करैत आणि सत्यासाठी त्यांचा शोध
“माझ्या अभिप्रायावर अवलंबून न राहता [शास्त्रवचनांचा] पूर्णपणे शोध करा.” सा. यु. आठव्या शतकातील एका करैत नेत्याचे हे शब्द आहेत. करैत कोण होते? त्यांच्या उदाहरणावरून आपण मोलाचे काही शिकू शकतो का? या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी, आपल्याला इतिहासाकडे वळून करैत चळवळीस कारणीभूत ठरलेला दीर्घकालिन वादविषय पाहावा लागेल.
तो वादविषय कसा सुरू झाला?
सामान्य युगाच्या आधीच्या शेवटल्या शतकांमध्ये, यहुदी धर्मामध्ये एक नवीन तत्त्वज्ञान निर्माण झाले. एक लिखित आणि एक मौखिक असे दोन नियमशास्त्र देवाने सिनाय पर्वतावर दिले अशी ती कल्पना होती.a सा. यु. पहिल्या शतकापर्यंत, ज्यांनी ही नवीन शिकवण स्वीकारली आणि ज्यांनी नाकारली त्यांच्यामध्ये कडाक्याचे खटके उडत होते. परूशी लोक त्या शिकवणीला चालना देणारे होते आणि सदुकी तसेच एसीन्स लोक विरोधी पक्षाचे होते.
या वादविवादामध्ये, नासरेथचा येशू वचनयुक्त मशीहा या नात्याने प्रकट झाला. (दानीएल ९:२४, २५; मत्तय २:१-६, २२, २३) येशूने, यहुद्यांच्या सर्व परस्परविरोधी गटांना तोंड दिले. त्यांच्यासोबत तर्क करताना, त्यांच्या सांप्रदायांमुळे देवाच्या वचनाला रद्द केल्याचा त्याने धिक्कार केला. (मत्तय १५:३-९) केवळ मशीहा शिकवू शकतो अशा मार्गाने येशूने आध्यात्मिक सत्य देखील शिकवले. (योहान ७:४५, ४६) शिवाय, केवळ येशूच्या अनुयायांनीच ईश्वरी पाठिंब्याचा पुरावा दिला. ते ख्रिस्ती म्हणून ओळखले जाऊ लागले.—प्रेषितांची कृत्ये ११:२६.
सा. यु. ७० मध्ये जेरूसलेमच्या मंदिराचा नाश करण्यात आला तेव्हा, केवळ परुशी लोकांचाच तेवढा धार्मिक पंथ जशाचा तसा बचावला होता. आता याजकपद, अर्पणे आणि मंदिर या सर्व गोष्टींविना, परुशी लोकांचा यहुदी धर्म, या सर्वांसाठी पर्यायांचा शोध लावू शकत होता ज्याद्वारे ते परंपरा आणि स्पष्टीकरणांना, लिखित नियमशास्त्राची जागा घेण्यास वाव देत होते. त्यामुळे आणखी नवी “पवित्र पुस्तके” लिहिण्यासाठी संधी मिळाली. पहिल्यांदा त्यांच्या मौखिक नियमशास्त्रांमध्ये आणखी भर आणि स्पष्टीकरण असलेले मिशनाह आले. त्यानंतर, इतर लिखाणांचे संग्रह जोडण्यात आले ज्याला तालमूद असे म्हणण्यात येऊ लागले. त्याच वेळेस, धर्मत्यागी ख्रिस्ती येशूच्या शिकवणी मनाप्रमाणे अनुसरू लागले. दोन्ही मंडळ्यांनी शक्तिशाली धार्मिक व्यवस्थांची निर्मिती केली—एका बाजूला रब्बींचा अधिकार तर दुसऱ्या बाजूला चर्चचा अधिकार.
मूर्तिपूजक रोम आणि नंतर “ख्रिस्ती” रोमसोबत यहुदीयांच्या वादविवादामुळे, यहुदी धर्माचे केंद्र कालांतराने बॅबिलोनला हलवण्यात आले. तेथेच तालमूदच्या संपूर्ण लिखाणात बदल करण्यात आला. तालमूद अधिक पूर्णपणे देवाची इच्छा प्रकट करते असा रब्बींनी दावा केला असला तरी, अनेक यहुदी लोकांनी रब्बींच्या अधिकाराचा वाढता प्रभाव ओळखला व मोशे आणि इतर संदेष्ट्यांद्वारे दिलेल्या देवाच्या वचनाची त्यांनी प्रबळ इच्छा धरली.
सा. यु. आठव्या शतकाच्या उत्तरार्धात, मौखिक नियमशास्त्रातील रब्बींच्या अधिकाराचा आणि विश्वासाचा विरोध करणाऱ्या बॅबिलोनमधील यहुद्यांनी अनान बेन डेवीड नावाच्या एका विद्वान नेत्याला प्रतिसाद दिला. रब्बींचे स्पष्टीकरण किंवा तालमूद याकडे अधिक लक्ष न देता प्रत्येक यहुद्याचा इब्री शास्त्रवचनाचा अनिर्बंध अभ्यास करण्याचा हक्क हाच खऱ्या धर्माचा एकमात्र उगम आहे असे त्याने म्हटले. अनानने शिकवले: “माझ्या अभिप्रायावर अवलंबून न राहता [देवाचे लिखित नियमशास्त्र] तोराह याचा पूर्णपणे शोध करा.” शास्त्रवचनांवर अशा प्रकारे जोर दिल्यामुळे, अनानच्या अनुयायांना क·री·ʼमʹ, म्हणून ओळखण्यात येऊ लागले. हे एक इब्री नाव आहे ज्याचा अर्थ “वाचक” असा होतो.
करैत आणि रब्बींमध्ये खटके उडतात
रब्बींच्या मंडळाची त्रेधा उडवणाऱ्या करैतांच्या शिकवणींविषयीची काही उदाहरणे कोणती आहेत? एकाच वेळी दूध आणि मांस खाण्यावर रब्बींनी बंदी घातली होती. त्यांनी, “करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये” हे निर्गम २३:१९ मधील वचन मौखिक नियमशास्त्राचे स्पष्टीकरण म्हणून सादर केले. दुसऱ्या बाजूला पाहता, या वचनात जे म्हटले आहे अगदी तोच त्याचा अर्थ होतो असे करैतांनी शिकवले. रब्बींचे निर्बंध मानवी शोध असल्याचा त्यांनी युक्तीवाद केला.
अनुवाद ६:८, ९ वचनाच्या त्यांच्या स्पष्टीकरणानुसार, यहुदी पुरुषांना टेफिलीन बांधून प्रार्थना करावी लागत असे आणि प्रत्येक घराच्या दाराच्या बाह्यांवर मेझुझा लावायचा होता.b या वचनांचा केवळ लाक्षणिक किंवा सांकेतिक अर्थ होता असे करैतांना वाटले आणि म्हणून रब्बींच्या अशा नियमांना नाकारले.
इतर बाबींमध्ये रब्बींपेक्षा करैतांची अधिक बंधने होती. उदाहरणार्थ, “तुम्ही आपल्या वसतिस्थानातून विस्तव पेटवू नये,” या निर्गम ३५:३ मध्ये लिहिलेल्या वचनाबद्दलच्या त्यांच्या दृष्टिकोनाचा विचार करा. करैत लोकांनी दिवा जाळत ठेवण्याला किंवा विस्तवाला पेटते ठेवण्याला मनाई केली, मग जरी तो शब्बाथाच्या आधी जाळला किंवा पेटवला असला तरी.
अनानच्या मृत्यूनंतर विशेषकरून, करैत नेत्यांचे विशिष्ट निर्बंधांच्या प्रमाणावर आणि स्वरूपावर वारंवार मतभेद होत असत शिवाय त्यांचा संदेश नेहमीच स्पष्ट नव्हता. करैतांनी एकच नेता न मानल्यामुळे त्यांच्यामध्ये ऐक्याची उणीव होती, परंतु रब्बींच्या अधिकाराच्या पद्धतीच्या विरोधात असलेली गोष्ट म्हणजे व्यक्तिगत वाचन आणि स्पष्टीकरणावर त्यांनी अधिक जोर दिला. परंतु तरी देखील, करैत चळवळ बॅबिलोनच्या यहुदी समाजाच्याही पलीकडे प्रसिद्ध आणि प्रभावीत होत गेली व मध्य पूर्वेकडे पसरली. जेरूसलेममध्ये तर एक मुख्य करैत केंद्र देखील स्थापण्यात आले.
सा. यु. नवव्या आणि दहाव्या शतकांदरम्यान, करैत विद्वानांनी इब्री भाषेच्या नविनीकृत अभ्यासात श्रेष्ठत्व मिळवले आणि एक प्रकारचा सुवर्णयुग अनुभवले. त्यांनी मौखिक परंपरेला नव्हे तर, लिखित इब्री शास्त्रवचनांच्या भागास पवित्र समजले. काही करैत इब्री शास्त्रवचनांचे काळजीपूर्वक नकलाकार बनले. वास्तविक पाहता, सर्व यहुद्यांमध्ये शास्त्रवचनांच्या मॅसोरेटिक अभ्यासाला उत्तेजित करणारे करैतांचे कार्य होते व त्यामुळे आज अधिक अचूक बायबल लिखाण टिकून राहिल्याची खात्री मिळते.
शीघ्र वाढीच्या या काळात, करैत यहुदी धर्म इतर यहुद्यांमध्ये खुल्या मिशनरी कार्यात गुंतले. यामुळे रब्बींच्या यहुदी धर्माला उघडपणे धोका होता.
रब्बींनी कसा प्रतिसाद दिला?
रब्बींचा प्रतिहल्ला, त्वेषपूर्ण शाब्दिक हल्ला होता. त्यांचा उद्देश साध्य करण्यासाठी ते धूर्तपणे त्यांच्या शिकवणींना जुळवून घेत व बदलत होते. अनानच्या अटके नंतरच्या शतकामध्ये रब्बींच्या यहुदी धर्माने पुष्कळ करैत पद्धतींचा स्वीकार केला. रब्बींनी त्यांच्या अलंकारशास्त्रात करैतांच्या शैलीचा आणि पद्धतीचा समावेश केला व ते शास्त्रवचनांचा संदर्भ घेण्यात अधिक निपुण झाले.
करैतांसोबतच्या या शाब्दिक चढाओढीचा मान्यताप्राप्त नेता साʽदिया बेन जोसफ हा होता जो नंतर सा. यु. दहाव्या शतकाच्या पूर्वार्धात बॅबिलोनमधील यहुदी समाजाचा प्रमुख बनला. साम्युवेल रोझनब्लाट याने, साʽदियाचे सर्वात मोठे पुस्तक विश्वास आणि मतांचे पुस्तक इंग्रजीत भाषांतरीत केले. त्याने त्याच्या प्रस्तावनेत म्हटले: “तो त्याच्या दिवसांमध्ये . . . तालमूदचा तज्ज्ञ असला तरी देखील [साʽदिया], तुलनात्मक रीतीने या यहुदी परंपरेच्या उगमाचा फारच कमी प्रमाणात उपयोग करतो, कारण ज्या करैतांनी केवळ लिखित नियमशास्त्रच साधार असल्याचे स्वीकारले होते त्या करैतांचा त्यांच्याच शस्त्रांनी पराभव करण्याची त्याची इच्छा होती असे दिसते.”
साʽदियाचे अनुकरण केल्याने रब्बींच्या यहुदी धर्माने कालांतराने वरचष्मा मिळवला. स्वतःला लिखित नियमशास्त्राशी जुळवून करैत वादविवादाकडून शक्तिशाली पुरावा काढून घेण्याइतपत यहुदी धर्माने हे साध्य केले. १२ व्या शतकाचा महशूर तालमूदी विद्वान मोझस मेमोनिडसने शेवटला घाव घातला. इजिप्तमध्ये तो ज्या करैतांबरोबर राहिला होता त्यांच्याबरोबरच्या त्याच्या सहनशील मनोवृत्तीने तसेच त्याच्या खात्रीशीर विद्वत्तापूर्ण शैलीने त्याने त्यांची प्रशंसा मिळवली व त्यांच्या स्वतःच्या नेतृत्वाचे पद दुर्बळ केले.
करैत चळवळ उत्तेजन गमावते
आता ऐक्याची उणीव तसेच सुव्यवस्थित प्रतिउपाय यांच्याविना, करैत चळवळीने उत्तेजन तसेच अनुयायी हे दोन्ही गमावले. कालांतराने, करैतांनी त्यांचे दृष्टिकोन आणि तत्त्वांमध्ये सुधारणा केल्या. करैत चळवळीबद्दलचे लिखाण केलेला लेखक लिऑन निमॉय याने असे लिहिले: “तालमूदवर सैद्धांतिकपणे बंदी असली तरी, पुष्कळसे तालमूदी साहित्य, निमूटपणे करैत नियम आणि रूढींच्या प्रथेमध्ये समाविष्ट करण्यात आले.” मूलभूत रीतीने, करैतांनी त्यांचा मूळ उद्देश गमावला आणि रब्बींचा बहुतेक यहुदी धर्म स्वीकारला.
इस्राएलमध्ये अद्यापही २५,००० करैत आहेत. आणखी काही हजार इतर समाजांमध्ये म्हणजे बहुतेककरून रशिया आणि अमेरिकेत आढळतील. परंतु त्या सर्वांच्या आता स्वतःच्या मौखिक परंपरा असून ते सुरवातीच्या करैतांपासून खूपच भिन्न आहेत.
करैतांच्या इतिहासातून आपण काय शिकू शकतो? हेच की, ‘आपल्या संप्रदायांमुळे देवाचे वचन रद्द करणे’ गंभीर चूक आहे. (मत्तय १५:६) मनुष्यांच्या भारी संप्रदायांतून मुक्त होण्यासाठी शास्त्रवचनांचे अचूक ज्ञान जरूरीचे आहे. (योहान ८:३१, ३२; २ तीमथ्य ३:१६, १७) होय, जे देवाची इच्छा जाणू इच्छितात व पूर्ण करतात ते मनुष्यांच्या संप्रदायांवर विसंबून राहत नाहीत. उलट, ते बायबलचे परिश्रमपूर्वक परीक्षण करतात आणि देवाच्या प्रेरित वचनातील लाभदायक सूचना लागू करतात.
[तळटीपा]
a तथाकथित मौखिक नियमशास्त्राच्या स्पष्टीकरणासाठी, वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क, इंकाने प्रकाशित केलेल्या युद्धाविना एक जग असेल का? (इंग्रजी) या माहितीपत्रकाची पृष्ठे ८-११ पहा.
b टेफिलीन, दोन लहान चौकोनी चामडी डब्या असतात ज्यामध्ये शास्त्रवचनीय उतारे लिहिलेले चर्मपत्राचे लहान लहान तुकडे असतात. या डब्या, सप्ताहदिनादरम्यानच्या सकाळच्या प्रार्थनेवेळी त्या डाव्या बाह्यावर आणि कपाळावर पारंपारिकपणे बांधल्या जात असत. अनुवाद ६:४-९ आणि ११:१३-२१ ही वचने एका चर्मपत्रावर लिहून एका लहानशा डबीत घालून ती डबी दाराच्या बाह्यावर बांधली जात होती याला मेझुझा म्हणातात.
[३० पानांवरील चित्रं]
करैतांचा एक गट