देवाच्या दयेचे आज अनुकरण करा
“परमेश्वराच्या [यहोवा, न्यू.व.] हाती आपण पडू या. कारण त्याचे वात्सल्य [दया, न्यू.व.] मोठे आहे.”—२ शमुवेल २४:१४.
१. दाविदाला देवाच्या दयेबद्दल काय वाटले, व का?
मानवापेक्षा यहोवा हा अधिक दयाळू आहे हे दाविद राजाला अनुभवाने कळले होते. देवाचे मार्ग किंवा वाटा सर्वात चांगल्या आहेत असा आत्मविश्वास राखून त्याने त्याचे मार्ग शिकून त्याच्या सत्यतेत चालण्याची इच्छा धरली. (१ इतिहास २१:१३; स्तोत्रसंहिता २५:४, ५) तुम्हाला देखील दाविदाप्रमाणेच वाटते का?
२. गंभीर पातकांची हाताळणी कशी व्हावी याबद्दल येशूने मत्तय १८:१५-१७ मध्ये कोणता सल्ला दिला?
२ आपणाविरुद्ध पाप करणाऱ्यांच्या बाबतीत काय करावे याबद्दल पवित्र शास्त्र आम्हाला देवाच्या विचारांची अंतर्दृष्टी पुरविते. येशूने, भावी ख्रिस्ती देखरेखे होणाऱ्या आपल्या प्रेषितांना म्हटलेः “तुझ्या भावाने तुझा अपराध केला, तर जा, आणि तू व तो एकटे असताना त्याचा अपराध त्याला दाखीव. त्याने तुझे ऐकले तर तू आपला भाऊ मिळविला असे होईल.” येथे ज्या अपराधाचा समावेश होता तो क्षुल्लक व्यक्तीगत चुकीचा नव्हता तर अफरातफर किंवा निंदा यासारखा गंभीर अपराध होता. येशूने म्हटले की, यामुळे जर प्रकरण मिटले नाही तर, उपलब्ध असलेल्या साक्षीदारांना घेऊन त्याने त्या अपराध्याकडे जावे व त्याने केलेली चूक त्याला दाखवावी. हा शेवटचा पर्याय होता का? नाही. “जर त्याने त्यांचे न ऐकले तर मंडळीला कळीव; आणि त्याने मंडळीचेही न ऐकले तर तो तुला विदेशी किंवा जकातदार यांच्यासारखा होवो.”—मत्तय १८:१५-१७.
३. पश्चाताप न करणारा अपराधी “विदेशी किंवा जकातदार यांच्यासारखा” व्हावा या येशूच्या म्हणण्याचा काय अर्थ होता?
३ कोणा अपराध्याला “विदेशी किंवा जकातदार यांच्यासारखा” समजणे याचा काय अर्थ होतो हे प्रेषितांना, ते यहूदी असल्यामुळे चांगले माहीत होते. यहूदी लोक विदेश्यांचा संपर्क टाळीत, आणि रोमी जकातदार म्हणून काम करणाऱ्या यहूद्यांना ते तुच्छ समजत.a (योहान ४:९; प्रे. कृत्ये १०:२८) यास्तव, येशू येथे आपल्या शिष्यांना सांगत होता की, मंडळीने कोणा अपराध्यास धिक्कारले तर त्यांनी त्याच्यासोबत सहवास ठेवायचा नव्हता. पण ही गोष्ट, स्वतः येशूच जेव्हा कधीकधी जकातदारांसोबत होता, त्याच्याशी कशी मेळ खाते?
४. मत्तय १८:१७ मधील येशूच्या शब्दांच्या दृष्टीने पाहता, तो जकातदार व पापी लोकांशी का दळणवळण ठेवू शकत होता?
४ लूक १५:१ वचन म्हणतेः “सर्व जकातदार व पापी लोक त्याचे ऐकावयास त्याच्याजवळ येत होते.” अर्थातच, तेथे प्रत्येक जकातदार किंवा पापी नव्हता, यास्तव “सर्व” या शब्दाचा अर्थ, पुष्कळ लोक असा असला पाहिजे. (पडताळा लूक ४:४०.) पण कोणते लोक? ज्यांना आपल्या पापांची क्षमा व्हावी असे वाटत होते ते. अशा प्रकारातील काही लोक, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने जो पश्चात्तापाचा संदेश दिला त्यामुळे त्याच्याकडे आले होते. (लूक ३:१२; ७:२९) या कारणामुळे, लोक जेव्हा येशूकडे आले व त्याने त्यांना जो प्रचार केला तो त्याने मत्तय १८:१७ मध्ये दिलेल्या सल्ल्याचा भंग करीत नव्हता. हे लक्षात घ्या की, “बहुत जकातदार व पापी लोक यांनी [येशूचे ऐकले] व त्यांनी त्याला अनुसरले.” (मार्क २:१५, न्यू.व.) आपल्या वाईट जीवनाक्रमणात पुढे चालत राहावे आणि आपल्याला कसलीही मदत नको अशी इच्छा धरणाऱ्यांमधील ते नव्हते. उलटपक्षी, त्यांनी येशूचा संदेश ऐकला व तो त्यांच्या अंतःकरणाला जाऊन भिडला. आपणात बदल करीत असताना जरी त्यांच्याकडून पाप घडत होते तरी, “उत्तम मेंढपाळ,” त्यांना करीत असलेल्या प्रचारामुळे आपल्या दयाळू पित्याचे अनुकरण करीत होता.—योहान १०:१४.
क्षमा—ख्रिस्ती कर्तव्य
५. क्षमा प्रदान करण्याबद्दल देवाची मूलगामी स्थिती कशी आहे?
५ आपल्या पित्याची क्षमा करण्याची केवढी इच्छा आहे हे या उबदार खात्रींनी आपल्याला कळतेः “जर आपण स्वतःची पापे पदरी घेतो, तर तो विश्वासू व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अधर्मापासून शुद्ध करील.” “तुम्ही पाप करू नये म्हणून हे मी तुम्हास लिहितो. जर कोणी पाप केलेच तर धार्मिक असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे.” (१ योहान १:९; २:१) तर मग, बहिष्कृत झालेल्यांना क्षमा मिळणे शक्य आहे का?
६. कोणा बहिष्कृत व्यक्तीची कशी क्षमा होऊ शकते व त्याला परत कसे घेतले जाऊ शकते?
६ होय. पापाबद्दल पश्चात्ताप न केलेल्या कोणाला बहिष्कृत करताना, मंडळीचे प्रतिनिधित्व करणारे वडील त्याला हे स्पष्ट करतात की, त्याने पश्चात्ताप करणे व देवाची दया प्राप्त करणे शक्य आहे. त्याला राज्य सभागृहातील सभांना उपस्थित राहता येईल आणि तेथे दिल्या जाणाऱ्या पवित्र शास्त्रीय सूचना ऐकता येतील; ज्यामुळे त्याला पश्चात्तापी होण्यात मदत मिळू शकेल. (पडताळा १ करिंथकर १४:२३-२५.) काही काळात तो शुद्ध मंडळीत परत घेतले जाण्याचा प्रयत्न करील. त्यानंतर वडील जेव्हा त्याची भेट घेतील, तेव्हा तो पश्चात्तापी झालेला आहे का व त्याने आपले पापी मार्गाचरण सोडले आहे का हे जाणून घेतील. (मत्तय १८:१८) तसे असल्यास, त्याला २ रे करिंथकर २:५-८ च्या नमुन्यानुसार मंडळीत पुन्हा घेतले जाऊ शकते. त्या बहिष्कृत होऊन पुष्कळ वर्षे झाली असल्यास, त्याने आपली प्रगति करण्याची शिकस्त केली पाहिजे. तेथून पुढे आपले पवित्र शास्त्राचे ज्ञान वाढविण्यासाठी व रसिकता उभारण्यासाठी त्याला बरीच मदत देण्याची गरज राहील; असे केल्यामुळे तो आध्यात्मिक दृष्ट्या मजबूत ख्रिस्ती होऊ शकेल.
यहोवाकडे परतणे
७, ८. आपल्या बंदिवान लोकांच्या बाबतीत देवाने कोणता नमुना प्रस्तुत केला?
७ पण, बहिष्कृत लोकांकडे जाण्यासाठी वडीलांना स्वतःच पुढाकाकर घेता येईल का? होय. पवित्र शास्त्र दाखविते की, दया शिक्षा आवरुन धरण्यातच नव्हे तर सरळ मनोदयाची कृत्ये करण्यातही प्रकट होते. याबाबतीत आपणापुढे यहोवाचे उदाहरण आहे. आपल्या अविश्वासू बनलेल्या लोकांना बंदिवासात पाठविण्याआधी त्याने त्यांना, परत येण्याबद्दलचे भविष्यवादित भाकित प्रस्तुत केले: “हे याकोबा, हे इस्राएला, ह्या गोष्टी स्मरणात ठेव; तू माझा सेवक आहेस. . . . तुझे अपराध धुक्याप्रमाणे, तुझी पातके अभ्राप्रमाणे मी नाहीशी करन. मजकडे फीर, कारण मी तुझा उद्धार करीन.”—यशया ४४:२१, २२, न्यू. व.
८ मग, बंदिवासाच्या काळात देखील यहोवाने पुढची पावले घेऊन सरळ मनोदयाने कृती केली. त्याने आपले प्रतिनिधी, त्याचे संदेष्टे यांना इस्राएल लोकांनी त्याच्या ‘शोधास लागण्यासाठी व त्याला पावण्यासाठी’ पाठविले. (यिर्मया २९:१, १०-१४) यहेज्केल ३४:१६ मध्ये त्याने स्वतःला मेंढपाळासमान आणि इस्राएल राष्ट्राला हरवलेल्या मेंढरासमान संबोधिले: “मी हरवलेल्यांस शोधीन, हाकून दिलेल्यांस परत आणीन.” यिर्मया ३१:१० मध्ये देखील यहोवाने इस्राएलाचा मेंढपाळ असल्याचे चित्र उभे केले. तो मेंढवाड्याच्या दारशी उभा असलेला आणि हरवलेले मेंढरु परत येण्याची वाट पाहात असलेला मेंढपाळ असे स्वतःबाबतीत दाखविले नाही. उलटपक्षी, हरवलेल्या मेंढरांचा शोध घेणारा मेंढपाळ असे त्याने आपले चित्र तेथे दिले. लोक साधारणपणे पश्चात्तापी नव्हते व ते बंदिवान होते तेव्हा देखील देवाने त्यांच्या परतीची पावले पडण्यासाठी प्रयत्न केले हे लक्षात घ्या. तर आता ख्रिस्ती मंडळीसोबत व्यवहार ठेवताना मलाखी ३:६ च्या अनुषंगाने तो बदललेला नाही हे आपल्याला सांगता येईल.
९. ख्रिस्ती मंडळीत देवाच्या उदाहरणाचे कसे अनुकरण करण्यात आले?
९ तर हे, बहिष्कृत असलेल्या व आता कदाचित पश्चात्तापी बनलेल्यांसाठी पावले उचलण्यासाठी कारण देणारे ठरत नाही का? करिंथच्या मंडळीतून त्या दुष्ट माणसाला बाहेर घालवून देण्याचा आदेश प्रेषित पौलाने दिला होता हे लक्षात आणा. पण आता या माणसाने पश्चात्ताप केल्यामुळे आणि त्याला मंडळीत परत घेतले गेल्यामुळे त्याच्याबद्दल आपली प्रीती पुन्हा दाखवा असे मंडळीला आर्जविले.—१ करिंथकर ५:९-१३; २ करिंथकर २:५-११.
१०. (अ) काही बहिष्कृत व्यक्तींचा संपर्क साधण्याचे प्रयत्न करणे कोणत्या हेतूमुळे होण्यास हवे? (ब) ख्रिस्ती नातेवाईकांनी तो पुढाकार का घेऊ नये?
१० आधी उल्लेखिण्यात आलेला एन्सायक्लोपिडिआ म्हणतोः ‘बाहेर घालवून टाकण्याचे मूलभूत कारण गटाच्या दर्जांचे संरक्षण करणे हे होतेः “थोडे खमीर सगळ्या गोळ्याला फुगविते.” (१ करिंथकर ५:६). हा हेतू बहुतेक पवित्र शास्त्रीय तसेच जोडपुस्तकातील उताऱ्यांत स्पष्ट दिसतो, तथापि, २ करिंथकर ७-१० मध्ये पौलाने केलेल्या विनंतीमध्ये बहिष्कृत झाल्यावर देखील त्या विशिष्ठाबद्दल वाटणारी काळजी दिसून येते.’ (तिरपे अक्षरवळण आमचे.) यास्तव, अशा प्रकारातील कळकळ ही आज कळपाच्या देखरेख्यांनी वास्तविकपणे दाखवण्यास हवी. (प्रे. कृत्ये २०:२८; १ पेत्र ५:२) बहिष्कृताचे पूर्वीचे मित्र व नातेवाईक तो परत यावा अशी आशा करीत असतील; पण केवळ १ ले करिंथकर ५:११ मध्ये आज्ञा दिली आहे त्याच्या आदरास्तव ते या बहिष्कृत व्यक्तीसोबत सहवास ठेवत नाहीत.b बहिष्कृताला परत येण्यामध्ये आस्था आहे वा नाही याबाबत निर्णयात पुढाकार घेण्याचे ते नियुक्त मेंढपाळांवर सोपून आहेत.
११, १२. कोणत्या प्रकारच्या बहिष्कृतांची वडील देखील भेट घेऊ इच्छिणार नाहीत, पण कोणाला ते भेटू इच्छितील?
११ तथापि, काही विशिष्ट बहिष्कृतांस, जसे की, धर्मत्यागी लोक, जे ‘शिष्यांस आपल्यामागे ओढण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतात,” अशांचा संपर्क घेण्याचा पुढाकार घेणे वडीलांनाही उचित नाही. तसे बहिष्कृत लोक “खोटे शिक्षक असून ते नाशकारक पाखंडी मते गुप्तपणे प्रचारात आणतात व मंडळीला आपल्या कपटाच्या भाषणाने लुटतात.’ (प्रे. कृत्ये २०:३०; २ पेत्र २:१, ३) तसेच भांडखोर किंवा वाईट आचरणाला प्रोत्साहन देणाऱ्या बहिष्कृतांना शोधून काढण्याचा आधार पवित्र शास्त्र देत नाही.—२ थेस्सलनीकाकर २:३; १ तीमथ्य ४:१; २ योहान ९-११; यहूदा ४, ११.
१२ तथापि, बहिष्कृतांपैकी पुष्कळ असे नाहीत. एखाद्याने कदाचित, त्याला ज्या कारणामुळे बहिष्कृत केले होते ते गंभीर पापाचरण सोडून दिले असेल. दुसऱ्या कोणी पूर्वी तंबाखूचा वापर केला असेल किंवा तो गतकाळात अधिक मद्यप्राशन करणारा असेल, पण आता तो इतरांना हे चुकीचे आचरण करण्यासाठी उत्तेजित करीत नसेल. हे आठवा की, बंदिवान लोक देवाकडे परत येण्याआधीच त्याने आपले प्रतिनिधी त्यांच्याकडे पाठवून त्यांना परत येण्याचे आर्जविले होते. करिंथमधील त्या बहिष्कृत माणसाच्या बाबतीत संपर्क साधण्याचा पौलाने वा इतर कोणा वडीलाने प्रयत्न केला की नाही याबद्दल पवित्र शास्त्र काही सांगत नाही. त्या माणसाने पश्चात्ताप करून आपले अनैतिक आचरण संपुष्टात आणले तेव्हा पौलाने त्याला मंडळीत परत घेतले जावे असे मार्गदर्शन दिले.
१३, १४. (अ) दयाळूपणे भेट घेतल्यामुळे काही बहिष्कृत व्यक्ती प्रतिसाद देऊ शकतील हे कशामुळे दिसते? (ब) वडीलवर्ग ही भेट घेण्याचे कसे ठरवून देऊ शकतात?
१३ अलिकडेच अशी काही प्रकरणे हाताळली, ज्यात एक वडील बहिष्कृत केलेल्या व्यक्तीला भेटतात.c जेथे योग्य होते तेथे मेंढपाळाने मंडळीत पुन्हा येण्यासाठी कोणती पावले उचलावीत ते थोडक्यात सांगितले. काही व्यक्तींनी पश्चात्ताप दाखविला व त्यांना परत घेण्यात आले. असा हा आनंदी परिणाम सुचवितो की, मेंढपाळांनी दिलेल्या दयाळूपणाच्या भेटीला बहिष्कृत किंवा स्वतःस अलिप्त करुन घेतलेल्या व्यक्ती प्रतिसाद देऊ शकतील. पण वडीलांना हे प्रकरण कसे हाताळता येईल? वर्षातून साधारण एकदा वडीलवर्गाने आपल्या क्षेत्रात अशा प्रकारातील कोणी व्यक्ती आहेत का याचा विचार करावा.d ज्यांना बहिष्कृत होऊन एका वर्षापेक्षा अधिक काळ झाला आहे अशांवर वडील आपले लक्ष केंद्रित करतील. परिस्थिती व योग्यतेप्रमाणे ते साधारण दोन वडीलांना (जे बहुधा परिस्थितीशी परिचित असतील) त्या विशिष्ठाची भेट घेण्यास नियुक्त करतील. जे कठीण, धोकादायक वृत्ती दाखवीत आहेत किंवा ज्यांनी स्पष्ट केले आहे की अशांना मदतीची गरज नाही अशांची भेट घेऊ नये.—रोमकर १६:१७, १८; १ तीमथ्य १:२०; २ तीमथ्य २:१६-१८.
१४ हे दोन मेंढपाळ त्या व्यक्तीला दूरध्वनीमार्फत छोटीसी भेट घेण्यासंबंधाने कळवू शकतील, किंवा योग्य वेळी ते त्याच्या घरी जातील. भेटीचे दरम्यान त्यांनी कडक किंवा थंडही असू नये, तर त्यांना वाटणारी दयेची कळकळ उबदारपणे दाखवावी. गेल्या प्रकरणाची उजळणी करण्याऐवजी ते यशया १:१८; ५५:६, ७; आणि याकोब ५:२० या वचनांची चर्चा करावी. त्या व्यक्तीला देवाच्या कळपात परत येण्याची इच्छा असल्यास त्याने कोणती पावले उचलावीत हे त्यांनी दयेने समजावून सांगावे. यात पवित्र शास्त्र, वॉचटावर सोसायटीची प्रकाशने वाचणे व राज्य सभागृहात सभांना येणे हे समाविष्ट आहे.
१५. बहिष्कृत व्यक्तीसोबत संपर्क साधणाऱ्या वडीलांनी कोणकोणत्या गोष्टी ध्यानात ठेवाव्या?
१५ त्या व्यक्तीठायी पश्चात्तापाची भावना आहे का व पुन्हा त्याची भेट घेतली जावी का हे जाणून घेण्यासाठी वडीलांठायी सूज्ञान व समज असली पाहिजे. त्यांनी हे ध्यानात ठेवावे की, काही बहिष्कृत व्यक्ती ‘पश्चात्ताप होईल असे पुनः नवीन होणे’ करणार नाहीत. (इब्रीयांस ६:४-६; २ पेत्र २:२०-२२) भेट घेतल्यावर यासंबंधीचा तोंडी अहवाल हे दोघे वडील मंडळीच्या सेवा समितीला कळवतील. ते, मग, ही माहिती, वडीलवर्गाच्या पुढल्या सभेच्या वेळी कळवतील. वडीलांच्या दयाळू पुढाकाराने देवाचा हा दृष्टीकोण प्रवर्तित केला असेलः “‘मजकडे वळा, म्हणजे मी तुम्हाकडे वळेन.’ असे सेनाधीश परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] म्हणतो.”—मलाखी ३:७.
दुसरी दयाळू मदत
१६, १७. ज्याला बहिष्कृत करण्यात आले आहे त्याच्या कौटुंबिक सदस्यांबद्दल आम्ही कोणता दृष्टीकोण धरावा?
१६ मग, आम्हापैकी जे देखरेखे नाहीत व जे बहिष्कृत व्यक्तीसंबंधाने असा पुढाकार घेणार नाहीत त्या आम्हाबद्दल काय? या व्यवस्थेशी सुसंगत तसेच यहोवाच्या अनुकरणार्थ आपल्याला काय करता येईल?
१७ जोपर्यंत कोणी बहिष्कृत किंवा स्वतःस अलिप्त करून आहे अशांच्या बाबतीत आपण ही सूचना अनुसरली पाहिजेः “बंधु म्हटलेला असा कोणी जारकर्मी, लोभी, मूर्तिपूजक, चहाड, मद्यपी किंवा वित्त हरण करणारा असला तर तशाची संगत धरू नये, त्याच्या पंक्तीस बसू नये.” (१ करिंथकर ५:११) पण या शास्त्रवचनीय मार्गदर्शनामुळे आमचा, ज्या घरात बहिष्कृत व्यक्ती राहात आहेत त्याच्या ख्रिस्ती कुटुंबाच्या दृष्टीकोणावर परिणाम होऊ देऊ नये. प्राचीन यहूद्यांनी जकातदारांबद्दल आपला द्वेष इतक्या प्रबळ रितीने दाखवला की, तो त्या जकातदारांच्या कुटुंबियांपर्यंतही पोंचला. येशूने याला दुजोरा दिला नाही. त्याने असे म्हटले की, जो पापी मदत नाकारतो तो “विदेशी किंवा जकातदार” व्हावा; ख्रिस्ती कौटुंबिक सदस्यांना या पद्धतीने वागविले जावे असे त्याने म्हटले नाही.—मत्तय १८:१७.
१८, १९. कोणा बहिष्कृत व्यक्तीच्या घरच्या विश्वासू सदस्यांच्या बाबतीत आपल्याला आपले ख्रिस्तीयत्व कोणकोणत्या मार्गाने प्रदर्शित करता येईल?
१८ जे विश्वासू ख्रिस्ती आहेत अशा कौटुंबिक सदस्यांना आम्ही खासपणे आधार दिला पाहिजे. कोणा बहिष्कृत व्यक्तीबरोबर राहात असल्यामुळे व जो वेळप्रसंगी त्यांच्या आध्यात्मिक ध्येयांना निराश करण्याचा प्रयत्न करत असेल अशामुळे त्यांना त्रास व अडखळणे उद्भवत असतील. ख्रिश्चनांनी आपल्या घरी भेट देऊ नये असे त्या बहिष्कृताला वाटत असेल. आणि जर कोणी निष्ठावंत कौटुंबिक सदस्यांना भेटायला आलेच तर तो कदाचित स्वतःला पाहुण्यांपासून अलिप्त ठेवण्याचे सौजन्य दाखवणार नाही. कुटुंबाच्या ख्रिस्ती सभा व संमेलनाला जाण्यामध्ये देखील तो कदाचित अडथळा आणीत असेल. (पडताळा मत्तय २३:१३) अशाप्रकारच्या गैरसोयीच्या स्थितीत असणाऱ्या कौटुंबिक सदस्यांना आम्ही खरेपणाने दया व्यक्त केली पाहिजे.—२ करिंथकर १:३, ४.
१९ कुटुंबातील अशा विश्वासू जनांसोबत ‘धीर देऊन बोलणी करणे’ आणि प्रोत्साहनदायक संभाषण करुन ही दया आम्हाला एकाप्रकारे व्यक्त करता येईल. (१ थेस्सलनीकाकर ५:१४) तसेच सभेच्या आधी व नंतर, क्षेत्रकार्यात असताना किंवा इतर वेळीही आधार देण्याच्या उत्तम संध्या आहेत. आम्ही बहिष्कृतपणाबद्दलचा उल्लेख न करता इतर उभारणीकारक गोष्टींची चर्चा करू शकतो. (नीतीसूत्रे २५:११; कलस्सैकर १:२-४) अशा ख्रिस्ती कुटुंबाला वडील मेंढपाळकत्वाची भेट देण्याची काम तर करतीलच, पण आम्हालाही तेथील बहिष्कृत व्यक्तीशी दळणवळण न ठेवता कुटुंबातील इतर सभासदांना घरी भेटता येईल. भेट घेताना किंवा टेलिफोन केल्यावर ‘काय पाहिजे, किंवा कोण आहे?’ अशी विचारणा त्या बहिष्कृताने केल्यास आम्ही कोणाची भेट घेऊ इच्छितो ते साधेपणात सांगावे. कधीकधी ख्रिस्ती कुटुंबातील सदस्यांना आम्ही दिलेले, आमच्या घरी येण्याचे आमंत्रण स्वीकारता येईल. यात मुद्दा हा आहे: ते—तरुण असोत की वृद्ध—आमचे सहसेवक आहेत, देवाच्या मंडळीचे प्रिय सदस्य आहेत, अशांना वेगळे ठेवू नये.—स्तोत्रसंहिता १०:१४.
२०, २१. एखाद्याला मंडळीत परत घेण्यात आल्यावर आपल्याला कसे वाटावे व आपण कशी प्रतिक्रिया दाखवावी?
२० जेव्हा बहिष्कृताला मंडळीत परत घेण्यात येते तेव्हा दया दाखविण्याचा आणखी एक मार्ग उघडा होतो. येशूने दिलेल्या दृष्टांतात दाखवले आहे की, ‘पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी मनुष्याबद्दल’ स्वर्गात आनंद होतो. (लूक १५:७, १०) पौलाने करिंथकरांना त्या बहिष्कृत झालेल्या मनुष्याबद्दल असे लिहिलेः “त्या मनुष्याने आपल्या दुःखातिशयात बुडून जाऊ नये म्हणून तुम्ही उलट [दयेने, न्यू.व.] त्याला क्षमा करून त्याचे सांत्वन करणे हे बरे. यामुळे मी तुम्हास विनंति करतो की, तुम्ही त्याजवर प्रीती करण्यचे ठरवा.” (२ करिंथकर २:७, ८) एखाद्याला मंडळीत परत घेतल्यानंतर आपण हा सल्ला सातत्याने लागू करू या.
२१ येशूने उधळ्या पुत्राचा दिलेला दाखला एक धोक्याची सूचना देतो, जो आम्ही टाळणे आवश्यक आहे. उधळ्या पुत्र परतला तेव्हा त्याच्या थोरल्या भावाला आनंद झाला नाही, उलट तो चिडला. आपण त्याच्यासारखे होऊ नये आणि ज्याला मंडळीत घेण्यात आले आहे अशांच्या मागच्या कृत्याबद्दल वाईट ते बोलून कुरकूरू नये. उलटपक्षी, आमच्या भावना त्या पित्यासारख्या असाव्या, ज्याने यहोवासारखा प्रतिसाद दाखवला होता. जो मुलगा हरवला होता व मरणात जमा झाला होता तो परत जिवंत झालेला असा आढळला म्हणून बापाला खूप आनंद वाटला होता. (लूक १५:२५-३२) याचप्रमाणे, आपणही मंडळीत परत घेतलेल्या बांधवासोबत मुक्तपणे बोलावे व त्याला उत्तेजन द्यावे. होय, आपला स्वर्गीय पिता क्षमाशील व दया दाखविणारा आहे, तसेच आपणही दया दाखवणारे आहोत हे दाखवून देण्यास हवे.—मत्तय ५:७.
२२. आम्ही यहोवाचे अनुकरण करण्यामध्ये कशाकशाचा समावेश आहे?
२२ आपल्याला आपल्या देवाचे अनुकरण करायचे आहे तर त्याच्या आज्ञा व न्यायाच्या अनुसार आपण दया दाखवली पाहिजे यात काहीच प्रश्न नाही. स्तोत्रकर्त्याने त्याचे असे वर्णन केले आहेः “परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] कृपाळू व कनवाळू आहे, तो मंदक्रोध व अतिदयाळू आहे. परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] सगळ्यांना चांगला आहे. त्याची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यांवर आहे.” (स्तोत्रसंहिता १४५:८, ९) ख्रिश्चनांनी अनुकरण करण्याजोगा हा केवढा प्रेमळ नमुना आहे!
[तळटीपा]
a “पॅलेस्टाईनमध्ये राहणारे यहूदी लोक जकातदारांना विशेषेरित्या विविध कारणांमुळे तुच्छ समजतः (१) ते इस्राएल प्रदेशावर प्रभुत्व करणाऱ्या विदेशी सत्तेसाठी पैसा गोळा करीत व त्यामुळे अप्रत्यक्षरित्या त्यांच्या रोषास पात्र होते; (२) ते तत्त्वहीनतेबद्दल अगदीच कुविख्यात होते व आपल्याच लोकांच्या पैशावर श्रीमंत बनले होते; आणि (३) त्यांच्या कामामुळे ते विदेश्यांच्या नित्य संपर्कात येत व त्यांना सांप्रदायिक अशुद्ध गोष्टी देत. जकातदारांबद्दलचा तिरस्कार न[वीन] क[रार] आणि रब्बी लिखाणात दिसतो. . . . रब्बींच्या मते तर हा तिरस्कार जकातदारांच्या कुटुंबियांनाही दाखविला जावा असे समजले जाई.”—द इंटरनॅशनल स्टँडर्ड बायबल एन्साक्लोपिडिआ.
b कोणा ख्रिस्ती घरात एखादा बहिष्कृत व्यक्ती असल्यास तो घरातील सर्वसाधारण, दैनंदिनीच्या व्यवहारात व कार्यात सहभागी असू शकतो. यात कुटुंबीय या नात्याने जेव्हा आध्यात्मिक साहित्याचा विचार होत असतो तेव्हा उपस्थित असण्याचेही समाविष्ट आहे.—पहा, द वॉचटावर, नोव्हेंबर १५, १९८८, पृष्ठे १९-२०.
c पहा, यहोवाच्या साक्षीदारांचे १९९१चे वार्षिक अहवाल पुस्तक, पृष्ठे ५३-४.
d कोणा साक्षीदाराला घरोघरच्या प्रचारकार्यात किंवा इतर मार्गाने त्यांच्या क्षेत्रातील बहिष्कृत व्यक्तीची माहिती मिळाली तर ती त्याने वडीलांना कळवावी.
तुम्ही हे मुद्दे लक्षात घेतले का?
◻ यहूदी लोक जकातदार व पापी लोक यांना कसे वागवीत, पण येशूने अशापैकी काहींसोबत का संपर्क ठेवला?
◻ कित्येक हरवलेल्यांच्या बाबतीत जो दयाळू पुढाकार घेतला जातो त्याला कोणता शास्त्रवचनीय आधार आहे?
◻ वडीलांच्या वर्गाला असा पुढाकार कसा घेता येईल व कोणासंबंधाने?
◻ मंडळीत परत घेतलेल्यांच्या बाबतीत, तसेच बहिष्कृतांच्या कुटुंबासंबंधाने आपल्याला दया कशी दाखवता येईल?
[१९ पानांवरील संक्षिप्त आशय]
एकेकाळी देवाच्या शुद्ध व आनंदी मंडळीचा भाग असणाऱ्या पण आता बहिष्कृत किंवा स्वतःस अलिप्त केलेल्या स्थितीत असलेल्यांनी असे राहण्याची जरुरी नाही. उलट, त्यांनी पश्चात्ताप करावा, व मंडळीतील वडीलांसोबत संपर्क साधण्यास पुढे यावे. परतीचा मार्ग उघडा आहे.