वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ९/१ पृ. २२-२३
  • बेथेल—चांगले आणि वाईटाचे शहर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बेथेल—चांगले आणि वाईटाचे शहर
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • बेथेल धर्मत्यागाचे केंद्र बनते
  • बेथेल सेवा—अधिक स्वयंसेवकांची आवश्‍यकता
    आमची राज्य सेवा—१९९५
  • हे तुमच्याकरता सर्वात उत्तम करियर असू शकेल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • ‘देवाच्या घराकडे’ गुणग्राहकतेने पाहणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • तुम्ही स्वतःला उपलब्ध करू शकाल का?
    आमची राज्य सेवा—२००३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ९/१ पृ. २२-२३

बेथेल—चांगले आणि वाईटाचे शहर

काही शहरे, त्यांच्यात होणाऱ्‍या घटनांमुळे विख्यात किंवा कुविख्यात होतात. परंतु, बेथेल शहराच्या बाबतीत एक असाधारण गोष्ट होती; ते चांगल्यासाठी आणि वाईटासाठी प्रख्यात होते. कुलपिता याकोब याने या शहराला बेथेल असे नाव दिले; याचा अर्थ, “देवाचे घर” असा होतो. परंतु, एक हजार वर्षांनंतर संदेष्टा होशेय याने या शहराला “क्लेशाचे घर” असे संबोधले. हे शहर चांगले होते; मग ते वाईट कसे झाले? आपण त्याच्या इतिहासातून काय शिकू शकतो?

अब्राहाम हयात असताना अर्थात सा.यु.पू. १९४३ पासून बेथेल शहराचा देवाच्या लोकांशी संबंध येऊ लागला. त्यावेळी, ते कनानी मूळ नाव, लूज याने ओळखले जायचे. ते जेरुसलेमच्या उत्तरेकडे १७ किलोमीटर दूर असलेल्या एका टेकडीवजा राष्ट्रात वसले होते. अब्राहाम आणि त्याचा पुतण्या लोट, बेथेलच्या आसपास असलेल्या सर्वात उंच डोंगरावर मोक्याच्या ठिकाणी उभे राहून खालच्या यार्देन खोऱ्‍याची सुपीक पठारे पाहत असल्याची कल्पना करा. आपल्या मोठ्या कळपासाठी चराऊ क्षेत्र कमी पडत असल्याचे अब्राहाम, लोटाच्या सुज्ञपणे लक्षात आणून देतो; तो म्हणतो: “हे पाहा, माझ्यातुझ्यामध्ये, आणि माझे गुराखी व तुझे गुराखी यांच्यामध्ये तंटा नसावा, कारण आपण भाऊबंद आहो. सर्व देश तुला मोकळा नाही काय? तर मजपासून वेगळा हो, तू डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन; तू उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन.”—उत्पत्ति १३:३-११.

निवड करण्याचा माझाच पहिला हक्क आहे, असा हट्ट अब्राहाम करत बसला नाही. उलट, त्याने त्याच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या लोटाला सर्वोत्तम क्षेत्र निवडू दिले. अब्राहामाच्या या उत्तम मनोवृत्तीचे आपणही अनुकरण करू शकतो. शांतीने बोलण्याद्वारे व निःस्वार्थाने वागण्याद्वारे होणारी खडाजंगी आपण टाळू शकतो.—रोमकर १२:१८.

अनेक वर्षांनंतर अब्राहामाचा नातू याकोब लूज येथे उतरला असता त्याने एक असामान्य स्वप्न पाहिले. त्याने पाहिले की, “एक शिडी पृथ्वीवर उभी केली असून तिचा शेंडा आकाशाला लागला आहे; आणि तिच्यावरून देवदूत चढतउतरत आहेत. आणि पाहा, परमेश्‍वर त्याच्यापाशी उभा” होता. (उत्पत्ति २८:११-१९; पडताळा योहान १:५१.) त्या स्वप्नाचा एक महत्त्वपूर्ण अर्थ होता. आपल्या संतानाविषयी देवाने त्याला दिलेले अभिवचन पूर्ण करण्याकरता याकोबाने पाहिलेले देवदूत त्याची सेवा करणार होते. शिडीच्या वर असलेला यहोवाचा श्रेष्ठ दर्जा दाखवून देतो, की या कार्याकरता तो देवदूतांना साहाय्य करणार होता.

आपल्याला ईश्‍वरी पाठिंबा आहे या खात्रीमुळे याकोब अतिशय प्रभावित झाला. स्वप्नातून जागे झाल्यानंतर त्याने त्या जागेला बेथेल, म्हणजे “देवाचे घर” असे नाव दिले आणि यहोवासमोर शपथ घेतली: “जे अवघे तू मला देशील त्याचा दशमांश मी तुला अवश्‍य अर्पण करीन.”a (उत्पत्ति २८:२०-२२) सर्व काही देवाकडून आले आहे हे जाणल्यामुळे त्याने कृतज्ञतेचे एक प्रतीक म्हणून उदारपणे अर्पण करण्याची इच्छा दाखवली.

आजही देवदूत ख्रिश्‍चनांची सेवा करतात. (स्तोत्र ९१:११; इब्री लोकांस १:१४) तेही मिळणाऱ्‍या आशीर्वादांबद्दल ‘देवाला समृद्ध आभार प्रदर्शित’ करून कृतज्ञता व्यक्‍त करू शकतात.—२ करिंथकर ९:११, १२.

कालांतराने, याकोबाच्या वंशजांचे एक राष्ट्र बनले. त्यांचा नेता यहोशवा याने, कनानच्या संघर्षाला तोंड फुटायच्या थोड्या काळाआधी बेथेलच्या मूर्तिपूजक राजाचा पराभव केला. (यहोशवा १२:१६) शास्त्यांच्या जमान्यात, संदेष्ट्री दबोरा बेथेलच्या जवळ राहायची आणि लोकांना यहोवाचा संदेश कळवायची. शमुवेलही इस्राएल राष्ट्राचा न्याय करताना वेळोवेळी बेथेलला भेट द्यायचा.—शास्ते ४:४, ५; १ शमुवेल ७:१५, १६.

बेथेल धर्मत्यागाचे केंद्र बनते

परंतु, सा.यु.पू. ९९७ मध्ये राज्य विभागल्यावर बेथेलचा शुद्ध उपासनेशी असलेला संबंध संपुष्टात आला. राजा यराबामाने बेथेलला वासराच्या उपासनेचे केंद्रस्थान बनवले; त्याच्यामते वासरू यहोवाचे प्रतीक होते. (१ राजे १२:२५-२९) याच कारणास्तव, बेथेलच्या नाशाची भविष्यवाणी करताना, होशेयने त्याला “बेथआवेन” असे नाव दिले; याचा अर्थ “क्लेशाचे घर” असा होतो.—होशेय १०:५, ८.

बेथेल हे आध्यात्मिक क्लेशाचे केंद्रस्थान बनले होते तरी, त्याजशी संबंधित घटना महत्त्वपूर्ण धडा शिकवतात. (रोमकर १५:४) एक असा धडा एका अनामिक संदेष्ट्याशी संबंधित आहे; त्याला बेथेलमधील वेद्यांच्या आणि याजकांच्या नाशाची भविष्यवाणी करण्याकरता यहूदाहून बेथेलला धाडले होते. यहोवाने त्याला, दक्षिणेकडे काही अंतरावरच असलेल्या यहूदाला देखील अनाशापोटी जाण्यास सांगितले. हा संदेष्टा निर्भीडपणे इस्राएलचा राजा यराबाम याच्यासमक्ष बेथेलच्या वेदीविरुद्ध बोलला. पण नंतर बेथेलमधील एका वृद्ध संदेष्ट्याच्या घरी जेवण करून त्याने देवाची आज्ञा मोडली. का बरे? सहसंदेष्ट्याला आदरातिथ्य दाखवावे, अशी यहोवाच्या देवदूताने आपल्याला आज्ञा दिली आहे, असे त्या वृद्ध संदेष्ट्याने त्याला खोटेच सांगितले. यहूदातून आलेला हा संदेष्टा त्याच्या अवज्ञेमुळे अकाली मरण पावला.—१ राजे १३:१-२५.

एखाद्या सहविश्‍वासूने आपल्याला आक्षेपार्ह वाटणारे कार्य करायला सुचवले, तर आपण कशी प्रतिक्रिया दाखवली पाहिजे? समजा एखादा सल्ला चुकीचा आहे परंतु तो देण्यामागील हेतू कितीही चांगला असला, तरी तो हानीकारकच ठरू शकतो. (पडताळा मत्तय १६:२१-२३.) प्रार्थना व यहोवाचे वचन यांतून मार्गदर्शन मिळवण्याद्वारे आपण त्या अनामिक संदेष्ट्याप्रमाणे कोणतीही घोडचूक करून बसणार नाही.—नीतिसूत्रे १९:२१; १ योहान ४:१.

सुमारे १५० वर्षांनंतर, संदेष्टा आमोस बेथेलविरुद्ध भविष्यवाणी करण्याकरता उत्तरेकडे गेला. आमोसने त्याच्या शत्रूंचा कडा निषेध केला; या शत्रूंमध्ये, “यहूदा देशात पळून जा” असे मोठ्या तोंडाने म्हणणाऱ्‍या याजक अमस्याचा देखील समावेश होता. पण आमोसने छाती ठोकपणे, खुद्द याजकाच्या घराण्यावर कोसळणाऱ्‍या संकटाबद्दल अमस्याला सांगितले. (आमोस ५:४-६; ७:१०-१७) यहोवा आपल्या विनम्र सेवकांचे धाडस बांधतो याची आठवण त्याचे उदाहरण आपल्याला करून देते.—१ करिंथकर १:२६, १७.

सरतेशेवटी, यहूदाचा विश्‍वासू राजा योशीया याने ‘बेथेल येथील वेदी पाडून टाकली, उच्च स्थान जाळून टाकले, त्याचा भुगा केला व अशेरामूर्ती जाळून टाकली.’ (२ राजे २३:१५, १६) देवाच्या सूचनांचे आवेशाने पालन करून व मंडळी शुद्ध राखण्यासाठी पुढाकार घेऊन आज वडील देखील त्याच्या उत्तम उदाहरणाचे अनुकरण करू शकतात.

बेथेलच्या इतिहासातील ह्‍या घटना धार्मिकता आणि दुष्टाई, यहोवाची आज्ञा पाळणे व अवज्ञा करणे यांच्या परिणामांचे हुबेहूब वर्णन करतात. अनेक वर्षांआधी मोशेने इस्राएल राष्ट्रापुढे ही निवड ठेवली होती: “जीवन व सुख, आणि मरण व दुःख, ही आज मी तुझ्यापुढे ठेवली आहेत.” (अनुवाद ३०:१५, १६) बेथेलच्या इतिहासावर मनन केल्याने ‘क्लेशाच्या घराऐवजी’ खऱ्‍या उपासनेचे ठिकाण असलेल्या ‘देवाच्या घराशी’ संलग्न असण्यास आपल्याला प्रोत्साहन मिळते.

[तळटीपा]

a याकोब आणि अब्राहाम या दोघांनी स्वेच्छेने दशमांश दिला.

[२३ पानांवरील चित्र]

बेथेलचे अवशेष, येथे यराबामाने वासराचे उपासनाकेंद्र स्थापन केले

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा