्टेशनला यायला सांगितले. तेथे पोहंचल्यावर थोड्या वेळाने एक फोन आला. तो गावच्या पाळकाचा होता. तो म्हणाला, “गावात यहोवाचे साक्षीदार आलेत असं मी ऐकलंय.” पोलिसाने उत्तर दिले, “हो, मी दोघांना इथंच घेऊन आलोय.” त्यावर पाळक म्हणाला: “मी आलोच.” या दोघांच्या बोलण्यावरून बांधवांना जराशी शंका येऊ लागली.
परंतु, पाळकाने आल्याबरोबर बांधवांच्या हातात हात दिला आणि तो पोलिसाच्या शेजारच्या खुर्चीवर बसला. चर्चा जशी सुरू झाली तशी पोलिसाने वाद घालण्यास सुरवात केली पण पाळक मात्र समजूतदार व आदरशील होता. साक्षीदारांचा अनादर करू नये असे त्याने पोलिसाला सांगितले; तो त्याला म्हणाला: “त्यांना कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देता येतं, कारण त्यांना ईश्वरशासित प्रशालेत प्रशिक्षण मिळतं. एखाद्या यहोवाच्या साक्षीदाराचा विश्वास तोडण्यापेक्षा ह्या जगाचा पाया हलवणं सोपं आहे.”
दुसऱ्या दिवशी सकाळी प्रचार करताना बांधव पुन्हा त्या पाळकाला भेटले आणि त्यांनी त्याला विचारले: “पोलिस स्टेशनमध्ये झालेल्या चर्चेत तुम्ही आमच्याबरोबर इतकं चांगलं कसं बोलला?” पाळकाने त्यांना सांगितले, की तो सायरॉस येथील पुष्कळ साक्षीदारांना ओळखत होता व अनेक वर्षांपासून टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिके वाचत होता. खरे तर, त्याने अनेकदा टेहळणी बुरूज नियतकालिक फोल्डरमध्ये लपवून त्यातूनच चर्चमध्ये भाषण दिले होते. तो म्हणाला: “माझ्याकडे तुमची प्रकाशनं नसती तर जीवन अगदी निरर्थक झालं असतं, असं मला वाटतं. त्यांमुळेच माझ्या जीवनाला अर्थ प्राप्त झाला आहे.”
पाळकाने पुढे साक्षीदारांना सांगितले: “मी एक गोष्ट तुम्हाला सांगितलीच पाहिजे. तुमच्याजवळ जे आहे त्याजशी जडून राहा. तुमचा विश्वास सोडून देण्याची चूक मुळीच करू नका. मी तुम्हाला आता जे सांगत आहे ते मी आजपर्यंत दिलेल्या भाषणांपैकी सर्वात उत्तम भाषण आहे; हे माझं वरवरचं बोलणं नाही, तर मी अगदी माझ्या मनापासून बोलत आहे.”