देव आपल्याकडून काय अपेक्षितो?
“देवावर प्रीति करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.”—१ योहान ५:३.
१, २. देवाची उपासना स्वीकारयोग्य पद्धतीने करणाऱ्यांसाठी त्याच्या काही अपेक्षा आहेत हे आश्यर्च करण्याजोगे का नाही?
“मी माझ्या धर्मात संतुष्ट आहे!” पुष्कळ लोक असे म्हणत नाहीत का? परंतु, “माझा धर्म देवाला संतुष्ट करतो का?” हा प्रश्न विचारणे महत्त्वाचा आहे. होय, देवाची उपासना स्वीकारयोग्य पद्धतीने करणाऱ्यांकडून त्याच्या काही अपेक्षा आहेत. यामुळे आपण चकीत व्हावे का? नाही. समजा तुमच्या मालकीचे एक सुंदर घर आहे व अलीकडेच तुम्ही बराच पैसा खर्च करून त्याची डागडुजी केली. तुम्ही तेथे कोणालाही राहण्याची परवानगी द्याल का? मुळीच नाही! जो कोणी भाडेकरू तुमच्या घरात राहील त्याला तुमच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील.
२ तसेच, यहोवा देवाने मानवी कुटुंबाला राहण्याकरता हे पृथ्वीरूपी घर दिले आहे. आपल्या राज्य शासनाखाली या पृथ्वीची लवकरच “डागडुजी,” म्हणजे सुंदर परादीसमध्ये तिचे रूपांतर करण्यात येणार आहे. यहोवा ते करणार आहे. बरीच किंमत मोजून हे शक्य होण्यासाठी त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. निश्चितच मग, तेथे राहणाऱ्यांकडून देवाच्याही काही अपेक्षा असतीलच!—स्तोत्र ११५:१६; मत्तय ६:९, १०; योहान ३:१६.
३. देव आपल्याकडून काय अपेक्षितो त्याचा सारांश शलमोनाने कसा दिला?
३ देवाच्या अपेक्षा कोणत्या आहेत हे आपल्याला कसे समजेल? यहोवा आपल्याकडून काय अपेक्षितो त्याचा सारांश देण्यासाठी त्याने राजा शलमोनाला प्रेरित केले. त्याने ज्या ज्या गोष्टी मिळवल्या त्या त्या गोष्टींवर तसेच मालमत्ता, बांधकामाचे साहित्य, संगीतातील अभिरुची आणि प्रणय यांच्यावर मनन केल्यानंतर हे जाणले: “सर्व काही तुम्ही ऐकले; सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे.” (तिरपे वळण आमचे.)—उपदेशक १२:१३.
“त्याच्या आज्ञा कठीण नाहीत”
४-६. (अ) “कठीण” या भाषांतरित केलेल्या ग्रीक शब्दाचा शब्दशः अर्थ काय आहे? (ब) देवाच्या आज्ञा कठीण नाहीत असे आपण का म्हणू शकतो?
४ “त्याच्या आज्ञा पाळ.” मूलतः, देव आपल्याकडून याचीच अपेक्षा करतो. त्याने आपल्याकडून फार अपेक्षिले आहे का? मुळीच नाही. प्रेषित योहान आपल्याला देवाच्या आज्ञांविषयी अथवा अपेक्षांविषयी काहीतरी अतिशय सांत्वनदायक सांगतो. त्याने लिहिले: “देवावर प्रीति करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.” (तिरपे वळण आमचे.)—१ योहान ५:३.
५ “कठीण” या भाषांतरीत केलेल्या ग्रीक शब्दाचा शब्दशः अर्थ “भारी” असा होतो. च्या नुसार जगणे अथवा पूर्ण करण्यास अतिशय कठीण, अशा कशाला तरी ते सूचित करू शकते. मत्तय २३:४ मध्ये, शास्त्री आणि परुशांनी लोकांवर लादलेली “ओझी” अर्थात मानव निर्मित नियम व परंपरा यांचे वर्णन करण्यासाठी त्याचा वापर करण्यात आला आहे. वृद्ध प्रेषित योहान काय निष्कर्ष काढतो त्याचे तुम्हाला आकलन होते का? देवाच्या आज्ञा भारी नाहीत; किंवा त्यांचे पालन करण्यासही अतिशय कठीण नाहीत. (पडताळा अनुवाद ३०:११.) याउलट, आपण देवावर प्रेम करतो तेव्हा त्याच्या अपेक्षा पूर्ण केल्याने आपल्याला आनंद मिळतो. यहोवाठायी आपली प्रीती प्रदर्शित करण्याची बहुमूल्य संधी ते आपल्याला देते.
६ देवाठायी आपली प्रीती दाखवण्यासाठी, तो आपल्याकडून नक्की काय अपेक्षितो हे जाणणे जरूरीचे आहे. चला आपण आता देवाच्या पाच अपेक्षांची चर्चा करू या. असे करताना, योहानाने जे लिहिले ते ध्यानात ठेवा, की ‘देवाच्या आज्ञा कठीण नाहीत.’
देवाचे ज्ञान घेणे
७. आपले तारण कशावर निर्भर आहे?
७ पहिली अपेक्षा देवाचे ज्ञान घेणे ही आहे. योहानाच्या १७ व्या अध्यायातील [NW], येशूच्या शब्दांचा विचार करा. मानव या नात्याने येशूच्या जीवनाच्या शेवटल्या रात्रीचे ते दृश्य आहे. येशूने संध्याकाळचा बराच वेळ आपल्या शिष्यांना त्याच्या प्रस्थानासाठी तयार करण्यात घालवला होता. त्याला त्यांच्या भवितव्याची, त्यांच्या सार्वकालिक भवितव्याची काळजी लागली होती. स्वर्गाकडे पाहून त्याने त्यांच्यासाठी प्रार्थना केली. ३ ऱ्या वचनात आपण वाचतो: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुझे व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताचे त्यांनी ज्ञान घ्यावे.” होय, त्यांचे तारण देव आणि ख्रिस्त या दोघांचे ‘ज्ञान घेण्यावर’ अवलंबून होते. हे आपल्यालाही लागू होते. तारण मिळवण्यासाठी आपणही ते ज्ञान घेतले पाहिजे.
८. ‘देवाचे ज्ञान घेणे’ याचा अर्थ काय?
८ ‘देवाचे ज्ञान घेणे’ याचा अर्थ काय होतो? ‘ज्ञान घेणे’ असा अनुवादित केलेला ग्रीक शब्द “ओळखणे, जाणणे” किंवा “पूर्णपणे समजणे” याला सूचित करतो. तसेच, ‘ज्ञान घेणे’ हा अनुवाद एका चालू क्रियेला सूचित करतो याची देखील नोंद घ्या. तेव्हा, देवाचे ज्ञान घेणे म्हणजे त्याला केवळ वरवरून नव्हे तर जवळून ओळखणे, त्याच्याबरोबर जिवाभावाची मैत्री विकसित करणे. देवासोबत कायमचा नातेसंबंध ठेवल्याने त्याच्याविषयीचे प्रवृद्ध ज्ञान मिळत राहते. ही क्रिया कायम राहू शकते, कारण यहोवाविषयी सर्वच आपण कधीही शिकू शकणार नाही.—रोमकर ११:३३.
९. सृष्टीच्या पुस्तकातून आपण यहोवाविषयी काय शिकू शकतो?
९ आपण देवाचे ज्ञान कसे घेतो? आपली मदत करणारी दोन पुस्तके आहेत. एक सृष्टीचे पुस्तक आहे. यहोवाने निर्माण केलेल्या गोष्टी—सजीव आणि निर्जीव दोन्ही—तो कशाप्रकारचा व्यक्ती आहे यांची समज देतात. (रोमकर १:२०) काही उदाहरणांचा विचार करा. अवाढव्य झऱ्याची गर्जना, वादळाच्या वेळी लाटांचे एकमेकांवर आपटणे, निरभ्र रात्री आकाशातील चांदण्यांचे दृश्य—या गोष्टी, यहोवा देव “महासमर्थ” असल्याचे आपल्याला शिकवत नाहीत का? (यशया ४०:२६) एखादे मूल, कुत्र्याच्या पिल्लाला आपलीच शेपटी पकडताना किंवा मांजराच्या पिल्लाला लोकरीच्या गोळ्याबरोबर खेळताना पाहून खदखदून हसते तेव्हा यहोवा, ‘आनंदी देव’ आहे, त्याला विनोदबुद्धी आहे हे यावरून सूचित होत नाही का? (१ तीमथ्य १:११) स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद, कुरणातील फुलांचा दरवळ, नाजूक फुलपाखराचे उठावदार रंग, वसंत ऋतूत पक्ष्यांचे मंजूळ गाणे, एखाद्या प्रिय व्यक्तीचा प्रेमळ स्पर्श—या सर्व गोष्टींवरून, आपला सृष्टीकर्ता आपण जीवनाचा आनंद लुटावा असे इच्छिणारा प्रेमळ देव असल्याचे समजून येत नाही का?—१ योहान ४:८.
१०, ११. (अ) सृष्टीच्या पुस्तकातून आपण यहोवा आणि त्याचे उद्देश यांविषयी कोणत्या गोष्टी शिकू शकत नाही? (ब) कोणत्या प्रश्नांची उत्तरे केवळ बायबलमध्ये सापडतात?
१० परंतु, सृष्टीच्या पुस्तकातून आपण यहोवाविषयी सर्वच काही शिकू शकत नाही. उदाहरणार्थ, देवाचे नाव काय आहे? त्याने पृथ्वीची निर्मिती करून त्यात मानवजातीला का ठेवले? देव दुष्टाईला अनुमती का देतो? भवितव्यात आपल्यासाठी काय राखून ठेवले आहे? अशा प्रश्नांच्या उत्तरासाठी आपण देवाचे ज्ञान प्रदान करणारे दुसरे पुस्तक—बायबल पाहिले पाहिजे. त्यामध्ये, यहोवा स्वतःविषयी आणि त्याचे नाव, व्यक्तिमत्त्व व उद्देश यांबद्दलची माहिती प्रकट करतो. ही माहिती आपण इतर कोणत्याही उगमाकडून प्राप्त करू शकत नाही.—निर्गम ३४:६, ७; स्तोत्र ८३:१८; आमोस ३:७.
११ यहोवा, आपण ज्यांच्याविषयी माहिती करून घेतली पाहिजे अशांबद्दलचे महत्त्वपूर्ण ज्ञानही शास्त्रवचनांमध्ये प्रदान करतो. जसे की, येशू ख्रिस्त कोण आहे आणि यहोवाचे उद्देश पूर्ण करण्यामध्ये त्याची काय भूमिका आहे? (प्रेषितांची कृत्ये ४:१२) दियाबल सैतान कोण आहे? कोणत्या मार्गांनी तो लोकांची दिशाभूल करतो? त्याच्याद्वारे आपली दिशाभूल होण्याचे आपण कसे टाळू शकतो? (१ पेत्र ५:८) या प्रश्नांची जीवनरक्षक उत्तरे फक्त बायबलमध्ये आढळतात.
१२. देवाचे आणि त्याच्या उद्देशाबद्दलचे ज्ञान घेणे कठीण नाही याचे स्पष्टीकरण तुम्ही कसे द्याल?
१२ देव आणि त्याच्या उद्देशांचे अशाप्रकारचे ज्ञान घेणे कठीण आहे का? मुळीच नाही! देवाचे नाव यहोवा आहे, त्याचे राज्य पृथ्वीवर परादीसची पुनःस्थापना करील, आपल्या पापांकरता खंडणी म्हणून त्याने आपला प्रिय पुत्र दिला आणि असेच इतर मौल्यवान सत्य तुम्ही पहिल्यांदा शिकलात तेव्हा तुम्हाला कसे वाटले होते ते तुम्हाला आठवते का? अजाणतेचा पडदा बाजूला सारून पहिल्यांदा सर्व गोष्टी इतक्या स्पष्टपणे दिसत आहेत असे तुम्हाला वाटले नव्हते का? देवाचे ज्ञान घेणे कठीण नाही. उलटपक्षी, ते आल्हाददायक आहे!—स्तोत्र १:१-३; ११९:९७.
देवाच्या दर्जांनुरुप जगणे
१३, १४. (अ) देवाचे ज्ञान घेतो तेव्हा आपल्या जीवनात आपल्याला कोणते बदल करावे लागतात? (ब) कोणत्या अशुद्ध प्रथांपासून आपण दूर राहावे असे देव अपेक्षितो?
१३ देवाचे ज्ञान घेत असताना, आपल्याला आपल्या जीवनात बदल करणे आवश्यक आहे हे लगेचच कळून येते. यावरून दुसरी अपेक्षा दिसून येते, की आपण उचित वर्तनासाठी देवाच्या दर्जांनुरुप जगले पाहिजे व त्याच्या सत्याचा स्वीकार केला पाहिजे. सत्य काय आहे? आपण कोणता विश्वास बाळगतो व काय करतो हे देवाला खरोखरच महत्त्वाचे वाटते का? आज पुष्कळ लोक याचा विचार करत नाहीत, हे स्पष्ट आहे. १९९५ मध्ये चर्च ऑफ इंग्लंडने प्रकाशित केलेल्या एका अहवालाने असे सुचवले, की विवाहाविना एकत्र राहण्याला पाप समजू नये. “‘पापात जगणे’ ही संज्ञा निषेधार्थ आहे व फायदेकारक नाही,” असे एका चर्च बिशपने म्हटले.
१४ म्हणजे, “पापात जगणे” पाप नाही? अशा प्रकारच्या वर्तनाबद्दल यहोवाला कसे वाटते ते तो ठाम शब्दांमध्ये आपल्याला सांगतो. त्याचे वचन, बायबल म्हणते: “लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व अंथरूण निर्दोष असावे; जारकर्मी व व्यभिचारी ह्यांचा न्याय देव करील.” (इब्री लोकांस १३:४) मुक्त विचारसरणी असलेल्या पाळकांच्या व चर्चला जाणाऱ्यांच्या दृष्टीत, विवाहाआधी लैंगिक संबंध पाप नसेल, पण देवाच्या नजरेत ते घोर पाप आहे! त्याचप्रमाणे व्यभिचार, गोत्रगमन व समलैंगिकता देखील. (लेवीय १८:६; १ करिंथकर ६:९, १०) देव ज्यांना अशुद्ध लेखतो अशा या प्रथांपासून आपण दूर राहावे असे तो अपेक्षितो.
१५. इतरांना आपण कसे वागवतो आणि आपण कोणता विश्वास बाळगतो या दोन्ही गोष्टी देवाच्या अपेक्षांमध्ये कशा गोवलेल्या आहेत?
१५ परंतु, देव ज्यांना पापी समजतो अशा प्रथांपासून दूर राहणे इतकेच पुरेसे नाही. आपण इतरांना कसे वागवतो तेही देवाच्या अपेक्षांमध्ये समाविष्ट आहे. कुटुंबात, पती आणि पत्नीने एकमेकांबद्दल प्रीती बाळगावी, एकमेकांचा आदर करावा असे देव अपेक्षितो. पालकांनी आपल्या मुलांच्या आर्थिक, आध्यात्मिक व भावनिक गरजा पूर्ण कराव्यात ही अपेक्षा देव करतो. तो मुलांना आपल्या पालकांच्या अधीन राहण्यास सांगतो. (नीतिसूत्रे २२:६; कलस्सैकर ३:१८-२१) आणि आपल्या विश्वासांबद्दल काय? खोटी उपासना किंवा बायबलमध्ये शिकवल्या जाणाऱ्या शुद्ध सत्याच्या विरुद्ध शिकवणुकींतून येणारे विश्वास व रुढी आपण टाळावेत असे यहोवा देव आपल्याकडून अपेक्षितो.—अनुवाद १८:९-१३; २ करिंथकर ६:१४-१७.
१६. उचित वर्तनासाठी देवाच्या दर्जांनुरुप जगणे व त्याच्या सत्याचा स्वीकार करणे कठीण का नाही याचे विवरण द्या.
१६ उचित वर्तनासाठी असलेल्या देवाच्या दर्जांनुरुप जगणे व त्याच्या सत्याचा स्वीकार करणे आपल्याला कठीण वाटते का? अविश्वासामुळे उद्ध्वस्त झालेल्या विवाहांऐवजी, पती आणि पत्नी एकमेकांवर प्रीती करतात व भरवसा ठेवतात असे विवाह; मुलांना ज्या कुटुंबात अप्रिय, दुर्लक्षित व नको असलेले असे वाटते अशा कुटुंबांऐवजी, प्रिय व आपल्या पालकांना आपण हवे आहोत असे घरकूल; अपराधभावना आणि एड्स किंवा इतर कोणत्यातरी लैंगिक संक्रमित आजाराने चाळण झालेल्या शरीराऐवजी, शुद्ध विवेक आणि चांगले आरोग्य—या फायद्यांचा विचार केल्यावर आपल्याला तसे वाटणार नाही. खरेच, यहोवाच्या अपेक्षा, जीवनाचा आनंद लुटण्यासाठी लागणाऱ्या कोणत्याही गोष्टीपासून आपल्याला वंचित ठेवत नाहीत!—अनुवाद १०:१२, १३.
जीवन आणि रक्त यांना आदर दाखवा
१७. जीवन आणि रक्त यांच्याविषयी यहोवाचा दृष्टिकोन काय आहे?
१७ तुम्ही आपले जीवन देवाच्या दर्जांनुरुप व्यतीत करता तेव्हा जीवन खरोखरच किती मौल्यवान आहे हे तुम्हाला समजून येते. आता आपण देवाच्या तिसऱ्या अपेक्षेची चर्चा करू या. आपण जीवन आणि रक्त यांना आदर दाखवला पाहिजे. जीवन यहोवाच्या नजरेत पवित्र आहे. ते पवित्रच असले पाहिजे कारण तो जीवनाचा उगम आहे. (स्तोत्र ३६:९) अहो, मातेच्या गर्भात वाढणाऱ्या बालकाचे जीवनसुद्धा यहोवाला मौल्यवान वाटते! (निर्गम २१:२२, २३) रक्त जीवनाला चित्रित करते. यास्तव, रक्तसुद्धा देवाच्या नजरेत पवित्र आहे. (लेवीय १७:१४) तेव्हा, आपण देवाप्रमाणेच जीवन आणि रक्त यांना आदर दाखवावा अशी तो आपल्याकडून अपेक्षा करतो त्यात नवल करण्यासारखे काही नाही.
१८. जीवन आणि रक्त यांच्याविषयी असलेला यहोवाचा दृष्टिकोन विचारात घेता आपल्याकडून काय अपेक्षिले जाते?
१८ जीवन आणि रक्त यांना आदर दाखवताना आपल्याकडून काय अपेक्षिले जाते? ख्रिस्ती या नात्याने, केवळ आपली हौस पूर्ण करण्यासाठी आपण आपले जीवन अनावश्यकपणे धोक्यात घालत नाही. आपल्याला सुरक्षिततेची जाणीव आहे व म्हणूनच आपल्या मोटार गाड्या आणि घरे सुरक्षित असल्याची आपण खातरी करतो. (अनुवाद २२:८) आपण तंबाखूचा वापर करत नाही, सुपारी चघळत नाही किंवा सुखभ्रम म्हणून व्यसन लावणाऱ्या वा मनास भ्रष्ट करणाऱ्या अंमली पदार्थांचे सेवन करत नाही. (२ करिंथकर ७:१) ‘रक्त वर्ज्य करण्याच्या’ देवाच्या सांगण्याकडे आपण लक्ष देतो आणि म्हणूनच आपण रक्त संक्रमण करत नाही. (प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९) आपल्याला जीवन प्रिय असले तरी, सध्याचे जीवन वाचवण्याच्या प्रयत्नात आपण देवाच्या नियमाचे उल्लंघन करून सार्वकालिक जीवनाची आपली आशा धोक्यात घालणार नाही!—मत्तय १६:२५.
१९. जीवन आणि रक्त यांना आदर दाखवल्याने आपल्याला कसा लाभ होतो त्याचे स्पष्टीकरण द्या.
१९ जीवन आणि रक्त यांना पवित्र मानणे आपल्याला भारी वाटते का? कदापि नाही! अंमळ विचार करा. तंबाखूचे धूम्रपान केल्यामुळे होणाऱ्या फुफ्फुसाच्या कर्करोगापासून मुक्त असणे भारी वाटते का? घातक अंमली पदार्थांच्या मानसिक व शारीरिक व्यसनापासून मुक्त असणे भारी वाटते का? रक्त संक्रमणामुळे एड्स, हेपाटायटीस किंवा इतर दुसऱ्या रोगांची लागण होण्यापासून मुक्त असणे भारी वाटते का? स्पष्टपणे, हानीकारक सवयी व रूढी टाळल्याने आपलेच भले होते.—यशया ४८:१७.
२०. जीवनाविषयी देवाचा दृष्टिकोन बाळगल्यामुळे एका कुटुंबाला कसा फायदा झाला?
२० या अनुभवाचा विचार करा. काही वर्षांपूर्वी, जवळजवळ साडेतीन महिने गर्भवती असलेल्या एका साक्षीदार स्त्रीला एके संध्याकाळी रक्तस्त्राव होऊ लागला आणि तिला लागलीच इस्पितळात नेण्यात आले. डॉक्टरांनी तिची तपासणी केल्यावर, तिचा गर्भपात करावा लागेल असे एक नर्सला सांगताना तिने ऐकले. यहोवा न जन्मलेल्या जीवनाकडे कोणत्या दृष्टीने पाहतो हे माहीत असल्यामुळे तिने गर्भपाताला ठामपणे विरोध केला आणि डॉक्टरांना म्हणाली, “बाळ जर जिवंत आहे तर राहू द्या!” अधूनमधून तिला रक्तस्त्राव होत असे, पण काही महिन्यांनतर ती अकाली प्रसवली आणि तिने एका निरोगी मुलाला जन्म दिला जो आता १७ वर्षांचा आहे. तिने सांगितले: “आमच्या मुलाला आम्ही हे सर्वकाही सांगितलं तेव्हा तो म्हणाला, की त्याला कचऱ्यात फेकून दिलं नाही म्हणून आनंद वाटतो. त्याला माहीत आहे, की आम्ही यहोवाची सेवा करत असल्यामुळेच तो आज जिवंत आहे.” खरेच, जीवनाविषयी देवाचा दृष्टिकोन बाळगण्यास या कुटुंबाला भारी वाटला नाही!
यहोवाच्या संघटित लोकांबरोबर सेवा करणे
२१, २२. (अ) आपण यहोवाची सेवा कोणासोबत करावी असे तो अपेक्षितो? (ब) देवाच्या संघटित लोकांना कसे ओळखता येऊ शकते?
२१ देवाच्या दर्जांच्या सुसंगतेत जीवन जगण्यासाठी आवश्यक बदल करताना आपण एकटे नाहीत. या पृथ्वीतलावर यहोवाचे लोक आहेत आणि त्यांच्यासोबत आपण त्याची सेवा करावी अशी तो अपेक्षा करतो. यावरून चौथी अपेक्षा दिसते, की आपण यहोवाच्या आत्म्याने मार्गदर्शित होत असलेल्या संघटनेसोबत त्याची सेवा केली पाहिजे.
२२ पण देवाचे संघटित लोक कशाप्रकारे ओळखू येतात? शास्त्रवचनांमध्ये घालून दिलेल्या दर्जांनुसार त्यांच्यामध्ये खरी प्रीती आहे, त्यांना बायबलबद्दल गाढ आदर आहे, ते देवाच्या नावाचा सन्मान करतात, ते त्याच्या राज्याचा प्रचार करतात आणि ते या दुष्ट जगाचे भाग नाहीत. (मत्तय ६:९; २४:१४; योहान १३:३४, ३५; १७:१६, १७) खऱ्या ख्रिस्ती विश्वासाची ही चिन्हे असलेली केवळ एकच धार्मिक संघटना या पृथ्वीवर आहे—यहोवाचे साक्षीदार!
२३, २४. यहोवाच्या संघटित लोकांसोबत त्याची सेवा करणे कठीण नाही याचे आपण उदाहरण कसे देऊ शकू?
२३ यहोवाच्या संघटित लोकांबरोबर त्याची सेवा करणे भारी आहे का? नाहीच! उलटपक्षी, ख्रिस्ती बंधू आणि भगिनींच्या जगव्याप्त कुटुंबाचे प्रेम आणि पाठिंबा असणे मौल्यवान सुहक्क आहे. (१ पेत्र २:१७) समजा तुमचे जहाज फुटते आणि त्यातून तुम्ही वाचता पण तुम्ही अद्याप पाण्यातच आहात व तरंगत राहण्यासाठी झटत आहात. जेव्हा तुम्हाला वाटत असते, की आता माझा निभाव लागणार नाही आणि तेवढ्यात एका लाईफबोटीतून तुम्हाला कोणीतरी हात देते. इतरही उत्तरजीवी आहेत! तुम्ही आणि इतर जण, वाटेत दिसणाऱ्या दुसऱ्या उत्तरजीवींना आपल्या बोटीत घेत आळीपाळीने ती लाईफबोट किनाऱ्याला हाकत नेता.
२४ आज आपण अशाच अवस्थेत नाही का? आपल्याला, या दुष्ट जगाच्या घातक “पाण्यांतून” वर यहोवाच्या पार्थिव संघटनेच्या “लाईफबोटीत” ओढण्यात आले आहे. यात, आपण एका धार्मिक नवीन जगाच्या ‘किनाऱ्याकडे’ जाताना खांद्याला खांदा लावून सेवा करतो. वाटेत जीवनाच्या दबावांमुळे आपण निराश झालो तर आपल्याला खऱ्या ख्रिस्ती सोबत्यांचे साहाय्य आणि सांत्वन उपलब्ध असल्याबद्दल आपण त्यांचे केवढे कृतज्ञ आहोत!—नीतिसूत्रे १७:१७.
२५. (अ) अजूनही या दुष्ट जगाच्या “पाण्यांत” असलेल्यांबद्दल आपले काय कर्तव्य आहे? (ब) पुढील लेखात देवाच्या कोणत्या अपेक्षेची चर्चा केली जाईल?
२५ इतरांविषयी—अजूनही “पाण्यात” असलेल्या नम्र अंतःकरणाच्या लोकांविषयी काय? त्यांनाही यहोवाच्या संघटनेत येण्यास मदत करण्याचे आपले कर्तव्य आहे, नाही का? (१ तीमथ्य २:३, ४) देव काय अपेक्षितो हे शिकण्यासाठी त्यांना मदतीची गरज आहे. यावरून देवाची पाचवी अपेक्षा दिसते. आपण देवाच्या राज्याचे निष्ठावान उद्घोषक असावे. यामध्ये काय गोवले आहे ते पुढील लेखात चर्चिले जाईल.
तुम्हाला आठवते का?
◻ देवाच्या आज्ञा कठीण का नाहीत?
◻ आपण देवाचे ज्ञान कसे घेतो?
◻ उचित वर्तनासाठी देवाच्या दर्जांनुरुप जगणे व त्याच्या सत्याचा स्वीकार करणे कठीण का नाही?
◻ जीवन आणि रक्त यांच्याविषयी असलेला यहोवाचा दृष्टिकोन विचारात घेता आपल्याकडून काय अपेक्षिले जाते?
◻ आपण देवाची सेवा कोणासोबत करावी असे तो अपेक्षितो आणि त्यांना कसे ओळखता येऊ शकते?
[१८ पानांवरील चित्रं]
आपण सृष्टीचे पुस्तक आणि बायबल यातून यहोवाविषयी शिकतो
[चित्राचे श्रेय]
मगर: By courtesy of Australian International Public Relations; अस्वल: Safari-Zoo of Ramat-Gan, Tel Aviv