वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ५/१ पृ. २६-२९
  • वयाच्या ८० व्या वर्षी नेमणूक बदलली

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वयाच्या ८० व्या वर्षी नेमणूक बदलली
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • बायबल सत्याने आमचे जीवन बदलले
  • आम्हाला बळकटी देणारी उदाहरणं
  • पूर्व ॲन्जीलियात पायनियरींग
  • युद्धाचा काळ आणि कुटुंब
  • स्पेनला जाण्याचा आमचा निर्णय
  • ‘ही सेवा आम्हाला देण्यात आली आहे म्हणून आम्ही हार मानत नाही’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • युनीकेच्या उदाहरणातून एक आई काय शिकू शकते?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • दृष्टी आणि अंतःकरण प्रतिफळावर लावणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • अनपेक्षित घटनांनी भरलेले यहोवाच्या सेवेतील जीवन
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ५/१ पृ. २६-२९

वयाच्या ८० व्या वर्षी नेमणूक बदलली

ग्वेन्डलीन मॅथ्यूज यांच्याद्वारे कथित

मी ८० वर्षांची झाले तेव्हा आम्ही उभयतांनी आमचा गाशा गुंडाळून भाड्याच्या टेंपोत भरला आणि इंग्लंडहून स्पेनला राहावयास गेलो. आम्हाला स्पॅनिश बोलता येत नव्हते तरी आम्ही स्पेनच्या नैर्ऋत्येस चाललो होतो जेथे इंग्रजी भाषिक असलेले यात्रेकरू क्वचितच येत. आम्हाला दोघांना वेडबीड तर लागले नाही ना, असे आमच्या बहुतेक मित्रांना वाटले, पण अब्राहामाने वयाच्या ७५ व्या वर्षी ऊर देश सोडला नव्हता का याची मी स्वतःला आठवण देत आनंदाने गेले.

सन १९९२ च्या एप्रिल महिन्यात आम्ही स्पेनमध्ये आलो; आतापर्यंत आम्ही येथे घालवलेली वर्षे सर्वात प्रतिफळदायी ठरली आहेत. पण, आम्ही येथे राहावयास का आलो ते सांगण्याआधी मी तुम्हाला, यहोवाच्या सेवेतील आमच्या आयुष्याने आम्हाला इतका मोठा निर्णय घ्यावयास कसे प्रवृत्त केले ते सांगते.

बायबल सत्याने आमचे जीवन बदलले

इंग्लंडमधील लंडनच्या नैर्ऋत्येस एका धार्मिक घरात मी लहानाची मोठी झाले. माझ्या आईला आध्यात्मिक समाधान हवे होते, म्हणून ती, मला आणि माझ्या बहिणीला वेगवेगळ्या उपासना ठिकाणी घेऊन जात असे. माझ्या वडिलांना टीबी झाल्यामुळे ते आमच्याबरोबर येत नसत. पण ते बायबलचे अगदी मन लावून वाचन करायचे, आणि त्यांना एखादा उतारा प्रबोधनकारक वाटल्यावर ते लागलीच अधोरेखीत करत असत. त्यांचे ते आवडतं बायबल आता खूपच जुने झाले असले तरी ते, माझ्याकडील सर्वात मौल्यवान ठेवा आहे.

मी १४ वर्षांची होते तेव्हा म्हणजे, १९२५ मध्ये, कोणीतरी आमच्या दाराच्या फटीतून एक पत्रिका आत सरकवली होती; त्यावर वेस्ट हॅम नगरभवनात होणाऱ्‍या एका जाहीर भाषणाचे आमंत्रण होते. माझ्या आईनं व आमच्या एका शेजारणीनं जायचं ठरवलं आणि माझी बहीण आणि मीही त्यांच्याबरोबर गेलो. “आता जिवंत असलेले लाखो लोक केव्हाही मरणार नाहीत,” ह्‍या भाषणाने आईच्या मनात बायबल सत्याचे बीज पेरले.

काही महिन्यांतच आमच्यावरून बाबांचं छत्र नाहीस झालं, वयाच्या ३८ व्या वर्षी ते मरण पावले. त्यांच्या मृत्यूने आम्हाला जबरदस्त फटका बसला होता कारण आम्ही दुःखी व निराश्रित झालो होतो. स्थानीय चर्च ऑफ इंग्लंडमध्ये त्यांच्या अत्यंविधीवेळी पाळकांनी जेव्हा असे म्हटले, की बाबांचा आत्मा स्वर्गात होता तेव्हा आईला हे ऐकून धक्का बसला. कारण बायबलमध्ये तर मृतजन कबरेत निद्राधीन असल्याचं सांगितलं आहे हे तिला माहीत होतं आणि पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाकरता बाबांचं एक ना एक दिवस पुनरुत्थान होईल असा तिला ठाम विश्‍वास होता. (स्तोत्र ३७:९-११, २९; १४६:३, ४; उपदेशक ९:५; प्रेषितांची कृत्ये २४:१५; प्रकटीकरण २१:३, ४) देवाच्या वचनाची शिकवण देणाऱ्‍या लोकांबरोबरच आपण संगती केली पाहिजे याची खात्री झाल्यावर तिनं, यहोवाच्या साक्षीदारांबरोबर म्हणजे तेव्हाच्या आंतरराष्ट्रीय बायबल विद्यार्थ्यांबरोबर आपला परिचय वाढवण्याचा निश्‍चय केला.

यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना जायला आमच्याकडे पैसे नसल्यामुळे आम्ही घरापासून सभा होतात त्या ठिकाणापर्यंत दोन तास चालत जायचो. आणि सभा संपल्यावर पुन्हा दोन तास घरी पायी चालत यायचो. पण आम्हाला त्या सभा अतिशय मौल्यवान वाटायच्या; लंडनच्या त्या प्रसिद्ध धुक्याबद्दल तुम्हाला कदाचित माहीतच असेल, तेव्हाही आम्ही कधी सभा चुकवल्या नाहीत. काही दिवसांतच आईनं यहोवाला तिचं जीवन समर्पण करून बाप्तिस्मा घेण्याचा निर्णय घेतला आणि तिच्या पाठोपाठ १९२७ मध्ये मीपण बाप्तिस्मा घेतला.

आम्हाला आर्थिकरीत्या अडचणी होत्या तरीसुद्धा, आध्यात्मिक प्राथमिकतांचं महत्त्व आईनं मला नेहमी शिकवलं. मत्तय ६:३३ हे तिचं आवडतं वचन होतं; आणि खरंच तिनं तिच्या जीवनात ‘राज्याला प्रथम’ स्थान दिलं. सन १९३५ मध्ये कॅन्सरमुळं जेव्हा तिचा अकाली मृत्यू झाला तेव्हा ती, फ्रान्सला कोणी पूर्ण वेळेचा सेवक म्हणून जाऊ इच्छितो का असं विचारण्यात आल्यावर तिथं जाण्याची योजना करीत होती.

आम्हाला बळकटी देणारी उदाहरणं

त्या दिवसांत, लंडनच्या सभांमधील काहीजण स्वतःचे विचार मांडायचा प्रयत्न करीत होते, आणि या लोकांनी आपआपसांत भांडणे लावली, क्रोध भडकवला. पण आई नेहमी म्हणायची, की यहोवाच्या संघटनेला सोडून देणं बेईमानी आहे कारण तिच्याकडूनच आपण पुष्कळ काही शिकलो आहोत. वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीचे तेव्हाचे अध्यक्ष, जोसफ. एफ. रदरफोर्ड यांच्या भेटींनी आम्हाला एकनिष्ठेनं सेवा करीत राहण्याची प्रेरणा दिली.

मला आठवतं बंधू रदरफोर्ड प्रेमळ होते, कोणीही त्यांना सहज भेटू शकत होतं. मी अजूनही किशोरवयीनच होते तेव्हा लंडन मंडळीची एकदा सहल निघाली होती आणि तेही आमच्याबरोबर होते. त्यांनी माझ्याकडे पाहिलं, मी काहीशा लाजाळू स्वभावाची, हातात कॅमेरा घेऊन उभी होते; ते माझ्याजवळ आले आणि माझा एक फोटो घेशील का म्हणून त्यांनी मला विचारलं. तो फोटो माझी प्रिय स्मरणवस्तू बनला.

नंतर, ख्रिस्ती मंडळीत पुढाकार घेणारे आणि जगातील प्रमुख लोक यांच्यातील मोठा फरक दाखवणाऱ्‍या एका अनुभवाचा माझ्या मनावर प्रभाव पडला. मी, लंडनमधील एका मोठ्या हॉटेलमध्ये वेटरस म्हणून काम करीत होते तेव्हा तेथे एके दिवशी, फ्रान्ज व्होन पॉपन या हिटलरच्या प्रतिनिधीला जेवणाचे आमंत्रण होते. जेवताना त्यांनी त्यांच्या कमरेला बांधलेली तलवार बाजूला काढून ठेवण्यास नकार दिल्यामुळे, मी त्या तलवारीवर अडखळले आणि माझ्या हातात असलेलं सूप खाली पडलं. माझ्यावर चिडून ते मला म्हणाले, जर्मनीत अशा निष्काळजीपणासाठी गोळीनं उडवलं जाऊ शकतं. ते तिथं होते तोपर्यंत मी त्यांच्यापासून होता होईल तितके दूरच राहण्याचा प्रयत्न केला!

सन १९३१ मध्ये, अलेक्झॅन्ड्रा पॅलेस येथे एक महत्त्वपूर्ण अधिवेशन झाले; तेथे मी बंधू रदरफोर्ड यांचे भाषण ऐकले. त्याच अधिवेशनात आम्ही यहोवाचे साक्षीदार हे नवीन नाव अंगीकारलं. (यशया ४३:१०, १२) दोन वर्षांनंतर म्हणजे १९३३ मध्ये मी, आता जिला पूर्ण वेळेची सेवा म्हणतात त्या पायनियर सेवेत दाखल झाले. त्या वर्षांतील आणखी एक आशीर्वाद मला आठवतो व तो म्हणजे, उत्तम तरुण बांधवांबरोबर संगती करू शकणे जे कालांतराने पृथ्वीच्या पाठीवरील दूरदूरच्या देशांत मिशनरी या नात्याने कार्य करण्यास गेले. यांमध्ये, क्लॉड गुडमन, हेराल्ड किंग, जॉन कूक आणि एडवीन स्कीनर यांचा समावेश होता. अशा विश्‍वासू लोकांच्या उदाहरणांनी मला, विदेशी क्षेत्रात जाऊन सेवा करण्यास प्रवृत्त केले.

पूर्व ॲन्जीलियात पायनियरींग

मला पूर्व ॲन्जीलियात (इंग्लंडच्या पूर्वेकडील) पायनियर नेमणूक मिळाली; तेथे प्रचार करण्यासाठी जोश आणि आवेशाची आवश्‍यकता होती. लांबचा पल्ला गाठण्यासाठी आम्ही सायकलने गावोगावी, खेडोपाडी जात असू व भाड्याच्या खोल्यांमध्ये राहत असू. त्या भागात मंडळ्या नसल्यामुळे माझी सोबतीण आणि मी आम्ही दोघीच नियमितरीत्या साप्ताहिक सभांच्या भागांची चर्चा करीत असू. सेवेमध्ये आम्ही देवाच्या उद्देशांचं स्पष्टीकरण देणाऱ्‍या शेकडो पुस्तकांचा व पुस्तिकांचा वाटप केला.

एक प्रसंग मला आठवतो; आम्ही एका पाळकाच्या घरी गेलो व चर्च ऑफ इंग्लंडच्या स्थानीय धर्मगुरुंशी बोललो. बहुतेक क्षेत्रांत, आम्ही ॲन्जीलिकन धर्मगुरूंना भेटण्याचे लांबणीवरच टाकत असू; यांनाही आम्ही शेवटीच भेटलो कारण आम्ही त्या क्षेत्रांत सुवार्तेचा प्रचार करत आहोत असे त्यांना समजल्यावर ते नेहमी आम्हाला त्रास द्यायचे. पण या गावांतील सर्वजण धर्मगुरूंविषयी चांगलं बोलत होते. ते आजाऱ्‍यांना जाऊन भेटत असत, वाचनाची आवड असलेल्यांना पुस्तक देत आणि बायबलचं स्पष्टीकरण देण्यासाठी धर्मगुरूंच्या घरी नियमितरीत्या भेटीसुद्धा देत असत.

आम्ही जेव्हा त्यांना भेटावयास गेलो तेव्हा ते खरंच खूप स्नेही होते, व आमच्याकडून त्यांनी पुष्कळ पुस्तकं घेतली. त्यांनी आम्हाला असंही सांगितलं, की गावात जर कुणाला पुस्तकं हवी असली पण त्यांची घेण्याची ऐपत नसल्यास ते स्वतः त्या पुस्तकांची किंमत देतील. नंतर आम्हाला कळाले की पहिल्या महायुद्धादरम्यान त्यांना आलेल्या भयंकर अनुभवांमुळे त्यांनी त्यांच्या चर्चमध्ये शांती व सदिच्छा वाढवण्याचे ठरवले होते. निघण्याआधी त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला व हे चांगले कार्य करीत राहण्याचे उत्तेजन दिले. निरोप देताना त्यांनी गणना ६:२४ मधील बोल बोलून दाखवले: “प्रभो तुम्हाला आशीर्वाद देवो आणि तुमचे संरक्षण करो.”—मराठी कॉमन लँग्वेज.

मी पायनियरींगला सुरवात केल्यानंतर दोन वर्षांनी आईचा मृत्यू झाला; आणि मी लंडनला पुन्हा आले, तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते किंवा कुटुंबही नव्हतं. एका स्कॉटीश साक्षीदार कुटुंबाने मला आसरा दिला; आईच्या मृत्यूमुळे मला झालेलं अनावर दुःख सहन करण्यास त्यांनी मला मदत केली आणि पूर्ण वेळेची सेवा चालू ठेवण्याचं उत्तेजन दिलं. मग मी पुन्हा जुलिया फेरफॅक्स नावाच्या एका नव्या पायनियर सोबतिणीबरोबर पूर्व ॲन्जीलियास गेले. आम्ही एक जुने कॅरव्हॅन (मोटारीने ओढायचे चाकावरचे घर) दुरुस्त केले, तेच आमचे चालते फिरते घर होते; एका ठिकाणाहून दुसऱ्‍या ठिकाणी त्याला हलवण्याकरता आम्ही ट्रॅक्टरचा किंवा ट्रकचा उपयोग करीत असू. आमच्याबरोबरच, अल्बर्ट आणि एथेल ॲबॉट या एका वृद्ध जोडप्याकडेसुद्धा एक कॅरव्हॅन होते; आम्ही प्रचाराला सोबतच जायचो. अल्बर्ट आणि एथेल जणू माझे पालकच झाले.

केम्ब्रीजशायर येथे पायनियरींग करत असताना, मी जॉन मॅथ्यूज नावाच्या एका गुणी ख्रिस्ती बांधवाला भेटले; त्यांनी कठीण परिस्थितीत यहोवाला सचोटी राखली होती. सन १९४० मध्ये आमचा विवाह झाला आणि इकडे दुसऱ्‍या महायुद्धाला देखील सुरवात झाली.

युद्धाचा काळ आणि कुटुंब

आमचं लग्न झालं तेव्हा आमचं घर म्हणजे लहान आकाराच्या स्वयंपाक घराऐवढं एक लहानसं कॅरव्हॅन. आमच्याकडे एक मोटारसायकल होती; तिने आम्हाला खूप चांगली साथ दिली; तिच्यावर आम्ही सेवेला जात असू. आमच्या लग्नाला वर्ष झाल्यावर, बायबल आधारित मतांमुळे लष्करी सेवेत भाग घेण्यास नकार दिला म्हणून जॉन यांना शेतमजूर म्हणून काम करण्याची शिक्षा देण्यात आली. (यशया २:४) यासाठी आम्हाला आमचं पायनियरींग थांबवावं लागलं असलं तरी, जॉनच्या ह्‍या शिक्षेमुळे आम्हाला फायदाच झाला कारण मला दिवस गेले होते आणि जॉन घर चालवू शकणार होता.

युद्धांदरम्यान, कठीण परिस्थितीतही होणाऱ्‍या खास सभांचा आम्ही आनंद लुटला. सन १९४१ मध्ये, जॉन, मी आणि माझ्या पोटातलं बाळ, मोटारसायकलनं ३०० किलोमीटर दूर असलेल्या मॅनचेस्टरला गेलो. रस्त्यात आम्ही बॉम्बचा मारा झालेली अनेक शहरे पार केली, अशा परिस्थितीत सभा होईल की नाही याविषयी आम्हाला शंका होती. पण सभा झाली. मॅनचेस्टरच्या मध्यभागी असलेला फ्री ट्रेड हॉल इंग्लंडच्या पुष्कळ भागांतून आलेल्या अनेक साक्षीदारांनी खचून भरला होता; संपूर्ण कार्यक्रम तेथे सादर करण्यात आला.

अधिवेशनाच्या शेवटल्या वक्‍त्‌याने भाषणाच्या शेवटी श्रोत्यांना सांगितले, की त्यांनी लगेचच्या लगेच तो हॉल आणि त्याच्या आजूबाजूचे क्षेत्र सोडून जावे कारण तेथे हवाईहल्ला होण्याची शक्यता होती. धोक्याची ती पूर्वसूचना किती समयोचित होती. आम्ही अजून हॉलपासून दूर गेलो नव्हतो इतक्यात आम्हाला भोंग्यांचा आणि विमानांवर गोळी करणाऱ्‍या बंदुकांचा आवाज ऐकू आला. मागे वळून पाहतो तर कितीतरी विमाने शहराच्या मध्यभागी बॉम्बचा मारा करीत होते. दूरूनच आम्हाला आगीचे आणि धूराचे लोट दिसले; काही क्षणांपूर्वी आम्ही ज्या हॉलमध्ये बसलो होतो तो हॉल पूर्णपणे उद्ध्‌वस्त करण्यात आला होता! बरं झालं आपला एकही बंधू किंवा बहीण मारली गेली नाही.

मुलांचं संगोपन करताना आम्हाला पायनियरींग करणं जमलं नाही; पण प्रवासी पर्यवेक्षक किंवा पायनियरांना राहायला जागा मिळत नव्हती तेव्हा आमचं घर त्यांच्यासाठी नेहमी खुलं असायचं. एकदा तर सहा पायनियर आमच्या घरात काही महिन्यांपर्यंत राहिले. आणि याचा चांगला परिणाम असा झाला की आमची मुलगी युनिस हिने, १५ वर्षांची असतानाच म्हणजे १९६१ मध्ये पायनियरींग करण्याचे निवडले. एका गोष्टीचं मात्र आम्हाला दुःख आहे, की आमचा मुलगा डेवीड मोठा झाल्यावर त्याने यहोवाची सेवा करण्याचे सोडून दिले आणि आमची दुसरी मुलगी लिंडा युद्धाच्या वेळी भयानक परिस्थितीत मरण पावली.

स्पेनला जाण्याचा आमचा निर्णय

आईच्या उदाहरणानं व उत्तेजनानं माझ्यातील मिशनरी होण्याच्या भावनेला उत्तेजित केले होते म्हणून ते ध्येय मी कधीच विसरू शकले नाही. मग, १९७३ मध्ये, युनिस इंग्लंड सोडून स्पेनला गेली; कारण तेथे राज्य घोषकांची अधिक गरज होती. ती जाताना आम्हाला खूप वाईट वाटलं होतं पण तिला एका विदेशी देशात सेवा करायची इच्छा होती हे पाहून आम्हाला तिचा अभिमान वाटला.

अधूनमधून आम्ही युनिसला भेटायला जात असू; यामुळे स्पेन देश आमच्या परिचयाचा झाला. खरं तर, जॉन आणि मी, तिला मिळालेल्या चार वेगवेगळ्या ठिकाणच्या नेमणुकींच्या वेळी भेटून आलो होतो. हळूहळू म्हातारपणामुळं आमचं शरीर ढीलं होत गेलं. एकदा जॉन पडल्यामुळे त्यांच्या तब्येतीवर खूपच वाईट परिणाम झाला; आणि मला हृदयाचा व थायरॉयईडचा त्रास सुरू झाला. शिवाय, आम्हा दोघांनाही संधिवात जडला. खरं तर आता आम्हाला युनिसची मदत हवी होती, पण आमच्यासाठी तिनं तिची नेमणूक सोडावी असं आम्ही इच्छित नव्हतो.

आम्ही युनिसशी यावर बोललो आणि मार्गदर्शनासाठी यहोवाकडे प्रार्थना केली. आम्हाला मदत करायला ती घरी यायला तयार होती. पण मग, आम्हीच स्पेनला जाऊन तिच्याबरोबर राहण्याचा सर्वात उत्तम उपाय शोधून काढला. मी स्वतः मिशनरी होऊ शकले नसले तरी, निदान मी माझ्या मुलीला आणि पूर्ण वेळेतील तिच्या दोन सोबतिणींना तरी मदत करू शकेन असे मला वाटले. नाहीतरी, युनिसच्या दोन पायनियर सोबतिणी, न्यरया आणि ॲना या दोघींना जॉन आणि मी आमच्याच मुली समजत होतो. म्हणून त्या तिघींना जेथे कोठे नेमण्यात येईल तेथे त्यांच्याबरोबर आम्हीही राहावे म्हणून त्यांनी इच्छा दाखवली.

हा निर्णय घेऊन सहा वर्षे उलटली आहेत. आमच्या तब्येती आहेत तशाच आहेत, पण आमचं जीवन अधिक मनोरंजक बनलं आहे. मला अजूनही इतकं स्पॅनिश बोलता येत नाही पण त्यासाठी मी प्रचार करण्याचं थांबवत नाही. जॉन आणि मी एका लहानशा मंडळीचे, स्पेनच्या नैर्ऋत्येकडे एक्स्ट्रीमड्यूरा मंडळीचे सदस्य आहोत; आम्हाला ही मंडळी घरच्यासारखीच वाटते.

स्पेनमध्ये राहायला आल्यावर, आपलं राज्य प्रचाराचं कार्य आंतरराष्ट्रीय आहे व येशू ख्रिस्तानं “शेत हे जग आहे,” असं कसं म्हटलं होतं ते मला आता समजतं.—मत्तय १३:३८.

[२८ पानांवरील चित्रं]

सन १९३० च्या दशकात पायनियरींग करताना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा