वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ८/१५ पृ. १४-१९
  • देवाच्या प्रतिज्ञांवर विश्‍वास ठेवून चालणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाच्या प्रतिज्ञांवर विश्‍वास ठेवून चालणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवा आपला सहभाग कमी करतो
  • देव आपली इच्छा पूर्णत्वास नेतो
  • देव भविष्यात पाहतो
  • अतिभव्य प्रकल्प
  • यहोवा पाठिंबा देतो
  • कधीही हिंमत हारू नका!
  • तो “देवाबरोबर चालला”
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
  • त्याचे “सात जणांसह रक्षण” करण्यात आले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • नोहाचा विश्‍वास जगाला दोषी ठरवतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • तुम्ही आपल्या विश्‍वासाच्या द्वारे जगाचा धिक्कार करता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ८/१५ पृ. १४-१९

देवाच्या प्रतिज्ञांवर विश्‍वास ठेवून चालणे

“मीच देव आहे, आणि दुसरा कोणी नाही; मीच देव, आणि माझ्यासारखा कोणीच नाही; मी प्रारंभापासूनच शेवट कळवतो आणि ज्या गोष्टी अजूनपर्यंत घडल्या नाहीत त्या मी प्राचीन काळापासून दाखवतो.”—यशया ४६:९, १०, पं.र.भा.

१, २. पृथ्वीवरील घडामोडींत देवाचा कितपत हात आहे यासंबंधी कोणती वेगवेगळी मते आहेत?

पृथ्वीवरील घडामोडींत देवाचा कितपत हात आहे? याबाबतीत लोकांची वेगवेगळी मते आहेत. काहींचे असे म्हणणे आहे की देव अजिबातच कशात गोवलेला नाही. म्हणजे सृष्टीची निर्मिती करून त्याने मानवजातीला सुरवात करून दिली आहे आणि आता तो आपल्यासाठी काहीही करण्यास एकतर इच्छुक नाही किंवा समर्थ नाही. या दृष्टिकोनानुसार देवाची तुलना एखाद्या लहान मुलाच्या बाबांशी करता येईल जे त्याला नव्या सायकलीवर बसवून, मागून हलकासा धक्का देतात आणि मुलगा थोडा पुढे गेला की मागे वळून निघून जातात. आता मुलगा एकटाच; तो पुढे जाऊन खाली पडला तरी त्याचे बाबा आता त्याच्यासाठी काहीच करू शकत नाहीत.

२ इतर काही लोकांचे असे मत आहे की आपल्या जीवनातली प्रत्येक लहानसहान गोष्ट देवच घडवून आणतो; या सृष्टीत घडणाऱ्‍या प्रत्येक घटनेत त्याचा प्रत्यक्ष सहभाग असतो. पण जर हे खरे आहे, तर मग काहीजण असा निष्कर्ष काढतील की आपल्या जीवनात घडणाऱ्‍या चांगल्या गोष्टीच नव्हे, तर मानवजातीला पीडणाऱ्‍या समस्या, गुन्हेगारी आणि दुर्घटना, सर्व देवच घडवून आणतो. म्हणूनच देवाच्या व्यवहारांविषयी सत्य काय आहे हे जाणून घेतले पाहिजे. मग आपण देवाकडून काय अपेक्षा करू शकतो हे आपल्याला कळून येईल. शिवाय, त्याच्या प्रतिज्ञा निश्‍चित पूर्ण होतील यावरील आपला विश्‍वासही आणखी दृढ होईल.—इब्री लोकांस ११:१.

३. (अ) यहोवा हा उद्देश बाळगणारा देव आहे असे आपण का म्हणू शकतो? (ब) यहोवा आपला उद्देश ‘घडवितो’ व ‘त्याला आकार देतो’ असे का म्हणण्यात आले आहे?

३ मानवी घडामोडींत देवाचा कितपत हात आहे यासंबंधी लक्षात घेण्यासारखा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यहोवा उद्देश बाळगणारा देव आहे. हे त्याच्या नावावरूनच स्पष्ट होते. “यहोवा” याचा अर्थ “तो व्हावयास कारणीभूत ठरतो.” प्रगमनशील पावले उचलण्याद्वारे तो आपल्या सर्व प्रतिज्ञांचा पूर्तिकर्ता व्हावयास कारणीभूत ठरतो. म्हणूनच, यहोवा भविष्यातील घटना किंवा कार्ये यांविषयी आपला उद्देश ‘घडवितो’ आणि त्याला आकार देतो असे म्हटले आहे. (२ राजे १९:२५; यशया ४६:११) हे शब्दप्रयोग “कुंभार” या अर्थाच्या यात्सार या हिब्रू शब्दापासून आले आहेत. (यिर्मया १८:४) निपुण कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुरेख भांडे तयार करू शकतो, तशाच प्रकारे यहोवा देखील आपली इच्छा पूर्ण करण्याकरता विशिष्ट गोष्टींना आकार देऊ शकतो, त्यांत आवश्‍यक फेरबदल करू शकतो.—इफिसकर १:११.

४. मनुष्यवस्तीकरता देवाने पृथ्वीवर कोणती आवश्‍यक तयारी केली?

४ उदाहरणार्थ, या पृथ्वीसंबंधी देवाचा असा उद्देश होता की ती अत्यंत सुंदर असावी आणि परिपूर्ण, आज्ञाधारक मानवांनी तिच्यावर वस्ती करावी. (यशया ४५:१८) पहिला मनुष्य व पहिली स्त्री यांना निर्माण करण्याच्या कितीतरी काळाआधीच यहोवाने प्रेमळपणे त्यांच्यासाठी आवश्‍यक तयारी करून ठेवली होती. उत्पत्तीच्या पुस्तकात सुरवातीच्या काही अध्यायांत याचे वर्णन आढळते, की कशाप्रकारे यहोवाने दिवस आणि रात्र, जमीन आणि समुद्र यांची निर्मिती केली. त्यानंतर त्याने वनस्पती व जीवजंतू निर्माण केले. मनुष्यवस्तीकरता पृथ्वीवर ही आवश्‍यक तयारी करण्याकरता हजारो वर्षे लागली. शेवटी हे कार्य यशस्वीरीत्या पूर्ण झाले. जीवनाचा आनंद लुटण्याकरता सर्व सोयींनी युक्‍त अशा सुखदायक एदेन बागेत, पहिला मनुष्य व स्त्री राहू लागले. (उत्पत्ति १:३१) अशाप्रकारे, आपल्या कार्यांना आपल्या महान उद्देशाच्या अनुरूप प्रगमनशीलपणे आकार देत, यहोवाने पृथ्वीवरील घडामोडींत प्रत्यक्ष सहभाग घेतला. मानव कुटुंबात वाढ झाल्यानंतर त्याच्या या सहभागात काही फरक पडला का?

यहोवा आपला सहभाग कमी करतो

५, ६. मनुष्यासोबतच्या व्यवहारांत देवाने आपला सहभाग का कमी केला?

५ यहोवाजवळ सामर्थ्य असूनही तो मानवजातीच्या व्यवहारांतील एकूणएक गोष्टीवर नियंत्रण किंवा ताबा ठेवत नाही. आणि यामागे काही कारणे आहेत. पहिले म्हणजे, मनुष्याला देवाच्या प्रतिरूपात निर्माण करण्यात आले असून, त्याच्याजवळ इच्छा स्वातंत्र्य आहे; मनुष्य हा स्वतंत्र नैतिक प्राणी आहे. त्यामुळे यहोवा आपल्याला कठपुतळ्या समजून त्याच्या इच्छेनुसार वागण्यासाठी भाग पाडत नाही. (अनुवाद ३०:१९, २०; यहोशवा २४:१५) तो आपल्याकडून आपल्या कृत्यांचा जाब मागतो हे खरे असले तरीसुद्धा, आपल्यावर प्रेम असल्यामुळे, जीवनात निर्णय घेता यावेत म्हणून त्याने बऱ्‍याच प्रमाणात आपल्याला स्वातंत्र्य दिले आहे.—रोमकर १४:१२; इब्री लोकांस ४:१३.

६ घडणाऱ्‍या प्रत्येक गोष्टीवर देव नियंत्रण ठेवत नाही यामागे आणखी एक कारण आहे; आणि त्याचा संबंध एदेन बागेत सैतानाने उपस्थित केलेल्या वादविषयाशी आहे. सैतानाने देवाच्या सार्वभौमत्वाला आव्हान केले होते. त्याने हव्वेला स्वातंत्र्याचे आमिष दाखवले; आणि ती व नंतर तिचा पती, आदाम या आमिषाला बळी पडले. (उत्पत्ति ३:१-६) पर्यायाने, सैतानाने उपस्थित केलेल्या आव्हानाचे खरेखोटे करण्यासाठी देवाने मानवांना काही काळासाठी एकमेकांवर सत्ता चालवण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे, आज लोकांच्या हातून ज्या वाईट गोष्टी घडतात त्यांसाठी देवाला दोष देता येत नाही. मोशेने विद्रोही लोकांविषयी म्हटले: “हे बिघडले आहेत, हे त्याचे पुत्र नव्हत, हा त्यांचा दोष आहे.”—अनुवाद ३२:५.

७. मानवजातीकरता व या पृथ्वीकरता यहोवाचा काय उद्देश आहे?

७ पण निर्णय घेण्याची आणि स्वतंत्र होऊन वेगवेगळ्या प्रकारच्या शासन पद्धती प्रयोगात आणण्याची मोकळीक जरी देवाने माणसाला दिली असली तरीसुद्धा पृथ्वीवरील घडामोडींच्या बाबतीत त्याने अगदीच आपले हात झटकून टाकले नाहीत; त्याने असे केले असते तर त्याची अभिवचने तो पूर्ण करील अशी आशाच आपल्याला बाळगता आली नसती. आदाम व हव्वा यांनी देवाच्या सार्वभौमत्वाला जुमानले नाही तरीसुद्धा यहोवाने पृथ्वी आणि मानवजात यांसंबंधी आपला प्रेमळ उद्देश बदलला नाही. तो अवश्‍य या पृथ्वीचे एका सुंदर बागेत रूपांतर करील ज्यात परिपूर्ण, आज्ञाधारक लोक आनंदाने नांदतील. (लूक २३:४२, ४३) हा उद्देश साध्य करण्यासाठी यहोवाने आजवर कशाप्रकारे प्रगमनशील पावले उचलली आहेत याविषयी बायबलमधील उत्पत्तीपासून प्रकटीकरणापर्यंतच्या अहवालात वर्णन करण्यात आले आहे.

देव आपली इच्छा पूर्णत्वास नेतो

८. इस्राएल लोकांना वचनयुक्‍त देशात आणण्यात काय समाविष्ट होते?

८ इस्राएल राष्ट्रासोबतच्या व्यवहारांतून देवाने स्पष्टपणे दाखवून दिले की तो आपला उद्देश अवश्‍य पूर्ण करील. उदाहरणार्थ, आपण इस्राएल लोकांना इजिप्तच्या गुलामीतून सोडवू आणि त्यांना दुधामधाच्या वचनयुक्‍त देशात आणू असे यहोवाने मोशेला आश्‍वासन दिले होते. (निर्गम ३:८) हे अभिवचन इस्राएल लोकांना दिलासा देणारे असले तरी ते इतके साधारण नव्हते. ते पूर्ण करण्याकरता, इस्राएल लोक व त्यांचे साथीदार मिळून—जवळजवळ तीस लाख लोकांना—एका अशा शक्‍तिशाली राष्ट्राच्या तावडीतून सोडवायचे होते जे त्यांना सहजासहजी सुटका देणार नव्हते. (निर्गम ३:१९) शिवाय, जो प्रदेश त्यांना दिला जाणार होता तो आधीपासून शक्‍तिशाली राष्ट्रांच्या सत्तेखाली होता; इस्राएल लोक आल्यानंतर ही राष्ट्रे साहजिकच शांत बसणार नव्हती. (अनुवाद ७:१) आणि तिथे पोचण्यासाठी आधी एक असे अरण्य पार करायचे होते ज्यात न अन्‍न मिळणार होते न पाणी. अशा या परिस्थितीत यहोवाने आपले सार्वभौमत्व आणि देवत्व दाखवून दिले.—लेवीय २५:३८.

९, १०. (अ) देवाच्या प्रतिज्ञा विश्‍वसनीय आहेत असे यहोशवा का म्हणू शकला? (ब) देव आपल्या विश्‍वासू सेवकांना प्रतिफळ देण्यास समर्थ आहे यावर आपला विश्‍वास असणे किती महत्त्वाचे आहे?

९ देवाने एकापाठोपाठ एक महान चमत्कार करून इस्राएल लोकांना इजिप्तमधून बाहेर आणले. पहिले तर त्याने इजिप्त राष्ट्रावर दहा क्लेशकारी पीडा आणल्या. नंतर तांबडा समुद्र दुभंगून इस्राएल लोकांना बाहेर पडण्याची वाट करून दिली, त्यांचा पाठलाग करणाऱ्‍या इजिप्तच्या सैन्याचा मात्र नाश झाला. (स्तोत्र ७८:१२, १३, ४३-५१) त्यानंतर, ४० वर्षे अरण्यात भटकत असताना त्याने इस्राएल लोकांची काळजी वाहिली, त्यांना मान्‍ना खाऊ घातला, पाणी पुरवले, इतकेच काय तर त्या सबंध काळात त्यांच्या अंगावरचे कपडे जीर्ण झाले नाहीत, त्यांचे पाय कधी सुजले नाहीत. (अनुवाद ८:३, ४) वचनयुक्‍त देशात प्रवेश केल्यानंतर यहोवाने इस्राएल लोकांना त्यांच्या वैऱ्‍यांविरुद्ध विजय मिळवून दिला. या सर्व घटना यहोवाच्या सर्व प्रतिज्ञांवर अढळ विश्‍वास दाखवणाऱ्‍या यहोशवाने प्रत्यक्ष पाहिल्या होत्या. म्हणूनच तो आपल्या वडीलधाऱ्‍यांना मोठ्या विश्‍वासाने म्हणू शकला: “तुम्ही सर्व जण मनात विचार करा आणि लक्षात घ्या की, आपला देव परमेश्‍वर ह्‍याने तुमच्याबाबतीत हिताच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यांतली एकहि निष्फळ झाली नाही; तुमच्याबाबतीत त्या सर्व सिद्धीस गेल्या.”—यहोशवा २३:१४.

१० यहोशवाला होती, त्याप्रमाणेच आज ख्रिस्ती लोकांनाही पूर्ण खात्री आहे की देव त्याची सेवा करणाऱ्‍यांच्या वतीने कार्य करण्यास इच्छुकही आहे आणि समर्थही. या खात्रीशिवाय त्यांचा विश्‍वास अपूर्ण ठरेल. प्रेषित पौलाने लिहिले: “विश्‍वासावाचून त्याला ‘संतोषविणे’ अशक्य आहे; कारण देवाजवळ जाणाऱ्‍याने असा विश्‍वास ठेवला पाहिजे की, . . . त्याचा शोध झटून करणाऱ्‍यांना तो प्रतिफळ देणारा आहे.”—इब्री लोकांस ११:६.

देव भविष्यात पाहतो

११. कोणत्या कारणांमुळे देव आपल्या प्रतिज्ञा पूर्ण करू शकतो?

११ इथपर्यंत आपण पाहिले की देवाने मानवाला इच्छास्वातंत्र्य दिले आणि स्वतंत्रपणे शासन करण्याची मुभा दिली, पण त्याचवेळेस आपला उद्देश पूर्णत्वास नेण्याकरता आवश्‍यक पावले उचलण्यास तो समर्थही आहे आणि इच्छुकही. शिवाय, देवाची अभिवचने निश्‍चित पूर्ण होतील अशी खात्री बाळगण्याचे आणखी एक कारण आहे. भविष्यात काय होणार आहे हे यहोवा पाहू शकतो. (यशया ४२:९) आपल्या संदेष्ट्याकडून देवाने म्हटले: “प्राचीन काळच्या पूर्वीच्या घटना आठवा, कारण मीच देव आहे आणि दुसरा कोणी नाही; मीच देव, आणि माझ्यासारखा कोणीच नाही; मी प्रारंभापासूनच शेवट कळवतो, आणि ज्या गोष्टी घडल्या नाहीत त्या मी प्राचीन काळापासून दाखवतो; मी म्हणतो, माझा संकल्प खरा ठरेल, आणि मी आपला सर्व मनोदय पूर्ण करीनच.” (यशया ४६:९, १०, पं.र.भा) अनुभवी शेतकऱ्‍याला पेरणी केव्हा आणि कोठे करावी हे माहीत असले तरीही पुढे काय होईल याविषयी त्याच्या मनात थोडीफार शंका असते. पण ‘सनातन राजा’ यहोवा मात्र आपला उद्देश साध्य करण्यासाठी नेमके केव्हा आणि कोठे कार्य करावे हे भविष्यात पाहून अचूकपणे ठरवू शकतो.—१ तीमथ्य १:१७.

१२. नोहाच्या काळात यहोवाने आपल्या भविष्याच्या ज्ञानाचा कसा उपयोग केला?

१२ नोहाच्या काळात देवाने भविष्याच्या या ज्ञानाचा कसा उपयोग केला हे लक्षात घ्या. पृथ्वीवर सर्वत्र पसरलेल्या दुष्टाईमुळे देवाने स्वैराचारी मानवजातीला नष्ट करण्याचे ठरवले. भविष्यात एका निश्‍चित वेळी म्हणजे १२० वर्षांनंतर या दुष्ट लोकांचा नाश करण्याचे त्याने ठरवले. (उत्पत्ति ६:३) हा नाश देवाला कधीही करता येत होता, पण एक निश्‍चित कालावधी ठरवल्यामुळे हे दिसून आले की दुष्ट लोकांचा नाश करायचा आहे, एवढेच त्याने विचारात घेतले नाही. तर धार्मिक लोकांच्या बचावाकरता देखील यहोवाने तरतूद केली. (पडताळा उत्पत्ति ५:२९.) देवाच्या महान बुद्धीमुळे, धार्मिकांच्या बचावाचे हे कार्य सुरू करण्याची आज्ञा नेमकी केव्हा द्यायची हे त्याला आधीच माहीत होते. त्याने नोहाला सर्व आवश्‍यक माहिती तपशीलवार सांगितली. नोहाला “आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी” तारू बांधायचे होते, आणि जागतिक जलप्रलयात दुष्टांचा नाश होणार होता.—इब्री लोकांस ११:७; उत्पत्ति ६:१३, १४, १८, १९.

अतिभव्य प्रकल्प

१३, १४. तारवाच्या बांधकामाला एक आव्हानात्मक कामगिरी का म्हणता येईल?

१३ स्वतःला नोहाच्या ठिकाणी ठेवून त्याला देवाने नेमलेल्या कार्याचा विचार करा. नोहा देवभक्‍त होता, त्यामुळे यहोवा दुष्टांचा नाश करू शकतो हे त्याला माहीत होते. पण त्याआधी, त्याला काही कार्य करण्यास सांगितले होते—एक असे कार्य, जे पार पाडण्यासाठी विश्‍वासाची गरज होती. तारवाच्या बांधकामाचा प्रकल्प अतिभव्य होता. देवाने त्याचे सर्व मोजमाप स्पष्ट सांगितले होते. हे तारू फुटबॉलच्या मैदानापेक्षाही लांब आणि पाचमजली इमारती एवढे उंच असणार होते. (उत्पत्ति ६:१५) बांधकाम करणारे अगदी थोडे होते आणि त्यांच्या पदरी अनुभव नव्हता. त्यांच्याजवळ आजच्यासारखी अत्याधुनिक साधने व हत्यारे नव्हती. शिवाय, नोहाला काही यहोवाप्रमाणे भविष्यात पाहता येत नव्हते; त्यामुळे येणाऱ्‍या वर्षांत कोणत्या घटना या प्रकल्पाला हातभार लावतील किंवा त्यात अडथळा आणतील हे जाणून घेण्याचा त्याच्याजवळ मार्गच नव्हता. साहजिकच त्याच्या मनात बरेच प्रश्‍न आले असतील. बांधकामाचे साहित्य कसे गोळा करावे? सर्व प्राण्यांना कसे एकत्र करावे? तारवात कोणत्या प्रकारचे अन्‍नधान्य न्यावे, आणि किती न्यावे? शिवाय, भाकीत केलेला जलप्रलय नेमका केव्हा येईल?

१४ नोहाच्या काळातील सामाजिक दृश्‍यही जरा लक्षात घ्या. सर्वत्र अनाचार होता. दुष्ट देवदूत आणि स्त्रिया यांची संकरित संतती, अर्थात शक्‍तिशाली नेफिलिम—सबंध पृथ्वीवर हिंसाचार करत होते. (उत्पत्ति ६:१-४, १३) शिवाय, तारवाचे बांधकाम हे काही जगापासून लपवता येण्यासारखे कार्य नव्हते. नोहा काय करत आहे याविषयी लोक साहजिकच तऱ्‍हतऱ्‍हेचे प्रश्‍न विचारणार होते, आणि नोहाला त्यांना सांगायचे होते. (२ पेत्र २:५) लोक काय त्याच्या कार्याची प्रशंसा करणार होते? निश्‍चितच नाही! काही वर्षांआधीच विश्‍वासू हनोखाने दुष्टांच्या नाशाविषयी प्रचार केला होता. त्याच्या या संदेशामुळे लोक इतके संतप्त झाले की शेवटी देवाने “त्याला नेले,” किंवा दुसऱ्‍या शब्दांत, त्याच्या शत्रूंनी त्याचा घात करू नये म्हणून देवाने त्याचे जीवन अकालीच संपुष्टात आणले. (उत्पत्ति ५:२४; इब्री लोकांस ११:५; यहूदा १४, १५) आणि आता नोहाला तसाच, लोकांना न रुचणारा संदेश घोषित करायचा होता आणि त्यासोबत तारूही बांधायचे होते. तारवाचे ते बांधकाम, दुष्ट लोकांमध्ये राहूनही नोहाने दाखवलेल्या विश्‍वासाचे एक अतिशय परिणामकारक प्रतीक ठरणार होते!

१५. आपल्याला नेमलेले कार्य आपण पूर्ण करू शकतो हा आत्मविश्‍वास नोहाला का होता?

१५ या कार्याला सर्वसमर्थ देवाचा पाठिंबा आहे, त्याच्यावर त्याचा आशीर्वाद आहे हे नोहा जाणून होता. हे कार्य करण्याची आज्ञा देवाने स्वतःच दिली नव्हती का? नोहा व त्याचे कुटुंब तारवाचे बांधकाम पूर्ण करून त्यात प्रवेश करतील आणि जागतिक जलप्रलयातून जिवंत बचावतील असे यहोवाने नोहाला आश्‍वासन दिले होते. आणि या आश्‍वासनाला पुष्टी देण्यासाठी त्याने नोहासोबत एक करारही स्थापित केला होता. (उत्पत्ति ६:१८, १९) या कार्यात कायकाय सामील आहे याचा समग्र विचार करूनच यहोवाने ते आपल्याला नेमले आहे हे नोहाने ओळखले असावे. शिवाय, जेव्हा साहाय्याची गरज पडेल तेव्हा आपल्या मदतीला धावून येण्याचे सामर्थ्य देवाजवळ आहे हेही नोहाला माहीत होते. या विश्‍वासानिशी नोहा कामाला लागला. आपला पूर्वज अब्राहाम याच्याप्रमाणेच नोहाला ‘पक्की खातरी होती, की देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करावयासही समर्थ आहे.’—रोमकर ४:२१.

१६. तारवाचे बांधकाम सुरू असताना नोहाचा विश्‍वास कशाप्रकारे दृढ होत गेला?

१६ वर्षे गेली आणि तारवाचे बांधकाम पूर्ण होत आले तसतसा नोहाचा विश्‍वासही अधिकाधिक दृढ होत गेला. बांधकामासंबंधी आलेल्या समस्या तसेच इतर तर्कशास्त्रीय समस्या सोडवल्या गेल्या, अडचणींवर मात करण्यात आली. कोणतीही विरोधी शक्‍ती या कार्याला खीळ घालण्यात यशस्वी होऊ शकली नाही. यहोवा आपला सहायक, पाठीराखा आहे हे नोहाच्या कुटुंबाला जाणवत होते. आपल्याला नेमलेले कार्य यत्नाने पूर्ण करत असताना नोहाच्या ‘विश्‍वासाची पारख उतरल्याने त्याच्याठायी धीर उत्पन्‍न झाला.’ (याकोब १:२-४) शेवटी, तारवाचे बांधकाम पूर्ण झाले, जलप्रलय आला आणि नोहा व त्याचे कुटुंब बचावले. यहोशवाला ज्याप्रमाणे नंतर अनुभव आला त्याप्रमाणे, देवाच्या प्रतिज्ञांची पूर्तता नोहाने प्रत्यक्ष अनुभवली. त्याला आपल्या विश्‍वासाचे प्रतिफळ मिळाले.

यहोवा पाठिंबा देतो

१७. सध्याचा काळ कोणकोणत्या बाबतींत नोहाच्या काळासारखा आहे?

१७ आपला हा काळ नोहाच्याच काळासारखा असेल असे येशूने भाकीत केले होते. पुन्हा एकदा, देवाने दुष्टांचा नाश करण्याचा संकल्प केला आहे आणि त्यासाठी त्याने वेळही निश्‍चित केली आहे. (मत्तय २४:३६-३९) शिवाय, नीतिमान लोकांच्या बचावासाठीही त्याने तरतूद केली आहे. नोहाला जसे तारू बांधण्याचे काम दिले होते तसे आज देवाच्या सेवकांना त्याचे उद्देश घोषित करण्याचे, त्याच्या वचनातील सत्य शिकवण्याचे व शिष्य बनवण्याचे काम दिले आहे.—मत्तय २८:१९.

१८, १९. सुवार्ता प्रचाराच्या कार्याला यहोवाचा पाठिंबा आहे असे आपण का म्हणू शकतो?

१८ यहोवा नोहाचा सहायक व पाठीराखा बनला नसता, तर तारवाचे बांधकाम होऊच शकले नसते. (पडताळा स्तोत्र १२७:१.) तसेच, यहोवाच्या साहाय्याशिवाय खऱ्‍या ख्रिस्ती धर्माची भरभराट होणे तर दूर, तो अस्तित्वातही राहू शकला नसता. पहिल्या शतकातला एक नामवंत परुशी व नियमशास्त्राचा शिक्षक गमालिएल याने हे ओळखले होते. यहुदी न्यायसभेने प्रेषितांचा काटा काढण्याचे ठरवले तेव्हा त्याने बजावून सांगितले: “ह्‍या माणसांपासून दूर राहा व त्यांना जाऊ द्या; कारण हा बेत किंवा हे कार्य मनुष्यांचे असल्यास नष्ट होईल; परंतु ते देवाचे असल्यास तुम्हाला ते नष्ट करिता यावयाचे नाही.”—प्रेषितांची कृत्ये ५:३८, ३९.

१९ प्रचार कार्याला आलेल्या यशामुळे, पहिल्या शतकातही व आजही, हेच सिद्ध झाले आहे की हे कार्य मनुष्यांचे नव्हे तर देवाचे आहे. या कार्याला इतक्या प्रचंड प्रमाणात जे यश आले आहे त्याला कोणत्या खास परिस्थितींनी व घटनांनी हातभार लावला, याविषयी पुढच्या लेखात चर्चा करण्यात येईल.

कधीही हिंमत हारू नका!

२०. सुवार्ता प्रचाराच्या कार्यात आपल्याला कोण साहाय्य करतात?

२० आपण ‘शेवटल्या काळातील कठीण दिवसांत’ राहात असलो तरीसुद्धा आपण खात्रीने म्हणू शकतो, की परिस्थिती यहोवाच्या पूर्ण नियंत्रणात आहे. या दुष्ट व्यवस्थीकरणाचा नाश करण्याची देवाची नियुक्‍त वेळ येण्याआधी सुवार्ता प्रचाराचे कार्य पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्‍या आपल्या लोकांना तो साहाय्य व पाठिंबा देत आहे. (२ तीमथ्य ३:१; मत्तय २४:१४) यहोवा आपल्याला त्याचे “सहकारी” होण्याचे आमंत्रण देतो. (१ करिंथकर ३:९) या कार्यात ख्रिस्त येशू देखील आपल्या पाठीशी आहे याची आपण खात्री बाळगू शकतो आणि देवदूतांच्या माध्यमाने तो आपल्याला आधार व मार्गदर्शन देईल याबद्दलही आपण आश्‍वस्त आहोत.—मत्तय २८:२०; प्रकटीकरण १४:६.

२१. कोणत्या गोष्टीवरचा आपला विश्‍वास आपण कधीही सोडू नये?

२१ नोहाने व त्याच्या कुटुंबाने यहोवाच्या प्रतिज्ञांवर विश्‍वास दाखवल्यामुळे त्यांना जलप्रलयातून बचावण्यात आले. आज जे लोक असा विश्‍वास दाखवतील त्यांना येणाऱ्‍या “मोठ्या संकटातून” बचावण्यात येईल. (प्रकटीकरण ७:१४) आपण खरोखरच विलक्षण काळात जगत आहोत. भविष्यात अतिशय महत्त्वाच्या घटना घडणार आहेत! “नीतिमत्त्व वास करिते असे नवे आकाश व नवी पृथ्वी” देव लवकरच निर्माण करील. (२ पेत्र ३:१३) देव जे काही म्हणतो ते पूर्ण करण्यास तो समर्थही आहे हा आपला विश्‍वास कधी, कधी सोडू नका.—रोमकर ४:२१.

आठवून पाहण्याचे मुद्दे

◻ मानवी व्यवहारांतील प्रत्येक लहानसहान गोष्टीवर यहोवा का नियंत्रण ठेवत नाही?

◻ आपला उद्देश पूर्णत्वास नेण्याचे यहोवाचे सामर्थ्य इस्राएल राष्ट्रासोबतच्या त्याच्या व्यवहारांतून कशाप्रकारे दिसून आले?

◻ यहोवा भविष्यात पाहू शकतो हे नोहाच्या काळात कसे दिसून आले?

◻ देवाच्या प्रतिज्ञांच्या बाबतीत आपण कोणता विश्‍वास बाळगू शकतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा