राज्य वार्ता क्र. ३५ चे विस्तारित वितरण करा
१ आपल्या सर्वांसाठीच, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे अत्यंत व्यस्त महिने असतील. ऑक्टोबरच्या पहिल्या ११ दिवसांदरम्यान आपण टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांच्या वर्गण्या सादर करणार आहोत. मग, रविवार, ऑक्टोबर १२ ते रविवार, नोव्हेंबर १६ पर्यंत आपण राज्य वार्ता क्र. ३५ चे वितरण करण्यात सहभागी होणार आहोत. आपल्या परिसरातील सर्व लोकांप्रत एक महत्त्वपूर्ण संदेश पोहंचवण्याचा विशेषाधिकार आपल्याला असेल. हा संदेश, “सर्व लोक कधी एकमेकांवर प्रीती करतील का?” या प्रश्नाचे उत्तर आहे. या खास मोहिमेदरम्यान, राज्य वार्ता क्र. ३५ चे वितरण आपण सप्ताहाच्या दिवसांत करणार आहोत. सप्ताहांती, राज्य वार्ता क्र. ३५ प्रस्तुत करण्याबरोबरच, नियतकालिकांचे अलीकडील अंक दाखवून आपण वर्गण्या देखील सादर करणार आहोत.
२ कोण सहभाग घेऊ शकतात? नेहमीप्रमाणे, या कार्यात वडील पुढाकार घेतील. राज्य वार्तेचे वितरण करणे सर्वांनाच आवडते आणि यात कोणतीही शंका नाही, की या मोहिमेच्या एका अथवा दोन्ही महिन्यांत असंख्य प्रचारक सहायक पायनियरींग करण्यासाठी आपली नावे नोंदवतील. इतर प्रचारक, नेहमीपेक्षा अधिक वेळ सेवेत घालवू इच्छितील.
३ तुमचा असा कोणी बायबल विद्यार्थी आहे का, ज्याने ज्ञान पुस्तकाचा पुरेसा अभ्यास केला असून क्षेत्र सेवेत सहभाग घेण्यासाठी तो लवकरच पात्र होईल? कदाचित, राज्य वार्ता मोहिमेत सहभागी होण्यासाठी पुरेशा वेळेआधी, तो बाप्तिस्मा न झालेला प्रचारक होऊ शकेल. हस्तपत्रिका देण्यासाठी केवळ एका साध्यासोप्या प्रस्तुतीची गरज आहे. उदाहरणार्थ, कदाचित एखादा म्हणू शकेल: “हा संदेश इतका महत्त्वपूर्ण आहे की या महिन्यात १६९ भाषांत तो विश्वभर वितरित केला जात आहे. तुम्ही देखील याची एक प्रत ठेवावी अशी माझी इच्छा आहे.” या उत्साहवर्धक कार्यात लहान मुले देखील एक अर्थपूर्ण सहभाग घेऊ शकतात.
४ राज्य वार्ता क्र. ३५ चे वितरण करण्यात पूर्ण सहभाग घेण्यासाठी, पुस्तक अभ्यास संचालकांनी आपापल्या गटातील प्रत्येक सदस्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. असेही काही प्रचारक असतील जे निष्क्रिय झालेले असतील, परंतु आवश्यक उत्तेजन मिळाल्यास पुन्हा एकदा सेवेत क्रियाशील होतील. सेवेच्या या खास भागात अनुभवी प्रचारकांसोबत कार्य करण्यास अशा लोकांच्या मदतीखातर काय करता येईल, हे पाहण्यासाठी वडिलांनी मोहिमेआधी अशा प्रत्येक व्यक्तीची भेट घ्यावी.
५ सेवेसाठी आपण केव्हा भेटावे? या कार्यासाठी, सोयीस्कर तसेच व्यवहार्य असेल अशा गट साक्षकार्य योजनांची गरज आहे. जेव्हा केव्हा शक्य असेल तेव्हा सप्ताहाच्या प्रत्येक दिवशी, सप्ताहांती तसेच संध्याकाळी देखील सेवेसाठी सभांचे आयोजन केले जावे. प्रचारकांना व पायनियरांना साक्षकार्याच्या कालावधीचा पुरेपूर फायदा घेता येईल अशा वेळी आयोजित केल्या जाव्यात. शाळकरी विद्यार्थी, शिफ्ट ड्युटी करणारे कर्मचारी आणि इतरांच्या फायद्यास्तव, दुपारी थोडे उशिरा देखील भेटण्याच्या योजना आखल्या जाऊ शकतात. घरोघरचे व व्यापारी क्षेत्र मोठ्या प्रमाणात उपलब्ध असेल याची, सेवाकार्य पर्यवेक्षकाने खात्री करावी जेणेकरून सगळ्यांनाच कार्यात पूर्णपणे भाग घेणे शक्य होईल. एखाद्या क्षेत्रात अनेक प्रचारक असल्यास, क्षेत्राच्या एखाद्या नियुक्त भागात कितीजण कार्य करतात यासंबंधी त्यांनी सुज्ञता बाळगावी.
६ घरी नसलेल्यांबद्दल काय? घरमालकांनी, राज्य वार्ता क्र. ३५ चे वाचन का केले पाहिजे याचे स्पष्टीकरण देण्यासाठी होता होईल तितक्या अधिक लोकांना आपण व्यक्तिशः भेटू इच्छितो. तर मग, तुम्ही भेट घेता तेव्हा कोणीही घरी नसल्यास पत्ता लिहून घ्या व दिवसातील दुसऱ्या एखाद्या वेळी पुन्हा भेट घ्या. मोहिमेच्या अगदी शेवटल्या आठवड्यापर्यंत देखील या घरमालकांशी संपर्क साधण्याचे तुमचे प्रयत्न निष्फळ ठरले, तर मग राज्य वार्तेची एक प्रत दाराच्या आत अशाप्रकारे टाकून द्या, की ती येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नजरेआड राहील. वसाहती क्षेत्रांत, रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींना राज्य वार्ता देण्यासंबंधी जागरूक असा. ग्रामीण क्षेत्रांत व जेथे मोहिमेदरम्यान उरकता येणार नाही इतके विस्तारित क्षेत्र आहे अशा ठिकाणी कार्य करताना, पहिल्याच भेटीत, घरी नसलेल्यांच्या घरांत राज्य वार्तेची प्रत टाकावी.
७ आपला उद्देश काय आहे? नोव्हेंबर १६ ला मोहीम संपण्याआधी, आपले सर्व क्षेत्र उरकण्यासाठी मंडळ्यांनी राज्य वार्तेच्या आपल्या संपूर्ण साठ्याचा उपयोग करावा. तुमच्या मंडळीला नियुक्त केलेले क्षेत्र अतिशय विस्तारित असल्यास; शिवाय एखाद्या सोबत्यासह कार्य करण्यापेक्षा एकेकट्याने कार्य करणे सुरक्षित असल्यास तसे करणे कदाचित तुम्हाला व्यवहार्य वाटेल. त्यामुळे योग्य असलेल्या शक्य तितक्या अधिक लोकांप्रत सुवार्ता पोहंचवणे तुम्हाला संभवनीय होईल. (मत्त. १०:११) एखादी ब्रिफकेस वापरण्याऐवजी तुमच्या हातातच थोड्याशा हस्तपत्रिका ठेवणे व खिशात अथवा पर्समध्ये बायबल ठेवणे कदाचित फायदेकारक असू शकेल. जेथे आस्था दाखवली जाते त्याचा उत्तम अहवाल ठेवण्याची खात्री करा.
८ सुरू करण्यास तुम्ही तयार आहात का? मंडळीला किती अतिरिक्त नियतकालिकांची गरज भासेल याचा वडिलांनी आधीच अंदाज बांधून तशी मागणी करावी. राज्य वार्ता क्र. ३५ ची मागणी करण्याची गरज नाही कारण प्रत्येक मंडळीला त्याचा साठा पाठवला जात आहे. खास, नियमित आणि सहायक पायनियरांसाठी प्रत्येकी २०० प्रती वितरणासाठी असतील तर मंडळीच्या प्रचारकांना प्रत्येकी ४० प्रती दिल्या जातील. आपल्याला आपले कार्य नेमून दिलेले आहे. या आनंददायक कार्यात सहभागी होण्यास तुम्ही उत्सुक आहात का? यात कोणतीही शंका नाही, की तुम्ही उत्सुक आहात. तर मग, राज्य वार्ता क्र. ३५ यातील बायबल आधारित महत्त्वपूर्ण संदेशाचे आपण सर्वात विस्तारित वितरण करू या!