वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ११/१५ पृ. १९-२४
  • विश्‍वास आपल्याला सहनशील आणि प्रार्थनाशील बनवतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • विश्‍वास आपल्याला सहनशील आणि प्रार्थनाशील बनवतो
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • हानीकारक चुकीच्या इच्छा
  • एकमेकांना दोषी ठरवू नका
  • आत्मविश्‍वासाची फुशारकी टाळा
  • धनवानांविरुद्ध इशारा
  • विश्‍वास आपल्याला धीर धरण्यास साहाय्य करतो
  • विश्‍वास आणि आपल्या प्रार्थना
  • आपल्या सर्वांकरता असलेले
  • येशूच्या लहान भावाकडून शिका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • परीक्षांतही तुमच्या विश्‍वासाला जडून राहा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • विश्‍वास कृती करण्यास आपल्याला प्रवृत्त करतो!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • यहोवाच्या सहनशीलतेचे अनुकरण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ११/१५ पृ. १९-२४

विश्‍वास आपल्याला सहनशील आणि प्रार्थनाशील बनवतो

“धीर धरा, आपली अंतःकरणे स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ आली आहे.”—याकोब ५:८.

१. याकोब ५:७, ८ वर मनन करण्याची का गरज आहे?

येशू ख्रिस्ताची दीर्घकाळापासून प्रतिक्षा करण्यात आलेली ‘उपस्थिती’ आता एक वास्तविकता आहे. (मत्तय २४:३-१४) देव आणि ख्रिस्त यांच्यावर विश्‍वास असल्याचा दावा करणाऱ्‍या सर्वांना पूर्वीपेक्षा अधिक आता शिष्य याकोबाच्या पुढील शब्दांवर विचार करण्याचे कारण आहे, “बंधूंनो, प्रभूच्या आगमनापर्यंत [उपस्थितीपर्यंत] धीर धरा. पाहा, शेतकरी भूमीच्या मोलवान पिकाची वाट पाहत असता, त्यास पहिला व शेवटला पाऊस मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरतो. तुम्हीहि धीर धरा, आपली अंतःकरणे स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनाची [उपस्थितीची] वेळ आली आहे.”—याकोब ५:७, ८.

२. याकोबाने ज्यांना लिहिले ते कोणत्या काही समस्यांना तोंड देत होते?

२ याकोबाने ज्यांना हे प्रेरित पत्र लिहिले त्यांना धीर धरण्याची व विविध समस्या सोडवण्याची आवश्‍यकता होती. देवावर विश्‍वास असल्याचा दावा करणाऱ्‍यांना जसे शोभते त्याच्या अगदी उलट काही जण वागत होते. जसे की, काहींच्या अंतःकरणात निर्माण झालेल्या विशिष्ट इच्छांविषयी काही पावले उचलण्याची आवश्‍यकता होती. त्या प्रारंभिक ख्रिश्‍चनांमध्ये शांती पूर्ववत करण्याची आवश्‍यकता होती. धीर धरण्यासंबंधी आणि प्रार्थनाशील होण्यासंबंधी त्यांना सल्ला देण्याची गरज होती. याकोबाने त्यांना जे सांगितले त्याचा विचार करताना, आपल्या जीवनात त्यांचा अवलंब आपण कसा करू शकतो ते पाहू या.

हानीकारक चुकीच्या इच्छा

३. मंडळीतील भांडणतंट्यांची कारणे काय होती व यांतून आपण काय शिकू शकतो?

३ काही तथाकथित ख्रिश्‍चनांमध्ये अशांती माजली होती आणि चुकीच्या इच्छा यांचे मूळ होते. (याकोब ४:१-३) भांडणांमुळे फाटाफूट होत होती शिवाय काही जण अगदी कठोरतेने आपल्याच बांधवांचा न्याय करीत होते. त्यांच्या अवयवांत वासना लढाई करत असल्यामुळे हे सर्व होत होते. प्रतिष्ठा, सत्ता आणि संपत्ती यांबद्दलच्या शारीरिक वासनांचा प्रतिकार करण्याकरता आपल्याला साहाय्य मिळावे म्हणून आपल्याला प्रार्थना करण्याची गरज भासेल जेणेकरून आपल्या हातून असे कोणतेही कार्य घडणार नाही ज्यामुळे मंडळीतील शांतीचा भंग होईल. (रोमकर ७:२१-२५; १ पेत्र २:११) पहिल्या शतकातील काही ख्रिश्‍चनांमध्ये लोभिष्टपणा इतका वाढला होता की ते द्वेषपूर्ण, खुनी मनोवृत्तीचे बनले होते. देव त्यांच्या गलत इच्छा पूर्ण करणार नसल्यामुळे त्यांनी आपले ध्येय साधण्याकरता बरेच खटाटोप केले. आपणही चुकीची इच्छा बाळगून त्यांची विचारणा केली तर ती पूर्ण केली जाणार नाही कारण आपला पवित्र देव अशा प्रार्थनांना उत्तर देत नाही.—विलापगीत ३:४४; ३ योहान ९, १०.

४. याकोब काहींना ‘व्यभिचारी’ का म्हणतो व त्याच्या विधानाचा आपल्यावर कसा परिणाम झाला पाहिजे?

४ काही प्रारंभिक ख्रिश्‍चनांमध्ये जगीकपणा, मत्सर आणि गर्व होता. (याकोब ४:४-६) याकोब काहींना ‘व्यभिचारी’ म्हणतो कारण जगाबरोबर मैत्री करून ते आध्यात्मिक व्यभिचाराचे दोषी बनले होते. (यहेज्केल १६:१५-१९, २५-४५) आपल्याला आपली मनोवृत्ती, आपले बोलणे किंवा आपली कृती जगीक बनवायची नाही कारण अशाने आपण देवाचे वैरी ठरू. त्याचे वचन आपल्याला दाखवून देते, की “ईर्ष्या,” पापी मानवात असलेल्या वाईट प्रवृत्तीचा किंवा ‘आत्म्याचा’ एक भाग आहे. (उत्पत्ति ८:२१; गणना १६:१-३; स्तोत्र १०६:१६, १७; उपदेशक ४:४) यास्तव आपल्याला ईर्ष्या, गर्व किंवा इतर वाईट प्रवृत्तींविरुद्ध लढत देण्याची गरज आहे असे आपल्याला जाणवल्यास पवित्र आत्म्याद्वारे आपण देवाची मदत घेऊ या. देवाच्या अपात्री कृपेद्वारे पुरवली जाणारी ती शक्‍ती ‘ईर्षेपेक्षा’ महान आहे. आणि यहोवा गर्विष्ठ लोकांचा विरोध करत असल्यामुळे, आपण जर पापी प्रवृत्तींविरुद्ध झगडलो तर तो आपल्याला अपात्री कृपा देईल.

५. देवाची अपात्री कृपा उपभोगण्याकरता आपण कोणत्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत?

५ आपण देवाची अपात्री कृपा कशी मिळवू शकतो? (याकोब ४:७-१०) यहोवाकडून अपात्री कृपा मिळवण्याकरता आपण त्याला आज्ञांकित राहण्याची, त्याच्या तरतूदींचा स्वीकार करण्याची आणि आपल्याबाबतीत तो जे काही इच्छितो ते मान्य करण्याची गरज आहे. (रोमकर ८:२८) शिवाय आपण दियाबलाचा ‘विरोध’ केला पाहिजे किंवा त्याच्या ‘विरुद्ध’ उभे राहिले पाहिजे. आपण यहोवाच्या सार्वत्रिक सार्वभौमत्वाचे समर्थक म्हणून दृढ राहिल्यास तो आपल्यापासून “पळून जाईल.” जगाच्या दुष्ट क्लृप्त्यांचा विरोध करणाऱ्‍या येशूचे साहाय्य आपल्याला आहे जेणेकरून कोणतीही गोष्ट आपल्याला कायमची इजा पोहंचवू शकत नाही. तसेच, हेही विसरू नका: प्रार्थना, आज्ञाधारकपणा आणि विश्‍वास यांद्वारे आपण देवासमीप जाऊ शकतो आणि तो आपल्या जवळ असतो.—२ इतिहास १५:२.

६. याकोब काही ख्रिश्‍चनांना “पापी जनहो” असे का संबोधतो?

६ देवावर विश्‍वास असल्याचा दावा करणाऱ्‍या काहींना याकोब “पापी जनहो” असे का संबोधतो? कारण, त्यांच्यावर ‘लढायांमध्ये’ भाग घेतल्याचा, ख्रिश्‍चनांना शोभत नाही अशी खुनी द्वेषी मनोवृत्ती बाळगल्याचा आरोप होता. (तीत ३:३) वाईट कृत्यांनी माखलेले त्यांचे “हात” निर्मळ करण्याची आवश्‍यकता होती. प्रेरणेचे केंद्र असलेली “अंतःकरणे” देखील त्यांना शुद्ध करावयाची होती. (मत्तय १५:१८, १९) ते ‘द्विबुद्धीचे’ लोक देवासोबत मैत्री ठेवावी की जगासोबत मैत्री ठेवावी याबाबतीत धरसोड करीत होते. त्यांचे हे वाईट उदाहरण इशारा समजून आपण नेहमी जागरूक राहू या, जेणेकरून अशा वाईट गोष्टींमुळे आपल्या विश्‍वासाचा भंग होणार नाही.—रोमकर ७:१८-२०.

७. याकोब काहींना “शोक करा, रडा” असे का सांगतो?

७ याकोब आपल्या वाचकांना “कष्टी व्हा, शोक करा, रडा” असे सांगतो. त्यांनी जर ईश्‍वरी शोक व्यक्‍त केला तर याचा अर्थ त्यांनी पश्‍चात्ताप केला. (२ करिंथकर ७:१०, ११) आज, विश्‍वास असल्याचा दावा करणारे जगाबरोबर मैत्री ठेवतात. अशाप्रकारचे मार्गाक्रमण आपल्यापैकी कोणी करत असल्यास त्यांनी आपल्या दुर्बळ आध्यात्मिक स्थितीवर शोक करून परिस्थिती सुधारण्यासाठी त्वरित पावले उचलू नयेत का? आवश्‍यक सुधारणा केल्याने व देवाची क्षमा प्राप्त केल्याने शुद्ध विवेकामुळे आणि सार्वकालिक जीवनाच्या आनंदमय आशेमुळे आनंदाची भावना निर्माण होईल.—स्तोत्र ५१:१०-१७; १ योहान २:१५-१७.

एकमेकांना दोषी ठरवू नका

८, ९. आपण एकमेकांविरुद्ध का बोलू नये किंवा एकमेकांना दोषी ठरवू नये?

८ एखाद्या सहविश्‍वासूच्या विरुद्ध बोलणे पाप आहे. (याकोब ४:११, १२) हे माहीत असूनही काहीजण, अहंकारामुळे किंवा इतरांना कमी लेखून स्वतःला मोठेपणा मिळावा म्हणून सहख्रिश्‍चनांची टीका करतात. (स्तोत्र ५०:२०; नीतिसूत्रे ३:२९) ‘विरुद्ध बोलणे’ असे भाषांतरीत केलेला ग्रीक शब्द वैरभाव दर्शवतो व अतिशयोक्‍ती करण्याला किंवा खोटा दोषारोप लावण्याला सूचित करतो. हे, एखाद्या बांधवाचा प्रतिकूल न्याय करण्याच्या बरोबरीचेच आहे. ‘विरुद्ध बोलणे व देवाच्या नियमाला दोषी ठरवणे,’ हे कसे काय? शास्त्री व परूशांनी अगदी ‘चलाखीने देवाची आज्ञा मोडली,’ व स्वतःच्या दर्जानुसार न्याय केला. (मार्क ७:१-१३) त्याचप्रकारे, यहोवा ज्या बांधवाला दोष देणार नाही त्याला जर आपण दोष दिला तर, ‘देवाच्या नियमाला दोषी’ ठरवून देवाचा नियमच अयोग्य आहे असे सूचवण्याचे पाप आपण करत असतो, नाही का? तसेच, अन्यायीपणे आपल्या बांधवाची टीका करून आपण प्रीतीच्या नियमाचे पालन करणार नाही.—रोमकर १३:८-१०.

९ आपण हे मनात ठेवावे की: “नियमकर्ता व न्यायाधीश असा एकच आहे”—व तो आहे यहोवा. त्याच्या नियमशास्त्रात काहीही खोट नसून ते परिपूर्ण आहेत. (स्तोत्र १९:७; यशया ३३:२२) दर्जे ठरवण्याचा व तारणाकरता नियम बनवण्याचा अधिकार केवळ देवालाच आहे. (लूक १२:५) म्हणूनच याकोब विचारतो: “आपल्या शेजाऱ्‍यास दोषी ठरविणारा तू कोण?” इतरांचा न्याय करून त्यांना दोषी ठरवण्याचा आपल्याला हक्क नाही. (मत्तय ७:१-५; रोमकर १४:४, १०) देवाचे सार्वभौमत्त्व आणि निःपक्षपातीपणा तसेच आपले पापीपण यांवर विचार केल्यामुळे अहंकाराने इतरांचा न्याय करण्यापासून परावृत्त होण्यास आपल्याला मदत होईल.

आत्मविश्‍वासाची फुशारकी टाळा

१०. जीवनातील प्रत्येक प्रसंगी आपण यहोवाला विचारात का घेतले पाहिजे?

१० आपण नेहमी यहोवा आणि त्याच्या नियमांना विचारात घेतले पाहिजे. (याकोब ४:१३-१७) देवाकडे दुर्लक्ष करून आत्मविश्‍वासी म्हणतात: “आपण आज उद्या अमुक एका शहरी जाऊ, तेथे एक वर्ष घालवू आणि व्यापारात कमाई करू.” आपण जर “स्वतःसाठी द्रव्यसंचय करितो व देवविषयक बाबतीत धनवान” नसलो तर, आपले जीवन उद्या समाप्त झाल्यावर आपल्याला यहोवाची सेवा करण्याची संधी मिळू शकणार नाही. (लूक १२:१६-२१) याकोब म्हणतो त्याप्रमाणे आपण त्या पहाटेच्या ‘धुक्यासारखे आहोत जे थोडा वेळ दिसते आणि मग दिसेनासे होते.’ (१ इतिहास २९:१५) केवळ यहोवावर विश्‍वास ठेवल्यानेच चिरकालिक आनंद व सार्वकालिक जीवनाची आशा आपल्याला मिळू शकते.

११. “प्रभूची इच्छा असेल तर” म्हणजे काय?

११ घमेंडीने देवाकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा, “प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व अमुक अमुक करू” असा आपला पवित्रा असला पाहिजे. “प्रभूची इच्छा असेल तर” असे म्हणण्याद्वारे आपण दाखवत असतो की आपण त्याच्या इच्छेच्या सुसंगतेत कार्य करण्याचा प्रयत्न करीत असतो. कुटुंबाच्या भरणपोषणाकरता आपल्याला व्यापार करावा लागेल, राज्य कार्याकरता प्रवास करावा लागेल, इत्यादी. पण आपण शेखी मिरवू नये. “सर्व प्रकारची फुशारकी वाईट आहे,” कारण देवावर अवलंबून राहण्याकडे ती दुर्लक्ष करते.—स्तोत्र ३७:५; नीतिसूत्रे २१:४; यिर्मया ९:२३, २४.

१२. याकोब ४:१७ मधील शब्दांचा काय अर्थ होतो?

१२ आत्मविश्‍वास आणि फुशारकी यांविषयी बोलल्यानंतर याकोब म्हणतो: “चांगले करणे कळत असून जो ते करीत नाही त्याचे ते पाप आहे.” प्रत्येक ख्रिश्‍चनाने हे नम्रपणे कबूल केले पाहिजे की त्याला देवावर अवलंबून राहावे लागते. तो असे करीत नसल्यास “ते पाप आहे.” अर्थातच, देवावर आपला विश्‍वास असल्यावर आपल्याकडून जे काही अपेक्षिले जाते ते न केल्यास येथेही हेच तत्त्व लागू होते.—लूक १२:४७, ४८.

धनवानांविरुद्ध इशारा

१३. आपल्या धनसंपत्तीचा दुरुपयोग करणाऱ्‍यांबद्दल याकोब काय म्हणतो?

१३ काही प्रारंभिक ख्रिस्ती लोक भौतिकवादी झाले होते किंवा धनवान लोकांचा उदोउदो करत असल्यामुळे, विशिष्ट धनवान लोकांबद्दल याकोब जरा कडक शब्द वापरतो. (याकोब ५:१-६) आपल्या संपत्तीचा दुरुपयोग करणाऱ्‍यांची देव त्यांच्या कर्मांनुसार परतफेड करील तेव्हा ‘त्यांच्यावर आलेल्या क्लेशांविषयी ते रडून आकांत करतील.’ त्या दिवसांत, कपडालत्ता, धान्यधुन्य आणि द्राक्षारस हीच अनेक लोकांची संपत्ती होती. (योएल २:१९; मत्तय ११:८) यांतील काही नासले जाऊ शकते किंवा त्यांना “कसर” लागू शकते, पण याकोब येथे संपत्तीच्या नाशाविषयी नव्हे तर तिच्या निरुपयोगीपणावर जोर देत आहे. सोन्याचांदीवर जंग चढत नसला तरी, त्यांची केवळ साठवणूक केल्याने, जंग लागलेल्या गोष्टींप्रमाणे तेही निरुपयोगी ठरतील. “जंग,” भौतिक संपत्तीचा सदुपयोग करण्यात आला नाही हे सूचित करते. यास्तव, आपण सर्वांनी हे लक्षात ठेवले पाहिजे, की आपल्या भौतिक धनावर विश्‍वास करणाऱ्‍यांनी, “अग्नीप्रमाणे” असे काही या शेवटल्या काळात आपल्याजवळ साठवले आहे, जेव्हा परमेश्‍वराचा कोप येईल. आपण ‘अंतसमयात’ जगत असल्यामुळे, हे शब्द आपल्यासाठी खास अर्थ राखून आहेत.—दानीएल १२:४; रोमकर २:५.

१४. धनवान बहुतेक वेळा कसे वागतात आणि त्याबद्दल आपण काय करावे?

१४ धनवान बहुतेक वेळा कापणी करणाऱ्‍यांना फसवतात; त्यांची अडवून ठेवलेली मजूरी भरपाईसाठी “ओरडत आहे.” (पडताळा उत्पत्ति ४:९, १०.) जगीक धनवान “चैनबाजी” करत आहेत. विलासात पूर्णपणे गढून गेल्यामुळे त्यांच्या हृदयावर चरबी चढली आहे, त्यांचे अंतःकरण दुर्लक्ष करणारे बनले आहे व वधाच्या ‘दिवसापर्यंत’ ते असेच राहतील. ते ‘नीतिमानाला दोषी ठरवून त्याचा घात करतात.’ याकोब विचारतो: ‘तो तुम्हांस विरोध करीत नाही का?’ पण दुसरे एक भाषांतर असे आहे, “नीतिमान मनुष्य तुम्हाला अडवत नाही.” काहीही असो, आपण मात्र धनवानांबद्दल पक्षपात बाळगणार नाही. आध्यात्मिक आस्थेला आपण जीवनात प्रथम स्थान द्यावे.—मत्तय ६:२५-३३.

विश्‍वास आपल्याला धीर धरण्यास साहाय्य करतो

१५, १६. धीर धरणे इतके महत्त्वपूर्ण का आहे?

१५ जगातील जुलमी धनिकांबद्दल बोलल्यानंतर याकोब जुलूमाला बळी पडलेल्या ख्रिश्‍चनांना धीर विकसित करण्याचे उत्तेजन देतो. (याकोब ५:७, ८) विश्‍वास असलेल्यांनी त्यांच्यावर आलेली संकटे धीर धरून सहन केली तर जुलूम करणाऱ्‍यांवर न्यायदंड बजावला जाईल तेव्हा त्यांना ख्रिस्ताच्या उपस्थितीच्या वेळी विश्‍वासूपणाबद्दल प्रतिफळ मिळेल. (मत्तय २४:३७-४१) त्या प्रारंभिक ख्रिश्‍चनांना त्या शेतकऱ्‍यासारखा धीर धरावयाचा होता जो पेरणी करण्याआधी शरद ऋतूच्या सुरवातीच्या पहिल्या पावसाची आणि मग वसंत ऋतूच्या शेवटल्या पावसाची जेव्हा त्याचे पीक तयार होईल त्याची वाट पाहत असतो. (योएल २:२३) आपणही धीर विकसित करून आपले अंतःकरण मजबूत करण्याची गरज आहे कारण, येशू ख्रिस्त “प्रभूच्या आगमनाची [उपस्थितीची] वेळ आली आहे!”

१६ पण आपण धीर का धरला पाहिजे? (याकोब ५:९-१२) सहविश्‍वासू आपल्याला संताप आणवतात तेव्हा व्याकूळ किंवा दुःखी न होण्यास धीर आपले साहाय्य करतो. घातक भावनेने आपण “एकमेकांविषयी कुरकूर” केली तर न्यायाधीश येशू ख्रिस्त आपला धिक्कार करील. (योहान ५:२२) त्याची ‘उपस्थिती’ झालेली असल्यामुळे व तो “दाराजवळ उभा” असल्यामुळे, विश्‍वासाच्या अनेक परिक्षांना तोंड देणाऱ्‍या आपल्या बांधवांविषयी धीर धरण्याद्वारे आपण शांती समृद्ध करू या. ईयोबाने धीराने आपल्या परिक्षांना तोंड दिल्यामुळे देवाने त्याला प्रतिफळ दिले हे आठवल्यामुळे आपला स्वतःचाही विश्‍वास मजबूत होतो. (ईयोब ४२:१०-१७) आपण जर विश्‍वास आणि धीर विकसित केला तर “प्रभु फार कनवाळू व दयाळू आहे” हे आपल्याला दिसून येईल.—मीखा ७:१८, १९.

१७. “शपथ वाहू नका” असे याकोब का म्हणतो?

१७ आपण अधीर झालो तर कदाचित दबावाखाली असताना आपल्या जिभेचा गैरवापर करू शकतो. जसे की, आपण अविचारीपणे शपथा घेऊ लागू. पोरकटपणे शपथ घेण्याविरुद्ध ताकीद देत याकोब म्हणतो: “शपथ वाहू नका.” प्रत्येक वाक्यावर शपथ घेणेसुद्धा ढोंगीपणा वाटतो. यास्तव, आपण सरळ सरळ सत्य बोलावे, आपले होय म्हणजे होय व नाही म्हणजे नाही असले पाहिजे. (मत्तय ५:३३-३७) अर्थातच, न्यायालयात सत्य बोलण्याकरता शपथ घेणे चुकीचे आहे असे याकोब म्हणत नाही.

विश्‍वास आणि आपल्या प्रार्थना

१८. कोणकोणत्या परिस्थितीत आपण ‘प्रार्थना’ व ‘स्तोत्रे गात’ राहिले पाहिजे?

१८ आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याकरता, धीर धरण्याकरता व देवावर सुदृढ विश्‍वास ठेवण्याकरता प्रार्थनेने आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिका पूर्ण केली पाहिजे. (याकोब ५:१३-२०) विशेषतः, परिक्षेत असताना आपण ‘प्रार्थना करीत राहण्याची’ गरज आहे. आपण आनंदी असतो तेव्हा ‘स्तोत्रे गाऊ या;’ येशूने आपल्या मृत्यूचा स्मारक विधी स्थापन केला तेव्हा त्याने व त्याच्या प्रेषितांनी हेच केले. (मार्क १४:२६) कधी कधी, देवाबद्दल आपल्या मनात कृतज्ञतेची भावना उचंबळून येते तेव्हा आपण मनातल्या मनात स्तोत्रे गाऊ लागतो. (१ करिंथकर १४:१५; इफिसकर ५:१९) शिवाय, ख्रिस्ती सभांमध्ये गाण्यातून यहोवाची स्तुती करणे किती आनंदविणारे आहे!

१९. आपण आध्यात्मिकरीत्या आजारी पडल्यावर काय केले पाहिजे व का?

१९ आपण आध्यात्मिकरीत्या आजारी पडलो म्हणजे, आपल्या चुकीच्या वर्तणुकीमुळे किंवा यहोवाच्या मेजावरील आहार नियमितरीत्या घेण्यास आपण उणे पडल्यास आपल्याला गाण्याची इच्छा होणार नाही. अशा अवस्थेत आपण नम्रपणे वडिलांना बोलावू जेणेकरून ते आपल्यासाठी ‘प्रार्थना करतील.’ (नीतिसूत्रे १५:२९) तसेच, ‘यहोवाच्या नावाने ते आपल्याला तेल लावतील.’ जखमेवर लावलेल्या आरामदायी तेलाप्रमाणे त्यांचे सांत्वनपर बोल आणि शास्त्रवचनीय सल्ला आपली खिन्‍नता, शंका आणि भय कमी होण्यास मदत करील. आपला स्वतःचा विश्‍वास असल्यास ‘विश्‍वासाची प्रार्थना आपल्याला बरे करील.’ आपली ही आध्यात्मिक दुर्दशा एखाद्या गंभीर पापामुळे झाली आहे असे वडिलांना आढळल्यास ते नम्रपणे आपले पाप आपल्याला दाखवून देतील आणि आपल्याला मदत करण्याचा प्रयत्न करतील. (स्तोत्र १४१:५) आणि आपण पश्‍चात्ताप केल्यास देव आपल्या प्रार्थना ऐकून आपल्याला क्षमा करील हा विश्‍वास आपण बाळगू शकतो.

२०. आपण आपली पातके कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना का केली पाहिजे?

२० “आपली पातके एकमेकांजवळ कबूल” केल्याने, भविष्यात पुन्हा पाप करण्याविरुद्ध तो प्रतिबंध ठरेल. त्यामुळे, “एकमेकांसाठी प्रार्थना” करण्यास आपल्याला प्रवृत्त करणारा गुण अर्थात परस्पर दया हा गुण आपल्यामध्ये उत्तेजित झाला पाहिजे. असे केल्याने आपला लाभ होईल असा आपण विश्‍वास बाळगू शकतो कारण, विश्‍वास बाळगणारा व देव ज्याला सात्विक लेखतो अशा ‘नीतिमान मनुष्याने’ केलेली प्रार्थना यहोवाकडून पुष्कळ काही साध्य करते. (१ पेत्र ३:१२) संदेष्टा एलीयातही आपल्याप्रमाणेच कमतरता होत्या, पण त्याच्या प्रार्थना प्रभावकारी होत्या. त्याने प्रार्थना केली आणि तब्बल साडेतीन वर्षे पाऊस पडला नाही. त्याने पुन्हा प्रार्थना केल्यावर पाऊस पडला.—१ राजे १७:१; १८:१, ४२-४५; लूक ४:२५.

२१. एखादा सहख्रिस्ती “सत्यापासून बहकला” असेल तर आपण काय करू शकतो?

२१ मंडळीतील एखादा सदस्य, “सत्यापासून बहकला” असेल, योग्य शिक्षण व वर्तन यांपासून परावृत्त झाला असेल तर काय? बायबलचा सल्ला, प्रार्थना आणि इतर साहाय्यता यांद्वारे आपण त्याला त्याच्या चुकीच्या मार्गापासून मागे आणू शकतो. यात आपल्याला यश मिळाले तर, ख्रिस्ताची खंडणी अजूनही त्याला लागू होऊ शकते व आध्यात्मिक मृत्यू आणि नाशापासून त्याला वाचवते. चूक करणाऱ्‍याला मदत करून आपण त्याच्या पुष्कळ ‘पापांची रास झाकून’ टाकत असतो. सुधारणूक केलेला हा मनुष्य आपल्या पापी मार्गापासून वळतो, पश्‍चात्ताप करतो व क्षमा मागतो, तेव्हा त्याच्या पापांची रास झाकण्यासाठी आपण प्रयत्न केले म्हणून आपल्याला आनंद होईल.—स्तोत्र ३२:१, २; यहूदा २२, २३.

आपल्या सर्वांकरता असलेले

२२, २३. याकोबाच्या शब्दांचा आपल्यावर कसा परिणाम झाला पाहिजे?

२२ स्पष्टपणे, याकोबाचे पत्र आपल्या सर्वांच्या लाभास्तव आहे. ते आपल्याला परीक्षांना कसे तोंड द्यावे ते दाखवते, पक्षपातीपणाविरुद्ध सल्ला देते आणि सात्विक कामात स्वतःला मग्न ठेवण्यास आर्जवते. याकोब आपल्याला आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवण्यास, जगीक प्रभावाचा प्रतिकार करण्यास व शांती वाढवण्यास उत्तेजन देतो. त्याच्या शब्दांमुळे आपण धीर धरणारे व प्रार्थना करणारे झाले पाहिजे.

२३ याकोबाचे पत्र हे सुरवातीला केवळ प्रारंभिक अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना पाठवलेले होते हे खरे आहे. तरीसुद्धा आपण सर्वजण, आपल्या विश्‍वासाशी जडून राहण्यास मदत व्हावी म्हणून त्यातील सल्ला लागू करू शकतो. याकोबाचे शब्द आपल्यामध्ये देवाच्या सेवेत निर्णायक कार्य करण्यास प्रवृत्त करणारा विश्‍वास वाढवू शकतात. तसेच, हे ईश्‍वर प्रेरित पत्र आपल्यामध्ये एक सहनशील विश्‍वास उत्पन्‍न करते जेणेकरून आपल्याला, ‘प्रभू येशू ख्रिस्ताच्या उपस्थिती’ दरम्यान म्हणजे आज, धीर धरणारे, यहोवाचे प्रार्थनाशील साक्षीदार बनवते.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

◻ काही प्रारंभिक ख्रिश्‍चनांना त्यांच्या मनोवृत्तीत व वर्तनात बदल करण्याची का गरज होती?

◻ याकोब धनिकांना कोणती ताकीद देतो?

◻ आपण धीर का विकसित केला पाहिजे?

◻ आपण नियमितरीत्या प्रार्थना का केली पाहिजे?

[१९ पानांवरील चित्राचे श्रेय]

Pictorial Archive (Near Eastern History) Est.

[२३ पानांवरील चित्र]

काही प्रारंभिक ख्रिश्‍चनांना सहविश्‍वासूंच्या बाबतीत अधिक सहनशील असण्याची गरज होती

[२४ पानांवरील चित्र]

ख्रिश्‍चनांनी धीर धरणारे, प्रेमळ, प्रार्थनाशील असावयास हवे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा