सार्वकालिक भवितव्यासाठी बांधणी करणे
“प्रत्येक घराचा कोणी ना कोणी तरी बांधणारा असतोच, पण सर्व गोष्टींची बांधणी करणारा देव आहे.”—इब्रीयांस ३:४, वेमाऊथ.
१, २. (अ) तारवाची आखणी कोणी केली व ज्या सूचना देण्यात आल्या त्या केवढ्या सविस्तर होत्या? (ब) आज आम्ही नोहाप्रमाणे आज्ञाधारक राहणे का महत्वाचे आहे?
सुमारे ४,४०० वर्षांआधी यहोवाने नोहाला जीवन रक्षणार्थ एक तारू बांधण्याची आज्ञा दिली. तरीपण, पाण्यावर तरंगू शकेल अशी वाटेल ती वस्तु उभारण्याचे देवाने नोहावर टाकले नाही. उलटपक्षी त्याने, याविषयी वापरण्यात येणारे साहित्य, आराखडा, लांबी, रुंदी, उंची, हवा खेळती राहण्यासाठी कवाडे तसेच आतील व बाहेरील शेवटची सफाई याबाबतीत असणाऱ्या सर्व सूचना त्याला सविस्तरपणे दिल्या. “नोहाने तसे केले. देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले.”—उत्पत्ती ६:१३–१६, २२.
२ हे, यहोवाच्या आधुनिक साक्षीदारांसाठी केवढे सुंदर उदाहरण! नोहाप्रमाणेच आम्हालाही जीवन रक्षणाचे काम सोपविण्यात आले आहे आणि हे तारण आज ‘जे लक्षावधि जिवंत आहेत जे कदाचित कधीही मरू शकणार नाहीत,’ त्यांचा शोध घेण्याच्या अनुषंगाने आहे. तर मग, नोहा होता त्याप्रमाणे आम्हीही आज्ञाधारक राहणे किती महत्वाचे आहे बरे! ‘धार्मिकतेचे उपदेशक’ या नात्याने सेवा सादर करताना आम्ही नोहापेक्षा थोर असणाऱ्या येशू ख्रिस्ताचा नमुना अनुसरणे हे देखील किती तातडीचे आहे!—२ पेत्र २:५.
आध्यात्मिक बांधणी कार्य
३. (अ) येशूच्या वचनांवर बांधणीकार्य करण्याचा कोणता परिणाम दिसेल? (ब) येशूने केलेले प्रचारकार्य विश्वासास का उभारक होते?
३ “पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे” ही थरारक घोषणा येशूने गालीलकरांना केली तेव्हापासून आता १९५६ वर्षे निघून गेली आहेत. आपल्या वचनांचे पालन करून त्यावर उभारी धरणाऱ्या प्रत्येकाची तुलना त्याने ‘खडकावर घर बांधणाऱ्या सूज्ञ माणसा’ सोबत केली. अशा माणसाचा विश्वास मजबूत, न हेलकावणारा व अटळ असतो. दबावाखाली तो चिरडला जात नाही. येशूचे प्रचारकार्य विश्वासास उभारक होते. ते लोकांच्या अंतःकरणापर्यंत जाऊन भिडले. ते यहुदी धर्मपुढाऱ्यांच्या दांभिक वाचाळतेपेक्षा खूपच वेगळे होते. येशूच्या शिक्षण पद्धतीमुळे साधारण माणूस थक्क होत होता. त्याला धरावयास पाठविलेले शिपाई देखील रिक्तहस्ते परतले. त्यांनी म्हटले: “कोणीही मनुष्य त्याच्या सारखा कधी बोलला नाही.”—मत्तय ४:१७; ७:२४, २५, २८; योहान ७:४६.
४. (अ) येशूने भवितव्यासाठी कशी बांधणी केली? (ब) इ.स. ३३च्या पेंटेकॉस्ट समयी कोणत्या प्रमुख वास्तुची घटना घडली?
४ येशू भवितव्यासाठी बांधणी करीत होता. त्याने पेत्र, ज्याला केफा म्हणजे त्याचा अर्थ “धोंडा” आहे त्याच्या सारख्या सहकर्म्यांना एकत्रित केले. या शिष्याला येशू म्हणाला: “तू पेत्र आहेस आणि मी या खडकावर आपली मंडळी रचीन.” काही काळातच पेत्र हा त्या पुष्कळ ‘जिवंत धोंड्या’पैकी एक बनला ज्याची बांधणी मंडळीचा “कोनशिला” येशू याजवर करण्यात आली होती. या मंडळीची स्थापना इ.स. ३३च्या पेंटेकॉस्टच्या दिवशी झाली. त्यावेळी स्वर्गात देवाच्या उजव्या हाताशी बसलेल्या पुनरुत्थित येशूने वाट पाहत असणाऱ्या शिष्यांवर पवित्र आत्मा ओतला.—मत्तय १६:१८; १ पेत्र २:४–६; प्रे. कृत्ये २:२–४, ३२, ३३.
५. ख्रिस्ती मंडळी आजच्या कोणत्या घडामोडीत स्वतःला मग्न ठेवून आहे?
५ आज ख्रिस्ती मंडळी यहोवाच्या उद्देशाच्या कार्यप्रणालीत पूर्णपणे निमग्न आहे. हा “ॲपोक्लीपस”चा किंवा “उघड होण्याचा” काळ असून “ज्या गोष्टी लवकर घडणार आहेत” त्या पृथ्वीवरील देवाच्या “सेवकां”ना प्रकटविल्या जात आहेत. (प्रकटीकरण १:१–३, रेफरन्स बायबल, तळटीप) देवाने सैतानाच्या या दुष्ट व्यवस्थीकरणावर दंडाज्ञेची अंमलबजावणी करण्याआधी हा काळ असा आहे की त्यामध्ये दासांनी ‘देवाच्या राज्याची सुवार्ता सबंध पृथ्वीवर साक्षीसाठी गाजविली पाहिजे.’ आत्ताची ही वेळ स्वर्गात सिंहासनाधिष्ठ असलेल्या राजा येशू ख्रिस्ताने नम्र, मेंढरासमान लोकांना, राज्य नको असणाऱ्या खट्याळ शेरडांसारख्या लोकांपासून वेगळे करून त्यांना “मोठे संकट” भडकण्याआधी, आध्यात्मिक “बंधूं”च्या त्याच्या मंडळीत संघटित करण्याची आहे.—मत्तय २४:१४, २१; २५:३१–४०.
६. आज कोणते “तारू” आहे आणि आम्ही कसा बचाव मिळवू शकतो?
६ आज बचाव मिळवून देणारे आधुनिक तारू कोणते आहे? यहोवाचे साक्षीदार १९१९ पासून ज्या आध्यात्मिक स्थितीत आले ते आध्यात्मिक नंदनवन हे ते तारू होय. नोहाच्या कौटुंबिक सदस्यांप्रमाणे अभिषिक्त ख्रिश्चनांचा शेष व त्याच्या सोबत्यांनी, यहोवाने उद्देशिलेला भव्य आध्यात्मिक प्रकल्प पूर्ण करीपर्यंत त्याच्या आत, आज्ञाधारकपणे आणि पूर्ण अंतःकरणाने कार्य करीत राहिले पाहिजे. हा प्रकल्प असा की, “स्वर्गात जे आहे, [इ.स. ३३ पासून स्वर्गीय वतनदारीचा अभिषिक्त वर्ग] व पृथ्वीवर जे आहे [खासपणे १९३५ पासून दृश्यमान झालेला आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा आणि पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाची आशा असणारा “मोठा लोकसमुदाय”] ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे.”—इफिसकर १:१०; प्रकटीकरण ७:९, १४.
‘बांधणी व लागवड’
७. कोणते दुहेरी काम आता होत आहे व नोहा आणि यिर्मया यांच्या सारख्या आनंदात आम्हाला कसे सहभागी होता येईल?
७ यहोवाने यिर्मया संदेष्टयास आज्ञा दिली होती त्याप्रमाणे पृथ्वीवरील अभिषिक्त ख्रिश्चनांच्या शेषाला “उपटण्यास व विध्वंस करण्यास, नासधूस करण्यास व पाडून टाकण्यास, बांधण्यास व लागवड करण्यास . . . राष्ट्रांवर व राज्यांवर नेमिले.” या प्रकारे दुहेरी काम आता होत आहे: (१) सैतानाच्या दुष्ट जागतिक व्यवस्थीकरणाविरूद्ध यहोवाचा न्यायदंड घोषित करणे आणि (२) बचावासाठी देवाच्या स्वतःच्या लोकांचे संघटन बांधणे व प्रस्थापित करणे. (यिर्मया १:१०; २४:६, ७; यशया २६:२०, २१) आज या कामात सहभागी होण्याचा अभिषिक्त जनांच्या शेषाला व त्याच्या सोबत्यांच्या वाढत्या जमावाला केवढा आनंद वाटतो! अशाच प्रकारचा आगळा आनंद उद्योगशील नोहा व त्याच्या कुटुंबाला त्यांच्या काळी नक्कीच अनुभवण्यास मिळाला असावा.
८. (अ) गेल्या २२ वर्षात प्रचारकांच्या संख्येतील कोणती वाढ लक्षनीय आहे? (ब) १९८६च्या वार्षिक अहवाल पुस्तकातील माहिती बघता १९८५ मध्ये कोणकोणत्या देशांनी अप्रतिम वाढ अनुभवल्याचे दिसते?
८ यहोवाच्या क्रोधाच्या दिवशी लाखोंचा निभाव लागेल का? याची उत्तम आशा बाळगता येईल कारण यहोवाच्या साक्षीदारांचा १९८५चा कार्य वर्षाचा अहवाल अशी संभाव्यता दाखवतो. या अहवालाचा सविस्तर वृत्तांत आपणाला यहोवाच्या साक्षीदारांच्या १९८६च्या वार्षिक अहवाल पुस्तकात पृष्ठ ३४–४१ वर बघता येईल. क्षेत्रावरील कार्यकर्त्यांच्या उच्चांकात जी भव्य वाढ झाली ती लक्षवेधक आहे. राज्य प्रचारकांची संख्या आता ३०,२४,१३१ इतकी आहे. दहा लाखांची रेषा प्रथमतः १९६३ मध्ये ओलांडली तर वीस लाखाची संख्या १९७४ मध्ये ओलांडली गेली; आणि आता १९८५ मध्ये तीस लाखापेक्षाही पुढे गेलो आहोत. त्या २२ वर्षात २०० टक्के वाढ झाली. या बाबतीत आम्ही यहोवाचे केवढे ऋणी आहोत! कारण तोच आपल्या आत्म्याद्वारे सर्व काही वाढवितो.—जखर्या ४:६; १ करिंथकर ३:६.
९. (अ) पायनियर मधील वाढ ही आणखी लक्षवेधक का आहे? (ब) ज्यांना याकरता इच्छा आहे त्यांनी काय करावे अशी शिफारस आहे व का?
९ या सर्व वर्षात पूर्ण वेळेच्या राज्य घोषकांची वाढ ही आणखी एक लक्षवेधक गोष्ट होय. जागतिकपणे आर्थिक परिस्थिती बिघडत असली तरी “पायनियर्स”च्या या प्रबळ गटाची संख्या १९६३ मधील महिन्याच्या सरासरी ३८,५७३ संख्येपासून १९८५ मध्ये ३,२२,८२१ पर्यंत गेली आहे—ही ७३७ टक्के वाढ आहे! यामुळे काय सूचित होते? असे दिसते की येशूच्या लूक ९:२३च्या शब्दाप्रमाणे देवाच्या लोकात स्वार्थत्यागी स्वरूपाचा आत्मा बहुतपटीने आहे. पायनियर सेवेच्या यशस्वीतेसाठी काळजीपूर्वक योजना व आत्मनिग्रह या गोष्टी जरूरीच्या आहेत. पण त्याकरवी मोठे बहुमान प्राप्त होतात.—रोमकर १२:१, २; मलाखी ३:१०.
१०. (अ) मंडळ प्रचारकांची कशाबद्दल प्रशंसा करण्यात येते? (ब) येथे कार्याचे कोणते तीन उच्चांक निरिक्षिलेले आहेत व ते काय दाखवितात?
१० सैतान व त्याच्या जगाकरवी प्रस्तुत केल्या जाणाऱ्या दबावांविरूद्ध लाखो मंडळ प्रचारकांनाही लढत द्यावी लागते. तरी हे सुद्धा देवास आपली “स्तुतियज्ञे” सादर करीत आहेत. (इब्रीयांस १३:१५; रोमकर १०:९, १०) तुम्ही विश्वासू प्रचारकांनी ज्या अहवालाची दर महिन्याला वर्दी दिली आहे ते थोडे असो की जास्त, पण त्यामुळेच १९८५चे ५९,०५,४०,२०५ तासांचे शिखर गाठता आले. ही १९८४ पेक्षा १६.८ टक्क्याची वाढ आहे! २२,४७,२५,९१८ पुनर्भेटींचा व २३,७९,१४६ घरगुती पवित्र शास्त्र अभ्यासांचा नवा उच्चांक दाखवितो की सर्वत्र असणारे राज्याचे घोषक उत्तम शिक्षक तसेच आवेशी प्रचारक बनण्याचा प्रयत्न करीत आहेत.—मत्तय २८:१९, २०.
खरी शांती व निर्भयतेसाठी बांधणी करणे
११. शांती व निर्भयतेच्या खऱ्या आशेची कशी जाहिरात बाजी होत आहे व केवढया प्रमाणात?
११ १९८५च्या उत्तरार्धात संयुक्त राष्ट्रसंघाने १९८६ हे आंतरराष्ट्रीय शांतीचे वर्ष असेल असे घोषित केले. अलीकडच्या काळात संयुक्त राष्ट्रसंघ शांती व निर्भयतेबद्दल बरीच बोलणी करीत आहे. पण तेच एका अधिक महत्वाच्या घोषणेने—शांती व निर्भयतेबद्दलच्या शास्त्रवचनीय आशेने, प्रचारात उंच भरारी घेतली जेव्हा यहोवाच्या साक्षीदारांनी क्षेत्रात ३,८८,०५,५६१ पवित्र शास्त्र, पुस्तके आणि पुस्तिका तसेच ३०,०५,४५,६०९ मासिके दिली व दी वॉचटॉवर आणि अवेक!च्या १७,१९,९३० वर्गण्या मिळविल्या. छापील पृष्ठ व तोंडचे शब्द याकरवी खऱ्या ‘शांतीच्या राजपुत्रा’च्या प्रस्थापित राज्यास आजपर्यंतची सर्वोत्तम साक्ष देण्यात आली. खरेच, “त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार.”—यशया ९:६, ७, किंग जेम्स व्हर्शन.
१२. वाढीमुळे कोणती मोठी गरज निर्माण झाली व या गरजेची पूर्ति करण्यात यहोवाच्या लोकांचे ऐक्य कसे दिसून आले?
१२ क्षेत्रावरील प्रचंड वाढी मुळे संघटनेच्या पाठबळाच्या वाढीचीही हाक प्रस्तुत झाली. १९८५ मध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या जगभरातील मंडळ्याची वाढ ४७,८६९ पासून ४९,७१६ पर्यंत झाली. या कारणामुळे शेकडो नव्या सभागृहांचे आव्हान आले. कित्येक देशात साक्षीदारांना स्वतःचे राज्य सभागृह बांधण्यासाठी केलेल्या प्रयत्ना आर्थिक खर्चासंबंधीचा आशीर्वाद मिळू शकला हे केवढे चांगले आहे. गरज भासली तेथे विशिष्ठांनी व मंडळ्यांनी एकमेकांच्या बांधणी कामाकरता निस्वार्थपणे हातभार दिला. यामुळेच जागतिक बंधुवर्गात “समानता” निर्माण झाली.—२ करिंथकर ८:१४, १५.
१३. राज्य सभागृह बांधणी प्रकल्पास वैयक्तिकरित्या कशी मदत देता येते?
१३ ज्या देशात अनुकूल स्थिती आहे तेथे वॉचटॉवर संस्थेच्या शाखा दप्तरांनी राज्य सभागृहाच्या प्रकल्पास हातभार लावला. अमेरिका व कॅनडा येथे पुष्कळ जन खास राज्य सभागृह निधीस अनुदान देत आहेत त्यामुळे विस्तारित राज्य सभागृह बांधणीसाठी कर्ज उपलब्ध होऊ शकले. इतरांनी आपले श्रम व कुशलता यांची भागीदारी केली ज्यामुळे सप्ताहाच्या शेवटाला अगदी त्वरेने राज्यसभागृहे बांधून पूर्ण होऊ शकली. अशा या प्रकल्पात “यहोवासाठी पूर्ण अंतकरणाने” सहभागी झाल्यामुळे जगातील लोकांना जे करणे अशक्य वाटते ते त्याचे साक्षीदार करून दाखवतात.—कलस्सैकर ३:२३.
१४. संमेलन सभागृहाच्या गरजा कशा पूर्ण झाल्या?
१४ काही देशात यहोवाच्या साक्षीदारांच्या अर्धवार्षिक विभागीय संमेलनाकरता उपयुक्त सभागृहे नसल्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला होता. तरीपण साक्षीदारांनी या आव्हानाचा आनंदाने स्वीकार करून बांधणी कामाच्या आयोजनेतर्फे ही गरज पूर्ण केली. यामध्ये त्यांनी देवाच्या प्राचीन काळच्या लोकांसारखा आत्मा दाखवला. उदाहरणार्थ, निवासमंडपाच्या बांधकामासाठी विविध साहित्य आणण्याची गरज लागली तेव्हा संघटीत इस्राएलांनी देवाची ही आज्ञा ऐकली: “तुम्ही आपल्याकडचे अर्पण यहोवाप्रीत्यर्थ आणावे. ज्याची अंतःकरणापासून इच्छा असेल त्याने यहोवासाठी अर्पण आणावे.” तेव्हा जमावाने जरूरीपेक्षा जादा वस्तु आणून दिल्या व त्यामुळे काम लगेच उरकले.—निर्गम ३५:५–१९; ३६:७.
१५. (अ) वॉचटॉवर संस्थेच्या शाखा दप्तरात कसली वाढ झाल्याची दिसते? (ब) हे काम कसे पूर्ण केले जात आहे?
१५ पवित्र शास्त्र व त्यावर आधारीत असणाऱ्या प्रकाशनाच्या मागणीची गरज वाढल्यामुळे जगभरातील ९४पैकी बहुतेक वॉच टॉवर संस्थेच्या शाखा दप्तरांना आपल्या सोयी विस्तारित कराव्या लागल्या. ब्रुकलिन व वॉचटॉवर फार्म येथील छपाई यंत्रणा अद्याप अवाढव्य आहेत तरीपण संस्थेची ३६ शाखा दप्तेर आता त्यांच्या स्वतःच्या मासिक छपाईचे नियंत्रण करू लागली आहेत आणि ६ शाखा स्वतःची पुस्तके छापून बांधणी करण्यास सुसज्ज झाल्या आहेत. यापैकीच्या जर्मनी, इटली व जपान येथील शाखा पवित्र शास्त्राचे उत्पादन करतात. जर्मनीतील सेल्टर्स येथील छापखाने परिणामकारकतेने काम करीत आहेत. जपानमध्ये एबीना येथे कारखान्यासाठी ६ मजली इमारतीचे तर २८० कामगारांसाठी बेथेल निवासाकरता ८ मजली इमारतीचे काम सुरु आहे. शलमोनाच्या मंदिर बांधणीच्या कामात यहोवाच्या लोकांनी “पूर्ण अंतःकरणाने” सहकार्य दिले तसे आजही वेगवेगळया देशातील देवाचे लोक “यहोवास स्वयंपूर्ण अर्पणे” देत आहेत आणि तो स्वतः आपला आशीर्वाद देत राहतो त्यामुळे काम तडीस नेले जाते.—१ इतिहास २२:१४, १५; २९:७, ९; पहा रेफरन्स बायबल तळटीपा.
१६. हे अधिक बांधणी कार्य व संघटना निर्माण करण्याचे कार्य का आवश्यक वाटले?
१६ एवढे सारी बांधणी कार्य व संघटना खऱ्याच जरूरीच्या आहेत का? होय, जर “विश्वासू व बुद्धीमान दासा” ने “यथाकाळी” आध्यात्मिक अन्न द्यावयाचे आहे तर हे सर्व आवश्यक आहे. हे अन्न “देवाचे घर” आणि २०० पेक्षा अधिक भाषांतील जगव्याप्त प्रचार कार्याच्या वाढीसाठी आवश्यक आहे. (मत्तय २४:४५;इफिसकर २:१९; ४:१५, १६) यहोवाच्या लोकांनी आपले चातुर्य व कुशलता वापरून स्वतःच बहुभाषीय इलेक्ट्रॉनिक फोटो कंपोजिग व्यवस्था (मेप्स) शोधून काढली आहे जी आता वॉचटॉवरच्या २६ शाखा दप्तरात वापरली जाते. यामुळे गोलार्धात समान ऑफसेट छपाई यंत्रणा राबविण्यास शक्य झाले व त्याकरवी राज्य संदेशाचे पृथ्वीच्या पुष्कळ भागात एकाच वेळी प्रकाशन करण्यात मदत मिळाली.—पडताळा यशया ५२:७–९.
१७. ब्रुकलिन मुख्यालयात सध्या कोणती गरज उद्भवली आहे व त्यास कसे हाताळले जात आहे?
१७ यहोवाच्या संघटनेच्या आधुनिक काळातील विस्तारास अंत नाही असे दिसते. आताही, संस्थेचे ब्रुकलिन न्यूयॉर्क येथील मुख्यालयाच्या बेथेल कुटुंबातील उपलब्ध असणाऱ्या सर्व जागा पूर्णपणे भरल्या गेल्या. यहोवाची इच्छा असेल तर संस्थेच्या कोलंबिया हाईट्स येथील जागेत आणखी एक उंच इमारत ज्यादा १००० बेथेल कर्मचाऱ्यांसाठी उभारण्याची योजना आहे. पण ती सफळ झाली नाही तर तिच्या परिपूर्तिच्या अधिक मार्गदर्शनासाठी आम्ही यहोवाकडे बघू. या सर्व विस्तारासाठी बंधुवर्गाने जगव्याप्त रूपाने केलेल्या प्रार्थना व दाखविलेले निष्ठावंत पाठबळ याबद्दलची रसिकता आम्ही व्यक्त करीत आहोत.—पडताळा प्रे. कृत्ये २१:१४; २ थेस्सलनीकाकर ३:१.
१८. हर्मगिद्दोन एवढे जवळ आले तरी आज इतक्या इमारतींचा प्रकल्प का आहे?
१८ ‘तरीपण’, कोणी असे विचारील, ‘इतके अवाढव्य प्रकल्प, आम्ही आता हर्मगिद्दोनाच्या तोंडाशी आलेलो असताना का?’ याचे उत्तर असे की हर्मगिद्दोन येते आहे म्हणून यहोवाची संस्था ‘आपला गाशा गुंडाळीत नाही.’ ‘गाशा गुंडाळण्याची वेळ’ आता सैतानाच्या संस्थेची आहे. यहोवाची संस्था चिरकालिक भवितव्यासाठी बांधणी करीत आहे. मानवी हातांनी घडविलेल्या इमारती हर्मगिद्दोनाच्या वादळात टिकतील किंवा नाही तरीपण आम्हास हे ज्ञात आहे की देवाची संस्था मात्र टिकेल व यहोवा तिचा व तिला निष्ठावंतपणे पाठबळ देणाऱ्यांचा वापर करून देवाच्या अभिवचनानुरुप असणाऱ्या पृथ्वीवरील वैभवी नंदनवनात चिरकालिक शांती व निर्भयतेची प्रस्थापना करील.—प्रकटीकरण ७:९, १४–१७; २१:१, ४, ५.
उद्देश राखून बांधणी करणे
१९. स्मारकविधीच्या १९८५च्या अहवालात कोणते आव्हान दिसते?
१९ नोहाने उद्देश राखून आपले बांधणी कार्य केले. त्याचप्रमाणे आम्हीही करावे. १९८५चा कार्य वर्षाचा अहवाल आम्हाला काही तरी विचार करायला सांगतो. तो, एप्रिल ४, १९८५ रोजी ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारक विधीला ७७,९२,१०९ची जी भव्य उपस्थिति होती त्याविषयीचा आहे. ही १९८५च्या एकूण संख्येपेक्षा ३,७५,१३५ची वाढ होती. खरेच, अप्रतिम! या संख्येत एक आव्हान आहे. राज्य सेवेत सहभागी होणाऱ्या ३०,२४,१३१ प्रचारकांचा उच्चांक पाहू जाता आम्हासोबत, काही प्रमाणात का होईना, सहवास ठेवणाऱ्या ४० लाखा पेक्षा अधिक जणांनी, भवितव्यासाठी आपण बांधणी करीत आहोत हे ख्रिस्ती उपाध्यपणात सहभागी होऊन अद्याप प्रदर्शित केले नाही. आम्ही त्यांची कशी मदत करू शकू?
२०. आव्हानास सामोरे जाण्यासाठी कोणती तातडीची निकड उभी आहे व त्याचा पाठपुरावा व्यावहारिक रित्या कसा करता येईल?
२० या आस्थेवाईक लोकांपैकीचे बरेच जण आम्हाला व्यक्तिगतरित्या परिचित आहेत. ते आमचे कौटुंबिक सदस्य, आम्हाकडून पवित्र शास्त्राचा अभ्यास घेणारे लोक, आमच्या मासिकाचे वर्गणीदार वा इतर आहेत. काहीजण गेल्या स्मारकविधीपासूनच आस्थेवाईक बनले असतील. तर मग आम्ही खास प्रयत्न करून यांना भरवू, पवित्र शास्त्राभ्यासाद्वारे त्यांची उभारणी करू शकू का की ज्याद्वारे “अरिष्टे टळून जात तोपर्यंत” त्यांना यहोवाच्या व्यवस्थेत आश्रय घेता येईल? (स्तोत्रसंहिता ५७:१) “मोठे संकट” हे यहोवाच्या विजयाचे कृत्य, नोहाच्या काळातील जलप्रलयापेक्षा अधिक अर्थभरित व निर्णायक असेल. या आस्थेवाईक लोकांची जीवनदायक सत्याद्वारे उभारणी व्हावी अशी आमची इच्छा आहे म्हणजे ते ‘यहोवाच्या नामाचा धावा करतील’ आणि नष्ट होणार नाहीत. (मत्तय २४:२१, २२, ३९; सफन्या २:३; ३:८, ९) आपण त्यांच्यासोबत, यु कॅन लिव्ह फॉरएव्हर इन पॅरडाईज ऑन अर्थ् वा इतर कोणत्याहि विश्वासास प्रेरक असणाऱ्या क्रमिक पुस्तका आधारे देववचनाचा अभ्यास करू या.
२१. नोहाप्रमाणे आम्ही आम्हाठायी व इतरांमध्ये विश्वास कसा उभारू शकतो?
२१ यहोवा देव हा सर्वश्रेष्ठ कारागीर व मानवजातीची पुरवणूक करणारा थोर दाता आहे. (स्तोत्रसंहिता १२७:१; १४५:१६; उपदेशक ३:१०–१३) तारूची रचना व त्याच्या बांधणी कार्याचे मार्गदर्शन त्यानेच नोहाला दिले. येशू ख्रिस्त या थोर नोहाच्या स्वेच्छापूर्ण सहकार्याने देवाने आज्ञाधारक मानवांची पाप व मरणापासूनची सुटका करण्यासाठी खंडणीची व्यवस्था केली. याच आपल्या पुत्राद्वारे त्याने आधुनिक “तारू”, बहरलेल्या आध्यात्मिक नंदनवनाची बांधणी केली असून यात विश्वास राखणाऱ्या स्त्री–पुरुषांना सार्वकालिक जीवन दृष्टिपथात ठेवून बचाव मिळतो. (मत्तय २०:२६–२८; योहान ३:१६; १७:३) आणखी पुष्कळांना आपला विश्वास उभारण्यास आणि यहोवा व त्याचा पुत्र यांच्या बरोबर सख्य साधण्यात आपली मदत मिळो. त्यांनी धार्मिकतेवर प्रीती करावी व वाईटाचा द्वेष करावा याकरता आपण त्यांना मदत देऊ. (इब्रीयांस १:९) याद्वारे, नोहासारखा विश्वास बाळगून आपण एकत्र मिळून चिरकालिक भवितव्यासाठी बांधणी करीत राहू या—१ तिमथ्यी ४:१५,१६.
उजळणीसाठी काही प्रश्न
◻ येशूने भवितव्यासाठी कशी बांधणी केली?
◻ १९८५च्या अहवालात तुम्हाला कोणत्या उल्लेखनीय गोष्टी आढळल्या?
◻ इश्वरशासित इमारतींचा प्रकल्प का जरूरीचा आहे?
◻ आम्ही सर्वजन उद्देश राखून कसे बांधणी कार्य करू शकतो?
[२६ पानावरील चौकट]
यहोवाच्या कार्यास बंदी असणाऱ्या आफ्रिकेतील एका मंडळीत ९५ प्रचारक आहेत. हे दर महिन्यात क्षेत्र कार्यात भाग घेतात. त्यांची सभांची सरासरी उपस्थिति १३० आहे तर जाहीर व्याख्यानाला १६० येतात. त्यांच्या मध्ये तीन नियमित पायनियर्स व अलीकडेच आठ साहाय्यक पायनियर्स आहे. केवळ सहा महिन्यात २१ नवीन प्रचारकांनी क्षेत्र कार्याची सुरुवात केली.
[२२, २३ पानांवरील चित्रं]
यहोवाच्या साक्षीदारांकरवीचे
जगभरात ३,२२,८२१ पायनियर्स दर महिन्याला अहवाल देत होते (२४.७ टक्के वाढ)
जगभरात प्रचारकांची संख्या ३०,२४,१३१ इतकी वाढली (६.४ टक्के वाढ)
आस्थेवाईक व्यर्क्तिना दिलेल्या पुनर्भेटींची संख्या वर्षभरात एकूण २२,४७,२५,९१८ होती (१४.८ टक्के वाढ)
दर महिन्याला २३,७९,१४६ घरगुती पवित्र शास्त्र अभ्यास चालविले गेले (१६.२ टक्के वाढ)
[चित्रं]
ब्रुकलिन न्यूयॉर्क येथे घरोघरच्या कार्यासाठी पायनियर्स निघत आहेत
कॅनडातील मॉन्ट्रीयल, क्युबेक येथील चौदा भाषीय संमेलन
इंग्लंडमध्ये कॅसल कोम्ब विल्टशायर येथील साक्षीकार्य
यॅप, मायक्रोनेसिया येथील अभ्यासाचा गट
जगव्याप्त आध्यात्मिक उभारणीच्या कामासाठी काही इमारती
ब्रुकलिन येथे ३६० फरमॅन स्ट्रीट मधील ह्या १०,००,००० चौरस फुटाची जागा व्यापलेल्या इमारतीतून पवित्र शास्त्र व पवित्र शास्त्रीय प्रकाशनाच्या टपालाचे काम हाताळले जाते.
हे राज्य सभागृह (डाऊन पॅट्रीक, उत्तर आयर्लंड) केवळ ३१ तासात बांधून तयार झाले
रोममधील हे संमेलन सभागृह त्यापैकीचे आहे जी पृथ्वीभरात वापरण्यात येतात
जपानच्या बेथेल गृहास जोडून असणारी ही इमारत आता बांधून होत आहे
[२७ पानावरील तक्ता]
१९८५ मध्ये १,००,००० पेक्षा अधिक प्रचारकांचा अहवाल दिलेले आठ देश
अमेरिका ७,२३,२२०
ब्रझिल १,७७,९०४
मेक्सिको १,७३,०३७
इटली १,२७,५२६
नायजेरिया १,२१,७२९
जर्मनी १,१५,६०४
ब्रिटन १,०३,५२२
जपान १,०३,११७