अनेसिफर धाडसी सांत्वनकर्ता
“बंधनात पडलेल्यांबरोबर तुम्ही बंधनात आहा असे समजून त्यांची आठवण करा; . . . पीडितांची आठवण ठेवा.” (इब्री लोकांस १३:३) प्रेषित पौलाने सा.यु. ६१ च्या सुमारास हे लिहिण्याआधी अनेक वेळा कारावास भोगला होता आणि आता तो हुतात्मिक मरणासाठी तुरुंगात होता. (प्रेषितांची कृत्ये १६:२३, २४; २२:२४; २३:३५; २४:२७; २ करिंथकर ६:५; २ तीमथ्य २:९; फिलेमोन १) मंडळ्यांनी, विश्वासाच्या परीक्षांना तोंड देणाऱ्या सहविश्वासूंची काळजी घेण्याची जशी तेव्हा गरज होती तशी आजही आहे.
पहिल्या शतकात, ती गरज जाणणारा एक शिष्य होता, अनेसिफर. पौल रोममध्ये दुसऱ्यांदा तुरुंगात होता तेव्हा त्याने त्याची भेट घेतली. त्याच्याविषयी प्रेषिताने लिहिले: “अनेसिफराच्या घरावर प्रभु दया करो, कारण त्याने वारंवार माझे समाधान केले आणि त्याला माझ्या बेडीची लाज वाटली नाही; तर तो रोम शहरात असताना त्याने श्रम घेऊन मी सापडेपर्यंत माझा शोध केला.” (२ तीमथ्य १:१६, १७) या काही शब्दांचा काय अर्थ होतो त्याचा विचार करण्याची तुम्ही कधी तसदी घेतलीत का? कदाचित यामुळे अनेसिफरबद्दलचा तुमचा आदर अधिक वाढेल. तो एक धाडसी सांत्वनकर्ता होता हे तुम्हाला दिसून येईल.
पौलाचा दुसरा कारावास
पहिल्या कारावासातून सुटका मिळाल्यानंतर, पौलाला पुन्हा एकदा एका रोमी तुरुंगात डांबण्यात आले पण ह्यावेळी परिस्थिती जरा वेगळी होती. आधी, मित्रजन त्याच्या भाड्याच्या घरात येऊन त्याला भेटू शकत होते व आपली लवकरच सुटका होईल असाही त्याला आत्मविश्वास होता. पण आता पुष्कळ जण त्याला सोडून गेले, त्याच्या डोक्यावर हुतात्मिक मृत्यूची टांगती तलवार लटकत होती.—प्रेषितांची कृत्ये २८:३०; २ तीमथ्य ४:६-८, १६; फिलेमोन २२.
पौल सा.यु. ६५ च्या सुमारास दुसऱ्यांदा तुरुंगात होता. जवळजवळ एक वर्षापूर्वी म्हणजे सा.यु. ६४ च्या जुलैमध्ये, रोमला आग लागली, शहराच्या १४ प्रांतांपैकी १० प्रांतांचे बरेच नुकसान झाले. रोमी इतिहासकार टॅसिटसनुसार, सम्राट निरोचा, “ही आग आपल्याच हुकूमानुसार लावण्यात आल्याच्या दुष्ट बेतावर विश्वासच बसेना. परिणामतः, स्वतःवरचा हा कलंक दूर करण्याकरता निरोने तो दोष, जनता ज्यांना ख्रिश्चन म्हणत होती व ज्यांच्या निंदास्पद कार्यांकरता त्यांचा द्वेष करीत होती त्यांच्यावर ढकलला आणि त्यांच्यावर सर्वात कडक कारवाई केली. . . . मृत्यूदंडही अगदी तिरस्करणीयरीत्या त्यांच्यावर बजावण्यात आला. काहींवर श्वापदांची कातडी चढवली गेली, कुत्र्यांनी त्यांच्या चिंध्या चिंध्या केल्या, काहींना क्रूसावर खिळण्यात आले, दिवस ढळल्यानंतर काहींच्या मशाली बनवून त्यांना जाळण्यात आले.”
अशा परिस्थितीत किंवा अशा सारख्याच शक्यतांमध्ये पौल पुन्हा तुरुंगात होता. म्हणूनच तर, त्याचा मित्र अनेसिफर याच्या भेटींसाठी तो किती कृतज्ञ होता! पण याच परिस्थितीकडे आपण अनेसिफरच्या दृष्टीतून पाहू या.
कैदी असलेल्या पौलाला भेटणे
हे स्पष्ट आहे की, अनेसिफरचे कुटुंब इफिसात राहत होते. (२ तीमथ्य १:१८; ४:१९) अनेसिफर रोम साम्राज्याच्या राजधानीत स्वतःच्या कामासाठी आला होता की खास पौलाला भेटण्याकरता आला होता हे काही सांगण्यात आलेले नाही. असो, प्रेषिताने मात्र त्याच्याबद्दल म्हटले, ‘अनेसिफर रोम शहरात असताना त्याने वारंवार माझे समाधान केले.’ (२ तीमथ्य १:१६, १७) कोणत्या प्रकारचे समाधान? अनेसिफरने त्याला भौतिकरीत्या मदत केली असली तरीसुद्धा, त्याची उपस्थिती पौलाला बळकटी व उत्तेजन देणारे टॉनिक ठरले. खरे तर, काही भाषांतरे असे म्हणतात: “त्याच्या भेटींनी मला टवटवीत केले,” किंवा “तो मला वारंवार उत्तेजन देत असे.”
रोममध्ये त्या काळात कैदेत असलेल्या एखाद्या ख्रिश्चनाला भेट देणे म्हणजे आव्हानच होते. पौल पहिल्यांदा तुरुंगात गेला, तेव्हा रोमी ख्रिश्चनांना त्याचा ठावठिकाणा माहीत होता पण आता तसे नव्हते. रोमसारख्या मोठ्या शहरात, वेगवेगळ्या अपराधांमुळे तुरुंगात असलेल्या असंख्य लोकांमध्ये एका गूढ कैद्याला शोधणे इतके सोपे नव्हते. त्यासाठी कसून शोध करण्याची गरज होती. विद्वान जोवॉनी रोस्तॅग्नो याबाबत असे वर्णन करतात: “तेव्हा भिन्नभिन्न समस्या उठल्या असाव्यात. विशेषतः, शोध करण्याकरता कमालीची सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता होती. इकडून तिकडून माहिती मिळवून, विविध गुन्ह्यात सामील असलेल्या एका धर्मवेड्या वृद्ध कैद्याचा ठावठिकाणा जाणण्याकरता उत्सुकता दाखवल्यामुळे लोकांचे विनाकारण लक्ष वेधले जाण्याची शक्यता होती.”
पी. एन. हॅरिसन नामक एक लेखक, याच परिस्थितीचे एक चित्र रेखाटून म्हणतात: “आपल्याला लोकांच्या घोळक्यात एका करारी मनुष्याचा चेहरा दिसतो आणि आपण लागलीच एजीएनच्या दूर किनाऱ्यांवरून येणाऱ्या या अनोळख्याचा पाठलाग करू लागतो; हा मनुष्य अनोळखी रस्त्यांवरून हिंडत हिंडत, अनेक दारांवर ठकठक करीत, हाती लागेल त्या सुगाव्याचा पाठलाग करीत, होणाऱ्या धोक्यांचा इशारा मिळालेला असतानाही शोध जारी ठेवतो. आणि सरतेशेवटी एका दूरवरच्या कारागृहात एक ओळखीचा आवाज त्याला नमस्कार करतो; तो पाहतो तर एका रोमी शिपायाने पौलाला साखळदंड घातलेले त्याला दिसते.” रोममधील इतर कारागृहांप्रमाणेच हेही कारागृह असावे म्हणजे ते, कदाचित थंड, काळाकुट्ट अंधार असलेले व घाणेरडे असावे जेथे साखळ्या होत्या आणि सर्व प्रकारच्या पीडा फोफावल्या होत्या.
पौलासारख्या कैद्याचा मित्र म्हणून स्वतःची ओळख देणे घातक होते. शिवाय, त्याला वारंवार भेटी देणे तर अधिकच घातक होते. स्वतःची उघडपणे ख्रिश्चन म्हणून ओळख करून देणे म्हणजे अटक आणि त्यानंतर यातनामय मृत्यूला आपणहून आमंत्रण देण्यासारखे होते. पण अनेसिफर केवळ एक किंवा दोन भेटींनीच संतुष्ट नव्हता. “वारंवार” भेट देण्यासही त्याला लाज वाटत नव्हती किंवा भीती वाटत नव्हती. अनेसिफर खरोखरच आपल्या नावाप्रमाणेच जगला; त्याच्या नावाचा अर्थ, “लाभ पुरवणारा” असा होतो. धोका असतानाही त्याने धाडसी व प्रेमळ साहाय्य पुरवले.
अनेसिफरने हे सर्व का केले? ब्रायन रापस्के म्हणतात: “तुरुंग केवळ शारीरिक यातनांचेच ठिकाण नव्हते तर, कैद्यावर चिंतेचे दडपण आणणारे ठिकाण होते. अशा प्रसंगी, साहाय्यता पुरवणाऱ्यांची उपस्थिती आणि शाब्दिक उत्तेजन कैद्याला भावनिकरीत्या प्रेरणा देणारे ठरू शकत होते.” असे वाटते, की अनेसिफरने हे जाणले व अगदी धैर्याने तो आपल्या मित्राशी जडून राहिला. पौलाला ह्या मदतीबद्दल केवढे कृतज्ञ वाटले असावे!
अनेसिफरचे काय झाले?
पौलाने तीमथ्याला लिहिलेल्या दुसऱ्या पत्रात अनेसिफरच्या घराण्याला नमस्कार पाठवून त्याच्याविषयी म्हटले: “प्रभु करो आणि त्या दिवशी त्याला प्रभूपासून दया मिळो.” (२ तीमथ्य १:१८; ४:१९) अनेकांना वाटते की “त्या दिवशी” हे शब्द देवाच्या न्यायाच्या दिवसाला सूचित करत असल्यामुळे, अनेसिफरचे निधन झाले होते असा समारोप करतात. असे असते तर, कदाचित “अनेसिफर त्याच्या शेवटल्या भेटीच्या वेळी पकडला गेला असावा व . . . त्याने आपले जीवन गमावले असावे,” असे पी. एन. हॅरिसनचे म्हणणे आहे. पण कदाचित अनेसिफर त्यावेळी दूर कोठेतरी गेलेला असेल किंवा पौलाने त्याच्या नावाचा थेट उल्लेख न करता त्याच्या अख्ख्या घराण्याला नमस्कार पाठवला असावा.
काहींना वाटते, की “प्रभु करो आणि त्या दिवशी त्याला प्रभूपासून दया मिळो” या वाक्यात एक खास अर्थ आहे. त्यांना वाटते, की हे शब्द, दिवंगत जिवंत जीवांसाठी आणि कदाचित कोणत्या ना कोणत्या तरी आत्मिक क्षेत्रातील पीडितांसाठी केलेल्या प्रार्थनांचे समर्थन करतात. परंतु, ही कल्पना मृतांना कशाचीही जाणीव नसते या शास्त्रवचनीय शिक्षणाबरोबर खटकते. (उपदेशक ९:५, १०) अनेसिफरचे निधन झाले असले तरीसुद्धा पौल, आपल्या मित्राला देवाकडून कृपा प्राप्त व्हावी अशी इच्छा व्यक्त करीत होता. आर. एफ. हॉर्टन म्हणतात: “अशा प्रकारची इच्छा तर आपण सर्वांकरता बाळगली पाहिजे. पण मृतांसाठी प्रार्थना करणे, त्यांच्याकरता मास करणे ही कल्पना [प्रेषिताच्या] मनात चुकूनही येऊ शकत नव्हती.”
आपण एकनिष्ठ सांत्वनकर्ते होऊ या
पौलाला साहाय्य करता करता अनेसिफरने आपला जीव गमावला की नाही हे माहीत नाही, पण त्याने मात्र प्रेषिताला शोधून काढण्यासाठी व तुरुंगात जाऊन भेट घेण्यासाठी नक्कीच आपला जीव धोक्यात घातला. शिवाय, यात काहीच शंका नाही की पौलाने अनेसिफरकडून त्याला लागणारा आधार व उत्तेजन प्राप्त केल्यामुळे त्याचे खूप आभार मानले.
सहख्रिस्ती परीक्षा, छळ किंवा तुरुंगवास अनुभवतात तेव्हा आपण त्यांना सांत्वन व उत्तेजन देऊ शकतो. अशांसाठी आपण प्रार्थना करू या व होईल तितकी मदत प्रेमळपणे त्यांना देऊ या. (योहान १३:३५; १ थेस्सलनीकाकर ५:२५) अनेसिफरप्रमाणे आपणही धाडसी सांत्वनकर्ते होऊ या.
[३१ पानांवरील चित्र]
अनेसिफरने कैदेत असलेल्या प्रेषित पौलाचे धाडसाने सांत्वन केले