तुमचा प्रकाश प्रकाशू द्या!
सरतेशेवटी त्या वृद्ध माणसासाठी, वचनयुक्त मशीहाला पाहण्याचा तो योग आला होता! “प्रभूच्या [यहोवा, NW] ख्रिस्ताला पाहण्याअगोदर तुला मरण येणार नाही,” हे ईश्वरी प्रकटीकरणाद्वारे शिमोनाला कळाले होते. (लूक २:२६) पण, शिमोनाने जेव्हा मंदिरात प्रवेश केला आणि मरीया व योसेफ यांनी बाळाला त्याच्या हातात दिले तेव्हा ते किती शिरशिरी आणणारे होते! त्याने देवाची स्तुती करून म्हटले: “हे प्रभू, आता तू आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहेस; कारण माझ्या डोळयांनी तुझे तारण पाहिले आहे. . . . ते परराष्ट्रीयांस प्रकटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या इस्राएल लोकांचे वैभव असे आहे.”—लूक २:२७-३२; पडताळा यशया ४२:१-६.
येशू, त्याच्या बाप्तिस्म्याच्या वेळी ३० वर्षांचा होता, तेव्हापासून ते त्याच्या मृत्यूपर्यंत जगाचा “प्रकाश” म्हणून सिद्ध झाला. कोणत्या मार्गाने? त्याने देवाचे राज्य व त्याचे उद्देश यांबद्दल प्रचार करून, आध्यात्मिक प्रकाश प्रतिबिंबित केला. त्याने खोट्या धार्मिक शिकवणी उघड केल्या व अंधकाराच्या कर्मांची स्पष्ट ओळख पटवून दिली. (मत्तय १५:३-९; गलतीकर ५:१९-२१) यामुळे, “मीच जगाचा प्रकाश आहे.” असे येशूला योग्यपणे म्हणता आले.—योहान ८:१२.
सा. यु. ३३ या वर्षी येशूचा मृत्यू झाला. तेव्हा प्रकाश मालवला का? मुळीच नाही! येशू पृथ्वीवर होता तेव्हाच त्याने त्याच्या शिष्यांना सांगितले: ‘तुमचा प्रकाश लोकांसमोर पडू द्या.’ (मत्तय ५:१६) त्यानुसार, येशूच्या मृत्यूनंतर त्याच्या शिष्यांनी तो प्रकाश तसाच प्रकाशू दिला.
येशूच्या अनुकरणार्थ, आज ख्रिस्ती जण प्रचाराच्या कार्यात सामील होऊन यहोवाचा प्रकाश प्रतिबिंबित करतात. ‘प्रकाशाच्या प्रजेसारखे चालून,’ ख्रिस्ती जीवनात स्वतःची तेजस्वी उदाहरणे शाबीत करतात.—इफिसकर ५:८.