तुम्ही देवाच्या दयेचे अनुकरण कराल का?
“प्रिय मुलांप्रमाणे देवाचे अनुकरण करणारे व्हा.”—इफिसकर ५:१.
१. दुसऱ्यांचे अनुकरण करण्याच्या बाबतीत आम्ही सर्वांनी का दक्षता घ्यावी?
लोक अनुकरणप्रिय आहेत. ते चांगले किंवा वाईट याचे अनुकरण करतात. आम्ही त्यांच्या सभोवताली वावरतो, ज्यांचे कदाचित अनुकरण करु, व त्याचा बहुतांशी आम्हावर परिणाम घडत असतो. नीतीसूत्राच्या प्रेरित लेखकाने आपल्या पुस्तकात १३:२० मध्ये हा इशारा दिलेला आहेः “सूज्ञांची सोबत धर म्हणजे सूज्ञ होशील; मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.” याच कारणामुळे देवाचे वचन अगदी उचितपणे म्हणतेः “वाईटाला अनुसरु नको, तर चांगल्याला अनुसर. चांगला करणारा देवापासून आहे.”—३ योहान ११.
२. आम्ही कोणाचे अनुकरण करावे व कोणत्या मार्गाने?
२ आम्हापाशी अनुकरण करण्याजोगी पवित्र शास्त्रातील चांगल्या स्त्री-पुरुषांची उदाहरणे आहेत. (१ करिंथकर ४:१६; ११:१; फिलिप्पैकर ३:१७) तरीही यात देवाचे उदाहरण अनुसरण्यास सर्वश्रेष्ठ आहे. इफिसकर ४:३१–५:२ मध्ये, आम्ही जी लक्षणे व ज्या सवया टाळल्या पाहिजेत ते सांगितल्यावर प्रेषित पौल आम्हाला आर्जवितो की, आम्ही “कनवाळू होऊन एकमेकांना क्षमा करा”वी. यानंतर तो मुद्यावर येतो व म्हणतोः “तर मग, तुम्ही प्रिय मुलांप्रमाणे देवाचे अनुकरण करणारे व्हा, आणि . . . तदनुसार प्रीतीने चाला.”
३, ४. देवाने स्वतःचे कोणते वर्णन दिले, आणि तो न्यायी देव आहे हे आपण का लक्षात घेतले पाहिजे?
३ आम्ही ज्याचे अनुकरण करू शकू असे देवाचे मार्ग व त्याचे गुण कोणते आहेत? त्याच्या व्यक्तीत्वाचे व कृतीचे विविध पैलू आहेत हे त्याने आपले वर्णन मोशेला ज्या पद्धतीने करून सांगितले त्यामध्ये दिसते. तो म्हणालाः “परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] दयाळू व कनवाळू देव, मंदक्रोध, दयेचाव सत्याचा सागर, हजारो जणांवर दया करणारा; अधर्म, अपराध व पाप यांची क्षमा करणारा; मुळीच गय न करणारा, असा तो वडिलांच्या अधर्माबद्दल पुत्रपौत्रांचा तिसऱ्या व चौथ्या पिढीपर्यंतही समाचार घेतो.”—निर्गम ३४:६, ७.
४ यहोवाला “नीती व न्याय ही प्रिय आहेत,” त्यामुळे आम्ही त्याच्या व्यक्तीत्वाच्या या पैलूची निश्चितच ओळख करून घेऊन त्याचे अनुकरण केले पाहिजे. (स्तोत्रसंहिता ३३:५; ३७:२८) तो निर्माणकर्ता तसेच मानवजातीचा सर्वोच्च नियंता व नियमदाता आहे, यामुळे तो सर्वांचा योग्यच न्याय करणार. (यशया ३३:२२) हे, त्याने आपले इस्राएल लोक तसेच नंतर ख्रिस्ती मंडळीत न्याय कसा केला जावा व तो कसा आचरावा याबद्दल जी पद्धत लावून दिली, त्याद्वारे दिसून येते.
ईश्वरी न्याय आचरण्यात येतो
५, ६. देवाने इस्राएलांसोबत केलेल्या दळणवळणात न्याय कसा प्रदर्शित होत होता?
५ इस्राएलांना आपले लोक म्हणून निवडण्याआधी देवाने त्यांना विचारले की, ते ‘खरोखर त्याची वाणी ऐकतील व त्याचा करार पाळतील’ का. तेव्हा सिनाय डोंगराच्या पायथ्याशी जमलेल्या सर्वांनी उत्तर दिलेः “परमेश्वराने [यहोवा, न्यू.व.] जे सांगितले आहे ते सर्व आम्ही करू.” (निर्गम १९:३-८) केवढी ही जोखीम! देवाने दूताच्या माध्यमाने इस्राएलांना साधारण ६०० नियम दिले व इस्राएलांना, त्याचे समर्पित लोक या अर्थी त्यांचे पालन करायचे होते. पण, जर कोणी त्यांचा अवमान केला तर काय? देवाच्या नियमात पारंगत असणाऱ्या एकाने म्हटलेः “देवदूतांच्या द्वारे सांगितलेले वचन . . . दृढ होते, आणि प्रत्येक उल्लंघनाचे व आज्ञाभंगाचे यथान्याय फळ देण्यात आले.”—इब्रीयांस २:२.
६ होय, जो इस्राएली माणूस आज्ञापालन करणार नव्हता त्याला अपूर्ण मानवी न्याय नव्हे, तर आमच्या निर्माणकर्त्याकडून “यथान्याय फळ” मिळणार होते. कायदेभंगाबद्दल निरनिराळ्या शिक्षा देवाने विदित केल्या होत्या. यापैकीची अत्यंत गंभीर शिक्षा म्हणजे, त्याचा स्वजनातून ‘उच्छेद केला जाई,’ किंवा ठार मारण्यात येई. ही शिक्षा मूर्तिपूजा, व्यभिचार, मात्रागमन, पशुगमन, पुरुषगामी, मुलांचा अग्नीत होम करणे, खून, आणि रक्ताचा दुरुपयोग यासंबंधाने केली जाई. (लेवीय १७:१४; १८:६-१७, २१-२९) तसेच, कोणी इस्राएल स्वेच्छेने, पश्चाताप न करता कोणत्याही ईश्वरी कायद्याचा भंग करील तर त्याचा ‘उच्छेद होत असे.’ (गणना ४:१५, १८; १५:३०, ३१) या ईश्वरी न्यायाची अंमलबजावणी केल्यावर त्याचे परिणाम अपराध्याच्या वंशजाला चांगले जाणवत होते.
७. देवाच्या प्राचीन लोकांमध्ये न्यायाची अंमलबजावणी करण्यामुळे कोणते परिणाम उद्भवत होते?
७ या सर्व शिक्षांनी देवाच्या नियमांचा भंग करणे किती गंभीर आहे हे अधोरेखित केले. उदाहरणार्थ, कोणी मुलगा मद्यपी व खादाड बनला तर त्याला प्रौढ न्यायाधिशांपुढे आणीत. तो उद्दाम व मुळीच पश्चाताप न वाटणारा अपराधी आहे असे त्यांना आढळल्यास न्यायाची अंमलबजावणी करण्यामध्ये पालकांना देखील सहभाग घ्यावा लागे. (अनुवाद २१:१८-२१) आम्हापैकी जे पालक आहेत त्यांना हे पाहून कसेतरी वाटू लागेल. तरी याची गरज आहे हे देवाला ठाऊक होते. त्यामुळे दुष्टता खऱ्या उपासकांमध्ये फैलावली जाणार नव्हती. (यहेज्केल ३३:१७-१९) हा न्याय त्याने लावून दिला होता, ज्याच्याबद्दल असे म्हणता येत होतेः “त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहत; तो विश्वसनीय देव आहे, त्याच्याठायी अधर्म नाही, तो न्यायी व सरळ आहे.”—अनुवाद ३२:४, न्यू.व.
८. देवाने ख्रिस्ती मंडळीसोबत राखलेल्या दळणवळणात त्याचा न्याय कसा दिसून येतो?
८ कित्येक शतकानंतर देवाने इस्राएल राष्ट्राचा त्याग केला व ख्रिस्ती मंडळीची निवड केली. पण यहोवा बदलला नाही. तो न्यायाचीच पूर्ति करीत राहिला व त्यामुळे त्याबद्दल “भस्म करणारा अग्नी” असे त्याचे वर्णन करता येऊ शकले. (इब्रीयांस १२:२९; लूक १८:७, ८) या कारणास्तव, सबंध मंडळीत ईश्वरी भय टिकून राहावे यासाठी अपराध्यांना बहिष्कृत करण्याची तरतूद त्याने लावून दिली. पश्चाताप प्रदर्शित न करणाऱ्या समर्पित ख्रिश्चनांना बहिष्कृत करायचे होते.
९. बहिष्कृती ही काय आहे, व ती काय साध्य करते?
९ बहिष्कृतीमध्ये कशाचा समावेश असतो? पहिल्या शतकात ज्या एका समस्येची हाताळणी झाली त्याद्वारे आपल्याला वस्तुनिष्ठ धडा शिकायला मिळतो. करिंथमधील एका ख्रिश्चनाने आपल्या बापाच्या बायकोसोबत अनैतिकता आचरली व त्याबद्दल पश्चात्ताप केला नाही. यामुळे पौलाने त्याला मंडळीतून बहिष्कृत करावे असा आदेश दिला. हे देवाच्या लोकांची शुद्धता टिकवून ठेवण्यासाठी करायचे होते, कारण “थोडेसे खमीर सगळ्या गोळ्याला फुगविते.” त्याला बहिष्कृत करण्यामुळे देव व त्याचे लोक यांचा त्याच्या दुष्टतेमुळे अपमान होण्याला आळा बसणार होता. अशाप्रकारची बहिष्कृत करणारी कृती त्याला धक्का देऊन ताळ्यावर आणू शकत होती आणि त्याजमध्ये व मंडळीत देखील देवाचे योग्य भय बिंबवू शकत होती.—१ करिंथकर ५:१-१३; पडताळा अनुवाद १७:२, १२, १३.
१०. कोणाला बहिष्कृत केल्यास देवाच्या सेवकांनी आपली कशी प्रतिक्रिया दाखवावी?
१० कोणा दुष्टाला बहिष्कृत केले तर ईश्वरी आज्ञा ही आहे की, ख्रिश्चनाने “तशाची संगत धरु नये; त्याच्या पंक्तीस बसू नये.”a अशाप्रकारे, त्याला देवाच्या नियमांचा आदर करणाऱ्या व त्यानुरुप राहणाऱ्या निष्ठावंतांच्या सहवासापासून व सामाजिक संपर्कापासून दूर ठेवले जाते. यांचेपैकी काही तर त्याचे नातेवाईक असतील जे कदाचित त्याच्या घरातील सदस्य नसतील. कदाचित या नातेवाईकांना हे ईश्वरी मार्गदर्शन अनुसरण्याचे थोडे कठीण वाटत राहील. हे, मोशेच्या नियमशास्त्रानुरुप दुष्ट मुलाची हत्या करण्याच्या वेळी त्याच्या इब्री पालकांना सहभाग घेण्यामध्ये जितके कठीण वाटत होते, त्यासारखे आहे. तरीही, देवाचा नियम स्पष्ट होता व आहे; यामुळे बहिष्कृत करणे ही गोष्ट न्याय्य आहे याची आम्हाला खात्री पटते.—१ करिंथकर ५:१, ६-८, ११; तीत ३:१०, ११; २ योहान ९-११; पहा द वॉचटावर, सप्टेंबर १५, १९८१, पृष्ठे २६-३१; एप्रिल १५, १९८८, पृष्ठे २८-३१.
११. बहिष्कृती संबंधाने देवाच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू कसे प्रदर्शित होऊ शकतात?
११ तथापि, हे लक्षात घ्या की, आपला देव हा केवळ न्यायी नव्हे, तर तो “दयेचा सागर, अधर्म व अपराध यांची क्षमा करणारा” देखील आहे. (गणना १४:१८) बहिष्कृत झालेला सुद्धा पश्चात्ताप करु शकतो व ईश्वरी क्षमायाचना शोधू शकतो असे देवाचे वचन स्पष्ट करते. मग काय? असे असल्यास, अनुभवी देखरेखे त्याची भेट, त्याने बहिष्कृतीचे कारण झालेल्या, आचरलेल्या कृतीबद्दल पश्चाताप खरोखरी दाखविला आहे का हे प्रार्थनापूर्वक व काळजीपूर्वक निश्चित करण्यासाठी, घेतील. (पडताळा प्रे. कृत्ये २६:२०) तसे दिसून आल्यास, २ करिंथकर २:६-११ प्रमाणे करिंथमधील त्या माणसाचे जे घडल्याचे दाखविले आहे त्याप्रमाणे याला मंडळीत परत घेता येईल. तरीपण, बहिष्कृत झालेले काहीजण देवाच्या मंडळीपासून कित्येक वर्षे दूर राहिलेले आहेत. तर मग, अशांना परत येण्यासाठी मदत देण्याजोगे काही करता येईल का?
न्यायाचा दयेशी मेळ
१२, १३. आम्ही देवाचे करीत असलेले अनुकरण त्याच्या न्याय या गुणावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा अधिक का ठरले पाहिजेत?
१२ आतापर्यंत आपण निर्गम ३४:६, ७ मधील देवाच्या गुणामधील केवळ एकाविषयीची चर्चा प्रामुख्यत्वे केली आहे. तथापि, ही वचने देवाच्या न्यायापेक्षा अधिक काही सांगतात, त्यामुळे जे देवाचे अनुकरण करू इच्छितात ते केवळ न्यायाची बजावणी करण्याकडेच आपले लक्ष केंद्रित करणार नाहीत. तुम्हाला शलमोनाने बांधलेल्या मंदिराचा नमूना करायला सांगितला तर तुम्ही त्याच्या एकाच खांबाचा अभ्यास व निरिक्षण करणार का? (१ राजे ७:१५-२२) नाही, कारण यामुळे तुम्हाला मंदिराच्या प्रकाराबद्दल तसेच भूमिकेबद्दल क्वचितच समतोल चित्र मिळेल. याचप्रमाणे, आपल्याला देवाचे अनुकरण करायचे आहे तर त्याचे इतर मार्ग व गुण यांचेही अनुकरण केले पाहिजे. ते त्याचे गुण, “दयाळू व कनवाळू, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर, हजारो जणांवर दया करणारा, अधर्म . . . (याची) क्षमा करणारा” असे आहेत.
१३ दया व क्षमा हे देवाचे मूलभूत गुण आहेत. हे त्याने इस्राएलांसोबत राखलेल्या दळणवळणावरुन दिसते. न्यायी देवाने त्यांना पुनःपुनः केलेल्या अपराधास्तव शिक्षा चुकविली नाही, तरी त्याने पुष्कळ दया व क्षमा दाखविली. “त्याने आपले मार्ग मोशाला आणि आपली कृत्ये इस्राएलाच्या वंशंजाला विदित केली. परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] कनवाळू, कृपाळू, मंदक्रोध व दयामय आहे. तो सर्वदाच दोष देत राहात नाही; तो आपला क्रोध सर्वकाळ राहू देणार नाही.” (स्तोत्रसंहिता १०३:७-९; १०६:४३-४६) होय, त्याच्या व्यवहाराचा शेकडो वर्षांचा सिंहावलोकनात्मक दृष्टीकोन हे शब्द सत्य असल्याचे सिद्ध करतात.—स्तोत्रसंहिता ८६:१५; १४५:८, ९; मीखा ७:१८, १९.
१४. येशूने देवाच्या दयाळूपणाचे अनुकरण केले आहे हे कसे दाखविले?
१४ येशू ख्रिस्त हा “[देवाच्या] गौरवाचे तेज, व त्याच्या तत्त्वाचे प्रतिरुप” असल्यामुळे त्यानेही आपल्या व्यवहारात तशीच दया व क्षमा करण्याची स्वेच्छा दाखवली पाहिजे हे आम्ही अपेक्षू शकतो. (इब्रीयांस १:३) ते त्याने केले हे त्याच्या कृतीवरून समजते. (मत्तय २०:३०-३४) लूकाच्या १५ व्या अध्यायातील त्याच्या शब्दांमध्ये दयेवर अधिक भर दिल्याचे आपल्याला आढळते. तेथे देण्यात आलेले तीन दृष्टांत येशूने यहोवाचे अनुकरण केले हे सिध्द करतातव त्यातून आपल्यला महत्त्वपूर्ण धडा मिळतो.
हरवलेल्याबद्दलची काळजी
१५, १६. लूक १५ मधील दाखला देण्यात येशूला कशामुळे चालना मिळाली?
१५ ते दृष्टांत देवाने पाप्यांबद्दल बाळगलेल्या दयाळूपणाच्या आस्थेची साक्ष देतात व आपल्याला अनुकरणासाठी समतोल चित्र देतात. या दृष्टांताची पार्श्वभूमि लक्षात घ्याः “सर्व जकातदार व पापी लोक त्याचे ऐकावयास [येशू]जवळ येत होते. तेव्हा परूशी व शास्त्री या उभयतांनी अशी कुरकूर केली की, ‘हा पापी लोकांचा स्वीकार करून त्यांजबरोबर जेवतो.’”—लूक १५:१, २.
१६ येथे सर्व यहूद्यांचा समावेश होता. शास्त्री व परुशी यांना मोशेच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याचा मोठा अभिमान वाटत होता. ही जणू कायदेशीर स्वरुपाची नीतीमत्ता होती. तथापि, अशा या स्व-घोषित नीतीमत्तेशी देव सहमत नव्हता. (लूक १६:१५) येथे ज्या जकातदारांचा उल्लेख आहे ते यहूदी होते; ते रोमकरता जकात गोळा करीत असत. यापैकी पुष्कळ जण आपल्या सहयहूद्यांकडून जकातीची अधिक रक्कम घेत असल्यामुळे जकातदारांचा वर्ग एक तुच्छतेचा बनला होता. (लूक १९:२, ८) यांची “पापी” लोकांसोबत वर्गवारी करण्यात आली, ज्यामध्ये अनैतिक लोक व वेश्या यांचाही समावेश होता. (लूक ५:२७-३२; मत्तय २१:३२) पण येशूने या तक्रार करणाऱ्या धार्मिक पुढाऱ्यांना असे विचारलेः
१७. लूकाच्या १५ व्या अध्यायातील येशूने दिलेला पहिला दृष्टांत कोणता होता?
१७ “तुम्हामध्ये असा कोण मनुष्य आहे की, त्याच्याजवळ शंभर मेंढरे असता त्यातून एक हरवले, तर ती नव्याण्णव रानात सोडून देऊन हरवलेले सापडेपर्यंत त्याचा शोध करीत नाही? ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यावर घेतो, आणि घरी येऊन मित्रांस व शेजाऱ्यांस बोलावून त्यांस म्हणतोः ‘माझे हरवलेले मेंढरु सापडले आहे म्हणून माझ्याबरोबर आनंद करा.’ त्याप्रमाणे ज्यांस पश्चात्तापाची गरज नाही अशा नव्याण्णव धार्मिकांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी मनुष्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल हे मी तुम्हाला सांगतो.” हे उदाहरण त्या धार्मिक पुढाऱ्यांना चांगले कळू शकत होते; कारण मेंढरे व मेंढपाळ हे नेहमीचेच दृश्य होते. एकाची काळजी असल्यामुळे त्या मेंढपाळाने ९९ मेंढरांना त्यांच्या नेहमीच्या कुरणात चरु दिले व तो भटकलेल्या मेंढरास शोधण्यासाठी निघाला. त्याने ते मिळेपर्यंत शोध केला आणि मग, त्या घाबरलेल्या मेंढरास मोठ्या कनवाळूपणे आपल्या खांद्यावर घेऊन त्याला आपल्या कळपात परत आणले.—लूक १५:४-७.
१८. येशूच्या लूक १५ मधील दुसऱ्या दाखल्यात चित्रित केल्याप्रमाणे कशामुळे आनंद झाला?
१८ येशूने दुसऱ्या दाखल्याची जोड दिलीः “तसेच, अशी स्त्री कोण आहे की, तिच्याजवळ दहा पावल्या असता त्यातून एक पावली हरवली तर दिवा लावून व घर झाडून ती सापडेपर्यंत मन लावून शोध करीत नाही? ती सापडल्यावर ती मैत्रिणींस व शेजाऱ्यांना बोलावून म्हणतेः ‘माझी हरवलेली पावली मला सापडली, म्हणून माझ्याबरोबर आनंद करा.’ त्याप्रमाणे पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी मनुष्याबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो हे मी तुम्हास सांगतो.” (लूक १५:८-१०) एक पावली ही कामगाराचे एका दिवसाचे उत्पन्न होते. त्या स्त्रीकडे असणाऱ्या पावल्या या वंशंपरंपरागत दागिन्यातून असल्या पाहिजेत, किंवा ती बनविलेल्या दागिन्याचा एक भाग असावी. ती हरवल्यावर तिने मन लावून तिचा सापडेपर्यंत शोध घेतला व मग तिने व तिच्या मैत्रिणींनी मिळून आनंद केला. हे आपल्याला देवाबद्दल काय सांगते?
स्वर्गीय आनंद—कशाबद्दल?
१९, २०. लूकच्या १५ व्या अध्यायातील येशूचे दोन दाखले प्रामुख्यत्वे कोणाला अनुलक्षून होते, आणि यांनी कोणती मध्यवर्ती कल्पना सादर केली?
१९ येशूने साधारण दोन महिन्यांआधी आपली ओळख “उत्तम मेंढपाळ” अशी देऊन म्हटले की, तो आपल्या मेंढरांसाठी आपला जीव देतो. (योहान १०:११-१५) तर आता देण्यात आलेले दोन दृष्टांत येशूबद्दल जी टिका मांडण्यात आली होती त्याच्या प्रत्त्युतरात होती. तरीपण, हे दाखले प्रामुख्याने येशूला अनुलक्षून नव्हते. जो धडा शास्त्री व परुशांनी याकडून शिकून घ्यावयास हवा होता तो हा की, त्यांनी देवाची प्रवृत्ती व मार्ग यावर आपले लक्ष केंद्रित करावे. येशूने म्हटले होते की, एका पाप्याच्या पश्चातापामुळे स्वर्गात आनंद होतो. ते धर्मपुढारी यहोवाची सेवा करण्याचा दावा करीत होते, पण ते वस्तुतः त्याचे अनुकरण करीत नव्हते. उलटपक्षी, येशूच्या दयाळू मार्गाने त्याच्या पित्याच्या इच्छेची माहिती दिली.—लूक १८:१०-१४; योहान ८:२८, २९; १२:४७-५०; १४:७-११.
२० शंभरापैकी एक मेंढरु जर आनंदाचे कारण होते, तर मग दहापैकी एक नाणे तर नक्कीच असणार. आजदेखील, नाणी सापडल्यावर स्त्रियांना केवढा आनंद होत असतो हे आपल्याला दिसू शकते! येथे हा धडा स्वर्गाभोवती केंद्रित होता, कारण “पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी मनुष्याबद्दल” “देवाचे दूत” यहोवासोबत आपला आनंद करीत असतात. दाखल्यातील “पश्चात्ताप” या शब्दाकडे लक्ष द्या. हे दृष्टांत पश्चात्ताप करणाऱ्या पाप्यांच्या अनुषंगाने होते. आणि दोन्ही दाखल्यांनी पश्चात्तापामुळे होणाऱ्या योग्य आनंदावर भर दिला आहे.
२१. येशूच्या लूक १५व्या अध्यायातील दृष्टांतापासून आपण कोणता धडा घेण्यास हवा?
२१ नियमशास्त्राचे पालन करीत असल्याचा वरवर भास निर्माण करणाऱ्या व दिशाभूल करणाऱ्या स्वसंतुष्ट धार्मिक पुढाऱ्यांनी देव हा “दयाळू व कनवाळू . . . अपराध व पाप यांची क्षमा करणारा” आहे या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. (निर्गम ३४:६, ७) त्यांनी देवाच्या या मार्गाचे व व्यक्तीमत्त्वाचे अनुकरण केले असते तर त्यांना येशूने पश्चात्ताप प्रदर्शित करणाऱ्या पाप्यांसंबंधाने जी दया व्यक्त केली त्याबद्दल कदर वाटली असती. आता आम्हाबद्दल काय? हा धडा आम्ही आपल्या अंतःकरणी लावून तो अनुसरतो का? यासाठी, येशूचा तिसरा दृष्टांत लक्षात घ्या.
पश्चात्ताप व दया कृतीत
२२. येशूने लूकच्या १५ व्या अध्यायात कोणता तिसरा दाखला दिला आहे ते थोडक्यात सांगा.
२२ याला उधळ्या पुत्राचा दाखला म्हणतात. तरी, तो वाचताना हा पित्याच्या प्रेमाचा दाखला आहे असे पुष्कळांना का वाटते ते लक्षात येऊ शकेल. तो एका कुटुंबातील धाकट्या मुलाचे वर्णन करतो, जो आपल्या बापाकडून आपल्या वतनाचा हिस्सा मागून घेतो. (पडताळा अनुवाद २१:१७.) हा मुलगा दूर देशी जातो व तेथे आपली सर्व संपत्ती नीच कामामध्ये उधळून टाकतो, मग त्याला डुकरे सांभाळण्याचे काम पत्करावे लागते व शेवटी तर डुकरे जे खातात त्यावरच त्याला आपली भूक भागवावी लागते. शेवटी तो शुद्धीवर येतो व घरी परतण्याचा निर्धार करतो व तेही बापाजवळ एक मोलमजुरीने लावलेला कामकरी या नात्याने काम करण्याचा विचार करतो. तो घराजवळ येत असता त्याचा बाप त्याच्या स्वागतासाठी स्वतः आपली खात्रीची पावले उचलतो आणि त्याच्यासाठी मेजवानीही करतो. घरी राहून काम करणारा थोरला भाऊ या करुणेबद्दल आपला संताप दाखवतो. पण बाप म्हणतो की, त्याचा मुलगा जो मेला होता, तो परत जिवंत झाला आहे म्हणून त्यांनी आनंद केला पाहिजे.—लूक १५:११-३२.
२३. उधळ्या पुत्राच्या दाखल्यापासून आपण काय शिकून घेतले पाहिजे?
२३ हा दाखला ऐकून काही शास्त्री व परुशांना आपण थोरल्या मुलाप्रमाणे व पापी लोक धाकट्या मुलाप्रमाणे आहेत असे वाटले असेल. तरीपण, या दृष्टांताचा जो मुख्य गाभा आहे तो त्यांनी हेरला का, आणि आपल्याला देखील तो कळतो का? तो आमच्या दयाळू स्वर्गीय पित्याच्या एका उल्लेखनीय गुणास, म्हणजे पाप्याच्या अंतःकरणपूर्वक पश्चात्तापाच्या आधारावर व परिवर्तनावर क्षमा करण्याची स्वेच्छा राखून आहे याला ठळकपणे मांडतो. या दाखल्याने श्रोतेजनांना पश्चात्तापी पाप्यांच्या मुक्ततेसंबंधाने आनंदमय प्रतिसाद व्यक्त करण्यास उद्युक्त केले पाहिजे होते. याच पद्धतीने देव सर्व गोष्टींकडे बघतो व कृती करतो आणि त्याला अनुसरणारेही असेच करतात.—यशया १:१६, १७; ५५:६, ७.
२४, २५. देवाच्या कोणत्या मार्गांचे आम्ही अनुकरण करण्याचा शोध घेतला पाहिजे?
२४ खरेच, देवाच्या सर्व मार्गात न्याय दिसतो, आणि ज्यांना यहोवाचे अनुकरण करण्याची इच्छा आहे अशांनी न्याय संग्रही ठेवला पाहिजे व तो जोपासला पाहिजे. तरीपण, आमचा देव हा केवळ अमूर्त किंवा कडक न्यायामुळे प्रभावीत होत नाही. त्याची दया व प्रेम थोर आहे. हे तो अस्सल पश्चात्तापाच्या आधारावर क्षमा प्रदान करण्याची तयारी दाखविण्यावर दर्शवितो. या कारणास्तव, आम्ही देवाचे अनुकरण करणे याचा आम्ही क्षमाशील असण्याशी संबंध आहे हे पौल योग्यपणे दाखवून देतो. तो म्हणतोः “तुम्ही एकमेकांबरोबर उपकारिक व कनवाळू व्हा; जशी देवाने ख्रिस्तामध्ये तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. तर मग, तुम्ही प्रिय मुलांप्रमाणे देवाचे अनुकरण करणारे व्हा, आणि . . . तुम्हीही प्रीतीने चाला.”—इफिसकर ४:३२–५:२.
२५ खऱ्या ख्रिश्चनांनी आधीपासूच यहोवाचा न्याय व त्याची दया आणि क्षमा करण्याची स्वेच्छा यांचे अनुकरण केले आहे. आपण त्याला जितक्या अधिकपणे जाणतो तितक्या अधिकपणे आम्हाला या बाबतीत त्याचे अनुकरण करण्याचे सोपे जाते. तर मग, हा विषय, ज्याला पापाचरणाचा मार्ग धरल्यामुळे न्यायीपणाने कडक शासन देण्यात आले त्याला कसा लागू होतो? आपण पाहू या.
[तळटीपा]
a “सभाबहिष्कृत म्हणजे एखाद्या गटाने त्याच्या एकेकाळच्या चांगल्या स्थितीत असणाऱ्या सदस्याला त्याच्या सदस्यत्वाचा हक्क नाकारणे हा निश्चयी कृतीचा सर्वसाधारण अर्थ देतो. . . . ख्रिस्ती युगात बहिष्कृती ही एखाद्याला काढून टाकण्याच्या अर्थाने अनुलक्षून आली. त्यामुळे एखादा धार्मिक समाज अपराध्याला पवित्र सहभागिता, मंडळीची उपासना व शक्यतो कोणताही प्रकारचा सामाजिक संपर्क यात मिसळू देत नव्हता.”—द इंटरनॅशनल स्टँडर्ड बायबल एन्सायक्लोपिडिआ.
तुम्ही काय शिकला?
◻ इस्राएल मंडळी तसेच ख्रिस्ती मंडळी यात देवाचा न्याय कसा प्रदर्शित झाला?
◻ देवाच्या न्यायासोबत आम्ही त्याच्या दयेचे देखील का अनुकरण केले पाहिजे?
◻ कशामुळे लूकच्या १५ व्या अध्यायात देण्यात आलेले दृष्टांत सांगण्यात आले, व यांनी आम्हाला कोणता धडा शिकवला पाहिजे?
[१२, १३ पानांवरील चित्रं]
सिनाय डोंगरापुढील एर-राहाची तळवट (डावी पार्श्वभूमि)