वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w91 १०/१ पृ. २९-३२
  • यहोवा त्याच्या कार्याचा कसा उत्कर्ष करतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा त्याच्या कार्याचा कसा उत्कर्ष करतो
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • मिळती जुळती माहिती
  • “पैसा येतो तरी कोठून?”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • “सर्व चांगल्या देणगीचा” दाता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • राज्य-प्रचारकार्यासाठी काही जण कशाप्रकारे देणग्या देतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • ‘आपल्या द्रव्याने यहोवाचा सन्मान करा’—कसे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
w91 १०/१ पृ. २९-३२

यहोवा त्याच्या कार्याचा कसा उत्कर्ष करतो

गेल्या काही दशकात यहोवाच्या साक्षीदारांमध्ये अपूर्व वृद्धी झाली आहे. गेल्या दहा वर्षातच त्यांच्या मंडळ्यांची संख्या ४२,६०० वरुन २१२ देशात ६०,१९२ मंडळ्यापर्यंत वाढली आहे. हे पाहून काही लोक विचारतातः साक्षीदारांच्या कामाला आर्थिक बळ कोठून मिळते? या लेखात या व अशा प्रश्‍नांची उत्तरे वॉचटावर संस्था देत आहे.

यहोवाच्या साक्षीदारांमध्ये दशमांश घेण्याची प्रथा आहे का?

नाही. इस्राएलात प्राचीन काळी लेवी व याजक या देवाच्या मंदिरात काम करणाऱ्‍यांच्या चरितार्थासाठी, मोशेच्या नियमशास्त्रात दशमांश देण्याबद्दल आज्ञा देण्यात आली होती. (गणना १८:२१, २४-२९) काही शहरांचा अपवाद वगळता या वंशाला जमीन नव्हती. त्यामुळे त्यांना या विशेष मदतीची गरज होती. या व्यतिरिक्‍त, मंडपाचे व नंतर मंदिराचे बांधकाम यासारख्या विशेष कार्यांसाठी ऐच्छिक दान करण्यास विश्‍वासू इस्राएली मोकळे होते.—निर्गम २५:१-८; १ इतिहास २९:३-७.

तथापि, येशूच्या मृत्युनंतर, पवित्र शास्त्र म्हणते की, ‘त्याने आज्ञविधींचे नियमशास्त्र नाहीसे केले.’ (इफिसकर २:१५; कलस्सैकर २:१३, १४) दुसऱ्‍या शब्दात म्हणायचे तर, देवाच्या दृष्टीने यहुदी व ख्रिस्ती यापैकी कोणावरही, त्यानंतर, नियमशास्त्र बंधनकारक राहिले नाही. त्यामुळे, मंदिरात नेमाने दिल्या जाणाऱ्‍या बळींसारख्या, नियमशास्त्राच्या इतर वैशिष्ठ्यांबरोबर दशमांश देणे हे देखील विश्‍वासू जणांना आवश्‍यक राहिले नाही.

ख्रिश्‍चनांमध्ये देण्याची प्रेरणा प्रीतीमुळे असते, नियमामुळे नव्हे. यहूदीयातील गरजूं ख्रिस्ती लोकांसाठी निधी गोळा करण्याची व्यवस्था करताना प्रेरित पौलाने या तत्त्वाचा खुलासा केला. तो म्हणालाः “प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे. दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो.” (२ करिंथकर ९:७) स्वेच्छेने देण्याची ही पवित्र शास्त्रावर आधारीत असणारी प्रथा यहोवाचे साक्षीदार पाळतात.

तुम्ही निधी उभारण्यासाठी निधी-उभारणीची भोजने, वर्गणी पाकिटे, निधी गोळा करण्यासाठी लोकांना भेटून मागणी करणे व असे इतर प्रकार अनुसरता का?

नाही. दान देण्यासाठी खऱ्‍या ख्रिश्‍चनांवर जबरदस्ती करावी लागत नाही किंवा बक्षिसांची गाजरे दाखवून लाच द्यावी लागत नाही. निरनिराळ्या हौसी, बाजार, लॉटऱ्‍या, मेळे, चर्चमधील राखीव जागा भाड्याने देणे वा वर्गणी गोळा करण्यास थाळ्या फिरविणे अशा गोष्टींचा आश्रय घेणारे धार्मिक गट प्रकट करतात की, त्यांनी त्यांच्या लोकांना आध्यात्मिक भोजन दिलेले नाही. यामुळेच देवाचा आत्मा त्यांच्या मंडळ्यातील सभासदांना मुक्‍तहस्ते निधी देण्याची प्रेरणा देत नाही. मागे पडलेल्या दशमांशाच्या प्रथेचा आश्रय घेणाऱ्‍यांच्या बाबतीत देखील तेच म्हणता येते.—मत्तय १०:८.

नवी राज्य सभागृहे, शाखा कार्यालये तसेच ब्रुकलिन व पॅटरसन येथील जागतिक प्रधान कार्यालयाचा विस्तार या सारख्या योजनांसाठी तुम्ही पैसा कसा उभा करता?

यहोवा आपल्या साक्षीदारांवर त्याचा पवित्र आत्मा ओतून, “चांगले ते करावे, सत्कर्माबद्दल धनवान असावे, परोपकारी व दानशूर असावे, जे खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल असा स्वतःसाठी साठा करावा,” अशी क्षमता त्यांना देतो. (१ तीमथ्य ६:१८, १९) राज्याच्या कार्याला हरतऱ्‍हेने मदत करण्यासाठी हा आत्मा यहोवाच्या साक्षीदारांना प्रेरणा देतो.

उदाहरणार्थ, १९८९ मध्ये २१२ देशातील ३७,८७,१८८ साक्षीदारांनी इतरांना देवाचे वचन शिकवण्यात ८३,५४,२६,५३८ तास खर्च केले, आणि देवाच्या वचनाची आस्था असलेल्या लोकांसोबत ३४,१९,७४५ ठिकाणी नियमित रुपात पवित्र शास्त्र अभ्यास केले. त्यासाठी जो काही खर्च आला असेल तो अभ्यास देणाऱ्‍या साक्षीदारांनी सोसला आहे. प्रीतीखातर घेतलेल्या कष्टाचे बक्षीस म्हणून यहोवाने २,६३,८५५ नवीन बाप्तिस्मा घेतलेल्या साक्षीदारांची भर दिली आहे.

यहोवाचे साक्षीदार व आस्थेवाईक लोकांना हीच औदार्याची वृत्ती आर्थिक सहकार्य देण्यास चालना देते. स्थानिक मंडळ्यांचा नेहमीचा खर्च भागवण्यात मदत करण्याव्यतिरिक्‍त, त्यांच्या राज्य किंवा संमेलन सभागृहाची दुरुस्ती, विस्तार किंवा एखादे नवे बांधावयाची गरज पडल्यास त्या बांधकामाच्या कार्याला ते मदत करतात. झपाट्याने होणाऱ्‍या वाढीमुळे दर वर्षी मोठ्या संख्येने राज्य सभागृहे बांधावी लागतात. काहींना हजारो डॉलर्स खर्च येतो. त्यांचा खर्च स्थानिक साक्षीदार त्यांच्या ऐच्छिक देणग्या व श्रमदानाने सोसतात.

शिवाय, अनेक देशांमध्ये शाखांच्या छपाई व कार्यालयाच्या सोयी तसेच राहण्याच्या इमारती वाढवाव्या किंवा नव्या बांधाव्या लागल्या आहेत. संघटनेच्या विस्तारामुळे वाढता कर्मचारी वर्ग व अधिक सोयी यांना सामावून घेण्यासाठी हे करावे लागले आहे. न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन तसेच पॅटरसन येथील बांधकाम व दुरुस्त्यांच्या योजनांप्रमाणे ही कामेही स्वखुषीने दिलेली दाने व श्रमदान यांच्या मदतीने होतात. शक्य असेल तेथे स्थानिक साक्षीदार बांधकामाला आर्थिक बळ पुरवतात. काही ठिकाणी दुसऱ्‍या देशांमधून, आर्थिक व कुशल कामगारांच्या रुपात, शाखांना मदत मिळण्याची व्यवस्था वॉचटावर सोसायटी करते. अशा रितीने संस्थेच्या मार्गदर्शनाखाली “समानता” होते.—२ करिंथकर ८:१४.

अनेक धार्मिक गटांप्रमाणे तुम्ही इस्पितळे वा दवाखाने चालवणे व मदतीची कामे आणि इतर सामाजिक कार्ये का करीत नाही?

यहोवाचे साक्षीदार शक्य असेल तेथे युद्ध वा नैसर्गिक आपत्तीनंतर उद्‌भवणाऱ्‍या आणिबाणीच्या प्रसंगी विनाविलंब मदत करतात. वस्तुस्थिती अशी आहे की, बहुधा अन्‍न, वस्त्र व पुनर्बांधणीच्या कामात मदत करण्यासाठी स्वयंसेवक घेऊन, घटनास्थळी सर्वप्रथम पोचणाऱ्‍यात ते आहेत. परंतु जीवनाच्या सुरक्षिततेसाठी असलेले अग्नी-शमन खाते वा पोलिस खाते जसे ते चालवत नाहीत तसेच इस्पितळे व दवाखानेही ते चालवत नाहीत.

ते सुवार्तेचे समर्पित सेवक आहेत व अंत येण्यापूर्वी देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा सर्व जगात प्रचार व शिकवण हे त्यांचे नियुक्‍त कार्य आहे. (मत्तय २४:१४) येशूने म्हटल्याप्रमाणे पीक फार व कामकरी थोडे आहेत. इतर कार्ये कितीही कौतुकास्पद असली तरी ती करण्यासाठी या सर्वात महत्त्वाच्या कामाकडे दुर्लक्ष करणे अक्षम्य ठरेल.—मत्तय ९:३७, ३८.

परिस्थिती अशी आहे की, यहोवाच अनेक साक्षीदार डॉक्टर, नर्सेस व इस्पितळात मदतनीस आहेत. परंतु हे काम त्यांचे प्रमुख कार्य, ख्रिस्ती सेवेच्या दुय्यम स्थानी असल्याचे ते मानतात.

वॉचटावर सोसायटीचे कोणी अधिकारी किंवा सभासद तुमच्या विस्तृत छपाई कार्यापासून पैसे कमवतात का?

मुळीच नाही! कायद्यानुसार ही संस्था ना नफा ना तोटा तत्त्वावर चालणारी आहे. त्यात भागधारक नाहीत, नफ्याचा हिस्सा नाही, पगारही नाहीत. प्रमुख कार्यालयातील प्रत्येक सेवकाने, त्यात संस्थेचे अध्यक्ष व संचालक यांचाही समावेश आहे, अल्पसंतुष्टतेची कायदेशीर प्रतिज्ञा घेतलेली आहे. त्याला अन्‍न, निवारा व गरजेची वैद्यकीय मदत तसेच हातखर्चासाठी थोडेसे पैसे दिले जातात. एखाद्या साक्षीदाराला संस्थेच्या कामासाठी प्रवास करावा लागल्यास बहुधा संस्था त्याचा खर्च देते.

याशिवाय, लग्न लावण्यासाठी, बाप्तिस्मा व दफन करण्यासाठी जगभरात कोठेही आमचे सेवक फी आकारीत नाहीत. जाहीर भाषणाच्या सभांना तसेच अधिवेशनांना प्रवेश फी नसते.

वर्गणीसाठी थाळ्या फिरवल्या जात नाहीत तर स्थानिक मंडळ्या त्यांचा खर्च भागवण्यासाठी निधी कसा जमवतात?

लोकांची इच्छा असल्यास व्यक्‍तीगत ऐच्छिक देणग्या देता याव्या म्हणून राज्य सभागृहामध्ये अनुदानासाठी पेट्या ठेवलेल्या असतात. (२ राजे १२:९) लहान वा मोठ्या सर्व देणग्यांची कदर केली जाते. (मार्क १२:४२-४४) एकूण मिळालेल्या देणग्या, खर्च व जागतिक प्रचाराचे कार्य आणि इतर योजनांच्या मदतीसाठी वॉचटावर सोसायटीला मंडळीने दिलेल्या देणग्या ह्‍यांची माहिती मंडळीला देण्यासाठी हिशोब सांभाळणारा सेवक महिन्यातून एकदा एक संक्षिप्त निवेदन करतो.

या व्यवस्थेबद्दल लोकांना माहिती झाली की, प्रत्येक जण “आपणाला यश मिळाले असेल त्या मानाने” त्यात सहभागी होण्यास मोकळा असतो. (१ करिंथकर १६:२) जगभरात ६३,००० पेक्षा अधिक मंडळ्यांमध्ये हीच प्रथा आहे.

पेंटेकॉस्टला, सुरवातीचे ख्रिस्ती सर्व गोष्टी सामायिक समजत असत. यहोवाचे साक्षीदारही असे करतात का?

इ. स. ३३च्या पेंटेकॉस्टनंतर दूरवरुन आलेले व नुकताच ख्रिस्ती धर्म स्वीकारलेले यहुदी अधिक आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी यरुशलेममध्ये थांबले तेव्हा बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. त्यांना तात्पुरती निवाऱ्‍याची व अन्‍नाची गरज भासली. त्यामुळे दीर्घकाळ परस्पर सहवास करता यावा म्हणून स्थानिक ख्रिस्ती लोकांनी मालमत्तेची ऐच्छिक विक्री केली व त्यामधून मिळालेला पैसा सामायिकरित्या वापरला. (प्रे. कृत्ये २:१, ३८-४७; ४:३२-३७) विक्री वा देणगी करण्याची सक्‍ती कोणावरही नव्हती. (प्रे. कृत्ये ५:१-४) काही लोक समजतात तसे हा समाईकपणा म्हणजे कम्युनिस्ट मतप्रणाली नव्हती. ती केवळ एक तात्पुरती व्यवस्था होती. ते ख्रिस्ती लोक आपापल्या घरी परतल्यावर ती संपुष्टात आली.

भौतिक दानाने पापक्षालन होते असे तुम्ही शिकवता का?

छे, मुळीच नाही! पवित्र शास्त्र म्हणतेः “वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणूकीपासून, सोने, रुपे अशा नाशवंत वस्तुंनी नव्हे तर, निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त, त्याच्या मूल्यवान रक्‍ताने तुम्ही मुक्‍त झाला आहा.”—१ पेत्र १:१८, १९.

यहोवाचे साक्षीदार तारणासाठी, येशूच्या खंडणीच्या बलिदानावर विश्‍वास ठेवतात. ऐच्छिक देणग्या दिल्यामुळे आपल्याला तारण मिळेल या अपेक्षेने ते त्या देणग्या देत नाहीत. तरीही, देवाच्या नीतीमान नवीन जगाच्या सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी बऱ्‍याच मोठ्या निधीची गरज लागते हे त्यांना माहीत आहे. (२ पेत्र ३:१३) आणि या घोषणेसाठी देणग्या देणे हा यहोवाने दिलेला विशेष अधिकार आहे असे त्यांना वाटते.

आपला मुलगा शलमोन जे यहोवाचे मंदिर बांधणार होता त्याच्यासाठी मोठ्या देणग्या देताना दावीद राजाने अशी प्रार्थना केलीः “हे यहोवा, बल, पराक्रम, वैभव, जय व प्रताप ही तुझीच आहेत. कारण आकाशात व पृथ्वीत जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. . . . याप्रमाणे आम्हास स्वखुषीने अर्पण करायची शक्‍ती असावी असा मी तरी कोण व माझे लोक कोण? कारण सर्व वस्तु तुझ्यापासून आहेत, आणि जे आम्हाला तुझ्या हातून मिळाले त्यातूनच आम्ही तुला दिले आहे.”—१ इतिहास २९:११, १४, पं. रमाबाई भाषांतर.

आज यहोवाच्या साक्षीदारांना व नीतीमत्वाकडे इतर झुकलेल्या लोकांना, दावीदाला वाटले तसेच वाटते. त्याच्या सेवेला दिलेली प्रत्येक गोष्ट त्याच्याचकडून येते हे जाणून यहोवाची प्रशंसा करण्याच्या कामाला मदत करण्यासाठी देणग्या देण्याचा विशेष अधिकार असल्याबद्दल त्यांना आनंद वाटतो. यहोवा या वृत्तीला आशीर्वाद देतो व अशा रितीने त्याच्या कार्याचा उत्कर्ष करतो.

[३० पानावरील चौकट]

राज्य कार्यास काहीजण कसे अनुदान देतात

◻ देणग्याः पैशांचे आपखुशीने दिलेले अनुदान थेटपणे वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ इंडिया, एच-५८, जुना खंडाळा रस्ता, लोणावळा ४१० ४०१, महा. येथे किंवा या मासिकाच्या प्रकाशकांकडे पाठवावे. मालमत्ता जशी की इस्टेट व शिवाय दागिने वा चीजवस्तु दान केल्या जाऊ शकतात. या देणगीसोबत हे सरळपणे दान केले आहे हे स्पष्ट करणारे पत्र असावे.

◻ सशर्त दान योजनाः वॉचटावर सोसायटीच्या ट्रस्टला वैयक्‍तीक गरजेप्रसंगी ते देणगीदारास परत केले जातील या अटीवर पैसे दिले जाऊ शकतात.

◻ इन्शुअरन्सः लाईफ इन्शुअरन्स पॉलिसीवर किंवा निवृत्ती वेतन योजनेवर देणगी उपभोग घेणारा म्हणून द वॉचटावर सोसायटीचे नाव दिले जाऊ शकते. अशा योजनेबाबत संस्थेला कळविले जावे.

◻ ट्रस्ट्‌सः बँक सेव्हींग्ज खाते संस्थेस विश्‍वस्त यानाते ठेऊन चालविता येते. असे केल्यास कृपया संस्थेला कळवा. ठेवी, लेखी करारनामे व मालमत्ता तिच्या किंवा त्याच्या जीवनभरात देणगीदाराच्या फायद्याच्या दान योजनेखाली देणगी म्हणून दिल्या जाऊ शकतात. ही पध्दत खर्च व स्वइच्छित मृत्युपत्राची अनिश्‍चितता काढून टाकते. याची खात्री देताना मृत्युप्रसंगी मालमत्ता संस्थेला प्राप्त होते.

◻ मृत्युपत्रेः मालमत्ता वा धन मृत्युनंतर वॉचटावर संस्थेच्या हवाली कायदेशीरपणे दिले जाऊ शकते. त्याची प्रत संस्थेस पाठवा.

याविषयीच्या अधिक माहिती व सल्ल्यासाठी वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रक्ट सोसायटी ऑफ इंडिया, एच-५८ जुना खंडाळा रस्ता, लोणावळा ४१० ४०१, महा. यांना किंवा या मासिकाच्या प्रकाशकांना लिहा.

[३१ पानांवरील चित्रं]

पॅटरसन, न्यूयॉर्क येथील बांधकाम चालू असलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या, पवित्र शास्त्र शैक्षणिक केंद्राचा एक भाग

[३२ पानांवरील चित्रं]

स्वेच्छेने देणग्या देणाऱ्‍या आपल्या लोकांच्या बांधकामाचा यहोवा उत्कर्ष करतो

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा