अखेरीस—सर्वांकरता न्याय
“विव्हळणारे आवाज, चिंतातूर आवाज, कोणी ऐकत नाही म्हणून निराश झालेले आवाज यांना नव्याने ऐकण्याचा आम्ही प्रयत्न करू . . . कायद्यात जिवंतपणा आणणे ही गोष्ट बाकी आहे; शेवटी हे निश्चित करण्यासाठी, की देवासमोर सर्वांचा जन्म एकाच दर्जामध्ये होतो त्यामुळे मनुष्यासमोर सर्वांचा जन्म एकाच दर्जामध्ये होतो.”—अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड मिलहॉस निक्सन यांनी जानेवारी २०, १९६९ रोजी दिलेले प्रांरभिक भाषण.
राजे, अध्यक्ष आणि प्रधानमंत्री पदावर येतात तेव्हा त्यांचा न्यायाविषयी बोलण्याचा कल असतो. अमेरिकेचे भूतपूर्व अध्यक्ष, रिचर्ड निक्सन हे या गोष्टीला अपवाद नव्हते. परंतु प्रत्यक्ष इतिहासात काय घडले हे पाहिल्यास त्यांचे शब्द कवडीमोल वाटू लागतात. निक्सन यांनी ‘कायद्यात जिवंतपणा आणण्याची’ शपथ घेतली होती, पण नंतर त्यांनी स्वतः कायद्याचा भंग केला आणि त्यांची अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली. तीन दशकांनंतरही ‘विव्हळणारे, चिंतातूर आणि निराशेचा सूर असलेले’ आवाज अद्याप दुर्लक्षित आहेत.
अशाप्रकारचे आवाज ऐकणे आणि तक्रारींकडे लक्ष देणे इतके सोपे काम नाही आणि हे अनेक सद्हेतुक नेत्यांनी अनुभवले आहे. ‘सर्वांकरता न्याय’ हे फसवे ध्येय शाबीत झाले आहे. तथापि, अनेक शतकांपूर्वी, न्यायाविषयी एक अतुलनीय अभिवचन देण्यात आले होते ज्याकडे आपण लक्ष देणे आवश्यक आहे.
यशया नामक संदेष्ट्याद्वारे देवाने त्याच्या लोकांना असे आश्वासन दिले, की तो त्यांच्याकडे त्याचा “सेवक” पाठवील आणि तो सेवक त्याने स्वतः निवडलेला असेल. यहोवाने त्यांना म्हटले: “त्याच्याठायी मी आपला आत्मा घातला आहे; तो राष्ट्रांस न्याय प्राप्त करून देईल.” (यशया ४२:१-३) प्रत्येक राष्ट्राला सर्वकाळासाठी न्याय मिळवून देण्याची अशी ही व्यापक घोषणा करण्याचे कोणाही माणसाचे धाडस होणार नाही. प्रत्येक राष्ट्रास निरंतर न्याय हा या घोषणेचा अर्थ आहे. या अभिवचनावर विश्वास ठेवता येऊ शकतो का? अशाप्रकारची असाधारण प्राप्ती कधी वास्तवात येऊ शकेल का?
विश्वासयोग्य अभिवचन
अभिवचन पूर्ण करणाऱ्या व्यक्तीनेच अभिवचन द्यावे. या बाबतीत, माझा “सेवक” संपूर्ण जगात न्याय स्थापन करील, अशी घोषणा करणारा सर्वसमर्थ देवाशिवाय दुसरा कोणी नाही. राजकीय नेत्यांप्रमाणे यहोवा निव्वळ पोकळ अभिवचने देत नाही. बायबल आपल्याला आश्वासन देते: “खोटे बोलणे देवाला अशक्य आहे.” (इब्री लोकांस ६:१८) देव अगदी ठामपणे सांगतो: “मी जे ठरवले आहे ते पूर्ण झालेले असेल.”—यशया १४:२४, टुडेज इंग्लिश व्हर्शन.
देवाने निवडलेला “सेवक” अर्थात येशू ख्रिस्त याचा अहवाल वाचून देखील त्या अभिवचनावरील आपला विश्वास मजबूत होतो. न्याय प्रस्थापित करणाऱ्याने स्वतः न्यायावर प्रेम करण्यास हवे आणि न्यायाने जगण्यास हवे. मनुष्य या नात्याने येशूचा निष्कलंक अहवाल आहे; त्याला ‘न्यायाची चाड आणि स्वैराचाराचा वीट होता.’ (इब्री लोकांस १:९) त्याने जे म्हटले, ज्याप्रकारे जीवन व्यतीत केले आणि इतकेच नव्हे तर तो ज्याप्रकारे मरण पावला या सर्व गोष्टींनी तो खरोखरच न्यायी मनुष्य असल्याचे शाबीत केले. एका रोमी शताधिपतीने येशूची परीक्षा आणि त्याला देण्यात आलेला मृत्युदंड पाहिला होता; येशूच्या मृत्यूवेळी हा शताधिपती असे म्हणण्यास प्रेरित झाला: “खरोखर हा मनुष्य नीतिमान होता.”—लूक २३:४७.
येशू स्वतः धार्मिक जीवन जगला खरा शिवाय, त्याच्या काळात बोकाळलेल्या अन्यायालाही त्याने विरोध केला. त्याने हे कोणत्याही विद्रोही किंवा क्रांतिकारी मार्गाने केले नाही, तर ऐकणाऱ्या प्रत्येकाला खऱ्या न्यायाविषयी शिकवण्याद्वारे त्याने असे केले. खरा न्याय आणि खरी धार्मिकता कशी आचरणात आणावी, हे सांगणारे त्याचे डोंगरावरील प्रवचन या गोष्टीचे एक उत्तम उदाहरण आहे.—मत्तय, अध्याय ५-७.
बोले तैसा चाले, असा येशू होता. यहुदी समाजात “अस्पृश्य” समजल्या जाणाऱ्या दुर्दैवी कुष्ठरोग्यांचा त्याने तिरस्कार केला नाही. तर, तो त्यांच्याशी बोलला, त्यांना स्पर्श केला आणि त्याने त्यांना बरे सुद्धा केले. (मार्क १:४०-४२) त्याला भेटलेले सर्वजण मग ते गरीब असोत अथवा व्यथित असोत त्याच्यासाठी महत्त्व राखून आहे. (मत्तय ९:३६) त्याने त्यांना म्हटले: “अहो कष्टी भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन.”—मत्तय ११:२८.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, येशूने त्याच्या भोवताली असलेल्या अन्यायामुळे स्वतःला भ्रष्ट किंवा कटू होऊ दिले नाही. त्याने वाईटाची परतफेड वाईटाने केली नाही. (१ पेत्र २:२२, २३) त्याला अतिशय वेदना होत असताना त्याला वधस्तंभावर खिळणाऱ्या सैनिकांसाठी त्याने त्याच्या स्वर्गीय पित्याकडे प्रार्थना केली. येशूने कळकळीची विनंती केली: “हे बापा, त्यांना क्षमा कर; कारण ते काय करितात हे त्यांना समजत नाही.” (लूक २३:३४) निश्चितच, येशूने ‘राष्ट्रांना न्याय काय आहे ते कळवले.’ (मत्तय १२:१८) न्यायी जग स्थापन करण्याच्या देवाच्या इच्छेचा सबळ पुरावा त्याच्या पुत्राच्या जिवंत उदाहरणापेक्षा आणि कोणता असू शकतो?
अन्यायावर मात केली जाऊ शकते
अन्यायावर मात केली जाऊ शकते, याचा जिवंत पुरावा आजच्या जगात देखील उपलब्ध आहे. व्यक्तिगतरीत्या तसेच संघटितरीत्या यहोवाचे साक्षीदार कलुषितपणा, पक्षपात, जातिवाद आणि हिंसाचारास वश करण्यासाठी झटतात. खालील एक उदाहरण विचारात घ्या.
स्पेनमधील बसाक कंट्री येथे राहणाऱ्या पेड्रोa नामक व्यक्तीला असे वाटत होते, की न्याय प्रस्थापित करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे क्रांतीकारी चळवळ. त्यामुळे तो अतिरेकी संघटनेचा सदस्यही बनला. या संघटनेने त्याला फ्रान्समध्ये निमलष्करी प्रशिक्षण दिले. त्याचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक अतिरेकी गट स्थापन करून पोलिसांच्या बराकींमध्ये विस्फोट घडवून आणण्याचे काम त्याच्यावर सोपवण्यात आले. त्याच्या साथीदारांनी विस्फोटांची तयारी केलीच होती तोच तो पोलिसांच्या हाती लागला. त्याला १८ महिने तुरुंगात काढावे लागले, तरी तुरुंगात राहूनही त्याचे राजकारण हे चालूच होते. उदाहरणार्थ, उपोषणाला बसणे आणि एकदा तर त्याने स्वतःच्या मनगटावर वार करून घेतले होते.
आपण न्यायासाठी लढत आहोत, अशी पेड्रोची समजूत होती. नंतर त्याला यहोवाविषयी आणि त्याच्या उद्देशांविषयी कळले. पेड्रो तुरुंगात असताना त्याच्या पत्नीने यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करण्यास सुरवात केली आणि त्याची जेव्हा तुरुंगातून सुटका झाली तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला एकदा सभेला यायला सांगितले. त्याला सभा इतकी आवडली की त्याने बायबल अभ्यासाची मागणी केली, बायबल अभ्यासामुळे त्याच्या विचारसरणीत आणि त्याच्या जीवनशैलीत विलक्षण बदल झाला. अखेरीस, १९८९ मध्ये पेड्रोने आणि त्याच्या पत्नीने बाप्तिस्मा घेतला.
पेड्रो म्हणतो: “मी अतिरेकी असताना माझ्या हातून कोणी मारले गेले नाही म्हणून मी यहोवाचे आभार मानतो. आता मी देवाच्या आत्म्याच्या तलवारीचा अर्थात बायबलचा उपयोग खऱ्या शांतीचा आणि खऱ्या न्यायाचा संदेश—देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा संदेश सांगण्यासाठी करतो.” पेड्रो आता यहोवाच्या साक्षीदारांमध्ये वडील या नात्याने सेवा करत आहे. या बराकी उद्ध्वस्त करण्याचा त्याचा पूर्वी उद्देश होता. याच बराकींमध्ये तो गेला, परंतु तेथील लोकांना शांतीच्या संदेशाचा प्रचार करण्यासाठी.
यहोवाचे साक्षीदार धार्मिक जगाची वाट पाहत असल्यामुळे ते स्वतःमध्ये अशाप्रकारचे बदल करतात. (२ पेत्र ३:१३) हे सर्व लवकरच होणाऱ्या देवाच्या अभिवचनावर त्यांचा पूर्ण विश्वास असला, तरी त्यांना या गोष्टीची देखील जाण आहे, की त्या न्यायाच्या एकवाक्यतेत जगणे हे त्यांचे कर्तव्य आहे. आपण आपला भाग पूर्ण करावा, ही देव आपल्याकडून अपेक्षा करतो असे बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगते.
धार्मिकतेची पेरणी करणे
हे खरे आहे, की आपल्यावर जेव्हा अन्याय होतो तेव्हा आपण असे ओरडतो: “न्याय करणारा देव आहे कोठे?” मलाखीच्या दिवसांतील यहुद्यांचे हे उद्गार होते. (मलाखी २:१७) देवाने त्यांच्या तक्रारीची गंभीरपणे दखल घेतली का? उलटपक्षी, या लोकांच्या तक्रारीचा त्याला “कंटाळा” आला कारण ते इतर गोष्टींशिवाय त्यांच्या वृद्ध झालेल्या पत्नींचा विश्वासघात करत होते, क्षुल्लक कारणांवरून त्यांना घटस्फोट देत होते. यहोवाने ‘त्या लोकांच्या तारुण्यातल्या स्त्रियांविषयी चिंता व्यक्त केली, या स्त्रिया त्यांच्या सहकारिणी व त्यांच्या कराराच्या पत्नी असूनही ते त्यांच्यासोबत विश्वासघाताने वर्तले होते.’—मलाखी २:१४.
आपण स्वतः अन्यायाने वागत असल्यास आपण अन्यायाबद्दल यथायोग्यपणे तक्रार करू शकतो का? त्याउलट, आपल्या हृदयांतून पूर्वग्रह आणि जातिवाद समूळ काढून टाकण्याद्वारे, सर्वांशी निःपक्षपातीपणे आणि प्रेमाने वागण्याद्वारे आणि वाईटाची परतफेड वाईटाने न करण्याद्वारे आपल्याला न्याय खरोखरच प्रिय असल्याचे आपण दाखवत असतो.
आपल्याला न्यायाची कापणी करायची असल्यास ‘धार्मिकतेची पेरणी करण्याचे’ बायबल आपल्याला आर्जवते. (होशेय १०:१२) अन्यायावरील प्रत्येक व्यक्तिगत विजय महत्त्वाचा आहे, मग तो कितीही लहान असला तरी हरकत नाही. मार्टिन लुथर किंग जुनियर याने लेटर फ्रॉम बिरमिंघॅम जेल यात असे लिहिले: “अन्याय कोठेही असला तरी सर्वत्र असलेल्या न्यायाला त्याचा धोका असतो.” लवकरच येणाऱ्या धार्मिकतेच्या नवीन जगात वास्तव्य करण्यासाठी देव अशा लोकांची निवड करतो जे ‘धार्मिकतेचे अवलंबन करतात.’—सफन्या २:३.
मानवी अभिवचनाच्या डळमळीत पायावर आपण न्यायाची आशा उभारूच शकत नाही, तर आपल्या निर्माणकर्त्याच्या वचनावर आपण विश्वास ठेवू शकतो. यास्तव, येशूने त्याच्या अनुयायांना देवाचे राज्य येण्याविषयी प्रार्थना करत राहण्यास सांगितले. (मत्तय ६:९, १०) त्या राज्याचा नियुक्त राजा येशू ‘धावा करणाऱ्या दरिद्री, दीन व अनाथ लोकांना सोडवील. दुबळे व दरिद्री लोकांवर तो दया करील, दरिद्र्यांचे जीव तो तारील.’—स्तोत्र ७२:१२, १३.
स्पष्टपणे, अन्याय हा कायम राहणार नाही. संपूर्ण पृथ्वीवरील ख्रिस्ताचे राज्य अन्यायावर कायमचा विजय मिळवेल, देव त्याचा संदेष्टा यिर्मया याच्याद्वारे आपल्याला खात्री देतो: “जे अभिवचन मी दिले आहे ते पूर्ण करण्याचा काळ जवळ येत आहे. . . . तेव्हा राजा होण्यासाठी दाविदाच्या एका नीतिमान वंशजाची मी निवड करीन. तो देशात न्यायनीती प्रस्थापित करील.”—यिर्मया ३३:१४, १५, कॉमन लँग्वेज भाषांतर.
[तळटीपा]
a एक पर्यायी नाव.