शास्त्रवचनातील धडेः योएल १:१—३:२१
यहोवाच्या नावाचा धावा करा आणि सुरक्षित बचाव मिळवा!
“जर ही पीडा आटोक्यात आणली नाही तर ती पूर्व आफ्रिका आणि पूर्वीय देशाकडे जाईल. तो मोठा अनर्थ असेल.” असे उद्गार युनोच्या अन्न व शेतकी संघटनेच्या अधिकाऱ्यांनी काढले. ते आफ्रिकेच्या वायव्येकडे, मिळेल ते खाऊन फस्त करणाऱ्या कीटकांच्या—टोळधाडीच्या— संदर्भात बोलत होते.
इ. स. पूर्वीच्या ८२० व्या वर्षी योएल या देवाच्या संदेष्ट्यानेही अशाच प्रकारच्या पीडेविषयी म्हटले. अचूकता व खरेपणा यासाठी विविध अपूर्व सज्ञांद्वारे त्याने यहुदी राष्ट्रावर कीटकाची धाड येऊन कशी नासधूस होईल ते सांगितले. तरीपण ती पीडा कोणा भूप्रदेशीय धोक्यापेक्षा अभूतपूर्व गोष्टीचे चित्र देत होती. ती ‘यहोवाच्या दिवसा’ची घोषणा करीत होती! आमच्या पिढीत तो “भयप्रेरित दिवस” आणि त्याचे सर्व विध्वंसकारी परिणाम दिसणार. मग तारणाची काही आशा आहे का? योएल या भविष्यवादित पुस्तकापासून आपल्याला कोणते धडे मिळतात?
कीटकांचा भयंकर हल्ला
यहोवाच्या भयप्रेरित दिवशी तारण मिळवण्यासाठी पश्चाताप जरुरीचा आहे. योएलच्या नजरेतून आपण सुरवंट, टोळ, पंख नसलेले रांगणारे टोळ आणि झुरळे याकरवी देशातील सर्व वनस्पतींची नासधूस झाल्याचे पाहतो. याजक, वडील जन आणि यहुदातील इतर निवासियांना पश्चाताप करण्याचे व “यहोवाला आरोळी मारा” असे आव्हान केले जाते. गुदामे उध्वस्त झाली आहेत आणि धान्याची कोठारे, त्यात कसलाही उपज नाही म्हणून भंगलेली आहेत. पाळीव प्राणी घाबरलेल्या स्थितीत फिरत आहेत. त्यांना चारा कोठे मिळत नाही. सर्वसमर्थाकडून विनाशाचा हा केवढा भयंकर दिवस दिसला!—१:१-२०.
यहोवाच्या दिवसाच्या समीपतेने आम्हाला पवित्र वर्तणूक आणि इश्वरी भक्तीमध्ये पुढे सरसावण्याची चालना दिली पाहिजे. (२ पेत्र ३:१०-१२) योएल आम्हाला तो दिवस अंधाराचा, मेघमय अभ्राच्छादित आणि औदासिन्याचा दिवस या रुपात पहावयास लावतो. टोळधाड ही त्या दिवसाची भीतीदायक चाहूल आहे. त्यांच्या वाटचालीत यहुदाचा एदेनासारखा प्रदेश ओसाड भूमिसारखा होतो. टोळांचा ध्वनिदेखील अनिष्टसूचक आहे कारण तो रथाच्या धावण्याचा आणि रोपाचे राहिलेले खुंट जाळून टाकणाऱ्या अग्नीसारखा आहे. “युद्धासाठी सज्ज केलेल्या बलवान लोकांसारखे” ते टोळ निघतात तेव्हा ते भिंतीवर चढतात, शहरात घुसतात आणि घरात जातात. ‘यहोवाच्या भयप्रेरित दिवशी’ सूर्य, चंद्र आणि तारेही काळे पडतात.—२:१-११.
तारणाचा मार्ग
तारणासाठी आम्ही ‘यहोवा हाच देव आहे, अन्य कोणी नाही’ हे कबूल केले पाहिजे. “अंतःकरणपूर्वक मजकडे वळा.” अशी सूचना यहोवा करतो. इश्वरी कृपा मिळविण्यासाठी लहानथोरांना मेळ्यात एकत्र जमून विनवणी करण्याचे आर्जविले जाते. देव दया दाखवील आणि कीटकांनी केलेल्या विध्वंसाची भरपाई करुन देईल व आपल्या लोकांना समृद्ध आशीर्वाद देईल. यहोवा हाच खरा देव आणि तारणाचा उगम आहे असे मानणाऱ्यांना पस्तावा होणार नाही.—२:१२-२७.
यहोवाच्या नामाचा धावा विश्वासाने करण्यावर देखील आमचे तारण अवलंबून आहे. “यहोवाचा मोठा व भयंकर दिवस” येण्याआधी देव ‘मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करील.’ तरुण, वृद्ध, पुरुष व स्त्रिया, सर्वजण भविष्यकथनाचे कार्य करतील. अशाप्रकारे, ‘यहोवाच्या नामाचा धावा करील तो तरेल’ हे पुष्कळांस समजेल.—२—२८-३२.
राष्ट्रांवरील न्याय
यहोवा राष्ट्रांवर न्यायदंड बजावील तेव्हा तो आपल्या लोकांस वाचवील. (पडताळा यहेज्केल ३८:१८-२३; प्रकटीकरण १६:१४-१६.) देवाच्या लोकांना वाईट प्रकारे वागविल्यामुळे व त्यांना गुलामगिरीत नेल्यामुळे सोर, सीदोन आणि पलशेथ यांना दंड दिलाच पाहिजे. यहुदा व यरुशलेमच्या बंदिवानांना यहोवा परत आणील; तो त्याच्या शत्रूंना हे आव्हान देतोः “यज्ञयाग करुन लढाईची तयारी करा!” पण देवाशी त्यांची बरोबरी होऊच शकणार नाही. तो त्यांना लाक्षणिक “यहोशाफाटाच्या खोऱ्यात” न्यायदंड देईल. आकाश व पृथ्वी जरी कापली तरी यहोवा आपल्या लोकांचा आश्रय राहील. विश्वासू जनच राष्ट्रांवर बजावण्यात येणाऱ्या न्यायदंडातून वाचतील व ते नंदनवनमय परिस्थितीत जीवनाचा आनंद घेतील.—३:१-२१.
स्मरणासाठी धडेः यहोवाच्या भयप्रेरित दिवशी बचाव मिळवावयाचा आहे तर आधीच पश्चाताप व्यक्त होण्यास हवा. त्या दिवसाच्या समीपतेने आम्हाला पवित्र वर्तणूक आणि इश्वरी भक्तीत मग्न राहण्यास उद्युक्त करावयास हवे. अर्थातच, आमचे तारण हे केवळ यहोवाला देव मानण्याकरवी मिळू शकते. आम्ही त्याच्या नावाने विश्वासाने धावा केल्यास, तो राष्ट्रांवर न्यायदंड बजावण्याच्या वेळी आम्हाला वाचवील.
योएलचा भविष्यवाद आम्हाला आणखी विचाराला खाद्य देतो. “यहोवाचा मोठा व भयंकर दिवस” अगदीच समीप आहे! मानवजातीला याविषयीचा इशारा दिला गेला पाहिजे. योएलच्या भविष्यवादात टोळ होते तसे यहोवाचे साक्षीदार ख्रिस्ती धर्मराज्याची आध्यात्मिक निर्जनावस्था प्रकर्षाने उघड करुन त्याचा विध्वंस करीत आहेत. यामुळे त्याच्या पुढाऱ्यांचा क्रोध व विरोध सामोरा येतो. पण याप्रकारे कसलीही भिंत जरी त्यांनी मध्ये आणली तरी ती लाक्षणिक टोळांसमोर टिकत नाही. यहोवाने आपल्या लोकांवर त्याचा आत्मा ओतिला आहे आणि त्याचे न्यायदंड घोषित करण्यासाठी त्याने त्यांना समर्थ केले आहे. याकारणास्तव, यहोवाचा भयंकर दिवस येण्याआधी उरलेल्या या थोड्या समयात लोकांनी ‘यहोवाच्या नावाचा धावा करुन सुरक्षित बचाव मिळवावा’ यासाठी मदत करण्यात पूर्ण रुपाचा सहभाग घेऊ या.
[२६ पानावरील चौकट]
पवित्र शास्त्र वचनांचे परिक्षण
● १:२—योएल येथे, राष्ट्राला चुकीच्या दिशेने नेणाऱ्या “वृद्ध” किंवा वडील जनांना संबोधित होता. ‘देशात राहणाऱ्या सर्व जणांनी’ त्यांच्या खोट्या नेतृत्वाचा मागोवा घेतला होता त्यामुळे हे देखील यहोवाच्या नजरेत जबाबदार होते. आज ख्रिस्ती धर्मजगताच्या पुरोहितांनीही आपल्या कळपाला चुकीच्या दिशेने निरविले आहे. योएलप्रमाणेच यहोवाच्या साक्षीदारांनी त्या धर्मपुढारी वर्गास संदेश दिले आहेत. तरीपण सर्वसाधारण लोकांना सुद्धा यहोवाला जाब द्यावयाचा असल्यामुळे यांनाही देवाचे वचन घोषित केले गेले पाहिजे.—यशया ९:१५-१७; रोमकर १४:१२.
● २:१-१०, २८—इस्त्राएलांना हा इशारा देण्यात आला होता की त्यांनी देवाची आज्ञा अवमानिली तर टोळ आणि इतर कीटकांमार्फत त्यांच्या पिकांचा विध्वंस होणार. (अनुवाद २८:३८-४५) योएलने उल्लेखिलेल्या प्रमाणात कनानवर कीटकांची धाड आली असा अहवाल शास्त्रवचनात दिसत नसल्यामुळे त्याने वर्णिलेली ही पिडा चित्रमय होती. तर मग, या भविष्यवादाची पूर्णता इ. स. ३३ च्या पेंटेकॉस्टपासून सुरु झाली. तेव्हा यहोवाने ‘आपल्या आत्म्याचा वर्षाव’ येशूच्या अनुयायांवर केला आणि देवाकडून मिळालेल्या संदेशाकरवी यांनी खोट्या धर्मपुढाऱ्यांना यातना दिल्या. (प्रे. कृत्ये २:१, १४-२१; ५:२७-२९) यहोवाचे साक्षीदार आता अशाच स्वरुपाचे विध्वंसक कार्य करीत आहेत.
● २:१२, १३—प्राचीन काळी आपली बाह्य वस्त्रे फाडण्याचा अर्थ दुःख प्रदर्शित करणे हा होत होता. (उत्पत्ती ३७:२९, ३०; ४४:१३) पण हे फसव्या रितीने, ढोंगीपणाने देखील केले जाऊ शकत होते. यामुळेच योएलने हे स्पष्ट केले की बाह्यदर्शी दुःख पुरेसे नव्हते. लोकांनी अंतःकरणपूर्वक पश्चाताप दाखवून ‘आपले हृदय फाडण्याची’ गरज होती.
● २:३१, ३२—योएलच्या काळातील विश्वासू जनांना यहोवाने बचावाचा मार्ग पुरविला. आता, “शेवटल्या दिवसात” देव येशू ख्रिस्ताद्वारे तारणाची शक्यता उपलब्ध करीत आहे. (२ तीमथ्य ३:१; रोमकर ५:८, १२; ६:२३) तरीपण सार्वकालिक तारणासाठी पापी मानवांनी यहोवाच्या नावाचा धावा करणे जरुरीचे आहे. याचा अर्थ, इश्वरी नाम जाणणे, त्याचा सर्वतोपरि आदर करणे आणि ते नाव ज्याचे आहे त्यावर पूर्णपणे विसंबून राहणे असा आहे. जे या पद्धतीने विश्वासाने यहोवाच्या नावाचा धावा करतील त्यांनाच, देव आपल्या ‘भयंकर दिवशी’ राष्ट्रांवर न्यायदंडाची अमलबजावणी करील तेव्हा ‘सुरक्षित बचाव मिळेल.’—सफन्या २:२, ३; ३:१२; रोमकर १०:११-१३.
● ३:२, १४—“यहोवाच्या दिवशी” इश्वरी न्यायदंड बजाविण्याची लाक्षणिक जागा ‘निर्णयाचे खोरे’ आहे. याला ‘यहोशाफाटाचे खोरे’ असेही म्हणतात. ते योग्यच आहे कारण यहोशाफाट या नावाचा अर्थ, “यहोवा शास्ता आहे” असा होतो. यहोशाफाट राजाच्या काळी देवाने यहुदा व यरुशलेम यांची मवाब, अम्मोन, सेईरचा डोंगराळ भाग येथील प्रबळ शक्त्यांपासून सुटका केली आणि हे करताना त्याने त्यांना गोंधळात पाडले व एकमेकांचीच हत्या करु दिली. (२ इतिहास २०:१-३०) आमच्या काळी, ‘यहोशाफाटाचे खोरे” हे त्या लाक्षणिक द्राक्षकुंडास सूचित आहे जेथे राष्ट्रांना, यहोवाच्या लोकांना वाईट वागणूक दिल्यामुळे, द्राक्षे तुडवितात त्याप्रमाणे तुडविण्यात येईल.
● ३:६—यहुदा व यरुशलेमच्या लोकांना ग्रीक लोकांना दास म्हणून विकून टाकण्याचा दोष सोर, सीदोन आणि पलशेथ यांचा होता. कदाचित असे असावे की इतर राष्ट्रांनी जिंकलेले काही यहुदी सोर, सीदोन व पलशेथ यांच्या हाती लागले. किंवा आपल्या शत्रुंपासून पळून आलेल्या व आश्रय मागणाऱ्या यहुद्यांना दास बनविले असावे. काहीही असले तरी देवाने मानवी जीवनाचा सौदा करणाऱ्या या सौदागरांना आपल्या लोकांना वाईट वागणूक दिल्यामुळे जाब दिला. याकरवी, आज यहोवाच्या सेवकांना छळणाऱ्या राष्ट्रांचे काय होईल ते सूचित होते.