देवाच्या अपेक्षांबद्दल शिकण्यास इतरांना साहाय्य करणे
“मला . . . सांगणे भाग आहे; कारण मी सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार!”—१ करिंथकर ९:१६.
१, २. (अ) कोणत्या दुहेरी कार्यात आपण भाग घ्यावा असे यहोवा अपेक्षितो? (ब) देवाच्या राज्याची प्रजा व्हावयाचे असल्यास नम्र अंतःकरणाच्या लोकांनी काय शिकले पाहिजे?
यहोवाकडे मानवजातीकरता सुवार्ता आहे. त्याचे एक राज्य आहे आणि सर्वत्र लोकांनी त्याबद्दल ऐकावे असे त्याला वाटते! ही सुवार्ता जाणून घेतल्यावर आपण इतरांना ती सांगावी अशी देव अपेक्षा करतो. हे दुहेरी कार्य आहे. पहिले, आपण देवाच्या राज्याच्या सुवार्तेची घोषणा केली पाहिजे. येशू, ‘युगाच्या समाप्तीविषयीच्या’ त्याच्या भविष्यवाणीत म्हणाला: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.”—मत्तय २४:३, १४.
२ या कार्याच्या दुसऱ्या पैलूत, राज्य घोषणेला अनुकूल प्रतिसाद देणाऱ्यांना शिकवणे समाविष्ट आहे. येशूने त्याच्या पुनरुत्थानानंतर आपल्या शिष्यांच्या एका मोठ्या गटाला असे सांगितले: “तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.” (मत्तय २८:१९, २०) ‘ख्रिस्ताने आज्ञापिलेल्या गोष्टी’ त्याच्या नव्हत्या; त्याने इतरांना, देवाच्या आज्ञा पाळण्यास अथवा अपेक्षा पूर्ण करण्यास शिकवले. (योहान १४:२३, २४; १५:१०) इतरांना, ‘ख्रिस्ताने आज्ञापिलेल्या गोष्टी पाळावयास शिकवण्यामध्ये’ देवाच्या अपेक्षा शिकण्यास मदत करणे समाविष्ट आहे. देवाच्या राज्याची प्रजा होण्याकरता नम्र अंतःकरणाच्या लोकांनी देवाच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत.
३. देवाचे राज्य काय आहे व ते असे काय साध्य करणार आहे जे राज्य संदेशाला सुवार्ता बनवते?
३ देवाचे राज्य काय आहे? आणि ते असे काय साध्य करणार आहे ज्यामुळे राज्य संदेश एक सुवार्ता बनते? देवाचे राज्य स्वर्गीय सरकार आहे. ते यहोवास अतिशय प्रिय वाटते कारण त्याद्वारे तो त्याच्या नावावरील कलंक पुसून टाकून ते पवित्र करणार आहे. ते राज्य असे एक साधन आहे ज्याचा उपयोग यहोवा, आपली इच्छा जशी स्वर्गामध्ये तशी पृथ्वीवरही पूर्ण करण्यासाठी करणार आहे. म्हणूनच येशूने आपल्याला देवाचे राज्य यावे म्हणून प्रार्थना करावयास शिकवले व त्याला आपल्या जीवनांत प्रथम स्थान देण्यास आर्जवले. (मत्तय ६:९, १०, ३३) तेव्हा, इतरांना यहोवाच्या राज्याविषयी शिकवणे त्याला इतके महत्त्वाचे का वाटते ते तुम्हाला समजले का?
ते आव्हान आहे पण ओझे नाही
४. सुवार्तेचा प्रचार करण्याचे आपले कर्तव्य कठीण नाही हे कोणत्या उदाहरणावरून दाखवता येऊ शकते?
४ सुवार्तेचा प्रचार करणे कठीण आहे का? मुळीच नाही! उदाहरणार्थ, आपल्या कुटुंबाची भौतिक तरतूद करणे हे पित्याचे कर्तव्य आहे. तसे न करणे ख्रिस्ती विश्वास नाकारण्याच्या बरोबरीचे आहे. प्रेषित पौलाने लिहिले: “जर कोणी स्वकीयांची व विशेषेकरून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारला आहे; तो माणूस विश्वास न ठेवणाऱ्या माणसापेक्षा वाईट आहे.” (१ तीमथ्य ५:८) परंतु हे कर्तव्य ख्रिस्ती पुरुषाला ओझे वाटते का? तो आपल्या कुटुंबावर प्रेम करत असल्यास नाही, कारण त्या बाबतीत तो त्यांची तरतूद करू इच्छितो.
५. प्रचाराचे व शिष्य बनवण्याचे कार्य हे कर्तव्य असले तरी त्यात सहभाग घेण्यास आपल्याला आनंद का वाटला पाहिजे?
५ त्याचप्रकारे, प्रचाराचे आणि शिष्य बनवण्याचे कार्य एक कर्तव्य, एक अपेक्षा आहे ज्यावर आपले जीवन निर्भर आहे. त्याच्याबद्दल पौलाने असे म्हटले: “मला ती सांगणे भाग आहे; कारण मी सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार!” (१ करिंथकर ९:१६; पडताळा यहेज्केल ३३:७-९.) परंतु, निव्वळ जबाबदारी नव्हे तर प्रेम हा प्रचारामागचा आपला हेतू आहे. सर्वप्रथम आपण देवावर प्रेम करतो, पण त्यासोबत आपण आपल्या शेजाऱ्यांवरही प्रेम करतो आणि त्यांनी सुवार्ता ऐकावी हे किती महत्त्वपूर्ण आहे ते आपल्याला ठाऊक आहे. (मत्तय २२:३७-३९) सुवार्ता ऐकल्यामुळे त्यांना भवितव्यात एक आशा मिळते. देवाचे राज्य लवकरच अन्यायाला काढून टाकणार आहे, सर्व जुलूमांना काढून टाकणार आहे व शांती आणि ऐक्य पुन्हा स्थापणार आहे—यामुळे राज्याच्या धार्मिक शासनाच्या अधीन होणाऱ्या सर्वांना हा सार्वकालिक आशीर्वाद मिळेल. अशा प्रकारची सुवार्ता इतरांना सांगण्यास आपल्याला आनंद, होय रोमहर्षक वाटत नाही का?—स्तोत्र ११०:३.
६. प्रचाराचे व शिष्य बनवण्याचे कार्य खरोखर एक आव्हान का आहे?
६ यासोबतच, हे प्रचाराचे आणि शिष्य बनवण्याचे कार्य आपल्यासमोर एक आव्हान मांडते. लोकांमध्ये विविधता आहे. सर्वांच्या आवडीनिवडी किंवा क्षमता सारख्याच नसतात. काही जण सुशिक्षित असतात तर काहींचे फारसे शिक्षण झालेले नसते. पूर्वी विरंगुळा समजल्या जाणाऱ्या वाचनाकडे आता बहुधा एका कामाप्रमाणे पाहिले जाते. “वाचावयास येणे पण तसे करण्यास रस न बाळगण्याचा गुण अथवा अवस्था” अशी व्याख्या असलेल्या असाक्षरतेची समस्या, उच्च साक्षरतेचे प्रमाण असल्याची घमेंड मिरवणाऱ्या राष्ट्रांमध्येसुद्धा वाढती समस्या बनली आहे. मग, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या व आवड बाळगणाऱ्या लोकांना देव काय अपेक्षितो हे शिकण्यास आपण कशी मदत करू शकतो?—पडताळा १ करिंथकर ९:२०-२३.
इतरांना मदत करण्यास योग्यप्रकारे सुसज्ज
७. ‘विश्वासू आणि बुद्धिमान दासाने’ इतरांना देवाच्या अपेक्षा शिकवण्यास मदत करण्यासाठी आपल्याला कसे सुसज्ज केले आहे?
७ तुमच्याकडे योग्य साधन किंवा सामग्री असल्यास कोणतेही आव्हानात्मक कार्य पार पाडणे सोपे जाते. एखाद्या विशिष्ट कामासाठी आज उचित असलेल्या एखाद्या साधनात फेरबदल होऊ शकतात किंवा बदलत्या गरजांमुळे उद्या त्याच्याऐवजी दुसरे साधन वापरावे लागेल. देवाच्या राज्याच्या संदेशाची घोषणा करण्याविषयी आपल्याला दिलेल्या कामगिरीच्या बाबतीत असेच आहे. अनेक वर्षांपासून, ‘विश्वासू आणि बुद्धिमान दासाने’ आपल्याला उचित साधने अर्थात, गृह बायबल अभ्यासांमध्ये वापरण्यासाठी खास तयार केलेली प्रकाशने दिली आहेत. (मत्तय २४:४५) अशा प्रकारे आपण, “सर्व राष्ट्रे, वंश . . . निरनिराळ्या भाषा” बोलणाऱ्या लोकांना देवाच्या अपेक्षांविषयी शिकण्यास मदत करण्यासाठी सुसज्ज आहोत. (प्रकटीकरण ७:९) मधूनमधून, जगाच्या क्षेत्रातील बदलत्या गरजांच्या बरोबरीने राहण्यास आणखी साधने पुरवण्यात आली आहेत. काही उदाहरणांचा आपण विचार करू या.
८. (अ) बायबलचे शिक्षण वाढवण्यात “देव सत्य होवो” पुस्तकाची भूमिका काय होती? (ब) सन १९६८ मध्ये बायबल अभ्यास कार्याकरता कोणते साधन पुरवण्यात आले व ते कशाप्रकारे खास रचण्यात आले होते? (क) सत्य पुस्तकाच्या साधनाने कशाप्रकारे शिष्य बनवण्याच्या कार्याला साहाय्य केले?
८ सन १९४६ ते १९६८ पर्यंत, “देव सत्य होवो” प्रकाशन, बायबलचे शिक्षण देण्याकरता शक्तिशाली उपकरण म्हणून वापरण्यात आले आणि ५४ भाषांमध्ये त्याच्या सुमारे १,९२,५०,००० प्रती प्रकाशित करण्यात आल्या होत्या. सन १९६८ मध्ये प्रकाशित झालेले सत्य जे चिरकालिक जीवनाप्रत निरविते पुस्तक आस्थेवाईक लोकांबरोबर बायबलचा अभ्यास करण्यासाठी अनेक वर्षे प्रभावीपणे वापरण्यात आले. पूर्वी, काहींना बाप्तिस्मा न घेता यहोवाच्या साक्षीदारांसोबत वर्षानुवर्षे अभ्यास करत राहणे सामान्य गोष्ट होती. पण हे उपकरण विद्यार्थ्याला अभ्यासात गोवण्यास, तो जे काही शिकत होता त्याचा अवलंब करण्यास त्याला उत्तेजन देण्यासाठी तयार करण्यात आले होते. याचा परिणाम? यहोवाचे साक्षीदार—देवाच्या राज्याचे उद्घोषक (इंग्रजी), पुस्तक म्हणते: “सप्टेंबर १, १९६८ पासून ऑगस्ट ३१, १९७१ पर्यंतच्या तीन सेवा वर्षांदरम्यान एकूण ४,३४,९०६ जणांचा बाप्तिस्मा झाला—गत तीन सेवा वर्षांदरम्यान बाप्तिस्मा घेतलेल्यांच्या संख्येच्या दुप्पट संख्येपेक्षा अधिक!” सत्य पुस्तकाचे प्रकाशन झाल्यापासून त्याचे ११७ भाषांमध्ये १०,७०,००,००० पेक्षा अधिक प्रतींचे उल्लेखनीय वितरण झाले आहे.
९. अनंतकाल जगू शकाल पुस्तकाचे खास वैशिष्ट्य काय आहे व राज्य उद्घोषकांच्या संख्येवर याचा कोणता प्रभाव पडला?
९ सन १९८२ मध्ये, तुम्ही पृथ्वीवरील नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक बायबल अभ्यास चालवण्यात प्रमुख पुस्तक बनले. या साधनात १५० पेक्षा अधिक उठावदार चित्रे आहेत व सोबत चित्रांचा शिकवण्याचा मुद्दा संक्षिप्तपणे ठळक करणारे अर्थपूर्ण मथळे आहेत. आमची राज्य सेवा ऑक्टोबर १९८२ च्या अंकाने म्हटले: “‘देव सत्य होवो’ हे आपले अभ्यासाचे प्रमुख पुस्तक होते त्या सुमारे २० वर्षांदरम्यान (१९४६ पासून १९६० दशकाच्या मध्यापर्यंत), १०,००,००० पेक्षा अधिक नवीन राज्य उद्घोषकांची आपल्या संघटनेत भर पडली. मग, सत्य जे चिरकालिक जीवनाप्रत निरविते पुस्तक १९६८ मध्ये प्रकाशित झाल्यानंतर ते अभ्यासाचे प्रमुख पुस्तक बनले तेव्हा आणखी १०,००,००० प्रचारक वाढले. तुम्ही पृथ्वीवरील नंदनवनात अनंतकाल जगू शकाल या अभ्यासाच्या नवीन पुस्तकाचा वापर केल्यानंतर, राज्य प्रचारकांच्या संख्येत अशाच प्रकारची वृद्धी आपल्याला पाहायला मिळेल का? यहोवाची इच्छा असल्यास निश्चितच!” ती यहोवाची इच्छा होती यात काही शंका नाही, कारण १९८२ पासून १९९५ पर्यंत, २७,००,००० पेक्षा अधिक जणांची राज्य उद्घोषकांच्या संख्येत भर पडली!
१०. सन १९९५ मध्ये कोणते नवीन उपकरण पुरवण्यात आले, आणि त्यामुळे बायबल विद्यार्थ्यांना साधारण जलद आध्यात्मिक प्रगती करण्यास का शक्य झाले पाहिजे?
१० “पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत,” असे येशू म्हणाला. (मत्तय ९:३७) पीक खरोखरच खूप आहे. पुष्कळ काम अद्याप बाकी आहे. काही देशांमध्ये लोकांना बायबल अभ्यासासाठी प्रतीक्षा यादीत आपले नाव नोंदवावे लागते. यास्तव, देवाच्या ज्ञानाचा प्रचार जलद गतीने व्हावा या हेतुने, १९९५ मध्ये ‘विश्वासू आणि बुद्धिमान दासाने,’ एक नवीन साधन, सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान हे शीर्षक असलेले १९२ पानी पुस्तक पुरवले आहे. हे मौल्यवान उपकरण खोट्या शिकवणींची सविस्तर माहिती देत नाही. ते सकारात्मक पद्धतीने बायबल सत्य मांडते. ते बायबल विद्यार्थ्यांना तुलनात्मकरीत्या जलद आध्यात्मिक प्रगती करण्यास साहाय्य करील अशी आशा केली जाते. ज्ञान पुस्तकाने आधीच, १२५ भाषांमध्ये ४,५५,००,००० प्रतींमुळे तसेच आणखी २१ भाषांमध्ये त्याचा अनुवाद सध्या चालू असल्यामुळे जागतिक क्षेत्रावर आधीच आपली छाप पाडली आहे.
११. निरक्षर असलेल्यांना किंवा ज्यांना चांगल्याप्रकारे वाचता येत नाही अशांना शिकवण्यास मदत करण्यासाठी कोणते प्रभावी उपकरण पुरवण्यात आले व त्यामुळे आपल्या विश्वव्यापी शैक्षणिक कार्यक्रमाला कशाप्रकारे जबरदस्त हातभार लागला?
११ ‘विश्वासू दासाने’ वेळोवेळी विशिष्ट अथवा मर्यादित श्रोत्यांसाठी बनवलेली उपकरणे पुरवली आहेत. जसे की, ज्या लोकांना त्यांच्या संस्कृती वा धार्मिक पार्श्वभूमीमुळे खास मदतीची आवश्यकता असेल अशा लोकांबद्दल काय? देवाच्या अपेक्षा शिकण्यास आपण त्यांना कशाप्रकारे साहाय्य करू शकू? १९८२ मध्ये आपल्याला ज्याची गरज होती नेमके तेच अर्थात, भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा! हे ३२ पानाचे माहितीपत्रक मिळाले. हे सचित्र प्रकाशन, निरक्षरांना किंवा ज्यांना चांगल्याप्रकारे वाचता येत नाही अशांना शिकवण्यासाठी प्रभावी उपकरण ठरले आहे. त्यामध्ये मूलभूत शास्त्रवचनीय शिकवणुकी अगदी सरळ सोप्या भाषेत सादर केल्या आहेत. जीवनाचा आनंद हे माहितीपत्रक प्रकाशित झाल्यापासून आपल्या विश्वव्यापी शैक्षणिक कार्यक्रमाला जबरदस्त हातभार लागला आहे. २३९ भाषांमध्ये सुमारे १०,५१,००,००० पेक्षा अधिक प्रती छापण्यात आल्या आहेत यामुळे, आजपर्यंत वॉच टावर संस्थेने प्रकाशित केलेल्या प्रकाशनांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात भाषांतरित केलेले हे प्रकाशन ठरले आहे!
१२, १३. (अ) सन १९९० पासून, ‘विश्वासू दासाने’ दूरदूरच्या श्रोत्यांपर्यंत पोहंचण्यासाठी आणखी कोणता एक नवीन मार्ग दाखवला आहे? (ब) संस्थेच्या व्हिडिओंचा वापर आपण आपल्या क्षेत्र सेवेत कसा करू शकतो? (क) आपल्या शिष्य बनवण्याच्या कार्याला साहाय्य मिळावे म्हणून अलीकडेच कोणते नवीन उपकरण पुरवण्यात आले?
१२ छापील प्रकाशनांसोबत ‘विश्वासू दासाने’ १९९० पासून दूरदूरच्या श्रोत्यांपर्यंत पोहंचण्याचा व प्रशिक्षण देण्याचा आणखी एक मार्ग दाखवला आहे अर्थात, व्हिडिओकॅसेट्स. त्या वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात, वॉच टावर संस्थेने निर्माण केलेला पहिला व्हिडिओ—जेहोवाज विटनेसस—द ऑर्गनायझेशन बिहाईन्ड द नेम हा ५५ मिनिटांचा व्हिडिओ प्रकाशित झाला. ३५ भाषांमध्ये उपलब्ध असलेली ती मोहक, माहितीपूर्ण प्रस्तूती, संपूर्ण पृथ्वीवर सुवार्तेचा प्रचार करण्याबाबत येशूने दिलेल्या आज्ञेची पूर्णता करणाऱ्या यहोवाच्या भक्तिमान लोकांची जगव्याप्त संघटनेचे दर्शन घडवते. हा व्हिडिओ खासकरून शिष्य बनवण्याच्या कार्यात आपल्याला साहाय्य देण्याकरता रचलेला आहे. राज्य प्रकाशकांनी वेळ न दवडता क्षेत्र सेवेत या नवीन उपकरणाचा उपयोग केला. काहींनी ते आपल्या बॅगमध्ये नेले आणि आस्थेवाईक लोकांना ते दाखवण्यास वा देण्यास ते तत्पर होते. त्याचे प्रकाशन झाल्यानंतर काही काळतच, एका प्रवासी पर्यवेक्षकांनी लिहिले: “व्हिडिओ, लाखो लोकांच्या मनांपर्यंत व अंतःकरणांपर्यंत पोहंचण्यासाठी या २१ शतकाचे एक साधन बनले आहेत तेव्हा, आमची आशा आहे की हा व्हिडिओ, जगव्याप्त राज्य कार्याच्या वृद्धीकरता संस्था जितके व्हिडिओ निर्माण करील त्यांपैकी सर्वात पहिला असेल.” होय, आणखी व्हिडिओ पुरवण्यात आले ज्यामध्ये द बायबल—अ बुक ऑफ फॅक्ट ॲण्ड प्रॉफसी या तीन भागांच्या शृंखलेचा आणि जेहोवाज विटनेसस स्टॅण्ड फर्म अगेन्स्ट नात्सी असॉल्ट यांचा समावेश आहे. संस्थेचे व्हिडिओ तुमच्या भाषांमध्ये उपलब्ध असल्यास तुमच्या क्षेत्र सेवेत तुम्ही त्यांचा उपयोग केला आहे का?a
१३ अलीकडेच एक नवीन उपकरण, देव आपल्याकडून काय अपेक्षितो? माहितीपत्रक, शिष्य बनवण्याच्या कार्यात आपल्या साहाय्याकरता देण्यात आले. ते का प्रकाशित करण्यात आले? त्याचा उपयोग कसा केला जाऊ शकतो?
नवीन उपकरणाचे परीक्षण
१४, १५. अपेक्षा माहितीपत्रक कोणाकरता रचण्यात आले आहे व त्यामध्ये काय आहे?
१४ देव आपल्याकडून काय अपेक्षितो? हे नवीन प्रकाशन देवावर विश्वास करणाऱ्या व बायबलचा आदर करणाऱ्या लोकांकरता बनवण्यात आले आहे. प्रवासी पर्यवेक्षकांनी तसेच विकसनशील देशांमध्ये अनेक वर्षांचा अनुभव असलेल्या गिलियड प्रशिक्षित मिशनऱ्यांनी या माहितीपत्रकाच्या तयारीत मदत केली आहे. त्यामध्ये, बायबलच्या मूलभूत शिकवणुकींचा बहुसमावेशक अभ्यासक्रम आहे. त्यातील शब्दरचना अतिशय प्रेमळ, सोपी व थेट आहे. तथापि, त्यातील प्रबंधरचना निम्न प्रतीची नाही. ते देवाच्या वचनातील केवळ ‘दूधच’ नव्हे तर, बहुतेक लोकांना समजेल अशाप्रकारे ‘जड अन्नही’ सादर करते.—इब्री लोकांस ५:१२-१४.
१५ अलीकडील वर्षांमध्ये, विविध देशांतील राज्य प्रकाशकांनी अगदी अशाच प्रकारच्या प्रकाशनाची मागणी केली आहे. उदाहरणार्थ, पापुआ न्यू गिनीतील वॉच टावर संस्थेच्या शाखा दफ्तराने लिहिले: “परस्परविरोधी धार्मिक शिकवणुकींमुळे लोक बुचकळ्यात पडले आहेत. त्यांना, अनेक बायबल वचनांचा पाठपुरावा असलेली सत्याची संक्षिप्त विधाने हवीत, जेणेकरून ते आपल्या बायबलमधून ती उघडून पाहू शकतील. त्यांना, देव खऱ्या ख्रिश्चनांकडून कशाची अपेक्षा करतो व कोणत्या रुढी व प्रथा त्याला स्वीकारयोग्य नाहीत यांची स्पष्ट आणि विशिष्ट प्रकारची प्रस्तूती हवी आहे.” अशा लोकांना देवाच्या अपेक्षा शिकण्यास मदत करण्यासाठी अपेक्षा माहितीपत्रक आपल्याला हवे असणारे अगदी उचित साहाय्य आहे.
१६. (अ) नवीन माहितीपत्रकातील सोप्या स्पष्टीकरणाचा लाभ विशेषकरून कोणाला होऊ शकतो? (ब) तुमच्या क्षेत्रातील लोकांना कदाचित अपेक्षा माहितीपत्रकाचा लाभ कसा होईल?
१६ तुम्ही या नवीन साधनाचा उपयोग कसा करू शकाल? सर्वप्रथम, ज्यांना नीट वाचता येत नाही किंवा वाचण्याची प्रवृत्ती नसलेल्या लोकांबरोबर त्याचा अभ्यास करण्यासाठी त्याचा उपयोग केला जाऊ शकतो.b अशा लोकांना माहितीपत्रकातील सोप्या स्पष्टीकरणांचा लाभ होऊ शकतो. या प्रकाशनाच्या आगाऊ प्रतीची उजळणी केल्यावर, वॉच टावर शाखांनी पुढील प्रमाणे लिहिले: “या देशात, जेथे लोक जास्त वाचन करत नाहीत अशा पुष्कळ भागांत हे माहितीपत्रक अतिशय उपयोगी ठरेल.” (ब्राझील) “येथे असे अनेक आप्रवासी आहेत ज्यांना स्वतःची राष्ट्रभाषा वाचता येत नाही आणि फ्रेन्च देखील नीट वाचता येत नाही. अशा लोकांबरोबर अभ्यास करण्यासाठी साहाय्य म्हणून या माहितीपत्रकाचा उपयोग केला जाऊ शकतो.” (फ्रान्स) अपेक्षा माहितीपत्रकातून लाभ मिळवू शकणाऱ्या तुमच्या क्षेत्रातील लोकांचा तुम्ही विचार करू शकता का?
१७. हे नवीन माहितीपत्रक कशाप्रकारे अनेक देशांमध्ये उपयोगी ठरू शकते व का?
१७ दुसरे, अनेक देशांमध्ये देवभीरू लोकांबरोबर, मग ते कितीही शिकलेले असोत, बायबलचा अभ्यास चालू करण्यासाठी हे माहितीपत्रक उपयोगी ठरू शकते. अर्थात, सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान पुस्तकाचा अभ्यास चालू करण्यासाठी प्रयत्न केलेच पाहिजेत. पण काही प्रसंगी, माहितीपत्रकातून अभ्यास चालू करणे सोपे असू शकते. मग उचित समयी तो अभ्यास, आपले प्रमुख व आपण अधिक पसंत करतो त्या अभ्यास साधनातून म्हणजे ज्ञान पुस्तकातून घेतला जाऊ शकतो. अपेक्षा माहितीपत्रकाच्या या उपयोगाविषयी वॉच टावर शाखांनी लिहिले: “बायबल अभ्यास चालू करणे कठीण आहे, पण प्रकाशक जेव्हा माहितीपत्रकाने सुरवात करतात तेव्हा अभ्यास चालू करण्याच्या संधी उत्तम असतात.” (जर्मनी) “या प्रकारचे माहितीपत्रक नवीन बायबल अभ्यास चालू करण्यात अधिक प्रभावकारी ठरेल आणि नंतर मग ज्ञान पुस्तकातून अभ्यास घेतले जाऊ शकतात.” (इटली) “जपानी लोक उच्च शिक्षित असले तरीसुद्धा, बहुतेकांना बायबल आणि त्याच्या मूलभूत शिकवणुकींचे सीमित ज्ञान आहे. हे माहितीपत्रक ज्ञान पुस्तकासाठी उत्तम पूर्वाधार ठरले पाहिजे.”—जपान.
१८. देवाच्या अपेक्षा पूर्ण करण्याबाबत आपण काय ध्यानात ठेवावे?
१८ संस्थेच्या संपूर्ण जगभरातील शाखांनी या माहितीपत्रकाची मागणी केली व २२१ भाषांमध्ये त्याचा अनुवाद करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. हे नवीन प्रकाशन, यहोवा देव इतरांकडून काय अपेक्षितो हे त्यांना शिकवण्यास आपल्याला मदत करण्यात मौल्यवान ठरो. आपण हे ध्यानात ठेवू या, की देवाच्या अपेक्षा पूर्ण करणे तसेच प्रचार व शिष्य बनवण्याची आज्ञा, आपण यहोवावर किती प्रेम करतो ते प्रदर्शित करण्याकरता आपल्याला एक अमूल्य संधी देते. होय, देव आपल्याकडून जे अपेक्षितो ते कठीण नाही. तो जगण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे!—स्तोत्र १९:७-११.
[तळटीपा]
a यहोवाचे साक्षीदार—देवाच्या राज्याचे उद्घोषक (इंग्रजी), पुस्तक म्हणते: “व्हिडिओकॅसेट्स, छापील साहित्यांची किंवा व्यक्तिगत साक्षीकार्याची मुळीच जागा घेत नाहीत. संस्थेची प्रकाशने सुवार्तेचा प्रसार अजूनही पूर्वीसारखीच महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. यहोवाच्या साक्षीदारांचे घरोघरचे कार्य, त्यांच्या सेवेचा ठोस आधारित शास्त्रवचनीय पैलू राहतो. परंतु, यहोवाच्या मौल्यवान अभिवचनांबद्दल विश्वास विकसित करण्याकरता व आपल्या दिवसांमध्ये पृथ्वीवर तो करवून घेत असलेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यास प्रेरणा देण्याकरता व्हिडिओकॅसेट्सवरील गोष्टींसाठी किंमती उपकरणे म्हणून सहायक ठरल्या आहेत.”
b अपेक्षा माहितीपत्रकातून अभ्यास कसा घ्यावा त्याच्या स्पष्टीकरणासाठी, पृष्ठे १६-१७ वरील “देवाच्या अपेक्षा शिकण्यास लोकांना मदत करणारे नवीन साधन” लेख पाहा.
तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकता का?
◻ आपल्या सेवकांनी कोणत्या दुहेरी कार्यात सहभाग घ्यावा असे यहोवा अपेक्षितो?
◻ प्रचाराचे व शिष्य बनवण्याचे आपले कर्तव्य आपल्याला कठीण का वाटत नाही?
◻ ‘विश्वासू आणि बुद्धिमान दासाने’ प्रचार करण्याच्या व शिष्य बनवण्याच्या कार्यात उपयोगात आणण्याकरता कोणती उपकरणे आपल्याला दिली आहेत?
◻ अपेक्षा माहितीपत्रक कोणाकरता बनवण्यात आले आहे व आपल्या सेवेत आपण त्याचा उपयोग कसा करू शकतो?
[२४ पानांवरील चित्र]
आपले प्रचाराचे व शिष्य बनवण्याचे कार्य कठीण नाही
[२६ पानांवरील चित्रं]
“देव सत्य होवो” (१९४६, सुधारित आवृत्ती १९५२): ५४ भाषांमध्ये १,९२,५०,००० प्रती (इंग्रजी प्रत दाखवली आहे)
“सत्य जे चिरकालिक जीवनाप्रत निरविते” (१९६८): ११७ भाषांमध्ये १०,७०,००,००० प्रती (फ्रेन्च प्रत दाखवली आहे)
“तुम्ही पृथ्वीवरील नंदनवनात अनंतकाल जगू शकाल” (१९८२): १३० भाषांमध्ये ८,०९,००,००० प्रती (रशियन प्रत दाखवली आहे)
“सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान” (१९९५): १२५ भाषांमध्ये ४,५५,००,००० प्रती (जर्मन प्रत दाखवली आहे)