निर्णयाच्या खोऱ्यात न्यायदंड बजावणे
“राष्ट्रे . . . यहोशाफाटाच्या खोऱ्यात येवोत; तेथे मी न्यायासनावर बसून . . . सर्व राष्ट्रांचा न्याय करणार आहे.”—योएल ३:१२.
१. योएल “निर्णयाच्या खोऱ्यात” लोकांच्या झुंडी एकत्र झाल्याचे का पाहतो?
“लोकांच्या झुंडी, निर्णयाच्या खोऱ्यात लोकांच्या झुंडी आहेत”! हे प्रेरणा देणारे शब्द आपल्याला योएल ३:१४ येथे वाचण्यास मिळतात. या लोकांच्या झुंडी का एकत्र झाल्या आहेत? योएल उत्तर देतो: “परमेश्वराचा दिवस येऊन ठेपला आहे.” हा यहोवाचा दोषनिवारणाचा महान दिवस आहे—ख्रिस्त येशूच्या अधीन असलेल्या देवाच्या प्रस्थापित राज्याचा धिक्कार केलेल्या लोकसमुदायांवर न्यायदंड बजावण्याचा तो दिवस आहे. शेवटी, प्रकटीकरणातील ७ व्या अध्यायातील “चार देवदूत,” ‘पृथ्वीच्या चार वाऱ्यांवरील’ आपली मजबूत पकड सैल करणार आहेत आणि त्याचा परिणाम म्हणजे “जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही, व पुढे कधीहि येणार नाही असे मोठे संकट त्या काळी येईल.”—प्रकटीकरण ७:१; मत्तय २४:२१.
२. (अ) यहोवाच्या न्यायदंड बजावण्याच्या ठिकाणाला उचितपणे ‘यहोशाफाटाचे खोरे’ असे का संबोधण्यात आले आहे? (ब) हल्ला झाल्यानंतर यहोशाफाटाने कशाप्रकारे उचित प्रतिक्रिया दाखवली?
२ योएल ३:१२ येथे, न्यायदंड घोषित करण्याच्या ठिकाणाला ‘यहोशाफाटाचे खोरे’ असे संबोधण्यात आले आहे. हे अगदी योग्य आहे कारण यहुदाच्या इतिहासाच्या एका खळबळजनक काळादरम्यान यहोवाने, यहोशाफाट नामक एका चांगल्या राजाच्या वतीने तेथे न्यायदंड बजावला; यहोशाफाट या नावाचा अर्थ “यहोवा न्यायाधीश आहे,” असा होतो. त्याकाळी जे झाले त्याचा विचार केल्यामुळे आज जे लवकरच घडणार आहे ते चांगल्याप्रकारे समजण्यास आपल्याला मदत होईल. याचा अहवाल २ इतिहास अध्याय २० मध्ये आढळतो. त्या अध्यायाच्या पहिल्या वचनात आपण वाचतो, की “मवाबी व अम्मोनी आणि त्यांच्याबरोबर मऊन्यांतले [अमोन्यातले] कित्येक लोक युद्ध करावयास यहोशाफाटावर चालून आले.” यहोशाफाटाने कशी प्रतिक्रिया दाखवली? यहोवाचा एकनिष्ठ सेवक संकटप्रसंगी नेहमी जे करतो तेच नेमके त्याने केले. तो मार्गदर्शनासाठी यहोवाकडे गेला आणि त्याने मोठ्या तन्मयतेने प्रार्थना केली: “हे आमच्या देवा; तू त्यांचे शासन करणार नाहीस का? कारण आमच्यावर चालून आलेल्या या मोठ्या समूहाशी सामना करण्यास आम्हास ताकद नाही; आम्ही काय करावे ते आम्हास सुचत नाही; पण आमचे डोळे तुजकडे लागले आहेत.”—२ इतिहास २०:१२.
यहोवा प्रार्थनेचे उत्तर देतो
३. यहुदातील लोक आसपासच्या राष्ट्रांच्या जोरदार हल्ल्याला तोंड देत होते तेव्हा यहोवाने त्यांना कोणत्या सूचना दिल्या?
३ “सर्व यहुदी आपली मुलेबाळे व स्त्रियांसह परमेश्वरासन्मुख उभे राहिले” तेव्हा यहोवाने त्यांना उत्तर दिले. (२ इतिहास २०:१३) तो आज ज्याप्रमाणे “विश्वासू आणि बुद्धिमान दासाला” उपयोगात आणतो त्याप्रमाणे प्रार्थना ऐकणाऱ्या महान यहोवाने त्या जमा झालेल्या लोकांना उत्तर देण्यासाठी लेवीय संदेष्टा यहजिएल याला अधिकार दिला. (मत्तय २४:४५) आपण वाचतो: “परमेश्वर तुम्हास सांगत आहे की, हा मोठा समुदाय पाहून घाबरू नका; कचरू नका; कारण युद्ध तुमचे नव्हे, देवाचे आहे. . . . या लढाईत तुम्हास लढावे लागणार नाही; . . . तुम्ही स्थिर उभे राहा आणि परमेश्वर तुमचे कसे तारण करील ते पाहा; घाबरू नका, कचरू नका; उद्या त्यांजवर चाल करून जा, कारण परमेश्वर तुमच्या बरोबर आहे.”—२ इतिहास २०:१५-१७.
४. शत्रूंच्या आव्हानाला सामोरे जाण्याकरता स्वस्थ न बसता क्रियाशील व्हावे, अशी अपेक्षा यहोवाने त्याच्या लोकांकडून कोणत्या मार्गाने केली?
४ राजा यहोशाफाट आणि त्याच्या लोकांनी केवळ स्वस्थ बसून आश्चर्यकारक सुटका होण्याची वाट पाहात बसावे, अशी अपेक्षा यहोवाने त्यांच्याकडून केली नव्हती. शत्रूंच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी त्यांना पहिले पाऊल उचलायचे होते. राजा आणि ‘सर्व यहुदी लोकांनी त्यांच्या मुलांबाळांसह व स्त्रियांसह’ मजबूत विश्वास प्रदर्शित केला कारण ते दिलेल्या आज्ञेच्या एकवाक्यतेत पहाटेस उठून हल्ला चढविणाऱ्या टोळ्यांना सामोरे गेले. वाटेवर असताना, राजाने ईश्वरशासित सूचना आणि उत्तेजन देण्याचे चालू ठेवले; त्याने असे आर्जवले: “तुमचा देव परमेश्वर याच्यावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल; त्याच्या संदेष्ट्यांवर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल.” (२ इतिहास २०:२०) यहोवावर विश्वास! त्याच्या संदेष्ट्यांवर विश्वास! हीच यशाची गुरुकिल्ली होती. त्याचप्रमाणे आज, आपण यहोवाच्या सेवेत क्रियाशील असताना, तो आपल्या विश्वासाला विजयी करील किंवा कसे असा संशय आपल्या मनात कधीही येऊ नये!
५. आज यहोवाचे साक्षीदार यहोवाची स्तुती करण्यास कशाप्रकारे क्रियाशील आहेत?
५ यहोशाफाटाच्या दिवसांतील यहुद्यांप्रमाणे आपणही ‘यहोवाचा धन्यवाद केला पाहिजे कारण त्याची दया सनातन आहे.’ आपण ही स्तुती कशी करतो? आवेशाने राज्याचा प्रचार करण्याद्वारे! यहुदी लोकांनी “स्तोत्र गाऊन स्तवन” केले त्याप्रमाणे आपणही आपल्या कृत्यांद्वारे आपल्या विश्वासाला मजबूत बनवतो. (२ इतिहास २०:२१, २२) होय, यहोवा त्याच्या शत्रूंच्या विरोधात कार्य करण्यासाठी तयारी करतो तेव्हा आपणही अशाचप्रकारच्या खऱ्या विश्वासाचे प्रदर्शन करू या! हा दूरचा पल्ला असला तरी विश्वासात कार्यशील होऊन आपण टिकून राहण्याचा संकल्प करू या आणि खरे तर त्याचे विजयी लोक पृथ्वीवरील कठीण परिस्थितींमध्ये आज तसेच करत आहेत. छळ, हिंसाचार, दुष्काळ आणि भयंकर आर्थिक परिस्थिती यांमुळे प्रभावित झालेले आपले बांधव विलक्षण परिणामांचा अनुभव घेत आहेत जे १९९८ च्या यहोवाच्या साक्षीदारांच्या वार्षिक अहवाल पुस्तकात नमूद करण्यात आले आहेत.
यहोवा त्याच्या लोकांना वाचवतो
६. मजबूत विश्वास आज आपल्याला एकनिष्ठ राहण्यास कशी मदत करतो?
६ यहुदाच्या सभोवताली असणाऱ्या अभक्त राष्ट्रांनी देवाच्या लोकांना गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला; परंतु यहोवाच्या सेवकांनी उदाहरणीय विश्वासाने यहोवाची स्तुती करण्याद्वारे त्यांना प्रत्युत्तर दिले. आपणही आज अशाचप्रकारचा विश्वास दाखवू शकतो. जीवनातील प्रत्येक पैलूत यहोवाची स्तुती करण्याद्वारे आपण आपली आध्यात्मिक शस्त्रसामग्री मजबूत करत असतो आणि त्यामुळे सैतानाच्या धूर्त क्लृप्त्यांचा काहीही परिणाम होत नाही. (इफिसकर ६:११) आपल्या सभोवतालच्या लय पावत असलेल्या जगाचे वैशिष्ट्य असलेले अवनत मनोरंजन, भौतिकवाद आणि उदासीनता यांद्वारे विचलित होण्याचा मोह दडपून टाकण्यास मजबूत विश्वासाची मदत होईल. आपण जसजसे “यथाकाळी” मिळणाऱ्या आध्यात्मिक अन्नाद्वारे निरंतर स्वतःचे पोषण करतो तसतसे हा अजिंक्य विश्वास ‘विश्वासू आणि बुद्धिमान दासासोबत’ निष्ठेने निरंतर सेवा करण्यास मदत करील.—मत्तय २४:४५.
७. यहोवाच्या साक्षीदारांवर झालेल्या अनेक हल्ल्यांना त्यांनी कशी प्रतिक्रिया दाखवली आहे?
७ आपल्या बायबल आधारित विश्वासामुळे आपल्याला सामर्थ्य प्राप्त होईल जेणेकरून आपण द्वेषयुक्त मोहिमांना तोंड देऊ शकतो; मत्तय २४:४८-५१ मधील ‘दुष्ट दासाचा’ आत्मा प्रदर्शित करणाऱ्या लोकांद्वारे या मोहिमा प्रेरित केल्या जातात. या भविष्यवाणीची विलक्षण पूर्णता करत असता आज धर्मत्यागी लोक अनेक देशांत क्रियाशीलपणे असत्य गोष्टींचे आणि दूषित मतप्रचाराचे बी पेरत आहेत, इतकेच नव्हे तर ते देशांतील अधिकार पदावर असणाऱ्या लोकांशी संगनमत करत आहेत. योग्य त्या ठिकाणी यहोवाच्या साक्षीदारांनी उत्तर दिले आहे, जसे फिलिप्पैकर १:७ (NW) मध्ये वर्णन करण्यात आले आहे, ‘सुवार्तेचे संरक्षणाद्वारे आणि कायद्याच्या माध्यमाने तिचे समर्थन करण्याद्वारे.’ उदाहरणार्थ, ग्रीसच्या एका खटल्यात सप्टेंबर २६, १९९६ रोजी स्ट्रॉजबर्ग येथे, मानवी हक्काच्या युरोपीय न्यायालयाच्या नऊ न्यायाधिशांनी एकमताने पुन्हा जोर देऊन सांगितले, की “यहोवाचे साक्षीदार ‘ज्ञात धर्म’ या संज्ञेशी पूर्ण एकवाक्यतेत आहेत,” त्यांना वैचारिक स्वातंत्र्याचा, विवेकी स्वातंत्र्याचा, विश्वासाच्या स्वातंत्र्याचा आणि त्यांचा विश्वास इतरांना सांगण्याच्या स्वातंत्र्याचा हक्क आहे. धर्मत्यागी लोकांविषयी देवाचा न्यायदंड म्हणतो: “‘आपल्या ओकारीकडे परतलेले कुत्रे व अंग धुतल्यानंतर गाळात लोळण्यास परतलेली डुकरीन,’ अशी जी म्हण आहे, तिच्यासारखी त्यांची गत झाली आहे.”—२ पेत्र २:२२.
८. यहोशाफाटाच्या दिवसांत, यहोवाने त्याच्या लोकांच्या शत्रूंवर कशाप्रकारे न्यायदंड बजावला?
८ यहोशाफाटाच्या दिवसांत, यहोवाने त्याच्या लोकांना इजा पोहंचू इच्छिणाऱ्यांवर न्यायदंड बजावला. आपल्याला असे वाचावयास मिळते: “अम्मोनी, मवाबी व सेइर पहाडातले लोक जे यहूदावर चाल करून येत होते त्यांस गाठण्यास परमेश्वराने दबा धरणारे बसविले व त्यांनी त्यांचा मोड केला. अम्मोनी व मवाबी सेइर पहाडातल्या लोकांची अजिबात कत्तल उडवून त्यांचा विध्वंस करावा म्हणून त्यांजवर उठले; सेइरनिवाश्यांचा निःपात केल्यावर ते एकमेकांचा वध करू लागले.” (२ इतिहास २०:२२, २३) यहुदी लोकांनी त्या जागेचे नाव बराखा खोरे असे ठेवले, या शब्दाचा अर्थ “आशीर्वाद” असा होतो. आजच्या दिवसांतही, यहोवाच्या त्याच्या शत्रूंवरील न्यायदंडामुळे त्याच्या लोकांना मोठा आशीर्वाद प्राप्त होईल.
९, १०. यहोवाच्या प्रतिकूल न्यायदंडास कोणी स्वतःला पात्र असल्याचे दाखवले आहे?
९ आपल्या मनात कदाचित असा प्रश्न येईल, की आज यहोवा कोणत्या लोकांवर प्रतिकूल न्यायदंड बजावेल? या प्रश्नाचे उत्तर पाहण्यासाठी आपल्याला योएलच्या भविष्यवाणीकडे जावे लागेल. योएल ३:३ त्याच्या लोकांच्या शत्रूंविषयी बोलते, त्या लोकांनी “मुलगा देऊन वेश्या घेतली, द्राक्षारस प्यावयासाठी त्यांनी मुलगी विकली.” होय, ते देवाच्या सेवकांना आपल्यापेक्षा फार कनिष्ठ समजतात; देवाच्या सेवकांच्या मुलांचे मोल एका वेश्येच्या किंमतीपेक्षा किंवा द्राक्षारसाच्या एका पेल्यापेक्षा अधिक नाही असे त्यांना वाटते. परंतु त्यांना याचा जाब द्यावा लागेल.
१० आध्यात्मिक वेश्यावृत्ती राखणाऱ्यांवर अशाचप्रकारचा न्यायदंड बजावण्यात येईल. (प्रकटीकरण १७:३-६) यहोवाच्या साक्षीदारांचा छळ करण्यासाठी आणि त्यांच्या कामात अडथळा आणण्यासाठी राजकीय अधिकाऱ्यांना प्रोत्साहित करणारे लोक विशेष दोषास्पद आहेत; अलीकडे पूर्व युरोपमध्ये अशांती भडकविणारे काही धार्मिक पुढारी अगदी हेच करत आहेत. अशाप्रकारच्या घोर अन्यायी लोकांच्या विरोधात कार्य करण्याचा आपला निर्धार यहोवा व्यक्त करतो.—योएल ३:४-८.
“लढाईची तयारी करा!”
११. यहोवा त्याच्या शत्रूंना लढाईसाठी कसे आव्हान देतो?
११ त्यानंतर, यहोवा राष्ट्रांमध्ये एक आव्हानात्मक घोषणा करण्याकरता त्याच्या लोकांना बोलावतो: “लढाईची तयारी करा, वीरांची उठावणी करा; सर्व लढवय्यांना एकवट होऊ द्या, आणि त्यांस चाल करू द्या.” (योएल ३:९) ही एक असाधारण युद्धाची घोषणा आहे—धार्मिक युद्धाची. यहोवाचे एकनिष्ठ साक्षीदार खोट्या मतप्रसाराला उत्तर देण्यासाठी आध्यात्मिक शस्त्रसामग्रीवर विसंबून राहतात; असत्याला सत्याने प्रत्युत्तर देतात. (२ करिंथकर १०:४; इफिसकर ६:१७) लवकरच देव ‘सार्वभौम देवाच्या त्या महान दिवसाच्या लढाईची’ घोषणा करील. यामुळे देवाच्या सार्वभौम सत्तेच्या विरोधातील पृथ्वीवरील सर्व लोकांचे उच्चाटन होईल. पृथ्वीवरील त्याच्या लोकांना या लढाईत शारीरिकरीत्या कोणताही सहभाग घेण्याची आवश्यकता नसेल. अक्षरार्थ आणि लाक्षणिक अर्थाने, त्यांनी ‘त्यांच्या तरवारी मोडून त्यांचे फाळ केले आहेत आणि भाल्याच्या कोयत्या केल्या आहेत.’ (यशया २:४) उलटपक्षी, यहोवा विरोध करणाऱ्या राष्ट्रांना याच्याविरुद्ध करण्याचे आव्हान करतो: “तुमचे फाळ ठोकून त्यांच्या तरवारी बनवा, आपल्या कोयत्यांचे भाले बनवा.” (योएल ३:१०) या लढाईत संपूर्ण शस्त्रागार आणि सर्व अत्याधुनिक युद्धसामग्री लावण्याचे यहोवा त्यांना निमंत्रण देतो. परंतु ते विजयी होणार नाहीत कारण संघर्ष आणि विजय यहोवाचा आहे!
१२, १३. (अ) शीत युद्ध समाप्त होऊनही अनेक राष्ट्रांनी हे कसे दाखवले आहे, की त्यांची परिस्थिती अद्यापही लढाई चालू असल्यासारखीच आहे? (ब) राष्ट्रे कोणत्या गोष्टीसाठी तयार नाहीत?
१२ सन १९९० च्या दशकाच्या सुरवातीला, शीतयुद्ध समाप्त झाल्याची घोषणा राष्ट्रांनी केली. या गोष्टीला लक्षात घेता, शांतीचे आणि सुरक्षिततेचे प्राथमिक ध्येय संयुक्त राष्ट्रसंघाला प्राप्त झाले आहे का? निश्चितच नाही! इराक, काँगो लोकसत्ताक प्रजातंत्र, बुरुंडी, पूर्व युगोस्लाव्हिया, र्वांडा, लायबेरिया आणि सोमालिया या देशांत अलीकडे घडलेल्या घटना आपल्याला काय सांगतात? यिर्मया ६:१४ मधील शब्दांत ते म्हणत आहेत: ‘शांतीचे नाव नसता ते शांती शांती असे म्हणतात.’
१३ काही ठिकाणी उघडपणे युद्ध होत नसले तरी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्य राष्ट्रांची अद्यापही अत्याधुनिक युद्धसामग्री बनविण्याची आपसांत स्पर्धा चालूच आहे. काही राष्ट्रांनी आण्विक शस्त्रांचा साठा करण्याचे चालू ठेवले आहे. इतर राष्ट्रे, जास्तीत-जास्त लोकांचा संहार करण्यासाठी रासायनिक किंवा अणुजीव शस्त्रांमध्ये विकास घडवून आणत आहेत. हर्मगिदोन नामक लाक्षणिक ठिकाणी एकत्र होत असलेल्या राष्ट्रांना यहोवा आव्हान करतो: “मी वीर आहे असे अशक्तहि म्हणो. सभोवतालच्या सर्व राष्ट्रांनो, त्वरा करून या व एकत्र जमा.” योएल आता मध्येच स्वतःचे असे अपील करतो: “हे परमेश्वरा तुझे वीर तेथे आण.” (तिरपे वळण आमचे.)—योएल ३:१०, ११.
यहोवा त्याच्या लोकांना संरक्षण देतो
१४. यहोवाचे वीर कोण आहेत?
१४ हे यहोवाचे वीर कोण आहेत? बायबलमध्ये सुमारे २८० वेळा खऱ्या देवाला ‘सेनाधीश परमेश्वर’ असे संबोधण्यात आले आहे. (२ राजे ३:१४) हे स्वर्गातील देवदूतीय सैन्य आहे; यहोवा त्यांना जे सांगतो त्याप्रमाणे करण्यासाठी ते सदैव तयार असतात. जेव्हा अरामी लोकांनी अलीशाला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना यश का लाभणार नव्हते, हे पाहता यावे म्हणून यहोवाने अखेरीस अलीशाच्या सेवकाचे डोळे उघडले: “पाहा, अलीशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे व रथ यांनी व्यापून गेला” होता. (२ राजे ६:१७) येशूने म्हटले, की तो त्याच्या पित्याकडे “देवदूतांच्या बारा सैन्यांपेक्षा अधिक” कुमक मागू शकत होता. (मत्तय २६:५३) हर्मगिदोनमध्ये न्यायदंड बजावण्यासाठी स्वार होऊन येणाऱ्या येशूचे वर्णन करताना प्रकटीकरण म्हणते: “स्वर्गातील सैन्ये पांढऱ्या घोड्यावर बसून पांढरी व शुद्ध अशी तागाची तलम वस्त्रे अंगावर घालून त्याच्यामागे चालत होती. त्याने राष्ट्रांस मारावे म्हणून त्याच्या तोंडातून तीक्ष्ण धारेची तरवार निघते; तो त्यांवर लोखंडी दंडाने अधिकार गाजवील; आणि सर्वसमर्थ देव ह्याच्या तीव्र क्रोधरूपी द्राक्षारसाचे कुंड तो तुडवितो.” (प्रकटीकरण १९:१४, १५) या लाक्षणिक द्राक्षारसाच्या कुंडाचे वर्णन स्पष्ट शब्दांत ‘देवाच्या क्रोधाचे मोठे द्राक्षकुंड’ असे करण्यात आले आहे.—प्रकटीकरण १४:१७-२०.
१५. राष्ट्रांविरुद्ध यहोवाच्या लढाईचे वर्णन योएल कशाप्रकारे करतो?
१५ तर मग, देवाने त्याचे वीर त्याठिकाणी पाठवावे, या योएलच्या विनंतीस यहोवा कसे उत्तर देतो? पुढील स्पष्ट शब्दांत: “राष्ट्रे उठावणी करून यहोशाफाटाच्या खोऱ्यात येवोत; तेथे मी न्यायासनावर बसून सभोवतालच्या सर्व राष्ट्रांचा न्याय करणार आहे. विळा चालवा, पीक तयार आहे; या, चला, उतरा, द्राक्षांचा घाणा भरला आहे; कुंडे भरून वाहात आहेत; कारण लोकांची दुष्टाई फार आहे. लोकांच्या झुंडी, निर्णयाच्या खोऱ्यात लोकांच्या झुंडी आहेत. कारण निर्णयाच्या खोऱ्यात परमेश्वराचा दिवस येऊन ठेपला आहे. सूर्य व चंद्र काळे पडले आहेत, तारे प्रकाशावयाचे थांबतात. परमेश्वर सीयोनेतून गर्जना करितो; यरुशलेमेतून आपला शब्द ऐकवितो, आकाश व पृथ्वी थरथर कापत आहेत.”—योएल ३:१२-१६.
१६. यहोवा ज्या लोकांवर न्यायदंड बजावतो त्यांत कोणाचा समावेश असेल?
१६ यहोशाफाट या नावाचा अर्थ “यहोवा न्यायाधीश आहे,” हे जसे निश्चित आहे तसेच ही गोष्टही तितकीच खरी आहे, की न्यायदंड बजावण्याद्वारे यहोवा देव त्याच्या सार्वभौम सत्तेचे पूर्णपणे दोषनिवारण करील. ज्या लोकांवर प्रतिकूल न्यायदंड बजावण्यात येईल त्यांचे वर्णन भविष्यवाणी “लोकांच्या झुंडी, निर्णयाच्या खोऱ्यात लोकांच्या झुंडी” असे करते. खोट्या धर्माचा कोणी समर्थक बाकी असल्यास तोही या लोकांच्या झुंडीमध्ये असेल. यामध्ये आणखी काही लोक समाविष्ट असतील ज्याचे वर्णन दुसऱ्या स्तोत्रात करण्यात आले आहे—राष्ट्रे, लोक, पृथ्वीवरील राजे, सत्ताधीश—यांनी ‘यहोवाची भीड धरून सेवा’ करण्याऐवजी जगाच्या भ्रष्ट व्यवस्थीकरणाला पसंती दर्शवली आहे. ‘पुत्राचे चुंबन घेण्यास’ त्यांनी नकार दर्शविला आहे. (स्तोत्र २:१, २, ११, १२) यहोवाचा सहकारी राजा म्हणून ते येशूला मानत नाहीत. याशिवाय, विनाशाकरता चिन्हांकित केलेले असे सर्व लोक असतील ज्यांचा वैभवी राजा ‘शेरडे’ म्हणून न्याय करील. (मत्तय २५:३३, ४१) स्वर्गीय जेरूसलेममधून गर्जना करण्याची यहोवाची उचित वेळ येईल तेव्हा त्याचा राजांचा नियुक्त राजा तो न्यायदंड बजावण्यास निघेल. आकाश आणि पृथ्वी थरथर कापतील! तथापि, आपल्याला खात्री देण्यात आली आहे की, “परमेश्वर आपल्या लोकांचा आश्रय आहे, इस्राएल लोकांचा दुर्ग आहे.”—योएल ३:१६.
१७, १८. मोठ्या संकटातून वाचणाऱ्यांची ओळख कशाप्रकारे करून देण्यात आली आहे आणि ते कोणत्या परिस्थितींचा आनंद लुटतील?
१७ येशूच्या रक्ताच्या खंडणी सामर्थ्यावर विश्वास ठेवत असलेल्या मोठ्या संकटातून पार पडलेल्या लोकांची ओळख प्रकटीकरण ७:९-१७ येथे “मोठा लोकसमुदाय” अशी करून देण्यात आली आहे. या लोकांना यहोवाच्या दिवशी संरक्षण प्राप्त होते, परंतु योएलच्या भविष्यवाणीमधील लोकसमुदायांवर प्रतिकूल न्यायदंड बजावण्यात येतो. बचावणाऱ्यांना योएल असे म्हणतो: “सीयोनेवर, माझ्या पवित्र डोंगरावर”—यहोवाचे स्वर्गीय निवासस्थान—“राहणारा परमेश्वर तुमचा देव मी आहे हे तुम्हास कळेल.”—योएल ३:१७अ.
१८ त्यानंतर भविष्यवाणी आपल्याला असे सांगते, की देवाच्या स्वर्गीय राज्याचे क्षेत्र “पवित्र स्थळ होईल; यापुढे परके त्यातून येणार जाणार नाहीत.” (योएल ३:१७ब) त्या स्वर्गीय राज्याच्या स्वर्गीय आणि पार्थिव क्षेत्रात कोणताही फरक असणार नाही कारण तेव्हा सर्वजण शुद्ध उपासनेत संघटित असतील.
१९. आजच्या देवाच्या लोकांच्या परादीसमय आनंदाचे वर्णन योएलने कशाप्रकारे केले आहे?
१९ आजसुद्धा, पृथ्वीवरील यहोवाच्या लोकांमध्ये खूप शांती आहे. ते संघटितरीत्या २३० पेक्षा अधिक देशांत आणि ३०० पेक्षा अधिक भाषांत त्याच्या न्यायदंडाची घोषणा करत आहेत. त्यांच्या भरभराटीचे वर्णन योएलने अगदी सुंदर शब्दांत केले आहे: “त्या काळी असे होईल की पर्वतावरून नवा द्राक्षारस पाझरेल, टेकड्यांवरून दूध वाहील, व यहूदाचे सर्व ओहोळ पाण्याने भरून वाहतील.” (योएल ३:१८) होय, यहोवा पृथ्वीवर त्याच्या स्तुतिकर्त्यांवर भरपूर आणि आनंदविणारा आशीर्वाद बरसवत राहील आणि मौल्यवान सत्याचा वाढता प्रवाह कायम वाहता ठेवील. यहोवाच्या सार्वभौम सत्तेचे निर्णयाच्या खोऱ्यात पूर्णपणे दोषनिवारण झालेले असेल आणि बंधमुक्त झालेल्या लोकांसोबत तो सर्वदा राहत असताना त्यांच्या आनंदाला पारावार राहणार नाही.—प्रकटीकरण २१:३, ४.
तुम्हाला आठवते का?
◻ यहोशाफाटाच्या दिवसांत यहोवाने त्याच्या लोकांना कशाप्रकारे वाचवले?
◻ “निर्णयाच्या खोऱ्यात” यहोवा कोणावर विनाशास पात्र असल्याचा न्यायदंड बजावतो?
◻ यहोवाचे वीर कोण आहेत आणि शेवटच्या संघर्षात ते कोणती भूमिका पार पाडतील?
◻ विश्वासू उपासक कोणत्या सौख्यांचा आनंद लुटतात?
[२१ पानांवरील चित्र]
यहुदाला सांगण्यात आले होते: ‘घाबरू नका कारण युद्ध तुमचे नव्हे, तर देवाचे आहे’
[२३ पानांवरील चित्र]
यहोवा त्याच्या शत्रूंना आव्हान देतो, की त्यांनी ‘त्यांचे फाळ ठोकून त्यांच्या तरवारी बनवाव्यात’
[२४ पानांवरील चित्र]
मोठ्या संकटातून वाचणाऱ्यांची ओळख बायबलमध्ये मोठा लोकसमुदाय अशी करण्यात आली आहे