खास पत्रिका मोहीम—नोव्हेंबर १० ते डिसेंबर ७!
१ जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का? या नवीन पत्रिकेच्या खास वितरण मोहिमेत आपण सहभाग घेणार आहोत. ही मोहीम सोमवार नोव्हेंबर १० ने सुरू होऊन पुढील चार आठवड्यांसाठी असेल. संपूर्ण जगभर होणाऱ्या या मोहिमेमुळे अधिक लोकांमध्ये, सत्याचा एकमेव स्रोत असलेल्या संदेशात आवड निर्माण होईल.—योहा. १७:१७.
२ या पत्रिकेत सहा महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे बायबलमधून थोडक्यात देण्यात आली आहेत. ते प्रश्न पुढीलप्रमाणे आहेत: “देवाला खरोखरच आपली काळजी आहे का?” “युद्ध, दुःख कधी नाहीसे होतील का?” “मृत्यूनंतर आपले काय होते?” “मृत जनांना पुन्हा भेटणे शक्य आहे का?” “देव कोणाच्या प्रार्थना ऐकतो?” “जीवनात खरा आनंद कसा मिळवता येईल?” ख्रिस्ती धर्मजगताच्या चर्चेसने या प्रश्नांची उत्तरे मनाचे समाधान करतील अशी कधीच दिली नाहीत. ख्रिश्चन नसलेल्या लोकांच्या मनातही असे प्रश्न अनेकदा आले आहेत व बायबलमध्ये या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे आहेत हे कदाचित त्यांना माहीतही नसावे. त्यामुळे या पत्रिकेतील संदेश बहुतेक लोकांना नक्कीच आवडेल, अशी आपण अपेक्षा करू शकतो.
३ तुमच्या क्षेत्रातील प्रत्येक घरी जा: क्षेत्र सेवेसाठी तुम्हाला नेमलेल्या क्षेत्रातील प्रत्येक घरी जाण्याचा होता होईल तो प्रयत्न करा. तुमचे क्षेत्र खूप मोठे असेल तर वडील जन तुम्हाला, ज्या घरी कुलूप दिसते त्या घरी पहिल्या भेटीत पत्रिकेची एक प्रत दाराखालून आत सरकवण्यास सांगतील. आपल्या शेजाऱ्यांना, नातेवाईकांना, कामाच्या ठिकाणातील किंवा शाळेतील तुमच्या ओळखीच्या लोकांना किंवा तुम्ही दररोज ज्यांना भेटता अशा लोकांना ही पत्रिका द्यायला विसरू नका. कदाचित तुम्ही नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात सहायक पायनियरींग करण्यासाठी काही फेरबदल कराल. तुमचे मूल किंवा बायबल विद्यार्थी आध्यात्मिक प्रगती करत आहे का? मग ते, बाप्तिस्मा न घेतलेले प्रचारक म्हणून पात्र ठरून आपल्याबरोबर या मोहीमेत भाग घेऊ शकतील का? होय, तर मग वडिलांना याबाबत कळवा.
४ घरमालक आवड दाखवत आहे हे ओळखा: घरमालकाबरोबर बोलायला सुरुवात करा. तो तुमच्या बोलण्यात आवड दाखवत आहे हे चटकन ओळखा. पण घरमालकाला आध्यात्मिक गोष्टीत काही आवड दिसत नाही, असे जर तुम्हाला जाणवले तर तुमचे बोलणे आदराने समाप्त करून तिथून निघा. पण घरमालकाला आवड आहे, असे जर तुम्हाला जाणवले, तरच संभाषण पुढे चालू ठेवा.
५ घरमालकाला काय म्हणाल: जास्तीत जास्त लोकांना हा संदेश सांगता यावा म्हणून तुमचे सादरीकरण मोजक्याच शब्दांचे ठेवलेले बरे. घरमालकासाठी उचित असेल असा पत्रिकेच्या पहिल्या पानावर असलेल्या सहा प्रश्नांपैकी एखादा प्रश्न निवडा. आणि मग थेट प्रश्न विचारून पत्रिकेच्या आतील पानावर दिलेल्या त्या प्रश्नाच्या उत्तराकडे त्याचे लक्ष न्या. अशाने सर्व प्रचारकांना क्षेत्रातील लोकांच्या गरजांनुरुप आपापली सादरीकरणे तयार करता येतील. जर कोणी आस्था दाखवली तर त्या व्यक्तीचे नाव व पत्ता लिहून घ्या आणि तिला पुन्हा भेटायला जा. शनिवार-रविवारच्या दिवशी या पत्रिकेसोबत नियतकालिकेही देता येतील. डिसेंबर ७ तारखेला मोहीम संपल्यानंतर आपण सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तक सादर करणार आहोत. या पत्रिकांचा साठा उरलाच तर इतर पत्रिका जशा दिल्या जातात तशाच याही देता येऊ शकतात.
६ बायबल अभ्यास सुरू करणे: आपल्याला बायबल अभ्यास सुरू करण्यास मदत व्हावी म्हणून ही पत्रिका खासकरून बनवण्यात आली आहे. आस्था दाखवणाऱ्या व्यक्तीला पुन्हा भेटायला गेल्यावर तुम्ही तिला, बायबलमधील कोणते सत्य जास्त भावले, असे विचारू शकता. मग, पत्रिकेच्या शेवटच्या पानावर जिथे बायबल अभ्यास व्यवस्थेचा उल्लेख करण्यात आला आहे ते दाखवून तुम्ही त्या व्यक्तीच्या हातात बायबल काय शिकवते पुस्तकाची प्रत ठेवू शकता. आणि शक्य असेल तर मग तिने निवडलेल्या विषयाशी संबंधित असलेला या पुस्तकातला अध्याय काढून त्यातील एक दोन परिच्छेदांवर चर्चा करा.
७ यहोवा त्याची उपासना “आत्म्याने व खरेपणाने” करणाऱ्यांना शोधत आहे. (योहा. ४:२३) तेव्हा, इतरांना सत्य समजण्यास मदत करण्याकरता आपण सर्व जण या खास मोहिमेत अगदी हिरहिरीने भाग घेऊ या!