वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ६/१ पृ. २८-३१
  • पौलाचे सहकारी—ते कोण होते?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पौलाचे सहकारी—ते कोण होते?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • प्रवासाचे सोबती, यजमान आणि यजमानिणी
  • अनेक स्नेही
  • कैदेत असताना निष्ठावान सोबत्यांचा आधार
  • “आम्ही देवाचे सहकारी आहो”
  • “अगदी पूर्णपणे साक्ष” दिली
    देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
  • घाबरू नका—यहोवा तुम्हाला साहाय्य करेल
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
  • “मी सगळ्या लोकांच्या रक्‍ताबद्दल निर्दोष आहे”
    देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
  • रोममध्ये पौल
    बायबल कथांचं माझं पुस्तक
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ६/१ पृ. २८-३१

पौलाचे सहकारी—ते कोण होते?

बायबलमध्ये प्रेषितांची कृत्ये या पुस्तकात आणि पौलाच्या पत्रांत जवळजवळ शंभरएक लोकांचा उल्लेख आहे; हे लोक पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीचे सदस्य होते आणि त्यांनी “परराष्ट्रीयांचा प्रेषित,” अर्थात पौल याच्या सहवासात कार्य केले होते. (रोमकर ११:१३) त्यांच्यापैकी बऱ्‍याच जणांबद्दल पुष्कळशी माहिती उपलब्ध आहे. अपुल्लोस, बर्णबा आणि सीला यांच्या कार्यांविषयी कदाचित तुम्हाला माहिती असेलच. पण तेच जर आर्खिप्पा, क्लौदिया, दामारी, लीन, पर्सिस, पुदेस आणि सोपत्र यांच्याविषयी विचारले तर कदाचित तुम्हाला फारशी माहिती देता येणार नाही.

वेगवेगळ्या प्रसंगी आणि वेगवेगळ्या परिस्थितींत, बऱ्‍याच व्यक्‍तींनी पौलाच्या सेवाकार्याला सक्रिय योगदान दिले. अरिस्तार्ख, लूक आणि तीमथ्य यांनी प्रेषित पौलासोबत खांद्याला खांदा लावून कितीतरी वर्षे सेवा केली. काही त्याच्यासोबत बंदिशाळेत राहिले, इतरांनी त्याला त्याच्या प्रवासात सोबत दिली किंवा प्रवासादरम्यान त्याचा पाहुणचार केला. पण दुःखाची गोष्ट म्हणजे आलेक्सांद्रा, देमास, हर्मगनेस, आणि फुगल यांच्यासारखे काहीजण ख्रिस्ती विश्‍वासातून ढळले.

पौलाचे इतर स्नेही जसे, असुंक्रित, हर्मास, युलिया, किंवा फिललग यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांच्या नावाखेरीज आपल्याला त्यांच्याविषयी काहीच माहिती नाही. नीरियाची बहिण आणि रूफाची आई किंवा क्लोएच्या घरातील माणसे यांची तर नावेही आपल्याला माहीत नाहीत. (रोमकर १६:१३-१५; १ करिंथकर १:११, इझी टू रीड व्हर्जन) तरीसुद्धा, या शंभरएक लोकांविषयी आपल्याला जितकी काही माहिती उपलब्ध आहे तिचे परीक्षण केल्यास पौलाच्या कार्यासंबंधी बरेच काही उजेडात येते. याशिवाय, अनेक सहविश्‍वासू बांधवांच्या सहवासात राहून त्यांच्यासोबत कार्य केल्यामुळे कोणकोणते फायदे प्राप्त होतात हेही आपल्याला शिकायला मिळेल.

प्रवासाचे सोबती, यजमान आणि यजमानिणी

प्रेषित पौलाला आपल्या सेवाकार्यात बराच प्रवास करावा लागत असे. प्रेषितांची कृत्ये या एकाच पुस्तकात आढळणाऱ्‍या उल्लेखांवरून एका लेखकाने अंदाज लावला की पौलाने आपल्या प्रवासांत, जमिनीवर आणि समुद्रावाटे जवळजवळ १६,००० किलोमीटरचे अंतर कापले. त्या काळात प्रवास हा अतिशय थकविणाराच नाही तर धोकेदायकही होता. पौलाला बऱ्‍याच संकटप्रसंगांना तोंड द्यावे लागले; जहाज फुटणे, नद्यांवरील संकटे, लुटारूंमुळे आलेली संकटे, रानातली संकटे, समुद्रावरची संकटे ही त्यांपैकी काही. (२ करिंथकर ११:२५, २६) म्हणूनच, एका ठिकाणाहून दुसऱ्‍या ठिकाणी प्रवास करताना पौल सहसा एकटा जात नसे.

पौलासोबत जाणाऱ्‍यांची त्याला प्रवासात सोबत तर व्हायचीच, पण त्यांच्याकडून पौलाला प्रोत्साहन आणि सेवाकार्यात बरीच मदतही होत असे. काही ठिकाणी नव्याने विश्‍वासात आलेल्यांची आध्यात्मिक दृष्टीने देखभाल करण्यासाठी पौल आपल्या सोबत्यांना त्यांच्याजवळ सोडून पुढच्या प्रवासाला निघत असे. (प्रेषितांची १७:१४; तीत १:५) पण सुरक्षेसाठी आणि प्रवासात येणाऱ्‍या निरनिराळ्या अडचणींना तोंड देण्यासाठी मदतीला कोणीतरी सोबत असणे त्याकाळात आवश्‍यक होते. त्यामुळे पौलाच्या प्रवासात, सोबती म्हणून गेलेल्या सोपत्र, सकूंद, गायस, आणि त्रफिम यांच्यासारख्या लोकांचा पौलाचे सेवाकार्य यशस्वी करण्यात सिंहाचा वाटा होता, असे म्हणता येईल.—प्रेषितांची कृत्ये २०:४.

तसेच, ठिकठिकाणी पौलाचा पाहुणचार करणाऱ्‍या स्त्रीपुरुषांनी केलेले साहाय्यही तितकेच मोलाचे होते. एखाद्या शहरात आल्यावर तेथे काही दिवस राहून प्रचार करण्याचा कार्यक्रम असेल किंवा फक्‍त रात्री मुक्काम करून सकाळी निघायचे असेल, तरी राहायचे कोठे हा एक मोठा प्रश्‍न असायचा. आणि पौलाइतका प्रवास करणाऱ्‍याला तर अक्षरशः दररोज वेगळ्या ठिकाणी झोपावे लागत असेल. मुक्काम करण्यासाठी ठिकठिकाणी पथिकाश्रमे असायची, पण इतिहासकारांच्या मते ही पथिकाश्रमे, “धोकेदायक आणि वाईट” होती; त्यामुळे पौल शक्यतो सहविश्‍वासू बांधवांकडेच राहात असावा.

पौलाचा पाहुणचार करणाऱ्‍या काही स्त्रीपुरुषांची नावे आपल्या ओळखीची आहेत—अक्विल्ला आणि प्रिस्का, गायस, यासोन, लुदिया, म्नासोन, फिलेमोन आणि फिलिप्प. (प्रेषितांची कृत्ये १६:१४, १५; १७:७; १८:२, ३; २१:८, १६; रोमकर १६:२३; फिलेमोन १, २२) फिलिप्पै, थेस्सलनिका, आणि करिंथ येथे आपल्या मुक्कामाच्या ठिकाणाहूनच पौल आपल्या मिशनरी कार्याच्या योजना आखू शकत होता. करिंथमध्ये मुक्काम करून प्रेषित पौलास आपले प्रचार कार्य सुरू ठेवता यावे म्हणून तीत युस्त यानेही त्याला आपल्या घरी ठेवले होते.—प्रेषितांची कृत्ये १८:७.

अनेक स्नेही

प्रवासादरम्यान वेगवेगळ्या परिस्थितींत भेटलेल्या या लोकांच्या पौलाजवळ वेगवेगळ्या आठवणी असतील, हे अपेक्षितच आहे. उदाहरणार्थ, मरीया, पर्सिस, फीबी, त्रुफैना व त्रुफासा या सर्व सहविश्‍वासू स्त्रिया होत्या आणि त्यांनी केलेल्या श्रमांबद्दल पौलाने त्यांचे कौतुक केले. (रोमकर १६:१, २, ६, १२) क्रिस्प, गायस, आणि स्तेफनाच्या घरच्यांना पौलाने स्वतः बाप्तिस्मा दिला होता. अथेनैत असताना दिओनुस्य आणि दामारी यांनी त्याच्याकडून मिळालेल्या सत्याचा संदेश स्वीकारला होता. (प्रेषितांची कृत्ये १७:३४; १ करिंथकर १:१४, १६) “प्रेषितांमध्ये नामांकित” असलेले अंद्रोनीक व युनिया हे पौलाच्याही आधीपासून विश्‍वासात होते आणि तो त्यांना आपल्या “सोबतीचे बंदिवान” म्हणतो. कदाचित बंदिशाळेत असताना तेही एखाद्या वेळेस त्याच्यासोबत सहकैदी असावेत. हेरोदियोन, यासोन, लूक्य, आणि सोसिपतेर यांच्याप्रमाणेच या दोघांनाही पौलाचे “नातेवाईक” म्हटले आहे. (रोमकर १६:७, ११, २१) “नातेवाईक” या अर्थाचा जो ग्रीक शब्द येथे वापरला आहे त्याचा अर्थ “देशबंधू” असाही होऊ शकतो, पण या शब्दाचा मूळ अर्थ “एकाच पिढीतले रक्‍ताचे नातेवाईक” असा आहे.

पौलाचे अनेक स्नेही सुवार्तेच्या प्रचाराकरता प्रवास करायचे. यांपैकी काही तर आपल्या ओळखीचे आहेतच; पण अखायिक, फर्तुनात, आणि स्तेफना हे देखील आपल्या मंडळीच्या आध्यात्मिक स्थितीविषयी पौलाशी विचारविनिमय करण्यासाठी करिंथवरून इफिस येथे गेले. अर्तमा व तुखिका, क्रेतात सेवा करत असलेल्या तीतासोबत कार्य करण्यासाठी तेथे जाण्यास तयार होते, आणि अपुल्लोसोबत जेना याला देखील रवाना करण्यात आले होते.—१ करिंथकर १६:१७; तीत ३:१२, १३.

अशाही काही व्यक्‍ती आहेत ज्यांच्याबद्दल पौल अगदी त्रोटक पण काहीतरी उल्लेखनीय माहिती देतो. उदाहरण द्यायचे झाल्यास, अपैनत हा “आशिया देशाचे प्रथमफळ” होता, एरास्त हा करिंथ “नगराचा खजिनदार” होता, लूक वैद्य होता, तर लुदिया ही जांभळी वस्त्रे विकत असे; तसेच रोमी बांधवांना लिहिलेले पत्र पौलाने तर्तिय याच्याकडून लिहून घेतले होते. (रोमकर १६:५, २२, २३; प्रेषितांची कृत्ये १६:१४; कलस्सैकर ४:१४) या लोकांबद्दल ज्यांना अधिक माहिती जाणून घ्यायची आहे, त्यांची उत्सुकता ही संक्षिप्त माहिती वाचल्यावर आणखीनच वाढते.

पौलाच्या इतर सोबत्यांना त्याने काही खास संदेश पाठवले होते आणि आज आपल्याला ते बायबलमध्ये वाचायला मिळतात. उदाहरणार्थ, कलस्सैकरांना लिहिलेल्या पत्रात, पौल आर्खिप्पाला प्रोत्साहन देऊन म्हणतो: “जी सेवा तुला प्रभूमध्ये मिळाली आहे ती पूर्ण करण्याकडे लक्ष दे.” (कलस्सैकर ४:१७) युवदीया व सुंतुखे यांच्यामध्ये काहीतरी मतभेद झाल्याचे आपण वाचतो. त्यामुळे पौलाने आपल्या एका निनावी ‘सोबत्याकडून’ त्यांना असा संदेश पाठवला की “तुम्ही प्रभूच्या ठायी एकचित्त व्हा.” (फिलिप्पैकर ४:२, ३) आपल्या सर्वांसाठीही हा एक उपयुक्‍त सल्ला आहे.

कैदेत असताना निष्ठावान सोबत्यांचा आधार

पौलाला कित्येक वेळा कैद झाली. (२ करिंथकर ११:२३) कैदेत असताना, त्या विशिष्ट शहरात कोणी ख्रिस्ती बांधव असल्यास, त्यांनी तुरुंगवासाचा हा खडतर अनुभव पौलाला सुसह्‍य व्हावा म्हणून होईल तितकी मदत नक्कीच केली असेल. पौल पहिल्यांदा रोममध्ये बंदिवासात होता तेव्हा त्याला स्वतःचे घर भाड्याने घेऊन राहण्याची मुभा देण्यात आली होती; दोन वर्षे तो येथे राहिला आणि यादरम्यान त्याचे स्नेही त्याला भेटायला येत असत. (प्रेषितांची कृत्ये २८:३०) या काळात त्याने इफिस, फिलिप्पै, कलस्सै येथे असणाऱ्‍या मंडळ्यांना तसेच फिलेमोनालाही पत्रे लिहिली. कैदेत असताना कोणकोण पौलाच्या जवळ होते हे आपल्याला या पत्रांतून कळून येते.

उदाहरणार्थ, फिलेमोनाचा पळून गेलेला गुलाम अनेसिम हा रोमला पौलाकडे गेला, तुखिकही तेथे होता; अनेसिम आपल्या मालकाकडे परत जाण्यास निघाला तेव्हा तुखिक त्याच्यासोबत गेला. (कलस्सैकर ४:७-९) एपफ्रदीतही फिलिप्पैहून रोमपर्यंतचा लांब प्रवास करून आपल्या मंडळीतर्फे पौलासाठी भेट घेऊन आला; पण नंतर तो आजारी पडला. (फिलिप्पैकर २:२५; ४:१८) याशिवाय, रोममध्ये पौलाच्या सहवासात कार्य करणाऱ्‍यांपैकी अरिस्तार्ख, मार्क, आणि युस्त म्हटलेला येशू होता; यांच्याविषयी पौलाने म्हटले: “हेच मात्र देवाच्या राज्याकरिता माझे सहकारी आहेत व त्यांच्याद्वारे माझे सांत्वन झाले आहे.” (कलस्सैकर ४:१०, ११) या विश्‍वासू लोकांव्यतिरिक्‍त तीमथ्य आणि लूक यांच्याविषयी तर आपल्याला माहीतच आहे; तसेच देमास, ज्याने ऐहिक सुख प्रिय असल्यामुळे पौलाला सोडून दिले होते.—कलस्सैकर १:१; ४:१४; २ तीमथ्य ४:१०; फिलेमोन २४.

हे सर्वजण खरे तर रोमचे रहिवासी नव्हते, पण तरीही ते पौलाच्या जवळ राहून त्याच्या पाठिशी उभे राहिले. यांपैकी काहीजण कदाचित खास कैदेत असलेल्या पौलाला मदत करण्यासाठीच रोमला गेले असावेत. अर्थातच, तेथे असताना काहींनी त्याची लहानमोठी कामे केली असतील, इतर काहींना खास कामांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आले, तर इतर काहीजणांकडून पौल पत्र लिहून घेत असे. या सर्वांना पौलाबद्दल गहिरी आपुलकी होती, शिवाय, त्याच्याप्रती आणि देवाच्या कार्याप्रती त्यांची किती प्रचंड निष्ठा होती हेच यावरून दिसून येते!

पौलाच्या काही पत्रांच्या शेवटल्या ओळी वाचल्यावर आपल्याला दिसून येते की अनेकानेक ख्रिस्ती बंधुभगिनी त्यावेळी त्याच्याबरोबर होते; आपल्याला तर अगदी मोजकीच नावे माहीत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी पौलाने “सर्व पवित्र जन तुम्हाला सलाम सांगतात,” आणि “माझ्याबरोबरचे सर्व जण तुला सलाम सांगतात” असे लिहिलेले आपल्याला आढळते.—२ करिंथकर १३:१३; तीत ३:१५; फिलिप्पैकर ४:२२.

पौल दुसऱ्‍यांदा कैदेत होता आणि त्याचा हुतात्मिक मृत्यू जवळ आला होता, त्या खडतर काळात त्याला आपल्या सहकाऱ्‍यांविषयी खूप काळजी वाटायची. त्यांपैकी निदान काहींच्या कार्यावर तो अद्यापही जातीने देखरेख करीत होता. तीत आणि तुखिक यांना सुवार्तेच्या कार्याकरता रवाना करण्यात आले होते, क्रेस्केस गलतीयास गेला होता, एरास्त करिंथमध्येच राहिला होता, आणि त्रफिम आजारी पडल्यामुळे त्याला मिलेता येथेच सोडून, मार्क आणि तीमथ्य पौलाजवळ येणार होते. लूक मात्र पौलाजवळच होता आणि पौलाने तीमथ्याला दुसरे पत्र लिहिले तेव्हा यूबूल, पुदेस, लीन व क्लौदिया असे बरेच सहविश्‍वासू त्याच्या जवळ होते, कारण पौलाने तीमथ्याला त्यांचाही सलाम कळवला. हे बांधव पौलाला आपल्या परीने होईल तितकी मदत करत असतील, यात शंका नाही. त्याच पत्रात पौल स्वतः प्रिस्का, अक्विल्ला व अनेसिफराच्या घरच्या माणसांना आपला सलाम कळवतो. पण दुःखाची गोष्ट म्हणजे, या कठीण काळात, देमास याने पौलाला सोडून दिले आणि आलेक्सांद्र याने त्याचे पुष्कळ वाईट केले.—२ तीमथ्य ४:९-२१.

“आम्ही देवाचे सहकारी आहो”

प्रचाराच्या कार्यात पौल क्वचितच एकटा असायचा. इ. अर्ल एल्लिस या भाष्यकाराच्या म्हणण्यानुसार, “अनेक साथीदार असलेल्या एका मिशनऱ्‍याचे चित्र उभे राहते. किंबहुना, कोणा सोबत्यांसोबत नसताना पौलाविषयीचा क्वचितच उल्लेख आढळतो.” देवाच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने पौल अनेक लोकांना प्रेरित करून अतिशय परिणामकारक प्रचार मोहिमा राबवू शकला. जवळचे सोबती, तात्पुरते मदतनीस, काही प्रभावशाली व्यक्‍तिमत्वे आणि बरेच विनम्र सेवक यांचा पौलाभोवती घोळकाच असायचा. पण हे निव्वळ त्याचे सहकारीच नव्हते. त्यांनी पौलाच्या सहवासात वेगवेगळी कामे आणि ती वेगवेगळ्या कालावधीपर्यंत केली होती, कोणी कमी तर कोणी जास्त; पण पौलाचे त्यांच्यासोबत जुळलेले ख्रिस्ती प्रीतीचे आणि घनिष्ट मैत्रीचे बंधन अगदी स्पष्ट दिसून येते.

पौलाजवळ “लोकांना जवळ करण्याचे खास कौशल्य” होते असे म्हटले जाते. त्याने परराष्ट्रांत सुवार्तेचा प्रचार करण्याकरता बरेच श्रम घेतले, पण त्याने हे कार्य एकट्याने करण्याचा प्रयत्न केला नाही. सुसंघटित ख्रिस्ती मंडळीसोबत त्याने सहकार्य केले आणि तिचा पूर्ण उपयोग करून घेतला. शिवाय, जे चांगले परिणाम घडून आले, त्यांचे श्रेय स्वतःच न घेता आपण केवळ एक सेवक असून देवच वाढ करत असल्यामुळे त्यालाच सर्व स्तुती मिळाली पाहिजे हे त्याने नम्रपणे मान्य केले.—१ करिंथकर ३:५-७; ९:१६; फिलिप्पैकर १:१.

पौलाचा काळ आपल्या काळापेक्षा वेगळा होता पण तरीसुद्धा, ख्रिस्ती मंडळीत कोणीही असे समजू नये, की मी स्वतंत्र राहून कार्य करू शकतो किंवा मी स्वतंत्र राहिलेलेच बरे. उलट, आपण सदैव देवाच्या संघटनेसोबत, आपल्या स्थानिक मंडळीसोबत आणि आपल्या सहविश्‍वासू बांधवांसोबत कार्य केले पाहिजे. आपल्या सुखदुःखात त्यांच्या मदतीची, आधाराची आणि सांत्वनाची आपल्याला गरज आहे. ‘सबंध जगात असलेल्या एक बंधुवर्गाचा’ भाग असण्याचा बहुमोल सुहक्क आपल्याला लाभला आहे. (१ पेत्र ५:९) आपण त्या सर्वांसोबत सहकार्य करून विश्‍वासूपणे आणि प्रेमळपणे खांद्याला खांदा लावून कार्य करीत राहिलो, तर पौलासारखे आपणही म्हणू शकू की “आम्ही देवाचे सहकारी आहो.”—१ करिंथकर ३:९.

[३१ पानांवरील चित्र]

अपुल्लो

अरिस्तार्ख

बर्णबा

लुदिया

अनेसिफर

तर्तिय

तुखिक

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा