तर्तिय—पौलाचा विश्वासू सचिव
तर्तिय समोर एक आव्हान उभे होते. रोममधील सहख्रिश्चनांना सविस्तर पत्र लिहिताना, प्रेषित पौलाला सचिव या नात्याने त्याचा उपयोग करायचा होता. हे फारच कठीण काम असणार होते.
सा.यु. पहिल्या शतकात सचिव होणे फारच कठीण का होते? ते काम कसे केले जात होते? त्या काळात कोणती लेखन साहित्ये वापरली जात असत?
प्राचीन काळातील सचिव
प्राचीन ग्रेको-रोमन समाजात, वेगवेगळ्या प्रकारचे सचिव होते. काही लोक सरकारी सचिव अर्थात मंत्रालयात सामाजिक राजकीय गटांतील, सामाजिक अधिकारी या नात्याने काम करत होते. बाजारपेठेतील लोकांना उपयुक्त सेवा सादर करणारे सामाजिक सचिवही होते. बहुधा धनिकच, खासगी सचिवांना (बहुतांशी गुलामांना) ठेवत असत. इतरांसाठी आनंदाने पत्र लिहिणारे इच्छुक मित्रही होते. इ. रॅनडॉल्फ रिचर्ड्स या विद्वानांप्रमाणे, “भाषेसंबंधी आणि/किंवा लिखाणासंबंधी कमी कार्यक्षमता असलेल्यांपासून ते लवकरात लवकर अचूक, योग्य आणि आकर्षक पत्र लिहिण्याची प्रविणता असणाऱ्यापर्यंत” या बिनसरकारी सचिवांचे कौशल्य असे.
सचिवांचा उपयोग कोण करत होते? सर्वात प्रथम, ज्यांना लिहिता वाचता येत नव्हते असे लोक त्यांचा उपयोग करीत. पुष्कळसे प्राचीन करार व व्यापारी पत्रे, एका टिपेने पूर्ण केली जात, ज्यामध्ये आपल्यावर काम सोपवणारी व्यक्ती असमर्थ असल्यामुळे आपण तो दस्तऐवज लिहिला असल्याची सचिवाने साक्ष दिल्याचा अहवाल होता. इजिप्तच्या थिब्स येथून मिळालेल्या पत्रातून, सचिवांचा उपयोग करण्याचे दुसरे कारण समजून येते. आस्क्लीपीआडीस नामक कोणा व्यक्तीसाठी लिहिणाऱ्या सचिवाने समारोपात म्हटले: “तो हळू हळू लिहित असल्याने . . . अरमाचा पुत्र, इवमेलीसने त्याच्यासाठी लिहिले.”
तरीपण, सचिवाचा उपयोग करण्यात, त्याला लिहिता वाचता यावे, केवळ हीच निर्णायक गोष्ट होती असे वाटत नाही. बायबल व्याख्याकार, जॉन एल. मेकेंजी यांच्याप्रमाणे, “कदाचित सुवाच्यतेचाही विचार केला जात नव्हता, पण केवळ त्यांच्या सुरेख वाक्यरचना आणि शुद्धलेखनामुळे,” लोक सचिवांची मदत घेण्यासाठी प्रवृत्त होत. लांब व सविस्तर साहित्याचे लिखाण असायचे तेव्हा सुशिक्षितही कंटाळून जात होते. जे. ए. ऍश्लीमान हे विद्वान सांगतात की ज्यांना सचिव ठेवण्याची ऐपत होती, ते लोक दास, पेशेवाईक शास्त्री यांना लिहिण्याचे काम सुपूर्त करून आनंदाने लिखाणाचे काम टाळत असत.” शिवाय, वापरण्यात आलेले साहित्य व ज्या परिस्थितीत हे काम करण्यात आले, ते लक्षात घेतल्यास, लोकांना स्वतःचे पत्र लिहिण्यासाठीही का आवडत नव्हते हे कळून येईल.
सा.यु. पहिल्या शतकात सामान्यतः वापरलेल्या लिखाण साहित्यामध्ये, पपायरसचा उपयोग केला जात असे. या वनस्पतीच्या खोडातील गाभ्याच्या लांब बारीक पट्ट्या काढल्या जात असत. उभ्या ढलप्यांचा थर रचला जात असे. आणि त्यावर आडव्या ढलप्यांचा थर रचला जायचा. त्या राशीवर दाब देऊन “कागदाचा” एक तक्ता तयार केला जात असे.
त्यावर लिहिण्याचे काम तेवढे सोपे नव्हते. त्याची वरची बाजू खरखरीत व तंतुमय होती. एँजिलो पेन्ना या विद्वानांप्रमाणे, “शाई फुटण्यास, पपायरसमधील सच्छिद्रित तंतु आणि खासकरून बारीक पट्ट्यांमध्ये असणाऱ्या लहान खाचा, कारणीभूत ठरत असत.” सचिव जमिनीवर मांडी घालून बसत आणि एका हाताने पपायरसचा तक्ता फळ्यावर धरत. जर लिहिणारा अननुभवी असला तर, किंवा त्याचे लेखण साहित्य उत्कृष्ट दर्जाचे नसले तर त्याची पिसाची किंवा बोरूची लेखणी, पपायरसमध्ये अडकण्याची किंवा तक्ता फाटून लिखाण अस्पष्ट ठरण्याचीही शक्यता होती.
काजळी आणि झाडाचा डिंक यांच्या मिश्रणापासून शाई बनवली जात होती. वडीच्या रूपात मिळणाऱ्या या शाईला, लिहिण्यापूर्वी दौतीमध्ये पाण्याने विरल करावे लागत होते. तर्तियसारख्या एखाद्या सचिवाकडे इतर साहित्यांबरोबर कदाचित, बोरूला टोक करण्यासाठी चाकू आणि चुका खोडण्यासाठी ओला स्पंज यासारख्या वस्तू असल्या असतील. प्रत्येक अक्षर अतिशय काळजीपूर्वकरितीने लिहिण्याची गरज होती. त्यामुळे अगदी हळू आणि मुष्किलीने लिखाण व्हायचे.
‘मी तर्तिय, तुम्हाला सलाम सांगतो’
रोमी लोकांना पाठवलेल्या शुभेच्छांमध्ये पत्राच्या शेवटी, पौलाच्या सचिवाच्याही शुभेच्छा आहेत; त्याने असे लिहिले: “हे पत्र लिहून देणारा मी तर्तिय तुम्हाला प्रभूमध्ये सलाम सांगतो.” (रोमकर १६:२२) पौलाच्या लिखाणांमधील, केवळ याच प्रसंगी त्याच्या सचिवाबद्दल स्पष्टपणे सांगितले आहे.
तर्तियबद्दल आपल्याला जास्त काही माहीत नाही. त्याने “प्रभूमधील” शुभेच्छा दिल्यावरून आपण हा निष्कर्ष काढू शकतो की तो विश्वासू ख्रिस्ती असावा. बहुधा, तो करिंथ मंडळीमधील सदस्य असून रोममधील पुष्कळशा ख्रिश्चनांना ओळखत असावा. बायबल विद्वान जुझेपे बारबालयो असे सुचवतात की, तर्तिय गुलाम किंवा स्वतंत्र केलेला दास असावा. का बरे? पहिले कारण म्हणजे, “शास्त्री बहुधा या वर्गाचे होते; आणि दुसरे कारण म्हणजे, त्याचे लॅटिन नाव . . . गुलाम व स्वतंत्र केलेल्या दासांमध्ये सर्वसामान्य होते.” “म्हणूनच,” बारबालयो म्हणतात, “तो एखादा ‘निष्क्रिय’ पेशेवाईक लेखक नव्हता, परंतु, त्याने सहकारी या नात्याने पौलाला त्याच्या मोठ्या आणि सर्वोत्कृष्ट लिखाण कामामध्ये मदत केली: खरोखरच या अनमोल सेवेमुळे पौलाचा वेळ आणि श्रम वाचले.”
तर्तियचे हे काम खरोखरच अनमोल आहे. तशाचप्रकारचे काम बारूखने यिर्मयासाठी, आणि सिल्वानने पेत्रासाठी केले होते. (यिर्मया ३६:४; १ पेत्र ५:१२) त्या सहकाऱ्यांसाठी हा केवढा मोठा सुहक्क होता!
रोमकरांना लिहिणे
बहुधा, करिंथमध्ये असलेल्या गायसकडे अतिथी असताना पौलाने रोमकरांस पत्र लिहिले. सुमारे सा.यु. ५६ मध्ये, पौल त्याच्या तिसऱ्या मिशनरी दौऱ्यावर असताना हे घडले. (रोमकर १६:२३) आपल्याला निश्चित माहीत आहे की, पत्र लिहिण्यासाठी पौलाने तर्तियचा सचिव म्हणून उपयोग केला, तरी त्याने त्याचा नक्की कसा उपयोग केला हे आपल्याला माहीत नाही. कोणतीही पद्धत अमलांत आणली असली तरी, ते काम निश्चितच इतके सोपे राहिले नसेल. पण आपण याबाबतीत खात्रीने म्हणू शकतो की: बायबलच्या इतर भागांप्रमाणे, पौलाने रोमकरांस लिहिलेले पत्र “परमेश्वरप्रेरित शास्त्रलेख” होते.—२ तीमथ्य ३:१६, १७.
हे पत्र पूर्ण होईपर्यंत, तर्तिय आणि पौलाने पपायरसचे कित्येक तक्ते वापरून त्यात हजारो शब्द लिहिले होते. मग हे तक्ते एकमेकांना जोडल्यावर बहुधा तीन ते चार मीटर लांबीची एक गुंडाळी तयार झाली असावी. पत्र व्यवस्थितरित्या गुंडाळून ते बंद करण्यात येत होते. रोमच्या प्रवासाकरता निघालेल्या किंख्रियातील फीबी नामक बहिणीकडे पौलाने ही गुंडाळी सुपूर्त केल्याचे दिसते.—रोमकर १६:१, २.
पहिल्या शतकापासून, लिहिण्याचे साहित्य तयार करण्याच्या पद्धतीत प्रचंड बदल झाले आहेत. परंतु, रोमकर ख्रिश्चनांसाठी लिहिलेले पत्र देवाने आजपर्यंत जपून ठवले आहे. पौलाचा विश्वासू व कष्टाळू सचिव तर्तिय याच्या मदतीने लिहिलेल्या यहोवाच्या वचनातील या भागासाठी आपण किती आभारी असू शकतो!