राज्य वार्ता याद्वारे एक यशस्वी मोहीम
“जीवन इतक्या समस्यांनी ग्रस्त का आहे ?—त्रास-मुक्त नंदनवन शक्य आहे का?” राज्य वार्ता क्र. ३४ या चार पृष्ठांच्या पत्रिकेचे ते शीर्षक होते, जिचे मागील वर्षी एप्रिल आणि मे महिन्यांदरम्यान, सबंध जगभरात १३९ भाषांमध्ये वितरण झाले. “त्या वर्षाचे एक ठळक वैशिष्ट्य” असे जमेकामधील साक्षीदारांनी या सेवाकार्याच्या मोहिमेचे वर्णन केले. बेल्जियममधील साक्षीदारांनी, “आमच्या बांधवांसाठी आनंदाचा एक महान स्रोत,” असे म्हटले. चेक प्रजासत्ताकमध्ये पहिल्यांदाच यहोवाच्या साक्षीदारांना, राज्य वार्तेच्या वितरणात सहभाग घेण्याची संधी लाभली. तेथील शाखेने असा अहवाल दिला: “ह्या मोहिमेने आवेश व उत्साहाचा आत्मा उत्पन्न केला.” इतर बहुविध देशांकडूनही अशाच प्रकारचे अभिप्राय ऐकण्यास मिळाले.
धर्माच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या घृणास्पद कार्यांमुळे जे लोक उसासे टाकून विलाप करीत आहेत, अशांसाठी राज्य वार्ता क्र. ३४ मध्ये एक खास संदेश होता. (यहेज्केल ९:४) ‘कठीण दिवसांमुळे’ ज्या लोकांचे जीवन त्रस्त झाले आहे व ज्यांवर त्यांचे नियंत्रण नाही अशांसाठी त्यात सांत्वन होते. (२ तीमथ्य ३:१) जीवनाच्या समस्या लवकरच सोडवल्या जातील असे त्या पत्रिकेने बायबलकडे निर्देश करून दाखवले. एक त्रास-मुक्त परादीस निश्चित आहे. (लूक २३:४३) राज्य वार्ता वाचणाऱ्या अनेक लोकांचे, तिच्या संदेशामुळे परिवर्तन झाले. टोगोमधील एका मनुष्याने साक्षीदारास म्हटले: “तुम्ही केलेले निवेदन निर्विवाद आहे.”
निर्विवादपणे, या राज्य वार्तेच्या वितरणाने लोकांचे विलक्षण लक्ष वेधून घेतले. डेन्मार्कमध्ये एका घरमालकाने, पत्रिका सादर करणाऱ्या साक्षीदारास अशाप्रकारे प्रतिसाद दिला: “मी नुकताच अमेरिकेतून आलो आहे आणि निघण्यापूर्वीच कोणीतरी तुमची पत्रिका मला सादर केली होती. मी इतक्यातच येथे पोहंचलो आणि ताबडतोब त्याच पत्रिकेचे डॅनिश भाषेत वाटप होत आहे!”
मोहिमेसाठी उत्साहपूर्ण पाठिंबा
जगभरातील यहोवाचे साक्षीदार पत्रिकेचे वितरण करण्याच्या कार्यात मोठ्या आवेशाने सहभागी झाले. राज्य वार्तेचे वितरण चालले होते त्या महिन्यांदरम्यान, प्रचारकांच्या सर्ववेळेच्या उच्चांकाचा अहवाल देणाऱ्या अनेक देशांपैकी काही देश म्हणजे ऑस्ट्रिया, एल साल्वादोर, हायती, हंगेरी, इटली, न्यू कॅलेडोनिया हे होते.
झांबियामधील एका विभागीय पर्यवेक्षकांनी त्यांच्या डेबरा नामक तीन वर्षांच्या मुलीला घरोघर साहित्य सादर करण्याचे प्रशिक्षण दिले आहे. राज्य वार्ता क्र. ३४ च्या मोहिमेदरम्यान डेबराने या पत्रिकेच्या ४५ पेक्षा अधिक प्रती सादर केल्या. ज्यांनी डेबराकडून राज्य वार्तेचा स्वीकार केला होता, अशा काहींबरोबर तिच्या आईने बायबल अभ्यास सुरू केला.
दक्षिण आफ्रिकेतील एका किशोरवयीन मुलीने, तिच्या कॅशयॉ नामक शाळकरी मैत्रिणीस ही पत्रिका देऊ केली. पत्रिका वाचून कॅशयॉ म्हणाली: “पृथ्वीवरील परादीसमध्ये अनंतकाळ जगणे—खरोखर हे किती विस्मयकारक आहे! याबद्दल मला अगोदरच का सांगितले गेले नाही?” बायबल अभ्यास चालू करण्यात आला. एका आठवड्यातच कॅशयॉला आणखी एक पत्रिका मिळाली. तिला ही दुसरी पत्रिका, सायप्रसमध्ये राहणाऱ्या व पत्रव्यवहाराद्वारे जिच्याबरोबर मैत्री प्रस्थापित झाली होती, अशा एका रोमन कॅथलिक मैत्रिणीकडून मिळाली होती. रोमन कॅथलिक चर्चच्या शिकवणी खोटया का आहेत याचे स्पष्टीकरण देऊन, यहोवाच्या साक्षीदारांबरोबर बायबल अभ्यास करण्याचा तिने निश्चय केला आहे, असे त्या मैत्रिणीने कॅशयॉला सांगितले. साहजिकच, त्यामुळे अभ्यास पुढे चालू ठेवण्याच्या कॅशयॉच्या निश्चयास मोठीच बळकटी मिळाली.
स्वित्झर्लंडमधील एका दहा वर्षांच्या मुलाने, पत्रिकेचे वाटप करण्याच्या कामात त्याच्या आईबरोबर सहभाग घेतला. एका तरुण स्त्रीस त्याने एक प्रत देऊ केली व काळजीपूर्वक त्याचे वाचन करण्यास तिला प्रोत्साहित केले. पत्रिकेच्या मुखपृष्ठावर चित्रित केलेले—पृथ्वीवर अनंतकालिक जीवन, यावर त्याचा खरोखर विश्वास आहे का, याविषयी तिने त्या मुलाला विचारले. मुलाचे प्रत्युत्तर? “हो नक्कीच, माझी पूर्ण खातरी आहे.” तिच्या स्वतःच्या धर्मामध्येच पुष्कळ विसंगती असल्यामुळे ती खऱ्या विश्वासाचा शोध करत होती. पुनर्भेट केल्यानंतर एक बायबल अभ्यास सुरू करण्यात आला.
तात्काळ प्रतिक्रिया
काहीवेळेस तर, ज्यांनी राज्य वार्तेचे वाचन केले होते त्यांच्यातील त्वरित प्रतिक्रियेस ती कारणीभूत ठरली. पत्रिका वाचल्यानंतर, बेल्जियममधील एका ११ वर्षांच्या मुलीने, आपण दुकानांत नजर चुकवून चोऱ्या करत असल्याची कबुली यहोवाच्या साक्षीदाराला दिली. तिच्या आईला यावर पांघरूण घालायचे होते, पण त्या मुलीने जे काही वाचले होते त्यामुळे तिच्या विवेकाला बोचणी लागली व शॉपिंग सेंटरच्या व्यवस्थापकास जाऊन त्याबद्दलची कबुली देण्याचा हट्ट तिने धरला. मात्र शेवटी आईने आपल्या मुलीला साक्षीदाराबरोबर त्या शॉपिंग सेंटरमध्ये जाण्याची संमती दिली. तिच्या कबुलीमुळे तो व्यवस्थापक अचंबित झाला. राज्य वार्तानेच त्या मुलीला हे पाऊल उचलण्यास प्रवृत्त केले होते, असे त्या व्यवस्थापकाला कळाले तेव्हा, त्यात इतके सामर्थ्यवान असे काय होते, हे पाहण्यासाठी त्यानेही एक प्रत मिळविली. ह्या मुलीचा आता प्रगमनशीलपणे अभ्यास चालू आहे.
कॅमेरुनमधील एका साक्षीदार स्त्रीने राज्य वार्तेची प्रत एका मनुष्याला सादर केली व त्याचे अशाप्रकारे कथन करते: “आम्ही ज्यावेळी परतलो तेव्हा आम्ही पाहिले, की त्याने ती पत्रिका आधीच अधोरेखित करून ठेवली होती व त्याचे अनेक प्रश्न होते. समाधानकारक उत्तरे मिळाल्यानंतर त्याने असे स्पष्ट केले: ‘मानवाच्या दुःखासाठी धर्माने हातभार लावला आहे हे अगदी बरोबर आहे. तुमच्या ह्या पत्रिकेने मला पुष्कळ काही शिकण्यास मदत केली आहे व अधिक जाणून घेण्याची माझी इच्छा आहे.’” त्याचा सध्या नियमितपणे बायबल अभ्यास चालू आहे.
उरुग्वेमध्ये घरोघर भेट देत असता साक्षीदाराने एका माणसाला पत्रिका सादर केली. आपले घरोघरचे प्रचारकार्य पुढे चालूच ठेवून, वसाहतीत कार्य करत साक्षीदार पुन्हा त्याच माणसाच्या घराच्या मागील दारात येऊन पोहंचला. हातात पत्रिका घेऊन आपली वाट पाहत उभा असलेल्या त्या माणसाला पाहून त्याला आश्चर्य वाटले. त्याने ती वाचूनही काढली होती व त्याला जास्त माहिती हवी होती. तत्क्षणी एका अभ्यासाची सुरवात झाली.
वितरण करण्यात जनता हातभार लावते
जपानमध्ये एका तरुण साक्षीदाराने, पन्नाशीत असणाऱ्या एका माणसाची भेट घेऊन त्याला पत्रिकेची ओळख करून दिली. त्या माणसाने विचारले: “अंध लोक तुम्हाला भेटल्यानंतर तुम्ही त्या हस्तपत्रिकेचे काय करता?” साक्षीदाराने याबद्दल काही माहीत नसल्याचे कबूल केले. त्या माणसाने त्याला थोडा वेळ थांबण्यास सांगितले व पुन्हा तो त्याच्या घरात गेला. राज्य वार्तेची एक प्रत घेऊन तो माघारी आला व म्हणाला: “मला अगोदरच ती पत्रिका मिळाली होती. त्यात अतिशय मनोरंजक व महत्त्वाची माहिती असेल असा विचार करून ब्रेललिपित मी तिची नक्कल केली. कृपया जे लोक अंध आहेत अशा लोकांसाठी त्याचा उपयोग करा.” त्या माणसाने, त्यात जे काही होते ते अंध लोकांनी चुकवू नये या हेतूने, राज्य वार्तेची, ब्रेललिपीत नक्कल करण्यासाठी कितीतरी तास खर्च केले होते.
स्लोवॉकीयामधील एका माणसाला पत्रिका इतकी आवडली, की त्याने त्याच्या २० प्रती बनवून घेतल्या व स्वतः या फोटोकॉपींचे वितरण केले. स्वित्झर्लंडमधल्या एका प्रचारकाने राज्य वार्तेची एक प्रत एका कुटुंबाला दिली व ते कुटुंब ज्या इमारतीत राहत होते तिच्या वरील मजल्यावर तो कार्य करत होता. पुन्हा खाली आल्यानंतर त्याच कुटुंबातील एक मुलगा त्याला भेटला व त्या पत्रिकेच्या १९ प्रती त्याने मागून घेतल्या. त्या मुलाच्या शाळेत, समस्या व त्यावरील उपायांचा शोध, या विषयावर लिहिण्याची नेमणूक त्या मुलाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. त्याच्या प्रत्येक वर्गमित्रासाठी त्याला एक प्रत हवी होती.
कोणालाही वगळण्यात आले नव्हते
या मोहिमेत सहभाग घेणाऱ्यांनी, कोणालाही वगळता येऊ नये याची खात्री करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले. न्यू कॅलेडोनियामध्ये, दोन साक्षीदार राज्य वार्तेचे वितरण करण्यासाठी आदिवासी जमातीचे लोक राहात असलेल्या क्षेत्राकडे जाण्यास प्रवास करत होते. वाटेने जात असता त्यांचे लक्ष एका आडवाटेकडे गेले, तरीसुद्धा तिच्या शेवटास कोणी राहत आहे की नाही, हे पाहण्याचे त्यांनी ठरवले. आपली मोटार गाडी मागे लावून वाटेने, पाण्याच्या प्रवाहांतून वाटचाल केल्यानंतर शेवटी एक घर त्यांना दिसले. यहोवाच्या साक्षीदारांविषयी ज्यांनी कधीच ऐकले नव्हते असे एक जोडपे तेथे राहत होते व त्यांनी राज्य वार्तेची एक प्रत स्वीकारली. काही काळानंतर प्रचारकांनी पुनर्भेट केली व साक्षीदारांना त्यांची मोटार गाडी घरापर्यंत नेता येईल, या हेतूने त्या जोडप्याने रस्ता व अनेक लहान पूलदेखील दुरुस्त केले होते, हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. एका नियमित बायबल अभ्यासाची सुरवात करण्यात आली.
पोलंडमधील एका साक्षीदाराला, बांधकाम चालू असलेले ठिकाण ओलांडून एका घरमालकाला राज्य वार्तेची प्रत सादर करण्यास जायचे होते. बांधकामाचे ते स्थान पार करून तो पुन्हा माघारी येत असता, तेथील कामगार त्याला पाहतच होते. शेवटी, त्यांतल्या एका कामगाराने त्यास हाक मारली व त्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये असे सांगितले. तो त्यांच्याजवळ गेला तेव्हा त्यांनी आपले काम थोडा वेळ थांबवले व पत्रिकेच्या प्रस्तावनेकडे काळजीपूर्वक कान दिला. त्यांनी पत्रिकेच्या प्रती व नियकालिके आणि नंतर पुनर्भेटीच्या वेळी पुस्तकेदेखील स्वीकारली.
नानाविध भाषांमध्ये राज्य वार्ता क्र. ३४ च्या करोडो प्रतींचे वितरण करण्यात आले होते. याच्या संदेशाने अगोदरच एक शक्तिशाली परिणाम घडवून आणला आहे. त्रास-मुक्त परादीस शक्य आहे हे पुष्कळांना समजले आहे. प्रामाणिक अंतःकरणाचे लोक सतत प्रतिसाद देत राहतील व शेवटी “लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; . . . उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील,” अशा लोकांत त्यांचा समावेश होईल अशी आम्ही प्रार्थना करतो.—स्तोत्र ३७:११.
[३१ पानांवरील चौकट]
नियतकालिकांचे वितरण करत राहा!
राज्य वार्ता क्र. ३४ हिचे वितरण करण्यात, एप्रिल आणि मे १९९५ मधील मोहीम अत्यंत यशस्वी ठरली. या दोन महिन्यांदरम्यान, टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिकांचे देखील उल्लेखनीय वितरण झाले. उदाहरणार्थ, एप्रिल महिन्यात राज्य वार्ता याच्या २५० प्रती व ७५० नियतकालिकांचे वाटप केल्याचा अहवाल, चेक प्रजासत्ताकमधील एक बांधव देतो. ग्वादेलूपमध्ये शनिवार, एप्रिल १५ हा खास नियतकालिक दिन म्हणून ठरवण्यात आला होता. देशातील जवळजवळ प्रत्येक प्रचारकाने त्या दिवशी सेवेत सहभाग घेतला! स्लोवॉकीयाने एप्रिल महिन्यात नियतकालिकांच्या वितरणातील एक नवीन उच्चांक गाठला. इतर अनेक देशांतून अशाच प्रकारचे अहवाल मिळाले.
तर मग, १९९६ मधील एप्रिल आणि मे ह्या महिन्यांना नियतकालिकांच्या वितरणासाठी उल्लेखनीय का बनवू नये बरे? मंडळ्या, खास नियतकालिक दिनांची योजना करू शकतात. अनेक व्यक्ती साहाय्यक पायनियरींग करण्यात सहभाग घेऊ शकतात. या आणि इतर अनेक मार्गांनी नियतकालिकांचे वितरण करण्याकरता प्रोत्साहन दिले जाऊ शकते आणि राज्य वार्ता क्र. ३४ मध्ये उद्घोषित केलेल्या महत्त्वपूर्ण संदेशाचा प्रसार सतत होत राहील. मग मागील वर्षाप्रमाणे यहोवा, आपण प्रदर्शित करत असलेल्या आवेशी आत्म्याकरता आपल्याला खात्रीने आशीर्वादित करील.—२ तीमथ्य ४:२२.