मिशना आणि देवाने मोशेला दिलेले नियमशास्त्र
“क धीच समजू न शकणाऱ्या विषयांबद्दलची चर्चा आपण बऱ्याच वेळेपासून करीत आहोत, असे गृहीत धरून आपण याची सुरवात करू . . . आपल्याला . . . असे वाटते, की आपण जणू काय दूरच्या विमानतळाच्या प्रतिक्षालयात आहोत. लोकांचे शब्द आपल्या कानांवर पडतात, पण त्या शब्दांचे अर्थ आणि त्यांतून दिसणाऱ्या चिंता विशेषतः त्यांच्या आवाजात असलेली उत्कंठा यांमुळे आपण चकित होतो.” अशा प्रकारचे वर्णन यहुदी विद्वान जेकब नोससनर यांनी मिशनाचे पहिल्यांदा वाचन करणाऱ्या वाचकाला काय वाटते ते सांगण्यासाठी केले. नोससनर पुढे म्हणतात: “मिशनाची नक्की अशी सुरवात नाही. ती सुरवात अचानक मध्येच नाहीशी होते.”
यहुदी धर्माचा इतिहास, (इंग्रजी) या पुस्तकात डॅनिएल जरेमी सिल्वर मिशनाला “रब्बींच्या यहुदी धर्माचा प्रमुख मूळग्रंथ” संबोधतात. खरे तर, ते पुढे असे म्हणतात: “मिशनाने अखंड [यहुदी] प्रशिक्षणाचा प्रमुख अभ्यासक्रम म्हणून बायबलची जागा घेतली.” अशा प्रकारचे दुर्बोध पुस्तक इतके महत्त्वाचे का होणार होते?
मिशनाच्या पुढील विधानात आपल्याला या प्रश्नाचे काहीअंशी उत्तर मिळते: “मोशेला तोराह सीनाय पर्वतावर प्राप्त झाला आणि त्याने तो यहोशवाच्या हाती सोपवला, यहोशवाने वडिलांच्या, आणि वडिलांनी तो संदेष्ट्यांना दिला. संदेष्ट्यांनी तो महासंमेलनातील लोकांच्या हाती सोपवला.” (एवॉट १:१) सीनाय पर्वतावर मोशेला जी माहिती सुपूर्त केली होती ती यात असल्याचा मिशनाचा दावा आहे—इस्राएलासाठी देवाच्या नियमशास्त्राचा अलिखित भाग. महासंमेलनातील (नंतर सन्हेद्रिन असे म्हणण्यात येऊ लागले) बुद्धिमान आणि विचारवंत लोकांना एका मोठ्या श्रृंखलेचा भाग म्हणून समजले जात असे, ज्यांनी विशिष्ट शिकवणुकी अखेरीस मिशनामध्ये नमूद केल्या जात तोपर्यंत मौखिकरीत्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला तोंडी दिल्या. पण वास्तवात तसे आहे का? वास्तविकरीत्या मिशना कोणी लिहिले आणि का? सीनाय पर्वतावर मोशेला प्राप्त झालेली माहिती त्यात होती का? त्याचा आज आपल्याकरता काही अर्थ होतो का?
यहुदी धर्म मंदिराविना
मोशेला लिखित नियमशास्त्राव्यतिरिक्त ईश्वरी मौखिक नियम दिले असा विश्वास, ईश्वरी प्रेरणेने शास्त्रवचनांचे लिखाण होत असताना अज्ञात होता.a (निर्गम ३४:२७) अनेक शतकानंतर, यहुदीधर्मामध्ये परूशांच्या गटाने ही संकल्पना विकसित केली आणि तिचा प्रसारही केला. सा. यु. पहिल्या शतकाच्या दरम्यान सदुकी आणि इतर यहुद्यांनी या गैरबायबली शिकवणुकीचा विरोध केला. तथापि, जेरूसलेममधील मंदिर यहुदी उपासनेचे केंद्र होते तोपर्यंत मौखिक नियमाचा वाद दुय्यम स्थानावर होता. या मंदिरातील उपासनेने प्रत्येक यहुद्याच्या अस्तित्वाला स्वरूप आणि काही प्रमाणात स्थैर्य दिले.
तथापि, सा. यु. ७० मध्ये कल्पना करवणार नाही, अशा प्रकारची धार्मिक संकटे यहुदी राष्ट्रावर कोसळली. रोमी सैन्यांनी जेरूसलेमचा नाश केला आणि दहा लाखांपेक्षा अधिक यहुद्यांना आपले प्राण गमवावे लागले. त्यांच्या आध्यात्मिक जीवनाचे केंद्र असलेले मंदिर नाहीसे झाले होते. मोशेच्या नियमशास्त्रानुसार जगणे अर्थात मंदिरात अर्पण तसेच याजकीय सेवा करणे आता अशक्यप्राय झाले होते. यहुदीधर्माचा आधारस्तंभच कोसळला होता. तालमूद विद्वान एडीन स्टाईनसॉल्टस् लिहितात: “सा. यु. ७० मधील . . . विनाशाने धार्मिक जीवनाच्या संपूर्ण रचनेस पुन्हा निर्माण करणे तातडीची प्रमुख बाब बनवले होते.” आणि त्यांनी त्याची पुनर्रचना केली सुद्धा.
मंदिराचा नाश होण्याआधीच परूशी नेता, हिल्लेल याचा आदरणीय शिष्य असलेल्या योहानान बेन झॉकी यांनी, यहुदी धर्माचे आध्यात्मिक केंद्र आणि सन्हेद्रिन जेरूसलेमपासून याव्नेह येथे हलविण्याची परवानगी व्हेस्पासिन (लवकरच सम्राट होणाऱ्या) यांच्याकडून प्राप्त केली होती. स्टाईनसॉल्टस् सांगतात, की जेरूसलेमच्या विनाशानंतर, योहानान बेन झॉकी “त्यांच्यासमोर लोकांकरता एक नवीन केंद्र स्थापण्याचे आणि नवीन परिस्थितींशी जळवून घेण्यात त्यांना मदत करण्याचे आव्हान होते. आता मंदिर अस्तित्वात नव्हते, धार्मिक आवेश दुसऱ्या एका केंद्रस्थानी केंद्रित करावयाचा होता.” मौखिक नियम नवीन केंद्रस्थान होते.
मंदिर जमीनदोस्त झाले होते, सदुकी आणि इतर यहुदी पंथांनी कोणत्याही प्रकारचा ठाम पर्याय प्रस्तुत केला नाही. परूशी लोक, यहुदी प्रमुख प्रवाह झाले आणि त्यांनी विरोधी गटाला आपल्यासोबत घेतले. एकते वर जोर देऊन, प्रमुख रब्बींनी स्वतःला परूशी म्हणण्याचे थांबवले कारण या संज्ञेत विशिष्ट पंथाचा किंवा पक्षपाताचा अर्थ ध्वनित होत होता. त्यांना रब्बी अर्थात “इस्राएलचे विचारवंत लोक” या नावाने ओळखण्यात येऊ लागले. हे विचारवंत, मौखिक नियमाविषयी असणाऱ्या त्यांच्या संकल्पनेला आश्रय मिळावा म्हणून एक रचना तयार करणार होते. मंदिरावर ज्याप्रकारे लोकांनी हल्ला चढवला होता त्याप्रकारे या आध्यात्मिक रचनेवर हल्ला चढवला जाणार नव्हता.
मौखिक नियमांचे दृढीकरण
याव्नेहमधील (जेरूसलेमच्या पश्चिमेपासून ४० किलोमीटर) रब्बी अकादमी आता प्रमुख केंद्र होते तरी देखील, इतर अकादमींच्या मौखिक नियम शिकवणीचा संपूर्ण इस्राएलमध्ये तसेच बॅबिलोन आणि रोमसारख्या दूरवरच्या ठिकाणांपर्यंत आवाका वाढला. तथापि, यामुळे एक समस्या निर्माण झाली. स्टाईनसॉल्टस् सांगतात: “सर्व विचारवंत एकत्रित होते आणि [जेरूसलेममधील] लोकांच्या एका गटाद्वारे बुद्धिमानाचे प्रमुख कार्य पार पाडले जात होते तोपर्यंत परंपरेचा एकसुत्रीपणा कायम होता. परंतु शिक्षकांच्या संख्येतील अचानक वाढीमुळे आणि वेगवेगळ्या शाळांच्या स्थापनेमुळे . . . अभिव्यक्तीच्या स्वरूपांचा आणि पद्धतींचा अतिरेक झाला.”
मौखिक नियम शिकवणाऱ्या शिक्षकांना तानाइम असे संबोधण्यात येई, तानाइम संज्ञेचे मूळ अरामी भाषेत असून त्याचा मूळ अर्थ “अभ्यास करणे,” “पुनरावृत्ती करणे” किंवा “शिकवणे” असा होतो. ही गोष्ट तीव्र पुनरावृत्ती आणि स्मरण यांद्वारे मौखिक नियम शिकण्याच्या आणि शिकवण्याच्या त्यांच्या पद्धतीला स्पष्ट करते. मौखिक परंपरा स्मरणात ठेवण्यास सुलभ व्हावे म्हणून, प्रत्येक नियमाचे किंवा परंपरेचे थोडक्या शब्दांत, संक्षिप्त स्वरूपात वर्णन करण्यात आले होते. जेवढे शब्द कमी तेवढे चांगलेच होते. शैलीदार, काव्यमय पद्धत वापरण्यात येत असे आणि संज्ञा बहुतेकवेळा गुणगुणल्या जात असत किंवा गायल्या जात असत. तथापि, हे नियम सुसंघटित नव्हते आणि शिक्षकाशिक्षकांनुसार त्यांत फार भिन्नता होती.
वेगवगळ्या मौखिक परंपरांना विशिष्ट स्वरूप आणि रचना देणारा पहिला रब्बी म्हणजे अकिबा बेन जोसफ (सुमारे सा. यु. ५०-१३५). त्याच्याविषयी स्टाईनसॉल्टस् लिहितात: “त्याच्या काळातील लोकांनी त्याच्या कार्याची तुलना अशा मजूराच्या कामासोबत केली जो शेतात जातो आणि त्याला तेथे जे काही मिळते ते तो आपल्या टोपलीत टाकतो आणि घरी आल्यानंतर मिळालेल्या सर्व वस्तू वेगवेगळ्या व्यवस्थित मांडतो. अकिबाने संघटित नसलेल्या अनेक विषयांचा अभ्यास केला आणि त्या विषयांची योग्य वर्गवारी केली.”
सा. यु. दुसऱ्या शतकात—जेरूसलेमच्या विनाशानंतर ६० पेक्षा अधिक वर्षांनी—बार कोख्बा याच्या नेतृत्वाखाली रोमच्या विरोधातील दुसरे प्रमुख यहुदी बंड पुकारण्यात आले. पुन्हा एकदा, बंडखोरीमुळे विनाश आला. अकिबा आणि त्याचे अनेक शिष्य बळी पडलेल्या जवळजवळ दहा लाख यहुद्यांपैकी होते. मंदिराच्या विनाशाच्या वर्षदिनाखेरीज यहुद्यांनी जेरूसलेममध्ये पाऊल न ठेवण्याचा हुकूम रोमी सम्राट हाड्रीयन याने सोडला तेव्हा मंदिराची पुन्हा उभारणी करण्याची आशा धुळीस मिळाली.
अकिबानंतर हयात असलेल्या तानाइम याने जेरूसलेमेमध्ये मंदिर पुन्हा कधीही पाहिले नाही. परंतु मौखिक नियमाच्या परंपरांतील अभ्यासाचा रचित नमुना त्यांचे “मंदिर,” किंवा उपासनेचे केंद्रस्थान झाला. अकिबा आणि त्याच्या शिष्यांनी या मौखिक नियमाला बळकट करण्याचे हाती घेतलेले काम शेवटचा तानाइम, यहुदा हा-नासी याने हाती घेतले.
मिशनाचे भाग
यहुदा हा-नासी हा हिल्लेल आणि गमलिएलचा वंशज होता.b बार कोख्बाने बंडखोरी केली त्या काळात त्याचा जन्म झाला, सा. यु. दुसऱ्या शतकाच्या अखेरीस आणि तिसऱ्या शतकाच्या सुरवातीस तो इस्राएलमधील यहुदी समाजाचा प्रमुख झाला. हा-नासी या पदवीचा अर्थ “राजकुमार” असा होतो, या अर्थातून त्याच्या काळातील यहुदी लोकांमध्ये त्याला जे स्थान होते ते दिसून येते. बहुतेकवेळा त्याचा मात्र रब्बी असा उल्लेख करण्यात आला आहे. यहुदा हा-नासी याने त्याच्या अकादमीचे आणि सन्हेद्रिनचे मस्तकपद भूषविले, पहिल्यांदा बेथ शरिम येथे आणि नंतर गलीलमधील सप्फोरिस येथे.
रोमसोबतच्या भवितव्यातील संघर्षांमुळे या मौखिक नियमाचे संचारण धोक्यात येईल हे ओळखल्यामुळे यहुदा हा-नासी याने मौखिक नियम टिकून राहावा म्हणून त्याची खास रचना करण्याचा निश्चय केला. त्याने त्याच्या अकादमीत तत्कालिन विशेष विद्वान लोकांना एकत्रित केले. मौखिक नियमाच्या प्रत्येक मुद्द्यावर आणि परंपरेवर वादविवाद करण्यात आला. इब्री भाषेतील काव्यमय कठीण नमुन्याप्रमाणे या चर्चांचे सारांश विलक्षण संक्षिप्त रूपात तयार करण्यात आले होते.
हे सारांश मुख्य विषयवार सहा प्रमुख विभागांत किंवा वर्गांत संघटित करण्यात आले. यहुदाने ते सारांश आणखी ६३ उपविभागांत किंवा लघुग्रंथांत विभागले. आध्यात्मिक रचना आता पूर्ण झाली होती. तोपर्यंत अशा प्रकारच्या परंपरेचे नेहमी मौखिकरीत्या वहन केले जात असे. पण अधिक संरक्षण प्राप्त झाल्यानंतर, अखेरचे प्रमुख पाऊल उचलण्यात आले—सर्व गोष्टींचे लिखित अहवाल तयार करणे. मौखिक नियमाच्या या प्रभावशाली नवीन लिखित स्वरूपाला मिशना असे संबोधण्यात आले. मिशना हे नाव इब्री शब्द शानाह यापासून आलेले आहे ज्याचा अर्थ “पुनरावृत्ती करणे,” “अभ्यास करणे,” किंवा “शिकवणे” असा होतो. हा शब्द अरामी भाषेतील तेना या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ज्यापासून तानाइम हा शब्द तयार होतो, ही संज्ञा मिशनाच्या शिक्षकांना लागू होत होती.
यहुदी नियमांचा सारांश तयार करणे हा मिशनाचा हेतू नव्हता. वाचकाला मूलभूत तत्त्वे माहीत आहेत असे समजून त्यामध्ये अधिकांश अपवाद देण्यात आले होते. यहुदा हा-नासी याच्या काळात रब्बी अकादमींमध्ये जे चर्चिण्यात आणि शिकवण्यात आले होते त्याचा सारांश मिशनामध्ये होता. संबंधित स्वरूप किंवा मूलरचना यांवर होणाऱ्या पुढील वादविवादाकरता मिशना रूपरेषा असणार होता.
मोशेला सीनाय पर्वतावर जे देण्यात आले होते ते प्रकट करण्याऐवजी मिशना मौखिक नियमाच्या विकासातील अशी अंतर्दृष्टी देते, या संकल्पनेला परूशांपासून सुरवात झाली. मिशनामध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांतील कथन तसेच येशू ख्रिस्त आणि परूशी यांच्यामध्ये झालेल्या विशिष्ट चर्चांविषयी समज देते. तथापि, सावधगिरी बाळगण्याची गरज आहे कारण मिशनामध्ये आढळून येणाऱ्या कल्पना सा. यु. दुसऱ्या शतकाचे यहुदी दृष्टिकोन प्रकट करतात. दुसऱ्या मंदिराचा काळ आणि तालमूद यांच्यामधील दुवा म्हणजे मिशना होय.
[तळटीपा]
a अधिक माहितीसाठी, वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित केलेल्या युद्धाविना जग कधी अस्तित्वात असेल का?, (इंग्रजी) या माहितीपत्रकाची पृष्ठे ८-११ पाहा.
b टेहळणी बुरूज जुलै १५, १९९६ या अंकातील “गमलिएल—त्याने तार्सकर शौलास शिकवले,” हा लेख पाहा.
[२६ पानांवरील चौकट]
मिशनाचे विभाग
सहा विषयांनुसार मिशनाचे विभाजन करण्यात आले आहे. त्यांमध्ये लहान ६३ पुस्तके किंवा ग्रंथ असून, ती अध्यायांमध्ये आणि मिशनायोत किंवा परिच्छेदांमध्ये (वचनामध्ये नव्हे) विभागण्यात आली आहेत.
१. झरिम (कृषी नियम) या ग्रंथांमध्ये अन्नावर आणि कृषीसंबंधी केलेल्या प्रार्थनांची चर्चा आहे. त्यांमध्ये दशांश, याजकीय भाग, धान्य गोळा करणे आणि शब्बाथ वर्षे यांविषयी नियम समाविष्ट आहेत.
२. मोएड (पवित्र प्रसंग, उत्सव) या विषयावर असलेल्या ग्रंथांमध्ये शब्बाथ, प्रायश्चित्ताचा दिवस आणि इतर उत्सवांसाठी असलेल्या नियमांची चर्चा करण्यात आली आहे.
३. नशिम (स्त्रिया, विवाह नियम) या ग्रंथांमध्ये विवाह आणि घटस्फोट, शपथ, नासोरी आणि कथित व्यभिचार या बाबींची चर्चा करण्यात आली आहे.
४. नझिकिन (हानी आणि मुलकी नियम) या विषयवार असलेल्या ग्रंथांमध्ये मुलकी आणि मालकी नियम, न्यायालय आणि शिक्षा, सन्हेद्रिनचे कार्य, मूर्तिपूजा, शपथा आणि प्रमुख लोकांची नीतिमूल्ये या विषयांवर चर्चा करण्यात आली आहे (एवॉट).
५. कोदाशिम (अर्पण) या ग्रंथांमध्ये प्राणी आणि धान्य अर्पण करण्याच्या नियमांची तसेच मंदिराच्या मोजमापाची चर्चा करण्यात आली आहे.
६. तोहारोत (शुद्धिकरण विधी) या ग्रंथांच्या विषयाखाली विधी शुद्धता, स्नान, हात धुणे, त्वचारोग आणि विभिन्न वस्तूंची अशुद्धता यांची चर्चा करण्यात आली आहे.
[२८ पानांवरील चौकट]
मिशना आणि ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचने
मत्तय १२:१, २: “त्यावेळी एका शब्बाथ दिवशी येशू शेतामधून गेला; तेव्हा त्याच्या शिष्यांना भूक लागली होती, म्हणून ते कणसे मोडून खाऊ लागले. हे पाहून परूशी त्याला म्हणाले, पाहा, शब्बाथ दिवशी जे करू नये ते आपले शिष्य करीत आहेत.” येशूच्या शिष्यांनी जे काही केले त्याचे खंडण इब्री शास्त्रवचने करत नाहीत. पण मिशनामध्ये आपल्याला ३९ अशी कामे आपल्याला पाहायला मिळतात जी शब्बाथ दिवशी करण्यास रब्बींनी मनाई केली होती.—शाब्बाथ ७:२.
मत्तय १५:३: “[येशूने] त्यांस उत्तर दिले, तुम्हीहि आपल्या संप्रदायेकरून देवाची आज्ञा का मोडता?” या मनोवृत्तीस मिशना मान्य करते. (सन्हेद्रिन ११:३) आपण वाचतो: “[लिखित] नियमशास्त्राच्या वचनाचे [पालन करण्यापेक्षा] शास्त्र्यांच्या वचनाचे [पालन करण्यास] अधिक कडक असले पाहिजे. जर एखाद्याने असे म्हटले, ‘ताईत घालण्याचे कोणतेही बंधन नाही’ कारण नियमशास्त्राच्या वचनाचे उल्लंघन झाले, तर तो दोषाच्या पात्र नाही; [पण त्याने असे म्हटले], ‘त्याच्यात पाच भाग असले पाहिजेत’, ते शास्त्रांच्या वचनात भर घातल्यासारखे झाल्यामुळे तो दोषपात्र आहे.”—द मिशना, हर्बट डॅन्बी यांच्याद्वारे, पृष्ठ ४००.
इफिसकर २:१४: “तो [येशू] आपली मूर्तिमंत शांति आहे, त्याने दोघांस एक केले आणि मधली आडभिंत पाडली.” मिशना म्हणते: “मंदिर पर्वताच्या आतमध्ये दहा वित उंच जाळीदार काम करण्यात आलेली आडभिंत, (द सोरज) होती.” (मिडॉट २:३) तेथून पलीकडे आणि आतील अंगणात प्रवेश करण्यास परराष्ट्रीयांना मनाई होती. प्रेषित पौलाने सा. यु. ६० किंवा ६१ मध्ये इफिसकरांना लिहिले तेव्हा त्याने त्यावेळी उभ्या असलेल्या त्या भिंतीचा उल्लेख सांकेतिकरीत्या केला असावा. ही लाक्षणिक भिंत नियमशास्त्राचा करार होती ज्या भिंतीमुळे दीर्घकाळापासून यहुदी आणि परराष्ट्रीय परस्परांपासून विलग होते. तथापि, सा. यु. ३३ मध्ये झालेल्या ख्रिस्ताच्या मृत्यूच्या आधारावर ती भिंत नाहीशी झाली.