मृत्यू समोर उभा असतानाही देवाची सेवा
झ्वाऊन मानकोका यांच्याद्वारे कथित
जून २५, १९६१ रोजी, ल्युआंडा, अंगोला येथे आमची सभा चालू असताना सैनिक आत घुसून आले. त्यांनी आमच्यापैकी तीस जणांना तुरुंगात नेलं आणि इतकं बदडून काढलं की दर अर्ध्या तासाला आमच्यातलं कोणी मेलंय का हे पाहायला सैनिक येत होते. त्यांच्यापैकी काहींनी असं म्हटलं म्हणे की, आमचा देव खरा असायला हवा कारण आमच्यापैकी कोणीच मेलं नाही.
हा बेदम मार खाल्ल्यावर मी साउ पाउलुच्या तुरुंगात पाच महिने होतो. मग पुढील नऊ वर्षांपर्यंत मला एका तुरुंगातून दुसऱ्या तुरुंगात पाठवले जात होते आणि यादरम्यान मी पुष्कळदा मार खाल्ला, अनेक गोष्टींपासून मला वंचित ठेवण्यात आले आणि पुष्कळदा मला चौकशीसाठी नेले जात होते. १९७० साली तुरुंगातून सुटका मिळाल्यानंतर लगेचच मला पुन्हा अटक करण्यात आली; या वेळी मला साउ निकुलाउ येथील—सध्या बेन्टीआबा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कुप्रसिद्ध मृत्यू छावणीत पाठवण्यात आले. तेथे मला अडीच वर्षे ठेवण्यात आले.
इमानदार नागरिक असल्यामुळे इतरांना माझ्या बायबल आधारित विश्वासांविषयी सांगितल्यामुळे मला तुरुंगात कशाला डांबून ठेवतील शिवाय देवाच्या राज्याच्या सुवार्तेविषयी मला सर्वप्रथम कोठे शिकायला मिळाले असा विचार कदाचित तुम्ही करत असाल.
उत्तम शिक्षण
माझा जन्म, उत्तर अंगोलातल्या माकेला दू झोंबो येथे ऑक्टोबर १९२५ साली झाला. माझे वडील १९३२ साली वारले तेव्हा आईने मला बेल्जियन काँगोत (सध्याचे काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक) असलेल्या तिच्या भावाकडे पाठवून दिले. खरे तर मला पाठवून देण्याची तिची इच्छा नव्हती, पण माझे पालनपोषण करण्यासाठी तिच्याकडे दुसरा मार्गच नव्हता.
माझे मामा बॅप्टिस्ट होते आणि त्यांनी मला बायबल वाचण्याचे उत्तेजन दिले. मी त्यांच्या चर्चचा सदस्य बनलो खरा, पण मला जे काही शिकायला मिळत होते त्याने माझे समाधान होत नव्हते, शिवाय, मला देवाची सेवा करावीशीही वाटत नव्हती. परंतु, मामांनी मला शाळेत पाठवले आणि मला उत्तम शिक्षण मात्र दिले. मी फ्रेंच भाषाही शिकलो. कालांतराने मी पोर्तुगीज भाषा देखील बोलायला शिकलो. शाळा संपल्यावर, लेपोल्डविल (सध्या किन्शासा) येथे मध्य रेडिओ केंद्रात मला रेडिओ टेलिग्राफिस्टची नोकरी मिळाली. त्यानंतर, २० वर्षांचा असताना माझा विवाह मारिया पोव्हा हिच्याशी झाला.
नवीन धार्मिक चळवळ
त्याच वर्षी म्हणजे १९४६ मध्ये, बॅप्टिस्ट चर्चमधील एका सुशिक्षित अंगोलन कॉयर चालकाचा माझ्यावर फार प्रभाव झाला. त्याला उत्तर अंगोलातल्या किकोंगो भाषिकांना शिकवण्याची आणि त्यांना वर आणण्याची फार उत्कट इच्छा होती. त्याला द किंग्डम, द होप ऑफ द वर्ल्ड या इंग्रजी पुस्तिकेचे पोर्तुगीज भाषांतर मिळाले होते; ही पुस्तिका वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीने प्रकाशित केली होती आणि यहोवाचे साक्षीदार तिचे वितरण करत होते.
या कॉयर चालकाने त्या पुस्तिकेचे भाषांतर किकोंगोत केले; बेल्जियन काँगोत काम करणाऱ्या आम्हा अंगोलन लोकांच्या एक गटासोबत साप्ताहिक बायबल चर्चा करण्यासाठी तो त्याचा उपयोग करत होता. नंतर, या कॉयर चालकाने अमेरिकेतल्या वॉच टावर संस्थेच्या मुख्यालयाला पत्र लिहून आणखीन साहित्य मागवून घेतले. परंतु, तो आम्हाला जी माहिती शिकवायचा त्यामध्ये चर्चच्या शिकवणी मिसळलेल्या असायच्या. त्यामुळे, खरा ख्रिस्ती धर्म कोणता आणि ख्रिस्ती धर्मजगताच्या अशास्त्रवचनीय शिकवणी कोणत्या यांमधला फरक मला स्पष्टपणे कळत नव्हता.
परंतु, मी हे निरीक्षण केले की, वॉचटावर संस्थेच्या साहित्यांमध्ये दिलेला बायबल संदेश आणि बॅप्टिस्ट चर्चमध्ये मी शिकत असलेल्या गोष्टी यांच्यामध्ये खूप फरक होता. उदाहरणार्थ, बायबलमध्ये देवाच्या यहोवा या व्यक्तिगत नावावर जोर दिला जातो आणि म्हणून खरे ख्रिस्ती उचितपणे स्वतःला यहोवाचे साक्षीदार म्हणवून घेतात. (स्तोत्र ८३:१८; यशया ४३:१०-१२) शिवाय, यहोवाची विश्वासूपणे सेवा करणाऱ्यांना परादीसमय पृथ्वीवर सार्वकालिक जीवन मिळण्याविषयी बायबलमध्ये जे अभिवचन दिले होते ते ऐकून मी खूप सुखावलो.—स्तोत्र ३७:२९; प्रकटीकरण २१:३-५.
मला बायबलविषयी फार कमी ज्ञान होते तरीही मला यिर्मया संदेष्ट्यासारखे वाटायचे की ज्याला यहोवा देवाविषयी इतरांना सांगण्याची इच्छा आवरता आली नाही. (यिर्मया २०:९) आमच्या बायबल अभ्यासाच्या गटातल्या सदस्यांनी मला घरोघरी जाऊन प्रचार करण्यात साथ दिली. माझ्या मामांच्या अंगणात मी जाहीर सभासुद्धा भरवत होतो आणि लोकांना बोलवायला मी निमंत्रणे टाईप करून घेत होतो. काहीवेळा तर चक्क ७८ उपस्थिती असायची. अशाप्रकारे, अंगोलन कॉयर चालकाच्या नेतृत्वाखाली एक नवीन धार्मिक चळवळ सुरू झाली.
माझे पहिले तुरुंगवास
बेल्जियन काँगोमध्ये वॉच टावर संस्थेशी निगडित असलेल्या कोणत्याही चळवळीला बंदी होती, हे मला मुळीच माहीत नव्हते. ऑक्टोबर २२, १९४९ रोजी आमच्यापैकी काहींना अटक करण्यात आले. चौकशीआधी न्यायाधीशाने मला वेगळे घेऊन माझी सुटका होऊ शकते असे सांगण्याचा प्रयत्न केला कारण मी सरकारी नोकर होतो हे त्याला ठाऊक होते. पण सुटका करण्यासाठी, आमच्या प्रचारामुळे तयार झालेली चळवळ मला सोडून द्यावी लागणार होती; त्याला मी नकार दिला.
तुरुंगात अडीच महिने घालवल्यावर अधिकाऱ्यांनी आमच्यातील अंगोलन लोकांना आपल्या देशी परत पाठवण्याचे ठरवले. पण अंगोलात आल्यावर पोर्तुगीज वसाहतीच्या अधिकाऱ्यांनाही आमच्या कार्याबद्दल शंका होती आणि म्हणून आमच्यावर बंदी घालण्यात आली. बेल्जियन काँगोतून आमच्या चळवळीतले आणखीन लोक आले; आम्ही एकूण १,००० हून अधिक लोक अंगोलात वेगवेगळ्या ठिकाणी राहत होतो.
काही काळानंतर, सिमोन किमबांगू या प्रसिद्ध धार्मिक नेत्याचे अनुयायी देखील आमच्या चळवळीत सामील झाले. या लोकांना वॉच टावर संस्थेच्या साहित्याचा अभ्यास करण्याची इच्छा नव्हती, कारण बायबलचे स्पष्टीकरण केवळ आत्मिक माध्यमाने मिळू शकते असा त्यांचा विश्वास होता. आमच्या चळवळीतल्या अधिकांश लोकांनी याचे समर्थन केले; आमच्या नेत्याने अर्थात कॉयर चालकाने देखील. यहोवाने वॉच टावर संस्थेच्या एका खऱ्या प्रतिनिधीशी आमची भेट घालून द्यावी अशी मी कळकळीने प्रार्थना केली. त्यामुळे कदाचित बायबल सत्य स्वीकारून अशास्त्रवचनीय रीतीरिवाज नाकारलेच पाहिजेत अशी आमच्या चळवळीतल्या सर्वांची खात्री पटवण्यात येईल अशी मला आशा वाटत होती.
आमच्यातील काहीजण करत असलेल्या प्रचार कार्याबद्दल आमच्या चळवळीतल्या इतरांनी तीव्र नापसंती दर्शवली. म्हणून त्यांनी आमची नावे अधिकाऱ्यांना सांगितली आणि आम्ही एका राजकीय चळवळीचे पुढारी आहोत असा आरोप आमच्यावर लावला. परिणामस्वरूप, १९५२ सालाच्या फेब्रुवारीत आमच्यातील पुष्कळांना अटक करण्यात आले; त्यांच्यामध्ये कार्लुस आगूस्टीन्यू काडी आणि साला रामोस फिलेमोन यांचाही समावेश होता. आम्हाला खिडक्या नसलेल्या एका कोठडीत डांबण्यात आले. परंतु, एक चांगला गार्ड होता; तो आमच्या पत्नींकडून आम्हाला जेवण आणून द्यायचा आणि त्याने एक टाईपरायटरसुद्धा आणून दिला होता; त्याच्यावरती आम्ही वॉच टावर संस्थेच्या पुस्तिकांच्या प्रती करत होतो.
तीन आठवड्यांनंतर आम्हाला बाईया दूस तिग्रेश या दक्षिण अंगोलातील वाळवंटी प्रदेशात पाठवले गेले. आमच्या पत्नीसुद्धा आमच्यासोबत होत्या. आम्हाला चार वर्षे सक्त मजुरीची शिक्षा देण्यात आली होती; आम्ही एका मच्छीमारी करणाऱ्या कंपनीसाठी काम करत होतो. बाईया दूस तिग्रेश येथे मच्छीमारीच्या बोटींकरता बंदर नव्हते, म्हणून आमच्या पत्नी सकाळपासून संध्याकाळपर्यंत बोटींमधल्या माशांचे ओझे वाहून आणायला पाण्यातून येरझाऱ्या घालत असत.
या तुरुंगात आम्हाला आमच्या चळवळीचे इतर सदस्य भेटले आणि आम्ही त्यांना बायबलचा अभ्यास चालू ठेवा असे सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना कॉयर चालक टोकोचेच अनुयायी राहायचे होते. कालांतराने त्यांना टोकोइस्ट्स हे नाव पडले.
दीर्घकाळापासून अपेक्षित असलेली भेट
बाईया दूस तिग्रेशमध्ये असताना, आम्हाला वॉच टावर संस्थेच्या उत्तर ऱ्होडेशिया (सध्या झांबिया) शाखेचा पत्ता मिळाला आणि आम्ही पत्राकरवी त्यांच्याकडून मदत मागितली. आमचे पत्र दक्षिण आफ्रिकेच्या शाखेला पाठवण्यात आले आणि त्यांनी आमच्यासोबत पत्रव्यवहार सुरू केला आणि आम्हाला बायबलच्या सत्याबद्दल आस्था कशी वाटू लागली असे त्यांनी विचारले. अमेरिकेतल्या वॉच टावर संस्थेच्या मुख्यालयाला आमच्याबद्दल कळवण्यात आले आणि मग एका खास प्रतिनिधीला आमच्याकडे पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यांचे नाव होते जॉन कुक; यांना परदेशांमध्ये मिशनरी कार्य करण्याचा बऱ्याच काळाचा अनुभव होता.
अंगोलात आल्यावर बंधू कुक यांना पोर्तुगीज अधिकाऱ्यांकडून आम्हाला भेटण्याची परवानगी मिळवण्यासाठी पुष्कळ आठवडे थांबून राहावे लागले. ते बाईया दूस तिग्रेश येथे मार्च २१, १९५५ रोजी पोहंचले आणि त्यांना आमच्यासोबत पाच दिवस राहण्याची परवानगी देण्यात आली. त्यांनी बायबलमधून दिलेल्या स्पष्टीकरणांनी माझे समाधान झाले आणि ते यहोवा देवाच्या एकमेव खऱ्या संघटनेचे प्रतिनिधीत्व करतात अशी माझी खात्री पटली. आपल्या भेटीच्या शेवटल्या दिवशी बंधू कुकने “राज्याची ही सुवार्ता” या विषयावर एक जाहीर भाषण दिले. एकूण ८२ लोक उपस्थित होते; बाईया दूस तिग्रेशचा मुख्य व्यवस्थापकही आला होता. उपस्थित असलेल्या सर्वांना भाषणाची एक छापील प्रत मिळाली.
अंगोलामध्ये पाच महिने असताना, बंधू कुक यांनी अनेक टोकोच्या अनुयायांशी आणि त्यांच्या पुढाऱ्याशीही संपर्क साधला. परंतु, त्यांतील बहुतेक लोकांना यहोवाचे साक्षीदार बनण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे, मला आणि माझ्या साथीदारांना वाटले की, आमच्या विश्वासाबद्दल आम्ही अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले पाहिजे. त्यासाठी आम्ही, “मॉसामेडेस जिल्ह्याचे मान्यवर गव्हर्नर” यांना उद्देशून जून ६, १९५६ या तारखेला एक औपचारिक पत्र लिहिले. त्यात आम्ही असे स्पष्ट केले होते की, टोकोच्या अनुयायांशी आमचा काहीही संबंध नाही आणि आम्हाला “यहोवाच्या साक्षीदारांच्या संस्थेचे सदस्य” समजावे. आम्हाला उपासना स्वातंत्र्य मिळावे अशीही त्यात विनंती केली. तथापि, आमची शिक्षा कमी होण्याऐवजी ती दोन वर्षे आणखी वाढवण्यात आली.
बाप्तिस्म्याआधीच्या घटना
शेवटी, ऑगस्ट १९५८ साली आमची सुटका झाली आणि ल्युआंडाला परतल्यावर तेथे यहोवाच्या साक्षीदारांचा एका लहानसा गट आम्हाला सापडला. मर्व्हन पास्लो नावाच्या एका मिशनऱ्यांनी एक वर्षाआधीच तो गट स्थापित केला होता; मर्व्हन पास्लो यांना जॉन कुक यांच्या जागी अंगोलात पाठवण्यात आले होते, पण आम्ही परतण्याआधीच त्यांना हद्दपार करण्यात आले. मग १९५९ साली, हॅरी आर्नट नावाचे आणखी एक यहोवाच्या साक्षीदारांचे मिशनरी आले. परंतु, विमानातून उतरताच त्यांना शिवाय त्यांची वाट पाहत असलेल्या आम्हा तिघांनाही अटक केले गेले.
मॅन्वेल गोन्सालवीश आणि बर्टा टेशेरा या अलीकडेच बाप्तिस्मा घेतलेल्या दोघांना पुन्हा सभा भरवायच्या नाहीत अशी ताकीद देऊन सोडून देण्यात आले. बंधू आर्नट यांना हद्दपार करण्यात आले आणि मला ताकीद दिली की, मी यापुढे साक्षीदार नाही असे एका कागदावर मी लिहून दिले नाही तर मला पुन्हा बाईया दूस तिग्रेश येथे पाठवण्यात येईल. सात तास माझी चौकशी केल्यानंतर कशावरही सही न देताच मला सोडण्यात आले. सरतेशेवटी एका आठवड्यानंतर मला बाप्तिस्मा घेता आला; माझ्यासोबत कार्लुस काडी आणि साला फिलेमोन या माझ्या मित्रांनीही बाप्तिस्मा घेतला. ल्युआंडाच्या मुसेके सामबीजांगा नावाच्या एका उपनगरात आम्ही एक खोली भाड्याने घेतली; अंगोलातल्या यहोवाच्या साक्षीदारांची तेथे पहिली मंडळी बनली.
आणखी जोरदार छळ
पुष्कळ आस्थेवाईक लोक सभांना उपस्थित राहू लागले. काहीजण आमची जासूसी करायला येत होते पण त्यांना सभा आवडल्या आणि नंतर तेच यहोवाचे साक्षीदार झाले! राजकारणात बदल होत होते आणि फेब्रुवारी ४, १९६१ रोजी राष्ट्रीयत्व भावनेने पेटलेल्या लोकांनी विद्रोह केल्यावर आमच्यासाठी परिस्थिती अधिकच कठीण झाली. आमच्याबद्दल खोट्या अफवा पसरवल्या जात असतानाही मार्च ३० रोजी आम्ही ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारकदिन साजरा करू शकलो आणि त्यासाठी १३० लोक उपस्थित राहिले होते.
जूनमध्ये, मी टेहळणी बुरूज अभ्यास घेत असताना लष्करी पोलिस आमच्या सभेत घुसून आले. बायकामुलांना सोडून देण्यात आले परंतु लेखाच्या अगदी सुरवातीला सांगितल्याप्रमाणे तेथे असलेल्या ३० पुरुषांना ते घेऊन गेले. आम्हाला सलग दोन तास काठ्यांनी खूप बदडले. त्यानंतर तीन महिने मला रक्ताच्या उलट्या होत होत्या. मला खात्री होती की मी जगणार नाही; मला ज्याने मारले होते त्याने मला खात्रीने म्हटले होते की मी जगणार नाही. मार खाल्लेले बाकीचे बहुतेक इतर बांधव नवीनच, बाप्तिस्मा न घेतलेले बायबल विद्यार्थी होते म्हणून मी त्यांच्यासाठी अगदी कळकळीने प्रार्थना केली की “यहोवा, आता तूच आपल्या मेंढरांची काळजी घे.”
पण यहोवाच्या कृपेने एकही बांधव मेला नाही; लष्करी अधिकाऱ्यांना तर याचे आश्चर्यच वाटले. यांपैकी काही सैनिकांनी तर हे पाहून देवाची स्तुती केली आणि उलट म्हणाले की देवानेच आम्हाला वाचवले होते! बहुतेक बायबल विद्यार्थ्यांनी नंतर बाप्तिस्मा घेतला आणि काहीजण आता ख्रिस्ती वडील म्हणून कामही करत आहेत. त्यांच्यापैकी एक, सीलव्हेशटर सीमाउ हे अंगोलाच्या शाखा समितीचे सदस्य आहेत.
नऊ वर्षांचा त्रास
लेखाच्या सुरवातीला सांगितल्याप्रमाणे, पुढची नऊ वर्षे मी भयंकर त्रास सहन केला; मला एका तुरुंगातून किंवा मजुरीच्या छावणीतून दुसरीकडे पाठवण्यात येत होते. या सर्व ठिकाणी मी राजकीय कैद्यांना साक्ष देऊ शकलो; त्यांपैकी पुष्कळजण आज बाप्तिस्माप्राप्त साक्षीदार आहेत. माझी पत्नी मारिया आणि आमच्या मुलांना माझ्यासोबत येण्याची परवानगी देण्यात आली.
आम्ही सर्पा पींटु मजुरीच्या छावणीत असताना, चार राजकीय कैद्यांना पळून जाताना पकडण्यात आले. पुन्हा कोणी पळून जाण्याचा विचारही करू नये म्हणून फार क्रूररितीने छळ करून त्यांना सर्व कैद्यांच्या समोर ठार मारण्यात आले. छावणीच्या अधिकाऱ्याने नंतर मारिया आणि माझ्या मुलांसमोर मला धमकी दिली: “तुला पुन्हा प्रचार करताना मी पकडलं तर त्या पळून जाणाऱ्यांची दशा केली तशी तुझीही करीन.”
शेवटी, नोव्हेंबर १९६६ मध्ये आम्हाला साउ निकुलाउच्या सर्वात भयानक मृत्यू छावणीत पाठवण्यात आले. मी तेथे गेलो आणि पाहतो तर काय, ज्या माणसाने साउ पाउलुच्या तुरुंगात मारून मारून माझा जीव काढला होता तोच माणूस, मि. सीड आमच्या छावणीचा व्यवस्थापक होता; मला तर धडकीच भरली! दर महिन्याला अशा कित्येक लोकांना पद्धतशीरपणे ठार मारले जायचे आणि माझ्या कुटुंबाला जबरदस्तीने ही क्रूर हत्या पाहायला लावायचे. परिणामस्वरूप, मारियाचे मानसिक संतुलन बिघडले आणि आजपर्यंत ती यातून पूर्णतः सावरलेली नाही. शेवटी, तिला आणि माझ्या मुलांना ल्युआंडाला पाठवण्याची परवानगी मला मिळवता आली; तेथे माझ्या दोन मोठ्या मुलींनी टेरेसा आणि जुआना यांनी त्यांची काळजी घेतली.
स्वतंत्र पण पुन्हा तुरुंगात
त्यानंतरच्या वर्षी, सप्टेंबर १९७० मध्ये माझी सुटका झाली आणि मी माझ्या कुटुंबाकडे आणि ल्युआंडातील बांधवांकडे जाऊ शकलो. मी नव्हतो त्या नऊ वर्षांमध्ये प्रचार कार्यामुळे किती प्रगती झाली होती हे पाहून माझ्या डोळे अश्रूंनी डबडबले. १९६१ साली मला तुरुंगात नेले तेव्हा ल्युआंडातील मंडळीत चार लहान लहान गट होते. पण आता तेथे चार मोठाल्या मंडळ्या झाल्या होत्या; त्या अगदी पद्धतशीर चालत होत्या आणि दर सहा महिन्यांनी यहोवाच्या संघटनेचा प्रवासी पर्यवेक्षक त्यांना भेट देऊन जात असे. माझी सुटका झाली म्हणून मला खूप खूप आनंद झाला होता पण तो आनंद फार काळ टिकला नाही.
एक दिवशी, सध्या कार्यरत नसलेल्या अन्वेषण आणि राज्य रक्षण पोलिस (पीआयडीई) विभागाच्या डायरेक्टर जनरलने मला बोलावून घेतले. माझी मुलगी जुआना हिच्यासमोर माझी फार स्तुती केल्यावर त्यांनी माझ्या हातात एक कागद देऊन त्यावर सही करायला सांगितले. मी पीआयडीईकरता खबऱ्या म्हणून काम करावे आणि मला पुष्कळ मालमत्ता दिली जाईल असे त्यात लिहिले होते. मी सही करायला नकार दिला तेव्हा मला पुन्हा साउ निकुलाउला पाठवले जाईल अशी धमकी देण्यात आली आणि असेही सांगण्यात आले की, यावेळी माझी कधीच सुटका होणार नाही.
जानेवारी १९७१ मध्ये, म्हणजे माझी सुटका होऊन फक्त चार महिन्यांनंतर त्यांनी ते खरेच करून दाखवले. ल्युआंडातील एकूण ३७ ख्रिस्ती वडिलांना अटक करण्यात आले आणि आम्हाला साउ निकुलाउला पाठवण्यात आले. तेथे ऑगस्ट १९७३ पर्यंत आम्हाला तुरुंगात ठेवण्यात आले.
सुटका तरीही छळ चालूच
सन १९७४ मध्ये पोर्तुगलमध्ये धार्मिक स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली आणि नंतर दूरदेशीच्या पोर्तुगीज प्रांतांनाही धार्मिक स्वातंत्र्य देण्यात आले. नोव्हेंबर ११, १९७५ रोजी, अंगोलाला पोर्तुगलपासून स्वातंत्र्य मिळाले. त्याच वर्षाच्या मार्च महिन्यात, अगदी स्वतंत्रपणे विभागीय संमेलने भरवण्यात आम्हाला केवढा आनंद झाला होता! ल्युआंडा येथील स्पोट्र्स सिटाडेल येथील संमेलनात जाहीर भाषण देण्याची सुसंधी मला प्राप्त झाली.
परंतु, नवीन सरकाराने आमच्या तटस्थ भूमिकेचा विरोध केला आणि सबंध अंगोलात मुलकी युद्ध सुरू झाले. परिस्थिती इतकी बिकट झाली की, गोऱ्या साक्षीदारांना देश सोडून जायला भाग पाडले गेले. यहोवाच्या साक्षीदारांच्या पोर्तुगल शाखेच्या निर्देशनाखाली अंगोलातल्या प्रचाराच्या कार्याची देखरेख करण्यासाठी आम्हापैकी तीन स्थानिक बांधवांना नेमण्यात आले.
लवकरच वृत्तपत्रांमध्ये आणि रेडिओवरही माझ्या नावाची घोषणा होऊ लागली. मी आंतरराष्ट्रीय साम्राज्यवादाचा प्रतिनिधी आहे आणि अंगोलातील साक्षीदार शस्त्रे वापरायला तयार नाहीत त्यासाठी मी जबाबदार आहे असे आरोप माझ्यावर लावण्यात येऊ लागले. परिणामतः, मला ल्युआंडा प्रांताच्या पहिल्या गव्हर्नरसमोर हजर राहावे लागले. आदरपूर्वक मी त्यांना हे समजावून सांगितले की, जगभरात यहोवाच्या साक्षीदारांची अशी तटस्थ भूमिका आहे आणि येशू ख्रिस्ताच्या प्रारंभिक अनुयायांचीही हीच भूमिका होती. (यशया २:४; मत्तय २६:५२) वसाहती सत्तेदरम्यान मी १७ हून अधिक वर्षे तुरुंगांमध्ये आणि मजुरीच्या छावण्यांमध्ये घालवली होती असे सांगितल्यावर त्यांनी मला अटक केली नाही.
त्या काळी, अंगोलामध्ये यहोवाचा साक्षीदार म्हणून सेवा करायला धैर्य लागायचे. माझ्या घरावर पाळत ठेवली होती म्हणून तिथल्या सभा आम्हाला थांबवाव्या लागल्या. पण प्रेषित पौलाने सांगितल्याप्रमाणे, “आम्हावर चोहोकडून संकटे आली तरी आमचा कोंडमारा झाला नाही.” (२ करिंथकर ४:८) आमच्या सेवाकार्यात आम्ही कधीच अक्रियाशील झालो नाही. मी प्रचार कार्य जारी ठेवले आणि बेंग्वेला, वीला आणि वाम्बो प्रांतातील मंडळ्यांना दृढ करत प्रवासी पर्यवेक्षक म्हणून सेवा करत राहिलो. त्या वेळी मी बंधू फिलेमोन हे नाव धारण करून जात असे.
मार्च १९७८ साली आमच्या प्रचारकार्यावर पुन्हा एकदा बंदी आली आणि मला विश्वसनीय सूत्रांकडून अशी माहिती मिळाली की, क्रांतीकाऱ्यांनी मला ठार मारायचे ठरवले होते. म्हणून मी नायजेरियाच्या एका साक्षीदाराच्या घरात आसरा घेतला; ते बांधव अंगोलातल्या नायजेरियन वकिलातीत नोकरीला होते. एका महिन्यानंतर, सगळे काही शांत झाल्यावर मी विभागीय पर्यवेक्षक या नात्याने बांधवांची सेवा करू लागलो.
बंदी आणि मुलकी युद्ध असूनही हजारो अंगोलन लोकांनी आमच्या प्रचाराला प्रतिसाद दिला. साक्षीदारांच्या संख्येत विलक्षण वाढ होत असल्यामुळे पोर्तुगल शाखा दप्तराच्या निर्देशनाखाली अंगोलातल्या प्रचार कार्याची काळजी घेण्यासाठी एक राष्ट्र समिती नेमण्यात आली. या काळादरम्यान, मी पुष्कळदा पोर्तुगलला जाऊन आलो; तेथे मला प्रशिक्षित सेवकांकडून मौल्यवान शिक्षण मिळाले त्याचप्रमाणे वैद्यकीय मदतही मिळाली.
सरतेशेवटी प्रचारासाठी स्वातंत्र्य!
मी मजुरीच्या छावण्यांमध्ये असताना राजकीय कैदी माझी थट्टा करून म्हणायचे की मी प्रचाराचे काम असेच चालू ठेवले तर माझी सुटका कधीच होणार नाही. पण मी त्यांना उत्तर द्यायचो: “अद्याप यहोवाचा दार उघडण्याचा समय आलेला नाही, तो येईल तेव्हा कोणीही हे दार बंद करू शकणार नाही.” (१ करिंथकर १६:९; प्रकटीकरण ३:८) १९९१ साली सोव्हिएत युनियनचा पाडाव झाल्यावर कोणत्याही बंदीविना प्रचार करण्याची संधी आणखी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाली. त्यावेळी अंगोलात आम्ही जास्त प्रमाणात उपासनेचे स्वातंत्र्य अनुभवू लागलो. १९९२ साली यहोवाच्या साक्षीदारांचे कार्य कायदेशीर करण्यात आले. शेवटी, १९९६ साली, अंगोलामध्ये यहोवाच्या साक्षीदारांची एक शाखा स्थापण्यात आली आणि मला तेथील शाखा समितीचा सदस्य म्हणून नेमण्यात आले.
मी तुरुंगात असताना, कशीबशी माझ्या कुटुंबाची काळजी घेतली जात होती. आम्हाला सहा मुले होती, त्यांतली पाच अजूनही जिवंत आहेत. आमची लाडकी जुआना मागच्या वर्षी कर्करोगाने मरण पावली. आमची बाकीची चार मुले बाप्तिस्माप्राप्त साक्षीदार आहेत पण आमच्या एका मुलाने अद्याप बाप्तिस्मा घेतलेला नाही.
सन १९५५ मध्ये, बंधू कुक आम्हाला भेटायला आले होते तेव्हा, देवाच्या राज्याच्या सुवार्तेची घोषणा करणारे फक्त चार अंगोलन होते. पण आज या देशात ३८,००० हून जास्त राज्य प्रचारक आहेत आणि ते दर महिन्याला ६७,००० हून अधिक बायबल अभ्यास चालवत आहेत. सुवार्तेचा प्रचार करणाऱ्या त्या लोकांपैकी असे पुष्कळजण आहेत ज्यांनी आधी आमचा छळ केला होता. या सर्वातून केवढे प्रतिफळ मिळाले, आणि यहोवाने मला जिवंत ठेवले आहे आणि त्याच्या वचनाची घोषणा करण्याची उत्कट इच्छा पूर्ण करण्याची मला अनुमती दिली आहे यासाठी मी यहोवाचा फार आभारी आहे!—यशया ४३:१२; मत्तय २४:१४.
[२२, २३ पानांवरील नकाशा]
(For fully formatted text, see publication)
काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक
किन्शासा
अंगोला
माकेला दू झोंबो
ल्युआंडा
साउ निकुलाउ (सध्या बेन्टीआबा)
मॉसामेडेस (सध्या नामीबे)
बाईया दूस तिग्रेश
सर्पा पींटु (सध्या मनोंगे)
[चित्राचे श्रेय]
Mountain High Maps® Copyright © 1997 Digital Wisdom, Inc.
[२४, २५ पानांवरील चित्रं]
खाली: १९५५ साली जॉन कुक यांच्यासोबत. साला फिलेमोन डावीकडे
उजवीकडे: ४२ वर्षांनंतर जॉन कुक यांच्याशी पुन्हा भेट
[२५ पानांवरील चित्र]
माझी पत्नी मारिया हिच्यासोबत