वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w92 ५/१ पृ. १६-२०
  • शुद्ध वाणीने एकवटलेले व्हा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शुद्ध वाणीने एकवटलेले व्हा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आजची देव-प्रणीत भाषा
  • शुद्ध वाणीची व्याख्या
  • शुद्ध वाणी आत्ताच शिकून घ्या
  • शुद्ध वाणी बोलत राहा व सर्वदा जिवंत राहा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • तुम्ही “शुद्ध वाणी” अस्खलितपणे बोलत आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • यहोवाचे पुनर्स्थापित लोक जगभरात त्याची स्तुती करतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • सर्व पृथ्वीची एकच भाषा होती
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
w92 ५/१ पृ. १६-२०

शुद्ध वाणीने एकवटलेले व्हा

“मी राष्ट्रांस शुद्ध वाणी देईन; व परमेश्‍वराच्या [यहोवा, न्यू.व.] नामाची सेवा घडावी म्हणून ते सर्व त्याच्या नामाचा धावा खांद्याला खांदा लावून करतील.”—सफन्या ३:९.

१. लोकांनी यहोवा देवाला कधी बोलल्याचे ऐकले का?

यहोवा देवाची भाषा शुद्ध आहे. पण लोकांनी कधी त्याची वाणी ऐकली आहे का? होय! हे, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त या भूतलावर १९ शतकांआधी होता तेव्हा घडले. येशूचा बाप्तिस्मा झाला तेव्हा देवाची अशी वाणी ऐकू आली की: “हा माझा पुत्र, मला परमप्रिय, याजवर मी संतुष्ट आहे.” (मत्तय ३:१३-१७) हे शुद्ध सत्य असलेले विधान येशू व बाप्तिस्मा करणारा योहान यांनी मानवी भाषेत ऐकले.

२. पौलाने ‘देवदूतांची जिव्हा’ असा जो संदर्भ लिहिला त्याद्वारे काय सूचित होते?

२ काही वर्षानंतर ख्रिस्ती प्रेषित पौलाने “माणसांच्या व देवदूतांच्या जिव्हे”बद्दल भाष्य केले. (१ करिंथकर १३:१) हे काय दर्शविते? ते सुचविते की, केवळ मानवालाच नव्हे तर आत्मिक प्राण्यांना देखील भाषा व बोली आहे! पण, देव व दिव्यदूत हे अर्थातच ऐकू येणाऱ्‍या व आम्हाला समजू शकणाऱ्‍या वाणी व भाषेतून बोलत नाहीत. ते का बरे? कारण, माणसांना ऐकू येणाऱ्‍या व समजू शकणाऱ्‍या वाणीच्या ध्वनिलहरींचा फैलाव होण्यासाठी पृथ्वीसभोवती तसे वातावरण असणे जरुरीचे आहे.

३. मानवी भाषेचा आरंभ कसा झाला?

३ मानवी भाषेचा उगम कसा झाला? काही म्हणतात की, आमचे पूर्वज एकमेकांशी बोलण्यासाठी खूप प्रयास केले. त्यांनी रेकल्यासारखा व कण्हण्यासारखा आवाज काढून दळणवळण करण्याचा प्रयत्न केला. इव्होल्यूशन (लाईफ नेचर लायब्ररी) हे पुस्तक म्हणतेः “एक दशलक्ष वर्षांआधी वानर-माणसाने . . . थोड्या शब्दांचा ध्वनि हस्तगत केला असावा.” परंतु प्रख्यात शब्दकोषकार लुडवीग कोहलर यांनी म्हटले आहेः “मानवी भाषा रहस्यमय आहे; ती ईश्‍वरी देणगी, एक चमत्कार आहे.” होय, मानवी भाषा ईश्‍वरी देणगी आहे, कारण देवाने पहिला मनुष्य आदाम याला एक भाषा बहाल केली होती. तिला ओघाओघाने इब्री भाषा म्हणण्यात आले. हीच भाषा, “अब्राम, इब्री” याच्या इस्राएल वंशाद्वारे बोलली जात होती. अब्राम हा असा विश्‍वासू कुलपिता होता ज्याचा पूर्वज शेम हा तारु बांधणाऱ्‍या नोहाचा पुत्र होता. (उत्पत्ती ११:१०-२६; १४:१३; १७:३-६) देवाने शेमला दिलेल्या भविष्यवादित आशीर्वादामुळे हे अपेक्षिणे रास्त ठरेल की, ४३ शतकांआधी यहोवा देवाने जो चमत्कार घडवला त्याचा याच्या भाषेवर परिणाम घडला गेला नाही.—उत्पत्ती ९:२६.

४. निम्रोद कोण होता, व त्याचा दियाबल सैतानाने कसा वापर केला?

४ तेव्हा “सर्व पृथ्वीची एकच भाषा, एकच बोली होती.” (उत्पत्ती ११:१) यावेळी निम्रोद नावाचा मनुष्य “यहोवाविरुद्ध बलवान पारधी [न्यू.व.]” म्हणून प्रसिद्ध होता. (उत्पत्ती १०:८, ९) मानवजातीचा आद्य शत्रू सैतान याने या निम्रोदाचा उपयोग, दियाबलाच्या संघटनेच्या पार्थिव भागाची प्रस्थापना करण्यासाठी केला. निम्रोदाला स्वतःचे नाव मोठे करण्याची इच्छा होती, आणि हीच उद्धट प्रवृत्ती त्याच्या अनुयायांमध्येही जडली. यांनी शिनार देशात एक मोठा प्रकल्प उभारण्यास आरंभ केला. उत्पत्तीच्या ११ व्या अध्यायातील ४ वचनाप्रमाणे ते म्हणालेः “चला, आपणासाठी एक नगर निर्माण करून गगनचुंबित शिखराचा एक बुरुज बांधू. ह्‍या रितीने आपले नाव करु; म्हणजे आपली पृथ्वीवर पांगापांग होणार नाही.” हे धाडस, देवाने “पृथ्वी व्यापून टाका,” या आज्ञेचे उल्लंघन करणारे होते; त्यामुळे ते, यहोवाने त्या बंडखोरांच्या भाषेचा घोटाळा केला तेव्हा संपुष्टात आले. “नंतर,” पवित्र शास्त्र अहवाल म्हणतोः “परमेश्‍वराने [यहोवा, न्यू.व.] तेथून त्यांस सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगविले, ह्‍याप्रमाणे त्यांचे नगर बांधावयाचे राहिले.” (उत्पत्ती ९:१; ११:२-९) त्या नगराचे नाव बाबेल, किंवा बाबेलोन (म्हणजे, “घोटाळा”) असे पडले, “कारण परमेश्‍वराने [यहोवा, न्यू.व.] सगळ्या जगाच्या भाषेचा तेथे घोटाळा केला.”—बाईंगटन.

५. (अ) देवाने मानवजातीच्या भाषेत घोटाळा केल्यामुळे कोणत्या गोष्टींना आळा बसला? (ब) पण, नोहा व शेम यांच्या भाषेबद्दल आपल्याला काय म्हणता येईल?

५ एका मानवी भाषेचा घोटाळा करण्याचा हा चमत्कार, देवाने नोहाला जी आज्ञा दिली होती त्याप्रमाणे पृथ्वीस भरुन टाकण्यामध्ये परिणामित झाला व यामुळे आकाश व पृथ्वीचा सार्वभौम प्रभुविरुद्ध बंड करणाऱ्‍या मानवांद्वारे स्वतःची संघटित अशी अशुद्ध उपासना प्रस्थापित करण्याच्या सैतानाच्या योजनेला पार तडा बसला. हे खरे की, खोट्या धर्माचे आचरण कोणाही पद्धतीने केल्यामुळे लोक दियाबलाचे भक्ष्य बनले होते, आणि ते आपापल्या दैवतांची प्रस्थापना करुन, आपल्या वेगवेगळ्या भाषेत त्यांना नावे देऊन त्यांची भक्‍ती करण्याद्वारे भूतांचीच सेवा करीत होते. (१ करिंथकर १०:२०) पण, एकच खरा देव याने बाबेल येथे केलेल्या हालचालीने एक संघटित असा खोटा धर्म उभारण्यात आणि त्याद्वारे दियाबलाला मनोमन वाटणारी भक्‍ती मिळवून देण्यात प्रतिबंध घातला. अर्थातच, शिनार देशात उडालेल्या गोंधळात धार्मिक नोहा व त्याचा मुलगा शेम कधीच सहभागी झाले नाही. या कारणामुळे असे म्हणता येते की, त्यांची भाषा ही शुद्ध अशी राहिली व ती विश्‍वासू अब्राम (अब्राहाम) याद्वारे बोलली गेली. ही तीच भाषा होती जी देवाने आदामाला एदेन बागेत बहाल केली होती.

६. इ. स. ३३च्या पेंटेकॉस्टच्या दिवशी यहोवाने कसे दाखविले की, तो भाषा बोलण्याची क्षमता प्रदान करू शकतो?

६ मानवजातीच्या मूळच्या भाषेत ज्याने घोटाळा केला तो यहोवा देव लोकांना विविध भाषेत बोलण्याचे सामर्थ्यही देऊ शकतो. हेच तर त्याने आमच्या समान शकातील ३३व्या वर्षी पेंटेकॉस्टच्या दिवशीही करून दाखविले! प्रे. कृत्ये २:१-११ नुसार यरुशलेममध्ये वरच्या खोलीत त्यावेळी येशू ख्रिस्ताचे सुमारे १२० अनुयायी एकत्र जमले होते. (प्रे. कृत्ये १:१३, १५) तेव्हा एकाएकी आकाशातून “मोठ्या वाऱ्‍याच्या सुसाट्यासारखा” आवाज ऐकू आला. “अग्नीच्या जिभा” दृश्‍यमान झाल्या व त्या सर्वांवर वितरीत झाल्या. तेव्हा शिष्य “पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसे त्यांस वदविले तसे ते अन्य भाषांतून बोल लागले.” त्या ईश्‍वरी मार्गदर्शनाद्वारे मिळालेल्या भाषांमध्ये त्यांनी “देवाची महत्कर्मे” सांगितली. जेव्हा, मेसोपोटेमिया, मिसर, लिबुवा, रोम इत्यादि दूरदूरच्या विविध ठिकाणातून आलेल्या यहूदी व धर्मांतरीत यहूद्यांनी वेगवेगळ्या भाषेत जीवनदायी संदेशाचे श्रवण केले तेव्हा तो केवढा चमत्कार झाला असावा!

आजची देव-प्रणीत भाषा

७. जगभर एकच भाषा बोलली व समजली गेली तर कोणते लाभ मिळू शकतील?

७ वस्तुतः देव अद्‌भूत प्रकाराने वेगवेगळ्या भाषा प्रदान करू शकत असल्यामुळे त्याने जर एकच भाषा जगभरात बोलली जाण्याचे व समजण्याचे शक्य केले तर ते मनोरंजक नसेल का? यामुळे मानवी समाजात अधिक समज वाढविण्याची मदत होऊ शकेल. द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिआ स्पष्ट करते त्यानुसार, “सर्व लोक एकच भाषा बोलले तर त्यामुळे सांस्कृतिक व आर्थिक बंध अधिक जवळचे होतील, आणि राष्ट्राराष्ट्रांमधील सदिच्छा वाढीस लागेल.” तसे पाहता, आलेल्या सर्व वर्षांत ६०० पेक्षा अधिक सार्वत्रिक भाषांचा प्रयोग झाला. यापैकीच्या एस्परान्टो या युरोपिय आंतरराष्ट्रीय भाषेने अधिक प्रभुत्व मिळविले, कारण तिचा १८८७ मध्ये शोध लावल्यावर १,००,००,००० पेक्षा अधिकांनी ती शिकून घेतली होती. तरीपण, सार्वत्रिक भाषेद्वारे मानवजातीचे एकत्रीकरण घडवून आणण्याचे मानवी प्रयत्न कधीच यशस्वी होऊ शकले नाहीत. खरे म्हणजे, ‘दुष्ट माणसे दुष्टपणात अधिक सरसावत’ असल्यामुळे या जगात अधिकाधिक समस्या विभाजन निर्माण करीत आहेत.—२ तीमथ्य ३:१३.

८. आजच्या जगात एखादी सार्वत्रिक भाषा जरी प्रचलित केली तरी अद्याप काय राहणार व का?

८ धार्मिकदृष्ट्या म्हणावयाचे झाल्यास खूपच गोंधळ आहे. पण, जर पवित्र शास्त्रातील प्रकटीकरणाचे पुस्तक खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्याला “मोठी बाबेल” असे म्हणते तर याची आम्ही अपेक्षा करू नये का? (प्रकटीकरण १८:२) होय, कारण “बाबेलोन” याचा अर्थ “घोटाळा” आहे. आजच्या जगात इंग्रजी, फ्रेंच, जर्मन किंवा रशियन यासारखी भाषा स्वाभाविक किंवा दुसरी कोणती तरी कृत्रिम भाषा सार्वत्रिक भाषा म्हणून केली तरी धार्मिक दृष्ट्या व इतर प्रकाराने फूट ही राहणारच. ते का? कारण “सगळे जग त्या दुष्टाच्या [दियाबल सैतान] अधीन आहे.” (१ योहान ५:१९) तो तर स्वार्थतेचा अर्कच आहे, आणि मानवजातीने आपली भक्‍ती करावी अशी तो अधाशी इच्छा बाळगून आहे. हे त्याने निम्रोद तसेच बाबेलचा बुरुज यांच्या काळी केले. पापीष्ठ मानवांनी एखादी सार्वत्रिक भाषा जरी बोलली तरी दियाबली भक्‍ती एकोप्याने उभारण्यात तीच सैतानाला मोठी संधि देणार! पण असे काही घडू देण्याच यहोवा कधीच मुभा देणार नाही; तो लवकरच सर्व खोट्या, दियाबल-प्रेरित धर्मांचा नाश करणार आहे.

९. सर्व राष्ट्र व वंशातील लोकांचे आता एकत्रीकरण कसे घडत आहे?

९ तरी, आश्‍चर्याची गोष्ट ही आहे की, सर्व रा व वंश यातील चांगले लोक आता एकत्रित केले जात आहेत. हे देवाच्या पद्धतीने व त्याच्या उपासनेखातर होत आहे. मानवांनी पृथ्वीवर केवळ एकच शुद्ध वाणी शिकावी व ती बोलावी असे देव घडवून आणीत आहे. आणि ती खरे पाहता सार्वत्रिक भाषा आहे. यहोवा देव खरेच ही शुद्ध वाणी पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांतील पुष्कळ लोकांना आज शिकवीत आहे. हे, सफन्या या देवाच्या संदेष्ट्या व साक्षीदारामार्फत देवाने दिलेल्या भविष्यवादित वचनाची पूर्णता आहे. तो म्हणतोः “मी राष्ट्रांस शुद्ध वाणी [अक्षरशः “शुद्ध ओठ”] देईन; व परमेश्‍वराच्या [यहोवा, न्यू.व.] नामाची सेवा घडावी म्हणून ते सर्व त्याच्या नामाचा धावा खांद्याला खांदा लावून करतील.” (सफन्या ३:९) ही शुद्ध वाणी काय आहे?

शुद्ध वाणीची व्याख्या

१०. शुद्ध वाणी काय आहे?

१० शुद्ध वाणी म्हणजे देवाचे वचन, पवित्र शास्त्रवचने यात त्याच्याबद्दल आढळणारे सत्य. ते खासपणे देवाच्या राज्याबद्दलचे सत्य आहे; ते राज्य शांती व इतर आशीर्वाद मानवजातीवर आणतील. शुद्ध वाणीत धार्मिक चुका व खोटी भक्‍ती याला कोणताही थारा नाही. ती वाणी, तिच्या बोलणाऱ्‍या सर्वांना एकच जिवंत व खऱ्‍या देवाच्या शुद्ध, स्वच्छ, व हितकारक भक्‍तीत एकवटते. आज जगात सुमारे ३,००० भाषा समजबुद्धीस अडथळा बनून आहेत आणि शेकडो खोटे धर्म मानवजातीस गोंधळात टाकून आहेत. यास्तव, देव लोकांना या अद्‌भूत, शुद्ध वाणीचा बदल देत आहे याबद्दल आम्हाला किती आनंद वाटावा!

११. शुद्ध वाणीने सर्व राष्ट्रे व वंशाच्या लोकांसाठी काय केले आहे?

११ होय, ही शुद्ध वाणी आता सर्व रा व वंश याच्या लोकांकरवी शिकली जात आहे. ती पृथ्वीवरील एकमात्र अशी शुद्ध भाषा असल्यामुळे ती ऐक्य घडविणारे बळ राखून आहे. जे सर्व ती बोलतात अशांनी ती देवाच्या “नामाचा धावा खांद्याला खांदा लावून” करण्यासाठी किंवा अक्षरशः “एकाच खांद्याने” करण्यासाठी समर्थ करते. अशाप्रकारे ते देवाची सेवा “एकचित्ताने,” “एका चित्ताने व एका खांद्याने मिळून” करतात. (द न्यू इंग्लिश बायबल; द ॲम्प्लीफाईड बायबल) स्टीवन टी. बाईंगटन यांनी केलेल्या भाषांतरात असे वाचण्यात येतेः “तेव्हा मी [यहोवा देव] सर्व लोकांचे ओठ शुद्ध करीन, म्हणजे ते सर्व यहोवाच्या नामाचा धावा करतील व त्याच्या सेवेत सहकार्य देतील.” अशाप्रकारे देवाच्या सेवेतील बहुभाषीय सहकार्य केवळ यहोवाच्या साक्षीदारांमध्ये दिसते. आज २१२ देशात, चाळीस लाखांपेक्षा अधिक हे राज्य घोषक वेगवेगळ्या मानवी भाषेत राज्याची सुवार्ता प्रसारीत करीत आहेत. तरीही, हे साक्षीदार ‘सारखेच बोलतात’ आणि “एकचित्ताने व एकमताने यथास्थित” आहेत. (१ करिंथकर १:१०) याचे कारण हे की, ते पृथ्वीवर कोठेही असले तरी यहोवाचे सर्वच साक्षीदार एकच शुद्ध वाणी त्यांचा स्वर्गातील पिता याच्या स्तुती व गौरवसाठी बोलत आहेत.

शुद्ध वाणी आत्ताच शिकून घ्या

१२, १३. (अ) शुद्ध वाणी बोलण्याची तुम्ही काळजी का करावी? (ब) सफन्या ३:८, ९ मधील शब्द आज इतके अर्थसूचक का आहेत?

१२ शुद्ध वाणी बोलण्याची तुम्ही काळजी का घ्यावी बरे? एक गोष्ट म्हणजे, ही वाणी शिकून ती बोलण्यावर तुमचे जीवन अवलंबून आहे. देवाने “लोकांस शुद्ध वाणी देईन” असे अभिवचन देण्याआधी त्याने हा इशारा दिलाः “मी लुटीसाठी उठेन, तोवर माझी वाट पाहा; कारण रा एकत्र जमवावी, त्यावर माझा क्रोध, माझा सर्व संतप्त क्रोध पाडावा हा माझा निश्‍चय आहे. कारण माझ्या इर्ष्येच्या अग्नीने सर्व पृथ्वी भस्म होईल.”—सफन्या ३:८.

१३ सार्वभौम प्रभु यहोवाने ते शब्द २६ शतकांआधी प्रथम यहूदामध्ये उच्चारले होते. त्यावेळी यरुशलेम त्याची राजधानी होती. पण ते विधान आमच्या काळासाठी खासपणे होते, कारण यरुशलेम आजच्या ख्रिस्ती धर्मराज्याचा नमुना होते. आणि आमचा हा काळ, देवाच्या स्वर्गीय राज्याची १९१४ मध्ये प्रस्थापना झाल्यापासून यहोवाचा दिवस असून यामध्ये राष्ट्रांचे व राज्यांचे एकत्रीकरण करण्याचे चालू आहे. त्याने मोठ्या साक्षीकार्याद्वारे या सर्वांना आपल्याकडे लक्ष देण्यासाठी एकत्र केले आहे. पण यामुळे त्यांनी त्याच्या उद्देशाला विरोध सुरु केला. तथापि, यहोवा देव दयेने या सर्व राष्ट्रांमधून लोकांना शुद्ध वाणी बोलण्याद्वारे एकत्रित होऊ देत आहे. त्याने अभिवचन दिलेल्या नव्या जगात जीवन मिळविण्याची इच्छा धरणाऱ्‍या सर्वांना तिजमुळेच ऐक्याने एकवटलेले होता येते. हे एकत्रीकरण आता, “सर्वसत्ताधारी देवाची त्या मोठ्या दिवसाची लढाई” जिला साधारणपणे हर्मगिदोन म्हटले जाते तिजमध्ये सर्व राष्ट्रांवर ईश्‍वरी प्रकोप येऊन ती भस्मसात होण्याआधी होत आहे. (प्रकटीकरण १६:१४, १६; २ पेत्र ३:१३) जे शुद्ध वाणी बोलतात आणि यहोवाच्या नावाचा धावा एकतेत एकवटलेले खरे उपासक या नात्याने विश्‍वासाने करतात अशांना त्या जागतिक विनाशाच्या दाहकतेमध्ये ईश्‍वरी संरक्षणाचा अनुभव येईल. देव अशांना नव्या जगात सुरक्षितपणे आणील व जे प्रत्येकाच्या ओठावर सरतेशेवटी शुद्ध वाणी राहील.

१४. सफन्याद्वारे देवाने कसे दाखवले की, या व्यवस्थीकरणाच्या अंतामधून बचाव मिळविण्यासाठी लगेच हालचाल करण्याची गरज आहे?

१४ आपला संदेष्टा सफन्या याद्वारे यहोवा हे स्पष्ट करतो की, जे या सद्य दुष्ट व्यवस्थेच्या अंतामधून पार होण्याची इच्छा धरतात अशांनी कोणती हालचाल त्वरेने केली पाहिजे. सफन्या २:१-३ नुसार देव म्हणतोः “हे निर्लज्ज राष्ट्रा, एकत्र हो, ताळ्यावर ये; निर्णय बाहेर पडेल, दिवस भुसाप्रमाणे उडून जाईल, परमेश्‍वराचा [यहोवा, न्यू.व.] क्रोधदिन तुम्हावर येईल त्यापूर्वी ताळ्यावर या. देशातील सर्व नम्र जनांनो, परमेश्‍वराच्या [यहोवा, न्यू.व.] न्यायानुसार चालणाऱ्‍यांनो, त्याचा आश्रय करा, धार्मिकता व नम्रता यांचे अवलंबन करा, म्हणजे कदाचित परमेश्‍वराच्या [यहोवा, न्यू.व.] क्रोधदिनी तुम्ही दृष्टीआड व्हाल.”

१५. (अ) सफन्या २:१-३ ची प्राथमिक पूर्णता कशी झाली? (ब) यहूदावरील देवाच्या दंडाज्ञेमधून कोण वाचले, आणि आमच्या काळात अशा प्रकारच्या बचावाची कोणती समांतरता मिळते?

१५ त्या शब्दांची आरंभीची पूर्णता यहूदा व यरुशलेमावर घडली. यहूदाच्या पापी लोकांनी देवाने केलेल्या अपीलास संमतीकारक प्रतिसाद दिला नाही हे त्यांजवर बाबेलोन्याच्या हातून इ. स. पूर्वी ६०७ मध्ये देवाचा जो न्यायदंड बजावण्यात आला त्यामध्ये दिसले. जसे यहूदा देवासमोर “निर्लज्ज राष्ट्र” होते तसेच ख्रिस्ती धर्मराज्य देखील यहोवासमोर निर्लज्ज “राष्ट्र” बनले आहे. तथापि, देवाचे वचन ऐकून काही यहूदी व इतरांचा बचाव झाला, त्यामध्ये यहोवाचा विश्‍वासू संदेष्टा यिर्मया होता. बचावणाऱ्‍यांमध्ये दुसरा एबेद-मलेख हा कुशी व योनादाबाचे वंशज होते. (यिर्मया ३५:१८, १९; ३९:११, १२, १६-१८) याचप्रमाणे आज सर्व राष्ट्रांतून सामोरा आलेल्या येशूची “दुसरी मेंढरे” यांचा “मोठा लोकसमुदाय” हर्मगिदोनातून वाचून देवाच्या नव्या जगात जाईल. (प्रकटीकरण ७:९; योहान १०:१४-१६) केवळ जे ही शुद्ध वाणी शिकतात व ती बोलतात असेच आनंदीपणे बचाव मिळवितील.

१६. “यहोवाच्या क्रोधाच्या दिवशी” बचाव मिळण्यासाठी एखाद्याने काय केले पाहिजे?

१६ यहूदा व यरुशलेम ही नष्ट व्हावीत असे यहोवाने ठरविले होते तसेच ख्रिस्ती धर्मराज्य देखील नष्ट होईल. सर्व खोट्या धर्मांचा शेवट जवळ आला आहे, त्यामुळे जे बचाव मिळवू इच्छितात अशांनी लगेच हालचाल केली पाहिजे. मळणी करताना जसा धान्याचा भुसा वाऱ्‍यावर उडून जातो तसा तो “दिवस भुसाप्रमाणे उडून जाईल” त्या आधीच त्यांनी हे केले पाहिजे. देवाच्या क्रोधापासून मुक्‍त होण्यासाठी आपण शुद्ध वाणी बोलले पाहिजे आणि यहोवाचा क्रोध आम्हावर येऊन गुदरण्याआधी देवाच्या इशाऱ्‍याला प्रतिसाद दिला पाहिजे. सफन्याच्या काळात तसेच आज नम्र जन यहोवा देवाचा शोध नीतीमत्तेने व लिनतेने घेत आहेत. आम्ही यहोवाचा शोध घ्यावा याचा अर्थ त्याच्यावर पूर्ण हृदयाने, जिवाने, मनाने, व शक्‍तीने प्रीती करणे होय. (मार्क १२:२९, ३०) जे असे असतील ते “कदाचित परमेश्‍वराच्या [यहोवा, न्यू.व.] क्रोधदिनी दृष्टीआड होतील.” पण हा भविष्यवाद “कदाचित” असे का म्हणतो? कारण विश्‍वासूपणा व सहनशीलता यावरच तारण अवलंबून आहे. (मत्तय २४:१३) देवाच्या नीतीमान दर्जांची पूर्ति करणारे आणि शुद्ध वाणी बोलणाऱ्‍यांनाच यहोवाच्या क्रोधदिनी बचावले जाईल.

१७. कोणते प्रश्‍न अजून विचार करण्यास बाकी उरले आहेत?

१७ यहोवाच्या क्रोधाचा दिवस समीप आहे आणि शुद्ध वाणी शिकून तिचा वापर करण्यावर तारण अवलंबून आहे तर तिचा अभ्यास करण्यात व तिची बोलणी करीत राहण्यात मग्न असण्याचा हाच काळ आहे. पण एखाद्याला ही शुद्ध वाणी कशी शिकता येईल? तसेच तिच्या बोलण्यामुळे आपल्याला कसा लाभ मिळू शकेल?

तुम्ही कसे उत्तर द्याल?

▫ मानवी भाषेचा उगम कसा झाला?

▫ शुद्ध वाणी काय आहे?

▫ सफन्या ३:८, ९ मधील शब्द आज का अर्थसूचित आहेत?

▫ “यहोवाच्या क्रोधदिनी” दृष्टीआड होण्यासाठी आपण काय केले पाहिजे?

[१६ पानांवरील चित्रं]

बाबेलमध्ये देवाने त्यांच्या भाषेचा घोटाळा करून मानवजातीला पांगविले

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा