तुम्ही “शुद्ध वाणी” अस्खलितपणे बोलत आहात का?
“मी राष्ट्रांस शुद्ध वाणी देईन, व परमेश्वराची सेवा घडावी म्हणून ते सर्व त्याच्या नामाचा धावा एकचित्ताने करितील.”—सफ. ३:९.
१. यहोवाने आपल्याला कोणते अद्भुत वरदान दिले आहे?
भाषेची सुरुवात मानवाने स्वतः केली नाही, तर मानवांचा सृष्टिकर्ता, यहोवा याच्याकडून मिळालेले हे वरदान आहे. (निर्ग. ४:११, १२) देवाने पहिला मानव आदाम याला फक्त बोलण्याचीच क्षमता दिली नाही, तर नवनवे शब्द योजून आपला शब्दसंग्रह वाढवत जाण्याचीही कुवत त्याला दिली. (उत्प. २:१९, २०, २३) हे वरदान खरोखर किती अद्भुत आहे! याच्या साहाय्याने मनुष्याला आपल्या स्वर्गीय पित्याशी संवाद साधणे व त्याच्या महान नावाचे स्तवन करणे शक्य झाले आहे.
२. आज जगातील सर्व लोक एकच भाषा का बोलत नाहीत?
२ मानव इतिहासातील सुरुवातीची १,७०० वर्षे सर्व जण केवळ एकच भाषा बोलत होते. त्या सर्वांची “एकच बोली होती.” (उत्प. ११:१) त्यानंतर, निम्रोदाच्या काळात यहोवाच्या आज्ञेला न जुमानता लोकांनी एका ठिकाणी एकत्र येऊन तेथेच राहण्याचा निश्चय केला. त्या ठिकाणाला नंतर बाबेल असे नाव पडले. बाबेल येथे त्या लोकांनी एक भले मोठे बुरूज बांधण्यास सुरुवात केली. यहोवाचे गौरव करण्यासाठी नव्हे, तर ‘आपले नाव करण्याच्या’ इराद्याने त्यांनी असे केले. त्यामुळे यहोवाने या बंडखोरांच्या मूळ भाषेत घोटाळा केला व ते सर्व जण निरनिराळ्या भाषा बोलू लागले. अशारितीने, त्यांची सर्व पृथ्वीवर पांगापांग झाली.—उत्पत्ति ११:४-८ वाचा.
३. यहोवाने बाबेल येथे लोकांच्या भाषेत घोटाळा केला तेव्हा काय घडले?
३ आज जगात अक्षरशः हजारो भाषा बोलल्या जातात. काही जणांच्या मते ६,८०० पेक्षा जास्त भाषा अस्तित्वात आहेत. या सर्व भाषा बोलणाऱ्यांची विचार करण्याची पद्धतही त्या त्या भाषेनुसार वेगवेगळी आहे. असे दिसते, की यहोवा देवाने त्या बंडखोर लोकांच्या भाषेत घोटाळा केला तेव्हा त्याने पूर्वीच्या भाषेचे त्यांना जराही स्मरण राहणार नाही असे घडवून आणले. त्याने त्यांच्या मनात नवीन शब्दसंग्रहच टाकला नाही तर त्यांची विचार करण्याची पद्धतही बदलून टाकली आणि प्रत्येक भाषेचे वेगळे व्याकरण अस्तित्वात आणले. म्हणूनच तर, त्या ठिकाणाचे नाव बाबेल, म्हणजे “घोटाळा” असे पडले. (उत्प. ११:९) विशेष म्हणजे, आज बोलल्या जाणाऱ्या विभिन्न भाषा कोठे उगम पावल्या याचे समाधानकारक स्पष्टीकरण फक्त बायबलमध्येच सापडते.
एक नवी, शुद्ध वाणी
४. यहोवाने आपल्या काळाच्या संदर्भात काय विदित केले होते?
४ बाबेल येथे यहोवाने लोकांच्या भाषेत कशा प्रकारे घोटाळा केला याविषयीचा बायबलमधील अहवाल वाचून आपल्याला नवल वाटते. पण आज आपल्या काळात त्याहीपेक्षा आश्चर्यजनक व महत्त्वपूर्ण असे काहीतरी घडून आले आहे. यहोवाने संदेष्टा सफन्या याच्याद्वारे असे विदित केले होते: “मी राष्ट्रांस शुद्ध वाणी देईन, व परमेश्वराची सेवा घडावी म्हणून ते सर्व त्याच्या नामाचा धावा एकचित्ताने करितील.” (सफ. ३:९) ही “शुद्ध वाणी” काय आहे आणि आपण ही नवीन भाषा चांगल्या प्रकारे बोलण्यास कसे शिकू शकतो?
५. “शुद्ध वाणी” काय आहे आणि या नव्या भाषेमुळे कोणता परिणाम घडून आला आहे?
५ शुद्ध वाणी म्हणजे यहोवा देवाविषयी व भविष्याकरता त्याच्या संकल्पांविषयी त्याचे वचन बायबल यात सापडणारे सत्य. देवाचे राज्य मुळात काय आहे, ते यहोवाच्या नावास कशा प्रकारे पवित्र करेल, केवळ यहोवालाच या विश्वावर आधिपत्य करण्याचा अधिकार आहे हे ते कशा प्रकारे सिद्ध करेल आणि विश्वासू मानवांना सार्वकालिक आशीर्वाद कशा प्रकारे मिळवून देईल या सर्व गोष्टींबद्दलचे अचूक ज्ञान या ‘वाणीत’ समाविष्ट आहे. ही शुद्ध वाणी शिकल्यामुळे काय परिणाम होतो? त्याच भविष्यवाणीनुसार, ही नवी भाषा शिकल्यामुळे लोक यहोवाच्या नावाचा धावा करतात आणि त्याची एकचित्ताने सेवा करतात. बाबेलमध्ये घडलेल्या घटनांच्या अगदी उलट, या नव्या भाषेमुळे यहोवाच्या नावाचे गौरव झाले आहे व त्याच्या लोकांमध्ये ऐक्य निर्माण झाले आहे.
शुद्ध भाषा बोलायला शिकणे
६, ७. (क) नवीन भाषा शिकण्यात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे आणि हेच शुद्ध भाषा शिकण्याच्या बाबतीतही खरे आहे असे का म्हणता येईल? (ख) आता आपण कशावर विचार करणार आहोत?
६ एखाद्या नवीन भाषेवर प्रभुत्त्व मिळवण्याकरता फक्त काही नवीन शब्द तोंडपाठ करणे पुरेसे नसते. तर, नवीन भाषा शिकण्यासाठी विचार करण्याची एक नवीन पद्धत आत्मसात करावी लागते. ती भाषा बोलणाऱ्या लोकांची तर्क करण्याची व विनोद करण्याची पद्धतही जाणून घ्यावी लागते. नव्या भाषेतील शब्दांचे अचूक उच्चारण करण्याकरता जीभ व इतर अवयवांचा विशिष्ट प्रकारे उपयोग करायला शिकावे लागू शकते. बायबलमधील सत्याची शुद्ध भाषा शिकण्याच्या बाबतीतही असेच आहे. बायबलच्या फक्त काही मूलभूत शिकवणींविषयी जाणून घेणे पुरेसे नाही. या नव्या भाषेवर प्रभुत्त्व मिळवायचे असेल, तर आपल्या सबंध विचारसरणीचे व मनोवृत्तीचे आपल्याला रूपांतर करावे लागेल.—रोमकर १२:२; इफिसकर ४:२३ वाचा.
७ शुद्ध भाषा समजायलाच नव्हे, तर ती चांगल्या प्रकारे बोलायलाही आपल्याला कशामुळे साहाय्य मिळेल? कोणतीही भाषा शिकण्याच्या बाबतीत असते त्याप्रमाणेच बायबलमधील सत्याच्या भाषेवर प्रभुत्त्व मिळवण्यासाठी काही मूलभूत तंत्र साहाय्यक ठरू शकतात. दुसरी भाषा शिकताना ज्या सर्वसाधारण पद्धतींचा वापर केला जातो त्यांपैकी काहींवर आता आपण विचार करू या आणि या तंत्रांचा वापर केल्यामुळे ही नवी लाक्षणिक भाषा शिकण्यास आपल्याला कशा प्रकारे साहाय्य मिळू शकेल यावरही विचार करू या.
शुद्ध भाषा अस्खलित बोलण्याकरता
८, ९. शुद्ध भाषा शिकण्याकरता आपण काय केले पाहिजे आणि हे इतके महत्त्वाचे का आहे?
८ लक्षपूर्वक ऐका. सुरुवातीला, नवीन भाषा डोक्यावरून जाते. (यश. ३३:१९) पण जसजसे आपण लक्षपूर्वक ऐकायला शिकतो, तसतसे त्या भाषेतील निरनिराळे शब्द व वारंवार येणाऱ्या वाक्यरचना आपल्याला ओळखीच्या वाटू लागतात. त्याच प्रकारे, शुद्ध वाणीच्या संदर्भातही आपल्याला असा सल्ला देण्यात आला आहे: “ऐकलेल्या गोष्टींकडे आपण विशेष लक्ष लाविले पाहिजे, नाहीतर आपण त्यापासून वाहवत जाऊ.” (इब्री २:१) येशूने आपल्या अनुयायांना वारंवार असे सांगितले: “ज्याला कान आहेत तो ऐको.” (मत्त. ११:१५; १३:४३; मार्क ४:२३; लूक १४:३५) त्याअर्थी, शुद्ध भाषा समजण्याच्या बाबतीत प्रगती करण्यासाठी जे आपल्या कानावर पडते ते ‘लक्षपूर्वक ऐकण्याचा’ व त्याचा अर्थ ‘नीट समजावून घेण्याचा’ आपण प्रयत्न केला पाहिजे.—मत्त. १५:१०, सुबोध भाषांतर; मार्क ७:१४.
९ लक्षपूर्वक ऐकण्याकरता एकाग्रतेची गरज आहे आणि एकाग्रतेने ऐकल्यामुळे आपल्याला अनेक प्रकारे फायदा होतो. (लूक ८:१८) ख्रिस्ती सभांमध्ये दिली जाणारी माहिती आपण एकाग्रतेने ऐकतो का? की वक्ता बोलत असताना आपण दुसऱ्याच कशाचातरी विचार करत असतो? सभेत सादर केले जाणारे भाग लक्ष देऊन ऐकण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणे अतिशय महत्त्वाचे आहे. नाहीतर, आपण ऐकण्यात मंद होण्याची शक्यता आहे.—इब्री ५:११.
१०, ११. (क) लक्षपूर्वक ऐकण्यासोबतच आपण आणखी काय केले पाहिजे? (ख) शुद्ध भाषा बोलण्यात आणखी कोणती गोष्ट समाविष्ट आहे?
१० अस्खलित बोलणाऱ्यांचे अनुकरण करा. नवीन भाषा बोलताना, जर एखाद्याच्या उच्चारांवर त्याच्या स्वतःच्या भाषेचा खूप जास्त प्रभाव असेल, तर इतरांना त्याचे बोलणे स्पष्टपणे समजणार नाही. म्हणूनच, नवीन भाषा शिकू इच्छिणाऱ्यांना त्या भाषेवर प्रभुत्त्व असलेल्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकण्यासोबतच, त्यांच्या उच्चार करण्याच्या व बोलण्याच्या पद्धतीचे अनुकरण किंवा नक्कल करण्याचाही सल्ला दिला जातो. त्याच प्रकारे, आपणही शुद्ध भाषेचे ‘शिक्षण’ देण्यात निपुण असलेल्यांचे अनुकरण केले पाहिजे. (२ तीम. ४:२) तेव्हा, मदत मागण्यास लाजू नका. तुमच्या चुका दाखवल्या जातात तेव्हा सुधारणा करण्यास तयार असा.—इब्री लोकांस १२:५, ६, ११ वाचा.
११ शुद्ध भाषा बोलण्यात बायबलमधील सत्य मानणे व ते इतरांना शिकवणे इतकेच समाविष्ट नसून, देवाच्या नियमांच्या व तत्त्वांच्या अनुरूप आचरण करणेही त्यात समाविष्ट आहे. असे करण्यासाठी, इतरांच्या चांगल्या आचरणाचे निरीक्षण करून त्याचे अनुकरण करणे साहाय्यक ठरू शकते. यामध्ये त्यांच्या विश्वासाचे, आवेशी वृत्तीचे अनुकरण करणे समाविष्ट आहे. येशू ख्रिस्ताच्या संपूर्ण जीवनपद्धतीचे अनुकरण करणे देखील यात समाविष्ट आहे. (१ करिंथ. ११:१; इब्री १२:२; १३:७) जर आपण असे करत राहिलो, तर देवाच्या लोकांमधील ऐक्य वाढेल व सर्वांना एकमुखाने शुद्ध भाषा बोलणे शक्य होईल.—१ करिंथ. ४:१६, १७.
१२. नवीन भाषा शिकण्यात पाठांतराची काय भूमिका आहे?
१२ तोंडपाठ करा. नवीन भाषा शिकणाऱ्यांना बऱ्याच नवीन गोष्टी आठवणीत ठेवाव्या लागतात. उदाहरणार्थ, नवनवे शब्द व वाक्प्रचार. पाठांतराचे हे तंत्र शुद्ध भाषेवर प्रभुत्त्व मिळवण्याकरता ख्रिश्चनांनाही अतिशय उपयोगी पडू शकते. उदाहरणार्थ, बायबलच्या सर्व पुस्तकांची क्रमवार यादी आपण तोंडपाठ करू शकतो. काही जणांनी विशिष्ट शास्त्रवचने किंवा अवतरणे तोंडपाठ केली आहेत. तर इतरांना राज्य गीते, इस्राएल राष्ट्रातील बारा गोत्रांची नावे, १२ प्रेषितांची नावे तसेच आत्म्याच्या फळात समावेश असलेल्या गुणांची यादी तोंडपाठ केल्यामुळे खूप फायदा झाला आहे. प्राचीन काळी, बरेच इस्राएली लोक स्तोत्रे तोंडपाठ करत असत. अलीकडे, एका लहान मुलाने सहा वर्षांचा होण्याआधीच, ८० पेक्षा जास्त शास्त्रवचने तोंडपाठ केली. आपल्यालाही या उत्तम कौशल्याचा आणखी चांगल्या प्रकारे उपयोग करता येईल का?
१३. पुनरुक्ती करणे इतके महत्त्वाचे का आहे?
१३ पुनरुक्ती केल्याने एखादी गोष्ट आठवणीत ठेवणे सोपे जाते. आपल्या ख्रिस्ती शिक्षणाचा एक भाग म्हणून आपल्याला निरनिराळ्या गोष्टींची पुन्हा पुन्हा आठवण करून दिली जाते. प्रेषित पेत्राने म्हटले: “जरी तुम्हाला ह्या गोष्टी माहीत आहेत आणि तुम्हास प्राप्त झालेल्या सत्यात तुम्ही स्थिर झालेले आहा तरी तुम्हाला त्यांची नेहमी आठवण देण्याची मी काळजी घेईन.” (२ पेत्र १:१२) आपल्याला आठवण करून दिली जाण्याची गरज का आहे? कारण यामुळे आपली समज आणखी स्पष्ट होते, आपला दृष्टिकोन रुंदावतो आणि सातत्याने यहोवाच्या आज्ञांचे पालन करण्याचा आपला निश्चय आणखी पक्का होतो. (स्तो. ११९:१२९) देवाच्या नियमांवर व तत्त्वांवर सतत विचार केल्यामुळे आपल्याला आत्मपरीक्षण करण्यास साहाय्य मिळते आणि ‘ऐकून विसरण्याच्या’ मानवी प्रवृत्तीवर मात करणे शक्य होते. (याको. १:२२-२५) जर आपण स्वतःला बायबलमधील सत्यांची सतत आठवण करून दिली नाही, तर इतर गोष्टी आपले हृदय काबीज करतील आणि परिणामस्वरूप आपण शुद्ध भाषा अस्खलितपणे बोलू शकणार नाही.
१४. शुद्ध भाषेचा अभ्यास करताना कोणती गोष्ट आपले साहाय्य करू शकेल?
१४ मोठ्याने वाचा. (प्रक. १:३) नवीन भाषा शिकणारे काही जण मोठ्याने वाचण्याऐवजी मनातल्या मनात अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात. पण यामुळे त्यांना फारसा फायदा होत नाही. शुद्ध भाषेचा अभ्यास करताना आपण लक्ष एकाग्र करण्यासाठी मनातल्या मनात वाचण्याऐवजी हळू आवाजात वाचन केले पाहिजे. म्हणूनच स्तोत्रकर्ता म्हणतो: ‘जो पुरुष परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन [“हळू आवाजात वाचन,” NW] करतो, तो धन्य.’ (स्तोत्र १:१, २.) असे केल्यामुळे, आपण जे वाचत आहोत ते आपल्या मनावर कायमचे कोरले जाते. “हळू आवाजात वाचणे” असे भाषांतर केलेल्या इब्री भाषेतील शब्दांचा मनन करण्याशी संबंध आहे. ज्या प्रकारे, खाल्लेल्या अन्नापासून पोषण मिळवण्याकरता त्याचे पचन होणे महत्त्वाचे आहे, त्याच प्रकारे आपण जे वाचतो ते आत्मसात करण्यासाठी मनन करणे गरजेचे आहे. आपण अभ्यास करताना मनन करण्यासाठीही पुरेसा वेळ देतो का? बायबलचे वाचन केल्यानंतर आपण वाचलेल्या माहितीवर सर्वांगांनी विचार केला पाहिजे.
१५. शुद्ध भाषेच्या “व्याकरणाचा” आपण कशा प्रकारे अभ्यास करू शकतो?
१५ व्याकरणाचा अभ्यास करा. भाषेचे मूलभूत ज्ञान मिळवल्यानंतर तिच्या व्याकरणाचा, म्हणजेच ती भाषा कशा प्रकारे वापरली जाते, त्यासंबंधीच्या नियमांचा अभ्यास करणेही फायदेकारक ठरू शकते. असे केल्यामुळे आपल्याला त्या भाषेतील अचूक वाक्यरचना समजून घेण्यास मदत होईल आणि परिणामस्वरूप ती भाषा योग्य प्रकारे बोलणे शक्य होईल. प्रत्येक भाषेत ज्या प्रमाणे शब्दांचा वापर करण्याची एक विशिष्ट पद्धत असते त्याच प्रमाणे बायबलमधील सत्याच्या शुद्ध भाषेतही एक “सुवचनांचा नमुना” आहे. (२ तीम. १:१३) आपण या ‘नमुन्याचे’ पालन केले पाहिजे.
१६. कोणत्या प्रवृत्तीवर मात करणे गरजेचे आहे आणि आपण हे कसे करू शकतो?
१६ सतत प्रगती करत राहा. काही जण नवीन भाषेचे कामचलाऊ ज्ञान मिळवण्यातच समाधान मानतात. त्यापुढे ते प्रगती करत नाहीत. शुद्ध भाषा बोलणाऱ्यांच्या बाबतीतही असेच घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. (इब्री लोकांस ५:११-१४ वाचा.) मग कोणती गोष्ट आपल्याला या प्रवृत्तीवर मात करण्यास साहाय्य करू शकेल? शुद्ध भाषेच्या आपल्या ज्ञानात सतत भर घालण्याचा प्रयत्न करा. “निर्जीव कृत्यांबद्दलचा पश्चात्ताप, देवावरचा विश्वास, आणि बाप्तिस्म्यांचे, हात वर ठेवण्याचे, मृतांच्या पुनरुत्थानाचे व सार्वकालिक न्यायाचे शिक्षण, हा पाया पुन्हा न घालता, आपण ख्रिस्ताविषयीच्या प्राथमिक बाबीसंबधी बोलत राहण्याचे सोडून प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करू या.”—इब्री ६:१, २.
१७. नियमित रीत्या अभ्यास करण्याची सवय असणे का महत्त्वाचे आहे? उदाहरण द्या.
१७ अभ्यासाची निश्चित वेळ ठरवून घ्या. मधूनच कधीतरी खूप वेळ अभ्यास करण्याऐवजी, कमी वेळ का होईना, पण नियमित रीत्या अभ्यास करणे जास्त हिताचे आहे. अभ्यासाकरता अशी वेळ निवडा, जेव्हा तुम्ही उत्साही असता आणि तुम्हाला सहज लक्ष एकाग्र करता येते. नवीन भाषा शिकणे हे एखाद्या पायवाटेवरून चालण्यासारखे आहे. लोकांची ये-जा सतत सुरू राहिली, तर त्या पायवाटेवरून चालणे सोपे जाते. पण काही काळ जर तेथून कोणीही गेले नाही तर आजूबाजूची झाडेझुडपे वाढल्यामुळे त्या पायवाटेवरून चालणे मुश्किल होते. म्हणूनच, चिकाटीने व नियमितपणे भाषेचा अभ्यास करणे अतिशय महत्त्वाचे आहे. (दानी. ६:१६, २०) बायबलमधील सत्याची शुद्ध भाषा बोलण्याच्या बाबतीत, प्रार्थनापूर्वक मनोवृत्ती बाळगून ‘पूर्ण तत्परतेने जागृत राहा.’—इफिस. ६:१८.
१८. शुद्ध भाषेत बोलण्याच्या प्रत्येक संधीचा फायदा का घेतला पाहिजे?
१८ साधनेविना सिद्धी नाही! नवीन भाषा शिकणारे काही जण लाजाळू स्वभावामुळे किंवा चुका होतील या भीतीने ती भाषा बोलायला मागेपुढे पाहतात. पण, यामुळे त्यांची प्रगती खुंटते. म्हणूनच, साधनेविना सिद्धी नाही हेच खरे! नवीन भाषा शिकणारा त्या भाषेत जितके जास्त बोलेल तितकीच त्याला ती सोपी वाटू लागेल. त्याच प्रकारे, आपणही शुद्ध भाषेत बोलण्याच्या प्रत्येक संधीचा फायदा घेतला पाहिजे. “जो अंतकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करितो त्याचे तारण होते.” (रोम. १०:१०) बाप्तिस्म्याच्या वेळी तर आपण आपला विश्वास ‘मुखाने कबूल करतोच;’ पण, सेवाकार्यात सहभाग घेताना, किंबहुना, जेव्हा जेव्हा आपण यहोवाविषयी बोलतो तेव्हा तेव्हा आपण आपला विश्वास मुखाने कबूल करत असतो. (मत्त. २८:१९, २०; इब्री १३:१५) शुद्ध भाषेत आपले विचार सुस्पष्ट व संक्षिप्त रीत्या व्यक्त करण्याची आणखी एक उत्तम संधी आपल्याला ख्रिस्ती सभांतून मिळते.—इब्री लोकांस १०:२३-२५ वाचा.
शुद्ध भाषेत एका सुराने यहोवाचे स्तवन करा
१९, २०. (क) आपल्या काळात यहोवाचे साक्षीदार कोणते अद्भुत कार्य साध्य करत आहेत? (ख) तुमचा काय निर्धार आहे?
१९ सा.यु. ३३ सालच्या शिवान महिन्याचा रविवार, तारीख ६. त्या दिवशी सकाळीच, ९:०० वाजण्याआधी जेरूसलेम येथे एक रोमांचक घटना घडली. एका घरात जमलेले लोक चमत्कारिक रीत्या “निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले.” कल्पना करा, ही घटना घडताना तुम्ही तेथे असता तर! (प्रे. कृत्ये २:४) आज, निरनिराळ्या भाषांतून बोलण्याची चमत्कारिक देणगी देवाच्या सेवकांना दिली जात नाही. (१ करिंथ. १३:८) तरीसुद्धा, यहोवाचे साक्षीदार ४३० पेक्षा जास्त भाषांतून आज राज्याच्या सुवार्तेची घोषणा करत आहेत.
२० आपली स्वतःची भाषा कोणतीही असली तरीसुद्धा आपण सर्व जण बायबलमधील सत्याची शुद्ध भाषा एकमुखाने बोलतो याबद्दल आपण किती कृतज्ञ आहोत! एका दृष्टीने, बाबेल येथे जे घडले होते त्याच्या अगदी उलट आज घडत आहे! यहोवाचे लोक जणू काही एकाच भाषेत त्याच्या नावाची स्तुती गात आहेत. (१ करिंथ. १:१०) तेव्हा, ही शुद्ध भाषा आणखी चांगल्या प्रकारे बोलण्यास शिकण्याद्वारे व जगभरातील आपल्या भाऊ-बहिणींसोबत एकचित्ताने सेवा करण्याचा निर्धार करण्याद्वारे आपण आपल्या स्वर्गीय पित्या, यहोवाचे स्तवन करू या.—स्तोत्र १५०:१-६ वाचा.
तुमचे उत्तर काय असेल?
• शुद्ध भाषा काय आहे?
• शुद्ध भाषा बोलण्यात कशाकशाचा समावेश होतो?
• शुद्ध भाषा अस्खलितपणे बोलण्यास आपल्याला कशामुळे साहाय्य मिळू शकते?
[२३ पानांवरील चौकट]
शुद्ध भाषेवर प्रभुत्त्व मिळवण्यासाठी
◆ लक्षपूर्वक ऐका.
◆ अस्खलितपणे बोलणाऱ्यांचे अनुकरण करा.
◆ पाठांतर व पुनरुक्ती करा.
◆ मोठ्याने वाचा.
◆ “व्याकरणाचा” अभ्यास करा.
◆ सतत प्रगती करत राहा.
◆ अभ्यासाची निश्चित वेळ ठरवून घ्या.
◆ बोलण्याच्या प्रत्येक संधीचा फायदा घ्या.
[२४ पानांवरील चित्रे]
यहोवाचे लोक एकमुखाने “शुद्ध वाणी” बोलतात