वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w92 ८/१ पृ. ८-१२
  • यहोवाचा दिवस ध्यानात असू द्या

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाचा दिवस ध्यानात असू द्या
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आज्ञापालन करणारे नागरिक
  • त्याच्या निर्णयाची अमलबजावणी
  • टोळधाड
  • “महान व बलवान राष्ट्र”
  • “पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले”
  • यहोवाचा दिवस जवळ आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उत्तरेकडून हल्ला!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
  • कोणाला ‘तारले’ जाईल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • परीक्षांमुळे यहोवावरील आमचा भरवसा आणखी वाढला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
w92 ८/१ पृ. ८-१२

यहोवाचा दिवस ध्यानात असू द्या

“निर्णयाच्या खोऱ्‍यात परमेश्‍वराचा [यहोवा, न्यू.व.] दिवस येऊन ठेपला आहे.”—योएल ३:१४.

१. यहोवाने घोषित केलेले पवित्र युद्ध हे मानवजातीच्या “पवित्र” युद्धांपेक्षा का वेगळेच आहे?

“राष्ट्रांमध्ये हे जाहीर कराः ‘यज्ञयाग करून लढाईची तयारी करा!’” (योएल ३:९) याचा अर्थ हे पवित्र युद्ध आहे का? ख्रिस्ती धर्मराज्याचा मोठा भाग होता अशा गतकाळी घडलेल्या धर्मयुद्धांकडे तसेच दोन महायुद्धांकडे पाहता, याला “पवित्र” युद्ध आहे म्हणताच काहींना भीतीचा थरकाप सुटेल. तथापि, योएलच्या भविष्यवादात सांगण्यात आलेले हे पवित्र युद्ध राष्ट्रांमधील नव्हे. ते क्षेत्र किंवा मालमत्ता यांच्यासाठी धर्म ही सबब वापरुन द्वेषाने केलेले युद्ध नाही, तर ते धार्मिक युद्ध आहे. ते पृथ्वीवरुन लोभ, झगडे, भ्रष्टता आणि जाच यांचे उच्चाटन करण्याचे देवाचे युद्ध आहे. ते, यहोवाचे त्याच्या सबंध निर्मितीवरील त्याच्या हक्काच्या सार्वभौमत्वास गौरविणार आहे. यामुळे ख्रिस्ताच्या राज्याच्या हजारवर्षीय राज्यकिर्दीत, देवाच्या संदेष्ट्यांनी भाकित केलेली विश्‍वव्यापी शांती, समृद्धी आणि आनंदाचे युग आणण्याची ते वाट मोकळी करून देईल.—स्तोत्रसंहिता ३७:९-११; यशया ६५:१७, १८; प्रकटीकरण २०:६.

२, ३. (अ) योएल ३:१४ मध्ये भाकित करण्यात आलेला “परमेश्‍वराचा [यहोवा, न्यू.व.] दिवस” काय आहे? (ब) या दिवशी राष्ट्रांना ज्या गोष्टीला तोंड द्यावे लागणार आहे ते का योग्यच आहे?

२ तेव्हा, योएल ३:१४ मध्ये सांगण्यात आलेला “परमेश्‍वराचा [यहोवा, न्यू.व.] दिवस” काय आहे? यहोवा स्वतःच त्या दिवसाबद्दल म्हणतोः “त्या दिवसाबद्दल हायहाय करा! भयंकर दिवस! परमेश्‍वराचा [यहोवा, न्यू.व.] दिवस जवळ येऊन ठेपला आहे. सर्वसमर्थाकडून विनाशमय असा तो येत आहे.” हा विनाशमय दिवस कसा असणार? संदेष्टा नंतर हे विवेचीत करतोः “लोकांच्या झुंडी, निर्णयाच्या खोऱ्‍यात लोकांच्या झुंडी आहेत, कारण निर्णयाच्या खोऱ्‍यात परमेश्‍वराचा [यहोवा, न्यू.व.] दिवस येऊन ठेपला आहे.” (योएल १:१५; ३:१४) यहोवाचे स्वर्ग व पृथ्वी यांजवरील हक्काच्या सार्वभौमत्वास नाकारणाऱ्‍या सबंध अभक्‍त मानवी समाजावर तो आपला न्यायी निर्णय बजावण्याचा तो दिवस आहे. मानवजातीला आपल्या पकडीत इतक्या काळ जखडवून ठेवणाऱ्‍या सैतानी व्यवस्थेचा चुराडा करावा हा यहोवाचा निर्णय आहे.—यिर्मया १७:५-७; २५:३१-३३.

३ पृथ्वीवरील भ्रष्ट व्यवस्थेने त्या निर्णयाला तोंड दिलेच पाहिजे. पण जागतिक व्यवस्था खरीच इतकी वाईट झालेली आहे का? तिच्या अहवालाकडे एकच कटाक्ष टाकल्यास पुरे! येशूने मत्तय ७:१६ मध्ये हे तत्त्व दिले आहेः “तुम्ही त्यांच्या फळांवरुन त्यांस ओळखाल.” जगातील मोठमोठी शहरे मादक औषधे, गुन्हेगारी, दहशत, अनैतिकता व प्रदुषण यांची डबकी बनली नाहीत का? कित्येक देशात नव्यानेच मिळालेले स्वातंत्र्य, राजकीय गोंधळ, अन्‍नटंचाई व गरीबी यांनी दडपून टाकले जात आहे. शंभर कोटीपेक्षा अधिक लोक उपासमारीत राहात आहेत. याखेरीज, मादक औषधे व अनैतिक जीवनाक्रमण यांनी भडकविलेली एडस्‌ची पीडा हिने पृथ्वीच्या मोठ्या भागावर आपली काळी सावली पाडली आहे. खासपणे, १९१४ पासून पहिल्या जागतिक युद्धाचा स्फोट झाल्यापासून जीवनातील प्रत्येक क्षेत्रात नासकेपणा दिसून येत आहे.—पडताळा २ तीमथ्य ३:१-५.

४. यहोवा राष्ट्रांपुढे कोणते आव्हान देतो?

४ तथापि, यहोवा सर्व राष्ट्रांमधून अशा लोकांचे एकत्रीकरण करीत आहे ज्यांना स्वखुशीने त्याच्या मार्गाचे शिक्षण घेण्याची व त्याच्या पथांनी चालण्याची इच्छा आहे. सबंध गोलार्धातून आलेल्या या लोकांनी आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ केले आहेत, आणि जगाच्या हिंसाचारी मार्गांचा त्याग केला आहे. (यशया २:२-४) होय तरवारी मोडून त्यांचे फाळ केले आहेत! पण ही गोष्ट योएल ३:९, १० मध्ये यहोवा जी ओरड करायला लावतो त्यापेक्षा वेगळी नाही का? कारण त्यात म्हटले आहेः “राष्ट्रांमध्ये हे जाहीर कराः ‘यज्ञयाग करुन लढाईची तयारी करा, वीरांची उठावणी करा, सर्व लढवय्यांना एकवट होऊ द्या, आणि त्यांस चाल करू द्या. तुमचे फाळ ठोकून त्यांच्या तरवारी बनवा, आपल्या कोयत्यांचे भाले बनवा.’” आह, येथे तर यहोवा जगाच्या सत्ताधिशांना त्यांचे सर्व सैन्य एकवटून हर्मगिदोनात त्याच्याविरुद्ध येण्याचे आव्हान करीत आहे! पण ते यशस्वी होणार नाहीत! त्यांचा पूर्ण पराजय होणार!—प्रकटीकरण १६:१६.

५. “पृथ्वीची द्राक्षे” तोडल्यावर काय घडेल?

५ प्रबळ सत्ताधिशांनी सार्वभौम प्रभु यहोवाच्या आव्हानाला प्रत्युत्तर म्हणून भयानक अशी शस्त्रागारे उभारली आहेत. पण सर्व काही व्यर्थ होय! यहोवा योएल ३:१३ मध्ये ही आज्ञा करतोः “विळा चालवा, पीक तयार आहे; या, चला, उतरा; द्राक्षांचा घाणा भरला आहे; कुंडे भरुन वाहत आहेत; कारण लोकांची दुष्टाई फार आहे.” हे शब्द प्रकटीकरण १४:१८-२० मधील वर्णनाशी जुळणारे आहे; येथे मशीही राजा येशूला आज्ञा करण्यात येते की, “पृथ्वीच्या द्राक्षीचे घड तोडून घे; तिची द्राक्षे परिपक्व झाली आहेत.” राजा आपला तीक्ष्ण विळा चालवून त्या प्रतिकारी राष्ट्रांना “देवाच्या क्रोधाच्या मोठ्या द्राक्षकुंडात” टाकतो. या कुंडातून, लाक्षणिकपणे घोड्यांच्या लगामास पोहोंचल इतके रक्‍त बाहेर येते व ते १,६०० फर्लांग, किंवा साधारण १८० मैल किंवा ३०० किलोमीटरपर्यंत वाहत जाते! यहोवाचा अनादर करणाऱ्‍या राष्ट्रांपुढे केवढा भयजनक नाश उभा आहे!

आज्ञापालन करणारे नागरिक

६. यहोवाच्या साक्षीदारांचा रा व त्यांचे अधिपती यांजबद्दल कोणता दृष्टिकोण आहे?

६ याचा अर्थ, यहोवाच्या साक्षीदारांठायी राष्ट्र व त्यांचे सत्ताधीश यांजविषयी अनादर आहेत का? मुळीच नाही! त्यांना स्पष्टरित्या दिसत असणाऱ्‍या भ्रष्ट स्थितीविषयी मोठा खेद वाटत आहे व त्यामुळेच यहोवाच्या जलदगतीने येणाऱ्‍या न्यायदंडाच्या दिवसाविषयी ते इशारा देत आहेत. याच वेळेसे ते पौलाने रोमकरांस पत्र १३:१ मध्ये जी सूचना दिली आहे की, “वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या अधीन असावे,” ती मान्य करतात. ते या अधिकाऱ्‍यांना भक्‍ती नव्हे तर सन्मान देतात. कायदा पालन करणारे नागरिक या अर्थाने ते पवित्र शास्त्रात दाखविण्यात आलेला प्रामाणिकपणा, सत्यता व शुद्धता यांजबद्दलच्या दर्जांचे पालन करतात व आपल्या कौटुंबिक सदस्यांमध्ये चांगले नैतिक आचरण उभारण्याचा प्रयत्न करतात. तसेच इतरांनाही याचे आचरण करता यावे म्हणून ते त्यांना शिक्षण देतात. ते सर्व लोकांसोबत शांतीप्रिय नातेसंबंध जोपासण्याचा प्रयत्न करतात आणि निदर्शने किंवा राजकीय क्रांत्या यात समाविष्ट होत नाहीत. मानवी वरिष्ठ अधिकाऱ्‍यांचे कायदे पालन करण्यात उदाहरणशील राहण्याचा यहोवाच्या साक्षीदारांचा प्रयत्न आहे, पण याच वेळी ते सर्वोच्च अधिकारी, सार्वभौम प्रभु यहोवा याजवर, त्याने या पृथ्वीवर परिपूर्ण शांती व नीतीमान सरकार आणावो म्हणून विसंबून आहेत.

त्याच्या निर्णयाची अमलबजावणी

७, ८. (अ) राष्ट्रांना कसे हादरविण्यात येईल व त्यांच्यावर काळोख कसा कोसळेल? (ब) योएल आज कोणाची प्रतिमा ठरतो, आणि सर्वसाधारण जगाच्या विरुद्ध यांना कसे आशीर्वादित केले जात आहे?

७ आपल्या निर्णयाची अंमलबजावणी कशी केली जाईल याबद्दलचे सविस्तर वर्णन लाक्षणिक भाषेत यहोवा पुढे देतो. तो म्हणतोः “सूर्य व चंद्र निश्‍चये काळे पडतील; तारे प्रकाश द्यावयाचे थांबतील. यहोवा सीयोनातून गर्जना करील; यरुशलेमातून आपला शब्द ऐकवील. आकाश व पृथ्वी थरथर कापतील.” (योएल ३:१५, १६) मानवजातीची तेजोमय व समृद्ध वाटणारी स्थिती वेगाने अंधकारी बनेल आणि उध्वस्त जागतिक व्यवस्थेस जणू एखाद्या बलाढ्य भूकंपाच्या धक्क्यामुळे विध्वंस होतो तसे अस्तित्वातून नाहीसे केले जाईल!—हाग्गय २:२०-२२.

८ तथापि, यहोवा आपल्या लोकांसाठी एक आश्रय व दुर्ग होईल हे आनंदविणारे आश्‍वासन लक्षात घ्या! ते का बरे? कारण ते एक लोक—आंतरराष्ट्रीय लोक—आहेत व यांनी यहोवाच्या या शब्दांना प्रतिसाद दिला आहे की, “मी यहोवा, तुमचा देव आहे हे तुम्हांस कळेल.” (योएल ३:१७) योएल या नावाचा अर्थ “यहोवा देव आहे” असा होत असल्यामुळे तो आधुनिक काळातील यहोवाच्या सार्वभौमत्वाचे निर्भिडपणे प्रकटन करणाऱ्‍या त्याच्या अभिषिक्‍त साक्षीदारांचे हुबेहूब प्रतिबिंब देत आहे. (पडताळा मलाखी १:११.) योएलच्या भविष्यवादाच्या प्रारंभीच्या शब्दांचे वाचन केल्यास, तो देवाच्या आजच्या लोकांच्या कार्याचे केवढे ठळक वर्णन देत आहे ते कळेल.

टोळधाड

९, १०. (अ) योएलने कोणत्या पीडेचे भाकित केले? (ब) प्रकटीकरण देखील योएलने पिडेबद्दल केलेल्या भाकिताचा कसा प्रतिध्वनि देते, आणि या पीडेचा ख्रिस्तीधर्मजगतावर कसला परिणाम होतो?

९ आता, “योएल याला परमेश्‍वराचे [यहोवा, न्यू.व.] (जे) वचन प्राप्त झाले” ते ऐकाः “अहो वृद्धहो, हे ऐका; देशात राहणारे सर्व जनहो, कान द्या. तुमच्या काळी अथवा तुमच्या वाडवडिलांच्या काळी अशी गोष्ट कधी घडली होती काय? तुम्ही हे आपल्या मुलांबाळांस कळवावे व त्यांच्या मुलांनी आपल्या पुढच्या पिढीस कळवावे. कुरतडणाऱ्‍या टोळापासून जे राहिले ते झुंडींनी येणाऱ्‍या टोळांनी खाल्ले; झुंडींनी येणाऱ्‍या टोळांपासून जे राहिले ते चाटून खाणाऱ्‍या टोळांनी खाल्ले; चाटून खाणाऱ्‍या टोळांपासून जे राहिले ते अधाशी टोळांनी खाल्ले.”—योएल १:१-४.

१० ही एक अपूर्व मोहीम आहे, जिचे स्मरण सदासर्वदा राहील. टोळ झुंडीझुंडींनी येत राहून ते प्रदेश उद्‌ध्वस्त करतील. याचा काय अर्थ होतो? प्रकटीकरण ९:१-१२ देखील टोळांच्या पीडेबद्दल सांगते व म्हणते की, ही पिडा यहोवा “अगाधकूपाचा दूत, राजा” याच्याद्वारे पाठवतो. हा दूत ख्रिस्त येशूशिवाय दुसरा कोणी नाही. इब्री भाषेतील त्याचे नाव “अबद्दोन,” आणि ग्रीक भाषेतील “अपल्लूओन” यांचा अर्थ अनुक्रमे “नाश,” आणि “विनाशक,” असा आहे. ते टोळ अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या शेषांचे प्रतिनिधित्व करतात; ते आज प्रभूच्या दिवसात ख्रिस्ती धर्मजगताच्या खोट्या धर्मास उघड करून आणि त्यांच्यावर येणारा यहोवाचा सूड घोषित करून त्यांची कुरणे संपूर्णपणे उद्‌ध्वस्त करीत आहेत.

११. आधुनिक काळातील टोळांना कोणाची साथ मिळाली आहे, आणि यांच्या हल्ल्याचे खासपणे कोण निशाण आहेत?

११ प्रकटीकरण ९:१३-२१ मध्ये सूचित केल्याप्रमाणे टोळांच्या पीडेनंतर घोडदळाची मोठी पीडा येते. हे आज किती खरे आहे, कारण काही थोडक्या हजार अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना आज “दुसरी मेंढरे” वर्गाचे चाळीस लाखांपेक्षा अधिक संख्येचे नेटाने कूच करणारे घोडदळ येऊन मिळाले आहे! (योहान १०:१६) ते ख्रिस्ती धर्मजगाच्या मूर्तिपूजकांवर तसेच ज्यांनी “नरहत्या, चेटके, जारकर्मे व चोऱ्‍या याबद्दलही पश्‍चाताप केला नाही” अशांवर येणाऱ्‍या यहोवाच्या दंशकारी न्यायदंडाची घोषणा करण्यात एक आहेत. या शतकाच्या खूनी युद्धांना पाठबळ दिलेले कॅथोलिक तसेच प्रॉटेस्टंट धर्मपुढारी आणि वेडेपिसे पाळक तसेच विकृत दूरदर्शनचे सुवार्तिक यांच्याविरुद्ध तो न्यायदंडाचा संदेश देण्यात येत आहे.

१२. ख्रिस्ती धर्मजगतातील अधिकारी न्यायदंडाचा संदेश मिळण्याच्या का पात्रतेचे आहेत, आणि त्यांचे तसेच मोठ्या बाबेलच्या सर्व सदस्यांचे लवकरच काय होणार?

१२ अशा या “सभ्य” पेहरावातील धर्मगुरुंना यहोवाचा आदेश आहेः “अहो मद्यप्यांनो, जागे व्हा आणि रडा; द्राक्षारस पिणाऱ्‍यांनो, तुम्ही सर्व नव्या द्राक्षरसाकरिता विलाप करा; कारण तो तुमच्या तोंडातून काढून घेतला आहे.” (योएल १:५) या २०व्या शतकात ख्रिस्ती धर्मजगताच्या धर्मांनी देवाच्या वचनाच्या शुद्ध नैतिक तत्वांऐवजी जगाच्या स्वैराचारी गोष्टींशी बदली केली. खोटा धर्म व त्याच्या पुरस्कर्त्यांना जगाचे मार्ग अवलंबणे मोठे गोड वाटते; पण यामुळे आध्यात्मिक व शारीरिक आजारांची केवढी कापणी त्यांनी केली! त्यामुळे, लवकरच देवाच्या “विचाराने” राजकारणी सत्ता खोट्या धर्माचे जगव्याप्त साम्राज्य, मोठी बाबेल हिजवर उलटतील व तिला उद्‌ध्वस्त करतील. केवळ त्यावेळी, म्हणजे यहोवाचा निर्णय तिच्याबाबतीत बजावला जात आहे हे कळल्यावर ती आपल्या मद्याच्या धुंदीतून ‘जागे होईल.’

“महान व बलवान राष्ट्र”

१३. ख्रिस्ती धर्मजगताला टोळांच्या झुंडी “महान व बलवान राष्ट्र” का वाटतात?

१३ यहोवाचा संदेष्टा टोळाच्या झुंडीचे वर्णन करताना त्यांना “महान व बलवान राष्ट्र” म्हणतो. हेच मोठ्या बाबेलला वाटते. (योएल २:२) ख्रिस्ती धर्मजगताच्या धर्मांना जपानमध्ये बुद्धांचे परिवर्तन घडविण्यात अपयश आले आहे या गोष्टीवर मोठ्या बाबेलचे धर्मपुढारी पडदा टाकतात. तथापि, आज त्याच देशात १,६०,००० पेक्षा अधिक जपानी यहोवाचे साक्षीदार सर्वत्र पसरलेले असून ते लोकांच्या घरी २,००,००० पेक्षा अधिक पवित्र शास्त्राचे अभ्यास चालवीत आहेत. इटलीमध्ये आज १,८०,००० यहोवाचे साक्षीदार कॅथोलिकांच्या खालोखाल दुसऱ्‍या क्रमांकावर आहेत असे ओळखण्यात येते. खरे म्हणजे, यहोवाचे साक्षीदार इटलीमध्ये दर वर्षी चर्चमधून ‘निदान १०,००० विश्‍वासू कॅथोलिकांना’ आपणामध्ये घेत आहेत या गोष्टीला एका रोमन कॅथोलिक अधिकाऱ्‍याला लपविता आले नाही.a साक्षीदार अशांचे आनंदाने स्वागत करीत आहेत.—यशया ६०:८, २२.

१४, १५. योएल टोळांच्या झुंडीचे कसे वर्णन देतो, आणि याची पूर्णता आज कोणत्या प्रकाराने झाली आहे?

१४ अभिषिक्‍त साक्षीदारांच्या टोळांच्या गटाचे वर्णन देताना योएल २:७-९ म्हणतेः “वीरांप्रमाणे ते धावतात, योद्ध्‌यांप्रमाणे ते तट चढून जातात, ते प्रत्येक आपापल्या मार्गाने कूच करितात, ते आपली दिशा सोडीत नाहीत. ते एकमेकांस रेटून चालत नाहीत; ते आपापल्या वाटेने जातात; समोर शस्त्रे असता ते जखम न होता त्यातून पार जातात. ते शहरातून इकडेतिकडे फिरतात, ते भिंतीवरुन चालतात, ते चढून घरात शिरतात, चोरासारखे खिडक्यातून प्रवेश करितात.”

१५ हे अभिषिक्‍त “टोळ” तसेच त्यांना येऊन मिळालेल्या चाळीस लक्षापेक्षा अधिक दुसरी मेंढरे या मोठ्या सैन्याचे खरेच लक्षवेधी चित्रण आहे! धार्मिक शत्रूत्वाची कोणतीही भिंत त्यांना अडथळा बनत नाही. ते जाहीर साक्षीकार्य तसेच इतर ख्रिस्ती हालचाली ‘ज्या नियमाने मजल मारीत आहेत, त्यानेच पुढे जात आहेत.’ (पडताळा फिलिप्पैकर ३:१६.) हातमिळवणी करण्यापेक्षा ते मरणास सामोरे जातात. हेच नाझी जर्मनीमध्ये हजारो साक्षीदारांनी केले. त्यांनी कॅथोलिक हिटलरची स्तुती केली नाही यामुळे त्यांना ‘बंदुकीच्या गोळीने ठार व्हावे लागले.’ टोळाच्या सैन्याने ख्रिस्ती धर्मजगताच्या ‘शहरात’ संपूर्ण साक्ष दिली आहे; सर्व अडखळणांवर मात करून ते पुढे गेले आणि आपल्या घरोघरच्या कार्याद्वारे लाखो पवित्र शास्त्र प्रकाशनांचे वितरण करताना ते जणू चोरासारखे घरात प्रवेश करतात. ही साक्ष द्यावी अशी यहोवाची इच्छा आहे त्यामुळे स्वर्ग किंवा पृथ्वीवरील कोणतीही ताकद त्यांना थोपवू शकत नाही.—यशया ५५:११.

“पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले”

१६, १७. (अ) योएल २:२८, २९ मधील शब्दांची उल्लेखनीय पूर्णता कधी घडली? (ब) योएलच्या कोणत्या भविष्यवादीत शब्दांची पहिल्या शतकात पूर्ण स्वरुपाची पूर्णता झाली नाही?

१६ यहोवा आपल्या साक्षीदारांना असे म्हणतोः “तुम्ही समजाल की [आध्यात्मिक] इस्राएल लोकांमध्ये मी आहे; मी परमेश्‍वर [यहोवा, न्यू.व.] तुमचा देव आहे; अन्य कोणी नाही.” (योएल २:२७) या गोष्टीची जाणीव त्याच्या लोकांना, यहोवाने योएल २:२८, २९ ची पूर्णता करण्यास सुरवात केली तेव्हा कळाली. “यानंतर असे होईल की, मी आपल्या आत्म्याचा मनुष्यमात्रावर वर्षाव करीन, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील.” हे इ. स. ३३च्या पेंटेकॉस्टसमयी घडले. त्यावेळी येशूच्या जमलेल्या शिष्यांचा पवित्र आत्म्याने अभिषेक घडला व ते “सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले.” पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्यांनी प्रचार केला व त्या एकाच दिवशी “सुमारे तीन हजार मनुष्यांची त्यांच्यात भर पडली.”—प्रे. कृत्ये २:४, १६, १७, ४१.

१७ त्या आनंदाच्या प्रसंगी पेत्राने देखील योएल २:३०-३२चे अवतरण घेतलेः “मी आकाशात व पृथ्वीवर रक्‍त, अग्नि व धुराचे लोळ अशी चिन्हे दाखवीन. परमेश्‍वराचा [यहोवा, न्यू.व.] महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्‍तमय होईल. तेव्हा असे होईल की, जो कोणी परमेश्‍वराचा [यहोवा, न्यू.व.] धावा करील तो तरेल.” त्या शब्दांची अल्प प्रमाणातील पूर्णता यरुशलेमाचा इ. स. ७० मध्ये नाश झाला तेव्हा झाली.

१८. योएल २:२८, २९ ची मोठी पूर्णता होण्यास कधी आरंभ झाला?

१८ तथापि, योएल २:२८-३२ ची भावी पूर्णता असणार. खरे पाहता या भविष्यवादाची अप्रतिम पूर्णता सप्टेंबर १९१९ पासून पुढे घडत गेली. त्यावेळी यहोवाच्या लोकांचे अमेरिकेतील सीडर पॉईंट, ओहायो, येथे स्मरणीय असे अधिवेशन झाले. देवाचा आत्मा स्पष्ट रुपात दिसला, आणि त्याच्या अभिषिक्‍त सेवकांना गोलार्धव्याप्त साक्षीकार्याच्या मोहीमेसाठी प्रभावीत केले गेले, जे आजतागायत चालू आहे. यामुळे केवढी भव्य वाढ परिणामित झाली! त्या सीडर पॉईंट अधिवेशनात जमलेल्या ७,००० पेक्षा अधिक लोकांची वाढ आता मार्च ३०, १९९१ मधील येशूच्या मृत्युच्या स्मरणदिनाच्या वेळी १,०६,५०,१५८ पर्यंत गेली. यामध्ये केवळ ८,८५० लोकांनीच अभिषिक्‍त ख्रिस्ती असल्याचा दावा व्यक्‍त केला. यहोवाच्या कार्यकारी आत्म्यामुळे ही जी गोलार्धव्याप्त वाढ घडवून आणण्यात आली त्यामुळे सर्वांना केवढा आनंद झाला!—यशया ४०:२९, ३१.

१९. यहोवाच्या दिवसाची समीपता लक्षात ठेवता, आम्हा प्रत्येकाची प्रवृत्ती कशी असली पाहिजे?

१९ अगदी नजीक, “परमेश्‍वराचा [यहोवा, न्यू.व.] महान व भयंकर दिवस” आलेला आहे; तो सैतानी व्यवस्थेचा विध्वंस करील. (योएल २:३१) तथापि, त्यावेळी, “जो कोणी परमेश्‍वराचे [यहोवा, न्यू.व.] नाम घेऊन त्याचा धावा करील, तो तरेल.” (प्रे. कृत्ये २:२१) ते कसे? प्रेषित पेत्र म्हणतो की, “परमेश्‍वराचा [यहोवा, न्यू.व.] दिवस चोरासारखा येतो,” आणि पुढे सांगतोः “तर ही सर्व अशी लयास जाणारी आहेत म्हणून पवित्र वर्तणुकीत व सुभक्‍तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कसे असले पाहिजे?” यहोवाचा दिवस समीप आहे हे ध्यानात ठेवल्यामुळे आपल्याला “नवे आकाश व नवी पृथ्वी” याबद्दल यहोवाने दिलेल्या अभिवचनाची पूर्णता बघण्याचा आनंद मिळू शकेल.—२ पेत्र ३:१०-१३.

[तळटीपा]

a ला रिपब्लिका, रोम, इटली, नोव्हेंबर १२, १९८५, आणि ला रिविस्टा डेल क्लेरो इटालिआनो, मे १९८५.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

▫ “यहोवाचा दिवस” काय आहे?

▫ येशू ‘पृथ्वीची द्राक्षे’ कशी तोडणार, व का?

▫ टोळांची पिडा ख्रिस्ती धर्मजगताला १९१९ पासून कशी जाणवू लागली?

▫ यहोवाचा आत्मा त्याच्या लोकांवर प्रथम इ. स. ३३ मध्ये व पुन्हा १९१९ मध्ये कसा ओतण्यात आला?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा