साक्षीदार नेहमी भेटी का देतात?
‘ते पहा, ते पुन्हा आले! पण ते तर काही आठवड्यापूर्वीच आले होते!’ एखादा यहोवाचा साक्षीदार तुमच्याकडे भेटीला येतो तेव्हा तुमच्याही मनात हेच विचार येतात का? लाखो लोकांना आज नियमितपणे यहोवाचे साक्षीदार भेट देतात. तुम्ही कदाचित विचाराल, बहुतेक लोकांना त्यांचा धर्म आहे किंवा त्यांना या गोष्टीत आवड नाही हे माहीत असूनही ते पुन्हा पुन्हा का येतात? या प्रश्नाला उत्तर हवेच.
देवासमोरील जबाबदारी
यहोवाच्या साक्षीदारांना शास्त्रवचनातून हे कळून आले की, पहिले महायुद्ध चालू झाले त्या वर्षापासून म्हणजे, १९१४ पासून, जागतिक घटना सध्याच्या जगिक व्यवस्थेच्या नाशाविषयी आणि या पृथ्वीवरील देवाच्या येणाऱ्या राज्याविषयीच्या पवित्र शास्त्रीय भविष्यवाण्या पूर्ण करत आहेत. हिंसा, रक्तपात, आणि द्वेष याचे जवळजवळ एक शतक पूर्ण होत आले आहे; आणि मानवजात अशा स्थितीत येऊन पोहंचली आहे की राजकारण देखील तिला या समस्यातून मुक्त करू शकत नाही. मानवी कुटुंबाला अजूनही छळत असणारी युद्धे आणि दहशत याचा पुरावा देतात की मानवी सत्ता लोकांचे हृदय, मन आणि मनोवृत्ती बदलवण्यास अपयशी ठरली आहे. मागील इतिहासात घडलेल्या घटनांमुळे जो संताप लोकांच्या मनात खोलवर रूजला आहे तो, मानवीवंश, वांशिक, आणि धार्मिक गटांमध्ये अजूनही विष पसरवीत आहे. ही गोष्ट अफगाणिस्थान, उत्तरेकडील आयर्लंड, दक्षिण आफ्रिका, भारत, मध्य पूर्व, आणि पूर्वीचे युगोस्लाविया यासारख्या देशाबद्दल खरी आहे. तर मग, कोणता एकमात्र टिकाऊ उपाय आहे?
साक्षीदारांना काय प्रवृत्त करते?
यहोवाच्या साक्षीदारांनी जाणले आहे की देवाचा उपायच—येशू ख्रिस्ताकरवीचे त्याचे वचनदत्त राज्यशासन—याला एकमात्र असे उत्तर आहे. येशूने त्याच्या प्रचलित नमुन्यादाखल प्रार्थनेतही त्या राज्य सत्तेसाठी एका विनंतीचा समावेश केला: “ह्यास्तव, तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा: ‘हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.’” साक्षीदार असा विश्वास ठेवतात की, ही प्रार्थना मानवजातीच्या व्यवहारात देवाने हस्तक्षेप करण्यासाठी खरोखरपणे मागणी करते.—मत्तय ६:९, १०.
तर यहोवाच्या साक्षीदारांना वारंवार घरोघरी जाऊन तो संदेश लोकांपर्यंत पोहंचवण्याची का गरज वाटते? कारण येशूने ठळकपणे मांडलेल्या त्या दोन आज्ञांमुळे त्यांना असे वाटते: “‘तू आपला देव [यहोवा, NW] ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने, व पूर्ण मनाने प्रीती कर.’ हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी ही आहे की, ‘तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर.’”—मत्तय २२:३७-३९.
साक्षीदारांना स्वतःवर देवाचा आशीर्वाद हवा आणि ते शेजाऱ्यांवर प्रीती करत असल्यामुळे, तोच आशीर्वाद त्यांना देखील मिळावा अशी त्यांची इच्छा आहे. अशाप्रकारे, येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करून, त्यांना निःस्वार्थ प्रीतीमुळे त्यांच्या शेजाऱ्यांना भेट देण्यास भाग पडते. ते लोकांना, स्वच्छ केलेल्या पृथ्वीवर आज्ञाधारक मानवजातीसाठी ‘आनंदी देवाने’ काय अभिवचन दिले आहे ते जाणून घेण्याची संधी सादर करतात.—१ तीमथ्य १:११; २ पेत्र ३:१३.
ख्रिस्ती मिशनरी पौलाने देवाच्या अभिवचनांवर विश्वास ठेवला आणि म्हणून लिहू शकला: “देवाच्या निवडलेल्यांच्या विश्वासासाठी, आणि सर्वकाळच्या जीवनाच्या आशेकरीता सुभक्तीनुसार असलेल्या सत्याच्या पूर्ण ज्ञानासाठी नेमलेला येशू ख्रिस्ताचा प्रेषित आणि देवाचा दास पौल, याच्याकडून; ते जीवन ज्याच्याने असत्य बोलवतच नाही त्या देवाने अनंत काळाच्यापूर्वी देऊ केले.” होय, देव ज्याला “असत्य बोलवतच नाही” त्याने, जे त्याला नम्रपणे जाणण्याचा आणि त्याची सेवा करण्याची इच्छा बाळगतात अशांना सार्वकालिक जीवन देण्याचे ‘अभिवचन’ दिले आहे.—तीत १:१, २, पं. र. भाषांतर; सफन्या २:३.
साक्षीदारांना वेतन दिले जाते का?
अधूनमधून काहींनी असा आरोप लावला आहे की, साक्षीदारांना त्यांच्या सेवेसाठी वेतन दिले जाते. हा बिलकूल चुकीची समज आहे! ते, पौलाने करिंथच्या मंडळीला जे शब्द लिहिले ते गंभीरपणे लागू करतात: “पुष्कळ लोक देवाच्या वचनाची भेसळ करून ते बिघडवून टाकतात. आम्ही त्यांच्यासारखे नाही, तर जसे सात्विकपणाने व देवाच्या द्वारे बोलावे तसे आम्ही देवासमक्ष ख्रिस्ताच्या ठायी बोलणारे आहो.”—२ करिंथकर २:१७.
काही धार्मिक नेते पैशासाठी प्रचार करतात, ते मग धार्मिक कार्यांसाठी असो किंवा व्यापारी दूरदर्शन कार्यक्रमातून असो. बहुतेक धर्मांमध्ये वेतन मिळणारे धार्मिक नेते आहेत.
याच्या विरूद्धतेत, साक्षीदारांमध्ये वेतन मिळणारे धार्मिक नेते नाहीत आणि बहुधा त्यांची पवित्र शास्त्र प्रकाशने, सत्याच्या प्रामाणिक शोधकांना विनामूल्य दिली जातात. असे असतानाही अनेक जण स्वखुशीने दान देण्यास प्रवृत्त होतात. हे दान जगव्याप्त होणाऱ्या प्रचार कार्याचा खर्च भागविण्यासाठी वापरले जाते. “तुम्हाला फुकट मिळाले, तुम्ही फुकट द्या” या येशूच्या सल्ल्याच्या एकवाक्यतेत साक्षीदार त्यांची साधनसंपत्ती, ज्यामध्ये वेळ आणि शक्तीचा देखील समावेश आहे, देवाच्या सेवेत प्रत्येक वर्षी लाखो तास पूर्ण करण्यासाठी मोकळेपणाने खर्च करतात. अशाप्रकारे ते आस्थेवाईक लोकांना, घरोघरच्या कार्याद्वारे आणि पवित्र शास्त्र अभ्यासाद्वारे शिकवतात.—मत्तय १०:८; २८:१९, २०; प्रे. कृत्ये २०:१९, २०.
या सर्व वस्तुस्थिती शाबीत करतात की यहोवाच्या साक्षीदारांचा, स्वतःसाठी, त्यांच्या स्थानिक मंडळ्यांसाठी, किंवा वॉचटावर संस्थेच्या फायद्यासाठी द्रव्यासंबंधी कोणताही हेतू नाही. घरोघरी जाण्यासाठी कोणालाच वेतन दिले जात नाही. पण मग या कामाची वित्तव्यवस्था कशी होते? संपूर्ण जगभरातील गुणग्राहकता प्रदर्शित करणाऱ्या लोकांकडून स्वखुशीने जे दान मिळते त्याआधारे ही व्यवस्था होते. त्यांच्यामध्ये कधीच पैसे गोळा केले जात नाहीत.
त्यांच्या साक्षीकार्याचा परिणाम
साक्षीदारांच्या घरोघरच्या सेवाकार्याची आणि औपचारिक प्रचारकार्याची जनतेला जाणीव झाली आहे का? प्रचार माध्यमातील पुरावा या प्रश्नाला निनादात्मक होय असे उत्तर देतो. यहोवाच्या साक्षीदारांचा उल्लेख दूरदर्शन कार्यक्रमातून आणि चित्रपटात जेव्हा कोणी अचानक दारावर थाप मारतो तेव्हा केला जातो. व्यंगचित्रपटात साक्षीदारांचा उल्लेख केला आहे. त्यांचे आवेशपूर्ण कार्य इतके प्रचलित आहे की, संपूर्ण जगभरातील व्यंगचित्रकारांनी यहोवाच्या साक्षीदारांचा संदर्भ घेतला आहे. हे कदाचित उपहासात्मक वाटत असेल, परंतु ते सर्वसामान्यपणे एका सकारात्मक मूलभूत वास्तविकतेवर आधारित आहे—साक्षीदार त्यांच्या नेटाच्या घरोघरच्या प्रचारकार्यासाठी प्रसिद्ध आहेत.—प्रेषितांचे कृत्ये २०:२०.
अलिकडील एका व्यंगचित्रात असे दाखवले गेले की, एक माणूस “गुरुकडे” विचारपूस करण्यासाठी डोंगर चढत आहे. तो म्हणाला: “ज्या आश्चर्यकारक गोष्टी घडणार आहेत त्यांच्याबद्दल मला सांग!” “गुरूने” काय उत्तर दिले असावे? त्याने म्हटले, “चला पाहू या . . . अन्नटंचाई, रोगराई आणि भूमिकंप होतील. सूर्य अंधकारमय आणि चंद्र रक्तमय होईल.” त्या माणसाने विचारले: “परंतु यात आनंदाची बातमी काय आहे?” “गुरूने” प्रतिसाद देत म्हटले: “देव त्यांच्या डोळ्यांचे अश्रु पुसून टाकील . . . आणि यापुढे मरण, रडणे किंवा कष्ट राहणार नाही!” तो माणूस त्याला विचारतो: “तुम्हाला ह्या गोष्टी कशा ठाऊक?” उत्तर काय होते? “यहोवाच्या साक्षीदारांपासून कोणीच वाचले नाही!” यहोवाच्या साक्षीदारांपासून कोणी वाचले नाही ही वस्तुस्थिती स्वतः व्यंगचित्रकाराच्या बाबतीत देखील खरी ठरली असावी!
या आणि अशाचप्रकारच्या इतर व्यंगचित्र पट्टींचा प्रभावकारी मुद्दा, साक्षीदारांच्या भेटींची सातत्यताच केवळ प्रकट करत नाही तर त्यांच्या संदेशाची सुसंगतताही प्रकट करतो. थोड्या शब्दातच कलाकाराने त्यांच्या घरोघरच्या साक्षीचा आणि वचनांच्या संदर्भांचा मुख्य भाग सादर केला.—पडताळा मत्तय २४:७, २९; प्रकटीकरण २१:३, ४.
अनेक लोक साक्षीदारांच्या संदेशाचा धिक्कार करतात ही वस्तुस्थिती त्यांना निरुत्साहित बनवीत नाही किंवा त्यांचा उत्साह मावळू देत नाही. प्रेषित पेत्राने ताकीद दिली: “स्वतःच्याच वासनांप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक शेवटल्या दिवसात थट्टा करीत येऊन म्हणतील, ‘त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे? कारण वाडवडील निजले तेव्हापासून सर्व काही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे.’” असे असतानाही, प्रीतीने प्रवृत्त होऊन, साक्षीदार त्यांच्या शेजाऱ्यांना भेटी देत राहतात आणि देव जोपर्यंत सध्याच्या भ्रष्ट व्यवस्थेचा अंत करत नाही तोपर्यंत देत राहतील.—२ पेत्र ३:३, ४.
येशूने म्हटले की शेवटल्या दिवसात, प्रथम सुवार्तेचा प्रचार केला जाईल. सुवार्तेचा प्रचार का आणि कशारीतीने होत आहे याच्या अधिक परीक्षणासाठी पुढील दोन लेख पाहा.—मार्क १३:१०.
[९ पानांवरील चित्रं]
यहोवाच्या साक्षीदारांमध्ये वेतन मिळणारा पाळक वर्ग नाही—सर्व जण स्वखुशीने काम करणारे सेवक आहेत