वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ७/१५ पृ. २५-२९
  • “तपासणी न्यायनिवाडा”—बायबल आधारित सिद्धान्त?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “तपासणी न्यायनिवाडा”—बायबल आधारित सिद्धान्त?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ते काय आहे?
  • भाषेचा चुकलेला दुवा
  • संदर्भ काय दाखवून देतो?
  • काही विलक्षण उत्तरे
  • इब्री लोकांस पुस्तकातून काही मदत?
  • वाद आणि स्थगिती
  • दानीएल पुस्तकातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • दानीएलच्या उदाहरणातून शिका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • देवाच्या भविष्यवाणीच्या वचनाकडे आज लक्ष द्या!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ७/१५ पृ. २५-२९

“तपासणी न्यायनिवाडा”—बायबल आधारित सिद्धान्त?

संयुक्‍त संस्थानांच्या पूर्वेकडील किनाऱ्‍यावर सुमारे ५०,००० लोकांसाठी, ऑक्टोबर २२, १८४४, हा दिवस फारच प्रत्याशेचा होता. येशू ख्रिस्त त्याच दिवशी परत येणार आहे असे विल्यम मिल्लर या त्यांच्या धार्मिक नेत्याने सांगितले. मिल्लराईट्‌स, या नावाने संबोधलेले ते लोक, रात्र होईपर्यंत वाट पाहत राहिले. दुसरा दिवस उजाडला, तरी प्रभूचा काहीच पत्ता नव्हता. निराश होऊन ते घरी परतले आणि त्यानंतर ते त्या दिवसाची आठवण “मोठी निराशा” अशाप्रकारे करतात.

तथापि, या निराशेमुळेच आशेचे किरण दिसायला लागले. इलन हारमन नामक एका तरुण स्त्रीने मिल्लराईट्‌सच्या एका लहानशा गटाला याची खात्री करवून दिली की, दृष्टान्तांद्वारे देवाने तिला विदित केले होते की त्यांची कालगणना योग्य होती. तिला पूर्ण विश्‍वास होता की त्या दिवशी महत्त्वाची घटना घडली—ख्रिस्ताने “स्वर्गीय मंदिरातल्या पवित्रस्थानात” प्रवेश केला.

दहा वर्षांपेक्षा अधिक काळानंतर ॲडव्हेंटिस्ट प्रचारक, जेम्स व्हाईट (ज्यांनी इलन हारमनशी विवाह केला) यांनी ऑक्टोबर १८४४ पासून ख्रिस्ताच्या कामाच्या स्वरूपाचे वर्णन करणारा एक वाक्प्रचार तयार केला. जानेवारी २९, १८५७ च्या समालोचन आणि वार्ताहर (इंग्रजी) यामध्ये व्हाईट यांनी सांगितले की येशूने “तपासणी न्यायनिवाडा” सुरू केला होता. आणि सेव्हेन्थ-डे ॲडव्हेंटिस्ट्‌स असे ओळखल्या जाणाऱ्‍या सुमारे सत्तर लाख लोकांमध्ये हा मूलभूत विश्‍वास राहिला आहे.

“तपासणी न्यायनिवाडा” हा बायबल आधारित सिद्धान्त आहे का, असा विचार सेव्हेन्थ-डे ॲडव्हेंटिस्ट (एसडीए) चर्चमधील काही आदरणीय पंडित करत आले आहेत. याबद्दल पुनर्विचार करण्याची पाळी त्यांच्यावर का आली? तुम्ही सेव्हेन्थ-डे ॲडव्हेंटिस्ट्‌चे एक सदस्य असता तर तुम्हाला हा विषय कुतूहलाचा वाटला असता. पण, “तपासणी न्यायनिवाडा” हे काय आहे?

ते काय आहे?

या सिद्धान्ताला आधार देण्यासाठी दानीएल ८:१४, या वचनाचा उपयोग केला जातो. त्यात असे लिहिले आहे: “तो मला म्हणाला, दोन हजार तीनशे दिवस; त्यानंतर पवित्रस्थानाची शुद्धि होईल.” (किंग जेम्स व्हर्शन) “त्यानंतर पवित्रस्थानाची शुद्धि होईल,” या वाक्यांशामुळे ॲडव्हेंटिस्ट्‌ याचा संबंध लेवीय १६ व्या अध्यायाशी जोडतात. त्यामध्ये प्रायश्‍चित्ताच्या दिवशी, यहुदी महायाजकाद्वारे केल्या जात असलेल्या पवित्रस्थानाच्या शुद्धीकरणाविषयीचे वर्णन दिले आहे. ते दानीएलाच्या शब्दांचा संबंध इब्री लोकांस ९ व्या अध्यायाशी देखील जोडतात, ज्यामध्ये स्वर्गातील थोर महायाजक येशू याचे वर्णन केलेले आहे. एक एसडीए विद्वान सांगतात की हा तर्क “पुरावा-ग्रंथ” पद्धतीवर आधारलेला आहे. एखाद्याला “पवित्रस्थानासारखा शब्द दानी. ८:१४ मध्ये” सापडतो, “तोच शब्द लेवी. १६ मध्ये व इब्री. ७, ८, ९ मध्येही आढळतो, आणि मग ही सर्व वचने एकाच गोष्टीविषयी बोलत असल्याचा” तो निष्कर्ष काढतो.

ॲडव्हेंटिस्ट्‌स अशा प्रकारे तर्क करतात: प्राचीन काळातील याजक पापांच्या क्षमेसाठी, परम पवित्रस्थानात दररोजची सेवा सादर करत असे. प्रायश्‍चित्ताच्या दिवशी महायाजक परम पवित्रस्थानात (पवित्रस्थानाच्या आंतल्या खोलीत) पापापासून दोषमुक्‍त होण्यासाठी, वार्षिक सेवा सादर करत असे. त्यांचे असे म्हणणे आहे की, ख्रिस्ताची स्वर्गातील याजकीय सेवा दोन टप्प्यांची आहे. पहिल्या शतकात, त्याच्या स्वर्गारोहणाने पहिल्या टप्प्याची सुरवात झाली व त्याचा शेवट १८४४ मध्ये झाला, व यामुळे पापांची क्षमा झाली. दुसरा, किंवा “न्यायदंड टप्पा,” ऑक्टोबर २२, १८४४ रोजी सुरू झाला व आजपर्यंत तो चालूच आहे; व पापापासून दोषमुक्‍ती असा याचा परिणाम होईल. हे कसे साध्य केले जाते?

सार्वकालिक जीवनासाठी योग्य आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी, सर्व तथाकथित विश्‍वासू लोकांच्या (पहिले मेलेल्या लोकांच्या, आणि नंतर जिवंत असलेल्यांच्या) पूर्वेतिहासाचा तपास येशू १८४४ पासून करत असल्याचे सांगितले जाते. या परीक्षणाला “तपासणी न्यायनिवाडा” म्हणतात. लोकांचा न्याय झाल्यावर, जे या परीक्षेत उत्तीर्ण होतील अशांचे पाप त्या तपास पुस्तकांतून खोडून टाकले जाते. परंतु, जे लोक या परीक्षेत अनुत्तिर्ण होतील ‘अशांची नावे जीवनाच्या पुस्तकातून खोडली जातील,’ असे स्पष्टीकरण इलन व्हाईट यांनी दिले. अशा तऱ्‍हेने, “जीवन किंवा मरण यांसाठी सर्वांचे भाग्य ठरलेले असेल.” तेव्हा, स्वर्गीय पवित्रस्थान शुद्ध केले जाते आणि दानीएल ८:१४ पूर्णत्वास येते. अशी शिकवण सेव्हेन्थ-डे ॲडव्हेंटिस्ट्‌सचे लोक देतात. परंतु, ॲडव्हेंटिस्ट्‌स सिंहावलोकन (इंग्रजी) हे एसडीए प्रकाशन मान्य करते: “तपासणी न्यायनिवाडा ही अभिव्यक्‍ती बायबलमध्ये कोठेही सापडत नाही.”

भाषेचा चुकलेला दुवा

या शिकवणुकीमुळे काही ॲडव्हेंटिस्ट लोकांना हा सिद्धान्त पटत नाही. एका निरीक्षकाने म्हटले, “इतिहास दाखवून देतो की तपासणी न्यायनिवाड्यावरील आमच्या पारंपरिक शिकवणुकीवर विचार करताना, आमच्या सदस्यांमधील निष्ठावान नेते अस्वस्थ झाले आहेत.” ते पुढे म्हणतात, विद्वान जेव्हा “आमच्या नेहमीच्या मंदिरविषयक प्रस्तावनेच्या आधारस्तंभांचा संदेह करू लागले” तेव्हा अलीकडील वर्षांमध्ये या अस्वस्थपणाचे रूपांतर संशयात झाले. आता आपण त्यांपैकी दोघांचे परीक्षण करू या.

आधारस्तंभ पहिला: दानीएलचा ८ वा अध्याय, लेवीय १६ व्या अध्यायाबरोबर जोडला आहे. दोन मुख्य कारणांमुळे हा प्रस्ताव कमजोर होतो—भाषा व संदर्भ. प्रथम भाषेबद्दल विचार करू या. ॲडव्हेंटिस्ट लोकांचा विश्‍वास आहे की, लेवीय १६ व्या अध्यायातल्या ‘पवित्रस्थानाची शुद्धी’ याची भविष्यसूचक पूर्णता दानीएल ८ व्या अध्यायामध्ये दिलेल्या ‘पवित्रस्थानाची शुद्धी’ ही आहे. किंग जेम्स व्हर्शन यामधील “शुद्धि” हा शब्द, दानीएल ८:१४ मधील इब्री क्रियापद त्सादाख (ज्याचा अर्थ “धार्मिक असणे” असा होतो) याचे चुकीचे भाषांतर असल्याचे अनुवादकांच्या लक्षात येईपर्यंत ही तुलना स्वीकारयोग्य अशी वाटत होती. धर्मशास्त्राचे प्राध्यापक, ॲन्थनी ए. होकमा टिपणी करतात: “तो शब्द शुद्ध केले जाणे असे भाषांतरीत करण्यात आला ही दुर्दैवाची गोष्ट आहे, कारण नेहमी वापरलेले इब्री क्रियापद, शुद्धी [टाहेर] येथे वापरलेलेच नाही.”a त्या शब्दाचा उपयोग लेवीय १६ व्या अध्यायात करण्यात आला आहे, जेथे किंग जेम्स व्हर्शन यामध्ये टाहेर शब्दाचे “शुद्ध करणे” व “शुद्ध असणे” ही रूपे देण्यात आली आहेत. (लेवीय १६:१९, ३०) याकारणास्तव, डॉ. होकमा अचूकपणे समारोप करतात: “प्रायश्‍चित्ताच्या दिवशी होणाऱ्‍या शुद्धीकरणाच्या प्रकाराचा संदर्भ दानीएलाला द्यायचा होता तर त्याने त्सादाखऐवजी टाहेर या शब्दाचा उपयोग केला असता.” तथापि, लेवीयमध्ये त्सादाखचा उल्लेख नाही, आणि दानीएलमध्ये टाहेरचा उल्लेख नाही. येथेच भाषेचा दुवा चुकल्याचे कळून येते.

संदर्भ काय दाखवून देतो?

आता जरा संदर्भाचा विचार करा. ॲडव्हेंटिस्ट्‌सचा ठाम विश्‍वास आहे की दानीएल ८:१४ हे वचन “अगदी वेगळे” असून आधीच्या वचनांशी त्याचा काहीच संबंध नाही. परंतु, येथे “संदर्भासहित दानीएल ८:१४” असे शीर्षक असलेल्या त्या बरोबरील पेटीमधील दानीएल ८:९-१४ वाचताना तुम्हालाही तसे वाटते का? वचन ९ मध्ये आक्रमण करणाऱ्‍या, लहान शिंगाविषयी सांगितले आहे. त्यामधील १०-१२ ही वचने प्रगट करतात की हाच आक्रमण करणारा, पवित्रस्थानावर हल्ला चढवेल. वचन १३ विचारते, ‘हे आक्रमण कोठवर चालणार?’ आणि १४ व्या वचनात याचे उत्तर दिले आहे: “दोन हजार तीनशे दिवस; त्यानंतर पवित्रस्थानाची शुद्धि होईल.” स्पष्टतः, १३ वे वचन प्रश्‍न विचारते, ज्याचे उत्तर १४ वे वचन देते. वेदान्ती, डेसमाँड फोर्ड सांगतात: “[“कोठवर?” १३ वे वचन] या आरोळीमधून दानी. ८:१४ या वचनाला वगळल्यास, विवरणाच्या बाबतीत ही तर बिनबुडाचीच गोष्ट होईल.”b

ॲडव्हेंटिस्ट लोक, संदर्भातून १४ वे वचन का वगळतात? एक विचित्र निष्कर्ष टाळण्यासाठी. वचन १४ मध्ये दिलेला पवित्रस्थानाचा अशुद्धपणा लहान शिंगाच्या कार्यहालचालींना लागू होतो असे संदर्भावरून दिसून येते. परंतु, “तपासणी न्यायनिवाडा” ही शिकवणूक मात्र पवित्रस्थानातील अशुद्धपणाला ख्रिस्ताच्या कार्यहालचाली कारणीभूत आहेत असे दाखवते. तो म्हणजे ख्रिस्त, विश्‍वासू लोकांच्या पापाची स्वर्गीय पवित्रस्थानात बदली करत असल्याचे सांगितले जाते. तर मग, ॲडव्हेंटिस्ट लोकांनी सिद्धान्त आणि संदर्भ या दोहोंचा स्वीकार केला तर त्यात काय झाले? सेव्हेन्थ-डे ॲडव्हेंटिस्टचे सदस्य आणि एसडीए बायबल कॉमेन्ट्री याचे माजी सहयोगी संपादक, डॉ. रेमंड एफ. कॉटरेल लिहितात: “एसडीएचे स्पष्टीकरण, दानीएल ८:१४ चे संदर्भानुरूप परीक्षण करत असल्याचे मान्य करून स्वतःचीच भुलवणूक करून घेणे, ख्रिस्तच लहान शिंग आहे असे सांगण्यासारखे होईल.” डॉ. कॉटरेल प्रामाणिकपणे मान्य करतात: “संदर्भ व ॲडव्हेंटिस्टचे स्पष्टीकरण, या दोघांचा आपल्याला स्वीकार करता येणार नाही.” यास्तव, “तपासणी न्यायनिवाडा” याबाबतीत ॲडव्हेंटिस्ट चर्चला एक निवड करावी लागली—एकतर सिद्धान्त स्वीकारणे किंवा दानीएल ८:१४ चा संदर्भ स्वीकारणे. दुर्दैवाने त्यांनी सिद्धान्ताचा स्वीकार केला व संदर्भाचा विचारच केला नाही. म्हणूनच डॉ. कॉटरेल म्हणतात की, माहीतगार बायबल अभ्यासक, ॲडव्हेंटिस्ट लोकांवर “शास्त्रवचनांत जो अर्थ निघत” नाही “अगदी तोच अर्थ त्यातून लावण्याचा” आरोप करतात!

१९६७ मध्ये डॉ. कॉटरेल यांनी दानीएल या पुस्तकावर आधारित सण्डे स्कूलसाठी पाठ तयार केला; जगभरातील सर्व एसडीए चर्चेसला तो पाठवण्यात आला. त्यामध्ये असे शिकवण्यात आले की दानीएल ८:१४, त्याच्या संदर्भाशी संबंधित आहे आणि ‘शुद्धिकरण’ तथाकथित ख्रिस्ती विश्‍वासू लोकांना अनुलक्षून नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्या पाठात “तपासणी न्यायनिवाडा” याचा कोणताही उल्लेख नाही.

काही विलक्षण उत्तरे

“तपासणी न्यायनिवाडा” सिद्धान्ताला पाठबळ देण्यासाठी हा आधारस्तंभ फारच कमजोर आहे याबद्दल ॲडव्हेंटिस्ट लोकांना कितपत जाण आहे बरे? डॉ. कॉटरेलने २७ प्रमुख ॲडव्हेंटिस्ट वेदान्त्यांना विचारले, ‘दानीएल ८ अध्याय व लेवीय १६ अध्याय यांमध्ये संबंध असण्याविषयी तुम्ही भाषेची व संदर्भाची कोणती कारणे देऊ शकाल?’ याबद्दल त्यांची प्रतिक्रिया काय होती?

“सर्व सत्तावीस लोकांनी मान्य केले की प्रायश्‍चित्ताचा प्रतिनमुनेदार दिवस आणि तपासणी न्यायनिवाडा यांना दानी. ८:१४ लागू होत असल्याचे, भाषेचे वा संदर्भाचे कोणतेही कारण नाही.” त्यांनी विचारले, ‘हा संबंध जोडण्याची तुमच्याजवळ दुसरी कारणे आहेत का?’ ॲडव्हेंटिस्ट विद्वानांमधील बहुतेक लोकांनी, त्यांच्याकडे इतर कोणतीही कारणे नसल्याचे सांगितले, इलन व्हाईटने अशाप्रकारचा संबंध जोडल्यामुळे त्यांनीही तसे केल्याचे पाच जणांनी सांगितले, व दोघेजण म्हणाले की ते हा सिद्धान्त भाषांतरामुळे “सुदैवाने झालेल्या योगायोगावर” आधारतात. वेदान्ती फोर्ड टिपणी करतात: “आमच्या सर्वात उत्तम विद्वानांनी केलेल्या या निष्कर्षांमुळे खरे पाहता हे निश्‍चित होते की, दानीएल ८:१४ या वचनावर आधारलेल्या आमच्या पारंपरिक शिकवणुकीचे समर्थन करता येत नाही.”

इब्री लोकांस पुस्तकातून काही मदत?

आधारस्तंभ दुसरा: दानीएल ८:१४ चा संबंध इब्री लोकांस ९ व्या अध्यायाबरोबर जोडण्यात येतो. “दानी. ८:१४ याचे स्पष्टीकरण करताना, आमचे पूर्वीचे सगळे साहित्य पूर्णपणे इब्री ९ वर आधारलेले होते,” असे वेदान्ती फोर्ड म्हणतात. १८४४ मध्ये झालेली “मोठी निराशा” यानंतर या संबंधाचा उगम झाला. मिल्लराईट्‌ हायरम एडसनने योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून त्याचे बायबल उघडे पडेल अशा पद्धतीने ते एका टेबलवर टाकले. त्याचा परिणाम काय झाला? त्याच्यासमोर, इब्री लोकांस ८ आणि ९ अध्याय उघडले गेले. फोर्ड पुढे सांगतात: “हे अध्याय, १८४४ आणि दानी. ८:१४ याच्या अर्थ स्पष्ट करणारी उत्तरे आहेत, ॲडव्हेंटिस्टच्या ह्‍या दाव्याला यापेक्षा आणखी अचूक व लाक्षणिक पुरावा कोणता असू शकतो!”

दानीएल ८:१४, प्रायश्‍चित्ताचा दिवस आणि तपासणी न्यायनिवाडा, या आपल्या पुस्तकात फोर्ड पुढे म्हणतात, “सेव्हेन्थ-डे ॲडव्हेंटिस्टना हा दावा महत्त्वाचा आहे.” “केवळ इब्री. ९ व्या अध्यायामध्ये . . . आम्हाला महत्त्वपूर्ण असलेल्या पवित्रस्थान सिद्धान्ताची . . . त्याच्या अर्थसूचकतेची तपशीलवार माहिती मिळू शकेल.” होय, “नवा करार” यामधील इब्री लोकांस ९ वा अध्याय हाच, लेवीय १६ अध्यायाबद्दल भविष्यसूचक अर्थ स्पष्ट करतो. परंतु, “जुना करार” यामधील दानीएल ८:१४ हे वचन देखील त्याचा अर्थ स्पष्ट करतो, असेही ॲडव्हेंटिस्ट म्हणतात. जर दोन्ही वाक्ये बरोबर आहेत, तर इब्री लोकांस अध्याय ९ आणि दानीएल अध्याय ८ मध्ये संबंध असला पाहिजे.

“इब्री. ९ वाचताना काही गोष्टी चटकन लक्षात येतात. दानीएलच्या पुस्तकाला सुस्पष्टरित्या अनुलक्षून काहीच म्हटलेले नाही, आणि दानी. ८:१४ ला तर मुळीच नाही. . . . हा पूर्ण अध्याय, लेवी. १६ वर अवलंबून आहे,” असे डेसमाँड फोर्ड निरीक्षण करतात. ते पुढे सांगतात: “मंदिराच्या सेवेच्या अर्थसूचकतेची चर्चा करणाऱ्‍या नव्या करारातल्या केवळ एकाच पुस्तकात आमची मंदिराची शिकवणूक सापडू शकत नाही. जगभरातील सुविख्यात ॲडव्हेंटिस्ट लेखकांनी हे कबूल केले आहे.” तर मग, खळबळ माजवणाऱ्‍या या सिद्धान्ताला पाठबळ देण्यासाठी आधारस्तंभ दुसरा देखील कमजोर आहे.

तथापि, हा निष्कर्ष काही नवा नाही. डॉ. कॉटरेल म्हणतात की कित्येक वर्षांपासून, “दानीएल ८:१४ आणि इब्री लोकांस ९ वा अध्याय यांबद्दलच्या आमच्या पारंपरिक स्पष्टीकरणामुळे उद्‌भवणाऱ्‍या विवरण समस्यांविषयी आमच्या चर्चमधील बायबल विद्वानांना पूर्णपणे माहिती होती.” प्रभावी सेव्हेन्थ-डे ॲडव्हेंटिस्ट, ई. जे. वॅग्गनर यांनी काही ८० वर्षांपूर्वी लिहिले: “पवित्रस्थानासोबत, ‘तपासणी न्यायनिवाडा’ याबद्दल ॲडव्हेंटिस्टची शिकवणूक . . . , खरे पाहता प्रायश्‍चित्ताला नकार देणारी आहे.” [विश्‍वासाची कबूली (इंग्रजी)] सुमारे ३० वर्षांपूर्वी, जनरल कॉन्फरेन्सच्या एसडीए चर्च नेतावर्गासमोर या समस्या सादर करण्यात आल्या होत्या.

वाद आणि स्थगिती

जनरल कॉन्फरेन्सने “दानीएलच्या पुस्तकातील वादांवरची समिती” नियुक्‍त केली. दानीएल ८:१४ वर आधारित वादांना कसे मिटवता येईल याचा या समितीला अहवाल तयार करायचा होता. पाच वर्षांपर्यंत समितीच्या १४ सदस्यांनी या वादांवर अभ्यास केला, परंतु ते एकमताने उत्तर देऊ शकले नाहीत. १९८० मध्ये, परिषदेचे सदस्य कॉटरेल यांनी सांगितले की, दानीएल ८:१४ चे ॲडव्हेंटिस्ट स्पष्टीकरण कदाचित “गृहित धरलेल्या गोष्टींच्या” मालिकेद्वारे “समाधानकारकरित्या सिद्ध” केले जाऊ शकते, व या वादविषयाची “आठवण काढू नये” असे बहुतेक समिती सदस्यांना वाटत होते. ते पुढे म्हणतात: “लक्षात ठेवा की समितीचे नाव, दानीएलच्या पुस्तकातील वादांवरची समिती असे असून, आपण हे वादविषय विसरले पाहिजेत आणि इथं त्याबद्दल काहीच बोलू नये असे बहुतेक जण सुचवत होते.” हे तर “आमच्याकडे उत्तरच नाही असे मान्य” करण्यासारखेच असते. म्हणूनच, बहुमतांची बाजू घेण्यास अल्पपक्षाने नकार दर्शवला, व त्यावरचा अधिकृत अहवाल तर बनलाच नाही. या सिद्धान्ताविषयीचे वादविषय तसेच्या तसेच राहिले.

या स्थगितीवर मत मांडताना, डॉ. कॉटरेल म्हणतात: “विवरण समस्या खरोखरच आहेत, या गोष्टीस तोंड देण्याची आमची आतापर्यंत तरी इच्छा नसल्यामुळे दानीएल ८:१४ चा वाद अजूनही तसाच आहे. आपण जोपर्यंत समस्याच नाही असे म्हणत राहतो, आणि आधार नसलेल्या या मतांवर जोपर्यंत आपण वैयक्‍तिकरित्या किंवा सामूहिकरीत्या डोळे झाकून समर्थन करतो, तोपर्यंत याचे निरसन होणार नाही.”—ॲडव्हेंटिस्ट न्यायस्थान समाजाद्वारे प्रकाशित नियतकालिक, स्पेक्ट्रम.

“गृहीत धरलेल्या मूळ गोष्टींवर व विवरण विषयक मूलतत्त्वावर आधारलेल्या स्पष्टीकरणाचा—ॲव्हेंटिसमसाठी—अत्यावश्‍यक असलेल्या शास्त्रवचनाच्या उताऱ्‍यावर आणखीन काळजीपूर्वक परीक्षण करण्यास” डॉ. कॉटरेलने ॲडव्हेंटिस्टना अर्जविले. आम्ही ॲडव्हेंटिस्टना, “तपासणी न्यायनिवाडा” या सिद्धान्ताचे आधारस्तंभ पूर्णपणे बायबलवर की परंपरेच्या डगमगत्या आधारावर आधारित आहेत, याविषयी परीक्षण करण्यास उत्तेजन देतो.c प्रेषित पौलाने सुज्ञतेने अर्जविले: “सर्व गोष्टींची पारख करा; चांगले ते बळकट धरा.”—१ थेस्सलनीकाकर ५:२१.

[तळटीपा]

a विल्सन्स ओल्ड टेस्टामेन्ट वर्ड स्टडिझ यामध्ये त्सादाखची व्याख्या “धार्मिक असणे, निर्दोष असणे,” अशाप्रकारे दिली आहे आणि टाहेर या शब्दाची व्याख्या “स्वच्छ, तेजस्वी, चमकदार असणे; पवित्र, निर्मळ, शुद्ध असणे; सर्व प्रकारच्या मलिनतेपासून व कलंकापासून शुद्ध असणे,” याप्रमाणे केली आहे.

b चर्चद्वारे चालविल्या जाणाऱ्‍या अमेरिकेच्या पॅसेफिक युनियन कॉलेजमध्ये डॉ. फोर्ड धर्म या विषयाचे प्राध्यापक होते. एसडीए नेतावर्गाने, १९८० मध्ये त्यांना सिद्धान्ताविषयी अभ्यास करण्याकरता सहा महिन्यांची रजा मंजूर केली, परंतु, त्यांनी लावलेले शोध मात्र झिडकारण्यात आले. दानीएल ८:१४, प्रायश्‍चित्ताचा दिवस आणि तपासणी न्यायनिवाडा, (इंग्रजी) या पुस्तकामध्ये त्यांनी त्यांचे शोध प्रकाशित केले आहेत.

c दानीएल ८ व्या अध्यायाबद्दल तर्कशुद्ध स्पष्टीकरणासाठी, वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित, “पृथ्वीवर तुझ्या इच्छे प्रमाणे होवो,” (इंग्रजी) या पुस्तकातील पृष्ठे १८८-२१९ पाहा.

[२७ पानांवरील चौकट]

संदर्भासहित दानीएल ८:१४

दानीएल ८:९ “त्यातल्या एका शिंगातून एक लहान शिंग निघाले; त्याची दृष्टि दक्षिणेस, पूर्वेस व त्या वैभवी देशाकडे पराकाष्ठेची झाली. १० त्याची वृद्धि आकाशगणांपर्यंत होऊन त्या गणांपैकी व त्या ताऱ्‍यांपैकी काहींना त्याने जमिनीवर पाडून तुडविले. ११ एवढेच नव्हे तर त्या गणांच्या अधिपतीबरोबर तो स्पर्धा करू लागला; त्याला नित्य होत असलेले यज्ञयाग त्याने बंद केले, आणि त्याचे पवित्रस्थान पाडून टाकिले. १२ लोकांच्या पातकांस्तव ते सैन्य नित्याच्या यज्ञयागांसहित त्याच्या स्वाधीन करण्यात आले; त्याने सत्य मातीस मिळविले; त्याने आपला मनोरथ सिद्धीस नेला.

“१३ तेव्हा मी एका पवित्र पुरुषास बोलताना ऐकले; दुसरा एक पवित्र पुरुष त्या बोलणाऱ्‍यास म्हणाला, ‘हा नित्याचा यज्ञयाग, विध्वंसमूलक पातक, पवित्रस्थान व सैन्य ही पायांखाली तुडविणे, ह्‍या दृष्टांतांत पाहिलेल्या गोष्टी कोठवर चालणार?’ १४ तो मला म्हणाला, ‘दोन हजार तीनशे दिवस [“दिवसांपर्यंत,” NW] त्यानंतर पवित्रस्थानाची शुद्धि होईल.’”—(तिरपे वळण आमचे.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा